Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Apr 30, 2013

मरणे कठीण झाले


मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले

एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले

दिसतात "अभय" येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठीण झाले

                                           - गंगाधर मुटे
------------------------------------------------------
मरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल
------------------------------------------------------
Chandrapur
------------------------------------------------------
Chandrapur
------------------------------------------------------

Apr 25, 2013

नाटकी बोलतात साले!

नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे

मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे

                                                   - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------
बटू वामन - शेतकर्‍यांना आत्महत्तेस बाध्य करून पाताळात गाडणारे सर्व सत्ताधारी म्हणजे बटू वामनाचेच वारस होय.
बटू वामन हा हिंदूचा देव आणि त्यावरच मी फक्त टीका केली आहे असे समजून हिंदूव्देष्ट्यांनी निष्कारण हुरळून जाऊ नये. कारण सर्वच धर्मांनी शेतकर्‍याला पाताळात गाडण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही, यावर माझा प्रगाढ विश्वास आहे. एका शेरात सर्वच धर्माच्या प्रेषितांचा उद्धार करणे मला शक्य नसल्याने अपरिहार्यतेपोटी मी ’दुधाची तहान ताकावर’ या न्यायाने केवळ वामनाचाच उल्लेख करू शकलो, याची मला जाणीव आहे.

तसा मी आस्तिक, बर्‍यापैकी धार्मिक आणि देवपूजकही आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Apr 16, 2013

विद्यापिठाच्या Thesis मध्ये माझी वाङ्मयशेती


मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)

                  सोलापूर दिव्यभारतीचे वरिष्ठ उपसंपादक श्री सिद्धाराम भै. पाटील यांनी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा अभ्यास क्रमाचा एक भाग म्हणून थेसिस सबमिट करण्यासाठी 'मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास' या विषयावर लघुशोधनिबंध सादर केला. हा लघु शोध निबंध 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठाला त्यांनी सादर केला आहे. जिज्ञासूंसाठी हा लघुशोधनिबंध येथे उपलब्ध करून देत आहे. त्यांनी संशोधनाकरीता निवडलेल्या १४ ब्लॉग्जमध्ये माझ्या "रानमोगरा - माझी वाङ्मयशेती" या ब्लॉगचा समावेश आहे. 
                                                                                                               - गंगाधर मुटे

PDF स्वरूपात वाचण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
---------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------

PDF स्वरूपात वाचण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Apr 2, 2013

मी मराठी - स्पर्धा विजेती गझल

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?


किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!

                                                                               गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------
कविता/गझल                                                    वृत्त - सुमंदारमाला
लगावली - लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा
----------------------------------------------------------------------------

                   १ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट (http://www.mimarathi.net) ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी प्रवेशिका भाग घेतला होता.

                  या स्पर्धेचा दि. १० सप्टेंबर २०११ रोजी निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत माझी वरील कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? ही  कविता प्रथम क्रमांक विजेता ठरली होती.

             दुरवर ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या माझ्यासारख्या  एका शेतकरी माणसाची कविता पुरस्कृत करून माझ्यामध्ये या स्पर्धेने एक नवा आत्मविश्वास जागविला आहे.

             त्याबद्दल  माझ्या कवितेला व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या या आंतरजालीय विश्वाच्या निर्मात्याला, संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मराठीचे मालक या नात्याने राज जैन यांना,  ज्येष्ठ पत्रकार-लेखक-गझलकार असलेले परीक्षक श्री प्रदीप निफाडकर यांना,  तसेच

            माझ्या कवितेला फुलविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या तमाम आंतरजालावरील प्रतिसादकांना
मी मन:पूर्वक अभिवादन करतो. :)

                                                                                                                         - गंगाधर मुटे
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं