Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Dec 30, 2013

दिल्लीतील सत्तापालट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात?

दिल्लीतील सत्तापालट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात?

       अपेक्षेप्रमाणे दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होऊन अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्याचबरोबर विधानसभेच्या त्रिशंकू स्थितीमुळे दिल्लीत नव्याने निवडणुका होण्याची शक्यता काही काळापुरती का होईना पण संपल्याचे संकेत मिळत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगले संकेत मानायला हवे. बदलती राजकीय स्थिती आणि प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव यामुळे देशात वारंवार त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणे आता यापुढे नित्याचेच ठरणार आहे. त्यावर वारंवार निवडणुका हा काही पर्याय असू शकत नाही. विभिन्न विचाराचे आणि प्रचंड राजकीय वैचारिक विरोधाभास असला तरी काही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे, हाच यावर एकमेव इलाज आहे. अशा बिकट प्रसंगी जर अपरिहार्यतेने विरोधाभासी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत असेल तर याला संधीसाधूपणा म्हणता येणार नाही.

       केजरीवाल मुख्यमंत्री झाल्याने आता त्यांना जनतेला दिलेले महागाई व कांद्याचे भाव वगळता अन्य अभिवचन पूर्ण करणे फारसे कठीण नाही, कदाचित शंभर टक्के यश मिळणार नाही पण एक पारदर्शक आणि "लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य" असे म्हणण्याइतपत चांगले सरकार ते नक्कीच देऊ शकतात. त्यामुळे लोकाभिमुख राज्यकारभाराचा एक अत्यंत चांगला पायंडा पडण्यास सुरुवात होण्याची नक्कीच शक्यता आहे.

       मला अरविंद केजरीवालांच्या वागण्याच्या पद्धतीत, बोलण्यातील ढबीत आणि पेहरावाच्या स्टाइलमध्ये एक "महात्मा" दिसत होता. ही त्यांची नौटंकी की निसर्गदत्त गुणविषेशता हे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच. पण सध्यातरी माझा भ्रमनिरासच झाला आहे कारण सत्तेच्या माध्यमातून लोकनेता होणे आजवर कुणालाच शक्य झाले नाही. केजरीवालांना शक्य होईल, हेही शक्य वाटत नाही त्यामुळे आता ’महात्मा’ व ’युगपुरुष’ होण्याची त्यांनी संधी गमावलीच आहे. मात्र त्यांना चांगला ’राजकारणी’ होता आले तर ती भारतीय लोकशाहीला कलाटणी देण्याची लोकाभिमुख सुरुवात ठरेल.

       केजरीवाल उत्साही आहे, मेहनती आहे आणि विषय समजून घेण्यासाठी अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे. सोबत साधी राहणी आणि निर्धोकपणा या त्यांच्या जमेच्या बाजू आहे. देश घडवण्यासाठी लागणारी कळकळ आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी परिणामास सामोरे जाण्याची तयारी आहे. मात्र त्यांचा धूर्तपणा यात सर्वात मोठा अडसर ठरेल असे मला वाटते. दिनांक १७/१२/२०१३ च्या फेसबुकवरील एका पोस्टमध्ये मी असे म्हटले होते की, "कोणाचा पाठिंबा घेणार नाही, कोणाला पाठिंबा देणार नाही" या डावपेचामागे भाजपाला सत्तेपासून अडवणे आणि विधानसभेच्या त्रिशंकू अवस्थेचे सर्व सूत्र संचलन आपल्या हातात घेणे, हा उद्देश केजरीवालांचा आहे, आणि नेमके तेच आज ते खरे झाले आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर

       ’आप’ला २८ जागा मिळाल्याने देशातील जनतेच्या आशा पालवल्या होत्या. अरविंद केजरीवालांच्या रूपाने एक प्रामाणिक नेता देशाला मिळाल्याची भावना व्यक्त व्हायला लागली होती. दिल्लीतून सुसाट निघालेला अश्वमेघाचा घोडा आता भारताच्या खेड्यापाड्यापर्यंत घोडदौड करून भारतीय राजकारणाला एक खंबीर आणि स्वच्छ पर्याय उपलब्ध करून देईल, अशी शक्यता निर्माण व्हायला लागली होती. मात्र त्रिशंकू विधानसभेतून सत्तेचा मार्ग शोधण्यात केजरीवालांनी धूर्तपणाच्या ज्या तिरक्या चाली खेळल्यात, त्या चाली आणि कॉग्रेस व भाजपाच्या मुत्सद्देगिरीच्या तुलनेत धूर्तपणाच्या होत्या, यात मुत्सद्देगिरी खचितच नव्हती. त्रिशंकू विधानसभेत "आप" निर्णायक स्थितीत असताना आणि सरकार स्थापनेचे भवितव्य ’आप’च्या हातात एकवटले असताना ’आप’ची ही भूमिका लोकशाहीला पोषक नव्हती. आपची ही भूमिका प्रामाणिकपणाची नव्हती तर भाजपला रोखून स्वतःचे सरकार स्थापन करण्यायोग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी खेळलेली ’आप’मतलबी व धूर्तपणाची खेळी होती, असे माझे स्पष्ट मत आहे.

       निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वात जास्त जागा जिंकून दिल्ली विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला होता. प्रचलित व्याख्येनुसार जनादेश भाजपला मिळालेला होता. भाजपने सरकार स्थापन करणे व इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा देणे, हा सरळसोपा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग होता. मात्र कॉग्रेसच्या मुत्सद्देगिरीने आणि केजरीवालांच्या धूर्तपणाने हा डाव उधळला गेला. याच कारणाने माझ्या नजरेत केजरीवालांचा प्रामाणिकपणा संशयाच्या भोवर्‍यात आला आहे. पण एवढ्याशा कारणाने त्यांच्या डोक्यावरील गांधीटोपीला गालबोट लागले, असे काही म्हणता येणार नाही. त्यांच्या डोक्यावर गांधीटोपी काँग्रेसवाल्यांच्या डोक्यावरील टोपीपेक्षा जास्त उठावून दिसते, हे सुद्धा तेवढेच खरे आहे.

       केजरीवालांना आणि भारतीय शोषित जनतेला अपेक्षित असलेले व्यवस्था परिवर्तन सत्ताप्राप्तीतून साध्य होण्याची शक्यता नाही. तरीही केजरीवाल सत्तेच्या मैदानात उतरले. आता सत्तेतूनही व्यवस्था परिवर्तन साध्य होऊ शकते हे सिद्ध करण्याची जबाबदारी केजरीवालांची आहे. नाहीतर भारतीय जनतेचा परिवर्तनवादी चळवळीवरीलच विश्वास डळमळीत होईल.

       सध्या देशात भ्रष्टाचारविरोधी वातावरण तापवण्यात केजरीवालांना आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला यश आल्यामुळे देशासमोरील एकमेव समस्या म्हणजे भ्रष्टाचार असे चित्र निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. या गदारोळात शेतमालाच्या भावाचा प्रश्न पार मागे ढकलला गेला आहे. दिड दशकापूर्वी जेव्हा व्ही.पी. सिंग यांनी बोफ़ोर्सच्या मुद्द्यावरून रान उठवले आणि देशात उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला तेव्हा देशात संतापाची लाट उसळली आणि सत्ताबदलाचे वारे वाहू लागले होते. तेव्हा शेतकरी संघटनेने कुशलतेने कर्जमुक्तीचा मुद्दा रेटून ऐरणीवर आणला होता. परिणामत: व्ही. पी. सिंग पंतप्रधान होताच संपूर्ण देशातील शेतकर्‍यांना दहा हजारापर्यंतची कर्जमुक्ती मिळवून देण्यास शेतकरी संघटना यशस्वी झाली होती.

       सध्या देशात जे बदलाचे वारे वाहात आहे त्यात शेतीसाठी फ़ारसे आशादायक चित्र दिसत नाही. केजरीवालांचे विचार शेतीच्या अर्थकारणाच्याबाबतीत फ़ारसे उपयोगाचे नाही. कांदा दिल्लीकरांना स्वस्त मिळावा, अशी एकंदरीत मांडणी आहे. मात्र ते जसजसे भ्रष्टाचाराच्या आणि दिल्लीतील जनतेच्या सिमा ओलांडून देशातील शेतीबाबत विचार करायला लागतील तेव्हा शेतकरी संघटनेची शेतीविषयक विचारधारा समजून घेणे फ़ारसे कठीन जाणार नाही. सद्यस्थितीत राहूल गांधी, नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारेंचा विचार केला तर तुलनेने अरविंद केजरीवाल जास्त उपयोगाचे ठरू शकतात. शेतकरी संघटनेचा अर्थवाद पुढे नेण्यासाठी व्ही.पी. सिंगांसारखा अरविंद केजरीवाल यांचा वापर शेतकरी संघटनेने करून घ्यायला हवा.

       सध्यातरी देशात केजरीवाल वगळता राष्ट्रीय पातळीवर दुसरा कोणताही अन्य आशेचा किरण उपलब्ध नाही, त्यामुळे परिवर्तनवादी घटकांनी अरविंद केजरीवालांना सक्रिय समर्थन देण्याची सक्त गरज निर्माण झाली आहे. ही ऐतिहासिक संधी आपण गमावता कामा नये. महाराष्ट्रात आम आदमी पक्ष, शेतकरी संघटना, विदर्भ संयुक्त कृती समिती, काही रिपब्लिकन पक्ष व आणखी काही संघटना एकत्र आल्यास राज्यात एक ताकदवान दबावगट निर्माण होऊन व्यवस्था-परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकले जाऊ शकते, एवढी मला नक्कीच खात्री आहे.

                                                                                                                          - गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------

Dec 28, 2013

टिकले तुफान काही

टिकले तुफान काही

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही

कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही

तापून षड-रिपुंनी पेटून पाहिले पण;
भट्टीतही जरा ना जळले तुफान काही

घेरून मध्यभागी केलाय कोंडमारा
नाहीच डोंगरांना नमले तुफान काही

होते तिथेच आहे थिजल्या समान काही
लोळून पायथ्याला निजले तुफान काही

खेळून धूर्त खेळी, स्वामित्व भोगणारे
सत्ता रवंथताना विरले तुफान काही

कक्षेत यौवनाच्या येताच प्रेमभावे
सौख्यात नांदताना दिसले तुफान काही

विकण्यास आत्मसत्ता जेव्हा लिलाव झाला
बोंबीलच्या दराने खपले तुफान काही

भाषेत गर्जनेच्या आवेश मांडला पण;
किरकोळ आमिषाला फसले तुफान काही

दिसण्यात शेर होते, दाढीमिशी करारी
निर्बुद्ध वागण्याने, मिटले तुफान काही

आश्वासने उधळली, सूं-सूं सुसाटतेने
वचने निभावताना नटले तुफान काही

मोठ्या महालमाड्या शाबूत राखल्या अन्
उचलून झोपडीला उडले तुफान काही

ना पाळताच आला आचारधर्म ज्यांना
गर्तेत लोळताना बुजले तुफान काही

हकनाक व्यस्त झाले चिंतातुराप्रमाणे
आव्हान पेलताना दमले तुफान काही

गल्लीकडून काही दिल्लीकडे निघाले
मध्येच मुद्रिकेला भुलले तुफान काही

बसताच एक चटका सोकावल्या उन्हाचा
पोटात सावलीच्या दडले तुफान काही

भोगात यज्ञ आणिक कामात मोक्षप्राप्ती
संतत्व लंघताना चळले तुफान काही

पूर्वेकडून आले, गेलेत दक्षिणेला
फुसकाच बार त्यांचा, कसले तुफान काही?

सत्तारुपी बयेचा न्याराच स्वाद भारी
आकंठ चाखण्याला झुरले तुफान काही

आरंभशूर योद्धे दिसले जरी ’अभय’ ते
गोंजारताच अख्खे निवले तुफान काही

                                         - गंगाधर मुटे 'अभय’
-------------------------------------------------------------------------

Dec 17, 2013

"आप" चा धूर्तपणा अंगलट येतोय!

"आप" चा धूर्तपणा अंगलट येतोय!

            दिल्ली निवडणूकांचे निकाल जाहीर होऊन ’आप’ला २८ जागा मिळाल्याने देशातील जनतेच्या आशा पालवल्या होत्या. अरविंद केजरिवालांच्या रुपाने एक प्रामाणिक नेता देशाला मिळाल्याची भावना व्यक्त व्हायला लागली होती. दिल्लीतून सुसाट निघालेला अश्वमेघाचा घोडा आता भारताच्या खेड्यापाड्यापर्यंत घोडदौड करून भारतीय राजकारणला एक खंबीर आणि स्वच्छ पर्याय उपलब्ध करून देईल, अशी शक्यता निर्माण व्हायला लागली होती. मात्र त्रिशंकू विधानसभेतून सत्तेचा मार्ग शोधण्यात केजरिवालांनी धूर्तपणाच्या ज्या तिरक्या चाली खेळल्यात, त्या चाली आणि कॉग्रेस व भाजपाच्या मुत्सदेगिरीच्या तुलनेत केजरिवालांचा धूर्तपणा आता त्यांच्याच अंगलट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सत्तेच्या सारीपाटात कॉंग्रेस, भाजप आणि आप कडून मांडण्यात आलेल्या सोंगट्याचा अन्वयार्थ असा;

कॉंग्रेस :
"केजरीवालांनी सरकार बनवावे, आम्ही त्यांना विनाशर्थ पाठींबा देऊ" :- सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजप सरकार स्थापन करू शकतो. भाजपला रोखण्यासाठी आणि केजरीवालांच्या मनात सत्तालोलुपता निर्माण करण्यासाठी कॉग्रेसकडून फ़ासा फ़ेकण्यात आला. दिल्लीत पुन्हा निवडणुका टाळणे आणि भाजपला सत्तेपासून दूर लोटणे, हा मुत्सदेगिरीचा डाव आहे.

आप :
"कोणाचा पाठींबा घेणार नाही, कोणाला पाठींबा देणार नाही" :- भाजपाला सत्तेपासून अडवणे आणि विधानसभेच्या त्रिशंकू अवस्थेचे सर्व सुत्र संचालन आपल्या हातात घेणे, हा उद्देश या डावपेचामागे आहे. हा धूर्तपणा आहे; मुत्सद्देगिरी खचितच नाही. त्रिशंकू विधानसभेत "आप" निर्णायक स्थितीत असताना आणि सरकार स्थापनेचे भवितव्य ’आप’च्या हातात एकवटले असताना ’आप’ची ही भुमिका लोकशाहीला पोषक नाही.

भाजप :
कॉंग्रेस आणि आपच्या भूमिकेमुळे भाजपची गोची झाली आहे. आपच्या समर्थनाशिवाय भाजप सत्तेवर येऊ शकत नाही आणि आप तिरक्या चाली खेळत आहे, हे बघून भाजपने सरकार स्थापनेस नकार दिला. घोडाबाजार किंवा अन्य मार्गाने जाण्याऐवजी "थांबा आणि वाट पहा" ही भुमिका स्विकारली. ही मुत्सद्देगिरी आहे.

            आता दिल्लीत राष्ट्रपती राजवट आल्यास किंवा विधानसभा विसर्जित होऊन पुन्हा निवडणुकांना सामोर जायची वेळ आल्यास त्याचे खापर केजरीवालांच्या माथ्यावर फ़ोडले जाईल. बदल आणि परिवर्तनापेक्षा लोकांची/मतदारांची प्राथमिकता राजकिय स्थैर्याला असते, हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अनेकदा दिसून आले आहे. त्याचा फ़ायदा कॉंग्रेस/भाजप घेईल.

            केजरिवालांना अपेक्षित असलेले परिवर्तन सत्ताप्राप्तीतून साध्य होण्याची शक्यता नाही. तरीही केजरीवाल सत्तेच्या मैदानात उतरले. आता सत्तेतूनही परिवर्तन साध्य होऊ शकते हे सिद्ध करण्याची जबाबदारी केजरीवालांची आहे. आता यातून पळ काढणे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही.

            प्रत्यक्ष राजकारणात उडी घेऊन केजरीवालांनी पहिली चूक केली. आता त्यांनी सरकार बनवावे किंवा बनण्याला मदत करून दुसरी चूक करावी. त्रिशंकूस्थितीत याखेरिज अन्य पर्याय केजरिवालांना उपलब्ध नाही. परिवर्तन झाले पाहिजे पण सोबतच लोकशाही सुद्धा मजबूत झाली पाहिजे, हे विसरता कामा नये.

केजरीवालांनी धूर्तपणापेक्षा प्रामाणिकपणाच्या मार्गाने जायला हवे, तरच देशाला काहीतरी उपयोग होईल.

                                                                                                                    - गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------

Dec 16, 2013

'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत

'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत

'आप’ के अडैल रुख पे ’कमल’ जरा मलूल है।
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥

खुली खुली ये बात है की उलझा हुआ ये दाव है-२
सोचना ये सोच है की सोच ही पडाव है
अण्णा जिधर गये - २
अण्णा जिधर गये वहॉसे ’लोकपाल’ दूर है
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥१॥

झुकी झुकी निगाह में भी है बला की मग्रूरी -२
दबी दबी सी बात मे भी छुपी हुई धुरंधरी
ये पेच दिल्लीका-२
ये पेच दिल्लीका अब बन गया नुपूर है
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥२॥

गीत - गंगाधर मुटे
संगीत - अरविंद हर्षवर्धन
गायिका - बि. किरण
फ़िल्म - ’आप’ के हसिन सपने
’दूम दबाके दिल्ली भागी’ प्रॉडक्शन की प्रस्तुती
------------------------------------------------------------

Dec 15, 2013

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥

पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥

क्षुल्लक संख्या ’नरबळी’ची, अन् तांडव केवढे यांचे
शतसहस्र "बळी" बळीचे, पण हाल पुसेना त्यांचे
या शहाण्यांच्या सद्बुद्धीवर, अवदसा कुठूनी आली?
मुळी कशाची लाज न उरली; की बुद्धी भ्रमिष्ट झाली?
पगार-वेतन विनाश्रमाचे यांना करतसे नादान है? ॥

या देशाच्या पुढारकांचा दिमाग सटकला आहे!
दीडदमडीच्या सुधारकांचा विवेक भटकला आहे!!
एकच प्रश्न अंतिम आता, पुसून घेऊ पुन्हा
विद्वानांनो, सुशिक्षितांनो, अरे! काय बिमारी तुम्हा?
काय नेमका इलाज तुम्हावर? आयुर्वेद की अ‍ॅलो?
धागे-दोरे की मांत्रिक-बाबा? बस एकबार तो बोलो!
जेणेकरूनी विवेक तुमचा येईल ताळ्यावरती
'अभय'तेने जगेल जनता त्यांच्या शेतावरती
आम्हालाबी जगू द्या आता! हम भी तो इन्सान है!!

                                          - गंगाधर मुटे 'अभय’
----------------------------------------------------------

Nov 24, 2013

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन


          ८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.

         कापसाला ६०४० रू, सोयाबिनला ५०००रू. आणि धानाला ३२०० रू आधारभूत किंमत जाहिर करावी, या प्रमुख मागणीसह प्रस्तावित सिलींग , भुसंपादन कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेतर्फ़े वायगाव चौरस्ता, आर्वी, सेलडोह आणि जांब चौरस्ता येथे आज दि. २३ नोव्हेंबर रोजी ५ तासाचे पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.

         यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबिनच्या उत्पादनात प्रचंड घट आलेली आहे. खरीप हंगामाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडल्यानंतर पुन्हा शेतकरी रबी हंगामाच्या उदिमाला लागलेला आहे परंतू जिल्ह्यात १८ तास शेतीसाठी वीज भारनियमन असल्याने आणि ६ तास मिळणारी वीज कमी दाबाची आणि खंडीत असल्याने शेतकर्‍यांसमोर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परिणामत: पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांनी उचल खाल्ली असून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढलेले आहे.

         सरकार मात्र नेहमीप्रमाणेच शेतीच्या मदतीसाठी उदासिन असून शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर काहीही हालचाल सुरू झालेली नाही. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेती विषयावर अवाक्षरही बोलायला तयार नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, हीच भुमिका शासनाची असल्याने आज राज्यभर पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.

         या आंदोलनात प्रवाशी वाहनांना थांबवून त्यातील प्रवाशांचे पान-फ़ूल देवून स्वागत करण्यात आले. सध्याची शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती आणि त्याबातची सरकारची शेतकरीविरोधी भूमिका याबद्दलची कैफ़ियत प्रवाशांसमोर मांडण्यात आली. सामान्य जनतेनेच आता शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सरकारला वठणीवर आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी प्रवाशांना हात जोडून विनंती करण्यात आली. प्रवाशांनी सुद्धा शेतकर्‍यांच्या आजच्या हलाखीच्या स्थितीशी सहमती दर्शवत सरकारने जगाच्या पोशिंद्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
*  *  *
वायगाव चौरस्ता (वर्धा) - वायगाव येथिल पानफ़ूल आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गंगाधर मुटे, नंदूभाऊ काळे, प्रा. पांडुरंग भालशंकर, सतिश दाणी, दत्ता राऊत, महेश वल्लभवार, सौ. शारदा प्रभाकर झाडे, बापू ठाकरे, गोविंद भगत, बाबा साटोणे, महादेव गोहो, अरविंद राऊत, माणिक उघडे, शोभा कोरेकार, ज्योती भगत, तानू ठाकरे, मधूकर नेजेकार, देवराव हुडे, राजू इखार, नारायण होले यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सेलडोह (वर्धा) - सेलडोह येथील पानफ़ूल आंदोलनात माजी आमदार सौ. सरोज काशीकर, सुनंदा तुपकर, निळकंठ घवघवे, रविंद्र खोडे, शकिल खोडे, चेतराम मेहुणे, धोंडबा गावंडे, शांताराम सोनटक्के, अरविंद बोरकर, रंजना सोनटक्के यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
*  *  *
जांब चौरस्ता (वर्धा) - जाम चौरस्ता येथे शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख मधुसूदन हरणे, प्रा. मधुकरराव झोटिंग, वसंतराव दोंदल, उल्हास कोटमकर, जीवन गुरनुले, अजाबराव राऊत, साहेबराव येडे, जि.प. सदस्य चंद्रमणि भगत, जि.प. सदस्य विणा राऊत, पं.स. सदस्य सुनिल बुरबुरे, दमडु मडावी, कैलास नवघरे, अनिल धोटे, केशव भोले, शंकर घुमडे, हरि जामुनकर, गणेश माथनकर, सुधाकर भगडे यांच्या नेतृत्वात पान, फुल आंदोलन करण्यात आले.
*  *  *
आर्वी (वर्धा) - आर्वी-तळेगाव मार्गावर शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा शैलजा देशपांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
*  *  *
बुलडाणा - शेतकरी संघटनेतर्फे आज, शनिवारी वेगळा विदर्भ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पान-फुल आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले. बुलडाणा तालुक्‍यातर्फे धाड नाक्‍यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनाला थांबवून प्रवाशांना पान-फुल देत त्यांचे स्वागत केले. संघटनेच्या मागण्यांचे पत्रकही त्यांना देण्यात आले.
         यावेळी वाहनधारकांची कोंडी झाली होती. त्या ठिकाणी झालेल्या छोटेखानी सभेत डॉ. हसनराव देशमुख, नामदेवराव जाधव यांनी वेगळ्या विदर्भाचे फायदे सविस्तर समजावून सांगितले. वेगळा विदर्भ झाला, तर विदर्भात होणारी वीज शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना व नागरिकांना 24 तास मिळू शकते व उर्वरित वीज टिकून मोठा महसूल मिळू शकतो. 24 तास वीज मिळाल्यामुळे शेतीचे व कारखानदारीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना आत्महत्येला आळा बसू शकतो. त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
*  *  *
वणी (जि. यवतमाळ) - येथील शेतकरी संघटनेने वरोरा मार्गावरील वाहनांना थांबवून चालकांना पानफूल देऊन वेगळ्या विदर्भासह अनेक मागण्यांसाठी शनिवारी दुपारी एकला आगळेवेगळे आंदोलन केले.
         या आंदोलनादरम्यान, विविध मागण्यांसाठी घोषणाबाजीही करण्यात आली. दिवसेंदिवस सरकारी धोरणामुळे बुडत चाललेला शेतीव्यवसाय व उत्पादन शेतकरी, पिकांचा भरून न निघणारा उत्पादन खर्च, शेतकऱ्यांवरील वाढत चाललेला कर्जाचा बोजा, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. कापसाला राज्य सरकारने शिफारस केल्याप्रमाणे 6040 रुपये प्रतिक्‍विंटल भाव केंद्राकडून जाहीर करावा, धान्याचा व खताचा वाढता खर्च लक्षात घेता सोयाबीनला पाच हजार रुपये केंद्राने जाहीर करावा, उसाला तीन हजार 200 रुपये भावाची पहिली उचल देण्यात यावी, शेतकऱ्यांचे वीजबिल व कर्ज माफ करण्यात यावे, तसेच वीजजोडणी थांबविण्यात यावी, विदर्भ राज्य तत्काळ घोषित करण्यात यावे, सर्व शेतमालावरील निर्यात बंदी हटविण्यात यावी, केंद्र सरकारने केलेल्या सीलिंगच्या कायद्यात सुधारणा करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
*  *  *
पान फ़ूल आंदोलन
वायगाव चौरस्ता

पान फ़ूल आंदोलन
वायगाव चौरस्ता. रापम च्या बस चालकाला पानफ़ूल देतांना 
पान फ़ूल आंदोलन
नांदेड
पान फ़ूल आंदोलन
लोकमत
पान फ़ूल आंदोलन
लोकशाही वार्ता
पान फ़ूल आंदोलन
महाराष्ट्र टाईम्स
पान फ़ूल आंदोलन
नवभारत
पान फ़ूल आंदोलन
पुण्यनगरी
पान फ़ूल आंदोलन
सकाळ
पान फ़ूल आंदोलन
भास्कर
पान फ़ूल आंदोलन
तरुण भारत
पान फ़ूल आंदोलन
देशोन्नती

Nov 11, 2013

“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचे प्रकाशन

“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचे प्रकाशन

      “माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाचे प्रकाशन दि. १० नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी २.०० वाजता चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर शेतकरी संघटनेच्या खुल्या अधिवेशनात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या शुभहस्ते आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग, स्वभापचे प्रांताध्यक्ष  माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, पी.टी.आयचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रताप वैदीक, माजी खासदार भूपेंद्रसिंग मान, माजी आमदार सौ. सरोजताई काशीकर, महिला आघाडीच्या प्रांताध्यक्षा सौ. शैलाताई देशपांडे, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय कोले, अनिल धनवट, माजी मंत्री रमेश गजबे, अ‍ॅड दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत विमोचन करण्यात आले.
      “माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाला जेष्ठ संगीतकार गझलगंधर्व सुधाकर कदम यांची प्रस्तावना लाभली असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक गझलनवाज भिमराव पांचाळे, प्रदीप निफ़ाडकर, स्वामी निश्चलानंद, किमंतू ओंबळे, प्रमोद देव यांचे अभिप्राय लाभले आहे. पुणे येथील शब्दांजली प्रकाशनने हा गझलसंग्रह प्रकाशित केला असून www.pustakjatra.com या संकेतस्थळावर ऑनलाईन विक्रीस उपलब्ध करण्यात आलेला आहे.

गझलसंग्रह  :    माझी गझल निराळी
पृष्ठे            : ८८
किंमत        : ७०/-
कवी           : गंगाधर मुटे "अभय"
प्रकाशक     : राज जैन
                शब्दांजली प्रकाशन,
                नर्‍हे गाव, पुणे
-------------------------------------------------------------

माझी गझल निराळी

-------------------------------------------------------------
गझलसंग्रह

-------------------------------------------------------------
Mazi gajal nirali

-------------------------------------------------------------
Gajhal

Nov 3, 2013

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!


आयुष्यभर "दिवे" नाही लावू शकलो!
मग आजच भरमसाठ पणत्या लावून असा कोणता प्रकाश पडणार आहे?
आयुष्यभर "उजेड" नाही पाडू शकलो,
मग आजच भरमसाठ फ़टाके फ़ोडल्याने असा कोणता गगणभेदी उजेड पडणार आहे?
लक्ष्मीपुजनाचे विचारताय?
मग ऐका, आता माझ्या घरात असलेली लक्ष्मी "बॅंकेच्या मालकीची" आहे. तीची पूजा केली काय नाही काय, तिला तसाही काय फ़रक पडणार आहे?
तिचा "मालक" तिची पूजा करेलच की!
माझ्यावाचून लक्ष्मीचे अडले तरी काय?
"लक्ष्मीपूजन" करावेसे मलाही वाटते, पण;
माझे दैवत माझे श्रम आहे आणि
लक्ष्मीदेवीला "श्रमाच्या घामावर" किंवा
"घामाच्या श्रमावर" प्रसन्न व्हायची अ‍ॅलर्जी दिसतेय.
* * *
बळीला पाताळात गाडल्याचा आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे दिवाळी!
वर्षभर शेतीला लुटून मिळवलेल्या "संचयाची" पूजा करणे म्हणजे दिवाळी!!
नव्या खातेवहीची औपचारीक पूजा करून नव्या दमाने शेतीला लुटायचा संकल्प म्हणजे दिवाळी!!!
शेतकर्‍याच्या कमरेला धडूतही शिल्लक राहाणार नाही, अशा सरकारी धोरणांची हिरिरीने अमलबजावणी म्हणजे दिवाळी!!!!
* * *
बळीराजाच्या डोक्यावर यंदा निसर्गानेच "फ़ुलझड्या" चेतवल्यात आणि
सरकार बळीराजाच्या बुडाखाली "फ़टाके" फ़ोडायला निघालंय.
* * *
तसं हे आमचं बारमाही गार्‍हाणं
खणखणीत नसते कधीच नशीबाचं नाणं
सरून गेल्या आशा
मरून गेल्या इच्छा
तरीही मात्र म्हणावेच लागते....
.
.
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!

Oct 26, 2013

शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर

शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर

स्थळ : क्लब ग्राऊंड, चंद्रपूर                                                         दिनांक – ८,९ आणि १० नोव्हेंबर २०१३



*   *   *



*   *   *
अधिवेशनातील कामकाजाचे प्रारूप व विषय-पत्रीका

दिनांक ८-११-२०१३

सकाळी   ११.०० ते ११.३०        ध्वजारोहन व उद्‍घाटन, उद्‍घाटक मा. शरद जोशी
सकाळी   ११.३० ते ०१.००        शेती, शेतीचे प्रश्न, कर्ज व वीज बीलमुक्ती
दुपारी     ०१.०० ते ०२.००        सुट्टी
दुपारी     ०२.०० ते ०५.००        जैव तंत्रज्ञान, जनुकीय तंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र्य
सायं       ०५.०० ते ०५.३०        सुट्टी
सायं       ०५.३० ते ०७.३०        दुष्काळ आणि पाणीप्रश्न

दिनांक ९-११-२०१३

सकाळी   ०९.०० ते १२.००        महिलांचे प्रश्न, मालमत्तेचा अधिकार, संरक्षण
दुपारी      १२.०० ते ०१.००        सुट्टी
दुपारी      ०१.०० ते ०४.००        लहान राज्य व स्वतंत्र विदर्भ राज्य का हवे?
सायं        ०४.०० ते ०४.३०        सुट्टी
सायं        ०४.३० ते ०७.३०        अन्न्सुरक्षा, सिलींग कायदा व राज्यघटनेतील शेड्यूल-९
दिनांक १०-११-२०१३

सकाळी   ०९.००                      हुतात्म्यांना श्रद्धांजली
सकाळी   ०९.०० ते ११.००        युवकांपुढील आव्हाने व बेरोजगारीचा प्रश्न
सकाळी   ११.०० ते ०१.००        मोटारसायकल रॅली
दुपारी   ०२.०० खुले अधिवेशन

अध्यक्ष – मा. शरद जोशी, शेतकरी संघटनेचे प्रणेते व राष्ट्रीय अध्यक्ष, स्वभाप
प्रमुख उपस्थिती – 
        मा. वेदप्रकाश वैदीक, माजी अध्यक्ष, पी.टी.आय
        मा. जयप्रकाश नारायण, आमदार, लोकसत्ता पार्टी
        मा. भुपेंद्रसिंग मान, अध्यक्ष, अ.भा. किसान समन्वय समिती
        सौ. सरोजताई काशीकर, माजी अध्यक्ष, अ.भा. किसान समन्वय समिती
        डॉ. मानवेंन्द्र काचोळे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, स्वभाप
        अ‍ॅड दिनेश शर्मा, अध्यक्ष, स्वभाप, युवा आघाडी
*   *   *
अत्यंत महत्वाची सुचना :

१)  शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाला स्वखर्चाने यायचे असते.
२)  नास्तापाणी, जेवनाची व निवासाची व्यवस्था ज्याची त्याने करायची असते.
३)  पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेखेरीज शेतकरी संघटनेकडून अन्य कुठलीही व्यवस्था पुरवली जात नाही, याची कृपया प्रतिनिधींनी नोंद घ्यावी.
*   *   *


Oct 9, 2013

अंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन

अंकुर साहित्य संघ, वर्धा शाखेच्यावतीने 

 साहित्य संमेलन संपन्न

हिंगणघाट : तालुका प्रतिनिधी "लोकमत"

Ankur sahitya sangha



             अंकुर साहित्य संघाच्यावतीने लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटन 'सखे साजणी' फेम कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. उषाकिरण थुटे होत्या.

             या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी जि.प. शिक्षण सभापती उषाकिरण थुटे, प्रसिद्ध कवी व चित्रपट दिग्दर्शक प्रा. ज्ञानेश वाकुडकर, अंकुर साहित्य संघाचे संस्थापक हिंमत शेगोकार, प्रा.डॉ. शिवानंद भानुसे, माजी पोलीस अधिकारी गंगाधर पाटील, काशीनाथ भारंबे भुसावळ, निंबाजी हिवरकर जळगाव, प्रा.डॉ. रवींद्र ठाकरे, प्रा.डॉ. सुरेखा देशमुख, प्रा. शीतल ठाकरे, जिल्हा मार्गदर्शक रा.न. शेळके, वा.च. ठाकरे, सुधाकर हेमके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा रिठे यांनी केले तर मान्यवरांचा परिचय गंगाधर मुटे यांनी करून दिला. कार्यक्रमात रवींद्र शेषराव वानखेडे लिखीत काव्यसंग्रह 'माय-प्रेमाचं विद्यापीठ' व वसंत विठुजी गिरडे यांचा काव्यसंग्रह 'पुष्पांजली'चे विमोचन प्रा. वाकुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आयोजित बालकवी संमेलनात बालकवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात प्रथम पुरस्कार नांदगाव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी निखीता बंडूजी दाभणे तर द्वितीय पुरस्कार सेंट जॉन्स हायस्कूलची प्रशंसा संदेश शेळके हिने पटकाविला. त्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात प्रा.डॉ. रवींद्र ठाकरे, प्रा. शीतल ठाकरे, रवींद्र वानखेडे, स्वाती वानखेडे तसेच वसंत गिरडे व पुष्पा गिरडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लावणी नृत्य अविष्कार स्वराली संजय रिठे हिने तर रवींद्र वानखेडे यांनी 'निदान आमच्यासाठी तरी' हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. प्रा. वाकुडकर यांनी मर्ढेकर व वाकुडकर यांच्या काव्यातील स्त्री प्रतिमाने या विषयावर विचार मांडून निवडक कविता सादर केल्या. 

             संचालन प्रशांत शेळके यांनी केले तर आभार गजानन नांदुरकर यांनी मानले. कार्यक्रमाला गंगाधर मुटे, वसंत पोहणकर, गीता मांडवकर, स्वाती वानखेडे, अर्चना झाडे आदींनी सहकार्य केले.

( "लोकमत" च्या सौजन्याने : प्रकाशीत दिनांक - ०९-१०-२०१३)

Sep 30, 2013

साप गिळतोय सापाला

साप गिळतोय सापाला

               बळी तो कान पिळी किंवा मोठे मासे लहान मास्याला गिळतात, यासारख्या म्हणी बर्‍याचदा ऐकायला मिळाल्या होत्या मात्र आज सकाळी ८ च्या सुमारास शेतात चक्क एक भला मोठा विषारी नाग एका बिनविषारी सापाला गिळताना बघायला मिळाला.

             एक अतिजहाल विषारी गव्हाळ्या नाग एका बिनविषारी लांबलचक धामण जातीच्या सापाला गिळण्याचा प्रयत्न करत होता. गव्हाळ्या नाग कात टाकण्याच्या अवस्थेत (कोषी आल्याने) त्याची हालचाल बरीच मंद होती. बिळातून २ फ़ूट बाहेर तोंड काढून त्याने आपले भक्ष पकडलेले होते. धामण बरीच लांबलचक असल्याने नागाला सहजासहजी आपले भक्ष्य गिळंकृत करता येत नव्हते. लढत काट्याची होईल असे स्पष्ट जाणवत होते.

             छायाचित्र घेण्यासाठी हवी तशी जागा उपलब्ध नसल्याने हवा तसा फ़ोटो मोबाईलने घेता आला नाही.
शिवाय मला अन्य कामासाठी शेत सोडून जायचे असल्याने पुढे काय झाले ते पाहता आले नाही.


snake


Sep 18, 2013

बोल बैला बोल : नागपुरी तडका

बोल बैला बोल : नागपुरी तडका


        बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे
        बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...!

नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले
कोणी तरी आला का रे हाल पुसायाले?
ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य
आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य?
फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....!

        थंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस
        वादळाचे तडाखे शिंगावरी झेलतोस
        तेव्हा कुठे हिरवीगार होते काळी आई
        तरी का रे तुझे श्रम मातीमोल जाई?
        लुटीचं अर्थकारण तू शिकलंच पाह्यजे...!

इच्छाधारी गायवासरे राजबिंडे नवी
खुर्चीसाठी त्यांना तुझी हाडंकुडं हवी
तुझे कष्ट त्यांचे लेखी भिक्षापात्रतेचे
ऐद्यांना देणार 'अभय' अन्न सुरक्षेचे
जागा हो बैलोबा तू जागलंच पाह्यजे...!

                               - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------

Sep 17, 2013

बायोडिझेल निर्मिती व्हावी

बायोडिझेल निर्मिती व्हावी

                           देशाचे "ग्रोथ इंजिन' असलेला महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राबद्दल मोठा जागर १६ सप्टेंबरपासून "अपेक्षा महाराष्ट्राच्या' या सदराखाली दैनिक "सकाळ"च्या व्यासपीठावर सुरू झाला. त्याअनुषंगाने १६ सप्टेंबरच्या सकाळमध्ये प्रकाशीत झालेली माझी प्रतिक्रिया.

  सकाळ

           शेतीव्यवसायामध्ये रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्याने शेती-व्यवसायाला मुख्य प्रवाहात आणल्याखेरीज औद्योगिक विकासामध्ये आपल्याला गरूड झेप घेताच येणार नाही. त्यासाठी शेतीक्षेत्राला उद्योगासारखी वागणूक मिळणे गरजेचे आहे. शासकीय धोरणे अनुकूल आणि वित्तियसंस्थांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला तर राज्याच्या औद्योगिक विकासात शेतीक्षेत्र फार मोठा सहभाग नोंदवू शकेल. नाशिवंत मालाचे गरजेपेक्षा जास्त प्रमाणावर उत्पादन आले तर त्या शेतमालाची अक्षरशः माती होते. वांगे, टमाटर व अन्य पालेभाज्या सडून जातात. अशावेळी नाशवंत शेतमालावर प्रक्रिया केली तर शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही लाभ होऊ शकतो. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी ‘ताज्या’ हूनही अधिक ताजे असतात. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अनेक देश स्थापित अवस्थेमध्ये वावरत आहेत. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषिप्रधान वगैरे असूनही विकसित करू शकलेला नाही. बायोडिझेल निर्मिती हा अत्यंत सोपा आणि अत्यंत कमी भांडवली गुंतवणूक लागणारा प्रक्रिया उद्योग आहे. शेतकर्‍यांच्या घराघरात बायोडिझेलची निर्मिती होऊ शकते, पेट्रोलजन्य पदार्थावर अमाप खर्च होणारे परकीय चलन वाचू शकते. पण त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. 

                                                                                                                 - गंगाधर मुटे
------------------------------------------------------------------------------------------------------------

Aug 27, 2013

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)


              या आधीच्या लेखांकामध्ये मी साप-विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी पारंपरिक उपचारपद्धती कशी असते, या विषयी लिहिले. ह्या उपचारपद्धती जश्या आहे तशाच स्वरूपात पिढोनपिढ्या चालत आल्या असाव्यात. उपचार करणार्‍या व्यक्ती स्वतः प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या नसल्याने व रोगी त्याचे म्हणणे ऐकत नसल्याने त्याने "हे मी करत नाही, माझ्या हातून देव करून घेतो" अशी भूमिका घेऊन उपचाराच्या सोबतीला पुजा-अर्चा करण्याचा देखावा निर्माण केला असावा. रोग्याची श्रद्धा देवावर असल्याने रोग्याला मानसिक बळ यातून आपोआपच मिळून उपचार अधिक प्रभावी होण्यास नक्कीच मदत झाली असावी.

              हे पारंपरिक उपचार आहेत. त्यात बदलत्या काळानुरूप संशोधन झालेले नाही. प्रयोगशीलता नसल्याने हे शास्त्र अविकसित राहिले. जे शास्त्र काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, ते फार काळ स्वतःचे उपयोगमुल्य शाबूत राखू शकत नाही. आज अ‍ॅलोपॅथीच्या तुलनेने पारंपरिक उपचार शास्त्र मागे पडले किंवा प्रभावहीन झाले, त्याचे प्रयोगशीलता नसणे, हेच प्रमुख कारण आहे. साप चावला तर पारंपरिक उपचार पद्धतीचा उपयोग करणे धोकादायक आहेच, मात्र याचा अर्थ असाही नाही की सर्पदंशावर वैद्यकियशास्त्र फारच प्रभावी आहे. साप चावलेला रोगी ताबडतोब दाखल होऊन वेळेच्या आत उपचार सुरू झाले नाहीत तर रोग्याला हमखास वाचवू शकेल असे औषध आधुनिक वैद्यकशास्त्राकडे नाही. येथे औषधीपेक्षा आणि उपचारपद्धतीपेक्षा रोगी वेळेच्या आत उपचारस्थळी दाखल होणे, हेच सर्वाधिक महत्त्वाचे असते हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. सर्पदंश झाला तर उपलब्ध सर्व पर्यायांमध्ये वैद्यकीय उपचार हाच एकमेव पर्याय परिणामकारक आहे, यात दुमत नाही. आधुनिक वैद्यकियशास्त्र आता सर्वमान्य झालेले आहे पण सर्पदंश झाला तर इस्पितळात पोहचण्याचा पर्यायच उपलब्ध नसेल तर तेथे जो कोणता पर्याय उपलब्ध असेल तो स्वीकारणे रोग्याची अपरिहार्यता असते, हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे वैद्यकियशास्त्र वगळता अन्य पारंपरिक उपचार करून घेण्याचे व्यक्तीचे पर्यायस्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. या कलमामुळे विनामूल्य पारंपरिक उपचार करणार्‍यांमध्ये भितीचे वातावरण तयार होईल आणि काळाच्या ओघात ही पारंपरिक उपचार पद्धती नामशेष होईल. सरकार जर जनतेला आहे त्यापेक्षा चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर उपलब्ध असलेला पर्याय हिसकावून घेण्याचा हक्क सरकारला असूच नये आणि तो जनतेने मान्य करू नये. 

हास्यास्पद कलम : जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, "कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." येथे "यासारखे उपचार करणे" हा शब्द फारच संभ्रम निर्माण करणारा आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार वगळता अन्य सर्व उपचार कायद्याने बेकायदेशीर ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. कुणी कितीही म्हणोत की हा कायदा केवळ बळजबरीने अघोरी उपचार करणार्‍या मांत्रिकासाठी आहे, तर त्यात अजिबात तथ्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. या कलमाच्या संदर्भात विचार केला तर असे दिसून येते की, "घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून" हे शब्द निव्वळ कुचकामी आहेत, कारण कोणताही मांत्रिक हातात तलवार, कट्यार, बिचवा, चाकूसारखे धारदार शस्त्र किंवा AK-47 अथवा स्टेनगनचा धाक दाखवून ज्याला दंश झाला आहे त्याव्यक्तीस बळजबरीने अडवून (बलात्कार करावा तसा) मंत्रतंत्र, गंडेदोरेचा उपचार करणार नाही तोपर्यंत "रोखणे/प्रतिबंध करणे" या सारखे कलमच लागू पडणार नाही, त्याअर्थी या कायद्यातले हे कलम हास्यास्पदच म्हणावे लागेल. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायदा अपराध्यास शिक्षा करत नाही, न्यायाधीश करत असते. शिक्षा न्यायाधीशाच्या स्वमर्जीने ठरत नसते, तर ते वकिलांच्या ऑर्ग्यूमेंटवर ठरत असते. कायदा किंवा कायद्याचे कलम अस्पष्ट किंवा संदिग्ध असेल तर न्यायप्रक्रियेत जो वकील अधिक चांगल्यातर्‍हेने युक्तिवाद करेल त्याच्या पक्षाने न्याय झुकण्याची शक्यता असते. कायदा किंवा कायद्याच्या कलमाच्या अस्पष्ट किंवा संदिग्धपणामुळेच निष्णात वकील न्याय आपल्या बाजूने झुकवून घेण्यास यशस्वी ठरत असतो. 

उपद्रवी कलम : या कलमान्वये कायदेशीर कारवाई करूनही पुरावे गोळा करणे अशक्य आहे असे पोलिस खात्याला वाटले आणि कायदेशीर कारवाई करूनही पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयात खटला दाखल करणे उपयोगशून्य आहे अशी खात्री झाली तर लाचलुचपत घेऊन तिकडेच निपटारा केला जाईल. त्यामुळे पोलिस खात्याचा अशा केसेसमध्ये उपद्रव वाढीस लागेल.

सूडबुद्धीने वागणारे कलम :  कलम ११ (क) बघा "स्वतःत विशेष शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वतःत पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे"

या तर्‍हेची वर्तणूक करणार्‍याला शिक्षेची कायद्यात तरतूद असणे समर्थनीयच आहे पण;

- तुला माझ्या संस्थेत नोकरी देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी संस्थाचालक लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून शिक्षणमहर्षी घोषित करायचे? 

- एखादा राजकीय नेता तुला निवडणुकीचे तिकीट देतो असे सांगून, जर एखाद्या स्त्री उमेदवाराशी तो राजकीय पुढारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून मंत्रिपद देऊन त्याचे हात अधिक मजबूत करायचे? 

- एखादा प्रशासकीय कर्मचारी तुझे काम करून देतो असे सांगून, जर एखाद्या गरजू स्त्री सोबत तो कर्मचारी लैंगिक संबंध ठेवत असेल तर;

तो गुन्हा नाही काय? की उलट त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरवून राष्ट्रपतिपदक देऊन त्याचे सत्कार करायचे? 

              गुन्हा जर समान असेल तर असा गुन्हा करणार्‍यापैकी निवडून एखाद्याला शिक्षा देणारा कायदा बनविणे, हे "समान न्याय तत्त्वाला" छेद देणारे ठरते. अशा स्वरूपाच्या कायदा निर्मितीमुळे कायदा आपल्याशी समान न्यायाने नव्हे तर सूडबुद्धीने वागतो, अशी भावना काही निवडक जनवर्गाच्या मनात उत्पन्न होऊन त्यांचा कायद्यावरचा विश्वास उडून कायद्याबद्दल चीड आणि द्वेष उत्पन्न होऊ शकते. हा फार गंभीर धोका आहे.

अव्यवहार्य कलम 

माझा या कायद्याच्या कलम नऊला विरोध आहे कारण;

१) त्यामुळे उपचार निवडीचे स्वातंत्र्य धोक्यात येते.

२) रोग्याने उपचार पद्धती कोणती निवडावी, हा प्रबोधनाचा विषय आहे, सक्तीचा नाही.

३) या कलमामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन पारंपरिक उपचारपद्धतीचे अस्तित्व धोक्यात येईल.

४) हे कलम लागू करण्यामागे सरकारचा उद्देश जनहिताचा नसून सवंग लोकप्रियता मिळविण्याचा आहे.

              हा कायदा केवळ शहरी किंवा जेथे वैद्यकीयसेवा सहज उपलब्ध आहे अशा शहराच्या आसपासच्याच जनतेसाठीच लागू नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर जनसंख्या ग्रामीण भागात राहते. तेथे अजून पिण्याचे पिण्यायोग्य पाणीसुद्धा पोचलेले नाही. काही गावात रस्तेच नाहीत. अनेक दुर्गम भाग असे आहेत की, जेथे बारमाही संचार सुविधा उपलब्ध नाही. पावसाळा सुरू झाला की काही गावात पायदळ चालत जाणे ही एकमेव संचार सुविधा उपलब्ध असते. पुर आला की काही गावांचा अन्य गावांशी आणि शहरांशी संपर्क तुटून जातो. महाराष्ट्राचा विचार केला तर असे दिसेल की शेतात जायला पक्के रस्ते नाहीत. केवळ पांधनरस्ते, शीवरस्ते किंवा पायवाटाच आहेत. पावसाळाभर चप्पल नावाची वहाण जेथे चालत नाही तेथे अन्य वाहने चालण्याचा प्रश्नच येत नाही. गावाकडून शहराकडे जायला शेतक्र्‍यांजवळ स्वतःचे वाहन नाही. बर्‍याच गावांना अजून एसटीचे दर्शन झालेले नाही. ज्या गावात एस टी जाते तेथे एक किंवा दोनच टायमिंग आहेत. आपण २०१३ मध्ये जगत असलो तरी खेड्यातील रोग्यास घ्यायला अ‍ॅम्बुलन्स येणे, ही सुविधासंस्कृतीच अजून जन्माला यायची आहे.

              सर्पदंश झालेल्या व्यक्तीस अत्यंत तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. अनेक गावांची स्थिती अशी की, सर्पदंश झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात पोचवायला किमान ४-५ तास लागू शकतात. समजा जेथे सर्पदंशावर वैद्यकसेवा उपलब्ध आहे अशा आरोग्य केंद्रापासून ७०-८० किलोमीटर दूर असलेल्या खेडेगावात श्याम नावाच्या व्यक्तीला गावापासून ३-४ किलोमीटर अंतरावरील शेतात सर्पदंश झाला तर दवाखान्यात न्यायचे वाहन उपलब्ध होईपर्यंत श्यामने किंवा त्याच्या नातेवाइकाने काय करायचे? जर वैद्यकीय उपचार उपलब्धच नसेल तर अन्य पर्यायी उपचार नाही करायचे? देवाचा धावा केल्याने मरणारा माणूस वाचत नाही, हे माहीत आहे म्हणून "देवा वाचव" असा धावा करण्यास मनाई करायची? पारंपरिक उपचार करायचेच नाहीत? 

              चावा घेण्यासाठी साप माणसावर चाल करून बाहेर मोकळ्या जागेत येत नसतो. झुडुपात, जमिनीच्या भेगांत, कचरा टोपलीत, कचर्‍याच्या ढिगात किंवा एखाद्या वस्तूच्या खाली बुडाशी बसलेला असतो. माणसाच्या ज्या भागाचा स्पर्श त्याला होईल त्या भागाला तो चावा घेत असतो. कधी कधी तो दिसतच नाही. अंधार असेल तर अजिबातच दिसत नाही. अशावेळी साप विषारी की अविषारी हा मुद्दाच गौण असतो. साप विषारी असेल तरीही त्याने किती मात्रेत विष शरीरात टाकले, हे कसे ठरवणार? सापाचे वजन, दंश झालेल्या व्यक्तीचे वजन यावर सुद्धा बरेच अवलंबून असते. अशावेळी दंश झालेल्या व्यक्तीस मानसिक आधार दिला तर तो कदाचित वाचेल सुद्धा. आमच्या भागात डोम्या नाग व गव्हाळ्या नाग प्रसिद्ध आहेत. हे साप चावले तर माणसाला "पाणी सुद्धा मागू देत नाही" अशी म्हण आहे. या प्रजातीचा मोठ्या आकाराचा साप चावला तर दोन तासात सर्वकाही संपून जाऊ शकते. वैद्यकीय सेवा उपलब्ध होईपर्यंत जर त्याच्यावर पारंपरिक उपचार केले तर कदाचित हा काळ आणखी वाढण्यास मदत होऊ शकते. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन झाले पाहिजे म्हणून काय अशा प्रसंगी हातावर हात ठेवून बसायचे? वेळेच्या आत वैद्यकीय सेवा जर उपलब्ध झालीच नाही तर डोक्यावर हात ठेवून त्याला मरताना उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचे? 

              अनेकजण यावर युक्तिवाद करतात की, पारंपरिक उपचारांना बंदी घातलेली नाही. पण माझ्या मते ही बंदीच आहे. समजा श्यामवर पारंपरिक उपचार सुरू केले आणि श्याम दगावला. त्याला दोन मुले आहेत एक पुण्याला आणि एक मुंबईला. ते दोघेही येणार पण तो पर्यंत बाप मेला असणार. या मुलांनी जर का बापाच्या मृत्यूपश्चात ठाण्यात तक्रार नोंदवली की, माझ्या बापावर मांत्रिकाने जबरदस्ती करून उपचार केले तर पुढे काय होईल कल्पना करा. शिवाय प्रत्येक गावात गटबाजी असते. ते अशावेळी एकमेकावर सूड उगवू शकतात. सत्ताधारी पक्ष गैरफायदा घेऊ शकतो.

              वास्तवाची एवढीशी जाणीव नसणे हा दुर्गम भागातील ग्रामीण लोकजीवनाशी राज्यकर्त्यांची नाळ तुटली असल्याचा पुरावा आहे. राजकारणाबाहेरील व्यक्तींना समाजसुधारणा करायची असेल तर त्यांनी प्रबोधन करावे, सक्ती करणे म्हणजे विचारसामर्थ्याचा पराभव मान्य करण्यासारखे आहे. सामाजिक सुधारणांच्या अनुषंगाने विचार केला तर ज्यांना स्वतःच्याच विचारावर भरवसा नाही तेच सक्तीची भाषा वापरत असतात, असेही म्हणता येईल. 

सरकारला जर खरेच अंधश्रद्धा निर्मूलन करायचे असेल आणि सर्पदंशामुळे होणारे मृत्यू थांबवायचे असतील तर;

१) प्रत्येक गावात पक्का रस्ता तयार करावा.

२) प्रत्येक गावात अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करावी.

३) किमान दहा गावासाठी एक M.B.B.S निवासी डॉक्टर नेमावा. त्याला ग्रामीण भागातच मुख्यालयात २४ तास हजर राहण्याची सक्ती करावी.

४) सर्पदंश झाल्याचा संदेश पोचल्याबरोबर स्वतः डॉक्टरनेच त्या स्थळी पोचावे आणि उपचार सुरू करावे. (जसे पोलिस खाते घटनास्थळी पोहचते.)

कायदाच करायचा असेल तर असा करावा;

"सर्पदंश झाल्यानंतर त्या दंश झालेल्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या नातेवाइकाकडून फोनवरून सूचना मिळाल्याबरोबर त्या प्रभागासाठी नेमलेला डॉक्टर तातडीने स्वतः दंश झालेल्या व्यक्तीकडे जाईल आणि उपचार सुरू करेल. जर उपचार सुरू होण्यास दिरंगाई किंवा हयगय झाली आणि सर्पदंश झालेला व्यक्ती जर दगावला तर त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यात येईल."

              या तर्‍हेचा कायदा जर अस्तित्वात आला आणि लागू झाला तर पुरोगामी महाराष्ट्रातील बर्‍याचशा अंधश्रद्धा संपुष्टात येतील. डॉक्टर नेमणुकीच्या प्रक्रियेत अंधश्रद्धा निर्मूलनाला स्वेच्छेने उत्सुक आणि कटिबद्ध असलेल्या डॉक्टर मंडळींना प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरून अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम आणखी गतिमान करता येईल.

                                                                                                         - गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------------------------------
(समाप्त)

Aug 26, 2013

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

                   कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, "कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." एखादा निबंध, कविता किंवा एखादी म्हण वाचत जावे तसेच हे कलमही वाचले तर या कलमात गैर काय आहे? असा साहजिकच कुणालाही प्रश्न पडतो. शिवाय रुग्णाला त्याच्या मनाविरुद्ध बळाचा वापर करून जर एखादा मांत्रिक रोखत असेल तर त्याच्यावर कारवाई होणे उचितच आहे, असे वाटून बस्स एवढाच तर अर्थ आहे या एका ओळीच्या कायद्याचा. मग त्यालाही जर कोणी विरोध करत असेल तर तो विरोध करणारा स्वतः:च मांत्रिक असावा, किंवा धर्मवेडा तरी असावा, तेही नसेल तर अंधश्रद्धा बाळगणारा, अनपढ, गवांर, गावंढळ, बुद्धू, बिनडोक वगैरे तरी नक्कीच असावा, असे बर्‍याच लोकांना वाटायला लागते, आणि नेमकी येथेच फसगत होते.

                  पण या कलमात "वैद्यकीय उपचार" हा एकमेवच पर्याय दिल्याने ही "सक्ती"च झाली आहे. "वैद्यकीय उपचार" म्हणजे "ज्या व्यक्तीकडे सरकारी अधिकार्‍याने सही करून शिक्का मारलेले वैद्यकीय सेवा करण्याचे परवानापत्र आहे त्याने केलेले उपचार." असाच अर्थ घ्यावा लागणार. या व्यतिरिक्त अन्य सर्व उपचार मंत्रतंत्र, गंडेदोरे व जादूटोणा या प्रकारातच गणले जाणार. लेखांक-१ मध्ये दिलेले सर्व "पारंपरिक उपचार" देखील दखलपात्र गुन्हाच ठरणार, कारण या कलमाला "वैद्यकीय उपचार" किंवा "मंत्रतंत्र, गंडेदोरे" हे दोनच प्रकार मान्य आहेत. मग कायद्याशी पंगा घेऊन, वेळ पडल्यास सात वर्ष शिक्षा भोगायची तयारी ठेवून दुसर्‍याचा जीव वाचवण्यासाठी पारंपरिक उपचार कोण आणि कशाला करेल बरे? म्हणजे आता हे सर्व पारंपरिक उपचार पद्धती थांबणार आणि कालांतराने नष्ट होणार. होत असेल तर होऊ द्या, आपल्या बापाचे काय जाते? असे म्हणून दुर्लक्षही करता आले असते पण; सरकार कायद्यान्वये ज्या वैद्यकीय उपचार पद्धतीची जनतेवर सक्ती करायला निघाले त्या वैद्यकशास्त्रात तरी साप, विंचू आदि चावल्यास "रामबाण उपचार" आहेत काय? दुर्दैवाने याचेही उत्तर नाही असेच आहे. मग सक्ती लादण्याचे कारणच काय? तुम्ही देत असलेला पर्याय जर "पर्फेक्ट" नसेल तर अन्य पर्यायांच्या निवडीचे स्वातंत्र्य का हिरावून घेत आहात?

                  सध्या प्रचलित उपचार पद्धती मध्ये ग्रामीण जीवनाच्या आवाक्यात असलेल्या अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या प्रमुख तीन उपचार पद्धती आहे. त्यातही लोकप्रियतेत सिंहाचा वाटा एकट्या अॅलोपॅथीचा आहे. वैद्यकशास्त्र अत्यंत प्रगत, अत्याधुनिक आणि बहुतांश रोगांच्या बाबतीत वैद्यकशास्त्राला पर्यायच नाही. पण काही रोग असेही आहेत की, अन्य उपचार पद्धतींच्या तुलनेने वैद्यकशास्त्र पिछाडीवर आहे. खुद्द वैद्यकशास्त्रालाही ते मान्य आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी मान्य केले आहे. उदा.

१) सर्दीपडसा आणि श्वसनाशी संबंधीत रोगांवर वैद्यकशास्त्रापेक्षा प्राणायामाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.

२) स्पॉन्डिलाइटिस सारख्या विकारावर वैद्यकशास्त्रापेक्षा योगाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते. असे म्हणतात.

३) काविळसारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.

                  या संदर्भात एक उदाहरण देतो, हे माहितीस्तव उदाहरण आहे, समर्थन नाही. माझ्या एका गोपाल नावाच्या मित्राला काही वर्षापूर्वी कावीळ झाला होता. त्याने सुरुवातीचे काही दिवस खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. पण कावीळ आणखी वाढतच होता. खाजगी डॉक्टरच्या सल्ल्यावरून तो थेट नागपूर मेडिकलला दाखल झाला. १५ दिवस लोटले खर्चही खूप झाला पण आराम नव्हता. डोळे, नखे वगैरे पिवळे आले होते. आरामच होईना म्हणून त्यांनी स्वमर्जीने इस्पितळ सोडले आणि एका घरगुती सेवाभावी नि:शुल्क औषध देणार्‍या ग्रामीण व्यक्तीकडून औषध घेतले. आराम मिळाला. 

                  ग्रामीण भागात अनेक लोकांना अनेक रोगांवर खात्रीने दुरुस्त होऊ शकेल अशी वनस्पती औषधे माहीत आहेत, याचा अनुभव मी बर्‍याचदा घेतला आहे. दु:खद बाब एवढीच की, आपले महत्त्व कायम राहावे म्हणून ही मंडळी अशी माहिती स्वतः:जवळच जपून ठेवतात. इतरांना अजिबात सांगत नाही. त्यामुळे या औषधोपचाराची चिकित्सा आणि संशोधन होत नाही. माझ्या गावावरून ८५ किलोमीटर अंतरावरील एका गावात एक सेवाभावी महिला आहे. ती कावीळ रोगावर औषध देते. ३० वर्ष झाले, कावीळ रोगाची साथ वगैरे आली की तिच्या घरासमोर रांगा लागतात. तिच्याकडील औषध घेणारे आजपर्यंत सर्वच दुरुस्त झालेत अशी चर्चा आहे. ते खरे की खोटे हे मला माहीत नाही पण हा औषधोपचार करताना कुठल्या वनस्पती वापरल्या जातात हा माझा नेहमीचाच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. हा लेखांक लिहिण्याच्या निमित्ताने या वेळेस मात्र मनावर घेतले आणि तिच्या गावात जाऊन तिची भेट घेतली. कावीळचे औषध ती कसे तयार करते, हे तिने मला सांगावे, मी त्यावर अधिक प्रयोग आणि संशोधन करून लोकांना फुकट वितरित करीन त्यामुळे लोकांचे भले होईल. तुला लोक आशीर्वाद देईल. तुला पुण्य लाभेल अशा तर्‍हेने खूप समजावले, पण ती राजी होत नव्हती. दोन दिवस सतत पाठपुरावा केल्याने कदाचित तिचे मन द्रवले असेल. शेवटी एकदाची ती राजी झाली.

तिने सांगितलेली औषधी तयार करण्याची पद्धत अशी.

शनिवार दिवशी सकाळी तळहाताच्या आकाराचे एरंडी या वनस्पतीची अडीच पाने घ्यावीत. त्यात १५ ग्रॅम मिरे घालावे. त्यात १/३ ग्लास पाणी टाकून ठेचावे. तयार झालेला रस उपाशी पोटी रोग्यास पिण्यास द्यावा. छोटासा गुळाचा तुकडा खायला द्यावा. नंतर दूध, भात आणि गूळ खायला द्यावा. गरज भासल्यास दुसर्‍या शनिवारी पुन्हा एक मात्रा द्यावी.

पथ्य - आंबट आणि कच्चे तेल अजिबात खायचे नाही.

हे औषध गुणकारी आहे किंवा नाही, याविषयी मी काही सांगू शकत नाही. केवळ मी मिळविलेली माहिती शेअर करणे, हा उद्देश आहे. भविष्यात कुणालाच कावीळ होऊ नये, ही सदिच्छा, पण झालाच तर थेट डॉक्टरकडेच जावे. 

३) वात, लकवा, अर्धांगवायू सारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, हा माझा अनुभव आहे.

                  दहा वर्षापूर्वी माझ्या आईला वात, लकवा झाला होता, अ‍ॅलोपॅथीचे खूप इलाज केले पण आजार दिवसेंदिवस वाढतच गेला. तालुक्याच्या इस्पितळात भरती केले. त्यांनी १०-१२ दिवसाच्या उपचारानंतर सेवाग्राम मेडिकलला रेफ़र केले. तिथे भरती केले पण प्रकृती सुधारणे ऐवजी बिकटच होत गेली. अर्धांगवायूचा झटका आला. काही दिवसानंतर तिला २० पैकी एकही बोट हालवता येत नव्हते. हात-पाय तर हालण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व शर्थीचे प्रयत्न झाल्यानंतर तिथून नागपूरला रेफ़र करण्यात आले. तिथे भरती केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, बघा, तुमचा आग्रह असेल तर भरती करून घेतो, आपण प्रयत्न करू पण काही उपयोग होईल असे वाटत नाही. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून १६ किलोमीटरवर एक तिगाव आहे. तेथे एक हकीम आहे, मग त्याच्याकडे नेले. त्याने फक्त २०० रुपयात काही जडीबुटीची भुकटी आणि तेल दिले. २४ तासातच आराम दिसायला लागला. तीन महिन्यात आई तंदुरुस्त झाली, एवढी की तिला घेऊन वैष्णोदेवीला गेलो. १६ किलोमीटर डोंगर चढणे व १६ किलोमीटर डोंगर उतरणे आणि तेही वयाच्या ७० व्या वर्षी! लीलया आव्हान पेलले माझ्या आईने मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर. आजही ती स्वस्थ आहे.
वैष्णोदेवीला जाण्यामागे भक्तिभावाने देवीदर्शन घेणे असा आईचा उद्देश तर आईला यानिमित्ताने शारिरीक व्यायाम देणे असा माझा उद्देश होता.
मृत्यूच्या दाढेतून परत आलेली माझी आई

                  हे लिहिण्यामागे वैद्यकशास्त्राला कमी लेखण्याचा किंवा आव्हान देण्याचा प्रयत्न नाही पण वैद्यकीय उपचाराव्यतिरिक्त अन्य तर्‍हेने उपचार घेणे म्हणजे अंधश्रद्धा असते, औषध देणारा म्हणजे भोंदूच असतो, असे वगैरे काही नसते. १७ वर्ग शिकणे, १८ पुस्तके वाचणे म्हणजेच ज्ञान असते, उरलेले सगळे अज्ञान असते, असेही नसते, याचेही भान असणे गरजेचे असते. 

                                                                                                                - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------------
(.....अपूर्ण....)

Aug 23, 2013

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२) 

                          कोणताही विषय नेमकेपणाने समजून घ्यायचा असेल तर त्या विषयांची शक्यतो सर्व अंगांनी माहिती करून घेणे आवश्यक असते. ज्यांना या पारंपरिक उपचार पद्धतींबद्दल अजिबात माहिती नसेल त्यांना या उपचार पद्धतीविषयी माहिती व्हावी म्हणून लेखमालेच्या पहिल्या भागात म्हणजे लेखांक-१ मध्ये साप आणि विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी पारंपरिक उपचार पद्धती कशी असते, ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला. तीन लेखांकामध्ये हा विषय पूर्ण करायचा विचार होता. परंतू पुस्तक किंवा ही लेखमाला मी वृत्तपत्रासाठी लिहीत नसून आंतरजालावर लेखन करत आहे याचे भान आल्याने व काही आततायी प्रतिसादकांकडून माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर हिणकस आरोप करणारे प्रतिसाद लिहिले जाण्याची शक्यता बळावल्याने, मग प्रत्येकाला स्वतंत्रपणे उत्तर देऊन स्वतःची दमछाक करून घेण्यापेक्षा या लेखांकात आत्मस्तुतीचा दोष स्वीकारून नाईलाजाने स्वतःबद्दल व्यक्तिगत माहिती मी लिहायचे ठरवले आहे. माझ्याविषयी संक्षिप्त माहिती अशी-

१) माझा माझा पूर्ण पत्ता विपूमध्ये लिहिलेला आहे. माझ्या गावातील २५ पेक्षा जास्त मंडळी फेसबुकवर आहे. हा लेख मी फेसबुकवर सुद्धा टाकत असल्याने मी देत असलेल्या माहितीबद्दल वाचकांनी विश्वास बाळगावा. याला संतोषीमातेचे पत्र समजू नये.

२) मी व्यक्तिस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सरकारची कमीतकमी ढवळाढवळ असावी, असे मानतो. 

३) मी विज्ञानाचा पदवीधर असून विज्ञानाचा आणि नव्या तंत्रज्ञानाचा कट्टर समर्थक आहे.

४) मी स्वतःमूर्तिपूजां करण्याचे टाळतो पण इतरांना मनाई करत नाही. 

५) भविष्य शास्त्रावर माझा विश्वास नाही पण विश्वास असणार्‍यांचा अनादर करत नाही. 

६) मी सनातनी, प्रतिगामी किंवा पुरोगामी या शब्दांपासून स्वतःला वाचवतो. कालबाह्य न झालेले व उपयोगमुल्य शाबूत असलेले जुने ते "सोने" समजतो आणि मला नवे ते "हवेहवेसे" वाटते.

७) जेथे विज्ञानाचे हात टेकतात आणि बुद्धीसुद्धा हतबल होते तिथून श्रद्धेची कक्षा सुरू होते. श्रद्धा ही श्रद्धा असते, डोळस किंवा आंधळी अजिबात नसते. श्रद्धेच्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष वेगवेगळ्या असू शकतात, यावर माझा विश्वास आहे.

८) कालबाह्य परंपरा व रुढी नष्ट झाल्या पाहिजेत पण त्याऐवजी ज्या नव्या प्रथांचा अंगीकार करायचा आहे त्याचीही कारणमीमांसा झाली पाहिजे, डोळे झाक करून ते स्वीकारायचे नाही मग ते कितीही अद्ययावत का असेना, असे मी मानतो.

९) देवापुढे प्राण्यांचा बळी द्यायचा नाही, याचा मी समर्थक आहे. आमचे घरात दरवर्षी फ़रिदबाबाची पुजा म्हणून बोकड कापून नैवद्य दाखवायची परंपरा होती, मी घरच्या सर्व वडिलधार्‍यांचे मनपरिवर्तन करून ही प्रथा मोडीत काढली.

१०) मजूरवर्गाला सायंकाळी/रात्री मजुरीचे पैसे देऊ नये, असा आमचेकडे समज आहे. त्याला छेद म्हणून गेली २६ वर्ष मजुरांना सायंकाळी/रात्रीच पैसे देत असतो.

११) एका भविष्यवेत्त्याने मला आठवा गुरू असताना लग्न करू नकोस असे सांगितले होते. मग मी मुद्दामच आठव्या गुरूत असतानाच लग्न केले. 

१२) मद्यप्राशनाला माझा कट्टर विरोध आहे पण सक्तीने दारूबंदी करायलाही विरोध आहे.

१३) १९८७ मध्ये गावात राहायला गेलो तेव्हा सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मारुतीच्या पारावर आणून पारंपरिक उपचार करायची पद्धत होती. या पद्धतीपेक्षा वैद्यकीय पद्धतीने त्यावर उपचार व्हावेत म्हणून त्या काळी समवयस्क मुलांना गोळा करून याविषयी सतत जनजागृती केली. स्वखर्चाने दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली, मात्र कुणावर कधीही सक्ती केली नाही. बराच काळ लागला पण यश मिळाले. आता सर्पदंश झाल्यास सर्वच थेट दवाखान्याचा रस्ता धरतात. मागील दोन महिन्यात माझ्या गावात ३ शेतकर्‍यांना सर्पदंश झाला आहे. त्यापैकी एका सर्पदंश झालेल्या शेतकर्‍याला माझ्या छोट्या भावाने स्वतःच्या चारचाकीने व स्वखर्चाने त्या व्यक्तिला दवाखान्यात नेऊन भरती केले. तीनही शेतकरी वाचले आहेत.

१४) दोन वर्षापूर्वी गावातील एका इसमाला कर्करोग झाला होता. पण तो नागपूरला मेडिकलमध्ये जाण्याचे टाळून वैद्याकडून जडीबुटीचे औषध घेत होता. मी खूप प्रयत्न केले पण तो मेडिकलमध्ये जायला राजी होत नव्हता. मी त्याला समजावत होतो मात्र सक्ती करत नव्हतो. मग मी पहिल्यांदा त्याच्या कुटुंबीयांना राजी केले. शेवटी रोगीही राजी झाला. मग अडचण आली पैशाची. माझ्यासमोर नाईलाज होता. खर्च मी करायचे मान्य करून त्याला नागपूरला भरती केले. कर्करोग शेवटच्या टप्प्यात पोचल्याने ऑपरेशन झाले पण ६ महिन्यानंतर तो दगावला. आता त्याचा मुलगा दारूचा आहारी गेला आहे व माझे पैसे परत करू शकत नाही, असे त्याने मला स्पष्टपणे कळवले आहे. माझे पैसे परत मिळतील अशी आशा मावळली आहे. चाळीस हजार रुपये सोडून देण्याइतपत मी श्रीमंत नसलो तरी माझा नाईलाज आहे. मात्र त्या पोराला मी एका वाईट शब्दाने देखील बोललेलो नाही माझे पैसे परत करावे म्हणून सक्ती केली नाही, करणार नाही.

१५) एक वर्षापूर्वी एका पेशंटला आजार झाला. त्याने काही दवाखाने केले पण त्याला आराम मिळेना म्हणून तोही वैद्याकडून जडीबुटीचे औषध घ्यायला लागला होता. मी स्वतः त्याला विशेषज्ञ डॉक्टरकडे नेले आणि त्याला हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले. दीड लाख रुपये खर्चाची बाब होती. त्याची ऐपत नव्हती म्हणून त्याला "जीवनदायी आरोग्य योजना" आणि अन्य संस्थांकडून सव्वा लाख रुपयाची मदत मिळवून दिली. पेसमेकर इन्प्लँटेशनचे ऑपरेशन यशस्वी झाले. मात्र यासाठी मी माझ्या गाडीचा एकूण दहा हजार रुपयापर्यंत आलेला डिझेल खर्च पेशंटकडून घेतलेला नाही. यावेळी अनेकदा डॉ. कैलास गायकवाड यांनी मला फोनवरून ऑपरेशन संदर्भात बरीच मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

१६) सहा महिन्यापूर्वी एका महिलेला "जीवनदायी आरोग्य योजना" आणि अन्य संस्थांकडून दीड लाख रुपयाची अशीच मदत मिळवून देऊन तिचे दोन्ही व्हॉल्व्ह्चे (एक रिप्लेसमेंट आणि एक रिपेअर) ऑपरेशन करून घ्यायला लावले. याकामी सुद्धा माझे स्वतःचे दहा हजार रुपये खर्च झाले आणि मी ते पेशंटकडून घेतलेले नाही.

मला असे वाटत आहे की, जे लिहिले तेच भरपूर झाले. यापेक्षा आत्मस्तुतीपर लिहिण्याची गरज नाही. आता पुन्हा मूळ लेखाकडे वळतो आणि उर्वरित लेखाचा भाग लेखांक-३ आणि लेखांक-४ मध्ये पूर्ण करतो.

                                                                                                                        - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------------

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१) 

                           अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांचा पुण्यामध्ये खून करण्यात आला. नागरिकांचे संरक्षण हे कोणत्याही सरकारचे आद्य कर्तव्य असते. दाभोळकरांच्या खुनाने सरकार नागरिकांचे रक्षण करू शकत नाही, हे अधोरेखीत झाले. सर्वत्र जनक्षोभ आणि संतापाची लाट उसळली, ज्यांनी कधी दाभोळकरांचे नाव देखील ऐकले नव्हते किंवा ज्यांना अनिसच्या कार्याची यत्किंचितही माहिती नव्हती, ते सुद्धा रस्त्यावर उतरले. जनक्षोभाचे विक्राळरूप बघून सरकार हादरले. भयमुक्त जीवन जगण्याचा नागरिकांचा अधिकार जोपासण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी तडकाफडकी मंत्रिमंडळाच्या खास बैठकीत निर्णय घेऊन जादूटोणा-विरोधी अधिनियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

                           जो अधिनियम लागू करायचा त्याचा मसुदा व प्रारूप जनतेसमोर यायला हवे होते पण; विरोधी पक्ष किंवा अन्य सामाजिक संघटनांना विश्वासात न घेताच सदर वटहुकूम स्वाक्षरीसाठी मा. राज्यपाल महोदयाकडे पाठवून देण्यात आला आहे. 

                    "प्रत्येक प्रश्नाची उकल केवळ नवा कायदा निर्माण केल्याने होते" अशी आधुनिक वेलक्वालिफ़ाईड प्रगाढ अंधश्रद्धा बाळगणार्‍या सरकारने कायद्याच्या घनदाट जंगलात आणखी एका नव्या कायद्याची भर घातली आहे. वस्तुतः: राज्यात आधीच इतके सक्षम कायदे आहेत की, कोणत्याही गुन्हेगाराला वठणीवर आणण्यास पुरेसे ठरावे. पण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी पुरेशी इच्छाशक्ती कायद्याच्या रक्षणकर्त्यांकडे नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारीवर नियंत्रण नुसते नवेनवे कायदे केल्याने नव्हे तर कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी केल्याने मिळवता येते, याचे भान कायद्याच्या रक्षणकर्त्यांना केव्हातरी यायला हवे. 

                           अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी तसेच अशी भेसळ करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसावा यासाठी अस्तित्वात असलेल्या अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याऐवजी अन्न सुरक्षा व मानद कायदा (फूड सेफ्टी ऍक्‍ट) हा नवा कायदा काही वर्षापूर्वी आणण्यात आला व त्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. मग थांबली का भेसळ? आळा तरी बसला का? किती लोकांना जन्मठेप सुनावण्यात आली? काहीच करायचे नव्हते तर मग आधीचा कायदा कुठे वाईट होता? आहे हे तेच कायदे खूप आहेत पण प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही बोंब आहे. 

                           जादूटोणा-विरोधी अधिनियम या प्रस्तावित कायद्याची सुद्धा तीच गत होईल, हे मसुद्याचे प्रारूप पाहून सहज लक्षात येते. एकंदरीत कुचकामी, निरुपयोगी पण उपद्रवी आणि पोलिसांना पैसे उकळण्याच्या अमर्याद संधी उपलब्ध करून देणारा एक अनावश्यक कायदा, असे या प्रस्तावित कायद्याचे थोडक्यात वर्णन करता येईल.

                           जादूटोणा-विरोधी कायदा या नावाने येऊ घातलेल्या कायद्यामध्ये एक कलम असेही आहे की ते कलम आजवरच्या अनेक कायद्याप्रमाणे शेतकर्‍यांच्याच गच्चीवर बसेल असे दिसत आहे. कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. कायद्याचे हे कलम अत्यंत अव्यवहार्य आहे, अनावश्यक आहे आणि शेतकरी वर्गाची गळचेपी करणारे आहे.

                           या राज्यात बहुसंख्येने शेतकरी राहतात आणि साप व विंचू यांचा घनिष्ट संबंध सर्वात जास्त शेतकर्‍यांचा येतो. सर्पदंश होऊन मृत्यू पावणार्‍यांमध्ये शेतकरी समाजच जास्त असतो. मग या विषयी एखादा कायदा तयार करायचा असेल तर शेतकरी समाजाला विश्वासात घ्यायला नको काय? अंधश्रद्धा निर्मूलन समिती शेतकर्‍यांचे प्रश्न समजावून घेईन किंवा अशा कायद्याचा सरकारकडे पाठपुरावा करण्यापूर्वी शेतकर्‍यांशी काही सल्लामसलत करेल, ही माझी अपेक्षा नव्हती आणि आजही नाही कारण; ही मंडळी स्वतः:च स्वतः:ला एवढी तज्ज्ञ आणि विद्वान समजतात की, त्यांना कुणाचेही म्हणणे समजावून घ्यायचे प्रयोजनच उरत नाही. पण सरकारचे काय? सरकारने तर संवाद साधायला हवा! संवाद साधला नाही तेही एकवेळ समजून घेता येईल पण निदान या प्रश्नाचा खोलवर अभ्यास तरी करायला हवा की नको? तेवढी विवेकशीलता जर सरकारमध्ये शिल्लक असती तर ते कलम या कायद्यात आलेच नसते.

                           साप आणि विंचू चावल्यानंतर त्यावर होणारे वैद्यकीय किंवा परंपरागत उपचारपद्धतीचा "जादू-टोणा" या प्रकाराशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मात्र या विधेयकात निष्कारण हे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. या विधेयकामुळे आता ही परंपरागत चालत आलेली उपचारपद्धती कायदेशीर अपराध ठरणार आहे. ज्या परंपरागत उपचार पद्धतीवर अनिसच्या दबावाखाली येऊन सरकार कायदा आणू पाहत आहे ती साप आणि विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी उपचार पद्धती कशी असते, ते आपण पाहू.

१) विंचू (साधा) - साधा विंचू चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता नगण्य असते. चावल्यानंतर लगेच काही मिनिटातच अत्यंत असह्य वेदना सुरू होतात. पहिले साधारण दोन-तीन तासांपर्यंत असह्य वेदनांची तीव्रता चढत्याअंगाने आणखी वाढत जाते. त्यानंतर त्यापुढील दोन-तीन तास असह्य वेदनांची तीव्रता उतरत्याअंगाने कमी होत जातात. सर्वसाधारण पणे २४ तास विंचवाच्या विषाची परिणामता जाणवते. मात्र पहिले काही तास सोडले तर उर्वरित काळ वेदना सुसह्य असतात.

यावर करण्यात येणारे परंपरागत उपचार - काही मंत्र उच्चारून दंश झालेल्या शरीराच्या भागातील नसा-धमन्यांवर हातांच्या बोटांच्या साहाय्याने हलकासा उतरता दबाव दिला जातो. जखमेच्या ठिकाणी काही जंगली वनस्पतीची पाने बांधण्यात येतात. त्याला मानसिक आधार दिला जातो. याला ग्रामीण भागात विंचू उतरविणे म्हणतात. ज्यांना दंश झाला होता त्यांना या उपचारपद्धतीने आराम मिळाला होता आणि यामुळे वेदना सुसह्य झाल्या होत्या, असा त्यांचा अनुभव आहे, असे ते सांगतात. या उपचार पद्धतीत उपचार करणारा सेवाभावी मनोवृत्तीने कार्य करतो. पैसे दिले तरी घेत नाहीत या उलट त्याचीच मोलमजुरी कमी होऊन त्याचे आर्थिक नुकसान होते.

२) विंचू (इंगळी) - इंगळी चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता काही अंशी असते. उपचार पद्धती वरीलप्रमाणेच.

३) साप - विषारी साप चावल्यावर वेळेच्या आत योग्य उपचार झाले नाही तर माणूस हमखास दगावतो. परंपरागत उपचार पद्धतीने जसे सर्प दंश झालेल्यास हमखास वाचवता येत नाही तसेच वैद्यकीय शास्त्राकडेसुद्धा यावर रामबाण औषध नाही. सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत जर त्याच्यावर दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू झाले तरच सर्प दंश झालेल्याचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय शास्त्राला काही अंशी यश येते. एकदा जर विष शरीरभर पसरून रक्तात मिसळले तर यावर वैद्यकीय शास्त्राकडे आजतरी रामबाण उपचार नाही.
परंपरागत उपचार पद्धत : सर्प दंश झाला त्याठीकाणी चुना लावला जातो. जर विषारी साप चावला असेल तर चुना हिरवा होतो. सर्प दंश झालेल्यास दर काही मिनिटांनी कडुनिंबाचा पाला खायला दिला जातो. निंबाच्या झाडाच्या सालींचा अर्क काढून त्याला पाजण्यात येतो. मंत्रोच्चार करून सतत त्याचा नाकात, कानात आणि तोंडात फुंका मारल्या जातात. त्याला चार माणसांच्या आधाराने चालवत ठेवतात. त्याला झोप लागू देत नाही. त्यासोबतच नागदेवतेची आणि अन्य देवांची प्रार्थना व आराधना केली जाते. (दवाखान्यात उपचार करणार्‍या डॉक्टरचे सर्व पर्याय संपले आणि कोणताही रोगी शेवटच्या घटका मोजायला लागला की डॉक्टरमंडळी सुद्धा रोग्याची सलाईन सुद्धा काढून टाकतात आणि छातीवर जोरजोराने भार देऊन त्याचा श्वासोश्वास बंद पडू नये म्हणून कृत्रिमरीत्या प्रयत्न करतात. अर्थात ही उपचार पद्धती वैद्यकीय शास्त्रात सुद्धा वापरली जाते) मात्र ही पारंपरिक उपचार पद्धती अन्य पर्याय नसेल तरच वापरली जाते. ही रामबाण उपचार पद्धती नाही आणि तसा कोणी दावाही करत नाही
.......(अपूर्ण).........
                                                                                                                             - गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

Aug 16, 2013

नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा 

                     सातपुडा पर्वताच्या कुशीत अत्यंत दुर्गम भागात वसलेले नागद्वार हे तीर्थक्षेत्र अती कठीण व देवदुर्लभ आहे, असे मी अगदी लहानपणापासून ऐकूनच होतो. शरीराने धट्टेकट्टे, मनाने खंबीर व जिवावर उदार होऊन वाटचाल करणारेच नागद्वारला जाऊ शकतात, असाच त्या काळी समज होता. त्या काळी नागद्वार तीर्थाला जाण्यास निघालेल्या यात्रेकरूंना सार करायला (निरोप द्यायला) अख्खा गाव मारुतीच्या पारावर गोळा व्हायचा. तो निरोप समारंभ म्हणजे अक्षरशः ओक्साबोक्सी रडारडच असायची. "हा जगून वाचून आला तर आपला" अशीच कुटुंबीयांची मनोभावना असायची. त्यामुळे नागद्वार तीर्थयात्रा म्हणजे अती कठीण व देवदुर्लभ आहे, याची मला जाणीव होतीच. 

                    मी म्हणजे देशाटनाला चटावलेला प्राणी. थोडाफार भाग वगळला तर अनेकदा अनेक कारणामुळे अख्खा देश कानाकोपर्‍यापर्यंत फिरलो आहे. निसर्गरम्य पहाडीतील निरनिराळी निसर्गरम्य स्थळे पाहिली आहेत. चिखलदरा, मैहर, बम्लेश्वरी, वैष्णोदेवी, उटी, कन्नूर, कोडाईकन्नल, माऊंटआबू पाहून झाली आहेत. आठ पैकी सहा अष्टविनायक, बारा पैकी अकरा ज्योतिर्लिंग, चार धामापैकी तीन धाम (रामेश्वर, पुरी व द्वारका) करून झालेत. आता एकदा बद्रीनाथ-केदारनाथ केले की बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम एकाच वेळी पूर्ण होणार. 

                    पण या सगळ्या ठिकाणांपेक्षा नागद्वार सर्वार्थाने खचितच वेगळे आहे. फारच कष्टाचे आहे पण आनंददायी आहे. देशात सर्वत्र फसवेगिरी, ठगगिरी आणि खिसेकापूंचा सुळसुळाट असताना येथे मात्र प्रामाणिकपणा आणि इमानदारी अजूनही जिवंत आहे. पंचमढीला गाडी जेथे जागा मिळेल तेथे पार्क करा आणि बिनधास्त निघून जा. कोणी हात देखील लावणार नाहीत. तिथल्या कोरकूकडे सामानाची पिशवी द्या व तुम्ही निर्धास्त व्हा. तो त्याच्या वेगळ्या शॉर्टकट मार्गाने पुढे निघून जातो. त्याची आणि तुमची दिवसभर भेट होत नाही पण तो तुम्हाला ठरल्या ठिकाणी तुमचे ओझे बरोबर आणून देतो. त्यासाठी तुम्हाला त्याचे नाव माहीत करून घ्यायची किंवा ओळखसुद्धा ठेवायची गरज नाही. तोच तुमची ओळख ठेवतो व तुम्हाला शोधून तुमचे सामानाचे ओझे तुमच्या स्वाधीन करतो. यात्रा करणारे सर्व यात्रिक परस्परांशी अत्यंत आपुलकीने वागतात. एकमेकांना चढा-उतरायला स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात. ही यात्रा करताना यात्रिकांमध्ये केवळ "भगत आणि भग्तीन" एवढेच नाते असते. दुर्गम रस्ता पार करताना व एकमेकांना मदतीचा हात देताना/घेताना स्त्री-पुरूष या भेदाभेदाचा कुणाच्याच मनात लवलेश देखील नसतो. 

                    सहा-सात वर्षापूर्वी मी नागद्वारला जाऊन आलो होतोच पण या वर्षी पुन्हा मनात ऊर्मी आली आणि पुन्हा जायचा बेत ठरला. यावर्षी अती पावसाने अन्य पहाडीक्षेत्राप्रमाणे नागद्वार पहाडीक्षेत्रातील दरड कोसळून रस्ते अवरुद्ध झाल्याच्या आणि रस्ते चालण्यासाठी अयोग्य तथा प्रतिकूल होऊन बंद झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकतच होत्या. पण ठरल्याप्रमाणे ८ ऑगष्टला आम्ही प्रवासाला निघालोच. सोबत एक बायको, दोन मुले, एक भाचा आणि १० नातेवाईक असे एकूण १५ जनांचा लवाजमा घेऊन आम्ही निघालो. सौंसर पार केले आणि सुरू झाला घाटाचा रस्ता. प्रचंड नागमोडी वळणे. सौंसर ते पंचमढी या २०० किमी लांब घाटवळणाच्या रस्त्याची तुलना गोवा ते मुंबई या मार्गावरील कोकणी भागातील घाटांशीच होऊ शकेल. पाऊस संततधार कोसळत असताना या वळणांतून स्विफ़्ट-डिझायर चालविण्याचा जो आनंद मला मिळाला तो शब्दात सांगणे खरेच कठीण आहे. 

                    सातपुडा पर्वताच्या नैसर्गिक वनस्पतींनी नटलेल्या पर्वतरांगांमध्ये पंचमढी हे गाव वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंच असलेलं हे ठिकाण नितांत सुंदर आहे. यालाच सातपुड्याची राणी असे म्हणतात. इथे आढळणारी जैवविविधता पाहता युनेस्कोने मे २००९ मध्ये पंचमढीला जैव विभागाचा दर्जा दिलाय. जैवविविधतेच्या बाबतीत WWF अर्थात World Wildlife Fund ने हा परिसर जगातील ४ थ्या नंबरचा परिसर घोषित केलाय. इथली निसर्गातली विविधता मनाला अक्षरशः मोहून टाकते. सभोवताल नैसर्गिक झाडाझुडुपांनी वेढलेल्या पर्वतरांगा, चांदीसारखे चमकणारे झरे, उंच शिखरावरून जागोजागी दुधाच्या फ़वार्‍यासारखे झरझरणारे छोटे-मोठे धबधबे आणि त्याही पेक्षा मनाला भुरळ घालणारे निसर्गरम्य वातावरण. पाऊस कधी सुरू झाला आणि कधी थांबला हे सुद्धा कळत नाही. धुवांधार कोसळणारा पाऊस त्रासदायक वाटण्यापेक्षा आल्हाददायक वाटतो. येथे नागद्वारला अनेक यात्रिक दरवर्षी नित्यनेमाने येतात. का येतात याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही कारण लौकिकदृष्ट्या सांगण्यासारखे काहीच नाही. पंचमढीवरून नागद्वारकडे निघालो की कुठेही फुलझाडे नाहीत, बागबगीचे नाहीत, घरे नाहीत, पक्षी-प्राणी नाहीत; पायवाटा आहेत त्यादेखील अत्यंत ओबडधोबड. कुठे-कुठे अक्षरशः दीड-दोन फूट रुंदीच्या पायवाटा आणि बाजूला हजारो फूट खोल दर्‍या. चुकून पाय घसरला तर मानवी देहाचा सांगाडासुद्धा मिळणे कठीण. गेला तो गेलाच. त्याला त्या दर्‍यांमधून शोधून काढू शकेल अशी कोणतीही प्रणाली आज अस्तित्वात नाही. आणि तरीही दरवर्षी लाखो यात्री येथे हजेरी लावायला येत असतात. 

                    आम्ही पंचमढीला रात्री मुक्काम करून ९ तारखेला सकाळी निघालो नागद्वारच्या दिशेने. यात्रेच्या दिवसात पंचमढीवरून पुढे धूपगढपर्यंत स्वतःचे वाहन नेता येत नाही. त्या मार्गाने फक्त स्थानिक परवानाधारक वाहनेच चालतात. आम्हाला एक जीप मिळाली. ९ आसनक्षमतेच्या जीपमध्ये १५ लोकांना कोंबून जीपगाडी ६ किमी अंतरावरील धूपगडाच्या प्रथमद्वाराशी थांबली. 

                    धूपगढ हे सातपुडा पर्वतराजीतील 4430 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते मावळणार्‍या सूर्याचा शेवटच्या किरणापर्यंत सतत उन्हाचा मारा आपल्या माथ्यावर झेलत धूपगढ उभा आहे. धूपगडावर एकाच जागी बसून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येऊ शकतो. सतत उन्हामध्ये असल्यामुळेच याला धूपगढ हे नाव देण्यात आले असावे. 

                    आणि येथून सुरू झाली आमची पायदळ यात्रा. काजरी, श्रावण बाल मंदिर, गणेशाद्वार, नागद्वार (पद्मशेषगुफ़ा), पश्चिमद्वार, अग्निद्वार, स्वर्णद्वार, निमपहाड़ी, आमकी पहाड़ी, चिंतामणी, गंगावन शेष, चित्रशाला माता (माई की गिरी) , दत्तगिरी, दादाजी धुनीवाले बाबा, नंदीगढ़, नागिणी, पद्मिनी, राजगिरी, गुलालशेष, चंदनशेष, हल्दीशेष हे सुमारे २० किमी अंतर पायी चालून परत धूपगढ असा प्रवास. मध्येमध्ये पाऊस कोसळत होता. बॅग किंवा सामानाची पिशवी घेऊन चालणे अवघड असल्याने आम्ही आमच्या जवळील मुक्कामाच्या साहित्याचे दोन भले मोठे गाठोडे केले व ते दोन कोरकूंच्या स्वाधीन केले. त्यांनी ते गाठोडे उचलले आणि भराभरा निघून गेले. काजरीला मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची आमची भेट होणार होती.
 ------------------------------------------------------------------
Nagdwar
अशा पाऊलवाटांनी चालणे म्हणजे अवघडच --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
                     काजरी येथे पोचल्यावर श्रावण बाल मंदिर दर्शन घेतले. काजरी येथेच रात्री एका झोपडीत मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी मोठे अंतर चालायचे होते. म्हणून पहाटे ४ वाजताच पुढील प्रवासाला सुरुवात करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते म्हणून सर्व पहाटेच उठलो, हाती विजेर्‍या घेतल्या आणि अंधारातच जंगलातून ओबडधोबड पाऊलवाटेने "एक डोंगर चढता, एक डोंगर उतरता" या प्रकारे मार्गक्रमण सुरू केले. तेथे सपाट म्हणून रस्ते नाहीतच. सर्व वाटा शिखर चढणार्‍या आणि शिखर उतरणार्‍या. मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी छोटे-छोटे "अन्नदानाचा भंडारा" लागलेला असतो आणि तो सुद्धा अगदी फुकट. कुठे काजू-मनुका घातलेला उपमा असतो तर कुठे जिलबी-बुंदा. भात, भाजी, पोळ्या, चहा सारे काही रस्त्याने फुकटच मिळते. अनेक सामाजिक संस्था या कामी पुढाकार घेऊन स्वखर्चाने भोजनाची व्यवस्था करतात. सतत कोसळणारा पाऊस आणि या डोंगरखड्याच्या ओबडधोबड चालण्यास असुरक्षित अशा पायवाटेने स्वतःपुरत्या अन्नाचे ओझे सोबत घेऊन जाणे अशक्य. त्यामुळे एका अर्थाने सर्व यात्रेकरू त्या मार्गावर अन्नासाठी "गरजू" बनतात. त्यांना या भाविक मंडळींच्या सामाजिक संस्था "अन्नसुरक्षा" प्रदान करतात आणि तिही अगदी फुकट. वाटेने फुकटाच्या प्रसादावर ताव मारत आम्ही सकाळी ८ च्या सुमारास नागद्वारला पोचलो. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar
नागद्वाराचे प्रवेशद्वार
 ------------------------------------------------------------------ 
 दोन पहाडांच्या मधोमध एका निरुंद कपारीत पद्मशेष बाबाची छोटीशी मूर्ती आहे. ती कपारी आता थोडी रुंद आणि उंच केली असावी, असे दिसले. त्यामुळे अंदाजे २०० फूट अंतर आता एकावेळी एकाला उभ्याने चालत जाता येते. काही काळापूर्वी सरपटत जायला लागत असावे. असा अंदाज येतो. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar
 पद्मशेषद्वार
 ------------------------------------------------------------------ 
पंजाबी लंगर वगळता देशात इतरत्र कुठेही, कोणत्याही तीर्थस्थळी फुकट अन्नप्रसाद मिळत नाही. याउलट सर्वत्र नाडवणूक, खिसेकापू, भंकसगिरी होत असताना या दुर्गम भागात जेथे या संस्थांना सर्व साहित्य प्रचंड कष्टाने डोक्यावर घेऊन जावे लागते तेथे या संस्था लाखो लोकांसाठी फुकटात जेवायची व्यवस्था करतात आणि आग्रहाने जेवू घालण्यात धन्यता मानतात, हे इथले मोठे वैशिष्ट्य ठरावे. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar
 अन्नदानाचा भंडारा - येथे आम्ही पोटभर जेवण घेतले. 
------------------------------------------------------------------
Nagdwar
 काही ठिकाणी अशी लोखंडी निशाणीची व्यवस्था केली आहे. 
------------------------------------------------------------------
Nagdwar
 दगडधोंड्यांच्या रस्त्यातून वाट काढत चालताना यात्रिक. 
------------------------------------------------------------------
Nagdwar
 गुळगुळीत वाट आणि बाजूला शेकडो फूट खोल दरी 
------------------------------------------------------------------
Nagdwar
 थकल्यासारखे वाटल्यावर काही क्षणांची विश्रांती घेताना
 ------------------------------------------------------------------
Nagdwar
 मनोहारी ओढा आणि दुर्गम वाटा
 ------------------------------------------------------------------
Nagdwar

 या वाटेने अनवाणी चालण्याचा आनंद काही वेगळाच. 
------------------------------------------------------------------ 
दोन दिवस सतत चालून आम्ही १० तारखेला परत धूपगढला रात्री ११ च्या सुमारास पोचलो. माझी चप्पल हरवल्याने मला मात्र प्रवास अनवाणी पायानेच करावा लागला. 
-----------------------------------------------------------------
चौरागढ : पंचमढीला जटाशंकर, गुप्त महादेव अशी देवस्थाने आहेत. ते बघून आम्ही चौरागडच्या दिशेने निघालो. समुद्रसपाटीपासून 4315 फूट आणि सुमारे बाराशे पायऱ्या चढून आलं, की आपण चौरागडाच्या माथ्यावर येतो. इथे शंकराचं मंदिर असून सभोवताल त्रिशूळांच्या रांगाच रांगा आहेत. अनेक भाविक नवस फ़ेडायसाठी किंवा श्रद्धेने खांद्यावर त्रिशूळ घेऊन येतात. 
 ------------------------------------------------------------------ 
Nagdwar
चौरागढाचे प्रवेशद्वार. 
------------------------------------------------------------------
Nagdwar
 चौरागढ चढण्याला पायर्‍या आहेत पण चढताना देव आठवतोच. 
------------------------------------------------------------------
Nagdwar
 चौरागढ चढताना क्षणभराची विश्रांती. 
------------------------------------------------------------------
Nagdwar
 एकदाचे चौरागढाचे शिखर दृष्टीपटात आले, शिवमंदिर दिसायला लागले आणि चेहर्‍यावर हास्य फुलायला लागले. 
------------------------------------------------------------------
Nagdwar
 प्राचीनकाळीन शिवमंदिर
 ------------------------------------------------------------------
Nagdwar
 हर हर महादेव
 ------------------------------------------------------------------
अन्होनी गरम पाण्याचे कुंड : पंचमढीवरून ४७ किमीवर अन्होनी येथे गरम पाण्याचे कुंड आहे. बाजूलाच ज्वाला माता मंदिर आहे. कुंडातील पाणी एवढे गरम असते की त्यातून वाफ निघत असते. या पाण्यात आपण हात घालू शकत नाही. बाजूलाच दोन हौद बांधले आहेत. या कुंडातील पाणी तेथे घेतले जाते. भाविक तेथे आंघोळी करतात. येथे आंघोळ केल्यास चर्मरोग दुरुस्त होतात, अशी जनभावना आहे. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar
 गरम पाण्याचे कुंड - पाण्यातून वाफ निघते
 ----------------------------------------------------------------------
काही वैशिष्टे :

१) पश्चिमद्वार गुफेची उंची ३/४ फूट असल्याने गुफेत वाकून चालत जावे लागते.
२) स्वर्गद्वार गुफेची उंची २/३ फूट असल्याने गुफेत रांगत किंवा सरपटत चालत जावे लागते.
३) हल्दीशेष गुफेत रांगत जावे लागते. आत गेलो आणि आतील दगडांना स्पर्श झाला की आपले अंग आणि कपडे हळदीसारखे पिवळे होऊन जातात.
४) गंगावन शेष गुफेत ५०/७० फूट रांगत किंवा बसून किंवा सरपटत जावे लागते. आत मात्र अत्यंत रमनिय मनोहरी दृष्य अहे. मुर्तीवर होणारा नैसर्गिक झर्‍याचा अभिषेक विलोभनिय आहे.

काही अवांतर :
 १) पचमढी मध्यप्रदेशात असले तरी नागद्वार, चौरागढ यात्रा करणारे मुख्यत्वे महाराष्ट्रीय आणि सिमेलगतचे मराठी भाषिक यात्रिकच असतात.
२) नि:शुल्क भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करणार्‍या बहुतांश संस्था वैदर्भियच आहेत.
३) प्रांतसिमा आणि पचमढी यामधल्या सौंसर, पांढुर्णा वगैरे भागात अजूनही मराठीच बोलली जाते.
४) नागद्वार यात्रेला प्रशासकिय सुविधा पुरेशा उपलब्ध न होण्यामागे व म.प्र शासकांची भूमिका उदासिनतेची असण्यामागे कदाचित हे एक प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे.
५) नागव्दार यात्रा बंद करण्यासाठी म.प्र. शासनाकडून जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची आतल्या गोटात चर्चा आहे. यावर्षी केवळ १० दिवसाची परवानगी मिळाली हा त्याचाच परिणाम असावा, असा संशय घ्यायला बराच वाव आहे.

         पंचमढीला आम्ही नागद्वार, चौरागढ आणि अन्होनी इतकेच पाहू शकलो. तीन दिवस सतत पायी चालून एवढे थकून गेलो की आणखी काही बघायची इच्छाच उरली नव्हती. मात्र येथे बरेच काही बघण्यासारखे आहे. गूढ आणि घनदाट जंगलातून लांबच लांब पसरलेले रस्ते आपल्याला इथल्या अनेक रमणीय स्थळांकडे घेऊन जातात. पंचमढीला सुमारे ४८ प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यातील काही स्थळं सामान्य लोकही अगदी सहज जाऊन पाहू शकतील अशी आहेत, तर काही ठिकाणं अवघड आहेत. 

 पांडव गुंफा, रॉक पेंटिंग, धबधबे, बी फॉल, अप्सरा, विहार, पंचमढी मधील सर्वांत उंच म्हणजे ३५० फूट उंचीचा रजतप्रताप हा धबधबा वगैरे बघायचे राहून गेले मात्र डिसेंबरमध्ये पुन्हा जायचा विचार आहे.

* नागद्वार यात्रा वर्षातून दोनदा असते.

१) गुरूपोर्णिमा ते नागपंचमी परंतु यावर्षी प्रशासनाने केवळ २ ते १२ ऑगष्ट अशी १० दिवसाचीच परवानगी दिली होती. हीच मुख्य यात्रा असते.
२) वैशाख महिन्यात वैशाखी यात्रा, पण यावेळेस पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. जंगली प्राण्यांचा या भागात वावर असतो, नि:शुल्क भोजन किंवा अन्य सुविधा देखील नसतात. अजिबात गर्दी नसते. त्यामुळे ही नागद्वार यात्रेसाठी उपयुक्त वेळ नाही.
३) उर्वरित  संपूर्ण काळ हा प्रभाग निर्जन असतो.

पंचमढीला कसे जावे? 
* हवाई मार्गाने जायचे झाल्यास भोपाळ वरून १९५ कि. मी. 
* रेल्वेने जायचे झाल्यास होशंगाबाद जवळील पिपरिया इथे उतरून पुढे बसने - अंतर ४५ कि. मी. आहे. 
* नागपूरहून बसने पंचमढीला जाता येते - अंतर सुमारे २७० कि. मी. आहे.

                                                                                                          - गंगाधर मुटे 
-------------------------------------------------------------------------------------

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं