Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Jul 29, 2011

आयुष्य कडेवर घेतो

आयुष्य कडेवर घेतो


झुंजूमुंजू पहाटेला, आभा चढे आभाळाला
काळोखाच्या भेगातुनी, सूर्य डोकावतो
गारठल्या पंखामधी, आशा जागवतो

सुन्यासुन्या शिवाराला, निजलेल्या आवाजाला
चेव येण्याला कोंबडा, दारी बांग देतो
सुस्तावल्या आळसाला दूर पांगवतो

अन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल
लेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो
चोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो

अभयता पेरताना, रुजलेली फुलताना
फळलेली पाहताना, जेव्हा आनंदतो
तेव्हा मीच आयुष्याला, कडेवरी घेतो

                                              गंगाधर मुटे
--------------------------------------------

Jul 27, 2011

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन


                भुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात. या गीतांचे गेयता आणि आशय हेच बलस्थान असल्याने त्यात रचनाशैली, खोटा समाजाभिमुख बेगडीपणा, आलंकारिक शब्दरचना वगैरे कृत्रिमरित्या अनावश्यकपणे घुसडण्याची त्या महिला गीतरचनाकारांना गरजच भासलेली दिसत नाही. मिरची-मसाला न वापरता आहे तेच वास्तव शब्दात उतरविण्याचा प्रयत्न केल्यानेच या गीतांना अस्सल अभिजातपणा आलेला आहे आणि म्हणूनच त्यात ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृतीचे अनेक पदर सहजपणे प्रतिबिंबित झालेले आहेत. हे गीत बघा.


वैदूदादा, वैदूदादा घरावरी चाल गा, चाल गा
बुढ्याचे मचले हाल गा, हाल गा
माही(माझी) सासू म्हणते गा, म्हणते गा
तुले खुट्याची म्हैस देते गा, देते गा.


                 घरात म्हातारा सासरा बिमार झालाय म्हणून वैद्याला बोलवताना त्याला उपचाराची फी म्हणून चक्क खुट्याची म्हैस देण्याचा वायदा करणे म्हणजे काय? नगदी फी का देऊ नये? शिवाय वैद्याची फी आणि म्हशीच किंमत यात खूपच तफावत आहे. या गीताचे दोन अर्थ निघू शकतात. 


                 खिशात रोकड नसली आणि एखादी वस्तू उधार मागायची म्हटले तर थेट तसे उधार न मागता आडवळणाने मागणी प्रस्तुत करायची एक पद्धत आहे. ती आजतागायत वापरात सुद्धा आहे. शेतकर्‍याच्या घरात वर्षातून एकदाच पैसा येत असल्याने व खर्च मात्र वर्षभर करावे लागत असल्याने त्याच्या उधारीचा प्रकारही दिर्घमुदतीचा असतो. स्वाभाविकपणे वैद्य वगैरे एकवर्षाच्या उधारीवर औषधोपचार करायला सहजासहजी तयार होत नसावेत म्हणून गरजेपोटी म्हैस देऊन किंवा म्हैस देण्याची भाषा करून उधारीवर औषधोपचार करून घेणे ही अपरिहार्यता असावी, हे स्पष्ट आहे.


                किंवा दुसरा अर्थ असाही निघतो की, सासर्‍याचा जीव वाचविण्याच्या बदल्यात वैद्याला म्हैस देण्याची भाषा सासू-सुनेने स्वेच्छेनेच केली असावी. शेतकर्‍याला बळीराजा म्हणतात कारण बळीराजाच्या दानशूरपणाचा गूण शेतकर्‍याच्या रक्तामासांत पुरेपूर भिनलेला आहे. आजही शेतकरी समाजाएवढे दानशूर दुसरे कोणीच नाही. अन्नदानाच्या बाबतीत आजही शेतकरी समाज सर्वात पुढे आहे. गणेश स्थापना, महालक्ष्मी स्थापना, माऊंदे, बारसे, लग्नकार्य, व्रतांचे उत्थापन या निमित्ताने शेतकर्‍याच्या अंगणात जेवढ्या पंगती बसतात, तेवढे अन्नदान अन्य कोणत्याच समाजात होत नाही, ही वास्तविकता आहे. वर्षभर घरात चटणी-भाकर खायची पण अन्नदान करताना इतरांना वरण-भात-भाजी-पोळी खाऊ घालायची हा शेतकरी समाजाचा धर्मच बनला आहे. ही वृत्ती चांगली की वाईट, हा स्वतंत्र वादाचा विषय असू शकेल पण शेतकरी माणसापेक्षा पन्नास पटीने अधिक मिळकत मिळविणारी बिगर शेतकरी मंडळी आपली संपूर्ण मिळकत स्वतःच्या स्वतःपुरत्या मर्यादित प्रपंचातच खर्च करीत असतात. स्वतः फारसे दान वगैरे करीत नाहीत आणि शेतकरी करतो त्याचे कौतुकही करीत नाहीत, याउलट "शेतकरी उधळखोर असल्याने कर्जबाजारी होतो’’ असा शिक्का मारून मोकळे होतात.


               शेतकर्‍यांमधील दानशूरपणाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. शेतकर्‍याच्या घरी येणारा पाहुणा कधीच उपाशी जात नाही. चहा-सुपारीवर पाहुण्याची बोळवण करणे अजूनही शेतकर्‍याला जमलेच नाही. अर्धा लाख मासिक मिळकत मिळवूनही भिकार्‍याच्या ताटात चार आणे टाकण्यासाठी का-कू करणे किंवा त्याऐवजी भिकार्‍याला दुनियाभराची अक्कल सांगत सुटणार्‍यांच्या या देशात आजही शेतकर्‍याच्या दारात भिक्षेकरी गेला तर त्याच्या झोळीत अगदीच सहजपणे शेर-दोन शेर धान्य पडतच असते. स्वेच्छेने लोकवर्गणी देऊन गावात एखादा सार्वजनिक उत्सव साजरा करणे त्याच्या अंगवळणीच पडले आहे.


             विनोबांच्या भूदान यज्ञात शेतजमीन दान करण्याची हिंमत शेतकर्‍यांनी दाखविली आहे. जनावरे (मुख्यत: गाय) दान करण्याची फार जुनी परंपरा आहे. काही काळापूर्वी झाडे सुद्धा दान दिली जात. आजही महसूल खात्याच्या नोंदी तपासल्या तर शेतीची मालकी एकाची आणि त्याच शेतातील झाडाची कायदेशीर मालकी दुसर्‍याची, असे प्रकार आढळतात.


शहरातील मनुष्य जर खेड्यात शेतकर्‍याकडे आला तर येताना सोबत रिकामी पिशवी घेऊन येतो. शेतकरीही अगदी आनंदाने चिंच, बोर, आंबे, संत्री, केळी, वांगी, मिरची, टमाटर, कोबी यापैकी त्याच्याकडे जे उपलब्ध असेल त्या वस्तूंनी ती रिकामी पिशवी भरून देतो. त्याचा तो कधीच मोबदला घेत नाही कारण रिकामी पिशवी घेऊन येणारा कधी मोबदला देतच नाही. मला अगदी बालपणापासून पडलेला प्रश्न असा की हे वनवे ट्रॅफिक का? शहरी माणसाला शेतकर्‍याकडून ताजा भाजीपाला, फुले फळे प्रेमाच्या नात्याखातर विनामूल्य घेऊन जावे असे वाटत असेल तर त्यात गैर काहीच नाही; पण येताना तो पिशवी रिकामीच का घेऊन येतो? शहरामध्ये असे अनेक पदार्थ असतात की जे शेतकर्‍यांनी कधीच पाहिलेले किंवा खाल्लेले नसतात. बालूशाही, बर्फी, चमचम, रसगुल्ला, फरसाण वगैरे तर लहानसहान शहरातही उपलब्ध असतात. मग शहराकडून खेड्याकडे येणारी पिशवी हमखास रिकामीच का असते? ज्याला इकडून काहीतरी घेऊन जायची सुबुद्धी असते त्याला तिकडूनही काहीतरी घेऊन येण्याची देव सद्‍बुद्धी का देत नाही? शेतकर्‍यांनी हे पदार्थ खाणे त्यांच्या प्रकृतीला हानिकारक असते काय? की शेतकर्‍याला हे पदार्थ पचतच नाही, खाल्ले तर शेतकर्‍याला अंदाधुंद ओकार्‍या होतील असे शहरी माणसाला वाटते?  बरे या एकतर्फी प्रेमाचे समीकरण शेतकर्‍याच्या लक्षात येत नसेल काय? बहुतेक नाहीच कारण पाहुण्याची पिशवी भरून देताना त्याच्या चेहर्‍यावर जे समाधान उमटते ते काही औरच असते. त्याची नैसर्गिक दातृत्ववृती अधोरेखित करणारे असते.



             वरील गीताचा समीक्षणात्मक अंगाने विचार केल्यास या गीतात गेयता, यमक आणि आशय वगळता अलंकार, उपमा, लेखनकौशल्य वगैरे फारसे आढळणार नाही पण आशयगर्भिता हेच या गीताचे बलस्थान आहे. चार ओळीच्या या गीतातील शब्दयोजना अत्यंत समर्पक व नेमकी असून दोनशे पानाचे पुस्तक लिहूनही जो आशय नेमकेपणाने व्यक्त करणे कठीण जाईल, एवढा प्रचंड आशय या गीतात ठासून भरला आहे. 


               मचने हा शब्द सध्या प्रमाणभाषेत वापरला जात नाही आणि मचणे या शब्दाचा नेमका अर्थ व छटा प्रकट करणारा दुसरा पर्यायी शब्द प्रमाणभाषेत उपलब्ध नाही. मर्यादित शब्दात गेयता राखून अमर्याद आशय व्यक्त करायचा असेल तर "मचणे" या शब्दासारखे शब्द भाषेत असणे अत्यंत आवश्यक आहे आणि मोजक्या शब्दात बरेच काही व्यक्त करणारे शब्द असल्याखेरीज कोणत्याही भाषेला भाषासमृद्धी येऊ शकत नाही, हेही लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे. 


                   बुढ्याचे मचले हाल याचा अर्थ वयाने म्हातारपणाकडे झुकलेल्या सासर्‍याला काहीतरी भयानक बिमारी झाली आहे. त्याच्या शरीरात उठणार्‍या कळा आणि आत्यंतिक वेदनांमुळे तो विव्हळत, तळमळत किंवा तडफडत आहे, असा होतो.

                     जेथे मला अर्थ लिहायला दोन वाक्य व बावीस शब्द वापरावे लागले व पद्याचे गद्य झाले तेथे तेवढाच आशय या गीतामध्ये "बुढ्याचे मचले हाल" या तीनच शब्दात व्यक्त झालाय आणि गेयताही निर्माण झाली. हे शक्य झाले ते केवळ मचले या शब्दाच्या वापरामुळेच.


                       गीतामध्ये वैद्यबुवाला घरावरी म्हणजे घरापर्यंत चाल असे म्हटलेले आहे, घरी ये असे म्हटलेले नाही. घरी ये असे म्हणण्यामध्ये औषधोपचार करण्यासाठी घरी ये असा अभिनिवेश असतो. 


                   मात्र घरापर्यंत चाल याचा वेगळा अर्थ लागतो. खरे तर पेशंटला जेवढी वैद्याची गरज असते तितकीच किंवा त्यापेक्षाही जास्त गरज "पापी पेट का सवाल है" या न्यायाने वैद्याला पेशंटची असायला हवी. ज्या घरात आजारी व्यक्ती आहे ते घर जर ऐश्वर्यसंपन्न आणि आर्थिक सुदृढ असेल तर उपचारासाठी बोलावताना वैद्याची मिनतवारी करायची गरज भासूच नये. कर्तव्यदक्षता किंवा पैशाचा मोह या दोन कारणापैकी निदान एका कारणाने तरी वैद्याने आजारी माणसाच्या घराकडे पळतच सुटायला हवे. पण या गीतातील आशयाचा मामला जरा वेगळा आहे. या म्हातार्‍याच्या घरची आर्थिक स्थिती वैद्याला माहीत असणार म्हणून तो चालढकल करीत असावा. म्हणून सून जे म्हणते त्याचा अर्थ असा की,


                "हे वैद्यराजा, तू मला माझ्या थोरल्या दादासारखा आहेस. तू केवळ माझ्या घरापर्यंत चल. उधारीवर उपचार करायचे किंवा नाही याचा निर्णय तू नंतर घे, मला खात्री आहे की, तू घरापर्यंत आलास तर माझ्या सासर्‍याच्या वेदना पाहून तुझे अंतःकरण नक्कीच द्रवेल. समोरचे दृश्य बघून व्यावसायिक विचार बाजूला पडेल, उधार की नगदी यापेक्षा पेशंट व वैद्य यांच्यातील नात्याची आठवण तुला होऊन तुझ्यातला वैद्य जागा होईल. म्हणून तू इथून ऊठ, फक्त माझ्या घरापर्यंत चल आणि एक नजर माझ्या सासर्‍यावर तर टाक." 


               या चार ओळीच्या गीताची नायिका सून आहे. सामाजिक भान हरवलेल्या एखाद्या साहित्यश्रेष्ठ कवीने ही कविता लिहायला घेतली असती तर आजारी सासरा आहे मग वैद्याला बोलवायला सासूच जाऊ शकते, सुनेसाठी कवितेत स्थानच निर्माण होत नाही असे गृहीत धरून सासूलाच नायिका बनविले असते. पण या गीतात तसे झाले नाही. सून-सासू-सासरा या नात्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न येथे झालेला दिसतो. या घरातली सून "सासरा माझा कुरकूर करे, तिकडेच मरू दे त्याले, भवानी आई रोडगा वाहीन तुले" असे म्हणणार्‍यापैकी नक्कीच नाही. सासर्‍याचे दु:ख पाहून व्याकूळ होणारी आहे. म्हातार्‍याच्या उपचारासाठी खुट्याची म्हैस देऊन टाकू म्हणणार्‍या सासूचे ती समर्थन करते. सासू सासर्‍यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणार्‍या उच्चभ्रू सभ्य संस्कृतीचा तिला अजूनतरी वारा लागलेला दिसत नाही.


                      खुट्याची म्हैस देणे हे सुद्धा आशयगर्भ वाक्य आहे. तुकारामांनी "भले आम्ही देऊ कासेची लंगोटी" असे म्हटले. कासेची न म्हणता नुसतीच लंगोटी देऊ म्हटले असते तर त्याचा अर्थ परिणामकारकतेने प्रकट झालाच नसता. तसे म्हैस देणे आणि खुट्याची म्हैस देणे यातही फरक आहे. म्हैस देतो म्हणणे याचा अर्थ अनेक म्हशीपैकी एक देतो, असा निघू शकला असता. पण खुट्याची म्हैस देतो याचा अर्थ खुट्याला असलेली एकमेव म्हैस असाच घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत खुट्याची म्हैस देण्याची भाषा दानशूर वृत्ती किंवा आत्यंतिक विवशता या दोनपैकी निदान एक तरी कारण स्पष्टपणे अधोरेखित करून जाते.


            या चार ओळीच्या गीतातील एकेक शब्द तोलून-मापून वापरलेला दिसत आहे. नेमक्या शब्दप्रयोगामुळे मर्यादित शब्दामध्ये अमर्याद आशय गुंफणारे कवित्व अशिक्षित ग्रामीण महिलांनी गेयस्वरूपात कवन केले आहे. पण या भुलाबाईच्या गीतांकडे साहित्यक्षेत्राने कधीच गंभीरतेने पाहिलेले दिसत नाही. ग्रामीण अशिक्षित जनजीवनामध्येही तोलमोलाचे काव्य रचण्याचे अंगीभूत कौशल्य असू शकते, भुलाबाईंची गाणी सुद्धा साहित्यक्षेत्राला मार्गदर्शक ठरू शकतात असे गृहीत धरून जर काव्यजगताची पुढील वाटचाल झाली असती तर मूठभर आशय व्यक्त करण्यासाठी ढीगभर शब्दांचे मनोरे रचून गेयता गमाविलेल्या गद्यस्वरूपातील निबंधांना कविता म्हणण्याचा प्रघातच पडला नसता. कवितेने सामाजिक बांधीलकी जपली असती तर कवीही स्वतःच्या एकलकोंड्या मानसिकतेतून बाहेर येऊन समाजाशी एकरूप झाला असता. कवितेला जनसामान्यांच्या सुखदु:खाची किनार लाभली असती तर कविता आमजनतेच्या भावविश्वाशी समरस झाली असती. आहे ते वास्तव साकारण्याचा प्रयत्न झाला असता तर कवितेच्या विषयामध्ये विविधता आली असती व काव्य लोकाभिमूख झाले असते आणि जर असे झाले असते तर कवी आणि कविता हा चेष्टेचा व उपहासाचा विषय नक्कीच झाला नसता अशी आता माझी खात्री पटायला लागली आहे.


                                                                                                                                गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------------

Jul 21, 2011

अतिरेक्यांनो तुमचे स्वागत आहे

cover


logo
वर्ष २८ ! अंक ८ ! २१ जुलै २०११

अंतरंग

जागरण

अतिरेक्यांनो तुमचे स्वागत आहे

श्रीकृष्ण उमरीकर.................................................3

शरदऋतू

आतंकवाद्यांचे भारतावर उपकार

शरद जोशी...........................................................7

आजकाल

न्यायालयीन सक्रीयता की लोकप्रतिनिधींची निष्क्रीयता

ज्ञानेश्वर शेलार..................................................11

मुद्दा

मग चळवळी का थंडावणार नाहीत?

रवि देवांग..........................................................14

मधोमध

भारताच्या रोजच्या मृत्यूचे सोयरसुतक कुणाला

दत्ता जोशी.........................................................16

कॉमन नॉन सेन्स

मंत्रिमंडळातील फेरबदल : शेतीच्या झारीतील शुक्राचार्यांना बक्षिसी

सुधाकर जाधव....................................................19

आवाहन

बळिराजा डॉट कॉम

गंगाधर मुटे........................................................21

वाङ्‌मय शेती

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

गंगाधर मुटे........................................................23

भारत की जुबानी

सोने की सीढी

ऍड. दिनेश शर्मा..................................................26

(उ)संतवाणी

अलीगढ की पदयात्रा

‘थंडा’ महाराज देगलूरकर....................................29

शेतकरी संघटना वृत्त     ....................................31

----------------------------------------------------------------------
शेतकरी संघटक चा पिडीएफ़ अंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 
----------------------------------------------------------------------

Jul 18, 2011

होतकरू झाड

होतकरू झाड


मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा

                                                 गंगाधर मुटे
-----------------------------------------------------
(नव्या यमांची नवीन भाषा    या गझलेतील शेर)

Jul 16, 2011

एहसान कुरेशी - एक सच्चा शेतकरीपुत्र

एहसान कुरेशी - एक सच्चा शेतकरीपुत्र



                     "मैं कई बार औरंगाबाद आया हूं. मुझे यह शहर अच्छा लगता है. यहां के लोग अच्छे है. दोस्तों इन दिनों में दो चैनल्स के लिए नियमित तौर पर कॉमेडी कर रहा हूं. और उसके अलावा आने वाली फिल्म तुक्का फिट, स्टूडेन्ट और हमार लव स्टोरी में अपने चित परिचित अंदाज में नजर आउंगा. आपको बताऊ, टेलीविजन पर हमेशा कॉमेडी करनेवाला आपका यह दोस्त आज कई मायने में दुखी है. आज मैं आप से अपने मन की बात कहना चाहता हूं. किसान का बेटा हूं और आज किसानों की स्थिति देखकर मुझे तकलीफ होती है. वह कर्ज में जीता है और कर्ज के साथ ही मर रहा है." 

                      ही व्यथा आहे ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर शो’मधून दिलखुलास विनोदी शैलीमुळे प्रकाशझोतात आलेले, लोकप्रिय विनोदी कलाकार एहसान कुरेशी यांची. लोकांना खळाळून हसवणारा विनोदाचा हा बादशाह सध्या व्यथित आहे तो शेतकरी करीत असलेल्या आत्महत्यांमुळे. कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या गहन समस्यांमुळे व्यथित असलेल्या एहसान कुरेशींनी त्यांच्या व्यथा औरंगाबाद येथून प्रकाशीत होणार्‍या ‘दिव्य मराठी’ जवळ बोलून दाखविल्या. एहसान कुरेशीं स्वत: भूमिपुत्र आहेत.

                            शेतकर्‍यांच्या घरात जन्म घेऊन पुढे नावलौकिक मिळविलेले कलाकार कमी नाहीत. कलेच्या सर्वच क्षेत्रात भरपूर शेतकरी पूत्र आहेत. पण शेतकर्‍यांचे दुर्दैव असे की, हे सर्व शेतकरीपूत्र गाव सोडून शहरात गेले की यांची शेतीशी असलेली नाळ तुटून जाते. मी शेतकरीपूत्र आहे, असे अभिमानाने सांगताना संकोच वाटायला लागतो. शेतीच्या दुर्दशेचे वास्तव भुलून जातो. शेतीची व्यथा चव्हाट्यावर मांडणे ही तर फ़ार दुरची गोष्ट.

ही पार्श्वभूमी लक्षात घेता एहसानभाईचे निवेदन मला फ़ार सुखावून गेले.

एहसानभाई मै आपको दिल-ए-जानसे सॅल्यूट करता हूं!

                                                                                                          गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------

Jul 14, 2011

बळीराजा़ डॉट कॉम

बळीराजा़ डॉट कॉम


              अनेक दिवसापासूनची एक इच्छा होती की, कोट्यवधी शेतकरी असलेल्या या विशालप्राय देशात किमान काही हजार शेतकरी मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन शेती या विषयावर त्यांनी आपसात चर्चा केली पाहिजे. आपल्या सुखदु:खात एकमेकाला समरस केले पाहिजे. शेतीत आयुष्य व्यतीत केल्यानंतर आलेल्या अनुभवांची आपसात देवाण-घेवाण केली पाहिजे. नवनवे तंत्रज्ञान अवगत करताना आणि त्याचा आपल्या शेतीत वापर करताना येणार्‍या अडचणी सोडवून घेण्यासाठी आपसात विचारविनिमय झाला पाहिजे.

               शेतकरी संघटनेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून एक कायमची खंत व्यक्त केली जात आहे की, जगाच्या इतिहासातील एवढी मोठी शेतकरी चळवळ, ज्या चळवळीच्या मेळाव्यांनी व अधिवेशनांनी गर्दीचे सर्व उच्चांक मोडले. ज्या चळवळीने लाखापेक्षा जास्त महिलांना एकत्र आणण्याचा विस्मयकारक चमत्कार घडवून आणला, इतिहासानेही तोंडात बोटे घालावी, असे आंदोलन यशस्वी करून दाखवले; त्या चळवळीला प्रसारमाध्यम आणि साहित्यक्षेत्रात मात्र फारशी चमकदार कामगिरी करून दाखवता आली नाही. या चळवळीला पूरक असे दर्जेदार साहित्यसुद्धा थोडाफार अपवाद वगळता फारसे काही निर्माण झाले नाही. 

          मुळातच शेतकरी समाज मुका आहे. त्याला स्वतःला व्यक्त होण्याची संधीच मिळत नाही. आर्थिकस्थितीने पुरेपूर परावलंबी असल्याने इतरांना जे रुचेल तेच बोलण्याखेरीज त्याला पर्याय उरत नाही. त्याला बोलण्यापूर्वी पहिल्यांदा परिणामांचा विचार करावा लागतो. कर्ज देणे थांबवेल म्हणून सावकार किंवा बॅंकाच्या विरोधात बोलू शकत नाही. उधारीवर किराणा मिळणे बंद होईल म्हणून व्यापार्‍यांच्या विरोधात बोलू शकत नाही. ७/१२ चा उतारा मिळायला त्रास जाईन म्हणून प्रशासनाच्या विरोधात बोलू शकत नाही आणि पुढार्‍यावाचून तर बरेच काही अडते, मग त्यांच्या विरोधात बोलायची तो कशी काय हिंमत करू शकेल? अन्यायाने कितीही मर्यादा ओलांडल्या तरी..... त्याला त्याच्या मनातली खदखद जिभेवर आणताच येत नाही. सर्वांना रुचेल असेच बोलणे, हीच परिस्थितीची गरज असल्याने त्याला स्वतःची अशी भाषा उरतच नाही.

                परिणामांची तमा न बाळगता एखाद्याने स्वतःला व्यक्त करायचे ठरवलेच तर तसे व्यासपीठच उपलब्ध नाही. शेतकर्‍याकडे जो कोणी येतो तो त्याला ऐकवायलाच येतो, त्याचे ऐकायला कोणीच येत नाही. कृषिविभागाच्या किंवा राजकीय पक्षाच्या मेळाव्यांत तो केवळ श्रोता असतो. कागदावर लिहून पाठवले तर गैरसोयीचे असल्याने वृत्तपत्रही शेतकर्‍यांचे मनोगत छापण्याची हिंमत दाखवत नाही. पुस्तक लिहायचे तर छपाईचा खर्च परवडण्यासारखा नाही. रेडियो-टीव्ही यांना तर एकंदरीतच शेती या शब्दाची ऍलर्जी आहे. मग शेतकर्‍याने व्यक्त व्हायचे तरी कसे? अभिव्यक्ती व्यक्त करताच येत नसेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून-नसून काय उपयोगाचे?

                   पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. शासन, प्रशासन आणि समाज यांनी नव्हे तर नियतीने व नव्या तंत्रज्ञानाने ती संधी शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली आहे. इंटरनेटने आता अल्पशा खर्चात अगदी दुर्गम प्रदेशातील आम माणसाला सुद्धा थेट जगाच्या नकाश्यावर आपली छाप सोडण्याची नामी संधी मिळवून दिली आहे. अगदी नाममात्र खर्चात आता इंटरनेटच्या माध्यमातून करोडो शेतकरी, जाती-पाती, धर्म-पंथ, स्त्री-पुरूष, देश-प्रांत या सर्व भेदाभेदाच्या सीमा ओलांडून एकाच वेळी एकाच व्यासपीठावर एकत्र येणे सहज शक्य झाले आहे.

                  तंत्रज्ञानाने गरूडझेप घेतली आणि सूर्य-चंद्र, मंगळ-अमंगळ तारे मनुष्याच्या टापूत यायला सुरुवात झाली. मात्र या कृषिप्रधान देशातला बहुसंख्य शेतकरी आणि एकूणच शेती हा विषय अडगळीत पडला आहे. विकासाच्या आणि प्रगतीच्या व्याख्येचे संदर्भ आणि अर्थ बदलत आहेत. शासनाच्या चुकीच्या आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे शेती हा विषयच फारफार मागे ढकलला गेला आहे.

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो, कांदा न भाकरी

                शेतकर्‍यांच्या अनेक पिढ्या उलटून गेल्या पण आमचा भैरू मात्र अजूनही कांदा-भाकर खाऊनच आला दिवस ढकलत आहे. त्याच्या न्याहारीचा 'मेनू' बिघडल्या घड्याळाच्या काट्यासारखा आहे त्याच स्थितीत स्थिर असून त्यात काही फारसा बदल घडत नाहीये. हे चित्र बदलण्याची सक्त गरज आहे. शेतकर्‍यांच्या जीवनातले नैराश्य संपून चैतन्य निर्माण होण्यासाठी आणि शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस उजाडण्यासाठी प्रयत्न होण्याची नितांत आवश्यकता आहे.

                    शेतीचे यतार्थ चित्रण करणारे आणि परिवर्तनाला भाग पाडणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे, असे आपल्याला वाटते. पण आपण म्हणतो की आम्ही मात्र लिहिणार नाही. ते इतरांनी लिहिले पाहिजे. आमचे आयुष्य जगलो आम्ही, आमच्या हालअपेष्टा भोगल्या आम्ही, आंदोलनात उतरलो आम्ही, तुरुंगाची हवा खाल्ली आम्ही, लाठ्यागोळ्या झेलल्या आम्ही आणि आम्ही म्हणतो की आम्ही लिहिणार नाही. ते कुणीतरी लिहावे. हे कसे शक्य आहे? हे कदापि शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मिती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढ्या प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत. आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. अस्सल आणि अभिजात लेखन करायला लेखनशैलीची गरज भासत नाही. बोबडेबोल जरी अस्सल आणि अभिजात असेल तर त्यात जिवंतपणा असतो व तो जिवंतपणाच त्या लेखनाला परिणामकारकता प्रदान करतो. लेखन करणे ही एक कला असते, हे मान्य; पण लेखनात कलाकौशल्य वगैरे वापरल्याने ते लेखन कलाकृतीकडे झुकते आणि मग ती कलाकृती वास्तविकतेपासून फारकत घेण्याची दाट शक्यता असते. कला ही कला असते आणि वास्तव हे वास्तव. त्यामुळे फारसा विचार करायची गरज नाही. जसे लिहिता येईल तसे आणि जसे जमेल तसे लिहायचा प्रयत्न शेतकर्‍यांनी करायलाच हवा.

म्हणून मित्रांनो..... या, 

              "पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" असे ब्रिदवाक्य असलेले बळीराजा डॉट कॉम (www.baliraja.com) हे संकेतस्थळ तुमच्यासाठीच आहे. येथे तुम्ही तुमच्या मनातल्या भावना स्पष्टपणे चितारू शकता. कविता, लेख लिहू शकता. इतरांच्या लेखनावर परखडपणे प्रतिक्रिया नोंदवू शकता. अगदी चारपाच ओळीचा मुद्दा किंवा मनोगत सुद्धा व्यक्त करू शकता. शेतकरी म्हणून जीवन जगताना आलेले अनुभव कथन करू शकता. आजवरच्या वेगवेगळ्या आंदोलनाविषयीची माहिती लिहू शकता. आंदोलनाचे तुमच्याकडे काही फोटो असल्यास ते प्रकाशित करू शकता. 

            प्रवेश कसा घ्यायचा, सदस्यत्व कसे घ्यायचे, मराठीत कसे लिहायचे या विषयीची सर्व माहिती बळीराजा डॉट कॉम (www.baliraja.com) वर उपलब्ध आहे.

म्हणून काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो.... या, 

शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण इथे थोडीशी धडपड करूया....!!

                                                                                                               गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------

Jul 13, 2011

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा



              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला “डोळस दृष्टी” प्राप्त करून देत असतात आणि सामाजिक जीवनमानाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोनही देत असतात.

             माझ्या बालपणीच्या (१९७०-७५) काळात दळणवळणाची साधने एकतर फारसी विकसित झाली नव्हती किंवा ग्रामीण भागापर्यंत पोचलेली तरी नव्हती. एखादी मोटर सायकल जरी गावात आली तरी गावातील लहानसहान पोरं मोटरसायकल मागे धावायचीत. बुजुर्ग मंडळीही घराबाहेर येऊन कुतूहलाने बघायचीत. त्याकाळी गावातले दळवळणाचे सर्वात मोठे विकसित साधन म्हणजे सायकल. सायकलचा वापरही केवळ पुरुषांसाठीच असायचा. पत्नीला सुद्धा सायकलवर बसवणे लाजिरवाणे वाटायचे आणि कुणी जर तसा प्रयत्न केलाच तर ते चेष्टेचा विषय ठरायचे.  ग्रामीण जनतेचे दळणवळणाचे एकमेव साधन म्हणजे रेंगीबैल, छकडा, दमनी वगैरे. गावाला जोडणारे पक्के रस्ते उपलब्ध नसल्याने ग्रामीण माणसांचा संचारही मर्यादित असायचा. पावसाळाभर गावाचा संपूर्ण जगाशीच संपर्क तुटायचा, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

           इलेक्ट्रिक, टेलिफोन किंवा तत्सम साधने गावात पोचायची होती. टीव्ही, संगणकाचे नामोनिशाण नव्हते. गावात दिसलाच तर एकट-दुकट रेडियो दिसायचा. गावातील एखादा तरुण नोकरी करायला शहरात गेला की शहरातून गावाकडे परतताना हमखास काखेला रेडियो लटकवून आणि रस्त्याने गाणी वाजवतच गावात प्रवेश करायचा. लग्नामध्ये हुंडा म्हणून गोफ, घड्याळ, अंगठी, सायकल आणि रेडियो ही वरपक्षाची सर्वात मोठी मागणी समजली जायची. स्वाभाविकपणे मनोरंजनाची काहीच साधने उपलब्ध नसल्याने पारंपरिक सण साजरे करून त्यातूनच मनोरंजनाची गरज पूर्ण केली जायची.

        जी अवस्था दळणवळण व मनोरंजनाची; तीच वैचारिक देवाणघेवाणीची. सभा, मेळावे, परिसंवाद याचे लोण गावापर्यंत पोचलेच नव्हते. चालायचेत ते केवळ हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने.  हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने याप्रकारातला सर्वात मोठा दोष असा की हे वनवे ट्रॅफिक असते. त्यात चर्चेला वगैरे काहीच स्थान नसते. एकाने सांगायचे आणि इतरांनी ते भक्तिभावाने श्रवण करायचे. आपल्या सुखद:खांना व्यक्त करण्याचे व्यासपीठच उपलब्ध नसल्याने ग्रामीण जनतेची केवढी घुसमट झाली असावी, याचा अंदाज आता सहज बांधता येऊ शकतो.

       निदान पुरुष मंडळींना मारुतीच्या पारावर किंवा चावडीवर बसून गप्पा तरी करता येत होत्या. भावना व्यक्त करायला संधी मिळत होती, पण महिलांचे काय? त्यांना ना पारावर बसून गप्पा मारण्याची अनुमती, ना सुखदु:खाला व्यक्त करण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध. त्यामुळेच महिलाप्रधान सण अतिशय जिव्हाळ्याने साजरे केले जात असावेत आणि त्यानिमित्ताने ग्रामीण महिला मनोरंजन आणि एकीमेकीचे क्षेमकुशल व्यक्त करण्यासाठी अथवा जाणून घेण्यासाठी या सणांचा वापर व्यासपीठासारखा वापर करून घेत असाव्यात.

       अशाच काही महिलाप्रधान सणापैकी भुलाबाईचा उत्सव हा एक सण. आश्विन शु.१० ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंतचा काळ “आश्विनच्या भुलाया” म्हणून साजरा केला जातो. काही भागात याला हादगा म्हटले जाते तर काही भागात भोंडला. या काळात मातीच्या बाहुल्या/भुलाया मांडून दररोज नित्यनेमाने गाणी म्हटली जातात. खिरापत वाटली जाते. जसजसा काळ बदलत गेला तसतसे या सणांचे महत्वही कमी होत गेले.

       पण त्याकाळी छोट्या-छोट्या बालिकांपासून जख्खड म्हातार्‍या महिला सुद्धा यामध्ये गाणी गायनासाठी सहभागी होत असायच्या. त्या पैकी काही गाणी ऐकतांना माझ्या अंगावर काटा उभारायचा. तर काही गाणी ऐकून मन खूप-खूप उदास व्हायचे. काही गाणी मनाला चटका लावून जायची तर काही गाणी ऐकताना कुतूहलमिश्रीत प्रश्नचिह्न निर्माण व्हायचे.


रुणझुण पाखरा जा माझ्या माहेरा
माझ्या का माहेरी सोन्याची पायरी
त्यावरी बसजो शिदोरी सोडजो
माझ्या का मातेला निरोप सांगजो
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
होते तर होऊ दे औंदाच्या मास
पुढंदी धाडीन … गायीचे कळप
पुढंदी धाडीन … म्हशीचे कळप


सोन्याचे मंदिर, सोन्याचा कळस या धर्तीवर घराचे छत सोन्याचे असेल तर ते समजण्यासारखे होते, पण घराला चक्क सोन्याची पायरी? उलगडा व्हायचा नाही म्हणून मग खूप कुतूहल वाटायचे.

      भुलाबाईच्या गाण्याला तत्कालीन सामाजिक साहित्याचा आविष्कारच म्हणावे लागेल. साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात. परंतू थोरा–मोठ्या कवी/लेखकांच्या साहित्यात तत्कालीन वास्तव प्रामाणिकपणे उतरलेलेच नसावे. त्या काळात संतकवी देवास भजण्यात गुंग, त्यांचे बहुतांश काव्यवैभव/प्रतिभा देवाचे गूण गाण्यात खर्ची पडली असावी. कवी हा तर मुळातच कल्पनाविलासात रमणारा प्राणी. वास्तववादी लेखन केले तर आपल्या काव्याला साहित्यिक दर्जा मिळणार नाही, या भयाने पछाडलेला. त्यातल्यात्यात कवी हे बहुतांश पुरूषच. त्यामुळे आपल्या दुखा:ला कोणीच वाली नाही हे बघून महिलांचा कोंडमारा झाला असावा. महिला विश्वाच्या सुखदु:खाचे लेखक, कवी किंवा गीतकारांनी नीट शब्दांकन केले नाही म्हणून आमच्या मायमाउल्या स्वतःच पुढे सरसावल्या असाव्यात आणि कदाचित त्यामुळेच अपरिहार्यपणे महिलांनी प्रस्थापित काव्याला फाटा देऊन स्वतःचे काव्यविश्व स्वतःच तयार केले असावे. कवी, गीतकार आणि संगीतकाराची भूमिका त्यांनीच चोख पार पाडली असावी आणि मग त्यातूनच आकारास आले असावे हादगा, भोंडला, भुलाबाईचे गाणे. या गीतामध्ये साठवलेली आहेत महिलांची अपार दु:खे. प्रकट झाली आहे साताजन्माच्या असहायतेची कारुण्यता. स्पष्टपणे प्रतिबिंबित झाली आहे अबला म्हणून आयुष्य कंठतांना वेळोवेळी झालेली कुचंबणा आणि मिळालेली हीनत्वाची वागणूक. त्यासोबतच अधोरेखित झाली आहे अठराविश्व दारिद्र्य लाभलेल्या संसाराचा गाडा हाकलताना झालेली दमछाक व ससेहोलपट अगदी ठळकपणे.

          वरील गीतात आईच्या घराला सोन्याची पायरी आहे असे म्हटले आहे. मग याला काय म्हणावे? कल्पनाविलास की अतिशयोक्ती? माहेरच्या बढाया की वास्तवता? मला मात्र यामध्ये एक भीषण वास्तविकता दिसते. ती सासुरवासीन जेव्हा सांगावा धाडण्यासाठी त्या पाखराला तिच्या माहेरगावी पाठविण्याचा बेत आखते तेव्हा तिचे माहेरघर पाखराला ओळखता यावे यासाठी तिच्या आईच्या घराची ओळख, खाणाखुणा सांगणे क्रमप्राप्तच ठरते. नेमकी येथेच तिची गोची झाली असावी. तिच्या आईच्या घराचे कवेलू, छप्पर, भिंती आणि दरवाजे हे नक्कीच सांगण्यायोग्य नसावे. खरं आहे ते सांगण्यासारखं नाही आणि खोटंही बोलायचं नाही अशी स्थिती जेव्हा उद्‍भवते तेव्हा अतिशयोक्तिपूर्ण कथन करून वेळ मारून नेणे, हाच तर मनुष्यस्वभाव आहे.  “जेव्हा एखाद्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते तेव्हा तो बढाईचा आधार घेत असतो” हेच तर त्रिकाल अबाधित शाश्वत सत्य. मग तिने सोन्याची पायरी सांगितली त्याचा वेगळा अर्थ कसा घेणार?

         त्यावरी (पायरीवर) बसजो, शिदोरी सोडजो म्हणजे काय? निरोप घेऊन जाणार्‍या पाखराला सोबत नेलेली शिदोरीच खाण्यास सांगायला ती विसरत नाही. का? उत्तर अगदी सोपे आहे, पाखराला तातडीने जेवायची व्यवस्था आईच्या घरी होऊ शकेल अशी परिस्थिती आईचीही नाही, हे तिला पुरेपूर ठाऊक असावे. तसे नसते तर तिने सोबत शिदोरी कशाला दिली असती? आईचे गाव लांब आहे, तेवढी मजल गाठेपर्यंत रस्त्याने भूक लागेल हा उद्देश असता तर मध्येच वाटेवरच्या एखाद्या विहिरीवर किंवा नदीवर बसून शिदोरी खायला सांगितले असते. आईच्या घरी पोचल्यावर पायरीवर बसून सोबतचीच शिदोरी खावी जेणेकरून पाव्हणा उपाशी नाही याचे समाधान आईला लाभेल व आईकडे पाव्हण्याला तातडीने जेवू घालायची व्यवस्था नसेल तरी तिची या फ़टफ़जितीपासून सुटकाही होईल, असा कयास बांधूनच तिने पाखराला नेमकी सूचना दिली, हे उघड आहे.

           आता हे गीत बघा. या गीतामध्ये एका सुनेला लागलेली माहेरची ओढ आणि सुनेला जर माहेरा जाऊ दिले तर शेतीत कष्ट करणारे दोन हात कमी होतील, या भितीने त्रेधातिरपट उडालेल्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांची हतबलताच दिसून येत आहे.

           नुकतेच लग्न होऊन सासरला नांदायला आलेल्या सुनेला तिच्या माहेरची आठवण होते, आईच्या आठवणीने जीव व्याकूळ झालेला असतो. तिकडे आईला सुद्धा लेकीची आठवण होऊन गहिवरलेले असते म्हणून मायलेकीची गाठभेठ करून देण्यासाठी बाप लेकीला घेण्यासाठी आलेला असतो. बाप घ्यायला आलेला बघून आनंदाने उल्हसित झालेली सून सासूला हळूच पण भीत-भीत विचारते.


हात जोडूनी पाया पडूनी
सासूबाई मी विनविते तुम्हाला
बावाजी आले घ्यायाला
जाऊ का मी माहेराला, माहेराला?


माहेराला जायची रीतसर परवानगी सूनबाई मागते आहे हे बघून सासू थोडी भांबावते. तिच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात. एक तर काहीना काही पैसा लागेलच जो घरात नाहीच. दुसरे असे की शेतीत कष्ट करणारे दोन हात पण कमी होणार. म्हणून ती सुनेला म्हणते.


कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा


कारलीच्या बियाणाची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सुनेला मनोमन पटतो. ती बेगीबेगी लागवड उरकते आणि पुन्हा सासूला विचारते.


कारलीचे बी लावलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


एक वेळ मारून नेता आली. कारलीचे बी लावून झाले पण आता पुढे काय? पुन्हा सासूबाई शक्कल लढवते.


कारलीचा वेल निघू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा


सून पुन्हा काही दिवस कळ काढते, बियाणे अंकुरून वेल निघेपर्यंत बियाला पाणी घालते, वेलीचे संवर्धन करते आणि मग वेल निघालेला बघून पुन्हा एकदा आपल्या सासूला विचारती होते.


कारलीचा वेल निघालाजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


सासूसमोर पुन्हा तोच यक्षप्रश्न. इकडे आड तिकडे विहीर. नाही म्हणता येत नाही आणि पाठवायला गेले तर संसाराचं अर्थशास्त्र कोसळते. कौटिल्याची अर्थनिती कळायला अर्थतज्ज्ञ किंवा अर्थमंत्रीच लागतो या सुशिक्षित समाजातील गोंडस समजुतीला उभा छेद देणारी एका अशिक्षित सासूची वर्तणूक.  मग तिथून पुढे नवनवीन युक्त्या लढविणे सासूचा नित्यक्रमच बनून जातो.


कारलीला फूल लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा


कारलीला फूल लागले की माहेराला जायला मिळणार या आशेने सून मात्र आलेला दिवस पुढे ढकलत असते.


कारलीला फूल लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


कारलीचा वेल मांडवावर गेलाय. वेल फुलांनी बहरून गेली. पण नशिबाच्या वेलीला बहर येईल तेव्हा ना.


कारलीला कारले लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा


आता प्रतीक्षेची घडी संपली. कारलीला कारले लागलेत. आता तरी परवानगी मिळायला हवी की नाही?


कारलीला कारले लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


आता कष्ट फळांस आले. कारली पण कारल्याने लदबदून गेली. पण कारली बाजारात नेऊन विकल्याखेरीज पैसा कसा येणार? म्हणून पुन्हा सासू सुनेला अगदी समजावणीच्या स्वरात सांगते


कारलीला बाजारा जाऊ दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा


कारलीला कारले लागलेत, कारली बाजारात गेली. आता मात्र नक्कीच परवानगी मिळणार अशी सुनेला खात्री आहे, म्हणून ती म्हणते


कारली बाजारात गेलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


कारली बाजारात गेली आहे. शेतीत पिकवलेला माल बाजारात जाणे, हा शेतीतील कष्ट फळांस येणारा परमोच्च बिंदू. खरे तर हे गीत यापुढे आनंदाच्या क्षणांकडे वळायला हवे. एवढ्या मेहेनतीने पिकविलेली कारली बाजारात जाणे हा कष्टाचे फळ पदरात पडण्याचा क्षण. शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मी येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शेतीत घाम गाळून पिकविलेला माल विक्रीस जाणे. माल विकायला बाजाराकडे गेलेला घरधनी घराकडे येताना लक्ष्मी घेऊन परतायला हवा. सोबत काहीना काही भातकं, खाऊ वगैरे आणायला हवा. पण इथून पुढे या गीतात तसे काहीच होत नाही. याउलट गीताच्या याच कडव्यापासून गीत विचित्र वळण घेते. निदान आतापर्यंत तरी कुठलाही खाष्टपणा न दाखविणार्‍या सासूचा स्वभाव इथूनच बदलायला लागतो. आजपर्यंत घरात एकमेकाशी गोडीगुलाबीने वागणारी माणसे आता नैराश्याच्या भावनेतून एकमेकांशी फटकून वागताना दिसत आहे. घरात चिडचीडपणा, उदासीनता वाढीस लागलेली दिसत आहे.

         नेमकं झालंय तरी काय? कारली मातीमोल भावाने तर नाही खपली ना? की कारलीच्या खरेदीला कोणी घेवालच मिळाला नाही? मनुष्यजातीचा स्वभाव त्याच्या आर्थिक स्थितीनुसार बदलत असतो हे समीकरण अर्थतज्ज्ञांच्या अर्थशास्त्रात बसत नसले तरीही तेच सत्य असावे. कारण या गीताचा शेवट नेमके तेच अधोरेखीत करून जातो.

आतातरी आपल्याला माहेराला जायला मिळणार की नाही या विचाराने ग्रस्त झालेली सून परत एकदा सासूला विचारती होते. सासूला खूश करण्यासाठी तिला तिच्या आवडीची कारलीची भाजी करून खाऊ घालते.


कारलीची भाजी केलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


पण आता आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या घरातली सारी कहाणीच बदललेली असते. परिस्थितीसमोर निरुत्तर झालेली सासू चक्क सुनेसोबत त्रोटक स्वरूपात बोलायला लागते. तिची भाषा बदलते, भाषेची ढब बदलते आणि शब्दफ़ेकीची तर्‍हाही बदलते.


मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या सासर्‍याला, सासर्‍याला


अगं सूनबाई, माझी ना नाही पण एक शब्द मामंजीला पण विचारून घे ना. असे म्हटले असते तर ते समजण्यासारखे होते पण सासूची आता तशी सहज आणि सौदार्हपूर्ण बोलीभाषाच बदललेली दिसत आहे कारण "मला काय पुसते, बरीच दिसते" हे वाक्य वाटते तेवढे सहज नाही. या वाक्यात उद्वेग, उबग, क्लेश, चिडचिड, ग्लानी आणि फ़टकळपणा ठासून भरला आहे.
मात्र तरीही "सासर्‍याकडूनच परवानगी घ्यायची होती तर इतके दिवस तुम्ही कशाला उगीच बहाणे सांगत राहिल्या" असा प्रतीसवाल सून करीत नाही. सासूची इच्छा प्रमाण मानून सून आता सासर्‍याला विचारायला जाते.


मामाजी, मामाजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा


पण सासरा तरी वेगळं बोलणार? सुनेला माहेरी पाठवायचे म्हणजे निदान तिला जाण्यापुरता तरी घरात पैसा असावा की नाही? नसणारच. म्हणून तर तोही आपल्यावरची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलून मोकळा होतो.


मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या नवर्‍याला, नवर्‍याला


आता शेवटला पर्याय. तिची माहेराला जाण्याची हक्काची मागणी कोणीच समजून घेतली नाही. पण आता परवानगी देण्याचे अधिकार थेट नवर्‍याच्याच हातात आले आहे. तिच्या व्याकुळतेची तीव्रता नवर्‍याला तरी नक्कीच कळलेली असणार, असे तिला वाटते. तिला खात्री आहे की आता नक्कीच जायला मिळणार. बस्स एवढ्याच तर आशेपायी ती नवर्‍याला विचारायला जाते.


स्वामीजी, स्वामीजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा


पण प्राणप्रियेच्या प्रश्नाला नवरा उत्तरच देत नाही. नवरा काय म्हणतो हे गीतात लिहिलेच नाही. गीताचा दोन ओळीत थेट शेवटच करून टाकला आहे.


”घेतलीय लाठी, हाणलीय पाठी,
तुला मोठं माहेर आठवते, आठवते……!!”


             पीएचडी, डी.लिट मिळवून किंवा वेदपुराण, कुराण, बायबल, कौटिल्य, चाणक्य किंवा हजारो पानांचे अर्थशास्त्राचे पुस्तक वाचूनही जेवढे गाव, गरिबी आणि शेतीचे अर्थशास्त्र समजून घेता येत नाही त्यापेक्षा जास्त वास्तववादी अर्थशास्त्र ह्या एका गीतात सामावले आहे, याची मला खात्री आहे.

                                                                                                                        गंगाधर मुटे

…………………………………………………………………………………………………….
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
…………………………………………………………………………………………………….

Jul 3, 2011

रावेरी - सीतामंदीर

रावेरी - सीतामंदीर

रावेरी, त.राळेगाव जि. यवतमाळ येथे भुमीकन्या सीतामाईचे मंदीर असून हे सीतामाईचे देशातले एकमेव मंदीर आहे.
प्रभूरामचंद्राने सीतामाईचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात सीतामाईचे वास्तव्य होते.

अयोध्यास्थित राममंदीरासाठी संपूर्ण देशात रामायण-महाभारत घडत असताना रावेरीचे सीतामाईचे एकमेव मंदीर जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, याकडे कुणाचे लक्षही नव्हते. काही वर्षापूर्वी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने या मंदीराच्या जिर्णोध्दाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि मंदीराचे काम पूर्ण केले.

या मंदीराच्या जिर्णोध्दारासाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांनी सिंहाचा वाटा उचलला आणि निधी उपलब्ध करून दिला.

मंदीराचे काम जवळ-जवळ पूर्ण झाले आहे.

दि. १५ नोव्हेंबर २०१० रोजी मा. शरद जोशीं यांनी रावेरी येथील सीतामंदीरास भेट देवून पाहणी केली.
त्यांच्यासोबत मा. रवीभाऊ देवांग, मा. वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, गुणवंतराव पाटील, कैलासजी तंवर, रमेश पाटील, नितीन देशमुख, रमेश देशमुख, गंगाधर मुटे आदी उपस्थित होते.


या विषयावर यथावकाश संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *
रावेरी
* * * *

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं