Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Feb 13, 2017

सामान्य चायवाला

सामान्य चायवाला

जिंकावया जगाला ऐटीत तो निघाला
मुलखात मुद्रिकेच्या अलगद शिकार झाला

मज रानटी समजला तेही बरेच झाले
कसदार रानमेवा मी चारतोच त्याला

ना घाम गाळला अन ना रक्त आटविले
कोणी कुणा पुसेना पैसा कुठून आला?

मी मेघ बाष्पधारी वणव्याकडे निघालो
लांबी-परीघ-रुंदी मोजत बसू कशाला?

धनवान इंडियाची बलवान लोकशाही
होतो प्रधानमंत्री सामान्य चायवाला

शिर्षस्थ पाखरांच्या चोची चरून झाल्या
की धाडतील नक्की आमंत्रणे तुम्हाला

ज्यांचे अभय पहारे ते मारतात बाजी
पुसणार कोण येथे निद्रिस्त जागल्याला?

                            - गंगाधर मुटे 'अभय'
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

Feb 10, 2017

सोज्वळ मदिरा

सोज्वळ मदिरा

आधी खाते भाव जराशी
मग ती घेते नाव जराशी

तू नसण्याने भिकार झाले
बघून ये तू गाव जराशी

चाल रडी पण; लोभसवाणी
खेळ आणखी डाव जराशी

आढे वेढे हवे कशाला
थेटच दे ना ठाव जराशी

खुळ्या स्मृतींना जपण्यासाठी
निदान दे तू घाव जराशी

उत स्वप्नांचा पाडा आला
लगबग ये चल घाव जराशी

मम श्वासाची कपोलभाती
ओठावरती लाव जराशी

अभय नशेची सोज्वळ मदिरा
दे चढण्याला वाव जराशी

               - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Feb 1, 2017

राष्ट्रपिता महात्म्याला साकडेनिवेदन

राष्ट्रपिता महात्म्याला साकडेनिवेदन

परमपुज्यनीय बापू,
आपण या देशातील सामान्यातील सामान्य जनतेला, शेतकरी व कष्टकरी ग्रामस्थांना स्वराज्य आणि सुराज्य मिळावे याकरिता वेगवेगळे आंदोलन व सत्याग्रह करुन स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताच्या दुर्दवाने गोर्‍या इंग्रजांना घालवल्यानंतर आपण अधिक काळ जगू शकले नाहीत.
स्वातंत्र्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी आपली ग्रामस्वराज्याची व ग्रामविकासाची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली नाही. उलट ग्रामजन आर्थिक गुलामित टाकण्याचे धोरण आखले. ग्रामविकासाचे मर्म शेतीच्या आर्थिक विकासात आहे, गाव आर्थिक संपन्न झाला तर देश संपन्न होईल, या संकल्पनेचा विचार न करता भारतीय शेतकर्‍यांना शेतीविरोधी कायद्याच्या जाळ्यात बेमालुमपणे अडकवले. देशासाठी त्याग करा असे सांगून आपल्या वैचारिक वारसदारांनी शेतकर्‍यांना अधिक पिकवायला सांगून आणि पिकवलेला शेतमाल नगण्य किंमतीत विकला जाईल याचा कायदेशीर बंदोबस्त करुन शेतकर्‍यांना कर्जाच्या खाईत ढकलले. शेती व शेतकरी विरोधी कायदे करुन व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन गावात बचत उरणारच नाही अशी चिरेबंदी व्यवस्था निर्माण केली त्यामुळे ग्रामीण भारतात उद्योग उभारणी होऊ शकली नाही.
गेली ६५ वर्षे नवनवीन उद्योगांची चैत्रगौर मांडून देश बाह्यदर्शनी सजवल्याने अंतर्गत देश पोखरून ’शायनिंग इंडिया’ विरुद्ध ’भकास भारत’ असे चित्र निर्माण झाले. आर्थिक विकासाचा कणा असलेला देशाचा पोशिंद्याची बाजारातली आर्थिक पत संपल्याने व त्याच्या समोरील जीवन जगण्याचे सर्व पर्याय संपल्याने आत्महत्त्या करायला लागला. शेतमालाचे उत्पादन खर्च भरुन निघतील इतके भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी शेतमाल स्वस्तात स्वस्त लुटून सुट-सबसिडीचा खुळखुळा वाजवण्यात आला. एकजात सर्वच राजकिय पक्षांची भूमिका समसमानच राहिल्याने शेती हा तोट्याचा व्यवसाय व कर्जबाजारी शेतकर्‍यांची पिढी तयार करणारा कारखाना झाला. आर्थिक विषमतेच्या सतत रुंदावत जाणार्‍या दरीमुळे आता भारत एकसंघ आणि अखंड राहिलेला नसून “इंडिया आणि भारत” असा विभागला गेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात विलायतेचा गुलाम असलेला भारत आता स्वातंत्र्योत्तर काळात इंडियाचा गुलाम झालेला आहे.

हे राष्ट्रपित्या,
शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्‍यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्‍या सर्व राजकीय पक्षांची आम्ही तुमच्याकडे तक्रार दाखल करत आहोत, 

ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण उत्थानासाठी युगात्मा शरद जोशी प्रणीत भारत उत्थान कार्यक्रम (मार्शल प्लॅन) अंमलात आणण्यासाठी..... 

शेती व शेतजमिनीसंबंधी दंडाबेडी ठरलेले समाजवादी कायदे (१) कमाल जमीन धारणा कायदा व सिलिंग कायदा (२) आवश्यक वस्तूंचा कायदा (३) सक्तीचा जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्यासाठी....  
शेतीसंबंधी बाजार व प्रक्रियेतील सर्व अडथळे काढून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यातील हस्तक्षेप संपवण्यासाठी..... 
ग्रामीण क्षेत्रासाठी रस्ते, वीज, पाणी साठवणूक व प्रक्रिया वाहतूक, विपणन, माहिती तंत्रज्ञान व प्रयोगशाळा आदी आवश्यक संरचना निर्माण करण्यासाठी.... 
"तूट नसतानाही आयात व मुबलकता असतानाही निर्यातबंदी" या शेतकरी विरोधी नितिचा विरोध करण्यासाठी....  
 • पूर्ण दाबाची पूर्ण वेळ वीज, मागेल त्याला तात्काळ नवीन वीजजोडणी, वीजबिलातून शेतकर्‍यांची सरसकट वीज बील मुक्ती मिळण्यासाठी...
उच्चशिक्षितांची वाढती बेरोजगारी लक्षात घेता ग्रामीण युवकांना शेती व्यवसायातूनच रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शेतीमध्येच भांडवलनिर्मिती होऊ शकेल असे शेती अनुकूल धोरण आखून त्याची अमंलबजावणी करण्यासाठी....  
देशाची उन्नती होण्याकरिता अंतर्गत बाजारपेठेचा विकास होणे गरजेचे असते. भारत भकास ठेऊन देशाचा विकास करु पाहणार्‍या अर्थनितीचा लगाम खेचण्यासाठी.... 
शेतकर्‍यांना संपत्ती बाळगण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ संविधानाची पुनर्स्थापना करण्यासाठी.... 
यासाठी, “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी प्रार्थना करुन तूच शेतकर्‍यांना आणि पर्यायाने या देशाला वाचव, असे समस्त भारतीय शेतकर्‍यांचे आर्जव तुमच्या चरणी गार्‍हाणे स्वरुपात सादर करत आहोत.

समस्त भारतीय शेतकर्‍यांच्या वतिने : सौ. सरोजताई काशीकर, अनिल घनवट, गंगाधर मुटे, सौ. शैलजा देशपांडे, सौ. गीता खांदेभराड, सतिश दाणी, सिमा नरोडे, मदन कामडी, गोविंद जोशी, सौ. अंजली पातुरकर, सरदार भुपेंद्रसिग मान,  किसान सुब्रतो त्रिपाठी आणि समस्त शेतकरी संघटनेचे पाईक

दिनांक : ३० जानेवारी २०१७
*************
बापू कुटी समोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात ३० जानेवारी २०१७, सोमवारी दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत संपन्न झालेल्या शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे या आंदोलनात सांगली, सातारा व सोलापूर हे तीन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून ३००० हजार शेतकरी उपस्थित झाले होते. सभेच्या सुरुवातीला दोन मिनिटे उभे राहून बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बापूंच्या आवडीचे "रघुपती राघव राजाराम" आणि "वैष्णव जन तो तेने कहिये" या भजनांचे दत्ता राऊत आणि संच यांनी गायन केले त्यास उपस्थितांनी आवाजात आवाज मिसळून तालासुरात सामुहिक गायन केले. साकडे आंदोलनाची रुपरेषा विशद करण्यासाठी झालेल्या सभेस सतिश दाणी, मदन कामडे, सिमा नरोडे, गीता खांदेभराड, अ‍ॅड दिनेश शर्मा, मध्य प्रदेशचे किसान सुब्रतो त्रिपाठी, किसान समन्वय समितीचे अध्यक्ष, माजी खासदार भुपेंद्रसिंग मान, सरोजताई काशीकर, अ‍ॅड वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वर्धा जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तर संचालन प्रा. पांडुरंग भालशंकर यांनी केले. 
 *************
स्वत: शेतकरी संघटनेच्या कामकाजात प्रत्यक्ष भाग न घेता निस्वार्थीपणे कौटुंबिक जबाबदारी सांभाळत कुटुंबातील दुसर्‍या सदस्यांना कौंटुंबिक जबाबदारीपासून मोकळीक देत व शेतकरी संघटनेच्या पूर्णवेळ कार्यासाठी प्रोत्साहन देत पडद्यामागे राहून कार्य करणार्‍या व्यक्तींना यथोचित सत्कार म्हणून "कृतज्ञता पुरस्कार" देण्याचा नांदेड येथे संपन्न झालेल्या शेतकरी संघटनेच्या १३ व्या संयुक्त अधिवेशनाच्या आयोजक समितीने निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिला पुरस्कार सौ. शालुताई सुरेंद्र काशीकर यांना प्रदान करण्यात आला. शालुताई काशिकर यांना सरदार भुपेंद्रसिंग मान "कृतज्ञता पुरस्कार" प्रदान करताना. 
*************
क्षणचित्रे : 
* सरकारला जागविण्यासाठी सेवाग्राम येथून आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे. १ आणि २ मार्च रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. त्यात जिल्हा पातळीवरील आंदोलनांची घोषणा होईल. 
* आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सेवाग्राम ते साबरमती अशी रॅली काढून करण्यात येणार आहे. 
* दुरवरचे कार्यकर्ते सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी पोचायला लागल्याने आश्रम परिसर फ़ुलायला लागला होता. * शेतकरी कार्यकर्त्यांची शिस्तबद्धता स्थानिक जनतेच्या कुतुहलाचा विषय झाली होती. 
* अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाल्याने कर्यकर्त्यामध्ये नव्याने उत्साह संचारल्याचे जाणवत होते. 
 *************

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं