Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Dec 9, 2019

झुंडशाहीचा न्याय

न्याय करण्याची सर्वसामान्य लोकांची सामूहिक मानसिकता :
  1. पायदळ चालणारा व सायकल यांची टक्कर झाली तर पायदळ चालणारा निर्दोष व सायकल चालक गुन्हेगार 
  2. सायकल व बाईक यांची टक्कर झाली तर सायकल चालक निर्दोष व बाईक चालक गुन्हेगार 
  3. बाईक व कार यांची टक्कर झाली तर बाईक चालक निर्दोष व कार चालक गुन्हेगार
  4. कार व ट्रॅव्हल्सची टक्कर झाली तर कार चालक निर्दोष व ट्रॅव्हल्स चालक गुन्हेगार
सर्वसामान्य लोकांची न्यायदानाची काही खास वैशिष्ट्ये :
  1. निर्दोष कोण आणि गुन्हेगार कोण याचा न्यायनिवाडा करायला त्यांना १ मिनिट देखील लागत नाही. काही सेकंद पुरेसे असतात.
  2. न्यायनिवाडा करायला घटनास्थळाचे निरीक्षण करण्याची त्यांना गरज नसते. ऐकीव माहितीच पुरेशी असते.
  3. न्यायनिवाडा करायला कायद्याऐवजी त्यांची भावनाच पुरेशी असते.
  4. सर्वसामान्य लोकांना ज्याची दया येते त्याच्या बाजूने न्याय झुकतो.
  5. जो न्याय करायला एक मिनिट देखील लागत नाही तोच न्याय करायला न्यायव्यवस्था काही महिने/वर्ष लावतात, हे त्यांच्या असंतोषाचे कारण असते.
तात्पर्य इतकेच कि कायद्याच्या राज्याऐवजी झुंडशाहीचे राज्य आले तर प्रत्येकाने आपापली नऊ मन लाकडे स्मशानात नेऊन ठेवावी. कुणाचा नंबर केव्हा लागेल याचा अजिबात भरवसा नाही.
"मी गुन्हा केला नाही, मला भीती नाही" अशा भ्रमात राहू नका. झुंडशाहीत केवळ सजा दिली जाते, तुम्हाला तुमच्या बचावार्थ बाजू मांडण्याचा अधिकार नसतो. "मी गुन्हा केला नाही, मला भीती नाही" अशा भ्रमात यासाठी सुद्धा राहू नका कारण तुम्ही गुन्हा केला किंवा नाही हे झुंड ठरवेल.

तुमच्या मरण्यावर २५ लोकांच्या झुंडीने जल्लोष केला तर तो जल्लोष बघून हजारो-लाखो-करोडो लोकं जल्लोष करायला एका पायावरच तयार असतात. याचेही भान असू द्या!
असो. तूर्त इतकेच पुरेसे.

- गंगाधर मुटे

Dec 6, 2019

राज्य कायद्याचेच असावे

कायद्यावरचा जनतेचा विश्वास उडाला हे खरे.
 कायद्याने न्याय मिळतो यावर विश्‍वास जनतेचा राहिला नाही हेही खरे.
 कायद्याने एकतर न्याय मिळत नाही, मिळालाच तर फार विलंब होतो हे त्यापेक्षाही खरे.

 पण याचा अर्थ कायदा हातात घेऊन स्वतः दुसऱ्याला आरोपी समजून शिक्षा घेणे कदापीही, कोणत्याही व्यवस्थेत समर्थनीय ठरू शकत नाही. कायद्याचं काम कायद्यानेच केलं पाहिजे.

 जनतेचा आक्रोश समजून घेता येतो पण हा आक्रोश कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी व्यक्त व्हायला हवा. हा आक्रोश कायद्याचे राज्य स्थापन करण्याऐवजी माणसांनीच हातात शस्त्र घेऊन न्याय द्यावा, अशा तऱ्हेने व्यक्त होत असेल तर त्याला आक्रोश म्हणणे अत्यंत अवघड आहे.

 न्याय आणि अन्याय या भावनिक गोष्टी नाहीत इतकी तरी समज सुजाण समाजामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे.

सबब एन्काऊंटरचे समर्थन करणे म्हणजे झुंडशाहीचे समर्थन करणे होय.

- गंगाधर मुटे आर्वीकर

उलट्या काळजांची उलटी गंगा

उलट्या काळजांची उलटी गंगा


उलटी गंगा वाहे, पूर आकाशी आला
एकाएकी नावेमध्ये, समुद्र बुडाला

       माझ्या बालपणी गावातील वारकरी भजन मंडळात हे भजन हमखास गायले जायचे. हे भजन भारूड या प्रकारात मोडते. पण तेव्हा काही फारसे समजत नव्हते. मात्र ऐकताना मनाला गुदगुल्या व्हायच्या. अर्थ सरळसोपा असल्याने कळत होता, पण असे कसे काय घडू शकते? असा प्रश्न उपस्थित होऊन कुतूहल वाटायचे आणि ही केवळ गंमत आहे याची खातरी वाटू लागायची.

       पण दुधाच्या दातांची जागा अक्कलदाढांनी घेतली आणि शेतीक्षेत्रात खरोखरच उलटी गंगा वाहत आहे, याची जाणीव व्हायला लागली. भारतात मनुष्यप्राण्याचा विचार केला, तर पुरुषांमध्ये सर्वात जास्त कष्ट शेतकरी पुरुष करतो, महिलांमध्ये सर्वात जास्त कष्ट शेतकरी महिला करत असतात, पण केलेल्या श्रमाचा मोबदला म्हणून भारतीय चलनमुद्रेची गंगाजळी त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही, याउलट चलनमुद्रेचा प्रवाह विपरीत दिशेनेच अखंड वाहत असतो, अशी जाणीव ठळकपणे व्हायला लागली. प्राण्यामध्ये सर्वात जास्त कष्ट वाट्यास येणारा शेतीतला बैल हाच प्राणी आहे. अनेक कारणामुळे इतर सर्व प्राण्यांचे कष्ट कमी झालेले आहेत. अनेक प्राण्यांना शासकीय संरक्षण लाभले आहे. अभयारण्याच्या स्वरूपात वाघांना - म्हणजे माणसाच्या नैसर्गिक शत्रूला जहागिरी बहाल करण्यात आली आहे, पण प्राण्यामध्ये सर्वात जास्त कष्ट करणार्‍या, अन्न पिकवणार्‍या, उन्हातान्हात मरमरमर राबणार्‍या बैलाला इथे शासकीय पातळीवर किंवा जनमानसात कवडीची किंमत दिली जात नाही. बैलाने पिकवलेले अन्नधान्य सारेच खात असले, तरी त्यापैकी कुणीही बैल दिसल्याबरोबर 'धन्यवाद बैलोबा' एवढे उपकाराच्या परतफेडीचे दोन शब्दही बोलायला तयार होत नाही. अन्न पिकवतो बैल, त्याचा अनादर केला जातो आणि कौतुक व पूजा होते देशाच्या पालनपोषणात नगण्य वाटा असलेल्या गायीची. टनभर चारा खाल्ल्यानंतर गाय मणभर दूध देते. दूध देण्यापलीकडे गायीचा काहीही उपयोग नाही. पण गायीला मातेचा दर्जा! बैल म्हणजे पिता तर नाहीच, पण छटाकभर माती उकरणाऱ्या उंदराला मित्र मानणारी मनुष्यजात जमीन नांगरून टाकणाऱ्या बैलाला मित्र मानायला तयार नाही. आहे की नाही उलटी गंगा? यावर शेतीसाठी उपयुक्त बैलाला जन्म देते म्हणून गायीचे महत्त्व आहे, असा युक्तिवाद केला जातो. पण हा युक्तिवाद समर्थनीय नाही, कारण तेच कारण असते तर गायीबरोबर सांडाचीही पूजा करण्याची नक्कीच प्रथा रूढ झाली असती.

    १९८० नंतर शेती क्षेत्रात काही अत्यंत क्रांतिकारक बदल झालेले आहेत. काही बाबतीत उलटापालट झाली आहे. पूर्वी कामाच्या शोधात खेड्याकडून पावले शहराकडे धावायची. पण आता गेल्या काही वर्षांपासून अकस्मातच काळ बदलला आहे. गंगा उलटी वाहायला लागून वळणीचे पाणी आढ्यावर जायला सुरुवात झाली आहे. मोलमजुरी आणि कामधंदा शोधण्यासाठी शहरातील पावले गावाकडे वळायला लागली आहेत. आम्ही शाळा शिकत असताना आम्हाला सांगितले जायचे की, अमेरिकेतील मोलकरीण स्वतःच्या चारचाकी गाडीने भांडी घासायला मालकाच्या घरी जात असते, एवढा तो देश समृद्ध आहे. आम्हाला ते ऐकताना मोठे कुतूहल वाटायचे. एक दिवस भारतातील शेतमजूरही चारचाकी गाडीमध्ये बसून शेतावर काम करायला थेट शेताच्या बांधावर जाईल असे जर भाकीत त्या काळी कुणी वर्तवले असते, तर त्याची रवानगी थेट वेड्यांच्या इस्पितळात केली गेली असती. मात्र अगदी पंधरा-वीस वर्षांच्या काळातच इतिहासाला कलाटणी मिळाली असून शहरातील मजूरवर्ग चारचाकी वाहनात बसून थेट खेड्यात येऊन शेतीच्या बांधावरच उतरायला लागला आहे. फरक एवढाच की अमेरिकेतील मोलकरीण भांडी घासायला मालकाच्या घरी स्वतःच्या चारचाकी गाडीने जात असते, आमचा मजूरवर्ग मात्र भाड्याच्या चारचाकी गाडीने जातो. स्वत:च्या स्वयंचलित वाहनाने शेतावर जाणारा शेतमजूर नजीकच्या काळात लवकर बघायला मिळेल आणि तो दिवससुद्धा फार लांब नाही. परप्रांतीयाचे लोंढेही आता गावामध्ये उतरायला लागले आहेत. मुंबई-पुण्यासारख्या शहरांना परप्रांतीयाचे लोंढे नकोनकोसे होत असताना आणि त्यांना हुसकावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत असताना खेड्यात मात्र याच परप्रांतीयांचे दिलखुलासपणे स्वागत केले जात आहे. खेड्यातील शेतकरी परप्रांतात जाऊन तेथील कामगारांना आपल्या गावात येण्याचे निमंत्रण देऊ लागला आहे. गावामध्ये आल्यानंतर त्यांची निवासाची व्यवस्था राजीखुशीने करायला लागला आहे.

      निसर्गत: गंगा उताराच्या दिशेनेच वाहत असते. मात्र शासन नावाची नियोजक व नियंत्रक संस्था जिथे जिथे नाक खुपसते, तिथे तिथे गंगा उलटी वाहायला सुरुवात होते. नैसर्गिक प्रवाहाला निष्कारण अवरुद्ध करून सत्तेचे दलाल पोसण्यासाठीच शासन नावाची यंत्रणा उतावीळ असते. मागे महाराष्ट्र शासनाने निर्मल ग्राम योजना जाहीर करून गाव स्वच्छ ठेवणार्‍या ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार दिले होते. अनेक ग्रामपंचायतींनी गाव स्वच्छ न करताच केवळ तसे कागदोपत्री दाखवून अनुदानासह पुरस्कार लाटले होते. गावाच्या सामुदायिक प्रयत्नातून व श्रमदानातून गाव निर्मल करावे, अशी शासनाची अपेक्षा असते, या उलट नागरी वस्तीबाबत शासनाचे धोरण उलटे असते. नगरात, महानगरात कुणाला सामुदायिक प्रयत्न अथवा श्रमदान करायला सांगितले जात नाही. शासकीय तिजोरीची दारे मोकळी करून पगारी कर्मचार्‍यांकडून सारी स्वच्छता करवून घेतली जाते. गाव आणि नगर यांच्यासाठी शासनाचे दुजाभावाचे धोरण असतेच, त्याहीपेक्षा हे धोरण गंगेचा प्रवाह उलट्या दिशेने फ़िरवणारे असते. गावातला माणूस दिवसभर शारीरिक श्रम करतो, त्याला आणखी श्रम करायला सांगितले जाते. याउलट बव्हंशी नागरी जनतेचा शारीरिक श्रमाशी संबंध येत नाही. त्यामुळे त्यांना लठ्ठपणाचे व मधुमेहासारखे विकार जडण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी शहरी माणसाने, शासकीय कर्मचार्‍याने, व्यापार्‍याने व उद्योजकाने श्रमदान केले, तर ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक व शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकते/ पण तसे होत नाही. ज्याला श्रम करण्याची सक्त गरज आहे, त्याला श्रम करायला सांगितले जात नाही. ज्याला आणखी श्रम करण्याची गरज नाही किंवा आणखी श्रम केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते, त्यालाच आणखी श्रम करायला सांगितले जाते.

     सध्या घरोघरी संडास बांधण्यासाठी व गाव 'हागणदारीमुक्त' करण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्नाची पराकाष्ठा केली जात आहे. त्यासाठी अनुदानाच्या योजना राबवल्या जात आहे. केंद्र शासन 'स्वच्छ भारत' करण्याच्या मिशनवर अग्रेसर आहे. पण कुठलीही गोष्ट स्वच्छ करायला पाण्याची नितांत गरज असते, याचे भान कुणालाच नाही.

     अगदी पंतप्रधानांनादेखील नाही. व्यवस्थेने सर्वांचीच बंडी उलार करून ठेवली आहे. प्रस्थापित व्यवस्थेने झाडून सारेच उलट्या गंगेचे प्रवासी निर्माण करून ठेवलेले आहेत. जो जितका सुज्ञ, विचारवंत, थोर, महान, ज्येष्ठ, वरिष्ठ तितका तो उलट्या गंगेचा प्रवासी, हेच समीकरण दुर्दैवाने सर्वत्र बघायला मिळत आहे.

       गावात प्यायला पाणी नाही. अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागते. जिथे पाणी उपलब्ध आहे तेथील पाण्याचा टीडीएस मोजण्याची कुणालाच खैस नाही. अनेक गावात पिण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचा टीडीएस चक्क १५०० ते २००० हजार असतो. हा चर्चेचा मुद्दा होत नाही. सर्वांना पिण्याचे शुद्ध आणि ४०० टीडीएसच्या आतील पाणी उपलब्ध झाले पाहिजे, यात कुणालाच स्वारस्य नाही. इथे चर्चा फक्त आरओचे पाणी आरोग्याला कसे हानिकारक आहे, याचीच होते. काळीजच उलटे असेल तर विचाराची गंगा तरी सरळ कशी असणार?

     परंपरागत गावाची रचना अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. कदाचित न शिकलेली माणसे दूरदृष्टी ठेवून विचार करत असावेत. परंपरागत पद्धतीत गावठाणासाठी गावाबाहेर खास जागा सोडलेली असायची. गुरांच्या शेणमूत्रासाठी गावाबाहेर व्यवस्था असायची. घरातला काडीकचरा आणि घाण गावाबाहेर नेऊन टाकण्यासाठी, घरगुती खत साठवण्यासाठी स्वतंत्रपणे प्रत्येकाला पुरून उरेल इतकी मोकळी जागा असायची. 'गावाच्या आतील घाण गावाच्या बाहेर म्हणून गाव स्वच्छ' अशी एकंदरीत मांडणी होती. गावातल्या जमिनीत घाणेरडे पाणी जिरायची व मुरायची काहीच शक्यता नसल्याने गावातील विहिरीतील पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्य असायचे. शौचाला गावाबाहेर जायचे तर अर्ध्या लिटर पाण्यात कार्यभाग उरकणे पुरेसे असल्याने पाण्याच्या दुर्मॉळतेशी सांगड घालणे आपोआपच शक्य व्हायचे. आता सरकार म्हणतेय की घरोघरी शौचालय झाले पाहिजे. झालेच पाहिजे याबद्दल दुमत नाही; नव्हे, ती काळाची गरज आहे. पण शौचायलाचा वापर करायला प्रतिव्यक्ती सरासरी दर दिवशी २५ लीटर पाणी लागते, ते कुठून आणायचे? याचे उत्तर तर आधी शोधायला हवे की नाही? त्यावर गांधी शौचालय हा मार्ग सुचवला गेला. पण त्यामुळे घाण पाणी जमिनीत खोलवर झिरपणे सुरू झाले. ते झिरपत झिरपत विहिरीत पोहोचले. आता विहिरीतील पाणी पिण्यायोग्यच राहिलेले नाही. नाइलाजाने तेच पाणी पिण्याशिवाय गावकर्‍यांना अन्य पर्यायच उपलब्ध नाही. नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करून गावकर्‍यांना चांगले पाणी उपलब्ध करून देण्याची प्राथमिकता शासकीय धोरणात नाही. फक्त अतिदुष्काळी स्थिती निर्माण झाली की सरकारी टँकर इकडे-तिकडे धावायला लागतात. टँकरद्वारे प्रतिव्यक्ती प्रतिदिवशी किती पाणीपुरवठा होतो, याचा आढावा घेतला जात नाही. 'आले देवाजीच्या मना, तेथे कुणाचे चालेना' अशी एक जुनी म्हण आठवते, तिचा येथे पुरेपूर प्रत्यय येत आहे. बदल घडणे ही नैसर्गिक क्रिया आहे व सदैव बदल घडवत राहणे हा मनुष्यस्वभाव आहे. बदल घडायलाच हवे, पण त्यात तारतम्य असायला हवे. घरोघरी शौचालय आले पाहिजे असे वाटत असेल तर घरोघरी पुरेसे पाणी पोहोचवणे ही पहिली पायरी आहे. पुरेसे पाणी उपलब्ध नसेल तर 'हागणदारीमुक्त गाव' ही घोषणा म्हणजे चक्क वेडपटपणा आहे. जेथे ३६० दिवसापैकी १८० दिवस पिण्याला धड पाणी मिळत नाही, त्या गावातील नागरिक गावकुसाबाहेर बाहेर जाऊन लीटरभर पाण्यात कार्यभाग उरकणे पसंत करतील की घरातल्या शौचालयात बसून २५ लीटर पाणी वाया घालवतील? मग बारमाही हागणदारीमुक्त गाव होईल तरी कसे? इतके सोपे समीकरण गणिताच्या पदवीधराला सोडवता येत नाही.

     सुशिक्षित बेरोजगारांना 'बेरोजगारी भत्ता' हा 'उलट्या गंगेला' अधोरेखित करणारा आणखी एक नमुना. बेरोजगारी भत्ता देणे गैर नाही पण केवळ सुशिक्षित बेरोजगारांनाच का म्हणून? अशिक्षित बेरोजगारांना का नाही? याचे समाधानकारक उत्तर कोणालाच देता येत नाही. मात्र तरीही घोडे दामटलेच जाते. अशिक्षित युवकाने महाविद्यालयात न जाता त्याऐवजी कुठले तरी काम केलेलेच असते. कुणी शेती करून अन्नधान्याच्या वखारी भरलेल्या असतात. कुणी सूतगिरणीत काम करून देशवासीयांना नेसायला कपडे पुरवलेले असतात. कुणी कामगार बनून घरे बांधण्यास मदत केलेली असते. पण ज्याने देशाला अन्न, वस्त्र, निवारा पुरवला त्याला आपला देश काहीही द्यायला तयार नसतो. त्याच्या कार्याला प्रोत्साहनही दिले जात नाही आणि त्याला बेरोजगारी भत्ताही दिला जात नाही. या उलट ज्याने केवळ महाविद्यालयीन शिक्षण घेतले, सुटीचा दिवस बसस्टॉपवर उभे राहून मजनूगिरी करण्यात घालवला, सार्‍या शासकीय सुविधांचा व फी माफीचा लाभ उचलला, त्या बदल्यात देशाला काहीच परतफेड केली नाही, तरीही फक्त त्याच सुशिक्षित युवकाला बेरोजगारी भत्ता देण्याची भाषा केली जाते. जो देशासाठी श्रम करून देश घडवतो, त्याला खिजगिणतीतही पकडले जात नाही.

    देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणारा जवान, देशवासीयांना तनफुगी होईपर्यंत भरपेट खाऊ घालणारा किसान, कापसापासून धागा व धाग्यापासून कापड बनवून देशवासीयांची लाज झाकणारा कामगार, श्वसनाचे रोग विकत घेऊन कोळसाखाणीत काम करून घरोघरी वीज पुरवून अंधार्‍या देशाला प्रकाशमय करणारा यांना देशभक्त म्हणण्याची आमची संस्कृती नाही. देशाच्या जडणघडणीत ज्याचा वाटा व कार्य शून्य, तो मात्र देशभक्त म्हणून गौरवला जातो.

इथे पावलोपावली गंगा उलटीच वाहत आहे आणि उलटी गंगाच आपल्या अंगवळणी पडलेली आहे!

- गंगाधर मुटे
(मनोगत-दिवाळी अंक २०१९ प्रकाशित लेख)

Nov 27, 2019

जातीयवाद

जातीयवादाचा आरोप आपल्याला घप्प चिकटेल इतके जातीयवादी वर्तन आपण स्वतः न करणे याला तारतम्य पाळणे, असे म्हणतात.

- गंगाधर मुटे

Nov 25, 2019

अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन

चौदावे अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन, यवतमाळ येथे मी सादर केलेली गझल.
------------
लाख रोधके वाट रोखती, पाय थबकले नाही
मी शस्त्र बदलले आहे, लक्ष्य बदलले नाही
------------
कोण जाणे खेळ नियतीचा, की तुझेच नशीब फुटेल
नकोस करू अन्याय इतका, कुणी बंड करून उठेल
------------
वैश्विक खाज नाही

शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही

त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही

गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही

शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला
बुद्धी भ्रमिष्टतेवर, उरला इलाज नाही

स्वातंत्र्य देवते तू, ये भारतात थोड़ी
जेथे 'अभय' कुणाला, कुठलेच आज़ नाही

© गंगाधर मुटे ’अभय’
-------------

Nov 15, 2019

शेती आणि सरकार

जर पंधरवड्यापूर्वी सरकार स्थापन झालं असतं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या घरावर सोन्याची कवले चढली असती का?
किंवा उद्या सरकार स्थापन झालं की लगोलग शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जाणार आहे का?

आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात शेती करताना एखाद्याला सरकारची किती कोटी रुपयांची मदत झाली हे कुणीतरी मला जरा सांगाल का?

जर शेतकऱ्यांना सरकारकडून काहीच मिळत नसेल तर निष्कारण अशा परिस्थितीचा संबंध शेतीशी जोडून जणू काही सरकार असलं की शेतकऱ्याला भरमसाठ मदत केली जाते असा चुकीचा संदेश बिगरशेतकरी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम होत असते…

आणि
नको त्या बाबीचा शेतीशी संबंध जोडणे म्हणजे अनावश्यक रित्या शेती बद्दलचे प्रेम उचंबळून आणण्यासारखे आहे.

नको तिथे शेती विषय घालून सोंगाड्या सारखी नाटके करण्याची गरज आहे मला वाटतं नाही.
****
शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते फार तर असे म्हणू शकतात की सरकार नसल्यामुळे आमची सरकार विरोधी लढाई थांबली आहे.
शेतकऱ्याला काहीच मिळणार नसेल तरी सुद्धा आमची लढाई सरकारच्या विरोधात रात्रंदिवस सुरू असते.
सरकार नसल्यामुळे आमच्या लढाईमध्ये खंड पडला आहे. त्यामुळे आमचे लढाईसाठी हात शिवशिवत आहे.
अशा स्थितीत तातडीने सरकारची स्थापना करावी आणि आमच्या लढाईच्या रस्ता मोकळा करून द्यावा.
त्यामुळे शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते किती लढवैय्ये, किती लढाई बहाद्दर आहेत आणि शेतकरी व शेतकऱ्यांची बाजू रात्रंदिवस कशी लावून धरत असतात, इतके तरी बिगर शेतकरी समाजाच्या लक्षात येईल.

- गंगाधर मुटे आर्वीकर

Oct 22, 2019

GDP घसरण्याचे कारण

GDP घसरण्याचे कारण शेतीची भयंकर दुरावस्था हेच आहे पण तज्ज्ञांना मान्य नाही कारण मान्य करणे त्यांना परवडणारे नाही.

- गंगाधर मुटे

Oct 12, 2019

पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा

 पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा


सरकारी वकील : पुढे काय झालं?
वसुली अधिकारी : आम्ही आर्वी छोटी या गावांमध्ये वसुलीसाठी गेलो होतो.
ऍड देशमुख : तुम्ही गावांमध्ये गेले होते कशावरून? काही पुरावा आहे का?
वसुली अधिकारी : आम्ही आमच्या ऑफिसमध्ये कारवाई बुक मध्ये तशी नोंद केली होती. 
ऍड देशमुख : दाखवा बुक
वसुली अधिकारी :  ऑफिसमध्ये आहे, सोबत आणले नाही.
ऍड देशमुख : का आणले नाही? तुम्ही आणले नाही त्याचे कारणच तुम्ही रजिस्टर काही लिहिले नाही. कारण तुम्ही त्या गावात गेलेच नव्हते
वसुली अधिकारी : गेलो होतो. रजिस्टर मध्ये नोंद आहे. रजिस्टर ऑफिस मध्ये आहे.
ऍड देशमुख : तलवार घरी ठेवून लढाईला जायचं किंवा वस्तरा घरी ठेवून हजामतीला जायचं, असं चालत असते का? तुम्ही रजिस्टर मेंटेन केलेलेच नाही कारण तुम्ही त्या गावात गेलेलेच नव्हते. तुम्ही त्या गावाला गेले असते तर तुम्ही नक्कीच रजिस्टर सोबत आणले असते.
वसुली अधिकारी काही बोलत नाही. चूप राहतो. 

ऍड देशमुख : तुम्ही गावात गेल्यानंतर ज्यांच्याकडे कर्ज आहे त्यांना तुम्ही शिवीगाळ केली.
वसुली अधिकारी : नाही. आम्ही शिवीगाळ केली नाही. आम्ही नियमाप्रमाणे वसुली करत होतो तेव्हा छातीवर शेतकरी संघटनेचे बिल्ले लावून सुमारे 100 तरुण पोरांचा जमाव गंगाधर मुटे यांच्या नेतृत्वाखाली आमचेकडे आला आणि आमची वसुली थांबवली
ऍड देशमुख : वसुली थांबवली म्हणजे नेमके काय केले?
वसुली अधिकारी : आम्हाला मारहाण केली, आणि शिवीगाळ केली
ऍड देशमुख : तुमची कॉलर वगैरे पकडली होती का?
वसुली अधिकारी : होय, आमची कॉलर पकडली होती.
ऍड देशमुख : आमची म्हणजे कोणाकोणाची?
वसुली अधिकारी : मी आणि माझ्या चार-चार सहकाऱ्यांची
ऍड देशमुख : तुमची कॉलर कुणी पकडली?
वसुली अधिकारी : गंगाधर मुटे यांनी
ऍड देशमुख : आणखी कुणी तुमची कॉलर झाली धरली?
वसुली अधिकारी :  गंगाधर मुटे यांनी धरली 
ऍड देशमुख : एकाच व्यक्तीने एकाच वेळी पाच लोकांची कॉलर कशी काय धरली? गंगाधर मुटे यांना किती हात आहेत?
वसुली अधिकारी :  दोन आहेत
ऍड देशमुख : मग कॉलर धरायला किती हात लागतात?
वसुली अधिकारी : एका हाताने कॉलर धरता येते 
ऍड देशमुख : गंगाधर मुटे यांना दोनच हात आहेत. दोन हाताने दोघांची कॉलर धरली असेल. एक माणूस एकाच वेळी पाच लोकांची कॉलर धरू शकत नाही. बरोबर?
वसुली अधिकारी : बरोबर आहे
ऍड देशमुख : म्हणजे गंगाधर मुटे यांनी पाच लोकांची कॉलर धरलीच नाही?
वसुली अधिकारी :  चुकलो होतो, पाच लोकांची नाही दोघांची धरली होती.
ऍड देशमुख : मग पोलीस तक्रार करताना कॉलर धरली असे तक्रारीत लिहिले होते का?
वसुली अधिकारी :  हो लिहिले होते
ऍड देशमुख : नक्की आठवते का?
वसुली अधिकारी : हो नक्की आठवते. तक्रारीत लिहिले होते.
ऍड देशमुख : तक्रार कोणी केली होती?
वसुली अधिकारी : मीच दिली होती?
ऍड देशमुख : तुमच्या तक्रारीचा मूळ कागद माझ्याकडे आहे. तक्रारीत कॉलर धरल्याचा कुठेही उल्लेख नाही
वसुली अधिकारी : मग विसरलो असेल
ऍड देशमुख : जेव्हा घटना घडली तेव्हा रिपोर्ट देताना आठवले नाही, आज कसे काय आठवले?
वसुली अधिकारी : तुम्ही विचारलं म्हणून आठवले
ऍड देशमुख : मी विचारले नसते तर आठवले नसते का? 
वसुली अधिकारी :  नसते आठवले.
ऍड देशमुख : बरं पुढे काय झालं? 
वसुली अधिकारी : आम्हाला मारलं
ऍड देशमुख : कोणी मारलं आणि कशाने मारले?
वसुली अधिकारी : लाथाबुक्क्यांनी मारले
ऍड देशमुख : तक्रारीत तुम्ही लाठ्याकाठ्यांनी मारले असे लिहिले आहे
वसुली अधिकारी :  होय, आम्हाला लाठ्याकाठ्यांनी मारले
ऍड देशमुख : पुढे आणखी काय झालं?
वसुली अधिकारी : आम्हाला दगड फेकून मारले
ऍड देशमुख : तुम्हाला दगड लागलेत का? काही जखमा झाल्यात का?
वसुली अधिकारी : होय, आम्हाला दगड लागले आणि जखमा सुद्धा झाल्या होत्या
ऍड देशमुख : मेडिकल रिपोर्ट दाखवा
वसुली अधिकारी : केस पेपरमध्ये जोडला असेल
ऍड देशमुख : तुम्ही जोडला असेल? की अन्य कुणी जोडला असेल?
वसुली अधिकारी :  पोलिसांनी जोडला असेल
ऍड देशमुख : तुम्हाला मेडिकलमध्ये पोलिसांनी नेले होते का?
वसुली अधिकारी : नाही, आम्ही स्वतःहूनच गेलो होतो
ऍड देशमुख : पोलिसांनी मेडिकल रिपोर्ट घेतला होता का?
वसुली अधिकारी : आता नक्की आठवत नाही
ऍड देशमुख : शरीरावर जखमा झाल्याचे काही व्रण तरी आहेत का?
वसुली अधिकारी : होय. आहेत.
ऍड देशमुख : दाखवा, कुठे आहे?
वसुली अधिकारी : तेव्हा कुठे कुठे जखमा झाल्या होत्या ते आता आठवत नाही. 
ऍड देशमुख : तुम्ही यांना ओळखता का?
वसुली अधिकारी : ओळखतो. हेच गंगाधर मुटे आहेत
ऍड देशमुख : यांनी तुमची गावातून मारबत काढली होती का?
वसुली अधिकारी : हो. "कर्जवसुली अधिकाऱ्यांना घेऊन जा गे मारबत" असे म्हणत आमच्या गाडीमागे धावत येऊन आमची मारबत काढली होती.
ऍड देशमुख : यांनी तुमच्या अंगावर चिखल फेकला होता का?
वसुली अधिकारी : यांनी आमच्या अंगावर चिखल फेकला होता.
ऍड देशमुख : तुमच्या अंगावर फेकायला यांनी चिखल कुठून आणला आणला होता?
वसुली अधिकारी : यांनी विहिरी जवळच्या नालीतील घेतला होता.
ऍड देशमुख : ही शाळेजवळची घटना आहे ना?
वसुली अधिकारी : होय. शाळेजवळचीच घटना आहे.
ऍड देशमुख : पण शाळेजवळ तर विहीरच नाही. मग तिथे नाली आणि चिखल कुठून आला? तुमच्या अंगावर चिखल फेकला, असे तुम्ही तर तक्रारीत लिहिलेलेच नाही!

वसुली अधिकारी काही बोलत नाही. चूप राहतो. 

ऍड देशमुख : गंगाधर मुटे यांनी तुमच्या अंगावर शेणसुद्धा फेकलेच असेल ?
वसुली अधिकारी : होय, त्यांनी आमच्या अंगावर शेण फेकले.

            हे ऐकून सरकारी वकील वैतागून उभा होतो आणि वसुली अधिकाऱ्याकडे बघून म्हणतो "आणखी किती खोटे बोलणार आहात रे तुम्ही? आता इथे बोलतो आहेस त्यातील अर्धे तर तू तुझ्या मूळ रिपोर्ट मध्ये लिहिलेच नाही!"

            ऍड देशमुख  न्यायालयाला सांगतात की, ही सगळी बनावट कहाणी आहे. ही मंडळी आर्वीला गेलेलीच नव्हती आणि तिथे काहीही झालं नाही. गंगाधर मुटे पत्रकार आहेत आणि त्यांनी बँकेविरोधात अनेक बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापल्या होत्या आणि बँकेतील गैरकृत्याचे  बिंग फोडले होते म्हणून ही मंडळी चिडली आणि खोटी बनावट केस उभी करून माझ्या अशिलाला त्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला.

         ही कहाणी आहे १९८२ या सालातील. या काळात इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संघटना स्थापन होऊन शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर येण्याला सुरुवात झालेली होती. कॉलेज करत असतानाच मी जशी संधी मिळेल तसा संघटनेच्या उपक्रमात सहभागी होत असायचो. शरद जोशी वर्धेला आले आणि त्यांची सभा किंवा बैठक असली की मी कॉलेजला  बुट्टी मारून शरद जोशींना ऐकायला जात असायचो. तो काळच वेगळा होता. त्या काळातल्या कहाण्या ऐकताना आजच्या नव्या पिढीला काल्पनिक कहाण्या वाटून एखादा कपोलकल्पित चित्रपट बघत असल्याचा फील येईल, इतका तो काळ वेगळा होता. शेती आणि शेतकऱ्याला अजिबात प्रतिष्ठा नव्हती. ७० वर्षाच्या वयोवृद्ध शेतकऱ्याला दलालांचा किंवा व्यापाऱ्यांचा १० वर्षाचा पोरगा अथवा मार्केट यार्डातला हमाल देखील अरे-कारे, आबे-काबे अशा एकेरी भाषेत बोलायचा. गावातल्या पटवाऱ्याकडे किंवा सोसायटीच्या बाबूकडे शेतकरी देव किंवा मसीहाच्या नजरेने बघायचे. माझं बालपण गावात आणि शिक्षणासाठी शहरात गेल्याने शहर आणि खेडी यांच्यातील जीवनमानाची दरी स्पष्टपणे नजरेत भरत होती.  शेतीची दुर्दशा संपवायची असेल तर शेतकरी संघटित झाला पाहिजे, अशी अस्पष्ट जाणीवही अंतर्मनाला होत होती. तशातच शरद जोशींचे परदेशातून गलेलठ्ठ पगाराची नोकरी (१९७८ मध्ये दीड लाख रु. महिना) सोडून भारतात येऊन शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटना बांधण्याचे त्यांचे प्रयत्न मनाला भुरळ घालत होते. 

            त्या काळात सक्तीची कर्जवसुली हा एक भयानक प्रकार सुरू होता. सक्तीची वसुली म्हणजे एखाद्या शेतकर्‍यावर एखाद्या बँकेचे जर ५० हजार रुपये कर्ज असेल तर वसुली अधिकारी त्या शेतकर्‍याच्या घरात घुसून त्याच्या घरातली स्वयंपाकाची भांडी जप्त करायचे, झोपायचा पलंग जप्त करायचे, घरात असलेले पाचपन्नास किलो अन्नधान्य जप्त करायचे. या वस्तूंची एकूण किंमत दोन-चारशे रुपयेच असायची. पण या वस्तू जप्त करून, त्याचे चावडीवर प्रदर्शन मांडून त्या शेतकर्‍याची पुरेपूर नाचक्की करणे, हा त्यामागचा हेतू असायचा. हे वाचताना एखाद्याला अतिशयोक्ती वाटेलही; पण सक्तीची वसुली करताना वसुली अधिकारी शेतकर्‍यांना ”तुझी बायको गहाण ठेव”, “तुझी मुलगी रातच्याला पाठव पण आमची वसुली दे'', या भाषेत बोलायचे. शेतीची, घराची, खुंट्याच्या जनावराची जप्ती करून जाहीर लिलाव करायचे आणि येईल त्या किमतीला हर्रास करून विकूनही टाकायचे. कर्ज मागायचे असेल तर अधिकाऱ्यांना पार्टी दिल्याशिवाय कर्जमंजुर होत नव्हते आणि कर्जफेडीसाठी महिनाभराची मुदत वाढवून मागायची असेल तर कोंबडीच्या तंगडीचा नैवद्य दाखवल्याशिवाय मुदतवाढ मिळत नव्हती. एकंदरीत "पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा" असा सर्रास प्रकार चालायचा. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय घाट्याचा झाला की भांडवली तूट भरून निघत नाही आणि शेतीवर कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे प्रयत्न करूनही, प्रामाणिकपणे शेती करूनही, कर्जफेड करणे शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते. शेतमालाला भाव द्यायला सरकार तयार नव्हते, मात्र शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली पाहिजे म्हणून सक्तीची कर्ज वसुली करणे हा त्या काळातील नेहमीच फंडा असायचा. मी नागपूर येथील एका प्रतिष्ठित दैनिकाचा पत्रकार असल्याने मी त्या काळात सविस्तर बातम्या लिहून प्रकाशित केल्या होत्या आणि शक्य त्या पद्धतीने हा प्रश्न चव्हाट्यावर आणायचा प्रयत्न केला होता.

            सक्तीची कर्जवसुली हा ज्वलंत प्रश्न असण्याच्या काळातच शेतकरी संघटनेचा एक शेतकरी मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात शरद जोशींनी "राजकीय पुढाऱ्यांना आणि कर्ज वसुली अधिकाऱ्यांना गाव बंदी" असा एक कार्यक्रम दिला होता. हा कार्यक्रम आपल्या गावात आपण राबवायचाच असा मी निर्धार केला. अंकुश भोयर, स्व. बाबा कातोरे, अशोक कातोरे, प्रभाकर उगेमुगे, अशोक धात्रक, राजू उगेमुगे या सहकाऱ्यांच्या मदतीने गावात संघटना स्थापन केली. शेतकऱ्यांसोबत बैठका केल्या. शरद जोशी काय म्हणतात ते शेतकर्‍यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता गावामध्ये शेतकरी संघटनेच्या रूपाने एक तरुणांची फौज तयार झाली. फौज तयार झाली पण काम काहीच नव्हते म्हणून मग आम्ही गावात भिंती रंगवणे, आजूबाजूच्या गावात जाऊन शेतकरी संघटनेचा विचाराच्या प्रचारार्थ छोट्या छोट्या बैठका घेणे असे कार्यक्रम सुरू केले. त्या काळात आम्ही तसे नवखे आणि अनुभव शून्य पण सळसळत्या रक्ताचे नवतरुण होतो. गावबंदी कशी करायची, त्याचा शेवट काय होईल, याचा विचार करायची जराशी सुद्धा गरज न वाटणारे आणि परिणामाची चिंता न बाळगणारे. 

            एक दिवस आम्ही सहज गप्पा मारत चौकात बसलो असताना काही शेतकरी पोरं धावत आमच्याकडे आली आणि म्हणाली की, बँकेचे कर्जवसुली अधिकारी गावात येऊन उत्तम देशकर यांच्या पत्नीला अर्वाच्य शिवीगाळ करत आहेत. हे ऐकताच आम्ही खाडकन उभे झालो आणि घटना स्थळाच्या दिशेने पळत सुटलो. तिथले दृश्य बघून मी अवाकच झालो. तो बँकेचा वसुली अधिकारी त्या शेतकऱ्याच्या पत्नीला "आत्ताच्या आत्ता आता कर्ज भर" असा हुकूम सोडत होता. 
"साहेब, अजून आमचे कापूस बोंड मार्केटला गेले नाही, घरात अजून पैसा आला नाही, आम्ही कर्ज भरावे कसे? कापूस विकला की कर्ज भरतो" अशी ती शेतकऱ्याची पत्नी गयावया व विनंती करत होती.  
"तुम्हाला मुलीचे लग्न करायला पैसे सापडतात, नातेवाइकांच्या तेरवीला जायला पैसे सापडतात, दारू प्यायला पैसे सापडतात, लुगडे घ्यायला पैसे सापडतात, मात्र बँकेचे कर्ज भरायला पैसे सापडत नाहीत, तुम्ही आत्ताच्या आत्ता कर्जाची रक्कम भरली पाहिजे" असा तो  उर्मट अधिकारी हुकूम सोडत होता.
            कर्जाचा हप्ता म्हणून भरायला काहीही रक्कम घरात नसल्याने तो शेतकरी हतबल होता पण अधिकारी मात्र काहीच ऐकून घेत नव्हता. शेवटी म्हणाला की, मी तुमच्या घरातली भांडीकुंडी जप्त करणार आहे आणि त्याने लगोलग आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला की भांडीकुंडी घराबाहेर काढा. त्याचे सहकारी लगेच घरात घुसले आणि त्यांनी घरातील  गुंड, ताट, वाट्या ,कोपरा, अशी स्वयंपाकाची भांडी गोळा करून रस्त्यावर आणून टाकली. अधिकाऱ्याने लगेच कागद लिहिला. त्यावर या सगळ्या भांड्यांचे वर्णन आणि जप्तीचा आदेश लिहून त्यावर स्वाक्षरी करून शेतकऱ्याच्या हातात ठेवला. आम्ही अगदी सौम्य भाषेत त्या वसुली अधिकाऱ्यांना विचारले की, साहेब! आता या भांड्यांचे काय करणार आहात? तर तो अधिकारी म्हणाला "ही भांडी आम्ही जप्त करून घेऊन जाणार आणि हिंगणघाट  बँकेचे ऑफिस समोर लिलाव करणार." स्वयंपाकाच्या भांड्यांचा जाहीर लिलाव हे ऐकताच आम्ही संतापलो, आमची वानरसेना संतापली आणि रस्त्यावर आणलेली सर्व भांडी आम्ही परत शेतकऱ्याच्या घरात नेऊन ठेवली. हे बघून तो अधिकारी आणखी चिडला आणि म्हणाला "मी तुम्हाला पाहून घेतो, जेलची हवा दाखवतो, तुम्हाला सहा महिन्यासाठी जेलमध्ये घातलं नाही तर मी नावाचा घोरपडे नाही." स्वाभाविकपणे मग आमची त्या अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. मग ते घर सोडून अधिकारी पुढच्या कर्जदार शेतकऱ्याकडे जायला निघाले. आम्ही त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे जात होतो. ते  शेतकर्‍याच्या घरी घुसून त्याच्या घरातली भांडी काढून रस्त्यावर आणत होते आणि जप्तीची प्रक्रिया पूर्ण झाली की ती भांडीकुंडी आम्ही उचलून परत शेतकऱ्याच्या घरात व्यवस्थित नेऊन ठेवत होतो. असे दहा-बारा घरी झाल्यानंतर सरतेशेवटी ते निघून गेले.

          आम्हाला वाटले की ते निघून गेलेले आहेत, म्हणून आम्ही सर्व एका शेतकऱ्याच्या घरासमोर शांतपणे ''आता पुढे काय होईल" याविषयी चर्चा करत बसलो होतो. तितक्यात पुन्हा बातमी मिळाली की तो अधिकारी आणि त्यांचे सहकारी गावाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन जप्तीची कारवाई करत आहेत. आम्ही लगबगीने त्या दिशेने निघालो. आम्ही पोहचेपर्यंत त्यांनी रामकृष्ण खाडे यांच्या घरात घुसून त्यांच्या घरात असलेला एकमेव लोखंडी पलंग सर्वांनी मिळून बाहेर आणला होता पण या वेळेस मात्र त्यांनी पलंग रस्त्यावर ठेवला नाही. सहा जणांनी तो पलंग खांद्यावर घेऊन ते त्यांच्या जीपगाडी कडे जायला निघाले होते. आता मात्र थेट संघर्ष अटळ होता. त्यांच्या हातचा पलंग हिसकावून घेणे यापलीकडे दुसरा कुठलाही मार्ग उरला नव्हता. मग आम्ही सगळ्यांनी मिळून वसुली अधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्यांची बर्‍यापैकी धुलाई केली. इतकी धुलाई केली की ते मिळेल त्या दिशेने पळायला लागले. आम्ही त्यांचा पाठलाग करून "वसुली अधिकाऱ्यांना घेऊन जा गे मारबत"  "शेतकरी संघटनेचा विजय असो" "शरद जोशी झिंदाबाद" "शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे" "सक्तीची कर्जवसुली थांबलीच पाहिजे" अशा घोषणा दिल्या आणि तो पलंग परत ज्याचा होता, त्याच्या घरी नेऊन ठेवून दिला. आम्ही सर्व त्या काळात नवथर म्हणजे वय वर्षे १५ ते २२ वयोगटाचे होतो, आम्हाला तशी कसलीच व्यावहारिक जाण नव्हती. आम्ही वसुली अधिकाऱ्यांशी जसे वागलो ते योग्य की अयोग्य, त्याचे दुष्परिणाम काय होतील, याचा विचार करण्याची सुद्धा आम्हाला त्या वेळेस गरज वाटली नाही. अधिकारी पळून गेले, आपला विजय झाला, आता हे सगळं प्रकरण संपलं आहे, असा काहीसा स्वतःचा ग्रह करून आम्ही सर्वच्या सर्व वानरसेनेसह घरी परतलो आणि गप्पा हाकत बसलो. 

        तितक्यात आजनगाव पोलीस स्टेशनची पोलीस व्हॅन आली. पोलीस निरीक्षक विकास देशकर आणि त्यांच्यासोबत पंचवीसेक पोलिसांचा ताफा. विकास देशकर झपाझप पावले टाकत आमच्या दिशेने आला आणि म्हणाला, 

"गंगाधर मुटे कोण आहे?" 
"मी आहे साहेब!"  मी उभा झालो आणि अदबीने म्हणालो.
विकास देशकरने माझा हात धरला आणि अक्षरशः ओढत न्यावे तसे ओढत नेऊ लागला. 
"साहेब! मी स्वतःहून तुम्ही म्हणाल तिथे यायला तयार आहे, माझा हात सोडा, मला सन्मानाने चालू द्या.”  पण एका सामान्य शेतकरी पुत्राचे ऐकेल तो पोलिस अधिकारी कसला? या पोलीस निरीक्षकाने मला बाजारओळी पर्यंत ओढत न्यावे त्या स्टाइलनेच नेले. गावातील लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक खच्चीकरण करणे हा त्याचा प्रयत्न असल्याचे माझ्या लक्षात आल्याने आता माझे डोके तापायला लागले होते. जी काही कायदेशीर सजा होईल ती आनंदाने भोगायची माझी आनंदाने तयारी होती. पण अशी वर्तणूक सहन करण्यापलीकडे होती पण नाईलाज होता.
बाजारओळीतील चौकात गेल्यानंतर देशकर मला म्हणाला,

"या वसुली अधिकाऱ्यांची माफी माग" 
"साहेब, मी माफी मागावी असा कोणताही गुन्हा मी केलेला नाही" मी म्हणालो आणि तो कर्ज वसुली अधिकारी शेतकरी महिलेशी कसा वागला, हे सांगण्याचा प्रयत्न करू लागलो. पण तो मला बोलूच देत नव्हता. माझे काहीही न ऐकताच तो म्हणाला..
"आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस. चल माफी माग" या वेळेस त्याचा स्वर मग्रुरीपूर्ण आदेशात्मक होता.
"मी गुन्हा केलेला नाही आणि मी माफी मागणार नाही" मग मी सुद्धा तितक्याच धीटपणे उत्तर दिले.

हे ऐकताच त्या पोलीस निरीक्षकाचा पारा चढला आणि त्याने खाडकन माझ्या कानशिलात ठेवून दिली. हा क्षण माझ्यासाठी नक्कीच अनपेक्षित होता. आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल, याचा अंदाज आला होता पण आपल्या अंगावर हात टाकला जाईल, याची मी यत्किंचितही कल्पना केली नव्हती. मी आजवर कधी कुणाकडून मार खाल्लेलाच नव्हता. शाळेत त्या काळी शिक्षक विद्यार्थ्यांना झोडून-फोडून काढायचे, पण किरकोळ शिक्षा वगळता मोठ्या शिक्षा मला माझ्या शालेय गुरुजनांनी कधी केल्या नव्हत्या. त्यामुळे हा प्रसंग माझ्यासाठी अत्यंत अनपेक्षित असाच होता. त्यामुळे पुढे जे घडले तेही अनपेक्षित असेच घडले.

ज्याक्षणी पोलीस इन्स्पेक्टरने पूर्ण ताकदीनिशी माझ्या कानशिलात ठेवली त्याच क्षणी.... 
अगदी क्षणाचा विचार न करता... 
मी सुद्धा माझ्या पूर्ण ताकदीनिशी पोलीस इन्स्पेक्टरच्या थोबाडीत ठेवून दिली. 

       आरोपीच्या अंगावर हात घातल्यावर आरोपीसुद्धा उलटटपाली परतफेड करू शकतो.... अशी त्याने आयुष्यात कधीच कल्पना केलेली नसणार. तो पूर्णतः बेसावध असल्याने त्याला मला अडवायची संधीच मिळाली नाही. डोक्यावर हॅट असल्याने कानशिलाचा भाग झाकलेला असला तरी गुबगुबीत गालाचा मलईयुक्त प्रदेश हिरव्यागार मैदानासारखा सताड मोकळा होता. त्याचा फायदा मी उचलला आणि पाचही बोटे उमटतील अशी झापड त्याच्या गालधरून ठेवून दिली.

            त्यांनंतर पुढे जे झाले ते पाहण्याच्या अवस्थेत मी नव्हतो. कारण आता पोलिसांचा पूर्ण ताफाच सक्रिय झाला होता. पावसात गेल्यानंतर जसे एकाच वेळी पाचपन्नास टपोरे थेंब अंगावर पडताना जाणवतात तसेच माझ्या सर्वांगावर पाच-पन्नास लाठ्यांचा भडिमार एकाचवेळी होत आहे असे जाणवत होते. प्रतिपक्षाला पुन्हा संधी मिळू नये म्हणून जशी व्यूहरचना केली जाते तशीच व्यूहरचना बहुधा त्यांनी केली असावी. दहावीस मांजरींनी मिळून उंदीर पकडावा तसे त्यांचे मला पकडणे, उचलणे, गाडीत कोंबणे ...... वगैरे वगैरे.

         घटना घडत असताना सारा गाव तिथे गोळा झाला होता. शेतकरी संघटनेच्या घोषणांनी आसमंत दुमदुमत होता. शेतकरी संघटनेच्या घोषणांमध्ये आता आणखी ''पोलीस खाते मुर्दाबाद" "पोलिसांची दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही" यासारख्या घोषणांची आणखी त्यात भर पडली होती. ज्या सफाईने गाडीत बसून शिताफीने व लगबगीने पोलिसांनी गाडी तिथून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, गाडीत ज्या तऱ्हेने सर्व "पोझिशन" घेऊन बसले होते, त्यावरून गावकरी विरुद्ध पोलीस असा संघर्ष उभा राहतो की काय, अशी भीती बहुधा पोलीस खात्याला वाटली असावी, असे जाणवले. मला घेऊन पोलीस व्हॅन पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झाली. गाडी चालत असताना माझ्या अंगावर किती वळ उमटले असतील, लाठ्या किती आणि कुठे कुठे बसल्या असतील याचा अजिबात विचार माझ्या डोक्यात आल्याचे मला आठवत नाही. माझ्या डोक्यात तेव्हा फक्त एकच विषय घोळत होता.... तो म्हणजे आपण थोबाडात कशी हाणली. तेच दृश्य शौर्य रूपाने माझ्यासमोर वारंवार दृष्टिपटलावर येत होते आणि मी माझ्या स्वतःच्या शौर्यात इतका मशगुल झालो होतो की अजूनपर्यंत माझ्या वेदनांनी डोके वर काढायला सुरुवातच केलेली नव्हती. ठाण्यात पोचताक्षणी मला पोलीस कस्टडीत कोंबले गेले... आणि कस्टडीला बाहेरून कुलूप लागले. एखादा कुख्यात दहशतवादी कस्टडीत कोंबताना व्हावे तसे त्यांचे वर्तन होते पण मी पाणी मागताच मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्याने पाणी मागितल्यावर करावी तशी धावपळ करून त्यांनी माझ्यासाठी पाणी आणले. मला पाणी दिले आणि पुढील कारवाईला लागले. मला जिथे ठेवले ती कस्टडी अगदीच मोक्यावर असल्याने त्यांचे सर्व कामकाज मला दिसत होते.

         वसुली अधिकाऱ्याच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंतची कारवाई केली होती. त्यामुळे "लेखी तक्रार तातडीने द्या" असे वसुली अधिकाऱ्याला सांगण्यात आले. वसुली अधिकाऱ्याने माझ्याकडे पहिले आणि नजरानजर होताच त्याला दरदरून घाम फुटला. रिपोर्ट लिहिताना त्याचे हात थरथरत होते. कोणत्याही स्थितीत सहा महिने जमानत मिळता कामा नये, यासाठी कोणकोणती कलमे लावावी, याचा सर्वांनी सामूहिक विचार करून माझ्यावर गुन्हा नोंद करून ३५३ हे अजामीनपात्र आणि आणखी ४ अन्य कलम लावण्यात आले. वसुली अधिकाऱ्याला तिथून निसटण्याची घाई असल्याने घाईगडबडीत रिपोर्ट लिहिल्या गेल्याने त्यात बऱ्याच चुका झाल्या आणि त्याच धबडग्यात वसुली अधिकारी व सहकाऱ्यांचे मेडिकल करणे पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असूनही राहून गेले. 

         या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरावी अशी त्या काळात कोणतीच साधने आमच्या गावात उपलब्ध नव्हती. न मोबाईल, न फोन, ना बाइक, ना फोरविलर. होती ती फक्त सायकल. आमची पोलीस व्हॅन गावावरून निघाली तेव्हा त्याच वेळी माझे सवंगडी सहकारी सायकली घेऊन हिंगणघाटच्या दिशेने रवाना झाले होते. एक टीम आमदार डॉ. बोंडे यांचेकडे तर दुसरी टीम शेतकरी संघटनेचे कणखर नेते गिरधर राठी यांच्या घरी पोचली. हिंगणघाटला आमदार डॉ. बोंडे, गिरधर राठी, प्रा. मधुकर झोटिंग, प्रा. शेषराव येरलेकर, डॉ. जवादे आणि अन्य सहकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. पुढे काय करावे याविषयी विचार विमर्श करण्यात आला. ही मंडळी तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात पोहोचले पण कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी हजर नव्हते. कळले की ते कुठे तरी लग्नात गेले आहे. मग ही मंडळी लग्नाच्या दिशेने रवाना झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी यांना सर्व प्रकार सांगितला आणि या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आजनगाव पोलीस स्टेशनला चालावे असा आग्रह धरला. पण अधिकारी काही केल्या ऐकेचना. मग गिरधर राठी यांनी तंबीच दिली की तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ पण जर का प्रकरण हाताबाहेर गेले आणि तिथे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्व जबाबदारी तुमची राहील. मग मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ही सर्व मंडळी त्यांना घेऊन आजनगावला आली. माझ्या सुटकेची मागणी केली तर ठाणेदार म्हणाले आरोपीवर ३५३ व अन्य ४ कलमे रजिस्टर झालेले आहेत. येथे जमानत देता येणार नाही. तुम्ही उद्या न्यायालयात आपली बाजू मांडा आणि जमानतीसाठी प्रयत्न करा. गुन्हा संगिन असल्याने सहा महिन्यापर्यंत जामीन मिळणे अशक्य आहे, असेही ते म्हणाले. ठाणेदाराची उर्मट भाषा ऐकून शेतकरी संघटनेचे नेते संतापले.

डॉ. बोंडे म्हणाले "आत्ताच्या आत्ता आमचा कार्यकर्ता सोड नाहीतर मी तुझी पॅंट सोडतो आणि तुला कस्टडीत कोंबून आमचा कार्यकर्ता बाहेर काढतो" 
गिरधर राठी म्हणाले "जास्त शहाणपणा करशील तर कुलूप फोडून आम्ही आमचा कार्यकर्ता बाहेर घेऊन जाऊ आणि पोलीस स्टेशन पेटवून देऊ"
तोपर्यंत पोलिस स्टेशन बाहेर सुमारे तीन हजार लोकांचा जमाव गोळा झाला होता. तणाव वाढत होता. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे लक्षात येताच एसडीपीओ श्री सारंगी साहेबांनी एसपी साहेबांसोबत फोनवरून संभाषण केले. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तणाव वाढू नये, अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आरोपीला विनाशर्त सोडून देणे आवश्यक असल्याचे एसपींना त्यांनी पटवून दिले. सरतेशेवटी ठाणेदाराला नमते घ्यावे लागले आणि माझी विनाशर्त सुटका करण्यात आली. 

            कर्जवसुली अधिकाऱ्याला कर्जवसुली करण्यापासून मज्जाव करणे, त्याला अडवणे आणि कर्ज वसुलीचा डाव उधळून लावणे हा शेतकरी संघटनेच्याच नव्हे तर शेतीच्या इतिहासातील हा पहिला अध्याय आणि मैलाचा दगड असण्याची शक्यता आहे. कदाचित सृष्टीच्या उगमानंतर समग्र शेतीच्या इतिहासातील हे पहिलेच आंदोलन असण्याची शक्यता आहे. त्याच आंदोलनाने राज्यभर वसुली अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले. तेव्हापासून पुढे कालांतराने सक्तीची कर्ज वसुली हा प्रकार कमी होत गेला आणि आता तर औषधालाही उरला नाही. नवीन पिढीला आज हे सुद्धा ज्ञात नसेल की ३० वर्षांपूर्वी इतक्या कठोर पद्धतीने शेतीची कर्जवसुली केली जात होती.

         दुसऱ्या दिवशी हिंगणघाट येथे पोलीस कारवाईच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला आणि सक्तीची कर्ज वसुली थांबवा ही मागणी करण्यात आली. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा व्यक्तिगत स्वरूपाचा होता आणि तो सरकार परत घेणार नाही याची आम्हाला जाणीव होती. त्यामुळे न्यायालयीन लढा लढण्याशिवाय अन्य काही पर्याय नव्हता. माझ्या विरोधात न्यायालयात सहा वर्षे खटला चालला. बँकेच्या बाजूने पूर्ण ताकदीनिशी केस लढवण्यात आली. माझ्या विरोधात पुरावे सुद्धा भक्कम होते परंतु बँक अधिकाऱ्यांनी तक्रार लिहिताना अक्षम्य चुका केल्याने तसेच माझ्या वकिलांनी बाजू पद्धतशीर व भक्कमपणे हाताळल्याने  या प्रकरणातून माझी निर्दोष मुक्तता झाली. 
       शेतकरी संघटनेचे कार्य करताना एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की पोलीस कारवाई झाली किंवा न्यायालयीन केसेस झाल्या तरी या केसेस प्रत्येक कार्यकर्त्याला आपआपल्या बळावरच स्वतःच्या ताकतीने आणि स्वतःच्या खर्चाने लढाव्या लागत असतात. शेतकरी संघटनेकडे कुठलाही निधी नसल्याने त्यावर अन्य काही पर्याय नाही. शेतकरी संघटनेत आजपर्यंत जेवढ्या पोलीस कारवाया अथवा न्यायालयीन कारवाया झाल्या आहेत त्या सर्व केसेस शेतकऱ्यांनी आपापल्या खर्चाने व स्वतःच्या ताकतीने न्यायालयात लढवलेल्या आहेत. शेतकरी संघटनेला राज्यभर असे कार्यकर्ते मिळालेत हेच शेतकरी संघटनेचं खास वैशिष्ट्य आणि वैभव आहे

- गंगाधर मुटे 
(टीप : संबंधितांच्या खाजगी आयुष्यातील हितसंबंधांना बाधा येऊ नयेत म्हणून काळ, वेळ, स्थळ आणि नावे बदलण्यात आलेली आहेत.)

Sep 12, 2019

मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)

मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)

                  सोलापूर दिव्यभारतीचे वरिष्ठ उपसंपादक श्री सिद्धाराम भै. पाटील यांनी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा अभ्यास क्रमाचा एक भाग म्हणून थेसिस सबमिट करण्यासाठी 'मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास' या विषयावर लघुशोधनिबंध सादर केला. हा लघु शोध निबंध 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठाला त्यांनी सादर केला आहे. जिज्ञासूंसाठी हा लघुशोधनिबंध येथे उपलब्ध करून देत आहे. त्यांनी संशोधनाकरीता निवडलेल्या १४ ब्लॉग्जमध्ये माझ्या "रानमोगरा - माझी वाङ्मयशेती" या ब्लॉगचा समावेश आहे. 

      - गंगाधर मुटे
-------------------
PDF स्वरूपात वाचण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
-------------

Aug 25, 2019

गणपतीची आरती

गणेश

 

गणपतीची आरती

जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥

वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥

पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥

तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझे लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥

        - गंगाधर मुटे "अभय"
.........................................................Jul 23, 2019

पोळ्याच्या झडत्या

पोळ्याच्या झडत्या 

           पोळा म्हणजे शेतकर्‍याचा मोठा सण. या दिवशी बैलांची शिंगे रंगवून,बेगड लावून बैलांना सजविले जाते. या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिले जात नाही. कामाला अजिबात जुंपले जात नाही.
मग पोळा भरवून बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मग सुरू होतात खड्या आवाजातील झडत्या.
“एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!” चा एकच जल्लोष होतो.

त्यापैकी काही गाणी झडत्या संकलीत करून येथे द्यायचा प्रयत्न करणार आहे.
…………………………..

पोळ्याच्या झडत्या… (१)
चाकचाडा बैलगाडा,
बैल गेला पवनगडा
पवनगडाहून आणली माती
थे दिली गुरूच्या हाती
गुरूने बनविली चकती
दे माझ्या बैलाचा झाडा
मग जा आपल्या घरा
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
*******
पोळ्याच्या झडत्या… (२)
आभाळ गडगडे,
शिंग फ़डफ़डे
शिंगात पडले खडे
तुझी माय काढे
तेलातले वडे
तुझा बाप खाये पेढे .
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!

*******

पोळ्याच्या झडत्या… (३)


गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा
वरच्या राणातून आणली माती
ते देल्ली गुरूच्या हाती
गुरूनं घडविला महानंदी
ते नेला हो पोळ्यामंदी,

एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
*******

पोळ्याच्या झडत्या… (४)

बळी रे बळी लिंब बनी
अशी कथा सांगेल कोणी
राम-लक्ष्मण गेले हो वनी
राम-लक्ष्मणाने आणली वनफुले
ते दिले महादेव पारबतीच्या हाती
तीनशे साठ नंदी
एक नमन गौरा.. महादेव..!

*******

पोळ्याच्या झडत्या… (५)
चक चावळा, बैल पावळा
बैल गेले हो पोंगळा.
पोंगळ्याची आणली माती,ते देली हो अंबाणीच्या हाती.
अंबानीन घडवला हो मोदी नंदी.
त्या मोडीनंदी न  केली हो नोटबंदी
त्या नोटबंदी आणली हो मंदी.
एक नमन कवडा-पारबती हर बोला हर हर महादेव.
*******

पोळ्याच्या झडत्या… (६)

घुटी रे घुटी, आंब्याची घुटी !!
मुख्यमंत्र्यान देल्ली हो, कर्ज माफीची ‘‘जडीबुटी’!!
त्या जडी बुटीले, आरा ना धुरा !!
मुख्यमंत्री साहेब, ‘भिक नको हो, कुत्र आवरा !!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
*******

पोळ्याच्या झडत्या… (७)
पोई रे पोई,, पुरणाची पोई !!
मुख्यमंत्र्यान देल्ली हो,
कर्ज माफीची गोई !!
त्या गाईले चव ना धव, 
कास्तकाराचं आस्वासनात,मराच भेव!!
रकुन आला कागुद, तीकुन आला कागुद,
आश्वासनावर,कास्तकार बसला
जिवमुठीत दाबून !!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
*******

पोळ्याच्या झडत्या… (८)
वसरी रे वसरी, शम्याची वसरी,
पयलीले लेकरू, नाई झाल, 
मनुन श्यान ‘केली होदुसरी’ !!१!!
दुसरीच्या लग्नात वाजवला बीन,
जनता डोल्ली, म्हणे हो ‘आयेगे अच्छे दिन’ !!२!!
इकास जन्माले याची ‘वाट पाहून रायली जनता’
सरकारण देल्ला हो, ‘नोट बंदीचा दनका’ !!३!!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
*******

पोळ्याच्या झडत्या… (९)
पोया रे पोया, यवत्याचा पोया
आत्महत्ये पाई लागला हो.. काया टिया !! १!!
काया मातीत टोब तो बीया, 
तूर घेणारे घालतात हो.. आम्हाले शिव्या !! २!!
शिव्या घालणारे, खातेत आमच काय बिघडवल हो..
आम्ही तुमच !! ३!!
घामाचा पैसा, मागतो आम्ही 
थंड हवेत बसता हो.. तुम्ही !! ४ !!
घाम गाऊन पिकवतो शेती
नांदी लागाल तर होईल माती !! ५!!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
*******

पोळ्याच्या झडत्या… (१०)
वाटी रे वाटी
खोबऱ्याची वाटी,
शेतकरी लढे जन्मंभर
रास्त भावासाठी
एक नमन गौरा.. महादेव..!

*******

पोळ्याच्या झडत्या… (११)
अभाय गडगडे शिंग फडफडे
जो तो जाये काँन्वेंटकडे
मराठी वाचतानी अडखडे..
तरी त्याचं ध्यान इंग्रजीकडे

अगाऊ कामानं मास्तर होये वेडे
त्यायलेच पहा लागते खिचडीतले किडे.....

कोणत्याही कामात मास्तरलेच ओढे....        
बिना कामाच्या कामानं मोडे कंबरडे....
एक नमन गौरा पारबती हरबोला महादेव.

*******

पोळ्याच्या झडत्या… (१२)

 चकचाडा बैलबाडा बैल गेला हो पहुनगडा,
 पहुनगड्याची आनली माती
ती दिली हो गुरुच्या हाती
गुरु न घडविला हो नंदी,
साजुन भाजुन भर सभेत उभा केला
पुढुण दिसते हिरवा पिवळा
मागुन दिसते हो नितनवरा,
चक्करशोभ्या मंधी
बैल तोरणामंधी
द्याहो आमच्या चौऱ्यामटाट्याचा झाडा
मग जा आपल्या घरा
एक नमन गौरा पार्वती हरभरा महादेव

*******

पोळ्याच्या झडत्या… (१३)
पोया रे पोया
बैलाचा पोया
तुरीच्या दायीन
मारला हो डोया
कांद्यान आमचे
केले हो वांदे
ऊसावाला बाप
ढसा ढसा रडे
एक नमन कवडा पार्वती हर बोला हर हर महादेव!!!!!
*******

पोळ्याच्या झडत्या… (१४)

पोळा रे पोळा 
पाऊस झाला भोळा
शेतकरी हीता साठी 
सगळे व्हा गोळा.
*******

पोळ्याच्या झडत्या… (१५)

वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी,
महादेव रडे दोन पैश्यासाठी,
पार्बतीच्या लुगड्याले छप्पन गाठी,
देव कवा धावल गरिबांसाठी,
एक नमन गौरा पर्बती हरबोला हर हर महादेव.......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
: संकलन साहाय्य :

श्री ज्ञानेश्वर चौधरी, हिंगणघाट
श्री राजेश रेवतकर
श्री पांडुरंग भालशंकर, वर्धा
श्री संदीप अवघड, अमरावती  

श्री पद्माकर शहारे, आर्वी छोटी, हिंगणघाट  
श्री नरेश नरड, आर्वी छोटी, हिंगणघाट  
श्री अच्युत रसाळ, परभणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Jun 6, 2019

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

पाहता पाहता काय झाले असे?
माकडांच्या पुढे नाचली माणसे!

या हवेला कुणाची हवा लागली?
चित्त कामामध्ये ना तिचे फारसे

त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे
मेघही वागती की पगारी जसे

नित्य येणे तिचे वादळासारखे
मग लपावे हृदय हे कुठे नी कसे?

व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती
तू अभय बोल तू, तू हवे तू तसे

              गंगाधर मुटे 'अभय'
==०==०==०= =०==०==०==

May 6, 2019

Ek Hasina Thi (Karz) On Keyboard - Gangadhar MuteEk Hasina Thi (Karz) On Keyboard By Gangadhar Mute
एक हसीना थी, एक दिवाना था (कर्ज)
केवळ छंद.... केवळ आनंदासाठी
खास माझ्या मित्र परिवारासाठी.....

Apr 4, 2019

५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत : पुरस्कार वितरण-समारोप

५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत :   पुरस्कार वितरण-समारोप

स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण 
दिनांक : २ व ३ फेब्रुवारी २०१९

   सारस्वतांच्या स्वागतासाठी सज्ज  प्रवेशद्वार 

प्रवेशद्वार

*****
 लक्षणीय उपस्थिती 

पुरस्कार वितरण

*****
  महिलांची लक्षणीय उपस्थिती

पुरस्कार वितरण

*****
 पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
   पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
 पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
   पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
   पुरस्कार वितरण  
पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण  
पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण  
पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****

   पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण 
पुरस्कार वितरण

*****
   पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण  
पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण  
पुरस्कार वितरण

*****
 पुरस्कार वितरण  
पुरस्कार वितरण

*****
 पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
   पुरस्कार वितरण 
पुरस्कार वितरण

*****
   पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
   पुरस्कार वितरण  
पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
 पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण
पुरस्कार वितरण

*****
पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
 पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
 पुरस्कार वितरण  
पुरस्कार वितरण

*****
पुरस्कार वितरण

*****
  पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण

*****
  समारोप समारंभ

पुरस्कार वितरण

*****
  समारोप समारंभ

पुरस्कार वितरण

*****
 समारोप समारंभ

पुरस्कार वितरण

*****
  समारोप समारंभ

पुरस्कार वितरण

*****
 समारोप समारंभ

पुरस्कार वितरण

*****
 समारोप समारंभ

पुरस्कार वितरण

*****
 समारोप समारंभ

पुरस्कार वितरण

*****
  समारोप समारंभ 

पुरस्कार वितरण

*****
 विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र

पुरस्कार वितरण

*****
  विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र 

पुरस्कार वितरण

*****
  विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र

पुरस्कार वितरण

*****
  विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र 

पुरस्कार वितरण

*****
   विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र

पुरस्कार वितरण

*****
   विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र

पुरस्कार वितरण

*****
  विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र

पुरस्कार वितरण

*****
 विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र

पुरस्कार वितरण

*****
 विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र

पुरस्कार वितरण

*****
 विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र

पुरस्कार वितरण

*****
 विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र

पुरस्कार वितरण

*****
 विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र

पुरस्कार वितरण

*****
 विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सन्मानपत्र

पुरस्कार वितरण

*****

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं