Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Feb 29, 2020

या हृदयीचे त्या हृदयी - भाग ६

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ६
या हृदयीचे त्या हृदयी

सांप्रतकाळात जन्माला येणारा मनुष्यजीव जन्माला येतानाच विज्ञान आणि तंत्रज्ञान सोबत घेऊन जन्माला येतो. पूर्वजन्म व संचिताचे संस्कार त्याचेवर असतात किंवा नाही, हे सांगणे अवघड आहे. परंतु गर्भात जीव पडल्यापासून त्याचेवर विज्ञान व तंत्रज्ञानाचे संस्कार व्हायला सुरू होतात. जन्मसुद्धा तंत्रज्ञानाच्या आधारानेच होतो व पालनपोषणात सुद्धा तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा असतो.

वयाच्या कोणत्याच टप्प्यात तंत्रज्ञानाची गरज नाही, असेही नसते. तंत्रज्ञान हीच मनुष्यजातीची अपरिहार्य गरज झाली असल्याने त्यापासून अलिप्त ठेवले कुणालाही अशक्य असते. पण तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा करावा, हे ठरवणे मात्र अत्यंत आवश्यक असते. बाब कोणतीही असो, त्याविषयीचा अतिरेकीपणा आणि गैरवापर हाच कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे शांतचित्ताने चिकित्सक विचार करून गंभीरतेने तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक ठरते.

आजच्या काळात उपलब्ध असलेले संगणकीय व आंतरजालीय (इंटरनेट) तंत्रज्ञान बाल्यावस्थेत असल्याने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुतूहलमिश्रित असणे स्वाभाविक आहे. त्यातूनच उपयुक्ततेच्या गणितीय हिशेबाने त्याचा वापर करताना भावनात्मक दृष्टीचा विसर पडत असावा. माणूस म्हणजे यंत्रमानव नसून भावनेच्या अविष्कारात रममाण असणारा सजीव आहे, याकडेही दुर्लक्ष होत असावे. हे सर्व लिहिण्याचे कारण की, प्रसंग कोणताही असो, सोशल माध्यमांच्या सहजसुलभ वापरामुळे शुभेच्छा व सदिच्छा देण्याचे उधाणच आलेले आहे. वर्षभर सतत येणारे सण, जागतिक दिवस, महापुरुषांपासून ते किरकोळ पुढाऱ्यांपर्यंतची पुण्यतिथी-जयंती, कुणाचा जन्मदिवस तर कुणाचा वाढदिवस, कुणाचे बारसे तर कुणाचे लग्न वगैरे वगैरे. इतके सर्व कमी पडते म्हणून की काय, त्याही पुढे जाऊन लग्नाचा वाढदिवसदेखील साजरा करण्याची संधी साधण्याची संधी दवडली जात नाही. या सर्व प्रसंगी परस्परांनाच नव्हे तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध नाही अशांनाही शुभेच्छा व सदिच्छा देण्याची सध्या इतकी रेलचेल झाली आहे की ती रेलचेल वैताग येण्याच्या पातळीवर पोचली आहे.

नवतंत्रज्ञानाच्या सहजसुलभतेमुळे एक जीताजागता मनुष्य दुसऱ्या जीत्याजागत्या मनुष्याला शुभेच्छा व सदिच्छा देत असेल तर अशी रेलचेल एकवेळ दुर्लक्षित करता येईल; पण जर जीत्याजागत्या मनुष्याऐवजी एखादे निर्जीव यंत्रच जीत्याजागत्या मनुष्याला शुभेच्छा द्यायला लागले तर काय करायचे? आता वेगवेगळे सॉफ्टवेअर बाजारात मिळतात. आपल्या संग्रही जितके ईमेल आणि मोबाइल नंबर असतील, त्या सर्वांना त्यांच्या जन्मदिवशी अमुक अमुक वेळी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे संदेश रवाना करायचे, अशी सॉफ्टवेअरना एकदा कार्यक्रम प्रणाली दिली की ते सॉफ्टवेअर न चुकता ज्याचा जन्मदिवस असेल त्याला शुभेच्छासंदेश पाठवत राहते. बँका, विमा कंपनीसहित अन्य कंपन्या, प्रतिष्ठाने, संस्था वगैरे हीच प्रणाली वापरत असते. म्हणजे आपल्याला ज्या शुभेच्छा दिल्यात त्या कुण्या व्यक्तीने नव्हे तर निर्जीव यंत्राने दिलेल्या असतात. आपला वाढदिवस आहे हे त्या यंत्राच्या मालकाच्या ध्यानीमनीही नसते. एकदा इतके उघड झाले तर शुभेच्छांनी आनंद होण्याऐवजी मनाची स्थिती उद्वेगाकडे झुकण्याची शक्यता असते.

अनेक पुढारी, पक्ष वगैरे तर नोकरांकडे किंवा एजंटकडे हे काम सोपवतात. म्हणजे एखाद्या नेत्याकडून आलेल्या शुभेच्छा या त्या नेत्याकडून नव्हे तर त्याच्या नोकरांकडून आलेल्या असतात. प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याऐवजी त्याच्या मालकाला चार मते जास्तीची मिळावीत म्हणून जर एखादे यंत्र किंवा नोकर परस्पर आपल्याला शुभेच्छा देत असतील, तर अशा प्रकाराला व्यापार-व्यवहाराचे स्वरूप येऊन मानवतेच्या परिभाषेचीच पायमल्ली होते. त्यांच्याकडे अमाप पैसा असेल, शुभेच्छा पाठवायला नोकर-चाकर असतील, पण सामान्य माणसाला भावना असते आणि तेच त्याचे सर्वस्व असते. जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे निव्वळ व्यवहारी स्वार्थच साधला जात असेल तर हा माणसाने माणसाचा घेतलेला दुरुपयोगच ठरतो.

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नको

एका हृदयाने दुसऱ्या हृदयाला शुभेच्छा द्यायच्या असतात. या हृदयीचे त्या हृदयी असे प्रत्यक्ष शक्य नसेल तर पत्र, फोन, फेसबुक, व्हॉट्‌सअॅप, ईमेल वगैरे माध्यमांचा वापर करून दिल्या जाऊ शकतात, पण संदेश पाठवणारा व्यक्ती जिताजागता मनुष्य असला पाहिजे. हृदयाचे काम जर यंत्र करायला लागले, तर उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाचे रूपांतर निर्जीव यंत्रात कधी होईल ते सांगता येत नाही.

- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ६ - दि. २९ फेब्रुवारी, २०२० - "या हृदयीचे त्या हृदयी"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Feb 22, 2020

...तर विचार प्रवाही होतात - भाग ५

"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग ५
...तर विचार प्रवाही होतात

सर्व प्राणिमात्रांचा विचार करता केवळ मनुष्यामध्येच विचार करण्याचा अंगीभूत गूण आहे. विचार करणे हे जर मनुष्यप्राण्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असेल तर प्रत्येक मनुष्य आपापल्या कुवतीनुसार विचार करतच असतो, ही अत्यंत स्वाभाविक बाब आहे. माणसाचा चेहरा केवळ काही इंच परिघाच्या आकाराचा असूनही कोट्यवधी जनतेमध्ये परस्परभिन्न असू शकतो आणि स्वतःचे वेगळेपण राखून असतो तर अमर्याद आणि सीमांचे बंधन नसलेला विचार कोट्यवधी जनतेचा एकसारखा कसा असू शकेल? त्यातूनच "जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती" असतात तसेच "जितक्या व्यक्ती तितके विचार" हे समीकरण आपोआपच तयार होते.

प्रत्येक मनुष्याचा चेहरा, आवाज, चालणे, बोलणे इतरांपेक्षा वेगळे असते. जसा मनुष्य चेहऱ्यावरून ओळखता येतो तसेच त्याच्या बोलण्यावरून व चालण्यावरूनही ओळखता येतो. निसर्गाची विविधताच इतक्या विविध अंगाने, रंगाने व ढंगाने नटलेली आहे की या विविधतेचे कोणत्याही एका सूत्रात वर्गीकरण करणे अवघडच नव्हे तर अशक्यप्राय आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्ती हा अनन्यसाधारण असतो, असे मान्य करावेच लागते.

मनुष्याच्या काळजातील अंतरंग सुद्धा परस्परभिन्न असतात. विचार आणि विचार प्रकटीकरणाची ढबही आगळीवेगळी असते. लेखनशैली बघून त्या लेखाचा लेखक कोण असेल हे अभ्यासू वाचक सहज ओळखू शकतो. एखादी कविता वाचल्यावर ती कविता कोणत्या कवीची असेल हे जाणकार रसिक ओळखू शकतो. कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा चेहरा किंवा चेहऱ्यावरील भाव बदलून जशी चेहऱ्याची ओळख लपवता येत नाही तसेच अंतरंग सुद्धा लपवता येत नाहीत. जोपर्यंत मनुष्य अबोल असतो तोपर्यंत ठीक पण एकदा बोलायला लागला की त्याच्या मनात काय दडले आहे ते उघड व्हायला लागते. विचार व्यक्तिसापेक्ष असल्याने अभिव्यक्ती सुद्धा व्यक्तिसापेक्षच असते. सुरुवातीला परस्परभिन्न विचार आपसात मेळ खात नसेल तर सर्व विचारांनी एकत्र बसून भेळ खाल्ली तर काही मुद्द्यांवर एकमत होऊन वैचारिक मेळ साधला जाऊ शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मान्य करून परस्पर विचारांचा आदर केल्यास वैचारिक समन्वय साधने अजिबात अवघड नसते.

कोणत्याच व्यक्तीचे अंगभूत विचार कधीच बदलत नसतात पण संस्कार, प्रबोधन अथवा तत्सम मार्गाने विचारांची दिशा बदलता येते. विचाराने स्वभाव घडवता येतो. पण त्याहीपेक्षा सभोवतालच्या परिस्थितीचाच सर्वात जास्त प्रभाव विचारधारेवर पडत असतो. परिस्थितीनुसार न वागल्यास जीवन जगणेच कठीण होत असल्याने परिस्थितीशी सर्वांना जुळवून घ्यावेच लागते आणि जगण्याच्या जीवनशैलीनुसार विचार कळत-नकळत आपोआप बदलत जातात. कधीकधी आधीच व्यक्तिसापेक्ष असलेला विचार परिस्थिनुसार आणखीनच कडवे स्वरूप धारण करतो. त्यातूनच जहाल विचारांना खतपाणी मिळून विचार एकांगी होत जातात. ''मी म्हणतो तेच सत्य" इथपर्यंत ठीक असते, त्याला विचारांचा ठामपणा किंवा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास असे गोंडस नाव देऊन दुर्लक्ष करता येईल पण ''मी म्हणतो तेच सत्य बाकी म्हणतात ते सर्व चुकीचे" या अतिरेकी पातळीवर जेव्हा विचार पोचतात तेव्हा त्या विचाराची जागा विचाराऐवजी हेकेखोरपणाने घेतलेली असते. एकदा का हेकेखोरपणा विचारात आला तर ती व्यक्ती स्वतःही शांतचित्ताने झोपू शकत नाही आणि इतरांनाही शांतचित्ताने झोपू देत नाही. अशा व्यक्तींची डोकेदुखी झेंडूबामने थांबत नाही आणि झोपेसाठी झोपेच्या गोळ्याही उपयोगी पडत नाही. विचार प्रवाही असल्याने परिवर्तनशील असतात. त्यामुळे चर्चा करून विचारांचे आदान-प्रदान केल्यास विचार अधिकाधिक प्रवाही व प्रगल्भ होण्यास मदत होते. चर्चेने आपण बाळगत असलेले विचार पारखता येतात, संवादाच्या पातळीवर तपासता येतात.

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्या-घेतल्याने मती शुद्ध होते

विचार हेच समाज प्रबोधनाचे साधन आणि वैचारिक उत्क्रांतीची रेशीमवाट असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असल्याने कोणताही विचार सरसकटपणे सर्वांना मान्य होऊ शकत नाही. एखादा विचार एकाला योग्य वाटेल तर तोच विचार दुसऱ्याला अयोग्य वाटू शकतो. अमान्य असलेल्या विचारांना विचारानेच प्रत्युत्तर दिले पाहिजे. विचाराची लढाई विचारानेच व प्रबोधनाची लढाई प्रबोधनानेच लढली पाहिजे. विचार स्वच्छ व स्पष्ट असतील तर चिडचिड न होता डोके शांत आणि शाबूत राहण्याची शक्यता आपोआपच बळावत जाते.

- गंगाधर मुटे आर्वीकर
===========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ५ - दि. २२ फेब्रुवारी, २०२० - " ...तर विचार प्रवाही होतात"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Feb 15, 2020

माणसाचा नव्हे साधनांचा विकास - भाग ४

"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग ४
माणसाचा नव्हे साधनांचा विकास

         शारीरिक, मानसिक थकवा घालवण्यासाठी पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून शासकीय कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा, असा नुकताच शासनाने निर्णय घेतला. पण दिवसभर टेबलाच्या आसऱ्याने खुर्चीवर बसून इकडल्या फाइल तिकडे हालविणाऱ्या (कामचुकार?) लोकांना थकवा येतो, ही संकल्पना सर्वसाधारणपणे शारीरिक कामे करणाऱ्यांना अजिबात मान्य होऊ शकत नसल्याने विषय चेष्टेचा ठरतो कारण सुखासीन जीवन हे शारीरिक दुर्बलतेचे कारण असते हेच जवळजवळ सर्वांना अमान्य असते.

         महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण करणे अशा तऱ्हेचा विचार सुद्धा अधूनमधून उचल खात असतो पण सबलीकरण, सक्षमीकरण म्हणजे नेमके काय? याचे उत्तर कुणाकडेच नसते. सर्वसाधारणपणे सर्व सोयी-सुविधा पुरवल्या की सक्षमीकरण होते असा काहीसा तर्क त्यामागे असतो. सोयी-सुविधांनी शारीरिक सक्षमीकरण, सबलीकरण होण्याऐवजी उलट खच्चीकरणच होत असते, याचे भान कुणालाच नसते.

         मानवी उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाचा प्रचंड वेगवान गतीने प्रगती आणि विकास झाला, असा एक सार्वत्रिक समज आहे पण माणसाने खरंच प्रगती किंवा विकास केला काय? याचा आढावा घेण्याची कुणीच तसदी घेऊ इच्छित नाही. जर आढावा घेतला तर जे निष्कर्ष निघतात ते अगदीच उलट निघतात. आदिमानव अवस्थेपासून तर सद्य अवस्थेपर्यंत मानवाची प्रगती होण्याऐवजी केवळ अधोगतीच झालेली आहे. काळाच्या ओघात दिवसेंदिवस माणसाची उंची कमी होत गेली, शरीरयष्टीचा घेर कमी होत गेला, वारा, ऊन, पाऊस, थंडी आणि नैसर्गिक बदलाशी जुळवून घेण्याची प्रतिकारशक्तीही कमी होत गेली हे ऐतिहासिक सत्य आहे. बौद्धिक विकास म्हणावा तर तसेही काही दिसत नाही. प्रगल्भता, विवेक, तारतम्य, कल्पनाशक्ती या पातळीवरही मनुष्याने प्रगती केली अशा काहीही पाऊलखुणा आढळत नाहीत. पौराणिक काळात राम, रावण, बिभीषण, लक्ष्मण होते तीच स्थिती आजही कायम आहे. माणसातला रावण मेला नाही आणि रामही जागा झालेला नाही. मानवी वृत्तीचे त्या वेळेस जे प्रमाण असेल तेच प्रमाण आजही कायमचे कायमच आहे. चोर-लुटेरे-डाकू-चरित्रहीन काही प्रमाणात तेव्हाही होते; आजही आहेत. सभ्य-सज्जन-शीलवान-चरित्रवान काही प्रमाणात तेव्हाही होते; आजही आहेत.

         माणसाचा विकास, प्रगती वगैरे काहीही झालेली नाही. केवळ मानवी अवस्था बदलली. वास्तुशिल्प, शिल्पकला, हस्तकला आणि वाङ्मय या क्षेत्रातील पूर्व कामगिरी बघून तर आज अचंबित होऊन चमत्कारिक वाटायला लागते. शारीरिक, आत्मिक अथवा बौद्धिक विकास वगैरे काहीही झालेला नाही. जो विकास झाला तो मनुष्यजातीचा विकास नसून केवळ साधनांचा, तंत्र आणि यंत्राचा विकास आहे. साधने जसजशी विकसित होत गेली तसतशी मानवी अवस्था बदलत गेली. समाजव्यवस्था सुद्धा कधीही निर्दोष नव्हती. ती सदैव एका सदोष अवस्थेकडून दुसऱ्या सदोष अवस्थेकडे सरकत राहिली. प्रगत तंत्र आणि साधनांच्या विकासामुळे मनुष्याचे ऊन, वारा, पाऊस, थंडी, वादळ, वातावरणातील बदल यापासून कृत्रिम संरक्षण झाले, जगणे आरामी-हरामी झाले, कष्टाची कामे सुसह्य आणि सुलभ झाली पण याच प्रगतीमुळे मनुष्याचा निसर्गाशी संपर्क तुटल्याने नैसर्गिक प्रतिकारक्षमता आणि सहनशीलता कमी झाली.

         सर्व साधनसामुग्रीचा लाभ घेत घेत ऐषोआरामात जीवन कंठण्याच्या शैलीमध्ये प्रसूतीच्या वेळी सिझरिंगचे प्रमाण वाढत असताना नैसर्गिक अवस्थेतील समाजशैली मध्ये मात्र अजूनही तशी वेळ ओढवलेली नाही. माझी एक कष्टकरी रक्ताची नातेवाईक गरोदर असूनही एकटीच शेतात कामाला गेली होती. अकस्मात प्रसूती कळा सुरू झाल्याने तिथेच बाळंत झाली. तिने स्वतःच्या हाताने स्वतःचेच बाळंतपण उरकले. लेकरू ओट्यात घेतले आणि एकटीच शेतातून दोन किलोमीटर अंतरावरील गावातल्या घरी स्वतः चालत चालत आली. आता मायलेकी दोघेही धडधाकट आहेत. ज्यांनी बालपणापासून सायकल, बस अथवा कोणत्याही साधनांचा वापर केला नाही ती माणसे वयाच्या नव्वद-पंच्याण्णवव्या वर्षी सुद्धा चार-पाच किलोमीटर अंतर सहज पायी चालू शकतात, अशी अनेक उदाहरणे आपल्याला आपल्या सभोवताली दिसतात.

शोधात सावलीच्या असा घात झाला
की दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला

         निसर्गापासून गरजेपेक्षा जास्त विलगीकरण, अंतर राखले आणि सोयीसुविधांचा अतिरेक झाला तर माणसाचे जगणे सुसह्य होण्याऐवजी असह्य होऊन निसर्गानेच निर्माण करून ठेवलेल्या आयुष्याच्या रेशीमवाटा हळूहळू काटेरी वाटेत रूपांतरित व्हायला लागतात.

- गंगाधर मुटे आर्वीकर
=========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ४ - दि. १५ फेब्रुवारी, २०२० - माणसाचा नव्हे साधनांचा विकास

==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.

==========

carona

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं