Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Mar 21, 2010

‘शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे’


शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे

                  शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरू आहे. या समस्येची उकल करताना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर “शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा” अशा स्वरूपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.
                शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी आयुष्यात एकदातरी सलगपणे काही दिवस शेतकरी समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात किंवा राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात, तो कसे जीवन जगतो आणि किती कष्ट करतो याचा अनुभव येणे अशक्य आहे. ४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे, पण हा देश आपण कोण्या कामचुकार, आळशी, अलायक तज्ज्ञांचा हातात सोपवला असा प्रश्न जर कोण्या ग्यानबाला पडला, तर त्याच्याशी वाद घालता येईल, मुजोरीही करता येईल पण त्या ग्यानबाच्या प्रश्नाचे समर्पक निराकरण करता येईल?
                       झोप, जेवण आणि अन्य शारीरिक विधींसाठी लागणारा काळ सोडला तर उर्वरित वेळात शेतकरी काय करतो? स्विमिंग करायला जातो? क्रिकेट / सिनेमा बघायला जातो? बायकोला घेऊन बागेत फिरायला जातो? बिअरबारवर जातो? बारबालांचे नृत्य बघायला जातो की इतवारी / बुधवारपेठेत फेरफटका मारायला जातो? मान्यवर तज्ज्ञांनी पहिल्यांदा या प्रश्नांचे उत्तर शोधायला हवे. ( आणि जरी का या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल तरीही बिघडते कुठे? सर्व उपभोगाचा भोग भोगणारी आमच्या सारखी भोगवादी मंडळी कुठे आत्महत्या करताहेत? आम्ही जिवंतच आहोत की अजून. )
औताच्या बैलाला वर्षातून फक्त १२० ते १४० दिवस तर शेतक-याला मात्र ३६५ दिवस काम करावे लागते, बाप मेला सुट्टी नाही, बापाला तिरडीवर तसाच ठेवून बैलाचे शेणगोटा, चारापाणी करायला जावेच लागते. पोरगा तापाने फणफणत असेल किंवा अगदी Gastro जरी झाला तरीही पेरणी थांबवता येत नाही हे वाजवी सत्य तज्ज्ञ मंडळींना कधी कळेल?
                 तरीही या तज्ज्ञ मंडळींना शेतकरी आळशी आणि कामचुकार दिसत असेल तर त्यांनी खालील प्रमाणे शास्त्रशुद्ध मार्गाचा अवलंब करून स्वतः:ची खातरजमा करून घ्यावी.
आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन;

१) प्रेताचे वजन करावे व शारीरिक उंची मोजावी. वजन व उंची यांचा रेशो काढावा. तो डॉक्टरला दाखवावा. मयत व्यक्ती सुदृढ की कुपोषित, कष्टकरी की कामचुकार या विषयी सल्ला घ्यावा.
२) मुखवट्याचा एक क्लोजअप फोटो घ्यावा. त्यावरून मरण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर काय भाव होते, मरण्यापूर्वी त्याची मानसिक स्थिती काय होती याचा याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून रिपोर्ट मागवावा.
३) त्याच्या घरातील नेसनीची वस्त्रे, अंथरून-पांघरून, भांडी-कुंडी यांची यादी बनवावी. त्यावरून मयत व्यक्ती काटकसरी की उधळखोर याचा अंदाज काढावा.
४) व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. तसे असेल तर तो कोणती दारू पीत होता? गावठी, देशी की इंग्लिश याचा शोध घ्यावा. गावठी, देशी आणि इंग्लिश मद्याचे अनुक्रमे बाजारभाव माहीत करून घ्यावे. (मान्यवरांना गावठी, देशीचे भाव माहीत नसणार) दरडोई येणारा खर्च याचा तुलनात्मक तक्ता/गोषवारा बनवावा. बिगरशेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण आणि शेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण याची आकडेवारी गोळा करून तुलना करावी.
५) अज्ञानतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. तसे असेल तर बिगरशेतकरी पण अज्ञानी अशा अन्य समुदायातील लोक आत्महत्या का करीत नाहीत? किंवा बारामतीचे लोक फारच सज्ञानी आहेत काय?
६) वेडसरपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. वेडसर लोक आत्महत्या करतात? कुठले? अमेरिकेतील? ब्रिटनमधील? फ्रांसमधील की पाकिस्तानातील?
७) मनोरुग्णपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. त्यासाठी गावागावात मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे त्यांना वाटते. पण ग्यानबाला हे पटत नाही. एका दाण्यातून शंभर दाण्याच्या निर्मितीचा चमत्कार घडवणारा व स्वतः: अर्धपोटी राहून जगाला पोटभर खाऊ घालणारा शेतकरी मनोरुग्ण कसा काय असू शकतो? कदाचित वैफल्यग्रस्त असू शकतो. मग तो वैफल्यग्रस्त, नाउमेद का झाला याची कारणे शोधावी. ती कारणे सामाजिक की आर्थिक याचाही शोध घ्यावा? शेतात गाळलेला घाम, दामात का परावर्तित झाला नाही याचाही शोध घ्यावा. याउलट पॅकेजची रक्कम गिळंकृत करणारे राजकीय पुढारी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणाऱ्या शासकीय मदतीचा चेक काढण्यासाठी लाच खाणारी नोकरशाही मानसिक विकृतीने ग्रासली असून त्यांच्या भावनिक संवेदना बधिर झाल्या आहेत. तेच खऱ्या अर्थाने मनोरुग्ण असून त्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये, मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे ग्यानबाला वाटते. शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेचे शुद्धीकरण आणि मतपरिवर्तन होणे गरजेचे आहे, ज्या अर्थी शेतीविषयक ध्येय-धोरणामध्ये मूलभूत बदल होताना दिसत नाही त्या अर्थी शेतीविषयक ध्येय-धोरणे आखणाऱ्याकडून शेतकरी आत्महत्या बद्दल व्यक्त होणारी चिंता हा वरपांगी देखावा आहे, ज्या अर्थी शेतीला न्याय देणारी कृषी विषयक धोरणे आखण्यासाठी लागणारी कणखरता त्यांच्यामध्ये नाही त्याअर्थी तेही मानसिक दुर्बल असावे असा ग्यानबाचा कयास आहे, त्यासाठी मंत्रालयामध्ये मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असेही ग्यानबाला वाटते. जे ग्यानबाला उमजते ते या तज्ज्ञांना का उमजू नये? उमजत असेलही कदाचित परंतु शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेवर उदरनिर्वाह करणारी मंडळी सिंहासनाच्या इच्छे विरुद्ध काही निष्कर्ष काढतील ही अशक्य कोटीतील बाब आहे, असेही ग्यानबाचे स्पष्ट मत आहे.
८) पॅकेजमुळे आत्महत्या थांबत नाही, असा काहींचा निष्कर्ष आहे. परंतु ते पॅकेजच्या स्वरूपावर अवलंबून आहे. कँसरच्या रोग्याला पॅरासीटामॉलचे पॅकेज द्यायचे, रोगी बरा झाला नाही अथवा दगावला की रोगी अज्ञानी होता, त्याने औषधे घेण्यात कुचराई केली, असा काहीसा बावळट निष्कर्ष काढण्याचा हा प्रकार आहे. त्या ऐवजी पॅकेजच्या मूळ स्वरूपातच गफलत झाली, रोगाचे निदान करण्यात, औषधांची निवड करण्यात चूक झाली हे कबूल करण्यासाठी लागणारी मानसिक औदार्यता आमच्यामध्ये केव्हा येणार हाच खरा लाख मोलाचा प्रश्न आहे.
                          मान्यवर तज्ज्ञांनी या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवी. विषयाच्या खोलवर जायला हवे. अभ्यासांती निष्कर्ष काढून सप्रमाण सिद्ध करायला हवे, पण हे होताना दिसत नाही. पूर्वग्रह बाजूला सारून त्रयस्थपणे मुद्द्याची उकल केल्याखेरीज निर्दोष निष्कर्ष निघू शकत नाही. परंतु बाटली आणि पंचतारांकित संस्कृती वृद्धिंगत झालेल्या स्वनामधन्य तज्ज्ञांना याची गरज भासत नाही. एरवी शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशील मुद्द्यावर तज्ज्ञांनी येरेगबाळे मतप्रदर्शन करण्यापेक्षा चूप बसने शेतकऱ्यासाठी समाधानाचे ठरेल. आणि कदाचित शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील मुद्द्याची उकल होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांच्या प्रारंभाचे तेच पहिले पाऊल ठरेल.


                                                             गंगाधर मुटे
....................................................................................
पुर्वप्रकाशित : १० मार्च २०१०
....................................................................................

10 प्रतिसाद:

हेरंब said...

गंगाधरजी, नेहमीप्रमाणेच खूपच तळमळीने लिहिलं आहेत आपण. या सरकारला काय पडलीये हो शेतक-यांची.. शेतकरी बिचारे जिवानिशी जातात आणि हे त्या आत्महत्यांना उगाच दारू पिऊन केलेली आत्महत्या किंवा वेडसरपणामुळे केलेल्या आत्महत्या म्हणतात. कोडगे आहेत साले सगळे एकजात.

Anonymous said...

धन्यवाद हेरंबजी,
ते कोडगे आहेत आणि शेतकरी मुका आहे. त्यामुळे असे घडतेय.

Anonymous said...

गंगाधरजी, छान विश्लेषण आहे. ह्याच विषयाला धरून लिहायचे आहे मनात बर्याच दिवसापासून. लिहीन लवकरच. शेतातले फारसे काही काळात नसलो तरी मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे :)

Gangadhar Mute said...

धन्यवाद कधितरी..!!

Govind Reddy said...

आपल्या या लेखाबद्दल प्रथम धन्यवाद.शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या या तुमच्या E व्यासपीठाचे कौतुक व स्वागत .
माझी प्रतिक्रिया --
शेतकऱ्यांच्या समस्याकडे तुच्छतेने पाहणाऱ्या सत्ताधारी,विरोधक व नोकरशाही यांचा दृष्टीकोन दुषित आहे .या सर्वाना सत्तेचा आणि पैशाचा असा माज आला आहे कि त्यांना शेतकरी मद्यपी ,वेडा, नालायक,कामचुकार वाटतो .आम्हा शेतकऱ्यांच्या कष्टी जीवनाला कांही सीमा नाही .त्यातच निसर्गाचा लहरीपणा , सत्ताधाऱ्यांचे मतापुरतेच वरवरचे सांत्वन आणि अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा.आमच्या कष्टाला या लोकाकडे ना आदर ना आमच्या प्रामाणिकपणाची कदर .अशा आम्हा पैकी काहींनी असह्य झालेल्या जीवनसंघर्ष संपविला तर त्यावर अशा तुमच्या बुद्धिहीन बौद्धिक प्रतिक्रिया .तुम्ही कांही अमर नाही आहात तुम्हाला एकदिवस मृत्यू गाठ्णारच आहे .माणूस आहात आमच्याबरोबर माणसासारखेच वागा .

Deepak said...

Govind Reddy ह्याच्याशी मी सहमत आहे. कोणतेही सरकार येऊ दे , सरकार कुठल्या शेतकऱ्याच भल करणार नाही, ते सगल आपल आपल्यालाच करावे लागणार आहे. आम्हा शेतकऱ्यांच्या कष्टी जीवनाला कांही सीमा नाही आणि हे मी जानतो कारन मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. म्हणुन मला सांगायचे आहे, सरकार वर अवलंबुन राहण्या पेक्षा व्यकती गत पातळी वर निर्णय घेतलेले बरे..... सरकार ला दोष देऊन शेतीत फायदा तर मुळीच होणार नाही. हे सरकार सत्ते वर येइल मग आपले क़र्ज़ माफ़ होइल , ह्या आशेवर बसण्या पेल्षा ते कसे फेड़ता येइल अणि आपण कुटे चुकलो ह्याकडे जास्त लक्ष दिले तर त्यात आपलाच फायदा आहे.
तसेच आपल्याला नविन नविन तंत्रन्यान आत्मसात करून नविन प्रकारे शेती केलि पाहिजे. एकाच प्रकारची शेती अणि तेच तेच पीक घेतल्यामुले जमिनीचा कस पण राहत नाही.

Govind Reddy said...

दिपक्जी ,पण जे गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेतीला पाण्याची व्यवस्था नाही त्यांनी काय कराव? मग हे सरकार कोणासाठी आहे ? सरकारची निशित जिम्मेदारी आहे.only Road, electricity comes not under national infrastructure? Agriculture must come under national infrastructure and it is govt duty to build it.

Gangadhar Mute said...

.only Road, electricity comes not under national infrastructure? Agriculture must come under national infrastructure and it is govt duty to build it.


गोविंद रेड्डी
हे ज्या दिवशी त्या स्वनामधन्य बुद्धिवाद्यांना कळेल,
तोच दिवस शेतकरी जीवनमानात बदल घडवणारा ठरेल.

लाख मोलाची गोष्ट बोललात. धन्यवाद.

दिपकजी चर्चेत भाग घेतल्याबद्दल आभारी आहे.

Deepak said...

जे गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेतीला पाण्याची व्यवस्था नाही त्यांनी काय कराव?
होई काका तुमच अगदी योग्य आहे , पण मी जे कमेन्ट केले होते ते फ़क्त ह्या लोकांसाठी आहे की , ज्यांच्या कड़े शेती आहे अणि ते लोकही सरकार कड़े मागणी ची अपेक्षा ठेवतात. आहे त्यातच ते असतात , नविन काही करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
ज्याच्या कड़े आहे त्याला गरज नाही अणि ज्याच्या कड़े नाही त्याला गरज आहे. आणि हा अनुभव मी अनुभवतोय

Deepak said...

जे गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेतीला पाण्याची व्यवस्था नाही त्यांनी काय कराव?
होई काका तुमच अगदी योग्य आहे , पण मी जे कमेन्ट केले होते ते फ़क्त ह्या लोकांसाठी आहे की , ज्यांच्या कड़े शेती आहे अणि ते लोकही सरकार कड़े मागणी ची अपेक्षा ठेवतात. आहे त्यातच ते असतात , नविन काही करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
ज्याच्या कड़े आहे त्याला गरज नाही अणि ज्याच्या कड़े नाही त्याला गरज आहे. आणि हा अनुभव मी अनुभवतोय

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं