Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Jul 7, 2017

संपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण?

संपादकीय : अंगारमळा - वर्ष १, अंक २ : मार्च २०१७

खरा शेती साहित्यिक कोण?

शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यार्‍या लढवैय्यांसाठी हातात नांगर धरल्याची अनुभूती असणे नक्कीच महत्त्वाचे असले तरी अनिवार्य नाही. एखाद्याच्या नावाने सात-बारा असला किंवा तो प्रत्यक्षात शेतीत राबत असला म्हणजे तो शेती आणि शेतकर्‍यांचा हितचिंतकच असतो, असेही समजण्याचे कारण नाही. इथे स्वार्थ आणि परमार्थाचे व्दंद उभे राहते. शेतीची बाजू घेऊन लढायचे असेल तर निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कटिबद्धता महत्त्वाची असते. स्वत: शेतीवर राबून शेतीवर उपजीविका असणार्‍याला शेतकरी म्हणता येईल; नव्हे तोच खराखुरा शेतकरी. पण शेतकरी असला म्हणजे तो समग्र शेतीच्या भल्यासाठी वैश्विकतेच्या भावनेतून सद्भावना बाळगून असतोच, शेतीचे प्रश्न सुटून समग्र शेतकर्‍यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे जीवन खेचून आणणारे व्यवस्था परिवर्तन व्हावे असा व्यापक विचार करत असतोच, असा गैरसमज करून घेण्याचेही कारण नाही. शेती कसणे हा त्याचा व्यवसाय आहे, कदाचित अन्य कोणतेच पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध नसल्याने नाईलाजाने उपजीविकेचे साधन म्हणून शेती कसत राहणे व मरता येत नाही म्हणून जगत राहणे अथवा जगण्याच्या सर्व वाटा समाप्त झाल्या तर स्वत:चे जीवन संपवण्यास सिद्ध होणे, हीच एकंदरीत शेतकर्‍याची जीवनशैली झाली आहे, असेही म्हणता येईल. 
मात्र शेतीची बाजू मांडायची असेल तर शेतकरी असणे किंवा नसणे फारसे महत्त्वाचे नाही. मागील ३० वर्षाचा इतिहास तपासला तर नेमके हेच आढळून येते. ज्यांच्याकडे सातपिढ्यापासून शेती नव्हती, शेतीच्या उत्पन्नावर उपजीविका अवलंबून नव्हती, शेतकर्‍यांच्या पोटी जन्मही घेतला नव्हता तरी त्यांनी "शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस उजाडावा" म्हणून घरादारावर तुळशीपत्र ठेवून शेतकरी आंदोलनात स्वत:ला झोकून दिले होते, अनेकांनी स्वत:च्या आयुष्याची होळी आणि संसाराची राखरांगोळी केली होती, हजारो तुरुंगात गेले होते, हजारोंनी निधड्या छातीवर पोलिसांच्या लाठ्या झेलल्या होत्या. शेकडोंनी बंदुकीच्या गोळ्यांसमोर स्वत:ची छाती आडवी धरली होती. मात्र त्याच वेळी स्वत:ला शेतकरी म्हणवणारे करोडो शेतकरी पुत्र मात्र शेतकरी आंदोलनाशी प्रतारणा करत आपापल्या जातीच्या पुढार्‍यांचे धोतर धूत बसले होते. हा अगदी ताजा इतिहास आहे.
विषय शेतकरी आंदोलनाचा असो किंवा शेती साहित्य चळवळीचा. वास्तव कटु असले तरी ते स्वीकारलेच पाहिजे. शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेतला असला किंवा नावाने सात-बारा असला तरी हा निकष लावून कोणत्याच निष्कर्षाप्रत पोचता येत नाही. फक्त सातबारा नावाने असला म्हणजे तो शेतकरी आंदोलक ठरत नाही; तद्वतच शेती साहित्यिकही ठरत नाही. संबंधित व्यक्तीची शेती विषयासोबत असलेली बांधिलकी, शेतीच्या अर्थवादाचा अभ्यास, कटिबद्धता आणि प्रसंगी त्यासाठी सर्वस्व पणाला लावू शकणारी त्यागी वृत्तीच इथे महत्त्वाची; भले मग तो शेतकर्‍याच्या घरात जन्मलेला असो अथवा नसो! लेखणीतून व्यक्त होणारा आशय शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा आहे की शेतीचा प्रश्न आणखी किचकट करून शेतीच्या शोषकांना पोषक ठरणारा आहे यावरूनच साहित्यिकाची जातकुळी ठरवली गेली पाहिजे.

- गंगाधर मुटे
   २०/०२/२०१६

************************************************
पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
***********************************************
अंगारमळा वार्षिक वर्गणी - रु.१५०/-
वर्गणी ऑनलाईन भरण्यासाठी:
A/c Name - ANGARMALA
A/c No - 0202002100027538
Punjab National Bank Branch - Hinganghat (Wardha)
MICR Code - 442024005 IFSC Code - PUNB0020200


वर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:
अंगारमळा
मु.पो.आर्वी (छोटी)
ता. हिंगणघाट जी. वर्धा पिनकोड - ४४२३०७


0 प्रतिसाद:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं