Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Aug 31, 2011

क्षण एक पुरे जगण्यास खरा : पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११

क्षण एक पुरे जगण्यास खरा

जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा

लपवून व्यथा रडतोय मनी
दिसतोच सदा मुखडा हसरा

जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा

मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा

श्रमतो, दमतो, शिणतो पुरता
परिहार जणू जुळता नजरा

दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा

रुळताच मनी भलतेसलते
पुसतात कशास हवा नवरा

वरदान मिळो "अभया"त जगा
दररोज घरात जणू दसरा

                           - गंगाधर मुटे
----------------------------------
पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११

पुण्यनगरी
प्रकाशित गझल
----------------------------------
वृत्त : तोटक    रदीफ : गैरमुरद्दफ
----------------------------------


उद्दिष्ट, चोरी आणि आयुष्य ......!


उद्दिष्ट, चोरी आणि आयुष्य ......!


तो चालत होता.. एक एक पाऊल पुढे
स्वच्छ तनाचा अन पारदर्शी मनाचा.. तो
अगदीच साधाभोळा, कसलेही किल्मिष.. न बाळगणारा
एक एक पाऊल टाकत... उद्दिष्टाकडे ... त्याची वाटचाल
.
.
सोबत सहकार्‍याची झुंड..... त्याच्या मदतीला
कधी मागे.. तर कधी त्याच्याही पुढे चालायची
स्वतः:लाच सर्वेसर्वा समजून.. करायची कारभार
हवे ते....... आणि नको तेही
.
.
शेवटी गाठला दरबार एकदाचा... उद्दिष्टाचा
धावतच गेला तो..
उद्दिष्टाला मिठी मारण्याला..
आणि तेवढ्यात
उद्दिष्ट कडाडलं... म्हणालं..
चोsssssssरा
काम काय तुझं? या पवित्र दरबारात!
.
.
तो हादरला.. म्हणाला.. महाराज
हे काय लांच्छनास्पद दूषण लावताय माझ्यावर
मी जगलोय.. माझं आयुष्य... अगदीच
पारदर्शी...... एखाद्या काचेसारखं
.
.
उद्दिष्ट हसलं.... म्हणालं.... अरे
पारदर्शीत्व मिळवायला निव्वळ
काच नाही रे पुरेशी
तुझ्याकडे काचेसोबतच जर का
असता एखादा आरसा
पाठीमागच्या प्रतिमा दाखवणारा
तर तुला कळले असते... की...
तू खाल्लेली फळे... तुझ्या सहकार्‍यांनी
आणलेली होती चोरून.....
लुटून... अगदीच सराईतपणे
.
.
आज त्याला कळली होती त्याची चूक.. पण
निसटून गेलं होतं त्याच्या हातून.... त्याने भोगलेलं आयुष्य....!

                                                                      गंगाधर मुटे
------------------------------------------------------------------

Aug 29, 2011

श्री शरद जोशी यांना 'जीवनगौरव' पुरस्कार

श्री शरद जोशी यांना 'जीवनगौरव' पुरस्कार

                    मुंबईतील 'चतुरंग प्रतिष्ठान' संस्थेच्या या वर्षीच्या सामाजिक क्षेत्रासाठी असलेल्या 'जीवनगौरव' पुरस्कारासाठी, निवड समितीने शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांची निवडक केली आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, सर्वदूर पसरलेल्या शेतकर्‍यांची मोठी संघटना बांधण्याचा आणि त्यांच्या शेतीविषयक बहुविध प्रश्नांची तड लावण्यासाठी कृतिशील चळवळ उभारण्याचा जो ध्यास श्री. शरद जोशी यांनी आयुष्यभर धरला, त्यासाठी अथक प्रयत्न केले, त्या त्यांच्या जीवनध्येयाचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमी कार्याचा आम समाजातर्फे सामाजिक जाणीवेतून कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा, या भावनेने चतुरंग प्रतिष्ठानच्या यंदाच्या सामाजिक 'जीवनगौरव' पुरस्कारासाठी श्री. शरद जोशींची निवड करीत असल्याचे निवड समितीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

                   शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांच्या प्रश्नांचा साल्याने विचार साहित्य प्रस्तृत करून समाजमनात शेतकरी बांधवाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण महिलांही संघटित होऊन कार्यरत व्हाव्यात अशा बीजस्वरुपी समाजकार्याचा विचार या निवडीमागे असल्याचे समितीने म्हटले आहे.

                        डॉ. अरुण टीकेकर अध्यक्षतेखालील डॉ. द.ना.धनागरे, डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुधीर जोगळेकर आणि सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर या मंडळींनी यंदाच्या २१ व्या जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीचे कामकाज पाहिले.

                         मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये असे पुरकार स्वरूप असलेला हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२), डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५), श्रीमान पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९) आणि श्रीमान नानाजी देशमुख (२००३) आणि सौ. साधनाताई आमटे (२००७) या मान्यवरांना देण्यात आला आहे.

                       हा पुरस्कार स्वीकारण्यास श्री. शरद जोशी यांनीही सानंद संमती दिली असून डिसेंबर २०११ मध्ये मुंबईत होणार्‍या चतुरंग रंगसंमेलनात श्री. शरद जोशी यांना तो प्रदान करण्यात येईल.
------------------------------------------------------------------------------------------------------

Aug 25, 2011

प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३

प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३

              समाज जसजसा पुढे जातो तसतशी नैतिकता आणि भ्रष्टाचाराची परिमाणे बदलत जाणे अपरिहार्य असते. कालची अनैतिकता ही आजची नैतिकता व कालचा असंस्कृतपणा हा आजचा संस्कृतपणा ठरत असतो. आजीबाईला नातीच्या ड्रेसमध्ये असंस्कृतपणा दिसणे किंवा देवाला दिलेले दान यात लाचलुचपतखोरी न आढळणे, ही मानसिकता याच वाहत्या काळाच्या वाहत्या बदलातून आलेली असते. भ्रष्टाचार पूर्वापार काळापासून चालत आला असला तरी आजच्या एवढी अत्युच्च पातळी नक्कीच गाठलेली नव्हती. नाकाला सुसह्य असणारा मोती दागिना ठरतो पण नाकापेक्षा मोती जड झाला तर ते असह्य व हानिकारक ठरत असते आणि त्याला काढून फेकण्याशिवाय गत्यंतर उरत नसते. आज शासकीय आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराने मर्यादेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला आवर घालणे ही काळाची गरज झाली आहे. भ्रष्टाचाराने नैतिकता आणि सभ्यतेच्या पार व्याख्याच बदलून टाकल्या आहेत. धर्म-पंथाच्या शिकवणी व मूल्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत इतिहासजमा झालेली आहेत.

              भ्रष्टाचार संपला पाहिजे असे ज्यांना वाटते, त्यांच्यात भ्रष्टाचार संपविण्याविषयीचे प्रामुख्याने दोन मतप्रवाह आहेत.

कठोर जनलोकपाल :
टीम अण्णा आणि त्यांच्या समर्थकांना कठोर जनलोकपाल विधेयक आणले की, भ्रष्टाचाराला आळा बसेल असे वाटते. याव्यतिरिक्त इतर काही उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशा तर्‍हेच्या भूमिकेचे अजून तरी त्यांनी सूतोवाच केलेले नाही.

नैतिकतेची पातळी उंचावणे :
लोकपाल वगैरे आणल्याने भ्रष्टाचार संपणार नाही कारण भ्रष्टाचाराची सुरुवात नैतिकतेची पातळी खालावल्याने झाली असे ज्यांना वाटते त्यांची लोकपालाने काहीही साध्य होणार नाही, अशी धारणा आहे. त्यासाठी जनजागरण करून जनतेत उच्च कोटीची नैतिकता रुजविली पाहिजे असे त्यांना वाटते.

                मला मात्र तसे वाटत नाही. कठोर जनलोकपाल किंवा नैतिकतेची पातळी उंचावल्याने अंशतः भ्रष्टाचाराला आळा बसेल परंतू आर्थिक भ्रष्टाचार पूर्णतः नियंत्रणात येऊच शकणार नाही. कारण मागील लेखात म्हटल्याप्रमाणे मनुष्यस्वभावातच विविधता भरली आहे. आर्थिक भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने विचार केल्यास मनुष्यस्वभावाचे ढोबळमानाने चार प्रकारात वर्गीकरण करता येईल.

अ) काही व्यक्ती निष्कलंक चारित्र्याच्या असतात. त्यांना नैतिकतेची चाड असते आणि त्यांच्या मनात समाजाविषयीचा सन्मानही असतो. 

ब) काही व्यक्ती समाजाला व कायद्याला भीत नाहीत पण नैतिकतेला सर्वोच्च स्थान देतात. 

क) काही व्यक्तींच्या आयुष्यात नैतिकतेला अजिबात स्थान नसते पण कायद्याला अत्यंत घाबरणार्‍या असतात.

ड) व्यक्तींचा एक वर्ग असाही असतो की तो कशालाच जुमानत नाही. ना नैतिकतेला ना कायद्याला. नैतिकतेला आणि कायद्याला न जुमानणारा वर्ग कायमच स्वार्थ साधण्यासाठी संधीच्या शोधात असतो. नानाविध कॢप्त्या लढवीत असतो, कायद्यातील पळवाटा शोधून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा सतत प्रयत्न करत असतो.

                 अ आणि ब प्रकारातील व्यक्ती स्वमर्जीनेच वाम मार्गाने जाण्याचे टाळतात. त्यांचा स्वतःचा स्वतःवर ताबा असतो. त्यांना ऐहिक किंवा भौतिक सुखापेक्षा आत्मसुख महत्त्वाचे वाटते. अशा व्यक्ती भ्रष्टाचाराशी दूरान्वयानेही आपला संबंध येऊ देत नाही. पण ह्या व्यक्ती राजकारणात किंवा प्रशासनात जायचे टाळतात. उच्च आदर्श घेऊन राजकारणात गेल्याच तर आजच्या काळात हमखास अयशस्वी होतात. उच्च आदर्श घेऊन प्रशासनात वावरताना अशा व्यक्तींची पुरेपूर दमछाक होते. प्रशासनात एकलकोंडी किंवा निरर्थक भूमिका वाट्याला येते. इतरांप्रमाणेच भ्रष्टाचारात सामील होता येत नसल्याने वारंवार प्रशासकीय बदल्यांना सामोरे जावे लागते. या व्यक्ती भ्रष्टाचारच करीत नसल्याने यांना कायदा किंवा नैतिकता शिकविण्याची गरज तरी कुठे उरते?

            ब प्रकारातील व्यक्तींना नैतिकतेचे धडे देऊन किंवा कायद्याचा धाक दाखवून भ्रष्टारापासून रोखले जाऊ शकते. मग नैतिकता कोणी कुणाला शिकवायची याचा विचार करणे आवश्यक ठरते. ज्ञानदेव, तुकारामांचा काळ संपल्यानंतर गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्यासारखे थोडेफार अपवाद वगळले तर नैतिकतेची शिकवण देणार्‍या "लोकशिक्षकांची" पिढीच लयास गेली आहे. शाळा-महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नैतिकतेची शिकवण हा उद्देशच निकाली काढण्यात आला आहे. शासनाला किंवा निमशासकीय शिक्षण संस्थेला लाच दिल्याशिवाय शिक्षकाची किंवा प्राध्यापकाची नोकरीच मिळत नसेल तर मग अशा परिस्थितीत आजच्या युगातील गुरू किंवा गुरुकुलाच्या स्थानी निर्माण झालेल्या शिक्षणसंस्था कोणत्या तोंडाने विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देणार, याचाही विचार झाला पाहिजे. अशा नीतिमत्ता गमविलेल्या शिक्षणव्यवस्थेत शिकून बाहेर पडणारा ब प्रकारातील मनुष्यस्वभाव असलेला विद्यार्थी प्रशासनात गेला किंवा राजकारणात गेला तर तेथे भ्रष्टाचारापासून अलिप्त राहील अशी कल्पनाच करणे मूर्खपणाचे ठरते. पण ब प्रकारच्या व्यक्ती कायद्याला घाबरणार्‍या असल्याने कठोर कायद्याने आणि त्याच्या अंमलबजावणीने वठणीवर येऊ शकतात. त्यांच्या साठी कठोर जनलोकपालासारखा कायदा रामबाण इलाज ठरू शकतो. 

                 ड प्रकारातील व्यक्ती मात्र नैतिकता आणि कायदा दोहोंनाही घाबरत नाही. नैतिकता बासनात गुंडाळून कायद्याला हवे तसे वाकविण्यात ही मंडळी तरबेज असतात. आज भ्रष्टाचाराने जे उग्र रूप धारण केले आहे त्याचे खरेखुरे कारण येथेच दडले आहे. 

               उच्च शिक्षण घेणे आणि प्रशासनात नोकरी मिळविणे, या दोन्ही प्रकारामध्ये पाय रोवण्याचा आधारच जर गुणवत्तेपेक्षा आर्थिकप्रबळतेवर आधारलेला असेल तर तेथे नैतिकतेची भाषा केवळ दिखावाच ठरत असते, हे मान्य केलेच पाहिजे.

                  आज राजकारण देखील अत्यंत महागडे झाले आहे. तुरळक अपवाद वगळले तर खासदारकीची निवडणूक लढायला कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. खर्च करण्याच्या बाबतीत एकएक उमेदवार आठ-नऊ-दहा अंकीसंख्या पार करतो, हे आता लपून राहिलेले नाही. ज्याला राजकारणात जायचे असेल त्याला प्रथम बर्‍यापैकी माया जमविल्याखेरीज राजकारणात जाण्याचे स्वप्नही पाहता येत नाही. राजकारणात जाणे दूर; केवळ स्वप्न पाहायचे असेल तरी माया जमविण्यासाठी भ्रष्टाचार करणे अपरिहार्य आणि अनिवार्य झाले आहे.

                 लोकशाहीच्या मार्गाने देशातील सर्वच नागरिकांना निवडणुका लढण्याचे अधिकार आहेत, हे वाक्य उच्चारायला सोपे आहे. पण निवडणूक लढवायची झाल्यास भारतातील नव्वद टक्के जनतेकडे कोट्यवधी रुपये कुठे आहेत? राजकारण आणि सत्ताकारणावर कायमची मजबूत पकड ठेवण्यासाठी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रस्थापित व्यवस्थेकडे एवढे प्रचंड आर्थिक पाठबळ तयार झाले आहे की, आता देशातील नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त जनतेचे राजकारणाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. 

                     म्हणून भ्रष्टाचार नियंत्रण किंवा भ्रष्टाचारमुक्तीचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शासन आणि प्रशासनावर घट्ट पकड ठेवून असलेले सर्व प्रस्थापित हे "ड" या वर्गप्रकारातीलच आहे. यांना नैतिकतेचे धडे शिकवणे जसे उपयोगाचे नाही तसे कठोर कायदे करूनही फारसा उपयोग नाही, कारण कायदे बनविणारेही तेच, कायदे राबविणारेही तेच आणि सोयीनुसार कायद्याला हवे तसे वाकविणारेही तेच; असा एकंदरीत मामला आहे.

(क्रमशः)                                                                                        गंगाधर मुटे 
-----------------------------------------------------------------------------------------
मंत्रालय हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक -१
देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २

Aug 23, 2011

भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा





भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा

कशी झाली देशाची गती, कुंठली मती
लाचखोरीचे पीक आले
भ्रष्ट पुढारी नेते झाले
नोकरशाहीची मस्ती चाले
भ्रष्टाचार्‍यांचे राज आले, रं जी जी .... ॥१॥

एक होता पाटील धांदे, खाण्याचे वांदे
बॅंकेला गहाण सातबारा
अवदसा होती घरादारा
मग तो सत्तेमध्ये गेला
पाहता मालामाल झाला
कसा हा चमत्कार झाला? रं जी जी .... ॥२॥

एक होता गोविंदा रेड्डी, पॅंट आणि चड्डी
मांडीवर उभी फाटलेली
चप्पल पायात तुटलेली
मग तो नोकरीत गेला
घरी पैशाचा पूर आला
सांगा कुठून पैसा आला? रं जी जी .... ॥३॥

गरीबाच्या घरी जन्मला, पदवीधर झाला
वणवण फिरे गल्लोगल्ली
डोनेशन मागे सारे हल्ली
संस्थेमध्ये हर्रासीला
पंधरा लाख भाव झाला
वाली गरीबांस नाही उरला, रं जी जी .... ॥४॥

सत्तेचे सर्व दलाल, करती हलाल
लुटीचा सारा बोलबाला
सरकारे खाती तिजोरीला
स्विस बॅंकेत पैसा गेला
अवकळा आली भारताला
रसातळाला देश नेला, रं जी जी .... ॥५॥

अरे मायभूच्या लेकरा, भानावर जरा
आता तरी ये रे देशासाठी
भविष्या उजाळण्यासाठी
भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी
दोन ठुसे नी एक लाठी
अभय मणक्यास आण ताठी, रं जी जी .... ॥६॥

हो जीजीजीजीजी, हो जीजीजीजीजी
हो जीरंजीरंजी, जीरंजीरंजी, जीरंजीरंजी जी
.
बोला भारतमाता की जय!
वंदे मातरम्!

                                              गंगाधर मुटे
------------------------------------------------
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

Aug 21, 2011

राखेमधे लोळतो मी (हजल)

राखेमधे लोळतो मी (हजल)


मलिंदा मिळावा असे भाकतो मी
जगावेगळे मागणे मागतो मी

कशाला गडे रोज येतेस स्वप्नी?
असा काय आमिर तुला वाटतो मी?

जसे गुंग व्हावे नशीले पिताना
तुला पाहताना तसा झिंगतो मी

मला नेमक्या टाळती अप्सरा त्या
बहूतेक त्यांना कवी भासतो मी!

दिलेली फुले तू जमा खूप झाली
अता गूळ, साखर, डबा शोधतो मी

करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी

समाजात चर्चेमधे राहण्याला
अभय मस्त राखेमधे लोळतो मी

                                     गंगाधर मुटे
-------------------------------------
(तर ही हजल)

शेतकरी संघटक २१ ऑगस्ट २०११


cover

logo


वर्ष २८ ! अंक १० ! २१ ऑगस्ट २०११



अंतरंग


शरदऋतू

नेहरूंची घोडचूक निस्तरण्याचा जयरामजींचा खटाटोप

शरद जोशी...............................3
--------------------------------------------------------------------------------------
निमित्त

आदरणीय शरद जोशी

श्याम पवार...............................5
--------------------------------------------------------------------------------------
आजकाल

पेटलेले पाणी स्फोटक धरणी

ज्ञानेश्वर शेलार.........................7
--------------------------------------------------------------------------------------
चर्चा

नवे भूसंपादन विधेयक आहे तरी काय?

ऍड. प्रकाशसिंह पाटील................9
--------------------------------------------------------------------------------------
कॉमन नॉन सेन्स

शक्तिमान लोकपाल नको, सक्षम पंतप्रधान हवा!

सुधाकर जाधव...........................11
--------------------------------------------------------------------------------------
जागरण

आर्थिक जगबुडी

श्रीकृष्ण उमरीकर.......................14
--------------------------------------------------------------------------------------
शेतकरी संघटना वृत्त..................18
--------------------------------------------------------------------------------------
वाङ्‌मय शेती

बरे झाले देवाबाप्पा

गंगाधर मुटे.................................22
--------------------------------------------------------------------------------------
भारत की जुबानी

हमें क्या चाहिये?

ऍड. दिनेश शर्मा..........................25
--------------------------------------------------------------------------------------
(उ)संतवाणी

पाणी साठे उद्ध्वस्त करा

‘थंडा’ महाराज देगलूरकर.............28
--------------------------------------------------------------------------------------
अभिजात वाङ्‌मय

गोदान

मूळ लेखक : मुन्शी प्रेमचंद,
अनु. अनंत उमरीकर................... 29
--------------------------------------------------------------------------------------

क्लिक करा आणि अंक वाचा.

/////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

/////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

पिडीएफ अंक पाहण्यासाठी येथे टिचकी मारा

Aug 20, 2011

अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २

अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २

                              भ्रष्टाचाराचा मुद्दा आता व्यापक प्रमाणावर ऐरणीवर आला असला तरी माणसाची भ्रष्टाचारी वृत्ती आता इतक्यातच किंवा गेल्या काही वर्षातच जन्माला आलेली नाही. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार अस्तित्वातच नव्हता असेही समजण्याचे कारण नाही. आमचे पूर्वज अत्यंत चारित्र्यवान होते, असे जर कोणी सांगत असेल तर ती सुद्धा लबाडी आहे कारण आर्थिक भ्रष्टाचार हा मनुष्य जातीच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून किंवा मनुष्य जातीच्या जन्माच्या आधीपासूनच अस्तित्वात होता, याचे पुरावे आहेत. देवदेवता लाचखोरीच्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. एखादा शासकीय अधिकारी स्वतःची नैतिकमुल्ये जपण्यासाठी एक छदामही न घेता जनतेची कामे करतो, असे दृश्य तुरळक असले तरी दुर्मिळ नाही. मात्र बिना धूप-दीप-आरतीशिवाय प्रसन्न होणारी देवता सापडणे कठीण आहे. एखाद्याजवळ देवाला देण्यासारखे काहीच नसेल, अगदी फूल-अगरबत्तीही देण्याची परिस्थिती नसेल तर निदान भक्तिभाव तरी अर्पण करावाच लागतो, त्याशिवाय देव काही प्रसन्न होत नाही.

                         काही देवतांना प्रसन्न करण्यासाठी कोंबडी, बकरी किंवा डुक्कर यासारख्या प्राण्यांचा बळी देऊन नैवेद्य दाखवावा लागतो. त्यातल्या त्यात काही देवता तर फारच अडेलतट्टू असतात. नरबळीखेरीज त्यांना दुसरे काहीच चालत नाही. देवतांची कृपादृष्टी हवी असेल तर त्यांना हे सगळे द्यावेच लागते. नाही दिले तर त्या प्रसन्न होत नाहीत आणि याचकाचे कल्याणसुद्धा करत नाहीत. मात्र या तर्‍हेच्या देवता पुजा अर्चना न केल्यास प्रसन्न होत नाही पण याचकाचे निष्कारण वाईटही करत नाही. अशा तर्‍हेच्या "प्रसन्न किंवा मंगळ देवता" या वर्गवारीत मोडणार्‍या देवतांचे गणित साधेसुधे असते. त्यांचे भक्तांना एकच सांगणे असते "आशीर्वाद हवा असेल तर खिसा सैल करा, नाही तर हवा खा." 

                             मात्र काही देवता वेगळ्याच म्हणजे "ओंगळ किंवा अमंगळ देवता" या वर्गवारीत मोडणार्‍या असतात. अशा देवतांचे स्वरूप फारच वेगळे असते. इथे याचकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याला किंवा मर्जीला अजिबात स्थान नसते. ठरल्याप्रमाणे वर्षातून एकदा तरी त्यांची पुजा करावीच लागते. दहीभात, मलिंदा, कोंबडी, बकरी यापैकी काहीना काहीतरी त्यांना द्यावेच लागते. नाहीतर त्या कोपतात. अशा देवतांना समाजही खूप घाबरतो. कारण या ओंगळ देवतांचा जर क्रोध अनावर झाला आणि त्या कोपल्या तर घरातल्या व्यक्ती आजारी पडणे किंवा मरणे, नैसर्गिक प्रकोप होणे, रोगराई येणे अशा तर्‍हेची संकटे येतील, अशी भिती त्यांच्या मनात दबा धरून बसलेली असते. देव आहे की नाही, तो प्रसन्न होतो की नाही, असा हा मुद्दा नाही पण पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीमध्ये अशाच तर्‍हेने समाजाची उत्क्रांती झाली असल्याने लाचखोरी आणि भ्रष्टाचार मनुष्यजातीच्या रक्तात पुरेपूर भिनलेला आहे, हे महत्त्वाचे आहे. 

                            निसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडविला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर जगण्यासाठी काहीना काहीतरी असा एक शारीरिक विशेष गूण किंवा अवयव दिले आहे की त्यामुळे त्याला स्वसामर्थ्यावर जगता येऊ शकेल. जसे की वाघ-सिंहाला तीक्ष्ण नखे आणि दात, हरणाला पळण्याचा प्रचंड वेग, हत्तीला शक्तिशाली सोंड, सापाला विष, जिराफाला उंच मान, काही प्राण्यांना झाडावर चढण्यायोग्य शरीररचना, मगरीला पाण्यात पोहण्यासाठी खवले, पक्षांना आकाशात उडण्यासाठी पंख वगैरे वगैरे. त्यामुळे त्या-त्या पक्षी-प्राण्यांना कुठलाही भ्रष्टाचार न करता जगणे सोयीचे झाले. त्यांना निसर्गाकडूनच स्वतःचे जीवन जगण्याचे हत्यार आणि ते वापरण्याचे कौशल्य मिळाले असल्याने त्यांना त्यांचे आचरण भ्रष्ट करण्याची गरजच भासत नाही. एका सावध प्राण्याने दुसर्‍या बेसावध प्राण्याची शिकार केली तर त्याला खून किंवा प्राणीहत्या मानली जात नाही आणी त्यांना निसर्गानेच तशी मुभा दिली असल्याने ते कायद्याचे उल्लंघनही ठरत नाही. म्हणूनच प्राण्यांना पाप-पुण्याच्या कसोट्याही लागू होत नाही. 

                       मात्र निसर्गाने माणसाला असा कोणताच अवयव दिलेला नाही की तो त्याच्या साहाय्याने स्वतःची शिकार स्वतःच मिळवून आपले पोट भरू शकेल. माणसाला देवाने वाघासारखे तीक्ष्ण नख, हत्तीसारखे दात किंवा सोंड, मगरीसारखी प्रचंड ताकद यापैकी जरी काहीही दिले नसले तरी त्याऐवजी बुद्धिसामर्थ्य दिले आहे. बुद्धिसामर्थ्य देताना बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा देऊन टाकले आहे आणि इथेच खरी मेख आहे. बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे व्यक्तीनिहायस्वातंत्र्य हेच मानवजातीच्या संबंध वर्तनाचे आणि गैरवर्तनाचे कारण ठरले आहे. मनुष्याने बुद्धीचा वापर कसा करावा याचे नियंत्रण जर मनुष्याऐवजी निसर्गाच्या स्वाधीन असते तर माणुसकी, सज्जनता, नैतिकता यांच्या व्याख्या करून त्याचा जाणीवपूर्वक अंगिकार करण्याची गरजच भासली नसती. तसेच माणसाने नीतिनियमाने वागावे म्हणून कायदे करण्याची गरजच भासली नसती. माणसाचे आचरण निसर्गाने नेमून दिलेल्या चौकटीतच राहिले असते. 

                           माणसाच्या वर्तणुकीचे नियमन निसर्ग करत नसल्याने व आपापल्या बुद्धीचा वापर कसा करावा याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असल्याने मानवीजीवाच्या व्यक्तीगत हालचालींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक मानवी जीवांच्या समुच्चयातूनच समाज बनत असल्याने प्रत्येक मानवी जीवाने व्यक्तीगत पातळीवर समाजाला पोषक हालचाली करणे म्हणजे नैतिकता आणि समाजाला नुकसान पोहचेल अशी हालचाल करणे म्हणजेच अनैतिकता, अशी एक ढोबळमानाने व्याख्या तयार झाली असावी. समाजरचना ही परिवर्तनशील असल्याने मग नैतिकतेच्या व्याख्याही त्यानुरूप बदलत गेल्या असाव्यात. 

                            एखाद्या व्यक्तीने केलेले वर्तन जर उर्वरित समाजासाठी व एकंदरीत समाजाच्या उत्क्रांतीच्या दिशा ठरण्यासाठी अहितकारक ठरत असेल तर त्याचे ते वर्तन गैरवर्तन ठरत असते. या गैरवर्तनाचेच दुसरे नाव भ्रष्टाचार असे आहे. मोह आणि स्वार्थ हा सजीवांचा स्थायीभाव असल्याने आणि मनुष्य प्राण्याच्या बाबतीत ज्याचा निर्णय त्यानेच घ्यायचा असल्याने, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे लपतछपत चौर्य कर्म करून, घेता येईल तेवढा लाभ पदरात पाडून घेणे, ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. ही प्रवृत्ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे. गैरवर्तन किंवा भ्रष्टाचार ही न संपवता येणारी गोष्ट आहे. मात्र समाजहिताच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या मार्गाने अनावश्यक व अहितकारक व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने लादून भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे. 

                          विविधता हा निसर्गाचा मुख्य गूण असल्याने जन्माला येणार्‍या व्यक्तीही जन्मताच नानाविध प्रवृत्तीच्या असतात. काही व्यक्ती निष्कलंक चारित्र्याच्या असतात. त्यांना नैतिकतेची चाड असते आणि त्यांच्या मनात समाजाविषयीचा सन्मानही असतो. काही व्यक्ती समाजाला व सामाजिक कायद्याला जुमानत नाहीत पण नैतिकतेला सर्वोच्च स्थान देतात, काही व्यक्तींच्या आयुष्यात नैतिकतेला अजिबात स्थान नसते पण कायद्याला अत्यंत घाबरणार्‍या असतात मात्र व्यक्तींचा एक वर्ग असाही असतो की तो कशालाच जुमानत नाही. ना नैतिकतेला ना कायद्याला. नैतिकतेला आणि कायद्याला न जुमानणारा वर्ग कायमच स्वार्थ साधण्यासाठी संधीच्या शोधात असतो. नानाविध कॢप्त्या लढवीत असतो, कायद्यातील पळवाटा शोधून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. 

                        मानवी प्रवृत्ती निसर्गदत्त भ्रष्टाचारधार्जिणी असल्याने व प्रवृत्ती व्यक्तीनिहाय विविधतेने नटलेली असल्याने केवळ कायदे करून किंवा निव्वळ नैतिकतेचे धडे देऊन भ्रष्टाचार काबूत येण्यासारखा नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. एवढा विचार केला तर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी किती व्यापकपणे पावले टाकण्याची गरज आहे, हे सहज समजून येईल.

(क्रमशः)                                                                                                          गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------
सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक-१
प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३
----------------------------------------------------------------------------------------------------------

Aug 19, 2011

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : लेखांक - १

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१
.
                                अण्णाच्या सशक्त जनलोकपाल विधेयकाच्या निमित्ताने भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या विधेयकामुळे ६० ते ६५ टक्के भ्रष्टाचार कमी होईल असा अण्णांचा दावा असला तरी तशी शक्यता दिसत नाही. भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार असले तरी सध्या जे आंदोलन चाललेय ते आर्थिक भ्रष्टाचाराशी निगडित असल्याने या लेखमालेत आपण केवळ आर्थिक भ्रष्टाचाराची चर्चा करणार आहोत. अण्णांनी जनलोकपालामुळे ६० ते ६५ टक्के भ्रष्टाचार कमी होईल असे म्हटले असले तरी ही टक्केवारी भ्रष्टाचार करणार्‍या व्यक्तींच्या संख्येशी संबंधित आहे की भ्रष्टाचारामुळे होणार्‍या एकूण अपहाराच्या रकमेशी याचा खुलासा झालेला नाही. सशक्त जनलोकपाल विधेयक आले आणि त्याची काटेकोरपणे व इमानेइतबारे अंमलबजावणी झाली असे गृहीत धरून रकमेच्या अनुषंगाने विचार केला तर ६० ते ६५ टक्के रकमेचा भ्रष्टाचार कमी होईल, अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही कारण कोट्यवधीपेक्षा जास्त रकमेचे होणारे भ्रष्टाचार जरी थांबवता आले तरी हे उद्दिष्ट सहज गाठले जाईल.

                मुळातच गेल्या काही वर्षात उच्चपातळीवरील राज्यकर्त्यांचे हजारो कोटीचे भ्रष्टाचार उघडकीस आल्याने आणि सरकार या भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्यातच प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, ही बाब जनसामान्याला प्रकर्षाने जाणवू लागल्यानेच जनप्रक्षोभाची कोंडी फुटून भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाला धार आली आणि नेमक्या याच पार्श्वभूमीवर अण्णांचे आंदोलन अधिक ठळकपणे जनतेच्या नजरेत भरायला लागले, हे अगदी उघड आहे.

               मात्र भ्रष्टाचार करणार्‍या व्यक्तींच्या एकूण संख्येचा विचार करता कितीही सशक्त जनलोकपाल विधेयक आणले तरी भ्रष्टाचारी व्यक्तींची संख्या एक टक्क्याने देखील कमी होण्याची शक्यता नाही. कारण भ्रष्टाचाराचे मूळ शासन संस्थेतच दडलेले आहे. सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र झाले आहे. उद्योग, व्यापार, व्यवसायाच्या प्रत्येक वाटा लायसन्स-परमिटच्या जाचक बंधनातून जात असल्याने प्रत्येक पायरीवर विराजमान असलेल्या देवी-देवतेला नवस कबूल केल्याखेरीज पाऊल पुढे टाकताच येत नाही. नैवेद्य दाखवल्याखेरीज टेबलामागील देव प्रसन्न होत नाही आणि नवस फेडल्याखेरीज कुणाचेच कार्य सिद्धीस जात नाही. जेथे जेथे म्हणून शासकीय नियंत्रणे आहेत तेथे तेथे भ्रष्टाचाराच्या अमाप संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि मिळालेल्या संधीचे सोने करायचे असते हे प्रत्येकाला पुरते ठाऊक असल्याने "संधीचे सोने" करण्याची संधी कुणीच दवडत नाही.

                  येणारे लोकपाल विधेयक आणि राबविणारी यंत्रणा सुद्धा शासनसंस्थेचाच एक भाग राहणार असल्याने ते भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ ठरण्याऐवजी भ्रष्टाचाराला पूरक आणि पोषकच ठरण्याची शक्यता जास्त आहे. जसे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा असूनही भ्रष्टाचाराला आवर घालता आला नाही, अगदी तसेच लोकपालाच्या बाबतीत घडेल. मात्र यातून दोन गोष्टी चांगल्या घडण्याची शक्यता आहे. पहिली अशी की भ्रष्टाचार करणार्‍यांना या नव्या "सशक्त" व्यक्तींनाही संगनमत करून आपल्यात सामावून घ्यावे लागेल. त्यामुळे अपहाराची जी रक्कम दहा लोकांतच हडप केली जाणार होती तिथे वीस लोकांमध्ये वाटून घ्यावी लागेल, त्या निमित्ताने विकेंद्रीकरणाची सुरुवात झाल्यासारखे होईल. दुसरे असे की या लोकपाल संस्थेला वार्षिक कर्तबगारीचा अहवाल "दमदार" दिसण्यासाठी काही ना काही तरी कार्यवाही करावीच लागेल. त्यामुळे त्यांनी पाच-पन्नास मोठे मासे जरी गळाला लटकवले तरी ६० ते ६५ टक्के रकमेचा भ्रष्टाचार कमी होईल असा अण्णांचा दावा प्रत्यक्षात खरा उतरायला कठीण जाणार नाही; कारण उच्चस्तरीय शासक-प्रशासकांच्या घोट्याळ्यातील रकमेचा आकडाच एवढा प्रचंड आहे की, तो आकडा ऐकताना एखाद्या संवेदनशील माणसाला चक्क "मूर्च्छा"च यावी.

                   अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपैकी संपूर्ण देशातल्या दारिद्र्यं रेषेखालील सर्व कुटुंबांना अन्न आणि वस्त्र या दोन मूलभूत गरजा एक वर्षासाठी फुकटात पुरवायच्या म्हटले तरी तो खर्च भागून शिल्लक उरेल एवढ्या प्रचंड रकमेचा अपहार एकट्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात झालेला आहे. देशातल्या संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जबाजारीपणातून एका झटक्यात पूर्णतः मुक्त केले जाऊ शकते एवढ्या किंवा यापेक्षा जास्त रकमेचे क्रित्येक घोटाळे एका-एका व्यक्तीने केले आहेत. चव्हाट्यावर आलेले घोटाळेच जर इतके महाप्रचंड आहेत तर प्रकाशात न आलेल्या घोटाळ्यांची संख्या किती असेल याची कल्पना करताना अंगावर काटा उभारल्याशिवाय राहत नाही. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कायद्याच्या कचाट्यात केवळ तेच भ्रष्टाचारी सापडतात ज्यांना रीतसर भ्रष्टाचार कसा करावा, याचे ज्ञान नसते. कायद्याला हवे तसे वाकविण्याचे कौशल्य नसते. मात्र जे पद्धतशीरपणे भ्रष्टाचार करण्यात पारंगत आहेत, ते कधीच कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. अगदीच स्वच्छ प्रतिमेचे महामेरू म्हणून उजळ माथ्याने मिरवत राहतात. अगदी स्विस बॅंकेत भरभक्कम खातेभरणी करूनही जनतेच्या नजरेत मात्र "बेदाग व्यक्तिमत्त्व" म्हणून अधिराज्य गाजवीत असतात.

                      जोपर्यंत घोटाळ्याच्या रकमा सुसह्य होत्या तोपर्यंत जनतेलाही फारसे नवल वाटत नव्हते कारण "जो तळ्याची राखण करेल तो पाणी पिणारच" हे गृहीत धरले जात होते पण आता पाणी पिण्याऐवजी चक्क तळेच हडप करण्याची भ्रष्टाचार्‍यांची नवी संस्कृती उदयाला आल्याने आजपर्यंतचा सुसह्य भ्रष्टाचार आता असह्य वाटायला लागला आहे. अण्णांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळण्याचे गमक यात दडले आहे.

(क्रमश:)                                                                                                          गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------

Aug 18, 2011

वादळाची जात अण्णा


अण्णा हजारे


वादळाची जात अण्णा

माणसे खंबीरतेने, टाकतेया कात अण्णा
इंडियाला भावला हा, एक झंझावात अण्णा

धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला?
भ्रष्ट नेते मोकळे अन, कोठडीच्या आत अण्णा

भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा

एक आशेचा उमाळा, शोधताहे देशवासी
चेतना चिंतामणीची, भासते बरसात अण्णा

आस अण्णा श्वास अण्णा, अभयतेचा ध्यास अण्णा
अग्निलाही पोळणार्‍या, वादळाची जात अण्णा


                                                - गंगाधर मुटे
-----------------------------------------------
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

Aug 13, 2011

माझी ललाटरेषा


माझी ललाटरेषा

धुंदीत वैभवाच्या, मस्तीत चूर झाली
माझी ललाटरेषा, मजला फितूर झाली

तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे
जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली

ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला
औलाद आज त्यांची, का "जी हुजूर" झाली?

घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे
भासे असे जसे की, दमछाक दूर झाली

घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली

                                             गंगाधर मुटे
------------------------------------------------
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
http://www.baliraja.com

Aug 6, 2011

शेतकरी संघटक 6 ऑगस्ट 2011

cover

logo

वर्ष 28 । अंक 9 । 6 ऑगस्ट 2011

अंतरंग


जागरण

लोकपाल म्हणजे रामबाण नव्हे

श्रीकृष्ण उमरीकर 3
------------------------------------------------------------------------------
प्रासंगिक

अण्णांचे आंदोलन व्यर्थ आहे

मूळ लेखिका : तवलिन सिंह/अनु.: शेतकरी संघटक ब्युरो 6
------------------------------------------------------------------------------
व्यक्तिविशेष

अशोक गुलाटी : द्रष्टा शेती अर्थशास्त्रज्ञ

अजित नरदे 7
------------------------------------------------------------------------------
आजकाल

‘स्वातंत्र्य का नासले?’ पुस्तकाविषयी

ज्ञानेश्वर शेलार 12
------------------------------------------------------------------------------
कॉमन नॉन सेन्स

राज ठाकरे उत्तर द्या! या अभागी शेतकर्‍यांनी जायचे कोठे?

सुधाकर जाधव 14
------------------------------------------------------------------------------
मधोमध

भारतीय जनता पार्टी (कॉंग्रेस गट) अर्थात ‘पार्टी विथ डिफ्रन्सेस’

दत्ता जोशी 16
------------------------------------------------------------------------------
वाङ्‌मय शेती

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : उत्तरार्ध

गंगाधर मुटे 19
----------------------------------------------------------------------------
भारत की जुबानी

आरक्षण और अस्मिता

ऍड. दिनेश शर्मा 22
----------------------------------------------------------------------------
(उ)संतवाणी

असला कापूस नकोच लावूस

‘थंडा’ महाराज देगलूरकर 25
----------------------------------------------------------------------------

शेतकरी संघटना वृत्त 28

----------------------------------------------------------------------------


अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

----------------------------------------------------------------------------

Aug 5, 2011

हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका


ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट

सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

                                                    - गंगाधर मुटे


http://www.baliraja.com
----------------------------------------------------------------------------------

श्री प्रमोद देव, मुंबई यांनी या गीताला जोशपूर्ण चाल लावली आहे. अवश्य ऐका.

----------------------------------------------------------------------------------

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं