Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Jun 30, 2013

आडदांड पाऊस

आडदांड पाऊस

अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने

गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने

आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने
केले सपाट डोंगर झिजवून पावसाने

खाण्या-पिण्यात झाला पाऊसही अधाशी
हंगाम फस्त केला निजवून पावसाने

नाही दिले कुणाला थोडे 'अभय' परंतू
खरडून दैव नेले थिजवून पावसाने

                                       - गंगाधर मुटे
--------------------------------------------

Jun 20, 2013

शेत लाचार झाले

शेत लाचार झाले

आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे
हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे

पडताच वीज लखलख थरकापता भयाने
निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे

कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

छाटून पंख आधी केलेय जायबंदी
आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहे

अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे

नसतोस सोबतीला तू व्यूह भेदताना
पुसतोस मग कशाला की काय बेत आहे?

दावा मला कुणीही कुठलाय एक मंत्री
निर्मोह-त्याग-करुणा ज्याच्या कथेत आहे

घे `अभय` दांडगाई सोसून लांडग्यांची
झोपून वाघ असली जोवर गुहेत आहे

                                          - गंगाधर मुटे
--------------------------------------------

Jun 7, 2013

भांडार हुंदक्यांचे....!

भांडार हुंदक्यांचे....!

ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी

धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी

संतप्त भावनांना हृदयात कोंबले पण;
केलाच पंचनामा दिलदार आसवांनी

वंध्यत्व पावसाचे नडले पिकांस जेव्हा
बरसून पाजली मग जलधार आसवांनी

होतो पराभवांनी पुरता खचून गेलो
पण रोवल्या उमेदी झुंजार आसवांनी

जेव्हा विजयपताका पहिलीच रोवली मी
जल्लोष धन्य केला साभार आसवांनी

खस्ताच जीवनाचा पाया रचून गेल्या
आयुष्य ठोस केले कलदार आसवांनी

अश्रू कठोर-जिद्दी होताच निग्रहाने
भिरकावली निराशा तडिपार आसवांनी

बाबा तुझ्या स्मृतींचा केला पुन्हा उजाळा
फोडून हुंदक्यांचे भांडार आसवांनी

जे द्यायचे ते दे, जादा नकोच काही
छळणे नकोच नशिबा हळुवार आसवांनी

जा सांग 'अभय' त्याला की त्याग आत्मग्लानी
बरसून दे म्हणावे अंगार आसवांनी

                                     - गंगाधर मुटे 'अभय’
---------------------------------------------------

Jun 4, 2013

शस्त्र घ्यायला हवे

शस्त्र घ्यायला हवे

श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
झोपले असेल शेत जागवायला हवे

ठाकली टपून चोच टोचण्यास पाखरे
टोचल्या फळास ठीक सावरायला हवे

शीग येइना कधीच पायलीस का इथे?
कोण लाटतोय रास आकळायला हवे

भेद शासका कशास नागरी व गावठी?
वाटणे निधी समान हे शिकायला हवे

लोकराज्य कल्पनेत शासकास चाकरी
सेवकासमान त्यांस वागवायला हवे

कालचे तुफानग्रस्त सज्ज होतसे पुन्हा
झेप घेत उंच-उंच बागडायला हवे

तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे

वाटते मनास फक्त एवढेच जीवना
की तुझ्यात एकमुस्त चिंब न्हायला हवे

पेरले 'अभय' अनेक बीज जाणतोस तू
हे प्रभो! निदान एक अंकुरायला हवे

                           - गंगाधर मुटे 'अभय'
----------------------------------------------

Jun 2, 2013

हुलकडूबी नाव

हुलकडूबी नाव

यांव आहे, त्यांव आहे
फेकण्याची हाव आहे

हालल्याने डोलणारी
हुलकडूबी नाव आहे

दूध-पाणी एक होता
एक त्यांचा भाव आहे

मध्यभागी घाण-गोध्री
भोवताली गाव आहे

जीवनाने नोंद घ्यावी
जिंकलो मी डाव आहे

भ्रष्ट, लंपट, चोरटा पण;
बोलताना साव आहे

पेटलो मी पूर्ण कोठे?
अंतरंगी वाव आहे

फुंकताना धाप कसली
’अभय’ झाले घाव आहे!

                        - गंगाधर मुटे
-------------------------------------
ढोबळमानाने शब्दांचे रूढार्थ
फेकणे = अतिरंजित बढाया मारणे
हुलकडूबी = अती हुरळून जाणारी

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं