Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Dec 11, 2012

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!

(पुण्यनगरीच्या सौजन्याने)

             केंद्राने कापसाला 20 टक्के हमीभाव वाढवून द्यावा किंवा राज्य शासनाने 20 टक्के बोनस द्यावा, धानाला 3 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यासह विविध मागण्यांकरिता शेतकरी संघटनेने ०९ डिसेंबर २०१२, रविवारला रिझर्व्ह बँक क्वॉर्टर चौकात आंदोलन केले. मुख्यमंर्त्यांनी आंदोलकांना भेटायला वेळ न दिल्याने शेतकरी संतप्त होत अचानक रामगिरीवर निघाले. दोन ठिकाणी पोलिसांनी शेतकर्‍यांना अडविल्यावर ते बॅरिकेट्स पाडून पुढे निघाल्याने शेतकरी-पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.

  Nagpur 

               शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी दुपारपासून रिझर्व्ह बँक क्वॉर्टर चौकात ठिय्या आंदोलन सुरू झाले. आंदोलनात विदर्भाच्या वेगवेगळय़ा भागासह मराठवाडय़ातून मोठय़ा संख्येने शेतकरी सहभागी झाले. आंदोलकांनी याप्रसंगी केंद्र सरकारने कापसाच्या आधारभूत किमतीत 20 टक्के दरवाढ किंवा राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या न्यायाकरिता 20 टक्के कापसावर बोनस द्यावा, धान उत्पादकांना 3 हजार प्रतिक्विंटल दर द्यावा, शेतकर्‍यांना 24 तास वीज द्यावी, शेतकर्‍यांचे वीज बिल आणि कर्जमाफी देण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या.

  Nagpur 

                      दरम्यान मुख्यमंर्त्यांना शेतकर्‍यांच्या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्याकरिता शेतकरी संघटनेने वेळ मागितली होती. मुख्यमंर्त्यांनी संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत आंदोलकांना भेटण्याकरिता वेळ दिली नसल्याने आंदोलक भडकले. आंदोलकांनी शेतकरी संघटनेचे नेते माजी आ. वामनराव चटप, राम नेवले, जगदीश बोंडे, नाना खांदवे, रवी देवांग, सरोज काशीकरसह अनेक मान्यवरांच्या नेतृत्वात अचानक थेट मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरीवर कूच सुरू केली. अचानक आंदोलक रामगिरीवर निघाल्याने पोलिसांचे धाबे दणाणले. शांत बसलेल्या पोलिसांनी धावपळ करीत बंदोबस्त वाढवायला सुरुवात केली.आंदोलकांनी सुरुवातीला आमदार निवासात घुसण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी तो हाणून पाडला. शेतकर्‍यांनी मग रामगिरीकडे जाणारा मार्ग धरला.

  Nagpur

                पोलिसांनी बॅरिकेट्स व मोठय़ा प्रमाणावर पोलीस कर्मचारी लावून आंदोलकांना आमदार निवास चौकाच्या बाजूला अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु संतप्त शेतकर्‍यांसह वामनराव चटप यांनी स्वत: बॅरिकेट्स पाडत पुढे धाव घेतली. शेतकरी बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून शेतकरी-पोलिसांमध्ये थोडी धक्काबुक्की झाली. याप्रसंगी तणाव निर्माण झाला होता. शेतकरी अचानक रामगिरीच्या दिशेने धावत सुटल्याने पोलीसही त्यांना अडविण्याकरिता मागे धावत होते. शेवटी पोलिसांनी लेडीज क्लब ग्राऊंडच्या पुढे तातडीने लाकडी व लोखंडी बॅरिकेट्स लावून शेतकर्‍यांना रोखले. शेतकर्‍यांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला असता येथेही पोलीस-आंदोलकांत धक्काबुक्की झाली. सुदैवाने पोलिसांनी नमते घेतल्याने लाठीचार्ज टळला. शेतकरी संघटनेने लेडीज क्लब ग्राऊंडच्या पुढेच मग ठिय्या आंदोलन करीत मुख्यमंर्त्यांना भेटल्यावर व त्यांनी मागण्या पूर्ण केल्यावरच आंदोलन परत घेण्याची घोषणा केली.

  Sakal 

                      तणाव वाढत असल्याने पोलीस अधिकार्‍यांनी मध्यस्थी करीत मुख्यमंर्त्यांची वेळ घेऊन देण्याकरिता प्रयत्न सुरू केले. दरम्यान शासनाच्या विरोधात संतप्त शेतकर्‍यांनी जोरदार निदर्शने केली. मुख्यमंर्त्यांनी शेवटी संघटनेच्या शिष्टमंडळाशी भेटण्याचे आश्वासन दिल्याने 17 सदस्यीय शिष्टमंडळ संध्याकाळी 7 च्या सुमारास रामगिरीवर पोहोचले. शिष्टमंडळात वामनराव चटप, राम नेवले, जगदीश बोंडे, नाना खांदवे, रवी देवांग, सरोज काशीकर, गंगाधर मुटे, विजय निवल, प्रभाकर दिवे, संध्या राऊत आदींचा सहभाग होता. शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौव्हाण यांच्यासोबत सुमारे ३० मिनिटे चर्चा केली. चर्चेत मुख्यमंर्त्यांनी शिष्टमंडळाला राज्य शासन केंद्र सरकारला कापसाची आधारभूत किंमत 20 टक्के वाढवा, गव्हाला प्रती क्विंटल 130 रुपये बोनस द्या, सी. रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करण्यासह विविध मागण्यांकरिता पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. विजेच्या मुद्यावरही अधिवेशनाच्या आधी बोलणे योग्य नसल्याने योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंर्त्यांनी दिल्याची माहिती शेतकरी नेते वामनराव चटप यांनी दिली. चर्चेत कापसाला 4,680 रुपये प्रतिक्विंटल दर धानाला 3,000 रुपये प्रतिक्विंटल दर विविध कारणांनी कापूस, सोयाबीन, धानपीक न झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी 10 हजार रोख द्या, शेतकर्‍यांचे कर्ज आणि वीजबिल माफ करा, कृषिपंपाची वीज खंडित करणे बंद करा, ऊस उत्पादकांकरिता महत्त्वाच्या असलेल्या सी. रंगराजन समितीच्या शिफारशी मंजूर करा, गव्हावर 130 रुपये प्रतिक्विंटल बोनस द्या, शेतकर्‍यांना बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्या. या मागण्यांचा समावेश होता. 

------------------------------------------------------------------------------------------------------------

    
------------------------------------------------------------------------------------------------------------

   
------------------------------------------------------------------------------------------------------------

Oct 23, 2012

'ब्लॉग माझा-२०१२' स्पर्धेचा निकाल जाहीर

'ब्लॉग माझा-२०१२' स्पर्धेचा निकाल जाहीर


  ‘एबीपी माझा’ या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी तर्फे जगभरातल्या मराठी भाषिक ब्लॉग लेखकांसाठी नुकतीच “ब्लॉग माझा” ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत कुवैत ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यूयॉर्क ते नागपूर अशा विश्वाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी भाग घेतला होता. नुकतेच ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे निकाल जाहीर करण्यांत आलेले आहेत.

          मराठी ब्लॉगर्सना व्यासपीठ मिळवून देणारी ‘ब्लॉग माझा’ ही मराठीतली एकमेव अभिनव स्पर्धा आहे. न्यू मीडियामुळे आपल्या मराठी भाषेसमोर संधी आणि आव्हानं उभी होत आहेत. या आव्हानांचं रूपांतर संधीत करण्याचा आणि या ब्लॉगसारख्या माध्यमातील मराठीला, मराठी लेखनाला व मराठी सृजनशीलतेला दाद देण्याचा उपक्रम म्हणजे ‘ब्लॉग माझा’! यंदाही या उपक्रमाला मराठी ब्लॉगर्सकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

        मराठी ब्लॉगच्या माध्यमातून मराठी भाषेचे वैश्विक पातळीवर संवर्धन आणि प्रसारण करण्यार्‍या ब्लॉगमधून उत्कृष्ठ आणि दर्जेदार ब्लॉग निवडीसाठी परीक्षक म्हणून असणारे दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक श्री. अशोक पानवलकर, मराठी अभ्यास केंद्राचे संचालक श्री. दीपक पवार आणि युवा नाटककार व लेखिका इरावती कर्णिक यांच्या समोर मराठी ब्लॉग्ज विश्वामधून फक्त पंधरा ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान होतं.
     या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – माझी वांङ्मयशेती” (http://gangadharmute.wordpress.com) या ब्लॉगचाही समावेश आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मराठी ब्लॉगर्सचे आणि विजेत्या ब्लॉगर्सचे मनापासून अभिनंदन! 

प्रथम पसंतीचे पाच ब्लॉगर्स आणि त्यांचे ब्लॉग
1. सुलक्षणा लक्ष्मण-  http://mrugtrushna.blogspot.in  
2. सागर पाटील-  http://bhurata.blogspot.com
3. नरेंद्र गोळे-  http://nvgole.blogspot.in/
4. विद्या कुलकर्णी- http://asvvad.blogspot.in/
5. युवराज गुर्जर-  http://ygurjar.blogspot.in/

उत्तेजनार्थ निवडलेले दहा ब्लॉगर्स आणि त्यांचे ब्लॉग

1. अवधूत- http://ekregh.blogspot.in/
2. गंगाधर मुटे- http://gangadharmute.wordpress.com
3. प्रशांत रोटवदकर- http://athirstymanmad.blogspot.in/ 
4. तन्मय कानिटकर-  http://tanmaykanitkar.blogspot.in/
5. रोहन जगताप- http://anudini.in
6. प्रसाद इनामदार- http://prajkta-prajkta.blogspot.in
7. ब्रिजेश मराठे-  http://brijeshmarathe.wordpress.com/
8. एकनाथ मराठे- http://ejmarathe.blogspot.com
9. श्रेया महाजन- http://shreya4mahajan.blogspot.com/
10. विजय लाले- http://barmahi.blogspot.in/

(प्रथम पसंतीचे पाच ब्लॉग्ज आणि उत्तेजनार्थ दहा ब्लॉग्ज हे दोनच गट आहेत. या गटातील क्रमवारी म्हणजे गुणानुक्रम नाही.)

                       विजेते ब्लॉगर्स यांच्या कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे एपिसोड रेकॉर्डिंग मुंबई येथील ‘एबीपी माझा’ टीव्हीच्या स्टुडियो मध्ये होणार असून या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम ‘एबीपी माझा’ टीव्हीच्या खास एपिसोडमध्ये प्रसारीत केला जाणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नुकताच श्री.प्रसन्न जोशी, ए.बी.पी.माझा ह्यांनी ई-मेलद्वारे वरील निकाल कळविलेला आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!


श्री.प्रसन्न जोशी आणि ए.बी.पी.माझा वाहिनी ह्यांचे हार्दिक आभार!

या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – माझी वांङ्मयशेती” (http://gangadharmute.wordpress.com) या ब्लॉगचाही समावेश आहे.
मराठी ब्लॉगर्स आणि ब्लॉग लेखनास प्रोत्साहन देण्याचे काम ते गेल्या चार वर्षांपासून करत आहेत ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे!
सर्व परीक्षक मंडळी आणि स्टार टीव्हीच्या चमुचा मी आभारी आहे.

                                                                                                                - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Jul 13, 2012

"वांगे अमर रहे" पुस्तक प्रकाशन

"वांगे अमर रहे" पुस्तक प्रकाशन
         
               गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" या पुस्तकाचे प्रकाशन "शरद जोशी" यांच्या हस्ते, आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त जेष्ठ पत्रकार मा. वेदप्रतापजी वैदीक यांच्या अध्यक्षतेखाली, मा.प्रा. सुरेश व्दादशीवार संपादक, लोकमत, नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २२ जुलै २०१२ रोजी संपन्न होत आहे. 
              
              प्रकाशन समारंभाला आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

दिनांक : २२-०७-२०१२
वेळ : दुपारी १.०० वाजता
स्थळ : गुजराती भवन, हवालदारपुरा, वर्धा

shetkari

Jun 3, 2012

आकाशवाणीवर मराठी गझल मुशायरा

आकाशवाणीवर मराठी गझल मुशायरा

        आज दि. ०३ जुन २०१२ ला यवतमाळ आकाशवाणी वरून (१०२.७) रात्री ९.३० वाजता मराठी गझल मुशायर्‍याचे प्रसारण केले जाणार आले.

       या मुशायर्‍यात सिद्धार्थ भगत, ललित सोनवणे, मसूद पटेल, प्रा. रुपेश देशमुख, गंगाधर मुटे, पवन नालट, प्रमोद चोबितकर. विनय मिरासे, उज्वल सरदार यांचेसह अनेक गझकारांचा सहभाग आहे.

यवतमाळ आकाशवाणी प्रसारणाचा संपादीत भाग ऐका;

May 28, 2012

माणसांचे यशू-बुद्ध होते

.
माणसांचे यशू-बुद्ध होते
.
.
घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

प्रणयवासनेला सिमा ना वयाची
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते

किती साचुदे गाळ-कचरा तळाशी
तरी धार नाहीच अवरुद्ध होते

जसा बाज गझलेस येतो मराठी
तशी मायबोलीच समृद्ध होते

कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते

                          - गंगाधर मुटे
---------------------------------

May 25, 2012

भिक्षा..!!

भिक्षा..!!

ऐकविण्याची रीत तुमची
काळीज माझं चिरते आहे
आमंत्रकालाच म्हणताय तुम्ही
भिक्षा मागत फिरते आहे?

मीच चालवितो सदावर्ते
कैक ढेकरे तृप्त होती
यज्ञ माझा सफ़ल करूनी
प्रेमे "पुलेशू" मजला देती ...!!

तुमचे माझे कसले नाते
मी भक्त; तुम्ही दैवत माझे
घ्यावे मजला सांभाळुनी
पदरी घ्यावे गुन्हे माझे ..!!

आमंत्रण जर का असेल गुन्हा
देत फ़िरेन मी पुन्हा-पुन्हा
मरेस्तोवर मागुनी भिक्षा
गुन्हा करेन मी पुन्हा-पुन्हा..!!

                     - गंगाधर मुटे
------------------------------

May 24, 2012

उद्दामपणाचा कळस - हझल

.
उद्दामपणाचा कळस - हझल
.
.

भिणार नाही तुला कुणीही, फुसकी खळबळ म्हणजे तू
पेल्यामध्येच खळवळणारे पुचाट वादळ म्हणजे तू

पराकोटीचा बेशरम तू, लाचार तू, येडपट तू
शेणामधल्या किड्यासारखी, अविरत वळवळ म्हणजे तू

नको तिथे नाक खुपसण्याचे, प्यायलास तू बाळकडू
उथळ पाण्यासारखी खळखळणारी खळखळ म्हणजे तू

ओंगळ तू, वंगाळ तू, जसा मल सांडव्याचा गाळ तू
साचलेल्या डबक्यामधील कुंठलेले जळ म्हणजे तू

राहू-केतू तू, असुरांचे दृष्ट हेवे-दावे तूच
स्मशानभूमीत पिशाच्चांची अशांत वर्दळ म्हणजे तू

छल-कट शिरोमणी शकुनी तू, कळीचा नारद मुनी तू
दुनियेस हैराण करणारी चुगलखोर कळ म्हणजे तू

वात्रट तू, वाह्यात तू, असतो इंद्रियांच्या कह्यात तू
उद्दामपणाच्या वृक्षाला आलेले फळ म्हणजे तू

ना नर तू, ना नारायण तू, दहा मुखाचा रावण तू
सर्व विकारास 'अभय'दाते, सोयीचे तळ म्हणजे तू

                                                        - गंगाधर मुटे
-----------------------------------------------------

May 19, 2012

कापला रेशमाच्या सुताने गळा

.
.
--------------------------------------------------------
कशी देऊ दाद मित्रा, तुझा विकासाचा आलेख वेगळा
ऐश्वर्य तुझे सात मजली, अन तुला गालिच्यांचा लळा
आरसी - ओसी मध्ये तुझी करंगळी खेळते....... पण;
त्या तिथे गावी बापास तुझ्या मिळ कोरडा जोंधळा
---------------------------------------------------------
.
.
कापला रेशमाच्या सुताने गळा
.

जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
कापला रेशमाच्या सुताने गळा

घेतला आळ नाही निसर्गावरी
भोगुनी सोसले मी तडाखे-झळा

साथ नाही सुखाचा खरे हे जरी
का तुझ्या वाचुनी मी लुळापांगळा?

राहतो मी कुठे, नेमका कोण मी?
सापडेना खुणा, मी कसा बावळा?

भाग ओसाड का घाम गळतो जिथे?
वाट चुकलाय पैसा-टका आंधळा

झेप घेण्यास तू वेळ लावू नये
मांडला आज आहे इथे सापळा

रंग खात्रीस पक्का, फिका ना पडे
वर्ण भाग्यात माझ्या निळासावळा

मार्ग सारेच धुंडाळतो कैकदा
चालण्याला तरी शोधतो वेगळा

चित्त शाबूत असणे ”अभय" चांगले
पोळलेला जरी भावनांचा मळा

                               - गंगाधर मुटे
---------------------------------------
अवांतर - एक विडंबन

मै खंजर तो नही
मगर ये घोरफडी
जबसे मैने तुझको काटा
खंजरी हो गयी....॥
---------------------------------------

May 14, 2012

सुप्तनाते

.
सुप्तनाते
.
तुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना
कुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना

तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा
तुझे वागणे तूज लखलाभ मित्रा, तुला मोक्ष देवो अहंभावना

तुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे?
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना

चला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ, हृदय भासते 'मेड इन चायना'

किती ग्रंथ वाचून मुखपाठ केले, किती ऐकतो रोज पारायणे
जुमानेच नाही कशालाच थोडी, नियंत्रीत होईचना वासना

कसा आज रस्ता दिशाभूल झालो, निघालो कुठे अन् कुठे पोचलो
कसोटीत उद्दिष्ट हरवून गेले, "अभय" व्यर्थ गेली तुझी साधना

                                                               - गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------

मीमराठी स्नेहसंमेलन : मल्टीस्पाईस, पुणे

मीमराठी स्नेहसंमेलन : मल्टीस्पाईस, पुणे

 (श्री विशाल  कुलकर्णी यांनी मीमराठीवर लिहिलेला  वृत्तांत)

ए ’सिंहगड’ पक्का ना मग? १३ मे करेक्ट?
काय राव, सिंहगडावर कसली गर्दी असेल शनिवार-रवीवार आणि आमच्यासारख्यांनी गडावर चढायचे म्हणजे? पुन्हा स्नेहसंमेलनाला जर कुणी ’वयोवृद्ध’ सदस्य येणार असतील तर (उदा. "?") त्यांना चढणे होणार का गडावर?
पण मी काय म्हणतो, पुण्यातच कुठेतरी सगळ्यांना येता येइल असे एखादे मध्यवर्ती ठिकाण नाही का ठरवता येणार?
"ब्रह्मा किंवा मल्टीस्पाईस' ठरवता येइल, पण मग खर्च आपल्याला वाटून घ्यायला लागेल...
'ठिक आहे ना, जर सगळ्यांची सोय होणार असेल तर खर्चाचा मुद्दा दुय्यमच नाही का?"

         गेले कित्येक दिवस मीमराठीवर गाजत असलेला २०११-२०१२ मधील काव्यलेखन आणि कथालेखन स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाबद्दल चाललेली चर्चा शेवटी 'म्हात्रे पुलाजवळील 'मल्टीस्पाईस' व्हेज रेस्टॉरंट या ठिकाणी सगळ्यांनी भेटायचे या मुद्द्यावर एकमत येवून संपुष्टात आली. मुळातच नेहमीप्रमाणे एखादा हॉल वगैरे घेवुन, पाहुणे बोलावून टिपीकल बक्षीस समारंभ करण्यापेक्षा एक अनौपचारिक स्नेह संमेलन करायचे ही कल्पना सगळ्यांनीच उचलून धरलेली असल्याने बर्‍याच कटकटी आपोआप दूर झाल्या होत्या.

              शनिवारी संध्याकाळी ठरल्याप्रमाणे अशोककाकांचा फोन आला. "विशाल, मी पोचलोय रे पुण्यात. उद्या सकाळी ९-९.३० च्या दरम्यान स्वारगेटला भेटू." काका, सांगवीला त्यांच्या चिरंजिवांकडे उतरले होते. सकाळी आम्ही स्वारगेटपाशी भेटायचे आणि मग तिथुन 'मल्टीस्पाईस' वर हल्ला करायचा असे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी बरोब्बर ८.५५ मिनीटांनी काकांचा फोन आला. ते स्वारगेटला पोचले होते. सव्वा नऊ पर्यंत मीही पोचलो आणि काकांना शोधायला सुरुवात करणार. तोवर तिथे उभे असलेले एक 'गॉगल' घातलेले 'डॉन' टाईप व्यक्तीमत्व पुढे आले. मी बाईक बाजुला लावत होतो तोवर काकांचा हुकुम झाला. 'गाडीवरुन खाली उतर." (मला क्षणभर सदाशिवपेठेत उभा असल्याचा भास झाला.) पण मी पुढे होवून हात जोडेपर्यंत अशोककाकांनी छान मिठी मारली. क्षणभर मला माझ्या आण्णांच्याच मिठीत असल्याचा भास झाला. ८.५० ते सवा नऊ एवढ्या वेळेत काकांनी तिथल्या एका उसाच्या रसविक्रेत्याशी मैत्री करुन टाकली होती. (हे अशोककाकांनाच जमू जाणे). काकांना घेवुण नियोजीत स्थलाकडे प्रस्थान केले. तेवढ्यात काकांनी मीरजहून श्री. जावेद मुल्ला हे (मीमचे नवसदस्य, एक उत्कृष्ट चित्रकार आणि 'कै. मोहम्मद रफीसाहेबांचे' अनन्य भक्त)आधीच मल्टीस्पाईसकडे रवाना झाल्याची बातमी दिली. आम्ही ही तिकडेच निघालो. काकांशी बोलण्याच्या नादात आम्ही थोडे पुढे गेलो आणि रस्ता चुकलो. तिथुन मालकांना फोन, मग ररादांना फोन. ररांनी व्यवस्थीत रस्ता समजावून सांगितला आणि शेवटी एकदाचे आम्ही गडावर येवुन पोहोचलो. दरम्यान आशिषशी (निंबाळकरांचा)समस - समस खेळणे सुरुच होते. मीमचे नव सदस्य श्री. गिरिश खळदकर हे आशिषला स्वारगेटवरुन घेवून मल्टीस्पाईसकडे रवाना झाले होते.


             इथे जावेदभाई आमची वाटच बघत होते. इतक्यात मालकही दोन मिनीटाच्या अंतरावर असल्याची बातमी मिळाली. मालकांची दोन मिनीटे म्हणजे २० मिनीटांपासुन एक तासापर्यंत कितीही होवु शकत असल्याने आम्ही थोडे काळजीत पडलो होतो, पण मालकिणबाईंनी २ म्हणजे दोनच मिनीटे अशी ग्वाही दिली आणि आम्ही निश्चिंत झालो. 'मल्टीस्पाईस' सकाळी ११ वाजता उघडते त्यामुळे आम्ही पोचलो तेव्हा तिथे अजुन साफ सफाईच चालु होती. कदाचीत एखाद्या झाडु आमच्याही हाती सोपवला जायचा या भितीने आम्ही (अस्मादिक, अशोककाका आणि जावेदभाई) बाहेरच थांबलो. तोपर्यंत मालक पोचलेच आणि आम्ही आत शिरलो. आल्या आल्या मालक आम्हाला 'चल तुला एक गंमत दाखवतो' म्हणून बाहेर घेवुन गेले. (नंतर येणार्‍या प्रत्येक जवळच्या व्यक्तीला गंमत दाखवण्याचे काम मालक इमाने इतबारे करत होते )

              भेटल्या भेटल्या अशोककाकांनी निपोंच्या मातोश्री आजारी असल्याकारणे ते येवु शकत नसल्याची बातमी दिली होती, त्यामुळे अशोककांच्या चेहर्‍यावर थोडी नाराजी होती. पण तेवढ्यात निपोंचा फोन आला आणि त्यांच्या भगिनी मातोश्रींची काळजी वाहण्यास समर्थ असल्याची आनंददायी बातमी देत त्याचबरोबर निपोंनी ते पुण्यात पोचले असुन, ररांबरोबर कार्यक्रमस्थळी येत असल्याची शुभवार्ता ऐकवली आणि काकांची कळी खुललली. एकेक मंडळी हळु हळू यायला लागली. सर्वात आधी गिरीश आणि श्रीमंत निंबाळकर महोदय हजर झाले. आम्ही सर्वात आधी निंबाळकरांची पावले सरळ असल्याची खात्री करुन घेतली. त्यावर निंबाळकरांनी 'आमची पावले उलटीच आहेत, पण तुम्हाला भय वाटू नये म्हणून आम्ही त्यानुसार आपले समस्त शरीर वळवून घेतलेले आहे' अशी बातमी दिली. बाकीची मंडळी येइअपर्यंत अस्मादिकांनी आपली फोटोग्राफीची हौस भागवून घेतली.इतक्यात एक हेल्मेट हॉटेलच्या कंपाऊंडमध्ये आत शिरलं. हे कोण असावेत असा विचार मनात येतोच आहे, तोवर "हेच ते ड्रेस-कोड वाले!" अशी अभिनव ओळख करुन देत मालकांनी 'विमो उर्फ विवेक मोडक' यांचं स्वागत केलं.

तेवढ्यात मीमवरील 'आदित्य चंद्रशेखर' हे आपल्या सौभाग्यवती आणि चिरंजिवांसहीत हजर झाले. मालकांनी लगेचच आदित्यच्या चिरंजिवांना 'मीमवरील सर्वात तरुण सदस्य' असा प्रिमीयम बिल्ला जाहीर करत असल्याची घोषणा केली. यावर विमोंनी स्वतः मालक आणि मालकिणबाई हे मात्र अजुनही 'प्रिमीयम सदस्य' नसल्याची आठवण करुन दिली. (रुपये ७०० + ७०० = १४०० या रकमेचा चांदनी दरबारात स्वीकार करुन तिथेच पोच पावती देण्यात येइल याची मालकांनी पोच घ्यावी. तसेच जितका उशीर होइल तितके १४०० वरील व्याज वाढत जाईल याचीही नोंद घ्यावी)

सौ. राज जैन, सौ. आदित्य आणि नव निर्वाचीत मीम सदस्य 

नव सदस्याने मीमचा स्वीकार करावा म्हणून त्यांना मस्का मारणारे मीमचे मालक आणि ही काय ब्याद गळ्यात पडली म्हणून वैतागलेले नव सदस्य

हळु हळु सगळी मंडळी जमा व्हायला सुरुवात झालेली होती. मुटेसाहेब पुण्यात पोचले असुन कार्यक्रमस्थलाकडे रवाना झाले आहेत ही बातमी येवुन पोचली होती. नेहमीप्रमाणे उशीरा येणारे मनसे लोहगाव शाखा उपाध्यक्ष इथेही आपल्या किर्तीला जागले.येणार्‍या प्रत्येकाची ओळख करुन देण्याचे काम मालक मनोभावे पार पाडत होते. टेबलावर बसुन एकमेकांची फिरकी खेचायचे प्रकार सुरु झाले होते.

मीमवरील एक महा-सज्जन(?)(कृपया डॅशच्या (-)जागी 'बाराचे' असे वाचावे)सदस्य विमोशेठ आणि शाखा उपाध्यक्ष

आशिष निंबाळकर (उत्सवमुर्ती - सफेद टी शर्ट) आणि गिरिश खळदकर

अशोककाका आणि शाखा उपाध्यक्ष

इतक्या वेळात मीमचे वयोवृद्ध सदस्य श्री.ररा निपोंना घेवून पोचले होते. जावेदभाईंनी आपला रफीसाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह मीमच्या सदस्यांसाठी खुला केला होता. जावेदभाई, पेशाने कलाशिक्षक आहेत. पण त्याबरोबरच एक उत्कृष्ट चित्रकारही आहेत.

निपो आणि जावेदभाई
(यातील निपो कोण हे ओळखणार्‍याला मालकांतर्फे ब्रह्मावर नेवुन एक कटींग चहा पाजण्यात येइल.)


इतक्यात मालकांना जोशीबाईंचा (प्रियंका) फोन आला व जोशीबाई पटवर्धनबागेपाशी असल्याचे कळले. मालक त्यांना 'मेहंदळे गॅरेजपाशी' बोलवण्याच्या विचारातच होते, तोवर जोशीबाईंनी रिक्षावाला सरळ मल्टीस्पाईसलाच घेवुन येत असल्याची बातमी मालकांना दिली. (रिक्षावाल्याचे ते सौजन्य पाहून आपल्याला अंमळ गहिवरुन आल्याचे मालकांनी नंतर मालकिणबाईंजवळ एका़ंतात कबुल केले अशी विश्वासु सुत्रांची माहिती आहे.)

जोशीबाई (प्रियंका पण चोप्रांची नव्हे) [मागे उभी असलेली व्यक्ती जोशीबाईंचा अंगरक्षक नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी]

ज्यांच्यामुळे सिंहगड कॅन्सल झाला ते 'गवि'च येवु शकत नसल्याने 'गवि'चा आतापर्यंत किमान १०० वेळातरी उद्धार झालेला होता. शेवटी गविंना एक दिवस गोव्याला 'मार्टिन्स कॉर्नरला' घेवून जायचे आणि सगळे बिल त्यांना भरायला लावायचे अशी सौम्य शिक्षा ठोठावण्यावर सदस्यांचे ९९.५% vs ०.५% असे एकमत झालेले होते.

काव्य स्पर्धा २०११ आणि लेखन स्पर्धा २०१२ अशा दोन्ही बक्षीस समारंभाची वाट पाहात एकमेकांशी गप्पा मारत, एकमेकाच्या फिरक्या खेचण्यात मशगुल असलेले मीमकर.. (डावीकडुन मालक, आदित्य चंद्रशेखर, श्री श्री श्री स्वामी संकेतानंद महाराज धायरी-बंगरुळकर आणि पिंगुशेठ) पाठमोर्‍या व्यक्तीच्या केसांवरुन त्या व्यक्तीबद्दल अंदाज आला असेलच. तरीही सद्ध्यातरी आम्ही ते नाव गुलदस्त्यातच ठेवत आहोत. तोवर keep on guessing !या वेळेपर्यंत बाकीची मंडळीही येवुन दाखल झाली होती.
उदा. झकासराव,

नीळा प़क्षी (हा पक्षी चक्क गौरवर्णीय निघाला, मीमकरांची दिशाभूल केल्याबद्दल नीलपक्षींचा झायीर णिशेद !त्याचबरोबर मीमच्या या कौटुंबिक सोहळ्यात आपल्या कुटुंबियांबरोबर सहभागी झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि अभिवादनही !

मीमचे अनुभवी सदस्य श्री. कोर्डे बंधुही कुटुंबासहीत येवुन दाखल झाले होते.
श्री.अरुण कोर्डे व श्री. शरद कोर्डे

इतका वेळ ज्याची आतुरतेने वाट पाहात होतो तो आपला सर्वांचा लाडका मीमकरही येवुन दाखल झाला. एवढ्या मोठ्या प्राणघातक आपत्तीतून नुकताच बाहेर आलेल्या या लाडक्या मित्राला बघून खरोखर मनस्वी आनंद झाला.

बावनखणीचा जादुगार : धुंद रवी

आता सगळेच कडाडलेले होते. त्यामुळे मालकांनी इनिशिएटिव्ह (मराठीचा आग्रह असणार्‍यांनी योग्य तो शब्द सुचवावा) घेवुन सुपची ऑर्डर दिली आणि सुप टेबलवर येताच बक्षीस समारंभाची घोषणा करुन गरम गरम सुप पिण्याच्या आनंदावर 'सुप'आपलं 'पाणी' फिरवले. आधी 'काव्य लेखन २०११' च्या विजेत्यांचा श्री. अशोककाका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्री. गंगाधरदादा मुटे आणि श्री. आदित्य चंद्रशेखर काकांच्या हातून पुरस्कार आणि प्रमाणपत्र स्वीकारताना...


त्यानंतर ’लेखन स्पर्धा २०१२’ च्या विजेत्यांचा अनुभवी मीमराठी करांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तृतीय पुरस्कार विजेत्या ’नीलपक्षी’ यांना मुटेसाहेबांच्या हस्ते गौरवण्यात आले.

द्वितीय पुरस्कार ढापणारे श्री श्री श्री ईरसाल म्हमईकर यांचा श्री. कोर्डे बंधु यांच्या हस्ते ’सत्कार’ करण्यात आला.

तर प्रथम पुरस्कार विजेते श्री. आशिष निंबाळकर यांना साक्षात मीमच्या आदीपुरुषाच्या हस्ते गौरवण्यात आले.
आशिष निंबाळकर रमतारामश्रींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना...

दरम्यान प्रत्येक विजेत्याने आपले मनोगतही व्यक्त केले. समस्त मीमकरांनी एकमताने फ़क्त चारच शब्दात आपले मनोगत व्यक्त करण्याची मागणी केलेली असतानाही ती बंडखोरपणे धुडकावून लावत ईरसाल म्हमईकरांनी उपस्थित सर्व मीमकरांना खालील आवाहन केले.

"आपण सर्वजण मीमराठीचे निश्चितपणे काही ना काही देणे लागतो. याची आठवण करुन देत आम्ही तुम्हा सर्वांना जबरदस्तीची विनंती कर्तो आहोत की इथे लेख, ललित, प्रवास वर्णन, कथा, कविता काहीही लिहीले नाही तरी एकवेळ चालेल पण फ़क्त वाचनमात्र राहू नका. उपलब्ध सर्व लेखनावर आपल्या शक्य तेव्हा व शक्य तेवढ्या शब्दात प्रतिसाद जरुर द्या. मीमराठीने आपल्याला दिलेल्या खजिन्याच्या बदल्यात आपण मीमराठीसाठी एवढे नक्कीच करु शकतो आणि करुच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाकडेवाडी!"

यानंतर श्री. अर्धवट तसेच शाखा उपाध्यक्ष श्री. सुहासराव यांनी अतिशय भावुक होत मालकांचे कौतुक केले. (मालक, ७०० रुपये आधीच वसुल केलेले आहेत ना दोघांकडुनही)

पुरस्कार वितरण सोहळ्याचे फोटो काढण्यात रमलेली उत्साही फोटोग्राफर मंडळी

बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपला आणि सर्व जण मुख्य मुद्द्याकडे वळले. म्हणजे आवडीच्या कामाला लागले...
जेवण टेबलावर येइपर्यंत गप्पा मारण्यात दंग झालेले मीमकर...


मनस्वी राजन, मीमवरच्या निवांत पोपटाबरोबर

डाव्या कोपर्‍यात स्वामीजींबरोबर बसलेले 'सातारकर'स्वामी !

खास अशोककाकांना भेटण्यासाठी म्हणून आलेली त्यांची भाची आणि अस्मादिकांची धाकटी बहिण दक्षीणा

बहुदा कुठल्यातरी अनन्य भक्ताला आपल्या कृपावचनांचा लाभ करुन देत असलेले स्वामी संकेतानंद, मनस्वी राजन आणि धुंद रवी यांच्यासोबत...

एकदाचे जेवण टेबलवर लागले आणि इतका वेळ हाडाडलेले मीमकर 'अन्नं पुर्णब्रम्ह'वर कचकचुन तुटून पडले.भुकेजलेल्या मीमकरांना बघून आश्चर्यचकीत झालेले 'नव निर्वाचीत मीम सदस्य' जेवणावर तुटून पडलेल्या मीमकरांकडे पाहताना..

च्यायला, काय माणसे आहेत एकेक? कधी खायला मिळालं होतं का नव्हतं यांना?

जेवण आटोपल्यावर नेहमीप्रमाणे गृपचे फोटो सेशन पार पडले.


इथे बहुदा मालकांना धरुन बसलेल्या मालकिणबाईंना 'बाई गं, तुझाच आहे, आम्ही नाय नेत त्याला' असे सुहासरावांनी सांगितल्यामुळे त्या अंमळ लाजल्या असाव्यात. (हे ही एक आश्चर्यच)


सर्व काही व्यवस्थीत पार पाडल्यावर एखाद्या सावकाराप्रमाणे मालकांनी उपस्थित सदस्यांकडून ठरलेला हप्ता गोळा केला आणि हॉटेल मालकांचे बील भरुन टाकले. (यानंतर मात्र मालकांनी खरोखर सुटकेचा श्वास सोडला असेल)

सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर हळु हळु सर्वांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली. बाकी प्रतिसादातुन बाकीचे सदस्य आपला अनुभव आणि छायाचित्रे शेअर करतीलच. तोपर्यंत एवढेच.....


आपला..
ईरसाल म्हमईकर

Apr 19, 2012

जगणे सुरात आले

जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाची
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, शब्दात गुंफताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले

कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!

                                          - गंगाधर मुटे
--------------------------------------------

Apr 18, 2012

माणूसकीच्या उत्क्रांतीचे १० टप्पे?

वानर

* * * * * 
 माकड

* * * * *
वानर
* * * * *
  माकड
* * * * *
मामलापुरम
* * * * *
Monkey
* * * * *
  Monkey
* * * * *
  Mahabalipuram
* * * * *
Monkey
* * * * *
Monkey
* * * * *

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं