Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Mar 28, 2020

कोरोनावर प्रभावी प्राणायाम? - भाग १०

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग १०
कोरोनावर प्रभावी प्राणायाम?

वैद्यकशास्त्र कुठलेही असो, अद्ययावत-आधुनिक असो किंवा परंपरागत चालत आलेले पण पुढे अविकसित राहिलेले वैद्यकशास्त्र असो; हृदयाच्या गतीला वैद्यकीयशास्त्रात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. दर मिनिटाला हृदयाची किती ठोके पडतात यावरून माणसाच्या आजाराचे निदान करण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आजही वैद्यकीयशास्त्रात कायमच आहे आणि भविष्यातही कायमच राहणार आहे कारण हृदयाची गती जितकी नीट असेल तितकेच आरोग्य सुदृढ असते.

हृदयगती बिघडल्यानंतर आरोग्य बिघडते कि आरोग्य बिघडल्यानंतर हृदयगती बिघडते, या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे व्यक्तिसापेक्ष असू शकते पण आरोग्याचा संबंध हृदयगतीशी आहे, हे मात्र शाश्वत असल्याचे स्वीकारायलाच हवे पण सहसा असे होत नाही. मनुष्य कोणताही असो तुरळक प्रसंग सोडले तर डोक्याने विचार करतच नाही. कधी हृदयाने तर कधी खिशाने विचार करतो. सारासार विचार करण्याऐवजी कोणतीही एकच बाजू निवडून त्याच बाजूचे पराकोटीचे समर्थन करत राहणे क्षम्य समजता येईल पण आपलीच बाजू सर्वश्रेष्ठ ठरवण्याच्या नादात अन्य बाजू चुकीच्या आहेत असा जेव्हा समज दृढ होतो त्याच बिदूवर मनुष्य आपला विवेक आणि तारतम्य गमावून बसतो. अशा स्थितीत मनाची केवळ काही कवाडे उघडी राहून उरलेली अन्य कवाडे बंद होत जाऊन ज्ञानग्रहणाच्या रेशीमवाटा अवरुद्ध होऊन जातात.

योग आणि प्राणायाम हे अतिप्राचीन वैद्यकीय शास्त्र आहे. या विषयातील मी तज्ज्ञ नसल्याने कोरोनासारख्या विषाणूच्या संसर्गावर प्राणायामाचा कितपत प्रभाव पडेल, हे अधिकारवाणीने सांगू शकत नसलो तरी एक अभ्यास अथवा चिंतन म्हणून यासंबंधातील माझे विचार व अनुभव प्रस्तुत करत आहे. मी दहावर्षापासून प्राणायाम करत असलो तरी नियमित करत नाही. वर्षातून ३६५ दिवसांपैकी अंदाजे ६०-६५ दिवस करत असतो. प्राणायामाला मी वेगवेगळ्या कसोट्यांवर १० वर्षांपासून पारखत आलेलो आहे. श्वसनासंबंधित व्याधी असेल तर प्राणायाम रामबाण इलाज आहे, असा मला प्रदीर्घ अनुभव आला आहे.

मला वर्षातून ३ वेळा सर्दी-पडसा-खोकला होतो. अगदी बालपणासूनच नियमितपणे होतो. त्याचे वेळापत्रकही ठरले आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरु होतो तेव्हा, पावसाळा संपून हिवाळा सुरु होतो तेव्हा आणि हिवाळा संपून उन्हाळा सुरु होतो तेव्हा. पण या वेळापत्रकात मजेशीर बाब अशी आहे कि मला आधी सर्दी होते व नंतर ४-६ दिवसांनी ऋतुबदल होतो. म्हणजे असे कि मला जेव्हा सर्दी होते तेव्हा उन्हाळा सुरु असतो. वातावरणात काहीही बदल झालेला नसतो. पण नंतर ४-६ दिवसांनी वातावरण बदलने सुरु होते, आकाशात ढग जमायला लागतात, पाऊस पडायला लागतो व तापमान कमी व्हायला लागते. बरं ही सर्दी इंग्रजी कॅलेंडर किंवा मराठी नक्षत्रानुसार होत नाही. ऋतूचे आगमन मागे पुढे झाले तर माझी सर्दी सुद्धा त्यानुसार मागे पुढे होत असते. अनुमान असाही काढता येईल कि माझ्या सर्दीवरून संभाव्य वातावरण बदलाच्या तारखा ठरवता येतात. हे ज्याअर्थी मी जाहीरपणे मांडतो आहे त्याअर्थी; कुणी मला आव्हान देऊन सिद्ध करून दाखव म्हटले तर माझी तयारी आहे, हे उघड आहे. मी प्राणायाम करायला लागलो आणि माझी सर्दी-पडसा-खोकला गायब झाला. अजिबात होतच नाही. पण प्राणायाम थांबवले कि सुरु होतो हा मागील अनेक वर्षाचा अनुभव आहे.

कोरोना संसर्ग झाल्यास श्वास घेताना त्रास होतो. प्राणायाम करताना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे जाणवल्यास कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षण मानता येईल. कोरोनाचे प्राथमिक निदान म्हणून प्राणायाम उपयोगी पडू शकतात. किंवा प्राणायाम केल्यामुळे हृदयाची गती व श्वसनसंस्थाच इतकी मजबुतीने कोरोनाचा प्रतिकार करेल कि, संसर्ग होणारच नाही. शक्यता का नाकारावी?

तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे

पण यातही गंमत अशी आहे कि, योग-प्राणायामाचा अभ्यास आणि संशोधन केवळ साधूसंत करतात. यावर अधिक व्यापकपणे संशोधन होण्याची गरज आहे परंतु सामान्य जनतेच्या आयुष्याच्या रेशीमवाटांवर जागोजागी टोलनाके तयार करणे हेच बुद्धिवंत व विचारवंतांचे जीवितकार्य असल्याने योग-प्राणायाम विकून गडगंज संपत्ती मिळवता येत नसेल तर बहुराष्ट्रीय कंपन्यासहित कोणत्याच देशी-विदेशी संशोधकांना हे नको असते .... नकोच असते!

- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १० - दि. २८ मार्च, २०२० - "कोरोनावर प्रभावी प्राणायाम?"

==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Mar 21, 2020

करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच! - भाग ९

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ९
करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच!
सध्या जगभर करोना विषाणूने थैमान घातल्याने पूर्ण जग धास्तावलेले आहे. जनमानस दहशतीखाली आलेले आहे. पण मी मात्र ठामपणे सांगू शकतो की, भारत नावाचा देश करोना नावाच्या विषाणूला अजिबात घाबरलेला नाही आणि घाबरणार नाही. भारतातील माणसे मरणाला भीत नाहीत. 'देह नश्वर आणि आत्मा अमर' ही संतांची शिकवण भारतीय जनमानसावर अजूनही प्रचंड प्रभाव टाकून असल्याने भारतीय माणसे मरणाला भीत नाहीत, अशी प्रचिती आपल्याला क्षणोक्षणी येत असते.

रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, सिग्नल तोडू नये, पुरेशी जागा मिळाल्याशिवाय ओव्हरटेक करू नये, वळणदार घाटाच्या रस्त्यातून वाहनाचा वेग कमी करावा, डोक्यात हेल्मेट घालावे इतके साधे नियम पाळण्यासाठीसुद्धा कायदा करून लोकांना दंडात्मक कारवाईची भीती दाखवावी लागते. भारतीय मनुष्य दंडाच्या भीतीने नियम पाळायला तयार होतो, पण मरणाच्या भीतीने तो नियम पाळायला अजिबात तयार नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती मरणासन्न अवस्थेत पोचते, तेव्हा मरणाच्या भीतीने ती व्यक्ती कधीच कावरीबावरी होत नाही आणि ढसढसा रडतही नाही. अशा क्षणी त्याचे आप्त रडवेले होतात, पण जो मरतो तो मात्र निश्चिंत असतो आणि निश्चिंत मनाने मरणाला सामोरा जातो.

मनुष्य मरणाला घाबरत नाही, पण स्वतःच्या अब्रूला प्रचंड घाबरतो. अब्रू वाचवून आत्मसन्मान जोपासणे त्याचे हेच सर्वस्व आणि आयुष्याचे सार असते. रस्त्याने चालताना पाय घसरून पडला तर तो सर्वात आधी स्वतःची मान ३६० अंशांत फिरवून आपल्याकडे कुणाचे लक्ष तर नाही ना, याचा शोध घेतो. कुठे लागले, पाणी पितोस का, असे लोक त्याला विचारतात, पण पडलेला मनुष्य आपल्याला कुठे काही मार लागला का, हे शोधण्याऐवजी आपल्याला पडताना कुणीकुणी पाहिले, याचा शोध आधी घेत असतो.

मनुष्य मरणाला घाबरत नाही म्हणून रोगालाही घाबरत नाही. परिसर स्वच्छ ठेवा, पाणी उकळून प्या, जेवणाआधी हात स्वच्छ करा, इतकेसुद्धा त्याला जबराईने सांगावे लागते. पण काही रोग मात्र असे आहेत की त्याला तो प्रचंड घाबरतो. उदाहरण म्हणून गजकर्ण, टीबी आणि एड्स या व्याधींची नावे घेता येईल. गजकर्ण, खाज, खरूज झाकून ठेवण्याचा लोकं जीवापाड प्रयत्न करतात. टीबीचा पेशंट 'मला टीबी झाला' हे सांगायला संकोचतो व त्याऐवजी दुसऱ्या कुठल्यातरी रोगाचे नाव सांगतो. याउलट हृदयविकार, कॅन्सरचे पेशंट 'मला हृदयविकाराचा त्रास आहे' असे इतक्या सहज आविर्भावात सांगतात की जणू काही त्याला त्याचा प्रचंड अभिमान आहे.

एड्सबद्दल समाजामध्ये इतके समज-गैरसमज पसरवले गेले आहेत की, एचआयव्हीची बाधा केवळ अनैतिक संबंधातूनच होते असा सार्वत्रिक समज रूढ झाला आहे. त्यामुळे समाज संबंधित व्यक्तीकडे संशयित नजरेने बघतो आणि त्याच्या चारित्र्याला संशयाच्या भोवऱ्यात उभे करतो. वस्तुतः एड्सचा संसर्ग होण्याचे अनैतिक संबंध हेच एकमेव कारण अजिबात नाही. याव्यतिरिक्त अनेक कारणे आजही जाणकारांना माहीत आहेत आणि भविष्यात आणखी शेकडो कारणे सापडतील, पण एड्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी उतावीळपणाच्या जाहिरातबाजीचा एवढा अतिरेक झाला की एचआयव्हीची बाधा केवळ असुरक्षित शरीर संबंधामुळेच होते, असाच सामान्य जनतेमध्ये संदेश गेला.

चारित्र्यसंपन्न व्यक्तीलादेखील चुकीच्या उपचार पद्धतीने किंवा अन्य अनेक कारणामुळे एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो, हे बोललेच गेले नाही. या चुकीच्या जाहिरात पद्धतीचा इतका विपरीत परिणाम समाजावर झाला की, आता एड्स हा शब्दच अश्लील समजून त्या शब्दाचा उच्चारदेखील कुणी खुलेआम न करता लपूनछपून करतात. त्यामुळे आपल्याला असा काही संसर्ग झाला तर आपल्याकडे संशयित नजरेने बघितले जाईल आणि आपण आयुष्यभर मिळवलेला आत्मसन्मान एका झटक्यात धुळीस मिळेल; इतकेच नव्हे तर मरणोपरांतदेखील आपल्याकडे अनादरानेच बघितले जाईल अशा अदृश्य भीतीने लोक धास्तावून आहेत, हे शतप्रतिशत खरे आहे.

जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा
मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा

दोन दिवस जगावे पण आत्मसन्मान राखूनच जगावे, हीच भारतीयांच्या जीवनशैलीची रेशीमवाट असल्याने 'करोनाने तत्काळ मरण हवे की एड्ससहीत शंभर वर्षांचे दीर्घ आयुष्य हवे' असा जर यमराजाने एखाद्यासमोर पर्याय ठेवून पर्याय निवडायला सांगितला, तर भारतीय मनुष्य एका क्षणाचा विलंब न लावता उत्तरेल. की... 'करोना चालेल पण एचआयव्ही नको रे बाबा!'

- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ९ - दि. २१ मार्च, २०२० - "करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच!"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Mar 14, 2020

शिमगा ही आनंदाची पर्वणीच - भाग ८

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ८
शिमगा ही आनंदाची पर्वणीच

कोणताही एक रंग माणसाचे आयुष्य रंगीबिरंगी करू शकत नाही आणि आयुष्य रंगीबिरंगी असल्याखेरीज जगण्यात रंगत येऊ शकत नाही. रंगाचे रंगत्व प्रकाशकिरणांवर अवलंबून असल्याने अंधारात जसे रंगाचे रंग बेरंगी असतात तसेच बेरंगी जीवनही प्रकाशमय असू शकत नाही. इतके प्राथमिक ज्ञान ज्या दिवशी माणसाला झाले असेल त्या दिवसापासून त्याला रंगाचे महत्त्व कळून आले असेल आणि त्या हिशेबाने त्याची पावले पुढे पडत गेली असेल.

परंपरागत रुढी, रीतिरिवाज, चालीरीती आणि उत्सव यांच्याकडे डोळस नजरेने बघितले की मग यामागची शास्त्रीय कारणमीमांसा सहज लक्षात यायला लागते. काळाच्या प्रवाहाच्या ओघात काही रूढी, परंपरा कालबाह्य ठरून जरी कालांतराने जाचक वाटायला लागल्या असतील तरी त्यांच्या निर्मितीमागची प्रेरणा मात्र आनंदाची रेशीमवाट विकसित करणे अशीच असणार हे उघड आहे. भारतीय सण आणि उत्सवांतील विविधता बघितली तर त्यातून ठळकपणे जाणवते की, प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव माणसाला परस्परभिन्न व वेगळा आनंद देऊन जात असतो. या सर्व सणात होळी आणि शिमगा हा सण तर थेट रंग या एका खास विषयाला वाहिलेला सण आहे.

खेळणारे खेळून जितका आनंद मिळवतात तसेच बघणारे बघूनही तितकाच आनंद मिळवत असतात. खेळणाऱ्यांकडे व बघणाऱ्यांकडे वक्रदृष्टीने पाहणारेही काही असतात. असतो तसाही स्वभाव अनेकांचा पण इतरांकडे वक्रदृष्टीने पाहून त्यातून आनंद मिळवण्यात त्यांचे सौख्य सामावलेले असते, हे सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. खेळण्यापासून चार हात लांब राहून मी इतरांपेक्षा वेगळा आहे, असे भासवून कुणी आनंद मिळवत असेल तर त्याचाही आपण आदरच केला पाहिजे. रासायनिक रंग शरीराला घातक असतात म्हणून नैसर्गिक रंग खेळा असे सल्ले देऊन जागतिक दर्जाचे राष्ट्रीय कर्तव्य निभावल्याची भूमिका पार पाडून काही व्यक्ती आनंद मिळवत असतात. जे जे नैसर्गिक असेल ते ते शरीराला घातक नसते, इतके सामान्यविज्ञान कोणी शोधून काढले हे तर सृष्टीच्या निर्मात्यालाही माहीत नसते. काचकुयरी, मिरची अथवा अन्य तत्सम जिन्नस नैसर्गिक असले तरी ते काय शरीराला फारच लाभदायक असतात काय? इतकाही विचार करण्याची सुद्धा त्यांना फुरसत नसते. पण एक मात्र बरे असते की, जसा आनंद ज्ञानात असतो तसाच आनंद अज्ञानातही असतो. त्यामुळे ज्ञान्याला अज्ञानी किंवा अज्ञान्याला ज्ञानी बनवण्याचे निष्कारण अट्टाहास म्हणजे आनंदाचे विरजण घालून निव्वळ डोकेदुखी वाढवून घेणे असते.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या भीतीने होळी खेळू नका, असे सल्ले देणारांचे यावर्षी पेवच फुटले होते. पण होळी हा केवळ रंगाची उधळण करून एकमेकांच्या शरीराला चेष्टा-मस्करी करून रंग फासण्याचा सण नसून शाब्दिक थट्टा, मस्करी, चेष्टा, टवाळी करण्याचा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, याचाही सर्वांना विसर पडला गेला. शरीरस्पर्शाने विषाणूचे संक्रमण होईलही पण शाब्दिक खेळाने विषाणू संक्रमण कसे होईल? जनतेच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्यापेक्षा नवे पर्याय उपलब्ध करून देणे जास्त संयुक्तिक नाही का? पण... हा पणच जागोजागी आडवा येतो आणि सुरळीत चाललेला चालता गाडा अनावश्यकरीत्या पंक्चर करून टाकतो.

एकमेकांचा उपमर्द, अपमान, अवमान न करणारी किंवा समाजाला जाचक ठरणार नाही अशी कोणतीही सात्त्विक मस्करी, टवाळी म्हणजे आनंदाची पर्वणीच असते आणि त्याचेच नाव असते शिमगा. सादर आहे शिमग्याचा एक नमुना.

मामाच्या पोरीच्या नावाने शिमगा

मामाचा गाव, मामीचा गाव
चांदीची पुतळी, सोन्याचा भाव
ही सोन्याची पुतळी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!

गुणाच्या पोरीचे फुगले गाल
फुगल्या गालावर सोनेरी बाल
सोनेरी बटांत डनरफचे थर
डनरफच्या थरात उवांचे घर
या उवांवर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!

कानाच्या खिडकीत रुपेरी मोर
मोराच्या तुऱ्यावर चंद्राची कोर
चंद्राच्या कोरीला मोत्याचे डूल
मोत्याच्या डुलावर कस्तुरी झूल
या झुलीवर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!

डोळ्याच्या खापनीस पापणीचे दार
पापणीच्या दाराला झेंडूचा हार
झेंडूच्या हाराला तागाचे सूत
तागाच्या सुतावर बसलंय भूत
या भुतावर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!

लिप्स्टीकच्या मागे दातांची रांग
दातांच्या रांगेवर विलायची भांग
विलायची भांगेला अफूचा संग
अफूच्या साथीला अभयचे रंग
या रंगावर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!

- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ८ - दि. १४ मार्च, २०२० - "शिमगा ही आनंदाची पर्वणीच"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Mar 7, 2020

आल्हाददायी हवी वेशभूषा - भाग ७

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ७
आल्हाददायी हवी वेशभूषा

चंचलता हा मानवी स्वभावाचा अटळ व जन्मजात गुण आहे. अगदी लहानग्या बाळाची नजरदेखील एका खेळण्यावर जास्त काळ स्थिरावू शकत नाही. थोड्या वेळापूर्वी हवीहवीशी वाटणारी वस्तू त्याला थोड्या वेळानंतर नकोनकोशी वाटायला लागते. दुसरे संपले कि तिसरे आणि तिसरे संपले कि चवथे असे दृष्टिभ्रमण अव्याहत सुरू असते. स्वभावातील ही चंचलता ज्ञानेंद्रियांसोबत अवयवांनासुद्धा सतत हालचाल करण्यास प्रेरित करत राहते.

मनुष्य एका जागेवर शांत बसला तरी निर्जीव पुतळ्यासारखा शांत बसू शकत नाही. डोळ्यांच्या मिचमिचण्यासह अवांतर शरीराच्या हालचाली अखंडपणे सुरू राहतात. कुणीकुणी तर बसल्याजागी एक किंवा दोन्ही पाय इतक्या जोरजोराने हलवत राहतात की शेजारच्या व्यक्तीला ते नको-नकोसे होते. मनुष्याच्या अंगात चंचलता इतकी एकजीव झालेली असते की ध्यानधारणा व एकाग्रचित्त करण्यासाठी त्याला काही काळ त्याचा सराव करावा लागतो. मनाची चंचलता माणसाला वेगवेगळे व नवनवे प्रयोग करण्यास बाध्य करते. प्रयोगशील आनंददायी प्रवासातूनच फॅशनचा जन्म होतो. फॅशनच्या नावाखाली धुडगूस घातला जातो, असे अनेकांचे मत असले तरी ते पूर्णसत्य नसते. फॅशनलासुद्धा शास्त्रीय आधाराचा पाया असतो. अशास्त्रीय असेल ते फार काळ टिकत नसते आणि शास्त्रीय आधार असेल तर ते कुणाच्या आडकाठीने रुजायचे थांबत नसते. संस्कृती कितीही थोर असली तरी ती जशीच्या तशी अनंतकाळापर्यंत स्वीकारत राहणे तर केवळ अशक्य असते. भौगोलिक स्थितीनुसार परिस्थिती बदलत असते आणि परिस्थितीनुसार जीवनशैली बदलत असते. परिस्थितीनुसार वेशभूषा करून आल्हाददायी किंवा सुसह्य जीवन जगण्याकडे मनुष्याचा स्वाभाविक कल असल्याने संस्कृतीच्या व्याख्याही लवचिक असल्या पाहिजेत.

ज्या भौगोलिक प्रदेशात कडाक्याची थंडी, रणरणते ऊन किंवा भरपूर पर्जन्यवृष्टी असते, तिथे जास्तीतजास्त जाडेभरडे व सर्वांग झाकणारी वेशभूषा आल्हाददायी असते. याउलट समुद्रकिनारी दमट वातावरणात कमीतकमी अंग झाकणारी व हवा खेळती असणारी वेशभूषा आल्हाददायक ठरत असते. पण कमीत कमी कपडे घालणे (विशेषतः स्त्रियांनी) म्हणजे भारतीय प्राचीन संस्कृतीवर हल्ला होतो असे संस्कृतीरक्षकांचे मत असल्याने व तशी समाजमान्यता असल्याने वेशभूषेच्या बाबतीत व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होतो. पण मग जे एकट्यादुकट्याला शक्य नाही ते सामूहिकपणे 'फॅशन'च्या नावाखाली होत असते. तीच जीवनशैली विकसित होत जाते. एरवी ती फॅशन नसून आवडलेली उपयुक्त सोयीची आनंददायी जीवनशैलीच असते.

फक्त डोळे सोडून उर्वरित चेहरा पूर्णपणे झाकला जाईल असा महिलांनी रुमाल बांधलेला बघून अनेक लोक नाक मुरडतात. यामागे काहीतरी काळंबेरं वर्तन असल्याचे वाटून अनेकांच्या भुवया उंचवायला लागतात. या प्रकाराकडे काही लोक फॅशन म्हणून, तर काही लोक फॅड म्हणून बघतात. वस्तुस्थिती मात्र त्यापेक्षा निराळी असते. प्रखर ऊन किंवा कडाक्याच्या थंडीपासून कोमल त्वचेचे संरक्षण करणे, असा यामागे उद्देश असतो. वेगवान हवा विरुद्ध दिशेने वाहत असेल तर ताशी ६० किलोमीटर वेगाने बाइक चालवताना चालकाला हवेचे असह्य चटके बसतात. हा सर्व बाइकचालकांचा स्वानुभव असतो. पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांची त्वचा कोमल आणि नाजूक असते, हेसुद्धा सर्वमान्य असते. पण इतरांमधले दोष शोधताना माणसाला स्वतःच्या अनुभूतीचाही विसर पडतो. त्यातूनच मग वस्तुनिष्ठ विचार करण्याऐवजी तर्ककुतर्क व संशयाचे भूत माणसाच्या मनात थैमान घालायला सुरुवात होते. ठिकठिकाणी फाटलेली पॅन्ट (भिकाऱ्यासारखी?) व मोठ्या आकाराची जागोजागी छिद्र असलेली शर्ट जर सर्वांगाला खेळती हवा पुरवत असेल तर अशा पोशाखाची चेष्टा होण्याऐवजी समर्थनच केले पाहिजे.

खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी

हवामानातील बदलाचा जसा मानवी शरीरावर प्रभाव पडतो, अगदी तसाच आर्थिक संपन्नतेचा प्रभावही मानवी शरीरावर पडत असतो. आर्थिक संपन्नतेच्या आलेखानुरूप माणसाची गरमी वाढत जाते, तसतसा कपड्याचा आकार घटत जातो. गरिबीने मानवी शरीराचा गारठा वाढत जात असल्यामुळे अंगावरील कपड्याचा आकारही वाढत जातो. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक व्यक्ती आल्हाददायी जीवन जगण्याच्या रेशीमवाटा धुंडाळतच असतो आणि त्यात सफलही होत असतो.

- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ७ - दि. ७ मार्च, २०२० - "आल्हाददायी हवी वेशभूषा"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं