शेतकरी कुणाला म्हणावे?
प्रश्न :- शेतकरी कुणाला म्हणावे?
उत्तर :- या निमित्ताने येथे आपण ज्या शेतकरी घटकाबद्दल चर्चा करतोय,ज्याला केंद्र बिंदू ठेवून चर्चा करतो आहे, त्या " शेतकरी Model " ची व्याख्या करावी लागेल.
जो सावकारकीचा व्यवसाय करतो, इतर व्यवसाय करतो, खरेदी-विक्री संस्था सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, राजकीय पक्षांचे पुढारी, शाळा - संस्था चालक, सरकारी कर्मचारी यांच्या नावाने ७/१२ चा उतारा असला, तरी त्यांचे पोट शेतीवर अवलंबून राहात नाही. शेतीतील दाहकतेचे चटकेही यांना बसत नाही. शासनात असणारे काही मंत्री सुद्धा शेतकरीच असतात म्हणून कुणी म्हणेल "तो मंत्री सुद्धा शेतकरीच आहे, त्याची शेती जावून बघा कसे भरमसाठ उत्पन्न घेतो आणि कसा हायक्लास जीवन जगतो, त्याचा आदर्श घ्या." तर ते संयुक्तिक ठरणार नाही. शेतीखेरीज अन्य मार्गाने उत्पन्न मिळवून कुणी स्वत:ला प्रगत, आदर्श किंवा कृषीनिष्ठ वगैरे समजत असतील तर समजू द्या पण शेतीच्या दुर्दशेचे मूळ शोधतांना आपण यांना "Model शेतकरी" म्हणून अशांना अजिबात निवडू नये असे माझे व्यक्तिगत मत आहे. कारण त्यामुळे आपले निदान आणि निष्कर्ष दोन्हीही चुकीचे ठरू शकते.
म्हणून "जो निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर उपजिविका करतो तोच शेतकरी." (कदाचित त्याच्या नावाने ७/१२ नसला तरीही ).
अशी व्याख्या करणेच योग्य ठरेल.
....... गंगाधर मुटे
....................................................................
प्रश्न :- मुळात शेतकरी हा परंपरा आणी रीतीरीवाज यातच पुर्ण बुडालेला आहे, नविन काही प्रयोग करायचा म्ह्टले की पहिले नकारार्थी शब्दापासुन सुरवात होते.
.
उत्तर :- आपण असे हताश होवुन कसे चालेल?
बिचारा शेतकरी आर्थिक विचारात एवढा गुंतलेला असतो की त्याला त्याची कैफियत मांडायला फुरसतच नसते, शेतीत प्रयोग करायचे म्हटले तर त्याचा पुरस्कार 'आत्महत्या' असतो. फरक एवढाच की 'शुभ हस्ते' दोर आवळायला पंतप्रधान किंवा मंत्री येत नाही, ज्याचा दोर त्यालाच आवळावा लागतो. त्याला हे कळते म्हणुन तो फारसा स्वतः आखुन घेतलेल्या परीघाबाहेर जात नाही.
परीघाबाहेर (प्रयोग) जावुन ज्यांनी शेती केली त्यांना कर्ज फेडतांना विकायला घराचे कवेलुही पुरले नाहीत. अशी उदाहरणे प्रत्येक गावात पावलोपावली सापडतात. मग तो जर तो "अंथरुन पाहुन पाय पसरावे" या न्यायाने वागत असेल तर तो त्याचा समजुतदारपणा आहे.
शेतीत नवनवे प्रयोग करु पाहणार्या शहाण्यांच्या शहाणपणाचे "धिंडवडे" निघतांना पाहीलेला कोणताही बाप, आपला मुलगा त्या मार्गाने जावु नये, गांवाबाहेर जावुन हमाली केली, रिक्शा चालवली तरी चालेल पण इज्जतीने/इभ्रतीने जगावा अशी अपेक्षा प्रत्येक बाप करित असतो. हे प्रत्येक गावाचे चित्र आहे. मग त्याला नकारार्थी किंवा रुढीवादी कसे म्हणता येइल ?.
शेतकरी त्याच्या आर्थिक हलाखीत एवढा गुरफटला की स्वतःची कैफियत मांडण्याचे बळ त्याच्यात उरलेले नाही. तो आर्थीकरित्या पुर्णपणे पराधिन (गुलाम) झालेला आहे, बँकेचे किंवा सावकाराकडुन कर्ज काढल्याखेरीज, किराना,कापड,कृषी केंद्रातुन उधारवाडी नेल्याखेरीज त्याचे नित्याचे व्यवहार चालत नाही. दुसर्याच्या दारात गेल्याशिवाय, पाय धरल्याशिवाय ज्याची चुल पेटत नाही तो स्वत:च्या समस्या कसा मांडणार/सोडवणार?
आपण आता शेतकरी राहीलो नाही कारण आपले पोट शेतीवर अवलंबुन नाही पण आपण शेतकरी पुत्र आहोत. गावातील दारिद्र्य आणी गावाबाहेरचे वैभव आपण अनुभवले आहे.त्यामुळे एका बाजुला जनावरासारखे कष्ट करुनही अठराविश्व दरिद्र्य आणी दुसर्या बाजुला तुलनेने कमी कष्ट करुनही वैभव असे का घडते याचा शोध घेण्याचे, छडा लावण्याचे प्रयत्न करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजायला पाहीजे. आणि हे कार्य आपल्या हातुन घडत असेल तर आपण स्वतःला भाग्यशाली समजले पाहिजे.
कधिकधी ज्याचं जळतं त्याच त्याला काहीच दिसत नाही, ते इतरांना अधिक स्पष्ट कळतं, म्हणुन त्यांचे आकलनही अधिक परिणामकारक ठरते. आणि म्हणुन कधिही चर्चेला निरुपयोगी म्हणता येत नाही.
आपण हे कार्य जिवाभावाने करीत राहीले पाहिजे.करता करता एक दिवस नक्किच यांतुन मार्ग निघेल,अशी
आपण आशा करुया.
गंगाधर मुटे
...........................................................
3 days ago