Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

May 28, 2013

अन्नधान्य स्वस्त आहे

अन्नधान्य स्वस्त आहे

अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)

शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!

मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे

अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे

कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे

पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे

कोरडा दुष्काळ तेव्हा पांढरे पक्षी दिसेना
कंच पिकलेल्या सुगीला मात्र त्यांची गस्त आहे

नापिकीच्या पावलाने काळ हा सोकावलेला
या शिवाराचा जणू तो नेमला विश्वस्त आहे

कोरडे जेव्हा भगोणे, पीठ-मिरची सापडेना
मीच माझी भूक तेव्हा, रोज केली ध्वस्त आहे

तो म्हणाला काव्य कसले? 'अभय' गझला फालतू या
(लेखणीच्या पाभरीने जीवजंतू त्रस्त आहे)

                                                - गंगाधर मुटे 'अभय’
------------------------------------------------------

May 13, 2013

रक्त आटते जनतेचे

रक्त आटते जनतेचे

रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला
एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला

जे हुजरे पाळलेस तू, सर्व खाण्याचे पाईक
ढेकर देणे झाले की, ते बघतील सटकायला

सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला

निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला

टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला

दार गेले, धुरा गेला अन कर्जापायी कुंकू
दोन्ही हात उरले मात्र, दररोज उर बडवायला

किती सीता पळवायच्या, तुम्ही लागा पळवायला
श्री बजरंग येत आहे, ’अभय’ लंका तुडवायला

                                           - गंगाधर मुटे
---------------------------------------------------

May 11, 2013

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना


लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले

वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले

साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले

क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले

नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले

काल अग्नीपरीक्षा त्यांनीच घेतली
कोंबड्यासारखे मज भाजून पाहिले

पूर्ण झाले उणे मी मातीत मिसळता
हातचे मी तरी ना राखून पाहिले

सोंग केलेय त्याने ना ऐकले जणू
प्रश्न भाग्यास जेव्हा टाकून पाहिले

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
मी ’अभय’दान इतुके मागून पाहिले

                                   - गंगाधर मुटे
------------------------------------------------
वृत्त : अभयकांती....@
लगावली : गालगा गालगागा गागाल गालगा
------------------------------------------------

@ - अशा वृत्ताची नोंद आहे किंवा नाही, ते शोधावे लागेल. पण हे वृत्त हरवून जाऊ नये म्हणून मी तात्पुरते अभयकांती हे नाव दिले आहे. ही लय मला खूप आवडली. मस्त ठसकेबाज आणि ठेकेबाज गझलेची चाल तयार होतेय. गेय गझलेसाठी फ़ारच मोहक आहे हे वृत्त.
------------------------------------------------

May 8, 2013

माझी गझल निराळी

माझी गझल निराळी

घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी

शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी

एकेका आरोपीची उला पकडतो गच्ची
सानीच्या लाथडण्यावर पिटती मिसरे टाळी

लढवैय्या आशय माझा करतो तांडव तेथे
जन्माला येते जेथे, ती काळरात्र काळी

युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी

गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकर्‍यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी

चेतनेला पेरून देते अभयतेची खते
संघर्षाला पिकवताना प्रतिभा बनते माळी

लयीत नाही कुणीही, बेसूर सत्ताधारी
अर्थशिस्त शिकवी त्यांना लिहिते वृत्त कपाळी

पोशिंद्याच्या रक्षणाचा ’अभय’ घेतो ’मक्ता’
ओतप्रोत भरतो आहे शेरास्त्रांनी हाळी

                                           - गंगाधर मुटे
-----------------------------------------------

May 4, 2013

काळजाची खुळी आस तू

काळजाची खुळी आस तू

भास तू, ध्यास तू, श्वास तू
काळजाची खुळी आस तू

आसवांना दिसू दे जरा
की निघालास जाण्यास तू

फार होतेय लडिवाळणे
खूप घेतोस रे त्रास तू

गुंतता मी गळाला तुझ्या
प्राक्तनाला मिळालास तू

दागिने अन्य काही नको
श्लेष, दृष्टांत, अनुप्रास तू

ओढ डोळ्यास का लागते
का मला वाटतो खास तू

कोण आहेस तू सांगना
धावते बोल प्राणास तू

चूक माझी अशी कोणती
"अभय" घेतोस वनवास तू

                        - गंगाधर मुटे
-------------------------------

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं