Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Apr 15, 2010

शेतकरी कुणाला म्हणावे?

शेतकरी कुणाला म्हणावे?


प्रश्न :- शेतकरी कुणाला म्हणावे?


उत्तर :-  या निमित्ताने येथे आपण ज्या शेतकरी घटकाबद्दल चर्चा करतोय,ज्याला केंद्र बिंदू ठेवून चर्चा करतो आहे, त्या " शेतकरी Model " ची व्याख्या करावी लागेल.
            जो सावकारकीचा व्यवसाय करतो, इतर व्यवसाय करतो, खरेदी-विक्री संस्था सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, राजकीय पक्षांचे पुढारी, शाळा - संस्था चालक, सरकारी कर्मचारी यांच्या नावाने ७/१२ चा उतारा असला, तरी त्यांचे पोट शेतीवर अवलंबून राहात नाही. शेतीतील दाहकतेचे चटकेही यांना बसत नाही. शासनात असणारे काही मंत्री सुद्धा शेतकरीच असतात म्हणून कुणी म्हणेल "तो मंत्री सुद्धा शेतकरीच आहे, त्याची शेती जावून बघा कसे भरमसाठ उत्पन्न घेतो आणि कसा हायक्लास जीवन जगतो, त्याचा आदर्श घ्या." तर ते संयुक्तिक ठरणार नाही. शेतीखेरीज अन्य मार्गाने उत्पन्न मिळवून कुणी स्वत:ला प्रगत, आदर्श किंवा कृषीनिष्ठ वगैरे समजत असतील तर समजू द्या पण शेतीच्या दुर्दशेचे मूळ शोधतांना आपण यांना "Model शेतकरी" म्हणून अशांना अजिबात निवडू नये असे माझे व्यक्तिगत मत आहे. कारण त्यामुळे आपले निदान आणि निष्कर्ष दोन्हीही चुकीचे ठरू शकते.
            म्हणून "जो निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर उपजिविका करतो तोच शेतकरी." (कदाचित त्याच्या नावाने ७/१२ नसला तरीही ).
अशी व्याख्या करणेच योग्य ठरेल.
....... गंगाधर मुटे
....................................................................
प्रश्न :-  मुळात शेतकरी हा परंपरा आणी रीतीरीवाज यातच पुर्ण बुडालेला आहे, नविन काही प्रयोग करायचा म्ह्टले की पहिले नकारार्थी शब्दापासुन सुरवात होते.
.
उत्तर :- आपण असे हताश होवुन कसे चालेल?
          बिचारा शेतकरी आर्थिक विचारात एवढा गुंतलेला असतो की त्याला त्याची कैफियत मांडायला फुरसतच नसते, शेतीत प्रयोग करायचे म्हटले तर त्याचा पुरस्कार 'आत्महत्या' असतो. फरक एवढाच की 'शुभ हस्ते' दोर आवळायला पंतप्रधान किंवा मंत्री येत नाही, ज्याचा दोर त्यालाच आवळावा लागतो. त्याला हे कळते म्हणुन तो फारसा स्वतः आखुन घेतलेल्या परीघाबाहेर जात नाही.
         परीघाबाहेर (प्रयोग) जावुन ज्यांनी शेती केली त्यांना कर्ज फेडतांना विकायला घराचे कवेलुही पुरले नाहीत. अशी उदाहरणे प्रत्येक गावात पावलोपावली सापडतात. मग तो जर तो "अंथरुन पाहुन पाय पसरावे" या न्यायाने वागत असेल तर तो त्याचा समजुतदारपणा आहे.
         शेतीत नवनवे प्रयोग करु पाहणार्‍या शहाण्यांच्या शहाणपणाचे "धिंडवडे" निघतांना पाहीलेला कोणताही बाप, आपला मुलगा त्या मार्गाने जावु नये, गांवाबाहेर जावुन हमाली केली, रिक्शा चालवली तरी चालेल पण इज्जतीने/इभ्रतीने जगावा अशी अपेक्षा प्रत्येक बाप करित असतो. हे प्रत्येक गावाचे चित्र आहे. मग त्याला नकारार्थी किंवा रुढीवादी कसे म्हणता येइल ?.
शेतकरी त्याच्या आर्थिक हलाखीत एवढा गुरफटला की स्वतःची कैफियत मांडण्याचे बळ त्याच्यात उरलेले नाही. तो आर्थीकरित्या पुर्णपणे पराधिन (गुलाम) झालेला आहे, बँकेचे किंवा सावकाराकडुन कर्ज काढल्याखेरीज, किराना,कापड,कृषी केंद्रातुन उधारवाडी नेल्याखेरीज त्याचे नित्याचे व्यवहार चालत नाही. दुसर्‍याच्या दारात गेल्याशिवाय, पाय धरल्याशिवाय ज्याची चुल पेटत नाही तो स्वत:च्या समस्या कसा मांडणार/सोडवणार?
             आपण आता शेतकरी राहीलो नाही कारण आपले पोट शेतीवर अवलंबुन नाही पण आपण शेतकरी पुत्र आहोत. गावातील दारिद्र्य आणी गावाबाहेरचे वैभव आपण अनुभवले आहे.त्यामुळे एका बाजुला जनावरासारखे कष्ट करुनही अठराविश्व दरिद्र्य आणी दुसर्‍या बाजुला तुलनेने कमी कष्ट करुनही वैभव असे का घडते याचा शोध घेण्याचे, छडा लावण्याचे प्रयत्न करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजायला पाहीजे. आणि हे कार्य आपल्या हातुन घडत असेल तर आपण स्वतःला भाग्यशाली समजले पाहिजे.
         कधिकधी ज्याचं जळतं त्याच त्याला काहीच दिसत नाही, ते इतरांना अधिक स्पष्ट कळतं, म्हणुन त्यांचे आकलनही अधिक परिणामकारक ठरते. आणि म्हणुन कधिही चर्चेला निरुपयोगी म्हणता येत नाही.
        आपण हे कार्य जिवाभावाने करीत राहीले पाहिजे.करता करता एक दिवस नक्किच यांतुन मार्ग निघेल,अशी
आपण आशा करुया.

गंगाधर मुटे
...........................................................

Apr 6, 2010

महिमा कशाचा ?

महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?

उठसूठ आणि तो सुद्धा शेतकर्‍याने न मागताच निष्कारण बाष्कळ सल्ला देण्यासाठी काही लोक फ़ारच उताविळ असतात.  सल्ल्यामध्ये तरी काही नाविन्य वगैरे तरी असावे की नाही? गेली ४० वर्ष ऐकत आल्याने आमचे कान बुजण्याची शक्यता तयार झाली आहे शिवाय हे वाक्य पुस्तकात छापू-छापू आजकाल तर प्रिंटींग मशिनला सुद्धा अजिर्ण व्हायची वेळ आली आहे.

तेच तेच घोकमपट्टी केलेले छापील पुस्तकातील छापील उतारे वाचण्याचा आणि आम्हाला ऐकवण्याचा या शहाण्यांना आणि शेतीतज्ज्ञांना ज्या दिवशी कंटाळा येईल किंवा लाज वाटायला लागेल कदाचित त्या दिवसापासून शेतीला बरे दिवस येण्याची सुरवात होऊ शकेल. 

शेतीचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही एवढे कमी जाणिवपूर्वक शेतीमालाचे भाव  ठरविले जातात, त्यामुळे शेती बकाल अवस्थेकडे झुकली आहे, हे एकतर त्यांच्या गावीच नसतं किंवा ही मंडळी "मंदबुद्धी" असल्याने त्यांच्या आकलनशक्तीला झेपत तरी नसावे.

शेतीची दुर्दशा शेतकर्‍यांच्या "पात्रतेशी" संबंधित नसून "व्यवस्थेशी" संबंधित आहे, हे ज्यांना मान्य नसेल त्यांनी खालील समिकरण सोडवून दाखवावे, असे माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.

हे एक गणित सोडवून दाखवा.

जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर....

१) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर तो निव्वळ शेतीच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?

२) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर तो निव्वळ रिक्षा चालवून घाम आणि श्रमाच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?

३) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता अन्य व्यवसायात वापरली तर तो दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?

४) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शासकिय नोकरीत वापरली तर तो अगदी लाचलुचपत न घेताही प्रामाणिकपणे दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?

५) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता राजकारणात वापरली तर तो निव्वळ राजकारणाच्या बळावर दरमहा किती उत्पन्न मिळवू शकेल?

महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?

मी पात्रता आणि लायकीबद्दल एवढेच म्हणेन की ज्यांना व्यवस्थेपेक्षा पात्रताच महत्वाची आहे असे वाटते; त्यांनी शेती करून आपली पात्रता/लायकी सिद्ध करून दाखवावे. स्वत:चा अनुभव आम्हाला सांगावा, इतरांचा  अनुभव आम्हाला सांगण्याचा कोडगेपणा अजिबात करू नये.

वस्तुत: विद्वत्ता/लायकी/पात्रतेच्या बळावर या देशात अर्थप्राप्ती होते हे विधानच खोटे आहे.

येथे लायकी नव्हे तर व्यवस्थेला महत्व आहे हो भाऊसाहेब......!

- गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------

Apr 5, 2010

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

                         १९७० साली भारताच्या समग्र उत्पन्नाच्या ४६% टक्के उत्पन्न शेतीतून येत होते आणि ७०% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून होती. मात्र आज चित्र वेगळे आहे. आता भारताच्या समग्र उत्पन्नाच्या फक्त १६% टक्के उत्पन्न शेतीतून येते पण अजूनही ५५% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून आहे.
१९७० नंतर शेतीची उत्पादकता कमी झालेली नाही या उलट शेतीमधिल एकरी उत्पादन कैकपटींनी वाढले आहे,तरी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न ४६ % टक्क्यावरून चक्क १६ % एवढे खाली उतरलेले दिसते. याचे कारण स्पष्ट  आहे.
                      राष्ट्रीय उत्पन्न उत्पादनाच्या संख्यांकावर किंवा वजनावर नव्हे तर त्या उत्पादनाच्या मुल्यावर काढले जाते.
                     जर वजनाच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न ठरवले गेले तर याक्षणी सुद्धा देशाच्या उत्पादनाच्या एकुन उत्पादनापैकी शेतीचे उत्पादन हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त असणार हे उघड आहे.
परंतू येथे मुख्य गोम अशी की
                    औद्योगीक मालाच्या किंमती स्वातंत्र्योत्तर काळात भरमसाठ वाढत गेल्यात मात्र त्यातुलनेने शेतमालाच्या किंमती वाढल्या नाहीत त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा हिस्सा कमी दिसतो.
त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादकतेशी निगडीत नसून त्या उत्पादनाच्या बाजारभावावर अवलंबून आहे हे आपण लक्षात घेतले पाहीजे

बागायती कापसाचा उत्पादन खर्च


बागायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
-----------------------------------------------
अ) चालू खर्च..
शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००
---------------------------------------------------------------------------------
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००
---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.

Apr 3, 2010

जिरायती कापसाचा उत्पादन खर्च.


जिरायती कापसाचा उत्पादन खर्च.
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
-----------------------------------------------
अ) चालू खर्च..
शेण खत :००००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १०००० रु.
किटकनाशके : १०००० रु.
संप्रेरके : ०००० रु.
सुक्ष्मखते : ०००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : १२००० रु.
वाहतूक खर्च : ३००० रु.
ओलीत मजुरी : ०००० रु.
वीज बिल : ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : ७६,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क         १,३७,००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ९०,००० = ००
---------------------------------------------------------------------------------
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क .......१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत.....०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा.................................. ०,४७,००० = ००
---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
                                            गंगाधर मुटे
-----------------------------------------------------
=========================================

Apr 1, 2010

खरेच बियाणे वांझ होते ?


खरेच बियाणे वांझ होते ... ?
"भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?"
               बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची...पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ असून-नसून उपयोग तो काय? ओलावा मिळाला तरच इच्छाशक्ती,आशावाद,मनोबळ उपयोगाचे. नाही तर शुन्य उपयोगिता.
              भुईला पण वाटते की त्या बीजाचा जन्म व्हावा. मातृत्वाची प्रेरणा काय असते,हे त्या मातेलाच कळे. पण ती तरी काय करणार बिचारी? ओलाव्यासाठी ती पुर्णत: मेघावर अवलंबून. मेघाकडून तिला पाण्याचे थेंबच हवे. कोरडे गर्जन नकोच. कोरड्या गर्जनाचा आवाज फ़ार मोठा. अशा गर्जनांमुळे गर्जना केल्याचा मेघाला आनंद मिळेलही कदाचित. पण अशा गर्जनांचा भुईने आणि बीजाने उपयोग तरी काय करून घ्यावा?
             बीजाला उगवता आले नाही कारण मातीत ओलावा नव्हता. आणि मातीत ओलावा तयार होण्यात न होण्यात बीजाचा दोष तो काय?
            पाऊस पाडला नाही हा दोष मेघांचा. दोष मात्र मढला जातो बीजाच्या माथ्यावर.
मेघांना दोषी ठरविण्यासाठी लागणारी हिंमत ज्यांच्याकडे नाही ते चक्क बियाणेच वांझ होते असा शेरा मारून मोकळे होतात.
गंगाधर मुटे
..........................................................................

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं