Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

बळीराजा डॉट कॉमळीराजा डॉट कॉम

पिढोन्-पिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
...............................................................................

माझ्याबद्दल थोडेसे..


नमस्कार मित्रहो..

ही माझी छोटीसी दुनिया…
माझ्या छोट्याशा दुनियेत आपले मन:पूर्वक स्वागत..
मित्रहो,

                तीन हजारच्या आसपास लोकसंख्या असलेलं एक माझं छोटासा गाव. जन्म आणि बालपण येथेच गेलेलं. महाविद्यालयीन शिक्षण व त्यानंतर मार्केटिंग क्षेत्रात नोकरी करताना थोडाफ़ार काळ शहरात गेलेला. पण काही अपरिहार्यतेमुळे पुन्हा गावाकडे पावले वळली आणि येथे स्थायिक झालो तो कायमचाच.
कविता,गाणी व भजने लिहिण्याची बालपणी खुप आवड होती. मजा वाटायची, आनंद लुटायचो पण बालपण संपायच्या आतच ’भाकरीचे प्रश्न’ निर्माण झालेत आणि ’भाकरीचा शोध’ घेता-घेता उरलेलं बालपण,तरुणपण यांची पुरती वाट लागली, अगदी जळून राख झाली. आणि त्यासोबतच कविता,गाणी व भजने लिहिण्याची ऊर्मी,प्रेरणा कुठे व कशी गहाळ झाली ते कसे म्हणून कळलेच नाही.


“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली, तारुण्य जळताना.”


अशी ’आयुष्य कोमात’ गेलेली अवस्था दोन-चार वर्षे नव्हे तर चक्क दोन तपाला पुरून उरेल एवढा काळ कायम होती.
काळाच्या प्रवाहात भाकरीचा प्रश्न सुटला. आयुष्यात जे जे हवे ते ते मिळाले. पण कविता करण्याची प्रेरणा मात्र करपूनच गेली होती. मी कवितेला अन कवितेने मला पूर्णतः: एकमेकांना विसरलोच होतो.पाऊलखुणा सुद्धा उरल्या नव्हत्या. याजन्मी भेटगाठ होईल असेही वाटलेच नव्हते कधी.
एका अर्थाने आयुष्य संपलेच होते.

*  *  *  *  *

पण …..
पण आयुष्याने पुन्हा एकदा कोलांटउडी घेतली आणि "नव्हत्याचे होते" झाले. दोन तपाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मी लिहिता झालो.

मित्रहो,

मी हाडाचा ना कवी ना लेखक.
मी आहे एक हाडा-मांसा-रक्ताचा शेतकरी.
शेतकरी कुटुंबात जगतांना मी जे काही पाहिलं, अनुभवलं,
काही माझ्या वाट्याला आलेली माझी अनुभुती, माझी अभिव्यक्ती, त्यासोबतच काही इतरांच्या वाट्याला आलेल्या व्यथा; पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या.
ते बरं-वाईट वास्तव प्रामाणिकपणे चितारण्याचा प्रयत्न करतोय.
आपल्या मर्यादा सांभाळून व्यक्त होण्याची एक धडपड करतोय.
त्यासोबत काही न उलगडलेली उत्तरे शोधायचा प्रयत्नही करतोय.
हे जग फार झपाट्याने बदलत आहे, संगणकीय तंत्रज्ञानाने गरूड झेप घेतली आहे. जीवन जगण्याच्या परिभाषा बदलत आहेत, विकास आणि विलासाच्या व्याख्या बदलत आहेत.
मात्र दुर्दैवाने ही सर्व विकासाची परिमाणे बिगरशेतीक्षेत्रातच तेवढी बदलत आहेत. बहुसंख्येने असणारा शेतकरी समाज व इतर कष्टकरी समाज अजूनही अंधारातच चाचपडत आहे, विकासाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा कल्पना केवळ वल्गना ठरत आहेत.

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो, कांदा न भाकरी

हे चित्र बदलण्याची गरज आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायची गरज आहे पण ....

जोडे सजावटीला एसी कपाट ते
भाजी-फळास जागा मात्र उघड्यावरी

ज्या देशाची ध्येयधोरणे बिगरशेतीउद्योगाला पूरक आणि शेतीला मारक असतील आणि वरून "कृषिप्रधान देश" म्हणून डंका पिटला जात असेल त्या देशात गरिबी आणि अठराविश्व दारिद्र्य यांचेच अमाप पीक येणार हे उघड आहे.

*  *  *  *  *

मी कवी नाही कारण कविता लिहायला लागणारी प्रतिभा आणि कल्पनाविलास माझ्याकडे नाही.
मी लेखक नाही कारण लेखनकौशल्य आणि साहित्यिक दर्जा माझ्याकडे नाही.
आणि तरीही लिहिण्याचा प्रयत्न करतोय..
कारण मला आता शेतीच्या दुर्दशेला वाचा फोडायची आहे.
या प्रचलित व्यवस्थेने धुत्कारलेल्या आणि माणूस म्हणून माणसासारखे जीवन जगण्याचा अधिकार नाकारलेल्या शोषित समाजाच्या व्यथांना चव्हाट्यावर मांडायचे आहे.
            मी काय लिहितो, कसे लिहितो, याचे मला भान आहे. माझे लेखन बहूसंख्यजनांना न रुचणारे, न पटणारे किंवा अनाकलनीय असू शकते, याची मला जाणीव आहे. कधीकधी तर क्रित्येकाच्या भावना दुखावणारे, तडाखे,चटके देणारे असू शकते, हेही ज्ञात आहे मला. पण नाईलाज आहे, वास्तव हे कटू असले तरी ते वास्तव असते, आणि मी ते टाळू शकत नाही. लेखन करतो म्हणून लेखक आणि कविता लिहितो म्हणून कवी, एवढंच माझं लेखक व कवी या शब्दांशी नातं. एरवी लेखक, कवीसाठी लागणारी योग्यता माझ्यात आहे किंवा नाही, मलाच संशय आहे. कारण मी कल्पनाविलासात फार काळ रमू शकत नाही. लोकांना रुचावे, दाद मिळावी, आपल्याला वाहवा मिळावी म्हणून त्या तर्‍हेने लेखन करण्याचे जाणूनबुजून मी प्रयत्न करू शकत नाही.
              वाचक, रसिक, समीक्षक हा लेखकाच्या दृष्टीने देव असतो हे मान्य, पण त्यांचे फ़ाजिल लाड पुरविलेच पाहिजे, याबाबत मी सहमत होऊ शकत नाही. याउलट गरज असेल तेथे त्यांना दोन खडे बोल ऐकवण्याची कठोरता माझ्यात असायलाच हवी, यावर मी ठाम आहे. लोकांचे निखळ मनोरंजन व्हावे एवढ्यासाठी मी लिहू इच्छित नाही. केवळ उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणे, सीमित म्हणा की संकुचित म्हणा, पण एवढाच उद्देश माझ्या डोळ्यासमोर असतो, हे खरे आहे.

*  *  *  *  *

            उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणारे आजवर खूप झालेत. पण इतिहास असे सांगतो की, या तर्‍हेचे व्रत घेतलेली बरीचशी माणसे मध्येच भरकटली आणि शेवटी देवाच्या आळंदीची वाट चुकून चोराच्या आळंदीला पोचलीत. आणि त्यामागच्या अनेक कारणांपैकी ’‘लोकप्रियता मिळविण्यासाठी लेखनीचा वापर करणे" हे एक प्रमुख कारण आहेच आहे. एकदा का पुरस्कार/शासकीय मानमरातब किंवा लोकप्रिय होण्याची इच्छा मनात जागृत झाली की सर्वांना रुचेल, पसंतीस पडेल असे लेखन लिहिण्याकडे कल झुकलाच समजावा. मग कटू, कठोर, तडाखे देणारे, दुष्प्रवृत्तीवर घाव घालणारे लेखन जन्माला घालणारी लेखनी स्वत्वाच्या विनाशाकडे वाटचाल करायला लागलीच असे निर्विवाद समजावे. मग या आभासी जगाच्या भुलभुलैयात लेखणीची धार कधी आणि कशी बोथट झाली, याचा उलगडा भल्याभल्यांना होत नाही.
           जी चूक इतरांनी केली, तीच चूक माझ्याकडून होऊ नये,एवढे बळ विधात्याने मला द्यावे, आणि या प्रवासात लोकप्रियता लाभली किंवा पुरस्कार वगैरे मिळाले तर आनंदच आहे, पण नाही मिळाले तरी त्यात खेद वाटण्यासारखे काहीच नाही, आपला मार्ग तेवढा महत्त्वाचा, तो भरकटू नये, हीच धारणा मरेपावेस्तोवर कायम राहावी, त्यात अंतर येऊ नये, एवढीच आंतरिक इच्छा आहे.  

मित्रहो,
आपणास माझे काव्य आवडले तरी आणि
ना-आवडले तरीही प्रतिक्रिया अवश्य द्या…

                                                                     गंगाधर मुटे

                                                   आर्वी छोटी,हिंगणघाट जि.वर्धा.
                                                   Email : ranmewa@gmail.com                                    
,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,
संक्षिप्त परिचय

नाव         : गंगाधर महादेवराव मुटे
जन्म       : २७ फ़ेब्रुवारी १९६२
शिक्षण    : बी. एससी (गणित)
व्यवसाय : मुक्त पत्रकार, शेती, शेतीविषयक संशोधन, बिजोत्पादन आणि विपणन, कापसाच्या अनेक संकरित वाणांची निर्मिती 

प्रकाशित साहित्य
१) “रानमेवा” (काव्यसंग्रह) नोव्हेंबर २०१०
२) ” वांगे अमर रहे” (ललित लेख संग्रह) जुलै २०१२
३) “नागपुरी तडका” E-book (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१३
४) “माझी गझल निराळी” (गझलसंग्रह) नोव्हेंबर २०१३
५) लोकमत, तरुण भारत, सकाळ, लोकसत्ता, देशोन्नती व अन्य विविधवृत्तपत्रातून सातत्याने लेखन. विविध नामांकित दिवाळी अंकातून अनेक कविता प्रकाशीत. 
६) पुणे, नाशिक व औरंगाबाद येथून प्रकाशित होणार्‍या शेतकरी संघटनेचे मुखपत्र असलेल्या पक्षिक “शेतकरी संघटक” मध्ये “वाङ्मयशेती” हे नियमित सदर लेखन.

ई-लेखन :         1] www.sharadjoshi.in 2] www.baliraja.com 3] www.gangadharmute.com
                       4] gangadharmute.wordpress.com 5] gangadharmute.blogspot.com 
                       या संकेतस्थळांची निर्मिती आणि त्यावर सातत्यपूर्ण लेखन.

फ़ेसबूक :          www.facebook.com/gangadharmute
फ़ेसबूक पेज :    www.facebook.com/my.net.farming ( माझी वाङ्मयशेती)

पुरस्कार :  १) स्टार माझा/ए.बी.पी माझा या लोकप्रिय मराठी TV वृत्तवाहिनीतर्फ़े आयोजित “ब्लॉग माझा” या जागतिक पातळीवरील स्पर्धेत २०१० आणि २०१२ मध्ये gangadharmute.wordpress.com या ब्लॉगला सलग दोनदा पुरस्कार 
२) मेहता पब्लिशिंग हाऊस आणि मी मराठी डॉट नेट संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरजालीय स्पर्धेत “वांगे अमर रहे” या ललितलेखाला पारितोषिक
३) मी मराठी डॉट नेट, व्दारा आयोजित आंतरराष्ट्रीय पातळीवरील कविता स्पर्धा - २०११ या स्पर्धेत “कुठेलुप्त झाले फ़ुले भिम बापू” या कवितेस प्रथम पुरस्कार 
४) २०१३ मध्ये दर्यापूर येथे भरलेल्या ५२ व्या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल “अंकूर वैभव” पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव.

सामाजिक कार्य : १९८२ पासून शेतकरी चळवळीत सक्रीय सहभाग. अनेकदा तुरूंगवास. 
                           सध्या शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत

संपादकीय कार्य : १२ व्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशानिमित्ताने प्रकाशीत करण्यात आलेल्या “पुन्हा एकदा उत्तम शेती” या स्मरणिकेसाठी कार्यकारी संपादक म्हणून कार्यभाग.

संपर्क पत्ता : मु. पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा – ४४२३०७

* * *

7 प्रतिसाद:

Innocent Warrior said...

मला तुमचा ब्लोग आवडला!!!

तुम्ही छान लिहिता. एक वेगळा ब्लॉग!!!

-अभि

समंजस said...

गंगाधरभौ, तुमची शेतकर्‍यांबद्दल असलेली कळवळ नेहमीच तुमच्या लिखाणातून दिसून येते. ती तशीच राहु देत. ज्यांनी शेतकर्‍यांचं जिवन जगलं आहे किंवा अनुभव तरी आहे त्यांना नक्कीच ती कळणार. शेती हा खरं तर एक व्यवसाय कारण इतर व्यवसायां प्रमाणेच यात गुंतवणूक, मेहनत ही करावी लागते नफा मिळवायला. परंतु नजीकच्या काळात हा व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असेच दिसतेय. सरकारची धोरणे लहान शेतकर्‍यांना मदत करण्या ऐवजी, अश्या शेतकर्‍यांना शेतीपासून परावृत्त करण्याचीच दिसून येत आहेत.
एके काळी भूदानाची चळवळ चालवून तसेच कसेल तो शेतकरी, तोच शेतमालक या धोरणाखाली जी थोडीफार शेतजमीन मजुरांना/गरीबांना मिळाली ती सुद्धा काढून घेण्याचं सध्याच्या सरकारांचं धोरण दिसून येतंय अर्थातच यात काही व्यक्तींचा आर्थिक फायदा होणे हाच त्या मागचा मुख्य उद्देश आहे.

मला स्वत: ला तरी भविष्यकाळ चांगला दिसत नाहीय (लहान शेतकर्‍यांच्या अस्तित्वाबाबत). नाइलाजाने का होईना परंतु लहान शेतकर्‍यांना हळु हळु शेतीच्या व्यवसायातून बाहेर पडावे लागेल असे दिसतेय. जर जगायचे असेल, पुढील पिढीला जिवन द्यायचे असेल तर हा पर्याय स्विकारावा लागेल.

निसर्ग चा समतोल बिघडत चाललाय, वाढत्या जागतीक उष्णतामानामुळे पावसाचं चक्र हे अनियमीत होणार, एक वर्ष कमी पाउस म्हणून पिक कमी परंतु खर्च जास्त, दुसरं वर्ष जास्त पाउस पिक वाया, नुकसान हे असं दोन तीनदा लागो पाठ झालं की लहान शेतकरी संपलाच.
सरकार काय करणार हे सांगायला नकोच.

या बाबतीतलं तुमचं लिखाण चालूच ठेवा. कोणाच्याही नकारार्थी प्रतिकीयांवर लक्ष देणे आवश्यक नाही.
शेतकर्‍यांचा फायदा होवो किंवा न होवो तुम्हाला जे खटकतेय ते लिहा.
तुम्ही एखादा धर्मग्रंथ लिहीत नाहीय किंवा तुम्हाला तुमच्या लिखाणातून एखादा धर्म/संप्रदाय स्थापन करायचा नाहीय त्यामुळे प्रत्येक लिखाण हे त्याच तोडीचं असणे आवश्यक नाहिय. असंतोषातून आलेल्या प्रत्येक लिखाणातून क्रांति होणे आवश्यक नाही किंवा तशी अपेक्षा ही ठेवू नये.

[असंतोषातून आलेल्या प्रत्येक लिखाणातून जर क्रांति व्हायला लागली असती तर रोजच ती झाली असती आणि कदाचीत त्यामुळे तीचं महत्त्व सुद्धा राहीलं नसतं]
.
समंजस

Jagatkumar said...

गंगाधरभौ, नमस्कार, चिबहीन बर्याच दिवसांनी आपल्या भाषेत लिहायचा चान्स आला म्हणून लिहित आहे. भौ, तुम्ही तुमच्या व्यावसायासाम्बाधी म्हणजे नौकरी धन्द्यासंबद्धी मात्र काही लिहिले नाही. तुम्हाला विनयामुळे सांगायचे नसले तरी आम्हाला समजून घ्यायची इच्छा आहे. त्याबद्दल जरा सविस्तर लिहाना

Jagatkumar said...

गंगाधरभौ, नमस्कार, चिबहीन बर्याच दिवसांनी आपल्या भाषेत लिहायचा चान्स आला म्हणून लिहित आहे. भौ, तुम्ही तुमच्या व्यावसायासाम्बाधी म्हणजे नौकरी धन्द्यासंबद्धी मात्र काही लिहिले नाही. तुम्हाला विनयामुळे सांगायचे नसले तरी आम्हाला समजून घ्यायची इच्छा आहे. त्याबद्दल जरा सविस्तर लिहाना

Jagatkumar said...

गंगाधरभौ, नमस्कार, चिबहीन बर्याच दिवसांनी आपल्या भाषेत लिहायचा चान्स आला म्हणून लिहित आहे. भौ, तुम्ही तुमच्या व्यावसायासाम्बाधी म्हणजे नौकरी धन्द्यासंबद्धी मात्र काही लिहिले नाही. तुम्हाला विनयामुळे सांगायचे नसले तरी आम्हाला समजून घ्यायची इच्छा आहे. त्याबद्दल जरा सविस्तर लिहाना

mrunal ghate said...

नमस्कार. मला तुमच्या कविता आवडल्या. तुमच्या देशभक्तीपर कवितेला compose करून मी हि कविता compititionla पाठवू का. त्यासाठी तुमची parmission हवी आहे.उत्तराची वाट पाहते. thank U. ( मला आवडलेली कविता – रे जाग यौवना रे.)

gimago said...

घास घेता आधी स्मरु शेतकर्‍यासी ।
सर्वांसाठी जो उपजी धान्यराशी ॥
ॠणातून त्याच्या व्हावे उतराई ।
गुरूदेव सर्वांना ऐसे भान देई ॥

----गिरीधर मारोतराव गोंधळी

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं

मराठी कॉर्नर

Marathi

Jankumata

..जाणकुमाता प्रसन्न..


* जन्मतिथी
कार्तिक शुद्ध एकादशी
१ नोव्हेंबर १९६८

* जन्मस्थळ ,
श्री विश्वनाथजी गावंडे
गांधीनगर वार्ड,
वर्धा

* प्रकटदिन : माघ शुद्ध सप्तमी

* समाधी दिनांक : माघ वद्य षष्ठी
०७ मार्च १९७८

* समाधी स्थळ : महाबळा,
त - सेलू जि - वर्धा

*******

रानमेवा-माझा प्रकाशित काव्यसंग्रह

.
. झूम करून वाचण्यासाठी डबल क्लिक करा.

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)