Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Dec 25, 2015

अखेरची मानवंदना

अखेरची मानवंदना

अखेरची ही मानवंदना
नतमस्तकल्या स्वरी
अश्रू होऊन हृदय वितळले
योद्ध्या चरणावरी

कृषीवलांना, मृदश्रमिकांना
तूच आसरा होता
अर्थवादाच्या प्रबोधिनीचा
तू प्रकाशतारा होता
तूच आमुची मथुरा, काशी
प्रयाग नि पंढरी

एका दाण्यापासून दाणे
हजार निर्मित जेथे
डाकू, लुटारू बनूनी शासक
सनद घेऊनी येते
उणे सबसिडीचा मांडलास तू
हिशेब गणितेश्वरी

युगायुगाच्या अबोलतेला
फोडलीस तू वाचा
मूठ आवळून लढवैय्याची
शिकविलीस तू भाषा
आयुष्याची मशाल चेतवून
जगलास जन्मभरी

कोटी-कोटी शेतकऱ्यांचा
पंचप्राण तू होता
युगपुरुष अन् थोर महात्मा
निर्विवाद तू होता
रेखांकित सप्रमाण केलीस
तू भारत इंडिया दरी

जाऊ नकोस तू त्यागून आम्हा
जरी सोडली काया
सदैव असू दे हात शिरावर
पाईक अभय व्हाया
तूच आमचा प्रकाशसूर्य अन्
योद्धा सारथ्यकरी

- गंगाधर मुटे ’अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१२/१२/२०१५
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Manwandana

Dec 13, 2015

निवले तुफान आता




  निवले तुफान आता

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही

कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही

तापून षड-रिपुंनी पेटून पाहिले पण;
भट्टीतही जरा ना जळले तुफान काही

घेरून मध्यभागी केलाय कोंडमारा
नाहीच डोंगरांना नमले तुफान काही

उत्थानना बळीच्या लढले जरी ’अभय’ ते
नियतीसमोर अंती हरले तुफान आता

काळासमोर हतबल झाले तुफ़ान अंती
हळुवारशा हवेने विझले तुफान आता

बेफ़ाम झुंजणारे, निवले तुफान आता
निवले तुफान आता, निवले तुफान आता

                           - गंगाधर मुटे 'अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Dec 9, 2015

नाच्याले नोट : नागपुरी तडका

नाच्याले नोट : नागपुरी तडका

चमचमी बूट हाय, मलमली कोट हाय
सिगारेट सिलगवाले, हजारची नोट हाय

फ़ाटलेलं दफ़्तर, चड्डीले भोक हाय
बापाच्या नशीबात, जह्यराचा घोट हाय

मरणारे मरतात, चरणारे चरतात
लेका इथं कोणाच्या, हाडावर चोट हाय?

वाणी-दास-पुढाऱ्याच्या, मिशीले तूप हाय
दूध-दूभतं करणार्‍याचे, पाठीले पोट हाय

जसं तुले हाय तसं, मलेबी वोट हाय, पण;
ढ्यँगपाट्या सरकाराच्या बापामंदी खोट हाय

सात, आठ, नवव्या आयोगाचे योग हाय
कापसाले भाव म्हणान तं फ़ेंडीवर सोट हाय

मुद्रास्फितीच्या व्यवस्थेत सृजनाचे हाल हाय
तोंडपुज्याले 'अभय' अन् नाच्याले नोट हाय

                                  - गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Dec 8, 2015

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व


            "मुरली खैरनार गेलेत" असा प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांकडून आलेला sms वाचताच माझ्याच मुखातून शब्द बाहेर पडले "हे राम!"
          जीवन क्षणभंगुर असते आणि आयुष्याची दोरी ओढून घेण्याचा काळाचा अधिकार मान्य केला तरी काळाने एवढे निष्ठुर वागायला नको असे राहून राहून वाटत आहे. विश्वासच बसत नाही की मुरली खैरनार आपल्यात नाहीत आणि तशी नोंद लिहायला मेंदूसुद्धा तयारच होत नाही आहे. माझ्या व्यक्तीगत आयुष्यावर प्रभाव टाकणारी जी काही बोटावर मोजण्याइतकी नावे आहेत, त्यातील एक नाव म्हणजे जिंदादील व्यक्तिमत्त्व असलेले मुरली. माझ्या भाग्याने माझ्या दैनंदिनीत काही सोनेरी व कधीच न पुसली जाणारी पाने लिहून ठेवली त्यातला एक अध्याय म्हणजे मुरली खैरनारांचा मला लाभलेला सहवास.


            शेतकरी संघटनेचा विचार अधिक प्रभावीपणे बिगरशेतकरी आणि शहरी माणसांपर्यंत पोचला पाहिजे अशा व्यापक उद्देशाने १९८६-८७ च्या सुमारास नाशिक येथून ‘आठवड्याचा ग्यानबा’ हे साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे संपादकपद श्री मुरली खैरनारांकडे सोपवण्यात आले. त्यांच्या मदतीसाठी म्हणून त्यांनी माझी निवड केली आणि मला त्यांचे सहवासात सहकारी म्हणून काम करण्याचा योग जुळून आला. त्यांचे सोबत काही दिवस नाशिकला घालवता आले आणि मोटरसायकलवरून राज्याच्या काही निवडक भागाचा दौराही करता आला. ‘आठवड्याचा ग्यानबा’ची सुरुवात तर चांगली झाली, त्यांनी त्यासाठी कठोर परिश्रमही घेतले परंतू शेतकरी संघटनेमधील तत्कालीन नेत्यांच्या दुसर्‍याफ़ळीतील काही कार्यकर्त्याकडूनच त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला. त्रासाचे रूपांतर वादात झाले आणि साप्ताहिक बाळशे धरायच्या आतच म्हणजे आठनऊ महिन्यातच बंद पडले आणि ‘आठवड्याचा ग्यानबा’चा मध्यांतर व्हायच्या आधीच पडदा पाडण्यात आला.

            शेतकरी संघटनेवर आणि मा. शरद जोशींच्या विचारावर अपार श्रद्धा असलेले मुरली विनोदी होते, मिश्किल होते, हजरजबाबी होते आणि गंभीरही होते. उच्च दर्जाचे पत्रकार, उत्तम वक्ता आणि नाटयकलावंत, दिग्दर्शकही होते. मनमिळाऊ होते पण सहकार्‍यांकडून कार्यक्षमतेने काम करवून घेण्याची विशेष खुबी त्यांच्यामध्ये होती. ते कुशल संघटकही होते. स्वत:च हजरजबाबी असल्याने ते मिश्किलपणे इतरांवर शाब्दिक कोटी करायचे तर कधी कधी सहकार्‍यांची फिरकी घ्यायचे. स्वत:ची फिरकी घ्यायची संधी ते दुसर्‍याला कधीच मिळू देत नसत. त्यांच्यापेक्षा मी वयाने बराच लहान असूनही त्यांनी मला कायमच बरोबरीच्या मित्राइतका दर्जा दिला त्यावरून त्यांच्या विनयशीलतेचाही अंदाज येतो. कायम बोलत राहणे, नवनव्या छोट्यामोठ्या कथा, विनोदी चुटकूले रचून ऐकवत राहणे हा त्यांच्या स्वभावातला स्थायीभाव होता.

            तेव्हा नाशिकच्या शरणपूर रोडवर कार्यालय होते. रात्री नऊ वाजेपर्यंत काम करायचे व नंतर जेवायला जायचे असा आमचा नित्यक्रम होता. आमच्या चमूमध्ये मिलिंद मुरुगकर, स्व. जीवन टिळक, धर्मेंद्र चव्हाण, वसंत विसपूते होते. नऊ वाजले की सर्व आपापल्या घरी जेवायला जायचे व मी भोजनालयात जायचो. एक दिवस मोठा मजेदार प्रसंग घडला. त्यांची फिरकी घ्यायची नामी संधी मला साधून आली आणि मी त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. त्यांची पत्नी सौ. मृणालिनी यांची एल.एल.बी ची परीक्षा सुरू असल्याने त्या सायंकाळी लवकरच आपला स्वयंपाक उरकून घ्यायच्या आणि अभ्यासाला लागायच्या. त्या दिवशी मुरलींना बहुतेक फारच कमी भूक असावी म्हणून त्यांनी विचार केला असेल की यालाही जर भूक कमी असेल तर एकाच्या डब्यात दोघांचे जेवण सहज होऊ शकते. याचा भोजनालयात जाऊन जेवणाचा खर्चही वाचेल. म्हणून त्यांनी मला सहजपणे विचारले.
"तुला आज किती भूक आहे?"
मला प्रश्नाचा रोखच कळला नाही म्हणून मी सुद्धा ठोकून दिले.
"आज मला भूकच नाहीये. फार तर एखादी पोळी. एखादी पोळी खूप झाले."
त्यावर ते लगेच मला म्हणाले.
"अच्छा! मग चल माझ्यासोबत घरी जेवायला"
            आता मला "एक पोळी" मागच्या रहस्याचा उलगडा झाला होता आणि पंचाईतही झाली होती कारण मला भूक होती आणि नेहमी इतकेच जेवायला लागणार होते. इतक्यात माझ्यातला ’फिरकी’पटू जागा झाला आणि ठरवले की आज अनायासे संधी आलीच आहे तर मुरलीची मस्तपैकी फिरकी घ्यायची.

            घरी पोचलो तेव्हा मृणालिनीताई अभ्यासात गर्क होत्या पण माझा आवाज ऐकताच बाहेर आल्या आणि मला स्मित करून लगेच स्वयंपाकगृहात गेल्या. मृणालिनीताई म्हणजे त्यावेळच्या शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या धडाडीच्या नेत्या. त्यामुळे त्यांची माझी ओळख मुरलींच्याही आधीची. घरी पाहुणा जेवायला आला म्हटल्यावर त्यांनी लगेच वाढीव स्वयंपाक केला आणि झाली जेवणाला सुरुवात. आज मस्तपैकी नाटक वठवायचे आणि फिरकी घेऊन मुरलींची जेवढी करता येईल तेवढी फजिती करायची असा ठाम निश्चय करून  अत्यंत गंभीर मुद्रेने जेवायला बसलो.  पहिली पोळी संपताच मी म्हणालो,
"झाले माझे जेवण"
"अरेव्वा! एका पोळीत जेवण आटोपले? असं काय करताहात?" असे म्हणत मृणालताईंनी दुसरी पोळी ताटात घातली. मी दुसरी पोळी खायला सुरुवात केली आणि म्हणालो,
"त्याचं असं आहे की, माझं आणि मुरलीचं एक अ‍ॅग्रीमेंट झालंय. एकच पोळी खाण्याच्या करारावरच त्यांनी मला जेवायला बोलावले आहे"
ऐकताच मृणालताई जाम भडकल्या मुरलीवर. मुरली समजावण्याच्या स्वरात मृणालताईंना खूप समजावीत होते,
"अगं हा वात्रट आहे, तुला माहीत आहे ना? हा वात्रटपणा करतो आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता"
            पोळी संपली की नवीन पोळी घेताना मी दरवेळेस संपूर्ण ताकदीनिशी नको म्हणत होतो, मात्र ताटावर आडवा हात घालण्याऐवजी ताटाबाहेर हात आडवा करून मस्त नाटक वठवत होतो, त्यामुळे पोळी अलगदपणे ताटात पडत होती आणि पोळी ताटात पडली की मी अधाश्यासारखा पोळीवर तुटून पडत होतो आणि निरागसपणाची भावमुद्रा करून हळूच पुटपुटत होतो.
"जेवणात कुठे आलाय वात्रटपणा? तुला किती भूक आहे, असे कधी कुणाला विचारले जात असते काय? आमच्या विदर्भात नाही बुवा अशी पद्धत!"
            पाहुण्याला फार भूक लागली आहे मात्र मुरलीमुळे अर्धापोटीच पाहुणा जेवण संपवणार होता हे मृणालताई सारख्या अन्नपूर्णेला आणखी बेचैन करत होते आणि तो त्यांचा राग पुन्हापुन्हा मुरलीवर गारपिठीसारखा बरसत होता. त्या दिवशी मी चारपाच नव्हे तर चक्क दहाबारा तरी पोळ्या नक्कीच खाल्ल्या असतील.
            घराबाहेर पडताना मुरली आपली खरडपट्टी नक्कीच काढणार असा माझा कयास होता पण तसे काहीच झाले नाही. बाहेर पडल्यावर मुरलींनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले की, तू तर पट्टीचा अभिनेता निघालास. आगामी नाटकात तुझ्यासाठी एखादी खास वात्रटाची भूमिका तयार करावी की काय, नक्कीच विचार करतो. मी उसने आव आणून हसायचा प्रयत्न  केला पण हसू मात्र फुटलेच नव्हते.

१९८७ च्या सुमारास ‘आठवड्याचा ग्यानबा’ बंद पडले आणि मुरलींशी संपर्क जवळजवळ तुटलाच आणि कधी पत्रव्यवहार तर कधी फोनवर बोलणे इतक्यापुरताच मर्यादित झाला.

            सात-आठ वर्षापूर्वीची गोष्ट. सकाळी नऊच्या सुमारास एक व्यक्ती माझ्या घरी आली. मी टेबलवर्क करत होतो. बसल्याबसल्याच मी नमस्कार केला. मी तसा राजकारणात आणि समाजकारणात असल्याने अनोळखी माणसे घरी येणे नित्याचेच आहे. मनुष्य अनोळखी असला तरी मी त्याच्याविषयी फारश्या ओळखीपाळखीच्या किंवा औपचारिक/अनौपचारिक चौकश्या करत बसत नाही. थेट मुद्द्याचेच बोलायला सुरुवात करत असतो. नित्याच्याच खाक्याप्रमाणे मी म्हणालो.

"बोला, कसं काय येणं केलंय? काय काम काढलंत?"
"तू मला आता ओळखणार नाहीस, आपण भेटून २० वर्षे......."
आणि मी जागेवरच उडालो. डोळे विस्फारून आश्चर्यतिरेकाने किंचाळलोच
"मुरलीभौ ????"
            मला आश्चर्यतिरेकाचा बहुधा अटॅकच आला असावा. मुरलीसारखा ८०० किलोमीटरवरचा मनुष्य कुठलीही पूर्वसूचना न देताच खेड्यातील थेट माझ्या घरीच पोचू शकतो, याचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.
आमची उरभेट ५-६ मिनिटे तरी चालली असावी. काहीकेल्या मिठी सैल होतच नव्हती आणि डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रूही थांबायचे नाव घेत नव्हते.
"मुळीच अवघड नाही" ही लर्नालॉजीची कार्यशाळा घेण्यासाठी ते जिल्ह्यात आले होते. ते आम्ही दोन दिवस मजेत घालवले आणि........
तीच आमची शेवटची भेट...!
            फेब्रुवारी २०१५ मध्ये संपन्न झालेल्या वर्ध्याच्या पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी संमेलनातील परिसंवादात भाग घेण्यासाठी मी त्यांना आवर्जून बोलावले होते, त्यांनी आनंदाने स्वीकृतीही दिली होती पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ऐनवेळेवर येऊ शकले नव्हते.
            त्यांनी लिहिलेली आणि याच वर्षी जुलै महिन्यात प्रकाशित झालेली शोध ही रहस्य कादंबरी खूप गाजली आणि वाचकप्रिय ठरली. एक महिन्यातच दुसरी आवृत्ती काढावी लागली, एवढे यश त्यांच्या लेखणीने मिळवले. त्यांनी चार व्यावसायिक नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. १८ माहितीपटांची निर्मिती केली. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा धनी असलेल्या मुरलीधर खैरनार यांचे दिनांक ६ डिसेंबर २०१५ ला दिर्घआजाराने निधन झाले.

आज मला पुन्हा माझ्याच काही ओळींची परत आठवण झाली.

काही संदेश नसतातच..... वाचण्यासारखे
काळजात जाऊन रुततात.... टाचण्यासारखे
सांत्वनाही जिथे ओशाळल्यागत होते....
सारेच घाव नसतात जेव्हा.... सोसण्यासारखे
काही जाऊन रुततात, आत खोलवर....
सारेच व्रण कुठे असतात.... दिसण्यासारखे?.
डोळे बधिर अन अश्रू मुके व्हायला लागतात.....
सारेच नसते शब्दात..... सांगण्यासारखे

टाळायचे म्हटले तरी काही टळत नाही......
घडते तेच नियतीला मंजूर.... असण्यासारखे
निश्चयाने झेलत जावा येणारा प्रत्येक क्षण.....
आणखी असतेच काय ‘अभय’ ..... असण्यासारखे?

भगवंत देवो तुम्हांस सुख आणि शांती
हेच शब्द माझे प्रार्थनेसारखे.......!

देव त्यांच्या आत्म्यास सुख आणि शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सोसण्याचे बळ देवो, एवढीच प्रभुचरणी प्रार्थना करतो.

                                                                                                      - गंगाधर मुटे
                                                                                                        ranmewa@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Nov 27, 2015

२ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूरला

दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड

           कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, कृषिजगताला भेडसावणार्‍या समस्यांची मराठी साहित्यविश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी २० आणि २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दोन दिवसाचे दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.

           या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक माजी प्राचार्य रा.रं. उर्फ़ रावसाहेब बोराडे भूषविणार असून संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार श्री सुरेश द्वादशीवार यांचे हस्ते संपन्न होईल. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार व शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी जबाबदारी स्वीकारली असून उद्‍घाटन सत्राला एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

           मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे परंतू प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाही. अगदी साहित्यक्षेत्र सुद्धा याप्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे आढळून येत नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात लक्षावधी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले आढळत नाही. शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.

           साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.

           दोन दिवस चालणार्‍या या संमेलनात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण, मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव, शेतकरी आत्महत्या : कारणे व उपाय, शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून, शेतीसाहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान, चालू दशकातली शेतकरी कविता, शेतीच्या मुक्तीसाठी मार्शल प्लॅनची गरज अशा विविध विषयावरील एकूण ७ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक मा. बाबाराव मुसळे, डॉ शेषराव मोहिते, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संजय पानसे, शेतकरी नेते रवी देवांग, गुणवंत पाटील, सरोज काशीकर, प्रज्ञा बापट, शैलजा देशपांडे, गीता खांदेभराड, कडुआप्पा पाटील, संजय कोले, शेतीविषयाचे गाढे अभ्यासक डॉ दिलीप बिरुटे, प्रा. डॉ. डी.एन राऊत, गोविंद जोशी अजित नरदे, अनिल घनवट इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत.

           नवसाहित्यिकांना शेतकरी आत्महत्यांच्या दाहक वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून “शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून” हा विशेष परिसंवाद ठेवण्यात आला असून परिसंवादात विदर्भातील ज्येष्ठ, व्यासंगी व अनुभवी पत्रकार भाग घेणार आहेत. हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.

           संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. ज्ञानेश वाकुडकर भूषवतील. या संमेलनात शरद जोशी विशेषांक, प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह व गंगाधर मुटे लिखित नागपुरी तडका या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. रात्री १०.०० वाजता नवनाथ पवार लिखित, स्वप्नील शिंदे दिग्दर्शित व स्वप्न, पुणे व्दारा निर्मित तुला कसला नवरा हवा ही एकांकिका सादर केली जाईल.

           या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा मला विश्वास आहे.

         
                          गंगाधर मुटे
                          कार्याध्यक्ष
दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शेतकरी साहित्य संमेलन

*********
शेतकरी साहित्य संमेलन

*********
शेतकरी साहित्य संमेलन

*********
शेतकरी साहित्य संमेलन

*********
शेतकरी साहित्य संमेलन
*********
शेतकरी साहित्य संमेलन

*********
शेतकरी साहित्य संमेलन

*********

Oct 22, 2015

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!


शेतमालाचे भाव वाढले की
आमचा जळफळाट होतो...कारण
आमच्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण

आमच्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते

आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी

कधी मरेल हा रावण
तुमच्या-आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?

रावणी मनोवृत्तीचे दहन व्हावे
अशी बाळगू ‘अभय’ इच्छा
नंतरच देऊ एकमेकांना
“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!

                        - गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Oct 13, 2015

कळली तर कळवा

कळली तर कळवा


दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर
गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर

जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर

यंदा मुद्दल मागू नकोस, फुकट केळी ने
कामात येईल कधी काळी, गरज पडली जर

भिडाच एकदा निग्रहाने, बाकी बघू मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर

स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य
मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर

किती उपडणार आहेस तू, बस इतके ठरव
रोज वाढणाऱ्या धस्कटास, ’अभय’ असेल तर

                                    - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Sep 26, 2015

नका घेऊ गळफास

नका घेऊ गळफास



किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास
बाबाजींना सांगू आम्ही
काकाजींना सांगू आम्ही
दादाजींना सांगू आम्ही
मामाजींना सांगू आम्ही
नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!

जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले
नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले
डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!

छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
कोणाच्या ना बापा भिऊ, लुटारूंच्या पाठी ठेवू
पायाखाली तुडवत जाऊ, साऱ्या अडथळ्यांस ....!

हातामध्ये हात धरू, पोशिंद्याची एकी करू
लक्ष्यावरती चाल करू, एकेकाची कुच्ची भरू
’अभय’ जगा, आता ठेवा, आम्हावर विश्वास ....!

                                 - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Sep 25, 2015

किसानो हो जावो तैय्यार 


होजा रे तैय्यार साथी रे होजा रे तैय्यार
हो जावो तैय्यार किसानो हो जावो तैय्यार
आओ मिलकर हाथ उठालो
मिलकर कर लो वार

खून पसीना सींच के हमने देश की किस्मत बोई
हाथ लगे जो भाव देखकर अपनी अस्मत खोई
फसल हमारी लूट ले गयी! चोरों की सरकार

बकरी, गैया, भैंस हमारे आँगन की है शान
स्तन माता के सूने है एवं भुखी है नन्ही जान
क्यों अपनी किस्मत है रूठी? सोचो मेरे यार

इस खेती की अस्मत लूटकर हमें भाषण से भरमाये
नेता, तस्कर, गुंडा, अफसर मिलकर माखन खाये
उठो किसानो वक्त आगया, करो अभय हुंकार

                                    - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Sep 24, 2015

सिक्वेंस....!

सिक्वेंस....!

सरकार शेतकरी विरोधी
धोरणे राबवणार
शेतकर्‍यास आत्महत्येला
भाग पाडणार
मग नाना आणि मका
धावत येणार
मयताच्या बायकोला
पंधरा हजार देणार
पेपरामधी मग
बातमी झळकणार
टीव्ही मध्ये स्पेशल
रिपोर्ट दाखवणार
.
.
.
पंधरा हजारात काय होते?
बँकांचे कर्ज फ़िटते?
सावकाराचा तकादा मिटते?
निदान व्याज तरी फ़िटते?
किराण्याची उधारी फ़िटते?
शेतीची लावलागवड होते?
पीक काढणीचा खर्च भागते?
.
.
तेही जाऊ द्या
.
.
तेरवी तरी होते?
मुलीचे लग्न होते?
.
.
परवाचा बळीराजा
कालचा अन्नदाता
आज भिकार्‍यांच्या रांगेत?
.
.
.
कुणीच नाही का रे विेचारी
आणि संवेदनाक्षम?
.
.
जाऊ द्या, सोडा विषय़
.
.
करा बघू नानाला
सॅल्यूट पटकन.....!!

- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~

इन्सान की नियत

इन्सान की नियत

किसी इन्सान को
रोटी खिलाकर
आप एक दिन के
लिए उसका पेट
भर देंगे!

उसी इन्सान को
रोटी कमाने का तरिका
बताने के लिये
आप लंबा चौडा भाषण भी
ठोक देंगे!

लेकिन....
अगर वह कोई काम
करता है, तो उसका उचित
मुआवजा देना आप कतई
स्विकार नही करोगे..!
आपको उसका पसिना
सस्ते मे चाहिये...!!
चाहे वह भुखा मरे
या
सुसाईड करे....!!!

है ना?
जरा अपने गिरेबानमे झांककर
तो देखिये भाईसाब,
कही मै गलत तो नही लिख बैठा??

- गंगाधर मुटे
----------------------------------------

Sep 22, 2015

चुलीमध्ये घाल

चुलीमध्ये घाल

मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल
नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल

जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद
या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?

बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार
असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल

कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग
येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल

या मातीचा लोळ एकदा क्षितिजे भेदुनी मार
चिंब न्हाऊ दे दिगंताला रंग दे लालीलाल

'अभय' देईना पोशिंद्यास; वाचू कशाला सांग?
तुझे प्रबंध तुपात घोळून चुलीमध्ये तू घाल

                                - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Aug 2, 2015

ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!!

ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो

जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....
त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना......
ऋणानुबंधाच्या
मुसळधार पावसासारख्या
ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!!

                             - गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना समर्पित कविता

चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ

नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर

शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग

दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर

देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही

मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती
मान ठेवून बघ

चिंता नकोस करू मित्रा
'अभय'तेने तेव
वादळासंगे लढेन मी
इतका विश्वास ठेव

               - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Jul 13, 2015

तू चांदणन्हाली अप्सरा

तू चांदणन्हाली अप्सरा
मी माती भरलं कोकरु
तुझं नि माझं कसं जुळावं
कसं व्हायचं सुरू .... गडे
तुरुरुरु तुरुरुरु,  तुरुरुरु तुरुरुरु .....?

तू कोकीळ, मी रेडा
मी चटणी, तू पेढा
जगरुढीचे दोन किनारे
मध्ये वाहाते सुसाट वारे
उडाण कशी मी भरु ?
कसं व्हायचं सुरू .... गडे
तुरुरुरु तुरुरुरु,  तुरुरुरु तुरुरुरु .....?

मी पाताळ, तू अंबर
तू नवनित, मी डांबर
इथे उगवतो पळस-धोतरा
तुझी आवडी जाई-मोगरा
मी सांग कसा विस्मरु
कसं व्हायचं सुरू .... गडे
तुरुरुरु तुरुरुरु,  तुरुरुरु तुरुरुरु .....?

तू इंडियाची राणी
मी भारतीय अज्ञानी
अभय उधळणे तुझे चौखूर
इथे चिंतेची सदैव टूरटूर
दरी कशी मी भरू ?
कसं व्हायचं सुरू .... गडे
तुरुरुरु तुरुरुरु,  तुरुरुरु तुरुरुरु .....?

                    - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Jul 10, 2015

पायाखालची वीट दे....!

पायाखालची वीट दे....!

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही
वेतनवाला आयोग दे

देवा मला चारदोन
सवंगडी धीट दे
हरामींना कुटण्यासाठी
पायाखालची वीट दे

वास्तवाच्या शोधासाठी
डोकं थंडगार दे
लढवैयांच्या लेखणीला
'अभय' आणि 'धार' दे

                - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Jun 24, 2015

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?


गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले
समज ना उमज पण खुर्चीत धसते?

जुन्या काळचे डाकू तरी लै बेस व्हते
शेतावरच्या श्रमिकांना कधी लुटत नोयते
शोषकांच्या छाताडावर पुरणपोळी लाटे
तीर्थप्रसाद करुनशान भुकेल्यांना वाटे
शेतीच्या गच्चीवर आता सरकारच बसते?

उठसूठ होयनोय पाखुरा करते
'मुक्या'च्या चुलीपाशी झाडलोट करते
गावातला 'मुका' इथं फास घेऊन मरते
पोशिंद्याच्या मढ्यावर बांडगूळ चरते
'अभय'तेच्या मस्तीवर ऐदी फुसफुसते?

                         - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------

Jun 19, 2015

औंदाची शेती - २०१५

औंदाची शेती - २०१५

               १९-०६-२०१५ भल्याभल्यांचे, थोरामोरांचे सारे अंदाज वावटळीत उडवून यंदा पावसाने शेतीस योग्य अशी दमदार सुरुवात केली आहे. धोंड्याचे वर्ष (अधिकमासाचे) शेतीसाठी अनुकूल असते असा पारंपारिकपणे शेतकर्‍यांनी बाळगलेला समज खरा ठरावा, अशी आशादायक स्थिती आजच्या दिवसापर्यंत तरी खरी ठरली आहे.

. औंदाची शेती
 झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी 
 *****************************************
  औंदाची शेती
कपाशीची लागवड करण्याचा दिवस उजाडला आणि आपल्या लहानसान मुलाबाळासह शेतकरी आपल्या कर्तव्याला तत्पर झाला. 
 बालमजुरी कायद्याचं आमच्या लेकराबाळांना संरक्षणही नाही. आणि शेतकर्‍याची लहान लेकरं शेतावर राबली तरी शेतकर्‍यांचं काही वाकडं करण्याची ऐपतही कायद्यात नाही. 
 (त्यांना स्वस्तात शेतमाल पाहिजे ना? मग शेतकर्‍याची मुलं शेतात फ़ुकटात काम करत असेल तर ते सार्‍यांना हवेहवेसेच आहे.) 
*****************************************
  औंदाची शेती 
 पेरते व्हा! पेरते व्हा! 
*****************************************
  औंदाची शेती 
 याला आमचेकडे फ़साटी म्हणतात. 
तुमच्याकडे काय म्हणतात. 
शेतकी पुस्तकात याला काय पर्यायी शब्द आहे? 
*****************************************

May 31, 2015

“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!


“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!



शेतकरी नेते मा. शरद जोशींचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १९८० पूर्वी शेतकर्‍यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. "कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकर्‍यांची संघटना होणार नाही" असे त्या काळी म्हटले जायचे. पण शरद जोशी नावाच्या एका ज्ञानेश्वराने शेतकर्‍यांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा मुका असलेला शेतकरी समाज ज्ञानेश्वराच्या रेड्याप्रमाणे बोलायला लागला. नुसताच बोलायला लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा शेतकरी चक्क मूठ आवळून रस्त्यावर उतरला. सरकारशी दोन हात करायला सज्ज झाला. शेतकरी संघटनेने शेतकर्‍याला त्याच्या गरिबीचे आणि दारिद्र्याचे मूळ कारण सांगितले. शेतीत गरिबी आहे याचे कारण शेतीतला माल स्वस्तात स्वस्त भावाने लुटून नेला जातो, हेही शिकविले.

जोपर्यंत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला बरकत येऊच शकत नाही. मग तुम्ही निसर्ग शेती करा, सेंद्रिय शेती करा,  कमी खर्चाची शेती करा, जास्त खर्चाची शेती करा, पारंपरिक शेती करा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करा. शेती कशीही करा; जोपर्यंत शासनाचे शेतकरीविरोधी धोरण बदलत नाही तो पर्यंत शेतकर्‍याचे मरण अटळ आहे. कोरडवाहू शेती केली तर बिनपाण्याने हजामत होते आणि ओलिताची शेती केली तर पाणी लावून हजामत होते, या पलीकडे फारसा काहीही फरक पडत नाही.

शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढे भाव मिळायला पाहिजे, हे सर्वांनाच मान्य आहे. तसे कोणीच नाकारतही नाही पण; कृती मात्र हमखास उलटी करतात. कुणी अज्ञानापोटी करतो तर कुणी जाणूनबुजून करतो. कुणी स्वत:ला शेतीतज्ज्ञ म्हणवून घेत असले तरी शेतीच्या अर्थशास्त्राच्या बाबतीत बहुतांशी तज्ज्ञ निव्वळ अज्ञानीच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही.

  शिवाय या स्वनामधन्य शेतीतज्ज्ञामध्ये आपसात एकजिनसीपणा नाही. प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला आहे. उठसूठ ज्याला जसे वाटते तसे सांगत सुटतो. कुणालाच खोलवर जाऊन विषयाचा पडताळा घ्यावासा वाटत नाही.  कुणी म्हणतो निसर्गशेती करा, कुणी म्हणतो झिरो बजेट शेती करा, कुणी म्हणतो मार्केटिंग करायला शिका तर कुणी म्हणतो प्रक्रिया उद्योग उभारा. आता तर काही लोकं मानवी मूत्र वापरायचा सल्ला द्यायला लागलेत. ज्याला जसे वाटते तसेतसे बोलत राहतात. बोलायला माझी हरकत नाही. तोंड त्यांचे आहे व जीभही त्यांचीच आहे पण शेतमालाचे भाव म्हटलं तर यांची दातखिळी का बसते? हा प्रश्न शिल्लक राहतोच आणि इथेच खरी ग्यानबाची मेख आहे.

निसर्गशेती म्हणजे काय? आमचे बाप-आजे निसर्गशेतीच तर करत होते. रासायनिक खते वापरत नव्हते, कीटकनाशके फवारत नव्हते, संकरित बियाणे लावत नव्हते आणि घरी संडास नसल्याने संडासला शेतातच जात होते आणि तरीही देशाची लोकसंख्या कमी असूनही जनतेला जाऊ द्या; त्या शेतकर्‍यालाच पोटभर खायला अन्न मिळत नव्हते. धान्याच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, ओलिताची व्यवस्था निर्माण झाली, फ़वारणीसाठी किडीनुरूप कीटकनाशके निर्माण झाली आणि चमत्कार झाला. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. अन्नधान्याचे उत्पादन वाढण्यामागे रासायनिक खतांनी मोलाची भूमिका बजावली. आजही जर रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर थांबवला तर देशाचे शेतीतील उत्पादन ७० ते ८० टक्क्यांनी घटेल, अशी परिस्थिती आहे.  निसर्गशेतीचा सल्ला देणार्‍यांनो, मुंह खोलनेसे पहले कुछ तो शर्म करो!

झिरो बजेटशेती हा शब्द ऐकला की मला ओकार्‍या व्हायला लागतात. झिरो बजेट शेती हा शब्द मला काही केल्या पचवून घेताच आला नाही. शून्य खर्चाची शेती करायची म्हणजे नेमके काय करायचे? शेतीला बियाणे लागले ते चोरून आणायचे का? गोड गोड बोलून खतं उधारीत आणायची मग त्याचे पैसे बुडवायचे का? खर्च शून्य करायचा म्हटलं तर शेतकर्‍यांनी वस्त्र परिधान करणे सोडून झाडाच्या वल्कली अंगाभवती गुंडाळाव्यात का? मजुरांकडून फुकटात काम करून घ्यायचे म्हटले तर मग या देशात वेठबिगारी व गुलामगिरीची पद्धत नव्याने सुरुवात करायची का? कसली आली बोडक्याची शून्य खर्चाची शेती?

अनेकदा शेतकर्‍यांनी मार्केटिंग करायला शिकावे, असा सल्ला घाऊकपणे दिला जातो. आता या उपटसुंभांना कोणी सांगावे की, कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन आणि विपणन हे दोन स्वतंत्र भाग असतात. शेतीमध्ये सुद्धा जो शेती कसून उत्पादन करतो तोच शेतकरी असतो. शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे. शेती करताना वेळेची इतकी बचत होत नाही की त्याने जोडीला मार्केटिंगसदृश अन्य व्यवसाय करावा. आजवर अनेकांनी असे चिक्कार प्रयोग केले आहे पण “तेलही गेले, तूपही गेले; हाती धुपाटणे आले” अशीच त्यांची गत झाली, असे इतिहासच सांगतो. याउलट जो शेती सोडून केवळ मार्केटिंगमध्ये गेला त्याने चांगल्यापैकी बस्तान बसवले, असेही इतिहासच सांगतो. जो शेतकरी नोकरी, पुढारीपणा किंवा व्यापार करायला लागतो तो अल्पावधीतच नोकरदार, पुढारी किंवा व्यापारी होतो; शेतकरी म्हणून त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. सातबारा नावाने असला तर त्याला शेतमालक म्हणता येईल, शेतकरी म्हणता येत नाही. अर्थात शेतकरी फक्त तोच जो शेती कसून उत्पादनाचा विभाग हाताळतो. एका वाक्यात असेही म्हणता येईल की “ज्याची उपजीविका फक्त आणि फक्त शेती उत्पादनावर अवलंबून असते, तोच खराखुरा शेतकरी” भलेही मग सातबारा त्याच्या नावाने असो किंवा नसो. तो भूधारक असो किंवा भूमिहीन असो! आपण जेव्हा शेतकरी असा शब्द वापरतो तेव्हा शेती कसून उत्पादन करणार्‍याविषयी बोलत असतो; व्यापारी, उद्योजक, दलाल यांच्या विषयी बोलत नसतो. शेती कसणे सोडून सार्‍यांनीच व्यापार सुरू करणे अशी कल्पनाच करणे शक्य नाही. इतके साधे गृहितक आमच्या शेतीतज्ज्ञांना कळत नाही, ही अद्भूतआश्चर्याच्या तोडीची बाब आहे.

तरीही शेतकामातून अतिरिक्त वेळ मिळाला तर किरकोळ मार्केटिंग करणे, शेतकर्‍याला वावगे नाही. अनादिकाळापासून शेतकरी शक्य होईल तसे किरकोळ मार्केटिंग करतच आला आहे. पूर्वी दहा-वीस गावाच्या परिघात एका मुख्य गावी गुजरी भरायची. आठवडी बाजार भरायचा. तिथे शेतकरी आपला शेतमाल स्वत: दुकान मांडून विकायचे. ही शेतमालाची मार्केटिंगच होती ना? आपल्या जवळचा शेतमाल विकून येणार्‍या पैशात अन्य गरजेच्या वस्तू खरेदी करणे, शेतकर्‍यांच्या अंगवळणीच पडले आहे. अगदी पौराणिक काळातला जरी विचार केला तरी गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला घेऊन जायच्याच ना? कुठे मध्यस्थ होता? कुठे दलाल होता? मग मार्केटिंग म्हणजे यापेक्षा वेगळं काय असते? आणि तरीही बरेचशे उपटसुंभ तज्ज्ञ शेतकर्‍यांना जणू काही फार मोलाचा आणि क्रांतीकारी मूलमंत्र सांगतो आहोत, अशा थाटामाटात मार्केटिंगसारखा बोजड शब्द वापरून शेतकर्‍याला सल्ले द्यायला उतावीळ असतात.

पूर्वी गावागावात बाराबलुतेदारांचे व्यवसाय चालायचे, गावागावात तेलघाण्या होत्या. गुळाची गुर्‍हाळं होती, हातमाग होते, कवेलू बनविण्याच्या भट्ट्या होत्या, कुंभारांचा कुंभारवाडा होता. तेलबियांपासून तेल, तूर-चण्यापासून डाळ, धानापासून तांदूळ, ज्वारी-बाजरी-गव्हापासून पीठ गावातच तयार होत होते. ही तेव्हाची शेतमाल प्रक्रियाच होती ना? आता शासकीय धोरणांच्या कृपेने गावात पिठाची चक्की हा एकमेव कुटीरोद्योग उरला आहे. बाकी सारंच शहरात-महानगरात पळालं आहे. हा बदल आपोआप घडलेला नाही. याला शासनाची इंडियाला पूरक आणि भारताला मारक शेतकरीविरोधी धोरणेच जबाबदार आहेत.  इस्रायली शेती, शेतकरी व त्यांचं तंत्रज्ञान या विषयी बोलणारे चिक्कार आहेत. रस्त्याने चालायला लागलं की जागोजागी ठेचा लागतात इतके मार्गदर्शक गल्लोगल्ली झाले आहेत पण; इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणाविषयी कुणीच “माईचा लाल” बोलायला तयार नाही. शेतीविषयात भरारी घेण्यात इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा सिंहाचा वाटा आहे. तिथले शेतीधोरण शेतीला पूरक आहेत भारतासारखे मारक नाहीत, हे मात्र जाणीवपूर्वक मांजरीच्या शेणासारखे या तज्ज्ञाकरवी झाकून ठेवले जाते.

स्वातंत्र्योत्तर काळात शहरातील औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी शेतमाल स्वस्तात लुटून नेणारी धोरणे राबविली गेली त्यामुळे गावात बचत निर्माण होणे थांबले आणि खेडी भकास होत गेली. शेतमाल स्वस्तात मिळाल्याने आणि पक्का माल महाग विकण्याची मुभा मिळाल्याने शहरात-महानगरात बचत निर्माण झाली. बचत निर्माण झाली म्हणून शहरात कारखानदारी वाढली आणि शहरे फुगत गेली. जेथे बचत निर्माण होत नाही तेथे प्रक्रिया उद्योग उभे राहू शकत नाही. गाव ओसाड झाले आणि गावात प्रक्रियाउद्योग निर्माण होत नाही याचे कारण येथे दडले आहे. आमचे शेतकी तज्ज्ञ वैचारिक पातळीवर खुजे असल्याने त्यांना हे कळत नाही. त्यामुळे ते शेतकर्‍यांना दोष देत फ़िरत असतात. शासकीय योजनांचा लाभ शेतकर्‍यांना घेता येत नाही असा “वड्याचे तेल वांग्यावर काढणारा” राग आळवत बसतात. धोरणे आखताना चक्क शेतकरी विरोधी आखायची आणि वरून पुन्हा शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत असे सल्ले देत फिरायचे हा चक्क वाह्यातपणा आहे.

मी निसर्गशेती, कमी खर्चाची शेती, पारंपरिक शेती, सेंद्रीयशेती वगैरे कोणत्याही शेतीपद्धतीच्या विरोधात अजिबात नाही, याउलट शेतकर्‍यांसमोर शेती पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असले पाहिजे, या मताचा आहे. शेतकर्‍याला जे सोयीचे वाटेल, त्याच्या खिशाला परवडणारे असेल तसे तो स्वीकारेल. हा त्याच्या व्यवसाय स्वातंत्र्याचा भाग म्हणून मान्य केले पाहिजे. पण होते असे काही मंडळी स्वत:ला ब्रम्हदेवाचा अवतार समजून किंवा ऋषी-महाऋषी भासवून आम्ही सांगतो तसे केले तर तुझ्या शेतीत करोडो रुपयाचे उत्पन्न येईल आणि तू मालामाल होशील, अशी बतावणी करून फीच्या माध्यमातून पुन्हा शेतकर्‍यांची लूटच करून जातात. शेतकरी देशोधडीला लागतो आणि यांची दुकानदारी मात्र “दिवसा दुप्पट आणि रात्रीची तिप्पट” या वेगाने बहरत जाते. त्यालाही माझा आक्षेप नाही मात्र शेतमाल लुटीच्या व्यवस्थेबद्दल ही मंडळी तोंडामध्ये चक्क बोळे कोंबून असतात, यावर माझा आक्षेप आहे.

पगारी शेतीतज्ज्ञांचे तर बरे असते. काही वर्ष रासायनिक खतांचा वापर करा म्हणून सांगत सुटतात, त्याचाही ते पगार घेतात. मग रासायनिक खतांचा वापर टाळा म्हणून सांगत सुटतात. त्याचाही पगार घेतात. यातच त्यांच्या नोकरीचे आयुष्य निघून जाते. पण पुन्हा मरेपर्यंत पेन्शन आहेच. कर्तृत्व काय तर एकदा ’करा’ म्हणून सांगीतले आणि एकदा ’टाळा’ म्हणून सांगितले. मला असे वाटते की शेतकर्‍यांना आता सल्ले वगैरे देण्याची अजिबात गरज उरलेली नाही. शेतमालाच्या भावाचा मुद्दा बाजूला ठेवून अन्य उपचार करण्याची तर अजिबातच आवश्यकता नाही. जर तुम्हाला शेतीच्या भल्यासाठी प्रयत्न करतो आहोत, असा आव आणायचा असेल तर निदान शेतमालाच्या भावाचा प्रश्न निकाली निघेपर्यंततरी सर्वांनी मिळून आपले लक्ष्य शेतमालाच्या भावाच्या प्रश्नावरच केंद्रित केले पाहिजे.

मी एक उदाहरण सांगतो. ४  वर्षापूर्वी माझा एक जवळचा नातेवाईक आजारी पडला होता. आजार तसा साधा होता. पण त्याला सतत ताप यायचा. ताप आला की १०५ डिग्री सेल्सियसच्याही पुढे जायचा. ताप चढला की पॅरसिटॉमालसहित कुठल्याही औषधाने उतरतच नव्हता. फक्त गार पाण्याच्या कापडीबोळ्याने अंग पुसून काढले की ताप उतरायचा पण तोही तात्पुरताच. काही मिनिटातच पुन्हा चढायचा. सर्व उपचार केलेत पण यश येत नव्हते. १५ दिवस लोटले पण काहीच सुधारणा होत नव्हती. हिंगणघाटचे डॉक्टर झाले, वर्ध्याचे शासकीय रुग्णालय झाले, सेवाग्राम इस्पितळात उपचार करून झाले पण ताप उतरायचे नावच घेईना उलट आजार आणखी गंभीर होत गेला. शेवटी पेशंट घेऊन आम्ही नागपूरला एक्स्पर्ट डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने तपासल्यानंतर आजवर केलेल्या औषधोपराची माहिती घेतली आणि म्हणाले की जितका औषधोपचार करायला तेवढा करून झाला आहे. आता मी आणखी कुठले औषध देऊ? काहीही द्यायचं बाकी राहिलेलं नाही. हे ऐकून आम्ही अक्षरश: हादरलोच. मग थोडा विचार करून डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे. आम्ही म्हणालो, काय खर्च येईल तो येऊ द्या साहेब चिंता करू नका पण उपचार कराच. त्यावर डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे “उपचारच न करणे.” पुढील ७२ तास रुग्णाला अजिबात औषधच द्यायचे नाही. मला खात्री आहे की पेशंटवर तोच एकमेव उपचार आहे. आम्ही होकार दिला. औषधोपचार बंद केल्याने कदाचित जर काही अघटित घडले तरी आम्ही डॉक्टरला दोष देणार नाही, असेही लेखी स्वरूपात लिहून दिले.

रुग्णाला औषध देणे बंद केले आणि पाच-सहा तासातच ताप उतरायला लागला. १५ दिवसापासून न उतरलेला ताप सातव्या तासाला ताप पूर्णपणे उतरला. पुन्हा फिरून ताप आलाच नाही. रुग्ण पूर्णपणे बरा झाला तो सुद्धा औषधी देणे थांबवल्याने. शेतीचेही तर असेच होत नाही ना? गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. शेती नावाचा पेशंट एकच आहे आणि त्यावर औषधोपचार करणारे तज्ज्ञ आहेत लक्षावधी. संपूर्ण भारतवर्षात शेतीचे मुख्य दुखणे एकच आहे आणि तेही सार्वत्रिक समान आहे मात्र सुचविण्यात येणारे इलाज नाना तर्‍हेचे आहेत. जो येतो तो शेतकर्‍याला वाटेल तसा डोज पाजूनच जातो. शेतीची मुख्य बिमारी एकच; शेतमालास योग्य भाव न मिळणे. पण इलाज मात्र भलतेच चालले. कदाचित नको त्या उपचारानेच तर शेती व्यवसाय आणखी दुर्दशेकडे ढकलला जात नाही ना? याचाही प्रामुख्याने विचार करायची वेळ आली आहे.

शेतकरी हा मुळातच उत्पादक आहे. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे त्याच्या रक्तामांसातच भिनले आहे. सोबत पिढोनपिढ्यांकडून चालत आलेला वारसा आहे आणि बालपणापासूनच शेती कशी करायची याचा त्याला अनुभव आहे. तरीही त्याला पावलोपावली सल्ले देण्याची आवश्यकता आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. बीटी आली तेव्हा संशोधकांचे म्हणणे असे होते की, देशभरात बीटी वाण लागवडीखाली यायला वीस-पंचेविस वर्षे लागतील. प्रत्यक्षात दोन ते तीन वर्षातच देशभर बीटीवाणाचा प्रसार झाला. त्यासाठी शासकीय पातळीवरून काहीच प्रयत्न करायची गरज पडली नाही. चांगलं असेल ते ते अंगिकारण्याची क्षमता शेतकर्‍यांना निसर्गानेच दिलेली आहे.

उत्पादन कसे घ्यावे, हे शेतकर्‍यांना सांगायची गरजच नाही. फक्त शेतमालाचे भाव ठरवणे त्याच्या हातात नाही म्हणून शेती तोट्यात जात आहे. शेतीत सुबत्ता येऊन बचत निर्माण करायची असेल तर सर्व शेतकरी हितचिंतकांनी “शेतमालास उत्पादन खर्चावर रास्त भाव” मिळण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत वारंवार शासकीय पातळीवरून जो अडथळा निर्माण करण्यात येतो त्याला थोपवून धरणे गरजेचे आहे. शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे जर सरकार राबवू शकत नसेल तर शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------
दि.३१/०५/२०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित माझा लेख


May 29, 2015

'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥

म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्‍यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्‍यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥

ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली
शेतकर्‍यांना स्मशानात थेट घेऊन गेली
कुणास पडलं सुतूक, जरी बदाबदा मेले? ....॥

दुष्काळाच्या वार्‍यापायी शेंगा नाही झोंबल्या
ज्या काही झोंबल्या त्या भावापायी लोंबल्या
चाळीस रुपये किलोवर कापूस रांगत नाही
सोयाबिनच्या इज्जतीले व्यापार हुंगत नाही
काय करू काय नाही, समजत नाही मले ....॥

कास्तकाराचे हाल भाऊ, कुत्रे पुसत नाही
काय पेरावं यंदा, काही मार्ग सुचत नाही
ना सुलतानाची हमी, ना कायदोबाचे ’अभय’
म्हणत असतो तरी आम्ही, “भारतमाता की जय”
आमच्यात एकी नाई म्हून, इथं डाकू पैदा झाले ....॥

                                - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------------

May 27, 2015

एक केवळ बाप तो

एक केवळ बाप तो


तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो

तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी
ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो

अंतरात्म्याचा दुरावा वाढला जर फ़ार तर
अंतराला अंतराच्या अंतराने कापतो

वाचणारा वाचतो पण; का? कशाला? जाणतो?
वाढवाया आत्मगौरव छापणारा छापतो?

आसवांच्या आसवांना धीर द्याया धावतो
निर्भयाला अभय ज्याचे एक केवळ बाप तो

                            - गंगाधर मुटे 'अभय’
----------------------------------------------

May 23, 2015

वाङ्मयशेतीचा वर्धापन दिन

वाङ्मयशेतीचा वर्धापन दिन

नमस्कार मित्रहो,

        आज माझ्या "वाङ्मयशेतीचा" ४ था वर्धापनदिन. मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, सकाळी ८.२९ वाजता www.baliraja.com आणि www.gangadharmute.com संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. 

      मायबाप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझी वांगंमय शेती तोट्यात गेली असली तरी मायबाप इंटरनेट आणि रसिकांच्या कृपेने माझ्या वाङ्मयशेतीला मात्र चांगले भाव मिळत आहेत, हे या दोन्ही संकेतस्थळावरील वाचक/वाचनांच्या संख्येवरून निर्विवाद सिद्ध व्हायला लागलेलं आहे.

     पिढ्यान्-पिढ्यापासून शेतकर्‍यापर्यंत जो-जो आला तो-तो शेतकर्‍याला सल्ला द्यायला किंवा अक्कल शिकवायलाच आला. एका दाण्यातून हजार दाणे निर्माण करणार्‍याला शुद्र व बेअक्कल गाढव समजून त्याला कोणी बोलुच दिले नाही, त्याचे ऐकण्याची तर गोष्टच दूर...! सर्व मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे शेतीच्या शोषणाची समर्थकच असल्याने त्याला प्रसारमाध्यमात स्थान मिळाले, तेही नगण्यच. पण आता इंटरनेट शेतकर्‍यांचा मदतीला आलंय. या माध्यामाने सर्वांना एक जागतिक दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय.

    नोव्हेंबर २००९ मध्ये मी अकस्मात आंतरजालावर आलो. एका सार्वजनिक संकेतस्थळावर १-२ लेख लिहिल्या नंतर तेथे घमासान चर्चायुद्ध सुरु झाल्याने इंटरनेटसुद्धा शेतकर्‍यांसाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते, याची जाणिव झाली. एका क्लिकमध्ये आपले विचार सातासमुद्रापल्याड जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकते, जगभरातील मराठी माणसांशी आपण संवाद साधू शकतो; या बाबींनी माझ्यावर एवढी भूरळ घातली की मी मग मागे वळून पाहिलेच नाही. माझ्या आंतरजालावरील वावराला आता उणेपुरे साडेपाच वर्ष होत आहेत.या साडेपाच वर्षात माझे शेतीविषयक लेखन २० लाखापेक्षा जास्त वाचकापर्यंत पोचले आहे, ही फ़ार समाधानाची बाब आहे.

     मी आंतरजालावर लेखन सुरू केले तेव्हा मला स्पष्ट जाणीव होती की मी ज्यांच्यासाठी लिहिणार आहे तो आंतरजालावर उपस्थित नाही. तो आपल्या शेतात घाम गाळत शेतीकाम करण्यात गुंतलेला आहे आणि जो आंतरजालावर उपस्थित आहे तो बहुतांशी बिगरशेतकरी आहे. सातबारा नावाने असणे आणि प्रत्यक्ष शेतीवर पोट असणे या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. दोन्ही अवस्थांचे हितसंबंध जवळजवळ परस्पर विरोधी आहेत. शहरात अथवा खेड्यात राहून शासकिय, निमशासकीय, खाजगी कंपंन्यामध्ये नोकरी करणारा अथवा व्यापार, उद्योग करणारा शेतकर्‍याचा मुलगा असला तरीही त्याला सुध्दा बिगर शेतकरी समाजासारखेच एका रुपयाला चार किलो कांदे, एका दिवसाच्या वेतनात वर्षभर कुटुंबाला पुरेल एवढे अन्नधान्य मिळाले तर हवेच असते. शेतीत पिकणारा माल स्वस्तात स्वस्त मिळवणे हा आपला निसर्गदत्त अधिकार आहे, हीच त्याचीही मनोभावना असते. 

     अशा विपरित स्थितीत शेतमालाच्या रास्त भावाला मध्यवर्ती स्थानी ठेवून केलेले लेखन फ़ारसे पसंत केले जाणार नाही, याची मला खात्री  होती पण माझे लेखन पसंत केलेे जाते किंवा नाही यापेक्षा शेतकर्‍यांचे गार्‍हाणे आणि शेतीचे अर्थकारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे जास्त महत्वाचे आहे, माझे लेखन केवळ लेखन नसून प्रबोधनयज्ञ असणार आहे, याचीही मला जाणीव असल्याने माझा वैचारिक किंवा भावनीकगोंधळ उडाला नाही. त्यामुळे माझ्या लेखनाचे समर्थन आणि टीका मला स्थितप्रज्ञपणाने स्विकारता आल्या.

   या प्रवासात माझ्या gangadharmute.wordpress.com या ब्लॉगला २०१० आणि २०१२ चा सलग दोनदा स्टार/एबीपी TV चा विश्वस्तरीय "ब्लॉग माझा" पुरस्कार मिळाला.

    माझा साडेपाच वर्षाचा लेखाजोखा :-
   माझे संकेतस्थळ/ब्लॉग आणि कंसात वाचने/वाचकांची संख्या खालीलप्रमाणे :-

०१) www.baliraja.com  बळीराजा डॉट कॉम - (२,८५,७१०)

०२) www.gangadharmute.com   माझी वाङ्मयशेती - (२,७५,८४२)

०३) gangadharmute.wordpress.com - रानमोगरा - (८८,४००) - सलग दोनदा स्टार/एबीपी ब्लॉग माझा पुरस्कार प्राप्त.
०४) www.sharadjoshi.in - योद्धा शेतकरी - ( ७३,०२५)

०५) baliraja.wordpress.com - बळीराजा - ( ८३,३३८ )

०६) gangadharmute.blogspot.com - शेतकरी विहार - ( ३६,९४७ )

०७) gangadharmutespoem.blogspot.in - माझी कविता - (१६,६३४)

०८) marathigazal.wordpress.com - माझी मराठी गझल - ( १६,९११ )

०९) shetkari-sanghatana.blogspot.com - शेतकरी संघटना - (६,७९६)

१०) ranmewa.blogspot.in - रानमेवा - (३,५२२)

एकूण वाचन संख्या - ८,८७,०९७

खालील संकेतस्थळावरील लेखन वाचकांची एकूण संख्या उपलब्ध नाही. मात्र ती सुद्धा काही लाखाच्या घरातच असणार हे उघड आहे.

०१) www.facebook.com/gangadharmute

०२) www.youtube.com/gangadharmute

०३) www.shetkari.in

०४) sharad-anant-joshi.blogspot.in

०५) www.twitter.com/gangadharmute

०६) www.facebook.com/groups/kawita

०७) www.facebook.com/my.net.farming

०८) www.facebook.com/groups/baliraja

०९) www.maayboli.com/user/26450/created

१०) www.misalpav.com/user/8199/track

११) www.mimarathi.net/user/382/mytrack

१२) www.sureshbhat.in/user/1099/track

      एकूणच शेतीसाहित्य वाचनाबाबत असलेली वाचकांची उदासिनता आणि मुद्रित शेतीसाहित्याला दुर्मिळ असलेला नागरी वाचकवर्ग हा आजवरचा इतिहास लक्षात घेतला तर आंतरजाल हे शेतीविषयासाठी फार मोठे व्यासपीठ ठरू शकेल, याबद्दल आता माझ्यामनात तिळमात्रही शंका उरलेली नाही.

Thank you Mr Internet!

                                                                                                                      - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------

Apr 29, 2015

श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२

श्री तिर्थक्षेत्र रावेरी

सीतामंदीर तिर्थक्षेत्राचे महात्म्य


        श्री क्षेत्र रावेरी हे गांव यवतमाळ जिल्हा त. राळेगाव वरुन दक्षिणेस ३ कि.मी आहे. या गावाला पौराणिक इतिहास लाभला आहे.
       त्रेतायुगात रामायण कालीन इतिहासाप्रमाणे अयोध्येचे राजा दशरथ, त्यांचा पुत्र प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीतेसह १४ वर्षाच्या वनवासात असताना रावणाने सीतेचे अपहरण करून लंकेत अशोकवनात ठेवलेले होते. प्रभू रामचंद्राने रावणाचा पराभव करून सीतेला अयोध्येत परत आणल्यानंतर पावित्र्याबद्दल शंका निर्माण झाली. सीतेने अग्निपरिक्षा देऊन पावित्र्य सिद्ध केले परंतु समाजातील कोणत्यातरी व्यक्तीचे समाधान झाले नाही. प्रभू रामचंद्राने समाजाची सुव्यवस्था राखण्यासाठी सीतेला गरोदर अवस्थेत लक्ष्मणाच्या रथात बसवून दंडकारण्यात सोडून दिले.

**************
  Raveri


          श्रीक्षेत्र रावेरी गावातील पूर्वजापासून वयोवृद्ध मंडळी याबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, जेव्हा रामाने सीतेला गरोदर अवस्थेत वनात सोडून दिले तेव्हा सीतेने याच रावेरी गावात वाल्मिकॠषिचे आश्रयाने वास्तव्य केले. रावेरी हे गाव आणि आसपासचा परिसर हा दंडकारण्याचा भाग असून याच गावात लव आणि कूश यांचा जन्म झाला. लव-कुशाचा जन्म झाल्यानंतर सीतेने गावातील लोकांकडे पसाभर गहू मागितला. गहू देण्यास लोकांनी नकार दिल्यावर तिने गावकर्‍यांना शाप दिला की या गावात गहू पिकणार नाही. शापाप्रमाणे या गावात गहू पीकत नव्हता. परंतू अलिकडे सन १९०० चे दरम्यान गावातील लोकांनी सीतेला साकडे घालून पिकलेला गहू सीतामंदीरात भेट दिल्याशिवाय आम्ही गव्हाचा एकही दाणा खाणार नाही. असा संकल्प करून तो संकल्प वार्षिक पाळल्यामुळे गावात गहू पिकण्यास सुरुवात झाली.

         आणखी अशीही एक कहाणी आहे की, रामाचा अश्वमेघ नावाचा घोडा लव-कुशांनी अडविला आणि त्या घोड्याबरोबरोबर आलेल्या शत्रुघ्न, लक्ष्मण यांचा पराभव करून घोड्याबरोबर आलेल्या हनुमंताला वेलीने बांधून ठेवले. रावेरी गावात वेलीने बांधलेल्या स्थितीतील ९ फ़ूट उंचीची हनुमंताची भव्य मुर्ती आहे. ज्या ठिकाणी लव-कुशांनी अश्वमेघ घोडा पकडला ते ठिकाण तमसा नदीचे (रामगंगा) तीरावर आजही पाहण्यास मिळते. गावाच्या दक्षिण भागाकडून तमसा (रामगंगा) नदीचे वळण असून उत्तर वाहनी असलेल्या नदीचे तिरावर जगातील एकमेव वनवासी सीतेचे हेमाडपंथी मंदीर आहे. तसेच बाजुला वाल्मिक ऋषिचा आश्रम सुद्धा आहे. शिवाजी महाराजांचे कालखंडातील पाच मोठे बुरूज (गढी) व त्याला भिंतीचा असलेला परकोट आजही पाहण्यास मिळतो.

         अशा पौराणिक इतिहास असलेल्या गावात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशींनी २ मे १९८२ ला भेट देऊन संपूर्ण इतिहास जाणून घेतला.

        जगातील एकमेव सीतेचे मंदीर जिर्ण असून मंदीराचा जिर्णोद्धार करण्याची गरज असल्याचे सांगीतले, परंतू एका शेतकरी राजाची भूमीकन्या सार्वभौम राजाची राणी वनवासी सीतेला गरोदर अवस्थेत वनात सोडल्यानंतर तिची काय अवस्था झाली असेल. वाल्मिकी ऋषीचे आश्रयाने वनवासी सीतेने धैर्याने आपल्या दोन मुलांचा सांभाळ करून समाजाला दाखवून दिले. त्याचप्रमाणे समाजातील ६०% महिला आपला घाम गाळून शेतीचे कष्ट करते. परंपंरेने चालत आलेला अन्याय होतच आहे. त्यासाठी महिलांना आधाराची गरज आहे. ज्याप्रमाणे वनवासी सीतेला श्री क्षेत्र रावेरी हे आधारस्थान मिळाले त्याचप्रमाणे समाजातील परित्यक्त्या महिलांसाठी सुद्धा रावेरी हे माहेर झाले पाहिजे, अशी मा. शरद जोशींनी गावकर्‍यांसमोर इच्छा प्रगट केली. १९९४ ला मा. शरद जोशींनी शेतकरी महिला आघाडीचा लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमाचे रावेरी येथे आयोजन करून शेतकरी महिला आघाडी समोर विषय ठेवला. हे काम शेतकरी महिला आघाडीने करावे अशी मा. शरद जोशी यांनी सुचना करून आम्ही शेतकरी संघटनेचे पाईक बंधू तुमच्या सोबत असल्याचे सांगीतले.

         सन नोव्हेंबर २००१ ला मा. शरद जोशींनी शेतकरी महिला आघाडीचे अधिवेशन रावेरीला घेऊन अधिवेशनात जगातील एकमेव सीता मंदीराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी व मा. शरद जोशी यांनी स्वत:च्या मिळकतीतून दहा लाख खर्चून मंदीराचा जिर्णोद्धार करून २ ऑक्टोंबर २०११ ला लोकार्पण सोहळा घेऊन गावाच्या सुपूर्द करण्यात आले.

          परित्यक्त्या महिलांचे श्रीक्षेत्र रावेरी हे माहेरघर व्हावे, ही संकल्पना मा. शरद जोशींनी पुढे नेण्यासाठी गावकर्‍यांना आवाहन केले. श्रीक्षेत्र रावेरी येथे श्री हनुमान मंदीर संस्थान रावेरी, र.नं. ए ६३६ या नावाने विश्वस्त ट्रस्ट आहे. मा. शरद जोशींची संकल्पना पुढे नेण्यासाठी विश्वस्त मंडळाने गावातील २५ तरुण युवकांची सन २०१० ला सौंदर्यीकरण विकास समिती निर्माण करून समितीमार्फ़त रावेरी हे गाव तिर्थक्षेत्र, परित्यक्त्या महिलांचे माहेर कसे करता येईल त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू केले आहे. तरी या कार्यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
************** 

Raveri

वाल्मिकी ऋषीचा आश्रम व समोरील परिसर
************** 

Raveri

**************

Raveri

**************
  Raveri

**************
  Raveri

************** 

Raveri

************** 

Raveri

गाभार्‍यातील मुर्ती
************** 

  Raveri 

सीतेची न्हाणी
 ************** 

Raveri

मंदीराचा दक्षिणभाग
************** 

Raveri

************** 

Raveri

वेलीने बांधलेल्या स्थितीतील ९ फ़ूट उंचीची हनुमंताची भव्य मुर्ती
************** 

Raveri

************** 

Raveri

दिनांक २७/०४/२०१५ रोजी सीतानवमी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर श्री विजय निवल, सौ. स्वाती मते, श्रीमती सुलोचना राहणे, सौ. सरोज काशीकर, सौ. शैलजा देशपांडे, गंगाधर मुटे व ट्रस्टचे पदाधिकारी.
************** 
Raveri

या प्रसंगी स्वत:ची किडणी देऊन पतीचे प्राण वाचविणार्‍या सौ. स्वातीताई मते यांचा व मुलांचे योग्य पालनपोषण करून त्यांना उच्चपदस्थ नोकरीपर्यंत पोचविणार्‍या सुलोचनाबाई राहणे यांचा शाल व श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार सौ. सरोज काशीकर यांनी त्यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले.
**************

Raveri

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप.
************** 

Apr 26, 2015

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥

शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥

घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला
तुमच्या लेकीसूना घेऊन, नाचासाठी या ...॥

इलंक्शनच्या टायमाले, थैल्या ढिल्या करतो
नाक लाजिम करण्यासाठी, चिमटीमध्ये धरतो
तवा कुठं भूमीग्रहण, कायदा येत असते
पैशाबिगर कोणालेच, 'अभय' मिळत नसते
उचला आता धोपटी-बिर्‍हाड, अन चालते व्हा ...॥

                                 - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------------

Apr 21, 2015

पाहून घे महात्म्या

पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने

इतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्‍या
बदलेल भाग्य निव्वळ, घाम गाळल्याने?

मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही
हकनाक तूच मरशील, गळफास घेतल्याने

शेती कसून दाखव, तू विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने

लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे?
नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने!

डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने

                                - गंगाधर मुटे 'अभय'
=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=

Apr 19, 2015

औंदाची शेती : रेकॉर्डब्रेक शेती

औंदाची शेती : रेकॉर्डब्रेक शेती


       अपवाद हा अपवादात्मकच असतो म्हणून त्याचे व्यावहारिक महत्वही अपवादत्मकच असले पाहिजे. अपवादानाने घडणार्‍या अपवादात्मक घटनांचा सर्वसाधारण घटनांशी संबंधसुद्धा अपवादानेच जोडला पाहिजे, अपवादात्मक घटनांचा साध्य आणि सिद्धतेशी सांगड घालण्याचा प्रयत्नही अपवादात्मकच असला पाहिजे, असा धडा मला माझ्या औंदाच्या शेतीने दिला आहे.

       होतं काय की बर्‍याचदा अपवादानेच एखाद्याला ढोबळी मिरचीचे प्रचंड उत्पादन येते. पण या अपवादाला एखादा "उंटावरचा शेतकरी" स्वत:ची यशस्विता समजून घेतो आणि रस्त्याने जो मिळेल त्याला "यशोगाथा" सांगत सुटतो. एखाद्याला एखादे वर्षी मक्यासारख्या पिकाला चांगला भाव मिळतो, तोही अपवादानेच. पण तरी सुद्धा तो शेतकरी जर "उंटावरचा" असेल तर स्वत:च्याच तोंडाने स्वत:चेच पोवाडे गात सुटतो. यावर कुणी असेही म्हणेल की "आम्हाला अपवादाने नव्हे तर बुद्धीचातुर्याने यश मिळाले आहे". त्यावर सरळसोपे उत्तर असे की त्याने निदान सलग चार वर्षाचा त्याच्या शेतीचा बिल-पावत्यासह ताळेबंद सादर करून दाखवावा. जर चारही वर्ष समान गुणोत्तर आढळले तर मी माझी सारी लेखनगाथा आपल्या विचारधारेसह समुद्रात नेऊन विसर्जित करायला तयार आहे.

       पण आव्हान कोणी स्विकारायला तयार नसते कारण वास्तव तसे नसतेच. एखाद्या वर्षी चांगले उत्पादन येते हे खरे; परंतू अनेक वर्ष शेतीतला तोटा भरून काढताना शेतकर्‍याला त्याच्या बायकोच्या अंगावरील मंगळसूत्र विकावे लागते, हे शेतीमधले शाश्वत सत्य झाले आहे, हे कोण नाकारू शकेल? अनेक "कृषिनिष्ठ" शेतकर्‍यांना बॅंकेतून कर्ज काढल्याशिवाय स्वत:च्या बायकोला वस्त्र आणि अंतर्वस्त्र घेताच येत नाही, हे मी पुराव्यासहीत केव्हाही सिद्ध करून दाखवायला तयार आहे. तद्वतच या "यशोगाथा"वाल्यांचा मागील फ़क्त दहा वर्षाचा इतिहास तपासावा, त्याचे पोट शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायावर अवलंबून नसेल, त्याला चोर्‍या करण्याची सवय नसेल, व्याज-बट्ट्याची गावठी सावकारी नसेल आणि फ़क्त शेती हेच जर त्याच्या उपजिविकेचे साधन राहिले असेल तर त्याचीही अवस्था यापेक्षा वेगळी आढळून येणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो.

       मी १९८५ साली शेती सुरू केली. तेव्हापासून नाना तर्‍हेचे प्रयोग करून झाले. उभा महाराष्ट्र पालथा घालून झाला. देशाच्या कानाकोपर्‍यातली शेती आणि शेतीची पद्धत न्याहाळून झाली. मिशीला पीळ देत मोठमोठ्या बढाया मारणार्‍या पाटलाचे माजघर पाहून झाले आणि अशा पाटलाच्या माजघरात शिरल्यावर त्याच्या गळलेल्या मिशाही पाहून झाले. विदर्भातील शेतकर्‍यांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातला द्राक्ष, उस उत्पादक शेतकरी दहापट जास्त कर्जबाजारी आहे, हेही पाहून झाले. 

        हे सांगायचे औचित्य असे की, यावर्षी सार्वत्रिक नापिकी आहे. यंदा शेतीव्यवसायात सर्वत्र हाहाकार माजला असताना व दुष्काळाने शेतीउत्पादनात प्रचंड घट आली असताना माझी औंदाची शेती मात्र याला अपवाद ठरली आहे. या मला विक्रमी उत्पादन झाले व माझ्या स्वत:च्याच शेतीतील उत्पादनाचे ३० वर्षाचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. पण मागील वर्षी कमी उत्पादन होऊनही घरात जेवढा पैसा आला तेवढाही पैसा यावर्षी घरात आलेला नाही कारण तूर वगळता अन्य पिकाचे बाजारभाव मागील वर्षी पेक्षा यावर्षी कमी आहेत.

       अधिक उत्पादन घेतल्याने अधिक फ़ायदा होतो, असे फ़क्त कागदीतज्ज्ञच म्हणू शकतात. प्रत्यक्ष शेती करून शेती उत्पन्नावरच जगून पाहिल्याशिवाय किंवा दुसर्‍याच्या शेतीच्या जमाखर्चाचा गणीतीय ताळेबंद मांडल्याशिवाय कुणालाच (अगदी ब्रह्मदेवालासुद्धा) शेतीचे अर्थशास्त्र कळू शकत नाही, हे माझे मत पुन्हा एकदा अधिक ठाम झाले आहे. 

       तसा हा विषय व गणीत साधे, सोपे आणि सरळ आहे. पण शेतीविषयात हात घालू इच्छिणारांमध्ये एक अनुवंशीय खोट आलेली असते. ती खोट अशी की शेतकर्‍याला गाढव गृहीत धरणे व जेवढी अक्कल मला आहे तेवढी अक्कल शेतकर्‍याला नसते, अशी स्वत:ची ठाम समजूत करून घेणे. त्यामुळेच शेतीव्यवसायाच्या उत्थानासाठी "शेतीमालाच्या भावाला" बगल देऊन अन्य गृहितके "उंटावरच्या शहाण्यांकडून" मांडली जातात.
मला यावर्षी रेकॉर्डब्रेक उत्पादन झाले यामागे माझे नियोजन, परिश्रम, आर्थिक गुंतवणूक वगैरे बाबींचा अंतर्भाव नक्कीच आहे, याबाबत दुमत नाही; पण एवढे मी यापूर्वीही केलेले आहे, करत आलेलो आहेच. मग एवढे उत्पादन या पूर्वी का झाले नाही? याचे उत्तरही तसे फ़ार सोपे आहे. शेतीचा संबंध थेट निसर्गाशी आहे आणि निसर्ग विविधतेने नटलेला आहे. एकवर्ष दुसर्‍या वर्षासारखे कधीच नसते, पाऊसमान प्रत्येकवर्षी समान असू शकत नाही. दर चार वर्षातून एकदातरी ओला अथवा कोरडा दुष्काळ नक्कीच पडणार, चारवर्षातून एकदा तरी गारपीठाचा वर्षावही हमखास होणार. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी खर्च सारखाच केला तरी दरवर्षी उत्पादनाचा आकडा सारखाच राहील हे कदापीही शक्य नाही. त्यामुळे शेतीमध्ये चार वर्षाच्या उत्पादनाची गोळाबेरीज करून त्याला चारने भागूनच वार्षिक उत्पादनाची सरासरी काढली गेली पाहिजे आणि हेच यावरचे एकमेव उत्तर आहे.

                शेतीत सधनता आणणे अजिबात कठीण नाही पण शेतीत सुबत्ता यावी, हीच अनेकांची आंतरिक इच्छा नसते. त्यामुळे "शेतीमालाचा भाव" हा प्रमुख मुद्दा सोडून अन्य पर्याय सुचविण्याचे व तेच अधिक ताकदीने मांडण्याचे कार्य अनेकांकडून अव्याहतपणे मांडले जाते. त्यामागे मूळ मुद्द्यावरील लक्ष दुसरीकडे वळवणे, हा छुपा डाव असतो. शेतकरी पुत्रांनी हा डाव ओळखला पाहिजे. शेतकरीविरोधी धोरणांच्या पुरस्कर्त्यांच्या सापळ्यात अलगद फ़सण्यापासून स्वत:ला वाचविले पाहिजे.

- गंगाधर मुटे

---------------------------------------------------------------------------------------
 sheti

यंदाची सुरुवातच खतरनाक झाली. मातीत बियाणं पडलं आणि वरुणराजा दिर्घ रजेवर गेला.
********************************* sheti

तुषार सिंचन - दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार
********************************* sheti

पाऊस येईल तेव्हा येईल.. त्यासाठी पेरणी थांबवणे शक्य नसते.
********************************* sheti

पेरते व्हा! पेरते व्हा!!
********************************* sheti

पावसाची शाश्वती नसतानाही आपले सर्वस्व मातीच्या स्वाधीन करण्याची कणखरता फ़क्त शेतकर्‍याकडेच असते.

********************************* sheti

भुईला दिली ओल नाही ढगाने
कसे अंकुरावे अता हे बियाणे?
********************************* sheti

मात्र तणाला फ़ारच जोर
********************************* sheti ********************************* sheti ********************************* sheti

वादळवार्‍यामुळे गव्हाच्या उत्पादनात सुमारे ३० टक्के घट आली.
********************************* sheti

नवे तंत्रज्ञान वापरायचे?
(शेतमजुरांचे काय होईल, असा प्रश्न कुणालाच पडत नाही)
*********************************

वैश्विक खाज नाही

वैश्विक खाज नाही


शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही

त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही

गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही

शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला
बुद्धी भ्रमिष्टतेवर, उरला इलाज नाही

स्वातंत्र्य देवते तू, ये भारतात थोड़ी
जेथे 'अभय' कुणाला, कुठलेच आज़ नाही

                             - गंगाधर मुटे ’अभय’
=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=

Apr 7, 2015

नाटक वाटू नये


नाटक वाटू नये


थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये

पिकल्या फळांनी लदबदलेले, रान जरी मोकळे
हवे तेवढे भरपूर खावे, फुटवे छाटू नये

सगे-सोबती गाळून घे तू, 'अभय' घप्प मनाने
बिनकाम्यांची अवतीभावती, गर्दी दाटू नये

                             - गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^==

Mar 23, 2015

संमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण

पहिले अ.भा.मराठी शेतकरी साहित्य समेलन, वर्धा
    
संमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण


 शेतकर्‍यांच्या घरी जन्मलेल्या साहित्यिक भावानो, बहिणींनो
आणि त्यांचे कौतुक करायला जमलेल्या अभिजनहो,

            प्रकृतीच्या कारणाने मी या संमेलनाला प्रत्यक्षात हजर राहू शकत नाही याबद्दल दिलगीर आहे. या शेतकरी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी माझी या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड केली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

            शेतकरी, शेती आणि साहित्य यासंबंधी मी शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून अनेक ठिकाणी बोललो आहे, लिखाण केले आहे. त्याचा साहित्यक्षेत्रावर कितपत परिणाम झाला आहे आणि त्याची शेतकरी समाजावर किती छाप पडली आहे हा अभ्यासाचा विषय आहे. या संमेलनाच्या निमित्ताने, मी वेळोवेळी मांडलेल्या काही विचारांची उजळणी करणे अनुचित होणार नाही, कारण मला जे या विषयात मांडायचे आहे ते मी पूर्वीच वेळोवेळी विस्ताराने मांडले आहे.

            सर्वप्रथम, म्हणजे शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात १९८५ साली मी 'आम्ही लटिके ना बोलू' या लेखातून तत्कालीन प्रचलित साहित्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करून शेतकर्‍याघरी जन्मलेल्या साहित्यिकांना आवाहन केले होते. त्यात वर्णन केलेल्या परिस्थितीत आज बरेच बदल झालेले असले तरी साहित्यात कितपत बदल झालेले आहेत आणि असल्यास ते माझ्या शेतकरी भावाबहिणींपर्यंत पोहोचून त्यांच्या मनांत अंगार फुलवण्याइतपत प्रभावी झाले आहे का हे तपासावे लागेल. मी त्या लेखात म्हटले होते की,

            वर्तमानपत्रांत, मासिकांत आपल्या जवळच्यापैकी कोणाचे नाव, फोटो छापून आले म्हणजे आपण केवढ्या कौतुकाने तो अंक मिळवतो, वाचतो, जपून ठेवतो! म्हणजे साहित्यात आपले, आपल्या ओळखीचे आपण शोधत असतो. मग, खरे म्हटले तर, शेतावर राबणार्‍या आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचे चित्रण, प्रतिबिंब आपण साहित्यात शोधायला पाहिजे.

            दर वर्षी पावसाळा यायच्या आधी बीबियाण्यांची जमवाजमव, खर्चासाठी सावकाराची मिनतवारी, सोसायटीतली कारस्थाने, भानगडी, पाऊस येतो किंवा नाही याची चिंता, आल्याचा आनंद, येत नसला तर पोटात उठणारा भीतीचा गोळा, पिकावर येणार्‍या तणांच्या आणि रोगांच्या धाडी, पीक उभे राहिल्यावर होणारा आनंद, बाजारात गेल्यावरची शोकांतिका, वाढते कर्ज, पुढार्‍यांची मग्रुरी, आग लागल्यावर घरातून निसटताना व्हावी तशी गावच्या आयुष्यातून सुटण्याची ज्याची त्याची स्वतःपुरती धडपड या किड्यांसारख्या जीवनात लिहिण्यासारखी प्रचंड सामुग्री आहे; पण ७० टक्के लोकांच्या आयुष्याचे प्रतिबिंब साहित्यात कधीच पडले नाही.

            खुरपताना, गवत काढताना, पिके काढताना, जात्यावर दळताना शेतकरी स्त्रियांनी उत्स्फूर्त म्हटलेली गाणी माळरानातच विरून गेली; मोटेवर, नांगरावर बैलांच्या साक्षीने शेतकर्‍यांनी ढाळलेले दु:खाचे कढ तापलेल्या जमिनीतच जिरून गेले.

            शेतकर्‍याची पिके लुटून नेलेल्या दरोडेखोर लुटारुंच्या तळांवर गायिली गेलेली उत्तान, उन्मत्त गाणी साहित्यात आली.

            मोठ्या लुटारूंनी दरबार भरवायला सुरुवात केल्यावर त्यांचे कौतुक करणार्‍या भाट-शाहिरांची प्रतिभा गाजली, त्यांचे मनोरंजन करणार्‍या कलावंतिणींच्या लावण्यांचा पूर आला, संगीताच्या मैफिली झडू लागल्या. पिके लुटून पेठा, शहरे वसवणार्‍या व्यापार्‍यांच्या, कारकुनांच्या समाजाचे साहित्य तयार झाले. साहित्य असो, संगीत असो, कला असो - शेतकर्‍याचे असे त्यात काहीच नाही.

            इतिहास जसा विजेते लिहितात तसेच साहित्य-संगीत-कलासुद्धा विजेत्यांच्याच असतात. आमचे काहीच नाही; मग, आम्हाला लुटणार्‍यांच्या लावण्या-तमाश्यांत आम्ही आपले मनोरंजन करून घेऊ लागलो; पण त्यात चंद्रकांत राजाच्या मुलीची कहाणी आली, शेतकर्‍याच्या मुलीची नाही. मग, त्यातले त्यात जवळचे साहित्य आम्हाला संतांचे वाटू लागले. कुठेतरी देव आहे, स्वर्ग आहे, मुक्ती आहे; एका नामात गुंगले की सर्व दु:खाचा विसर पडतो; 'शेवटी, देहाच्या दु:खाचा विचार काय करायचा? आत्मा अमर आहे.' या दिलाशात गावोगाव 'रूप पाहता लोचनी'च्या भजनात आम्ही सुटका शोधू लागतो.

            शहरांत गेलेली शेतकर्‍यांची पोरे शहरांत रमली. त्यांत लिहिण्याचे कसब असणार्‍यांनी गावाविषयी लिहिले; पण, शहराला काय पटेल, काय आवडेल याचाच विचार करीत लिहिले. 'हरामखोरांनो! तुम्ही माझे गाव लुटले, या पापाचा तुम्हाला झाडा द्यावा लागेल.' हा टाहो कोणी फोडला नाही. उलट, आपल्या ग्रामीण जन्मामुळे साहित्यात आपल्याला काही ‘राखीव जागा’ असावी असा आक्रोश करणारी एक ‘साहित्य आघाडी’ उभी झाली. शेतकर्‍यांच्या दु:खाचं भांडवल करून त्यावर साहित्यक्षेत्रात स्थानाचा ‘जोगवा’ मंडळी मागू लागली.

            दूरदर्शन (त्या काळी फक्त दूरदर्शन हीच एक कृष्णधवल सरकारी वाहिनी होती.) आता गावोगाव येईल. आज त्यावर अनेक कथा चालू आहेत. हमलोग, खानदान, ये तो है जिन्दगी, रजनी इत्यादि, इत्यादि. या 'हमलोग'मध्ये आम्ही लोक कुठेच नाही. खानदानी शेतकरी कुटुंब नाही, या जिंदगीत आमचे आयुष्य कोठेच नाही. पाच टक्क्यांच्या आयुष्याच्या चित्रणाने ९९ टक्के दूरदर्शन भरला आहे; पण, आपल्या घरच्या लुटून नेलेल्या वैभवाने भरलेल्या त्यांच्या महालांचेआम्ही जिभल्या चाटीत कौतुक करतो; 'हे आमचे आहे, आमच्याकडूनच लुटून नेलेले आहे' या विचाराने संतापून उठत नाही.

            हे अपरिहार्य आहे. साहित्य गुलामांचे नसते, विजेत्यांचे असते. सगळ्या जगाकडे बघायचे झाले तर इंग्रजी वाङ्मयाच्या वैभवशाली दरबारात इंग्रजीची ऐट दाखवणार्‍या इंडियन लेखकांना इंडियातील ग्रामीण साहित्यिकांइतकेसुद्धा स्थान नाही. ताकद साहित्याची नसते, ताकद त्यामागील समाजाच्या सधनतेची असते. युरोपातील देश आज इंग्रजी शिकत नाहीत, अमेरिकी शिकतात. आम्ही अक्षरशः गुलामांचे गुलाम आहोत.

            शेतकरी संघटनेच्या कामाच्या ओघात माझ्या लक्षात आले की, शेतकर्‍यांची जीभ कापली गेलेली आहे. दुसर्‍या कुणाचीतरी जीभ लावूनच त्यांना बोलता येते. (ग्रामीण साहित्यिक शहरी विद्वानांची जीभ लावतात, पुढारी मुंबईची जीभ लावतात. अगदी सोसायटीचा सेक्रेटरीसुद्धा तालुक्याची जीभ लावून बोलतो. शेतकर्‍याच्या जिभेने कोणीच बोलत नाही.)

            आम्ही बोललेले जगात ऐकले जाईल अशी साधने आमच्याकडे नसतील, शेती लुटून औद्योगिकीकरण करणारी व्यवस्था संपेपर्यंत ती साधने आमच्याकडे येणारही नाहीत; पण तोपर्यंत आमची जीभ तोंडात सलामत ठेवली पाहिजे. शब्द कसेही येवोत - अशुद्ध, बोबडे, वेडेवाकडे, तालहीन, सूरहीन, सौंदर्यहीन - पण त्यांतला अर्थ हा आमच्या अनुभूतीचा प्रामाणिकपणा टिकवणारा पाहिजे. साहित्याच्या बाजारी 'मुंगी व्याली, शेळी झाली' वाङ्मयाला उठाव असला तरी निदान आमच्याआमच्याततरी आमचा निश्चय 'आम्ही लटिके ना बोलू'.

            आमची गुलामगिरी, आमचे नाकर्तेपण अर्थकारणातून राजकारणात गेले, समाजकारणात गेले; साहित्यात आणि संस्कृतीच्या क्षेत्रात एक कण जिवंत ठेवू शकलो तर त्या बीजातून शेतकरी आंदोलन यशस्वी झाल्यावर नव्या प्रामाणिक संस्कृतीचे तरू कोटी कोटी तयार होतील.

            तंत्रज्ञान जसजसे विकसित होत गेले तसतश्या उपग्रहाच्या मदतीने विविध वाहिन्या आता गावोगाव आल्या, पण त्याततरी ‘आम्ही लोक’ कितपत दिसतो? शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात या प्रसारमाध्यमांतून अनेक कार्यक्रम - चित्रपट वगैरे सादर केले जातात हे खरे. पण त्यातून शेतकरी, शेती यांच्या परिस्थितीत काही फरक जाणवतो का? का हे पुन्हा 'शेतकर्‍याचे दु:ख' विकणेच आहे? अश्या प्रयत्नांतून शेतकर्‍यांच्या मनाला उभारी मिळत नसेल, त्याच्या मनात लुटारूंच्या विरुद्ध अंगार फुलत नसेल तर तेही 'शेतकर्‍याचे दु:ख' विकण्यासारखेच आहे.

            १९९५ मध्ये जवळाबाजार येथे परभणी जिल्हा मराठी साहित्य संमेलनात मला आग्रहाने अध्यक्ष म्हणून बोलावले होते. दुसर्‍या कुणाची तरी जीभ लावून बोलणार्‍या साहित्यिकांबद्दल माझ्या मनात तिटकारा आहे त्यामुळे मी नकार देत होतो. पण, त्या भागातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि मी बोलेन ते ऐकून घेण्याच्या अटीवर मी तेथे हजर झालो. त्या संमेलनात शेतकरी संघटनेच्या विचारावर श्रद्धा असलेल्या काही कविमित्रांनी काही कविताही सादर केल्या. त्या संमेलनातील माझ्या प्रदीर्घ भाषणात साहित्यिकांकडून शेतकरी समाजाच्या किमान अपेक्षा व्यक्त करताना मी त्या वेळी म्हटले होते;

            मला राजकारणावर बोलायचं नाही; पण देशातील परिस्थिती इतकी गंभीर वाटते की ती सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविण्यासाठी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातील शाहिरांसारखे शाहीर असायला हवेत असे वाटते. आज जर का ते शाहीर जिवंत असते तर मुंबईचं कोणतंच सरकार टिकलं नसतं, पण आजचे आमचे सगळे शाहीर सरकारी मान्यताप्राप्त शाहीर! संमेलनातून मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हातून फेटे, पारितोषके आणि बिदाग्या स्वीकारत कवनं अशा तर्‍हेची करतात, की त्यात शाहिरीचा जिवंतपणा राहत नाही. मग ते काव्य 'ब्राह्मणी' होते. अगदी तुम्ही आता वानगीदाखल जी काव्यं म्हणून दाखवलीत त्यांच्याबद्दलही माझे हेच मत आहे. तुमच्या या काव्याला मान्यता मिळाली त्याचं प्रमुख कारण त्याच्यातील प्रतिमा धूसर झाल्या हे आहे; शेतकर्‍याच्या दु:खाच्या प्रतिमा दाहक राहिल्या नाहीत. मी ज्वारी पिकवतो; पण माझ्या ज्वारीच्या कणसाला चांदणं लगडलेलं दिसलं आणि मला फार हर्ष झाला असं कधी घडलं नाही. ही ज्वारी निघाल्यानंतर त्याचं पुढं काय होतं हे साहित्यात कधी येतच नाही.

            मला सहज एक प्रश्न पडतो. अर्थशास्त्री मूर्ख असतील. गेली पन्नास वर्षे, शेतकर्‍यांची जाणीवपूर्वक लूट होते हे त्यांना कळालं नाही, हे समजण्यासारखं आहे, कारण ते इंग्रजी पुस्तकं वाचतात आणि त्यावरूनच लिहितात; त्या पुस्तकांत लिहिलं नव्हतं म्हणून त्यांना कळला नसावं. पण तुम्ही ग्रामीण साहित्यिक म्हणवणारे, मी शेतमजुराच्या घरी जन्मलो आहे म्हणून मला ग्रामीण साहित्यिकाचा वेगळा तंबू टाकण्याचा अधिकार आहे असं मोठ्या आग्रहाने सांगणारे, शेवटी शेतकर्‍यांचा दु:खांचा बाजार मांडून नागरी साहित्यिकांच्या पेठेत आपलंही दुकान असावं म्हणूनच प्रयत्न करता की नाही? जर तुम्हाला शेतकर्‍याच्या दु:खाची खरी जाण होती तर तुम्ही गावामधील झोपडं आणि गावामधील विटांचं घर यांच्यामधील भांडण का भांडलात? त्याचं कारण, तुमची ग्रामीण भागाची प्रतिमा खोटी होती, तुमचं अर्थव्यवस्थेचं ज्ञान हे डाव्यांच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकातून आलं होतं. तुम्ही असे का नाही म्हटलं, की तुम्ही कितीही ज्वारी पिकवा, कितीही पीक येऊ द्या; कणसाला चांदणं लगडण्याचं सोडा, कर्जाचा बोजा थोडा कमी झाल्याच्या आनंदाची रेघसुद्धा तुमच्या चेहर्‍यावर उमटणार नाही? कितीही पीक आलं तरी शेतकर्‍याच्या डोक्यावरचं कर्ज, आजच्या व्यवस्थेत, फिटण्याची कुठलीही शक्यता नाही असं एकाही कवीला का वाटलं नाही? हे सत्य जर तुम्ही ग्रामीण साहित्यिक मांडू शकला नाहीत तर तुमची अनुभूती किती खरी याबद्दल मला शंका आहे.

            एकेक दिवस, बी पेरल्यानंतर हाती पीक येईपर्यंत किंवा न येईपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकर्‍याच्या मनाला ज्या सहस्र इंगळ्या डसतात त्याचं चित्र साहित्यात मला कुठंही दिसत नाही. साहित्यात नाही आणि सिनेमातही नाही. सिनेमात तर काय? शेतकरी दाखवायचा म्हणजे एकदाच नांगर घालताना दाखवायचा. आणि लगेच सगळी पिकं लहलहरती. मग पुढे, दहा मुली इकडं तिकडं नाचत जाणार! शेतकर्‍याच्या आयुष्याचं चित्रण हे असं होऊन गेलंय. तुम्ही शेतकर्‍याच्या आयुष्यामध्ये बारकाईनं का पहात नाही?

            मी शेतकर्‍याच्या कुटुंबात जन्मलेला नाही; व्यवसायानं मी मुळात शेतकरी नाही आणि तरीदेखील गावामध्ये मी गेलो, की शेतकरी मोठ्या संख्येनं जमतात. कारण मी काय बोलतो हे शेतकर्‍यांना समजतं, मी शुद्ध, नागरी भाषेत बोललो तरी समजतं. मी साहित्यात अडाणी असेन पण ग्रामीण भागातल्या जनतेच्या, विशेषतः मायबहिणींच्या वेदना मला समजतात. कारण मी माझ्या अनुभवाचं विश्व व्यापक करण्याचा सतत प्रयत्न केला, करतो. मी तुम्हाला प्रेमानं आणि कळकळीनं सांगतो, मराठीतलं जे ग्रामीण म्हणून साहित्य आहे, ते खेड्याशी संबंधित आहे असं मला खरंच वाटत नाही. तुम्ही संमेलनं घालाल, डेरे घालाल; ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि आता आणखी काही 'साहित्यं' निघालीत, त्यांची संमेलनं घालाल, त्यांचे मंच उभे कराल, निधी जमवाल; पण तुम्हाला असं वाटत असेल, की यातून मराठी भाषा जगणार असेल तर तो तुमचा भ्रम आहे. याने मराठी भाषा जगणार नाही. मराठी भाषा मोठी करायची असेल तर मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. लहान माणसाची भाषा - मातृभाषा मोठी असूच शकत नाही एवढंच मला सांगायचं आहे. जवळाबाजरचे माझे हे भाषण ऐकून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला पण त्या संमेलनात हजर असलेल्या प्रस्थापित व होतकरू साहित्यिकांना काय वाटले असेल ते कधीच समजले नाही.

            शेतकरी समाजाच्या दृष्टिकोनातून मी साहित्याविषयी करीत असलेली मांडणी शेतकरी संघटनेच्या पाईकांच्या मनात ठसली गेल्याने आपण शेतकर्‍यांच्यात जसे हिंमतीचे बीजारोपण केले तसेच त्या काळच्या ग्रामीण साहित्यिकांच्या मनातही करू शकू या आशेने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऑगस्ट १९९८ मध्ये इस्लामपूर येथे 'ग्रामीण मराठी साहित्य संमेलन' आयोजित करून महाराष्ट्रभरातील मोठमोठ्या मान्यताप्राप्त ग्रामीण साहित्यिकांना त्यासाठी आमंत्रित केले; आणि आश्चर्य म्हणजे, सरकारी सरंजाम आणि बडदास्त नसतानाही मोठ्या संख्येने मोठे मोठे साहित्यिक त्या दोन दिवसांच्या संमेलनाला हजर राहिले. त्या दोन दिवसांत त्या सर्व साहित्यिकांचे सर्व सादरीकरण मी समोर बसून शांतपणे ऐकून घेतले. समारोपाच्या भाषणात मी माझ्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्या भाषणात मी म्हटले होते की,

            साहित्यिक होण्याचा माझा विचार होता. मी कॉलेजमध्ये असताना कथा लिहायला सुरुवात केली होती. माझा त्यावेळचा आवडता लेखक सॉमरसेट मॉम- आजही आवडता आहे- याच्या कथांचं भाषांतर करू लागलो. त्या वेळच्या एका प्रसिद्ध मराठी मासिकामध्ये माझी एक गोष्ट प्रसिद्ध झाली. ‘मुंबईत लोकल गाडीखाली सापडलेल्या एका तरुणाचे प्रेत घरी आल्यानंतर तिथे जमलेल्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या असाव्या’ असा त्या कथेचा विषय होता. चाळीमध्ये त्या तरुणाच्या शेजारी एक विधवा स्त्री रहात होती. तिच्या चेहर्‍यावर काय भाव उमटला असावा याचे वर्णन करताना, मी माझ्या खवचट स्वभावाने, लिहिले होते की, 'एखाद्या विधवा बाईला दुसर्‍या बाईचा नवरा मेल्यानंतर समाधान झाल्यावर व्हावा तसा तिचा चेहरा झाला होता.' माझ्या वडिलांनी ती प्रसिद्ध झालेली गोष्ट वाचली. माझे वडील अगदी वेगळ्या पठडीचे. राग आला तर दुष्ट, कपटी, अभद्रेश्वर, राक्षस यापलीकडे पाचवी शिवी त्यांना माहिती नव्हती. माझी गोष्ट वाचून ते रागाने म्हणाले, "मनुष्य जितका दुष्ट आहे तितकं सगळं कागदावर लिहिण्याची काही आवश्यकता नाही." मी मोठा पंचाईतीत सापडलो; जे आहे, जे मला दिसतंय ते लिहायचं नाही, म्हणजे मग काय करायचं? मग मी हळूहळू साहित्यापासून दूर व्हायला लागलो.

            मी काही जन्माने शेतकरी नाही; पण याबाबतीत माझ्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले ते सांगतो. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काम करीत असताना वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याचा योग आला. तिसर्‍या जगातील गरिबीचा उगम शेतीत आहे हे त्यावेळी लक्षात आले आणि मग मी शेती विकत घेऊन शेतकरी बनलो. मी शेतकर्‍याच्या जातीचा नाही; किंबहुना ज्यांनी शेतकर्‍यांना पिढ्यान पिढ्या पिळलं अशा ब्राह्मण जातीत जन्मलेला आहे. हे मुद्दाम सांगतो, अशाकरिता की, कोणी आपल्या पैतृक वारशाने शेतकर्‍यांशी निष्ठा सांगू नये. मी जेव्हा हिंदुस्थानात परत आलो, त्याच्या आधी बारा वर्षे मराठी बोलत नव्हतो; घरी मुलींबरोबरसुद्धा फ्रेंचमध्येच बोलत होतो. जन्माने शेतकरी नाही, धर्माने नाही; मराठीशीही संपर्क नाही. एवढं असूनसुद्धा शेतकरी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या, त्या गोष्टी मला ग्रामीण साहित्यामध्ये सापडल्या नाहीत. यावर्षी, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा प्रश्न उभा राहिला तेव्हा सगळीकडे खळबळ उडाली; पण फारशी नाही. मंडल आयोगाचा अहवाल जेव्हा व्ही.पी. सिंगांनी मान्य केला त्यावेळी राजेंद्र गोस्वामीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर पाच आत्महत्या झाल्या आणि सरकार पडलं. दिल्लीमधल्या एखाद्या गटानं आंदोलन केलं, काहींनी आत्महत्या केली तर सबंध देश खळबळून उठतो, पेटून उठतो, सरकार पाडतो आणि आज पाचशे शेतकरी मेले तर कोणी म्हणतं "कदाचित कर्जाच्या बोज्यामुळे असेल किंवा इतरही काही कारणांनी हे घडलं असेल, काय भानगडी असतील आपण काय सांगावं?" असं मुख्यमंत्रीसुद्धा खुशाल सांगत फिरू शकतात.

ग्रामीण आणि नागरी समाजातील संबंधांबाबत कोड्याच्या आधीची कोडी माझ्या मनात आहेत, ती सांगतो.

            पूर्वी गावातल्या सावकारांनी, जमीनदारांनी गावातील छोट्या शेतकर्‍यांचं, शेतमजुरांचं शोषण केलं यात काही शंका नाही. पण हे शोषणाचे आदिकारण आहे असं धरणारांची निरीक्षणशक्ती कुठे कमी पडली नाही ना? कागलच्या ब्राह्मण वस्तीतून जातांना तिथं राहतात ती सुखवस्तू दिसतात हे पाहताना त्यांच्यातील सर्वच काही शेतीतून श्रीमंत झालेले नाहीत, एखादा त्यानं स्वीकारलेल्या वकिलीच्या व्यवसायामुळे श्रीमंत झाला आहे हा मुद्दा त्यांच्या लक्षात का नाही आला? मी वीस वर्षांपूर्वी सांगायला सुरुवात केली, की शेतीवर श्रीमंत होणे अशक्य आहे. शेती जर तोट्याचं साधन असेल तर शेती जितकी मोठी तितका तोटा अधिक, शेती घेऊन लाखोंचा नफा मिळवणारे कुणी असतील तर ते अशी कोणती पिकं घेऊन तो मिळवतात त्याचा हिशेब तर सांगू द्यात? वीस वर्षापूर्वी मी हे मांडायला सुरुवात केली तेव्हा वि.म. दांडेकरांपासून सगळ्यांनी विरोध केला. पण आज या विषयावर काही वाद नाही राहिला. आता हिंदुस्थान सरकारने जागतिक व्यापार संघटनेकडे पाठविलेल्या आकडेवारीत कबूल केले आहे, की हिंदुस्थानातल्या शेतकर्‍याला बाजारपेठेत जितकी किंमत मिळाली असती, त्यापेक्षा ७२% कमी मिळावी अशी आमची व्यवस्था आहे. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला शेतकर्‍यांचा प्रश्न समजला असं सांगितलं, कुणी बिनधुराच्या चुली काढल्या, कुणी स्वच्छताकूप काढले, कुणी पाणी जिरवण्यासाठी शोषखड्डे घेतले, कुणी म्हणाले सुबाभूळ लावा, कुणी म्हणाले संकरित गायी पाळा. त्या सगळ्यांना आमचा विनम्र प्रश्न आहे, की तुमच्या ग्रामोद्धाराच्या या ज्या काही योजना होत्या त्या योजनांमध्ये सरकारने जाणीवपूर्वक ठरविलेली ७२% लूट भरून काढण्याचा काही मार्ग होता? तुमच्या लक्षात आलं नसेल तर तो काही अक्षम्य गुन्हा नाही; पण आता ते स्पष्ट झाल्यानंतर तुमच्या अहंकारापोटी तुमचंच म्हणणं चालू ठेवलं तर तुमच्या ग्रामीण जीवनाशी सांगितलेल्या निष्ठांबद्दल संशय तयार होतो.

            मी शेती चालू केली तेव्हा पहिल्यांदा बटाटे लावले. खूप तण झालं होतं, डोंगराच्या उताराचा भाग असल्यामुळे. तण काढायला माणसे लावायला पाहिजेत, नाहीतर बटाट्याचं पीक जाणार अशी परिस्थिती उभी राहिली. माणसं शोधायला गेलो तर गावातल्या लोकांनी सांगितलं, की आता तण काढायला कुणी मजूर मिळणार नाहीत; बाया नाहीत आणि पुरुषही नाहीत. का? तर म्हणे, आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि लोक मोठ्या संख्येनं पंढरपूरच्या वारीत चालले आहेत. मला मोठं आश्चर्य वाटलं. ज्या काळात शेतकर्‍यांच्या शेतात प्रचंड कामं असतात अश्या वेळेला लाखो लोकांना उठवून पंढरपूरला घेऊन जाणारी ही भक्तिमार्गाची परंपरा टिकलीच कशी? केवळ विठोबाच्या दर्शनाकरिता ही मंडळी जातात हे काही मला पटेना. मग मी सरळ देहूला गेलो, यात्रेमध्ये सामील झालो आणि एक भयानक विदारक सत्य माझ्यासमोर आलं.

            आमच्या कोरडवाहू भागातील शेतकरी, बियाण्यासाठी कशीबशी बाजूला ठेवलेली ज्वारी शेतामध्ये फुंकून टाकली, की घरी खायलासुद्धा काही राहत नाही म्हणून वारीमध्ये जातो आणि वारीच्या पहिल्या दिवसापासून कुठं फुटाणे वाटताहेत, कुठं कुरमुरे वाटताहेत, कुठं केळी वाटताहेत त्याच्या आशेवर पुढं पुढं जात राहतो. देहूपासून पंढरपूरपर्यंत जाणार्‍या या यात्रेचा भक्तिसंप्रदायाशी काहीही संबंध नाही; कोरडवाहू भागातल्या उपाशी शेतकर्‍यांची पंढरपूरपर्यंतच्या रस्त्यावरील पाण्याची सोय असलेल्या भागातून जाणारी ती ‘भीकदिंडी’ असते. हे साहित्याला जाणवले नाही?

            आजकालचं शेतकरी साहित्य किंवा ग्रामीण साहित्य म्हणजे जणू विनोदी विषय आहे. या साहित्यातील शेतकरी म्हणजे कुठे गण्याभामट्या किंवा पाटलाचा पोर - खांद्यावर बंदूक टाकून जुलूम करणारा नाही तर सोंगाड्या किंवा विदूषक किंवा थोडाफार अर्धवट. ग्रामीण साहित्यामध्ये जिवंत हाडामांसाचं चित्रण फार कमी होतं; Characterization (व्यक्तिचित्रण) कमी होतं; Caricaturing (विद्रूपीकरण) जास्त होतं. म्हणजे लेखक काही गुण मनात धरतो आणि एखादी व्यक्ती म्हणजे त्या गुणांचं मूर्तिमंत रूप असं धरून पहिल्या पानापासून तीनशे बावन्नाव्या पानापर्यंत त्या व्यक्तीची तीच गुणवत्ता कायम ठेवून मांडणी करतो.

            शेतकरी संघटनेमध्ये एकेका वेळी लाखांनी माणसं आंदोलनात उतरली; सभांना जमली; शहरामध्ये जाऊन पराभूत होऊन परतलेला, पायजमा घालणारा शेतकर्‍याचा मुलगा या संघटनेचा पाईक आहे. याच्या ऊर्मी काय? घरचे सर्व पैसे खर्च करून हा का धावतो आहे? मला प्रश्न पडतो, की या शेतकरी तरुणाचं चित्रण का झालं नाही? त्यापलीकडे, शेतकरी महिला आघाडीचं काम आहे. दोन लाख महिलांच्या नावावर जमिनी करून दिल्या. तुम्ही शेतकरी बायांना विचारलं तर त्या सांगतील, की 'चांदवडच्या महिला अधिवेशना' नंतर आम्हाला, पहिल्यांदा, माणूस म्हणून जगायला मिळालं; आधी आमची घरची माणसंसुद्धा आम्हाला माणसासारखं वागवत नव्हती. या महिलेचं चित्रण साहित्यामध्ये का नाही दिसत?

            तसंच आणखी एक पात्र आहे; महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये शिकलेली बी.ए., एम.ए. झालेली, थोडाफार पैसा हाती असलेली मुलं आली, एखाद्या आंदोलनामध्ये तडफेने चमकली आणि दुसर्‍या आंदोलनाच्या वेळी चमत्कार असा घडला, की ती राज्यकर्त्या पक्षात सामील झाली. आपल्या साहित्यात त्याचं प्रतिबिंब कुठंतरी पडायला काय हरकत आहे? सत्तर टक्के शेतकरी आहेत म्हणजे सत्तर टक्के साहित्य शेतकर्‍यांचंच असलं पाहिजे असा काही माझा आग्रह नाही. किंबहुना, ते तसं असूही शकणार नाही. कारण, साहित्य हा सौंदर्याचा आविष्काराचा भाग आहे आणि सौंदर्याची व्याख्या

क्षणेक्षणेSयं नवतामुपैति।
तदैव रूपम् रमणीयतायः॥

अशी आहे. सतत बदलत असतं तिथं सौंदर्याचा साक्षात्कार होतो आणि त्याच्या अविष्कारातून साहित्यकृती जन्माला येते. आपण आजूबाजूला वावरत असताना संदर्भाने महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात, त्याच नोंदल्या जातात. उदाहरणार्थ, एखादा रहदारीचा रस्ता ओलांडताना डावीउजवीकडून येणारी सगळी वाहने आपल्या नजरेसमोरून जातात, पण एकदा का रस्ता ओलांडला आणि कुणी विचारलं, की कश्याकश्या गाड्या होत्या तर काही सांगता येत नाही; रस्ता ओलांडत असताना एखादी गाडी करकचून ब्रेक लावून थांबली असेल तर तेवढंच लक्षात राहतं. तेव्हा, महत्त्वाच्या ज्या गोष्टी अनुभवाला येतात त्याच साहित्यात नोंदल्या जातात. त्यामुळे, शेतकरी जीवनात जितकं नवनवीन घडलं असेल तितकंच साहित्यात उतरेल हे मला माहीत आहे; पण महाराष्ट्राच्या ग्रामीण साहित्याचा वारसा सांगताना, गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रातील शेतकरी जीवनात जे घडलं ते पूर्णपणाने न येवो, पण त्याची छटाही ग्रामीण साहित्यात दिसत नाही, हे का? बीजिंग परिषदेच्या नावाने जगभरच्या महिला जमा झाल्या आणि त्यांनी काढलेल्या जाहीरनाम्यात म्हटले की बायांना स्वातंत्र्य नको, स्वातंत्र्य मिळालं तर बायांचं नुकसान होतं. महाराष्ट्रातल्या शेतकरी महिला एकमेव अश्या, की शिक्षणात मागे पडो की आरोग्यात मागे पडो आम्ही स्वातंत्र्य हे मूल्य महत्त्वाचं मानतो. ज्या ज्या प्राण्याला जीव आहे तो स्वतंत्रतेवर जगतो. ही बाई ग्रामीण साहित्याला कशी दिसली नाही?

            सगळ्या जगामध्ये शेती आणि बिगरशेती यांच्यामध्ये दोन फरक आहेत. एक म्हणजे शेतीच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे, शेतीची शैलीच वेगळी आहे. आणि दुसरा, शेतीचा भूगोल वेगळा आहे. शेतकरी सगळे खेडेगावात असतात आणि नागरी संस्कृतीचे लोक, मग ते वेशीच्या आतले असोत बाहेरचे असोत, ते वेगळे असतात.

           हिंदुस्थानात, दुर्दैवाने, आणखी एक तिसरा फार मोठा फरक आहे. तो फरक आहे जातीचा. शेती करणारांची जात वेगळी आहे आणि त्यामुळे शेतकरी समाजाविषयी शहरातील बहुतेक लोकांनी आपली मनं बधिर करून घेतली आहेत. मी जेव्हा शेतकरी संघटनेचं काम सुरू केलं तेव्हा माझ्या कुटुंबातील सर्वांनी, मी कामातून गेलो असंच म्हटलं. माझ्या बायकोनं तिच्या बहिणीला मी काय करतो आहे, कसं चांगलं काम करतो आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती बहीण म्हणाली, "हे शेतकरी दु:खीकष्टी वगैरे असतात हे काही खरं नाही. त्या लोकांना असं जगायची सवयच असते."

           'आम्हाला ताट वाढून आलं नाही तर मोठं दु:ख होतं आणि त्यांना भाकरी मिळाली नाही तरी त्यांना दु:ख होत नाही कारण त्यांना उपासमारीची सवय असते.' ही भावना नागरी संस्कृतीची आहे आणि थोडं तथ्यही असावं त्यात! भाकरी नाही मिळाली, कर्ज नाही मिळालं तर शेतकरी लोक आत्महत्या करतात आणि ज्यांना संध्याकाळची व्हिस्की मिळाली नाही, त्यांनी राज्यक्रांत्या केल्या, सरकारं उलथवून टाकली. मग आता कोणती गरज मोठी म्हणायची? शेतकर्‍यांच्या जीवनात हे असं चालायचंच. त्यांनी धान्य काढायचंच असतं, ते आपल्याला पुरवायचंच असतं, त्याचा विचार अधिक करू नये, केला तर क्लेशदायकच असतो असा विचार करून म्हणा किंवा काही म्हणा, शेतकर्‍यांविषयी नागरी समाजानं आपली मनं बधिर करून घेतली आहेत; मग त्या समाजातलं ते कलाक्षेत्र असो, नाट्य असो, काव्य असो, संगीत असो का साहित्य असो. नागरी समाजाच्या ग्रामीण जनतेबद्दलच्या करुणेच्या सहभावनेच्या इंद्रियाला आलेली बधिरता दूर होणे, ही सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता आहे. ही बधिरता जर आपल्याला दूर करता आली तर ग्रामीण साहित्य हे प्रभावशाली होऊ शकतं. ते करण्याचा एकमेव मार्ग आहे.

            बापाकडून जर का त्यांना बर्‍यापैकी जमीन मिळणार असेल तर महाराष्ट्रातल्या देशमुखांघरची पोरं बापासमोर बसत नाहीत; पण जर का बापाकडनं काहीच मिळण्यासारखं नसेल तर ती बापाला विचारतसुद्धा नाहीत. शरयू दप्तरींनी एका ठिकाणी म्हटले आहे, "आपली सारी संस्कृती शेतकर्‍याला गरजू ठेवण्यामुळे टिकून आहे." ज्या दिवशी शेतकरी म्हणू शकेल, की आमचं पीक व्यवस्थित आलं, पोती नीट भरली, कणगीला लावून ठेवली, जेव्हा चांगला बाजार येईल तेव्हा बघू. त्या दिवशी शेतकरी हा गरजू जनावर नाही, तो माणूस आहे अशी जाणीव तयार होईल आणि त्या दिवशी सहभावनेचे झरे पुन्हा वाहू लागतील.

            आजतरी शहरी समाजातील ही बधीरता थोडीतरी कमी झाली आहे का? शेतकर्‍यांच्या मनात शेतकरी संघटनेने फुलवलेला अंगार जवळ जवळ विझण्याच्या अवस्थेत आहे हे शेतकर्‍यांच्या वाढत्या प्रमाणातील आत्महत्या पाहिल्या की वाटते. हा अंगार पुन्हा फुलवून त्याचे मशालीत रूपांतर करण्याची ताकद तुमच्या या शेतकरी साहित्य संमेलनातून उभी राहील अशी आशा धरावी का? तशी आशा धरायला वाव आहे.

            तुमच्यापैकी किती लोकांनी लोकसत्ता दिवाळी अंक २०१४ मधील वसंत आबाजी डहाके यांचा 'तरीही हुंकार आहे!' हा लेख वाचला आहे मला माहीत नाही. पण, त्यांना तशी आशा वाटत आहे. ते त्या लेखात लिहितात, "१९८० च्या दशकात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची चळवळ सुरू झाली होती. या चळवळीशी काही कवी, लेखक जोडले गेले होते. त्यांचे ग्रामीण अथवा नजीकच्या निमशहरी, शहरी भागांत वास्तव्य होते. शेतकऱ्यांची दु:स्थिती त्यांना दिसत होती. त्याचबरोबर समाजाची व शासनाची त्यांच्याबाबतीतली उदासीनतेची भूमिकाही ते पाहत होते. ग्रामीण जीवनातून कृषिजीवनमूल्यांची चाललेली घसरण ते अनुभवत होते. झपाटय़ाने होत चाललेल्या शहरीकरणाचे ते साक्षी होते. १९९० मध्ये आर्थिक उदारीकरणाचे धोरण मान्य केल्यानंतर जीवनशैलीत होत गेलेला बदल त्यांच्या समोरच होता. वर्षभर राबराब राबावे आणि पीक बाजारात न्यावे, तर भाव पडलेले. उत्पादनखर्चही निघत नाही, त्यामुळे कर्जफेड करू शकत नाही. काल कोणीतरी भाव चढवतो, आज कोणीतरी उतरवतो असा लहरी हैदर कारभार सुरू असतो." आणि नंतर त्यांनी अनेक तरूणतरुणींच्या अभिव्यक्तींची उदाहरणे दिली आहेत.

            पण, अश्या अभिव्यक्तींनी, शेतकर्‍यांच्या मनात हिंमत आणि आत्मसन्मान जागृत न करता, केवळ शहरी भागातील बधीरता कमी होण्याची आशा धरणे हे पुन्हा भीक मागणेच होईल. तेव्हा तुमचे हे संमेलन, एकमेकांची दु:खे एकमेकांना सांगण्यापुरते न रहाता, शेतकरी संघटनेने फुलवलेल्या निखार्‍यांवरील राख उडवून ते पुन्हा धगधगविण्याची हिंमत व ताकद शेतकरी समाजात निर्माण करणारे ठरो हीच सदिच्छा.

            पुन्हा एकदा, या संमेलनास प्रत्यक्षात हजर राहू शकलो नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि गैरहजर अध्यक्षाचा मान दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.

(दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च २०१५ रोजी वर्धा येथील पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील संमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण)

* * *



स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं