Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Mar 28, 2017

एक लेख एका आत्मप्रौढीचा!

एक लेख एका आत्मप्रौढीचा!


            आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभनीयच. अगदी ग्रामीण जनजीवनात सुद्धा अशा वर्तनाला “अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे” अशा वर्गवारीत ढकलले गेले आहे. अगदी आत्मचरीत्र लिहायचे असेल तरी लेखकाने आपल्या आयुष्यातील बर्‍या-वाईट दोन्ही प्रकारच्या घटनांचा उहापोह करावा, अशी अपेक्षा असते. पण तरीही आयुष्यात कधीकधी अनपेक्षितपणे असाही प्रसंग येतो की आपलाच आपल्याला अभिमान वाटायला लागतो. आपण सहज म्हणून केलेले कार्य अनपेक्षितपणे अपेक्षेबाहेरची फ़लनिष्पती देऊन जाते. अशावेळी आपलाच आपल्याला वाटणारा  अभिमान अहंकार नसतो. त्यामागे असते केवळ आपल्या हातून घडलेल्या कार्याची कृत्यकृत्यता आणि श्रमसाफ़ल्यता.

            अशाच एका प्रसंगाविषयी आज लिहायचा मोह न आवरल्यामुळे आत्मस्तुतीचा दोष स्विकारुन मी लिहित आहे.

 १२ डिसेंबर २०१५ ची ती सकाळ. वेळ ९ च्या आसपासचा. पुण्यावरून माझे मित्र श्री प्रसाद सरदेसाई यांचा एक अचानक मोबाईल कॉल आला. ते कापर्‍या स्वरात म्हणाले,

“मुटे सर, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले का?”


          शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची प्रकृती अनेक दिवसापासून  चांगली नव्हती हे मला माहित होते. ते अत्यवस्थ असल्याचा १० नोव्हेंबर २०१५ ला दुपारी संदेश आल्याने रवीभाऊ काशीकर, सरोजताई काशीकर, सुमनताई अग्रवाल, शैलजाताई देशपांडे, पांडुरंग भालशंकर आणि मी लगोलग रात्रीच्या फ़्लाईटने पुण्याला जाऊन रुबिया हॉस्पीटलमध्ये त्यांची भेट घेऊन आलो होतो. ते अत्यवस्थ होते आणि वैद्यकीय उपचाराला त्यांचे शरीर फ़ारसे प्रतिसाद नव्हते. एवढे मला माहित होते. नंतरच्या काळात संपर्क माध्यमातून प्रकृती “यथास्थिती” असल्याचे संकेत मिळत होते. पण अगदीच ताजी म्हणावी अशी माहिती माझ्याकडे नसल्याने मी म्हणालो,

“ नाही. यासंदर्भात ताजी माहिती माझ्याकडे नाही” मी.

“शरद जोशी इज नो मोअर” असा तिकडून प्रसाद सरदेसाई यांचा रडका आवाज ऐकताच माझ्या काळजात धस्स झाले. विश्वास बसत नव्हता पण सरदेसाई सरांनी दिलेली बातमी खोटी असण्याचीही शक्यता नव्हती. मी तातडीने मोबाईलवर नंबर डायल केला.

“सरोजताई, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले काय?” मी.

“माझं काल रात्रीच बोलणं झालं प्रकृती.........”

मी मध्येच सरोजताईंचे बोलणे थांबवून म्हटले.

“आज काहीतरी विपरित बातमी आहे, तुम्ही तातडीने पुण्याला संपर्क करावा”

            इतके बोलून मी लगेच फ़ोन कट केला. नंतर लगेच श्री वामनराव चटप व श्री राम नेवले यांना फ़ोन केला. त्यांनाही काहीच माहिती नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पुण्याला संपर्क करुन माहिती मिळवावी, असे सुचवले. घरी बायकोला सांगून टीव्हीवर मराठी बातम्यांचे चॅनेल आळीपाळीने सतत बदलून काही बातमी येते का ते बघत राहायला सांगीतले.

            पुण्याला फ़ोन करून म्हात्रे सर किंवा देशपांडे सरांशी संपर्क करावा व नक्की काय ते खात्री करून घ्यावी, असा विचार करत असतानाच तिकडून तितक्यात सरोजताईंचाच फ़ोन आला. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. आता बोलण्याची गरजही संपलीच होती. मग फ़ोनवर दोन्हीकडून अक्षरश: ओक्साबोक्सी रडारड सुरु झाली. ९-१० मिनिटानंतर मी स्वत:ला सावरायचा प्रयत्न केला पण त्यात यश येईना म्हणून बोट लाल बटनेवर ठेवले आणि फ़ोन कट केला.

            आता रडण्याखेरीज अन्य काही कार्य उरलेलेच नव्हते. बातम्या अजून सुरु व्हायच्या होत्या. निदान आणखी दोन तास तरी ही बातमी अधिकृतपणे जाहीर होण्याची व प्रसारमाध्यमांपर्यत पोचण्याची शक्यता नव्हती. बातमी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना आणि वृत्त वाहिन्यांना शरद जोशींविषयीची माहीती, जीवनपट, छायाचित्र आणि व्हिडियो लागतील. ही सर्व माहिती प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देऊ शकेल असे शेतकरी संघटनेकडे एकच व्यक्तिमत्व होते आणि ते म्हणजे प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे. संघटनेच्या सुरुवातीपासूनच म्हात्रे सरांनी केंद्रीय कार्यालय सांभाळले आहे. पण याक्षणाला ते माहिती पुरवायला नक्कीच उपलब्ध होऊ शकणार नव्हते. शिवाय शरद जोशींच्या प्रकृतीची बातमी प्रसारमाध्यमांपासून लपवून गोपणीयता राखल्याने प्रसारमाध्यमेही बेसावध असल्याने ऐन वेळेवर माहिती गोळा करणे त्यांनाही शक्य होणार नाही, याचाही नीटसा अंदाज येऊन गेला.

            शरद जोशींच्या अत्यवस्थेविषयी कार्यकर्त्यांनाही फ़ारशी माहिती नसल्याने ही बातमी महाराष्ट्रासहित अन्य राज्यातील शेतकर्‍यांनाही धक्का देणारी असल्याने या बातमीचे महत्वही अनन्यसाधारणच होते. आता यासंदर्भात जे काही करायचे ते आपल्यालाच करायला हवे असे ठरवून  तातडीने लॅपटॉपवर बसलो आणि महाराष्ट्रासहित देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांना आणि दुरदर्शन वाहिन्यांना इमेलद्वारे माहीती पाठवायचा सपाटा सुरू केला.

            तीन-चार इमेल जाईपर्यंत ठीक होते पण जेव्हा एकापाठोपाठ शरद जोशींविषयीची संपूर्ण माहिती, जीवनपट, आंदोलनाचा आढावा, छायाचित्र व व्हिडियो असलेले दहा-बारा इमेल त्यांचेकडे पोचले तेव्हा पत्रकारांना संशय येऊन काहीतरी नक्कीच वाईट बातमी असल्याचा त्यांनाही अंदाज येणे क्रमप्राप्त होते. मग माझा मोबाईल खणखणायला लागला. पुण्यावरून अधिकृत घोषणा न झाल्याने मी पत्रकारांना बातमीच्या सत्यतेचा दुजोरा देऊ शकत नव्हतो. मग मोबाईल मित्राच्या हाती दिला आणि सांगीतले की कॉल करणार्‍या सर्वांना सांग की मी सध्या अतिव्यस्त आहे त्यामुळे त्यांनी एक तासानंतर संपर्क करावा. मी मात्र माहितीचे इमेल पाठवणे सुरुच ठेवले.

            मी पाठवत असलेल्या माहितीचा बाज लक्षात घेता बहुधा प्रसारमाध्यमांनाही पुरेसा अंदाज येऊन गेलेलाच असावा कारण मी फ़ोनवर उपलब्ध नाही म्हटल्यावर तिकडून इमेलवर रिप्लाय यायला लागलेत. रिप्लायला प्रतिसाद न देता मी नवीन माहिती पाठवणे सुरुच ठेवले.  त्याचा परिणाम असा झाला की अधिकृत घोषणा होताच दूरदर्शन वाहिन्यावर थेट सविस्तर बातम्याच सुरू झाल्यात. पुण्यापासून ८०० किलोमिटर अंतरावरील आर्वी छोटी सारख्या दुरवरच्या ग्रामीण भागातील ३००० लोकसंख्या असलेल्या गावात बसून मी दिवसभर राज्यभरातल्या कानाकोपर्‍यातील प्रसारमाध्यमांना हवी ती माहिती आणि साहित्य पुरवत होतो, ही आधुनिक संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञानाची किमया होती आणि मी त्या अत्याधुनिक नवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेत होतो.  दिवसभर दूरदर्शन वाहिन्यावर आणि १३ तारखेच्या राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यामध्ये ५० ते ९० टक्के मजकूर मी पाठवलेलाच दिसत होता किंवा मीच चालवत असलेल्या www.sharadjoshi.in व www.baliraja.com या संकेतस्थळावरुन तरी घेतलेला होता. शरद जोशींचा जीवनपट तर जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी मी जसा पाठवला तसाच्या तसाच छापला होता.

            माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने व मी निर्माण करून ठेवलेल्या संकेतस्थळांमुळे शरद जोशींसारख्या युगात्म्याचे व्यक्तीमत्व सविस्तर माहितीसह जनतेपर्यंत पोहचू शकल्याने श्रमसाफ़ल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटून अभिमानास्पद वाटणे अगदीच स्वाभाविक आहे.

 - गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
साप्ताहिक उदयकाळ "चैत्र विषेशांक-२०१७" मध्ये प्रकाशित.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं