Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Dec 4, 2016

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

                 शरद जोशींच्या पश्चात शेतकरी चळवळीचे भवितव्य काय, असा प्रश्न माझ्यासहित अनेकांना सतावत आहे. शेतकरी चळवळ शरद जोशींनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली की ती उंची पार करण्याचा विचार राहू द्या; त्या उंचीच्या आसपास पोचण्याचीही नेतृत्वक्षमता कुणात नाही, ही वास्तविकता नजरेआड करता येत नाही. खरं तर मी चळवळ शब्द वापरत असलो तरी जोशींनी शेतकरी आंदोलनाला चळवळ असा शब्द कधीच वापरला नाही. ते लढवैय्ये असल्याने त्यांनी मिळमिळीत भाषाशैलीही कधीच वापरली नाही त्याऐवजी थेट आणि आक्रमक पण अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध आणि परिशास्त्रीय भाषेचाच वापर केला. 

                 १९८० चे दशक उजाडेपर्यंत लढाऊ किसान किंवा लढवैय्या शेतकरी हे शब्दच निरर्थक होते. इतिहासात आपण कितीही मागे जाऊन बघितले तरी कोणत्याही कालखंडात भारतीय शेतकरी त्याच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध कंबर कसून लढत होता, अशा पाऊलखुणा कुठेही आढळत नाहीत. अगदी शेताच्या बांधावर राजसैन्याच्या घनघोर लढाया व्हायच्या तेव्हाही शेतकरी त्या लढायांकडे मूक बधिरतेने निर्विकार चेहरा करूनच बघत राहायचा. शेतकर्‍याला पक्के ठाऊक होते की, राजे असो, पेशवे असो, मोगल असो किंवा डाकू-लुटेरे असो, हे सारे विजयानंतर आपल्याकडे शेतसारा वसूल करायला किंवा धान्याची लूट करायलाच येणार आहेत. ह्या लढाया म्हणजे शेतसारा वसूल कोणी करायचा याचा रीतसर परवाना मिळवण्यासाठीच असतात. ज्याला आपले म्हणावे असे यांच्यापैकी आपले कोणीच नाहीत, अशीच शेतकरी समाजाची सामूहिक विचारपद्धतीची ठेवण असल्याने कितीही अन्याय, अत्याचार झालेत तरी त्याविरुद्ध एक शेतकरी म्हणून निखळ शेतीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेतकरी पेटून उठला, त्याने राजसत्तेविरुद्ध बंड पुकारले असे उदाहरणच शेतीच्या इतिहासात सापडत नाही. त्याऐवजी दोन्ही हात जोडून अदबीने उभा राहणारा शेतकरी मात्र इतिहासाच्या पानापानावर पाहायला मिळतो. 

                 अशा स्थितीत शरद जोशींनी शेतकरी चळवळ उभी केली. कुत्र्याचे शेपूट सरळ होईल पण शेतकरी संघटित होणार नाही, या पारंपरिक समजुतीला उभा-आडवा-तिरका छेद देत शेतकरी संघटित केला, नुसताच संघटित केला नाही तर शेतकर्‍यांच्या मनात स्वाभिमानाने जगण्याचे बीजारोपण केले. ताठ मानेने व मूठ आवळून जगायचा मूलमंत्र दिला. देशातील इतर नागरिकांसारखे सन्मानाने जगता यावे म्हणून रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली. शेतकर्‍यांच्या मनातील राजसत्तेची व तुरुंगाची भीती घालवली. त्याचबरोबर प्रचलित अर्थवादाला कलाटणी देऊन शेतीच्या अर्थवादाच्या उत्क्रांतीची दिशा बदलण्यात शरद जोशी शतप्रतिशत यशस्वी झालेले आहेत. शरद जोशी यांनी “शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य” बनून पिढ्यानपिढ्या दारिद्र्याच्या अंधार्‍या खाईत चाचपडणार्‍या शेतकर्‍यांचा मुक्तीचा मार्ग प्रकाशमय करून ठेवला आहे.

                 शेतीला मध्यवर्ती स्थानी ठेवून विचारांची गुंफणं करणार्‍या द्रष्टा नेत्याच्या पश्चात आता तोच वसा घेऊन पुढील वाटचाल करायचे काम शेतकरी चळवळीसमोर असायला हवे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. शेतकरी चळवळीसाठी हा संक्रमणकाळ असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शेतकरी चळवळीचा पाया भक्कम असल्याने चळवळ संपणार नाही मात्र चळवळीचा प्रभाव आणि परिणामकारकता संकुचित होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. सत्तेचे लालसी व शेतकरी आंदोलनाचा शिडीसारखा वापर करून राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करू पाहणार्‍या शेतकरी कार्यकर्त्यांना शरद जोशींनी पद्धतशीरपणे संघटनेच्या जवळपास फारसे फिरकू दिले नव्हते, त्यांना शरद जोशींचे जाणे म्हणजे संधीची पर्वणी वाटायला लागली आहे. जोपर्यंत जंगलचा राजा सिंह जिवंत असतो तोपर्यंत लांडगे-माकड-कोल्ह्यांना जंगलाचा राजा होताच येत नाही. पण सिंह मरण पावला की लांडगे-माकड-कोल्ह्यांची सुप्त ऊर्मी उफाळून येते आणि आपली योग्यता न जोखताच राजा होण्याची स्वप्ने त्यांना पडायला लागतात. सिंहाचे जाणे त्यांना लाभप्रद वाटायला लागते, नेमका असाच काहीसा प्रकार शेतकरी चळवळीच्या बाबतीत घडत आहे. सत्तेत सहभागी होऊन शेतीचे प्रश्न सोडवता येतात असा येरागबाळा विचार मांडून तशीच कृती करणे, एखाद्याने स्वत:ला शरद जोशींचे वारसदार घोषित करणे, ज्याला आयुष्यभरात तीन कार्यकर्तेही मिळवता आले नाही त्याने स्वत:ला शेतकरी चळवळीचा अर्ध्वयू समजून घेणे, पावसाच्या सरी आल्या की जागोजागी भुछत्र्या उगवाव्यात तशा भाराभार शेतकरी संघटनांची स्थापना व्हायला लागणे, हे त्याचेच निदर्शक आहे.

                 काही सत्तालोलुप कार्यकर्त्यांना सत्तापदांची लालसा दाखवून कोणतीही चळवळ फोडून प्रभावहीन करण्याची कला राजकारण्यांना उपजतच असते. शरद जोशी असतानाही हा प्रयोग वेळोवेळी झालेला आहे. त्यामुळे चळवळीची शक्ती कमजोर करण्यात राजकारण्यांना तत्कालीन परिस्थितीत काहीसे यश आले असले तरी शेतकर्‍यांचा आवाज म्हणून शरद जोशींचा दरारा दिल्लीपर्यंत तरीही कायमच होता. इथे विशेष बाब म्हणून हेही लक्षात घ्यायला हवे की प्रकृती अस्वास्थ्यामुळे १९९५ च्या सुमारासच शरद जोशींना अनेक बाबतीत शारीरिक मर्यादा आल्या होत्या. अनेक जटिल शस्त्रक्रियांमुळे तर त्यांना दौरे करणे, आंदोलनासाठी लागणारे जनमानस तयार करणे, उपोषण करणे आणि रणात प्रत्यक्ष उतरून पाईकांचे नेतृत्व करणे त्यांना अशक्यप्राय झाले होते. तरीही १९९५ ते २०१५ एवढा वीस वर्षाचा प्रदीर्घ काळ त्यांनी शेतकरी आंदोलनाचा दरारा कायम ठेवला होता. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी आंदोलनात एकवाक्यता होती. त्या एकजिनसीपणामुळेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याच्या मागणी सारख्या अव्यवहार्य संकल्पनांना डोके वर काढता आले नाही.

                 पण आज चित्र निश्चितच पालटले आहे. शेतकरी चळवळीच्या स्वनामधन्य नेत्यांत कुठेही एकवाक्यता नाही. आपापल्या मर्जीप्रमाणे ज्याच्या मनात जसे येईल तसे तो बोलत सुटतो. कुणी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी करतो, कुणी शेतकर्‍यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्या, असा एजेंडा पुढे रेटू पाहतो तर कुणी शेतकर्‍यांनी सत्ता हाती घेतल्याखेरीज शेतीचे प्रश्न सुटणार नसल्याची हाकाटी पिटतो. शेतीचे अर्थशास्त्र समजून न घेताच बेताल वक्तव्ये करण्याचेही सध्या पेवच फुटलेले आहे. डॉ आंबेडकरांच्या निधनानंतर रिपब्लिकन चळवळीच्या वाट्याला आला तसाच भोग शेतकरी चळवळीच्या वाट्याला येतो की काय, असा संभ्रम होण्यासारखी स्थिती उद्भवणे, ही  नक्कीच दुर्दैवी बाब आहे.

                 शेतीमालाला उत्पादन  खर्चावर आधारित रास्त भाव मिळाल्याखेरीज शेतीव्यवसायात बरकत येऊ शकत नाही, रास्त भाव मिळेल अशी व्यवस्था होण्याऐवजी केल्या जाणार्‍या अन्य सर्व उपाययोजना म्हणजे नुसत्याच मलमपट्ट्या आहेत या एका अर्थशास्त्रीय विचारधारेला मध्यवर्ती स्थानी ठेवून गेले तीन दशक शेतकरी चळवळ उभी होती.  शरद जोशींनी मांडलेली विचारधारा अनेक चिंध्या एकत्र करून बांधलेले गाठोडे नसून एकाच तलम धाग्यात विणलेले महावस्त्र असल्याने शास्त्रशुद्ध अर्थशास्त्रीय आधारावर आजवर कुणालाच त्या मांडणीला छेद देता आलेला नाही. त्यामुळे नाव शरद जोशींचे घ्यायचे आणि कृती मात्र चक्क विपरित करायची हा नवा अजबच प्रकार अलीकडे सर्रास पाहायला मिळत आहे. नाना पाटेकर-मकरंद अनासपूरे या जोडगोळीचे शेतकरी विधवांना आर्थिक मदत करण्याचे कार्यक्रम असोत किंवा राजू शेट्टी-सदा खोत यांचे सरकार प्रायोजित कार्यक्रम असोत, शेतकरी चळवळीच्या निकोप वाढीसाठी मारकच आहेत.

                 एकीकडे शेतकरी चळवळीची अशी वाताहात होत असतानाच शेतीसमोरचे प्रश्न आणखी बिकट होत चाललेले आहे. शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी नवनव्या कॢप्त्या शोधून काढून त्यावर अंमलबजावणी करण्याचे नव्या सरकारचे अनुनभवी शिलेदार शेतीव्यवसायाला व्दापारयुगात नेऊन ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आजपर्यंत शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी झोनबंदी, प्रांतबंदी, निर्यातबंदी व मुक्त आयात हेच मुख्यत्वे हत्यार म्हणून वापरले गेले होते; पण नव्या सरकारने त्या जोडीला साठेबंदी नावाचे नवे हत्यार वापरून शेतमालाचे भाव पाडून दाखवले आहे. तुरीचे घसरलेले भाव हा या संदर्भातील उत्कृष्ट नमुना मानावा लागेल. शेती विषयक नवतंत्रज्ञान-विरोधी डावपेच, सेंद्रीयशेती अथवा झिरो बजेट शेतीचा सरकार प्रायोजित गाजावाजा, गोवंश हत्याबंदी कायदा, भूमी अधिग्रहणाचा फसलेला मनसुबा इत्यादी अरिष्टे शेतीव्यवसायाला आणखी बेजार करीत आहेत. त्या जोडीला आजवर सर्वच सरकारांनी राबविलेले सीलिंग व जीवनावश्यक वस्तू सेवा सारखे शेतकरीविरोधी कायदे, घटनेचे शेड्यूल ९, अन्नसुरक्षा आणि मनरेगा वगैरे सारख्या शेतीव्यवसायाची गळचेपी करणार्‍या योजना व तत्सम धोरणे प्रभावीपणे राबवायला सरकारं मोकळे आहेतच.

                 कधी अतिवृष्टी तर कधी खंडवृष्टी, नेहमीचीच वीज टंचाई, वीज, बीज, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरीचे दर, मुलांच्या शिक्षणाचा वाढलेला खर्च, प्रवासखर्च इत्यादी सर्वच बाजूंनी कायमच भाववाढ होत असताना केवळ शेतमालाच्या भावाची नाकेबंदी करून दर स्थिर ठेवले किंवा कमी केले तर शेतीव्यवसाय आणखी तोट्यात येणार हे स्पष्ट आहे. अशातच शेतकरी चळवळीची दबावगट म्हणून प्रभाव पाडण्याची शक्ती हीन होत असेल तर येणारा काळ शेतीसाठी फारसा उत्साहवर्धक नसेल हे सांगायला भविष्य़वेत्त्याची गरज भासत नाही. शेतीमध्ये येऊ घातलेली संभाव्य निरुत्साहिता थांबवण्यासाठी आताच प्रभावी उपाययोजना केली गेली नाही तर निरुत्साहितेचे रूपांतर अराजकतेत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याची काही अंशी जबाबदेही शेतकरी चळवळीचीही असेल, यात संशय नाही.

 - गंगाधर मुटे                      
~~~~~(महाराष्ट्र टाईम्स, दि. २/१२/२०१६ राज्यातील सर्व मराठी आवृत्त्यांत प्रकाशित)~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Nov 19, 2016

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

   "विविधता आणि लहरीपणा हेच निसर्गाचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याने शेतीच्या दुर्दशेसाठी निसर्गाला दोषी धरण्याचे काहीही कारण उरत नाही. शेतीच्या दुर्दशेची कारणे निसर्गाच्या लहरीपणात नसून अन्यत्र आहेत, हे न समजण्याइतपत कुणी दुधखुळा असू शकतो, अशी कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. तरीही तशी भाषा वापरली जात असेल तर त्यात  नक्कीच काहीतरी काळेबेरे आणि कुटनितीचे खेळ आहेत, असा ग्रह नाईलाजाने करून घेणे भाग आहे.  डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून बुद्धीचातुर्याच्या बळावर कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले."


निसर्ग म्हणजे निसर्ग आहे आणि त्याची वर्तणूक सुद्धा निसर्गाला शोभेल अशी नैसर्गिकच असणार हे उघड आहे.  निसर्ग विविधतेने नटलेला आहे. विविधता हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. निसर्गातला विविधता हा गूण काही कालचा किंवा परवाचा नाही. आपल्यासारख्या बुद्धीवंतांचा जन्म झाल्यानंतर निसर्गाने विविधतेचा गूण धारण केला असेल, असेही नाही. निसर्गाचा जेव्हा केव्हा जन्म झाला असेल तेव्हाच तो विविधतेचा जन्मजात गूण धारण करुनच जन्माला आला असणार, हेही उघड आहे.  ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असूनही यावर मते-मतांतरे व्यक्त होत असतील तर तीही नैसर्गिक वैविध्यतेच्या रचनात्मक मानसिकतेमुळेच होत असते, ही नैसर्गिक शाश्वत सत्यता सुद्धा आपण स्विकारलीच पाहिजे. पण तिथेही विविधताच आडवी येते आणि शाश्वत सत्यता स्विकारायला शतप्रतिशत मानसिकता कधीच तयार होत नसते.

भारतीय शेती निसर्गावर अवलंबून असल्याने व निसर्ग बेभरवशाचा असल्याने शेतकरी गरीब आहे, हे विधान मी शाळा-कॉलेजात असताना ऐकताना आणि वाचताना इतके वेळा कानावर आणि डोळ्यावर येऊन आदळायचे की कानाचे पडदे फ़ाटायला बघायचे व डोळ्यातली बाहुली ठार गारद व्हायला बघायची. शाळा-कॉलेजात जाऊन शिकले-सवरलेले आणि ग्रंथ-कुराण-बायबल-वेद वाचून साक्षात ज्ञानाचे महामेरू झालेले इतके येरेगबाळे कसे बोलू आणि लिहू शकतात, याचे कायम कुतुहलमिश्रीत नवल वाटत राहायचे. मग या विधानाची शहानिशा करून आकलन करण्यासाठी मेंदूच्या भवती विचाराचे लोंदे गोळा व्हायचे. ते मेंदूभवती इतका पिंगा घालायचे की मेंदू पार गुळगुळीत होऊन पलिकडे काम करेनासा व्हायचा. कधीकधी मेंदू हँग झाला की मुद्दा निकाली न काढताच त्याला आहे तसाच अर्धवट आणि येरागबाळा सोडून मेंदूला फ़ॉर्म्याट मारून, नव्याने रिफ़्रेश मारून ताजेतवाने व्हावे लागायचे.

शाळा-महाविद्यालयात मिळवलेल्या ज्ञानाची शिदोरी गाठीशी घेऊन जेव्हा मी प्रत्यक्ष शेती करायला सुरवात केली तेव्हा पहिल्या सहा महिन्यातच पुस्तकीय ज्ञानातील विरोधाभास उघड व्हायला लागला. प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रत्यक्ष ग्रामीण जीवन, पुस्तकीय ज्ञानातील पांडित्य व बोलघेवड्या पगारी तज्ज्ञांचे सल्ले हे दुरान्वयानेही आपसात एकमेकांच्या नातेसंबंधात लागत नाही, याची प्रचिती यायला लागली. शेती, शेतीतील गरीबी, गावाची दुर्दशा याची कारणे शोधतांना जी कारणे आढळली ती पुस्तकांशी, पुस्तकी पंडीतांच्या निष्कर्षाच्या आणि शिकवणीच्या थेट उलटी दिसत होती. डोहाकडे जाणार्‍याला वाचवण्यासाठी उदात्त हेतूचा देखावा करून सुचवले जाणारे मार्ग त्याला आणखी त्वरेने डोहाकडे नेणारे आणि कुठल्याही स्थितीत तो बुडलाच पाहिजे, अशी बेमालूमपणे पण प्रभावी व्यवस्था करणारेच आहेत, हे ज्या क्षणी लक्षात आले आणि खात्री पटली त्या क्षणीच प्रचलित पुस्तकी पंडीत, पारंपारिक ज्ञानाचे महामेरू आणि पगारी तज्ज्ञ यांच्यावरचा माझा विश्वास भुर्रकन उडून अवकाशात निघून गेला तो आजतागायतही परत आलेला नाही.

मात नव्हे मैत्री

निसर्गावर मात करण्याच्या वल्गना हा आणखी एक असाच आगाऊपणा. एकंदरीत निसर्गाची प्रकृती एकजिनशी आणि वैश्विक आहे. विश्वाच्या एका भौगोलिक प्रदेशात घडलेल्या बदलाचा प्रभाव विश्वाच्या दुसर्‍या भौगोलिक प्रदेशात जाणवत असतो. वैश्विक रचना समग्र ब्रह्मांड रचनेशी संलग्नीत आहे, इतके जाणायला मनुष्य खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषशात्रीच असला पाहिजे, हेही आवश्यक नाही. ब्रह्मांडाची परिमिती कुणालाच मोजता आली नाही आणि मोजता येणे शक्यही दिसत नाही. आकाशगंगेतील अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिणाम सुद्धा अत्यंत थिटे आहे. आकाशगंगेचे नुसते अंतर मोजण्याचीही कुवत नसलेल्या मनुष्यप्राण्याने थेट मात करण्याच्या गोष्टी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरित निसर्गाची आणि निसर्गावर प्रभाव टाकणार्‍या घटकांची व्याप्ती लक्षात घेतली तर विभागवार किंवा प्रदेशवार निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणता येणे आपल्या आवाक्यात नाही. तंत्रज्ञानाने कितीही झेप घेतली तरी निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणणे कधीही शक्य होणार नाही, याचे भान विसरून चालणार नाही. सतरा वर्षे शाळा-महाविद्यालयात घालवली आणि जोडीला शे-पाचशे पुस्तके वाचल्याने ज्ञानग्रहनक्षमतेच्या कक्षा तेवढ्या रुंदावत जातात, निसर्गावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होत नाही याचे भान राखायलाच हवे.

हजारो वर्षापासून शेतकरी शेती करत आला पण त्याने निसर्गावर मात करण्याची भाषा कधीच केली नाही. त्याने निसर्गाशी जुळवून घेतले, निसर्गाशी मैत्री केली. निसर्गाला बदलायला भाग पाडणे मनुष्य प्राण्याच्या आवाक्यात नाही, याची जाणीव असण्याइतपत व्यावहारिक ज्ञान त्याचाकडे असल्याने तसा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. याउलट तो स्वत: बदलला. निसर्ग कसा असतो, हे त्याने समजून घेतले एवढेच नव्हे तर त्याने स्वत:ला निसर्गानुरूप बदलवून घेतले. त्याने नैसर्गिक प्रकृतीला स्वत:च्या प्रकृतीत विलिन करून घेतले. रान केव्हा नांगरायचे, उदिमाला सुरुवात केव्हा करायची, पेरणी केव्हा करायची याचे वेळापत्रक त्याने निसर्गाला अनुसरून तयार केले. पेरणी केली अन पाऊस आला नाही किंवा अति पाऊस होऊन दुबारपेरणीची वेळ आली तर कधी कुरबूर केली नाही, आदळआपट केली नाही आणि निसर्गाला कधी दोष तर दिलाच नाही. पुन्हा नव्याने तयारी केली आणि दुबार पेरणी केली. कधी ओला दुष्काळ पडला, कधी कोरडा दुष्काळ पडला, कधी एका पावसाच्या कमतरतेने पीक करपून गेले, कधी अति पावसाने अथवा महापूराने शेत पिकासहित खरडून गेले, कधी वादळाने तर कधी गारपिटीने पीक धाराशायी केले पण शेतकरी अश्रू ढाळत बसला नाही आणि निसर्गाच्या नावाने शिमगा करत डांगोराही त्याने कधीच पिटला नाही. त्याने निसर्गाला मित्रासारखीच वागणूक दिली आणि निसर्गाला त्याच्या विविधतेसह आनंदाने स्विकारले. पावसाने उघडीप दिली किंवा खंडवृष्टीची स्थिती निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍याने निसर्गाला बोल लावला नाही तर त्याची आराधना केली. कधी कमरेला बेडूक बांधून वरुणदेवतेला प्रसन्न करायचा प्रयत्न केला, कधी सर्व गावकर्‍यांनी एकत्र येऊन मारोतीच्या पाळावर अभिषेक केला तर कधीकधी सामुहिक सदावर्त करून देवासमोर नैवद्य ठेवला आणि गावातील सर्व गोरगरीब गावकर्‍यांना यथेच्छ भोजनाचा पाहूणचार दिला. शेतकर्‍याने पेरणीसाठी मातीचा, पीक जगवण्यासाठी पाण्याचा, कचराकाडी जाळण्यासाठी अग्नीचा, धान्य उफ़णण्यासाठी वायुचा, उदीमासाठी वृक्षाचा खुबीने वापर केला. पंचमहाभूतांचा आणि निसर्गदत्त संसाधनाचा पुरेपूर कौशल्यानिशी वापर करत व निसर्गाशी सलोखा राखत आपली शेती फ़ुलवत ठेवली. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात शेतकर्‍याने निसर्गाला शत्रू मानून त्याच्यावर मात करण्याची भाषा वापरल्याच्या यत्किंचितही पाऊलखुणा आढळत नाही.

कुटनितीचा खेळ

मग निसर्गावर मात करण्याची आणि शेतीतील अठराविश्व दारिद्र्याशी निसर्गाच्या लहरीपणाशी सांगड घालून निसर्गालाच जबाबदार धरण्याची भाषा आली कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. उत्तर जटील नसले तरी कुटील नक्कीच आहे. शेतकर्‍यांच्या मर्जीनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार पाऊस कोणत्याच युगात पडल्याची शक्यता नाही आणि यानंतर पुढे येणार्‍या युगातही पडणार नाही, हे शेतकर्‍याला निसर्गत: मान्य असल्याने तो त्याच्या गरिबीला निसर्गाला जबाबदार धरत नसला तरी अन्य कोण जबाबदार असेल याचीही कल्पना त्याला नाही आणि नेमकी इथेच शेतकरी समाजाची गोची झाली. शेतीत दारिद्र्य आहे हे खरे आहे पण ते कशामुळे आहे, याचे नेमकेपणाने उत्तर शेतकरी समाजाला माहित नसल्याने त्यांचा “नरोवा कुंजरोवा” झाला. शेतकरी समाजातील याच संभ्रमाचा फ़ायदा अनुत्पादक वर्गाने नेमकेपणाने उचलला.

 "विविधता आणि लहरीपणा हेच निसर्गाचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याने शेतीच्या दुर्दशेसाठी निसर्गाला दोषी धरण्याचे काहीही कारण उरत नाही. शेतीच्या दुर्दशेची कारणे निसर्गाच्या लहरीपणात नसून अन्यत्र आहेत, हे न समजण्याइतपत कुणी दुधखुळा असू शकतो, अशी कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. तरीही तशी भाषा वापरली जात असेल तर त्यात  नक्कीच काहीतरी काळेबेरे आणि कुटनितीचे खेळ आहेत, असा ग्रह नाईलाजाने करून घेणे भाग आहे.  डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून बुद्धीचातुर्याच्या बळावर कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले." जेव्हा जेव्हा थेट दोन हात करणे अशक्य असते तेव्हा तेव्हा समोरच्या बाजुला परास्त करण्यासाठी कुटनितीचा अवलंब करण्याला बहुतांश शास्त्रांची मान्यता असल्याने शेतमालाच्या लुटीसाठी या मार्गाचा अवलंब करणे सर्वांनाच सोईचे वाटले असावे. शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध होत राहण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या गरिबीचे खरे कारण कळू न देता त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत राहणे सर्वांना फ़ायदेशीर ठरले असावे. शेतकरी आळशी, कामचोर, उधळ्या, अज्ञानी आहे, परंपरागत पद्धतीने शेती करणारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर न करणारा आहे त्यामुळे तो गरीब आहे किंवा शेतीच्या दुर्दशेला निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत आहे, अशा सामुहिक जनमानस तयार करणार्‍या संकल्पनांचा वापर शेतीमालाला मिळणार्‍या अत्यल्प भावाच्या मुद्याला बगल देण्यासाठी कुटनितीक शैलीने पद्धतशीरपणे करण्यात आला असावा, हे उघड आहे.

ग्राहकांची मानसिकता

कोणत्याही व्यक्ती अथवा सामुहिक कुटुंबाचा जमा आणि खर्चाचा ताळेबंद जुळत नाही तेव्हा त्या व्यक्तीचा अथवा कुटुंबाचा अर्थसंकल्प तोट्याचा तयार होतो. अर्थाच्या अनुलब्धतेमुळे साधनांच्या खरेदीवर एकतर मर्यादा येतात किंवा खरेदी अशक्य होते. घरात साधनांची त्यातल्या जिवनावश्यक गरजेच्या वस्तुंच्या खरेदीसाठी अथवा जिवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी क्रयशक्ती संपली की घरात जे चित्र तयार होते त्यालाच आपण दारिद्र्य म्हणत असतो. देशाचा, राज्याचा, कार्पोरेट क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा अर्थसंकल्प मांडण्याची व तर्‍हेतर्‍हेचे उपाय सुचवण्याची पात्रता असलेले लक्षावधी पगारी अर्थतज्ज्ञ या देशात मुबलक मिळून जातात. अर्थसंकल्पात तृटी दर्शविणारे व त्याचे लेखापरिक्षण करणे ऑडिटर सुद्धा लक्षावधी संख्येने मिळून जातात पण शेतीत गरिबी आहे कारण शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढेही भाव मिळत नसल्याने शेतीचा अर्थसंकल्प तोट्यात जातो, असे ठासून सांगणारे अर्थतज्ज्ञ किंवा सी. ए मात्र दुर्मीळ असणे वरील कुटनितीचा परिणाम आणि पुरावा आहे.

गणीताच्या भाषेत ०.५ च्या वरील सर्व किंमती १ च्या बरोबर तर ०.५ च्या आतील सर्व किंमती शुन्याच्या बरोबरीच्याच असतात. आज आपल्या देशात बहुतांश शेतमालाला एकूण उत्पादनखर्चाच्या निम्म्यापेक्षाही कमीच भाव दिले जातात. म्हणजे शून्य किंमतीत म्हणजेच फ़ुकटाच्या बरोबरीनेच शेतमाल हडपला जातो, हे गणीतीय सत्य सर्वांनीच स्विकारायला हवे. शेतीतील गरिबी संपवण्यासाठी शेतमालाचे उत्पादन खर्च भरून निघतील एवढे भाव मिळण्याखेरीज अन्य कुठलाही मार्गच अस्तित्वात नसल्याने शेतमाल स्वस्तात मिळाला पाहिजे, अशी मानसिकता आता ग्राहकांनीही बदलणे, काळाची गरज झाली आहे.

                                                                                                                   - गंगाधर मुटे
(’जनशांती’नाशीक, दिवाळी अंकात प्रकाशित लेख)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Nov 14, 2016

ये तू मैदानात : शेतकरी गीत

ये तू मैदानात : शेतकरी गीत

ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||

गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, तेवण्या ये तू मैदानात ||१||

झोन बंदी, निर्यातबंदी
साठेबंदी, प्रदेशबंदी
आयातीचा दोर खेचतो
कंठाचा गळफास
कंठाचा गळफास, कंठाचा गळफास
कंठाचा गळफास सोडण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, सोडण्या ये तू मैदानात ||२||

हात बांधती, पाय बांधती
डोळ्यावरती टाय बांधती
आणिक म्हणती स्पर्धा कर तू
विद्वानांची जात
विद्वानांची जात, ‘ती’ विद्वानांची जात
‘ती’ विद्वानांची जात ठेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, ठेचण्या ये तू मैदानात ||३||

शेतीला गिळणार कायदे
हिरवळीला पिळणार वायदे
सुगीशिखरावर श्वापदं झाली
नांगी रोवून स्वार
नांगी रोवून स्वार, नांगी रोवून स्वार
सरावलेली नांगी चेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, चेचण्या ये तू मैदानात ||४||

रणकंदनाची हाळी आली
नीजप्रहरावर पहाट झाली
दे ललकारी अभय पाईका
हाती घेत मशाल
हाती घेत मशाल, हाती घेत मशाल
मशाल हाती घेत झुंजण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात झुंजण्या, ये तू मैदानात ||५||

- गंगाधर मुटे ’ अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हे काव्यफ़ूल युगात्म्याच्या चरणी वाहून शेतकरी संघटनेला अर्पण करून दिलेल्या वचनमुक्तीतून उतराई होण्याचा प्रयत्न.
संदर्भ >>> http://www.baliraja.com/node/986 “हतबल झाली प्रतिभा”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Sep 4, 2016

प्रणाम युगात्म्या

प्रणाम युगात्म्या

            १९८० चे दशक उजाडेपर्यंत लढाऊ किसान किंवा लढवैय्या शेतकरी हे शब्दच निरर्थक होते. इतिहासात आपण कितीही मागे जाऊन बघितले तरी कोणत्याही कालखंडात भारतीय शेतकरी त्याच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध कंबर कसून साक्षात महाकाली दुर्गेचा अवतार धारण करत होता, अशा काही पाऊलखुणा आढळत नाहीत. अगदी शेताच्या बांधावर राजसैन्याच्या घनघोर लढाया व्हायच्या तेव्हाही तो त्या लढायांकडे मुक बधिरतेने निर्विकार चेहरा करूनच बघत राहायचा. शेतकर्‍याला पक्के ठाऊक होते की, राजे असो, पेशवे असो, मोगल असो किंवा डाकू-लुटेरे असो, हे सारे विजयानंतर आपल्याकडे शेतसारा वसूल करायला किंवा धान्याची लूट करायलाच येणार आहेत. ह्या लढाया म्हणजे शेतसारा वसूल कोणी करायचा याचा रीतसर परवाना मिळवण्यासाठीच असतात. ज्याला आपले म्हणावे असे यांच्यापैकी आपले कोणीच नाहीत.

               कितीही अन्याय, अत्याचार झालेत तरी त्याविरुद्ध एक शेतकरी म्हणून निखळ शेतीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेतकरी पेटून उठला, त्याने राजसत्तेविरुद्ध बंड पुकारले असे उदाहरणच शेतीच्या इतिहासात सापडत नाही. त्याऐवजी दोन्ही हात जोडून अदबीने उभा राहणारा शेतकरी मात्र इतिहासाच्या प्रत्येक पानावर पाहायला मिळतो. साने गुरुजींनी शेतकर्‍यांना लढण्याची प्रेरणा देताना लिहिले,

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्‍यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण

              पण त्या कवितेची शेतकर्‍यांनी दखलच घेतली नाही. शेतकरी उठले नाहीत, रान पेटले नाही आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कुणी प्राणही पणाला लावले नाहीत. तसे पाहिले तर शेतकर्‍यांचा इतिहासच तसा फार चांगला नाही. ज्यांनी ज्यांनी शेतकर्‍यांना लुटायचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी यश मिळवले. पण ज्यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने लढायचा प्रयत्न केला त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला शेतकरी कधीच समोर आला नाही. कदाचित त्यामुळेच शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यापेक्षा शेतकर्‍यांना लुटून जगणार्‍या व्यवस्थेत सामील होऊन आपला निहित स्वार्थ साधून घेणे सगळ्यांना जास्त सोयीचे आणि परिणामकारक वाटले असावे, असा अंदाज बांधणे भाग पडत आहे.

                शेतकर्‍यांची कड घेऊन लढणारे शोधायला आपण इतिहासात कितीही मागे गेलो तरी सरते शेवटी बळीराजावर जाऊन थांबतो. खरे तर बळीराजा हा शेतकर्‍यांचा निखळ राजा नव्हताच. तो शोषित जनतेचा, सामान्य रयतेचा राजा होता. बळीराजाच्या राज्यात प्रजा सुखी होती. शेतकरी हाही त्याच प्रजेचा एक घटक असल्याने तोही सुखी होता. शेतकर्‍यांप्रती चांगला न्याय देणारा बळीराजा व्यतिरिक अन्य कोणी राजाच झाला नसल्याने बळीराजा हाच शेतकर्‍यांना आपला राजा वाटतो. आजही “इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे” अशी शेतकर्‍यांच्या घराघरात प्रार्थना केली जाते. पण नुसतीच प्रार्थना केली जाते, मनोभावना व्यक्त केली जाते. बळीचे राज्य संपल्यानंतर पुन्हा बळीचे राज्य यावे यासाठी मात्र शेतकर्‍यांनी काही प्रयत्न केले होते, याचा मागमूसही इतिहासात सापडत नाही.

     बळीराजानंतर शेतकर्‍याच्या कैवार्‍याचा शोध घेण्यासाठी गाडी पुढे काढली तर गाडी अधेमधे कुठेच थांबत नाही. गाडी थेट म. ज्योतिबा फुले यांच्यानावाजवळ येऊन थांबते. म. फुले हे शेतकर्‍यांचे दैवत. शेतकर्‍यांच्या बाजूने त्यांनीच व्यवस्थेवर पहिला आसूड उगारला. शेतीचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसून त्यांनी आयुष्य खर्ची घातले पण अत्यंत खेदजनक बाब ही की शेतकरी मात्र म. फ़ुलेंच्या बाजूने उभा राहिला नाही. म. फ़ुलेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांना नैतिक बळही पुरवले नाही. ज्योतिबांना एकाकी झुंज द्यावी लागली. अगदी सावित्रीबाईच्या अंगावर घाण फेकण्यात आली तरीही शेतकरी सावित्रीबाईच्या बचावासाठी सरसावला नाही, बंड करून उठणे ही तर फारच दूरची गोष्ट झाली.

        १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात पाहिल्यांदाच एक चमत्कार पाहायला मिळाला. शरद जोशींच्या रूपात एक झंझावात आला. इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते पहिल्यांदाच घडले. लाखो शेतकरी शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून रणात उतरले. “कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकरी संघटित होणार नाही” हा सार्वत्रिक समज तोंडघशी पाडत शेतकर्‍यांची संघटना स्थापन झाली. शेतीच्या प्रश्नावर कधीही शेकडोच्या संख्येत सुद्धा जमा न होणारा शेतकरी समाज लाखांच्या संख्येने गोळा व्हायला लागला. रस्ता रोको, रेलरोको, गावबंदी सारखे अस्त्र उगारून व्यवस्थेला सळो की पळो करून सोडू लागला. पुरुषच नव्हे तर महिलासुद्धा आंदोलनाचे नेतृत्व करायला पुढे सरसावल्या. चांदवडच्या अधिवेशनात ३ लक्ष शेतकरी महिलांची उपस्थिती, हा तर खरोखर चमत्कारच होता. त्यावेळी सर्वांच्या मनात एकच भावना होती,

सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले
बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले

              निखळ शेतीच्या प्रश्नावर ज्याच्या मागे शेतकरी समाज आपापल्या जाती-धर्माचे कडे झुगारून उभा राहिला की ज्यामुळे त्याला शेतकर्‍यांचा नेता म्हणावे, असा शेतकरी नेता एकच आणि तो म्हणजे शरद जोशी. आज शरद जोशी नसताना त्यांच्या पश्चात त्यांचा ८१ वा जन्मदिवस साजरा करण्याचा हा पहिलाच प्रसंग. आजवर या द्रष्ट्या शेतकरी नेत्याची पहिली जयंती उत्साहात साजरी करणार्‍यांना हा जन्मदिवस शोकविव्हळ वातावरणात साजरा करावा लागणार आहे. या वेळेस उत्साह आणि आनंदाऐवजी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच तरळणार आहेत आणि शेतकरी कार्यकर्ते सांडुभाई शेख यांच्या कवितेच्या ओळीच प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडणार आहेत.

हे ब्रह्मा, विष्णू, पांडुरंगा, तुम्हाला काय कमी सांगा
अमुचे शरद जोशी काका, अम्हाला देऊनी टाका

          शरद जोशींवर जिवापाड प्रेम करणारे, त्यांच्या एका शब्दावर स्वत:चा प्राण धोक्यात घालून आंदोलनाचा झेंडा पुढे नेणारे लक्षावधी पाईक त्यांना मिळालेत हे जितके खरे तितकेच हेही खरे आहे की शेतीचे अर्थशास्त्र मांडताना आणि शेतकरी आंदोलनाला पुढे नेताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही, कुणाला काय वाटेल याची कधी पर्वा केली नाही त्यामुळे त्यांना शत्रूही लक्षावधीच्या संख्येतच मिळाले. भारत विरुद्ध इंडिया ही संकल्पना मांडताना इंडियाशी वैरत्व घेतले. सारेच पक्ष शेतकर्‍यांचे शत्रू आहेत, असे सांगत सार्‍या राजकीय पक्षांशी दोन हात केले. निवडणुकांतील उमेदवार म्हणजे दोन गाढवांची शर्यत आहे, आपल्याला सोयीचा गाढव निवडायचा आहे असे प्रचारसभेतील व्यासपीठावर उमेदवाराच्या तोंडावर सांगत आपली भूमिका रोखटोकपणे विशद केली. शासकीय कर्मचार्‍यांचे पगार कमी केल्याखेरीज देशाची अर्थव्यवस्था सुधारणे शक्य नाही, असे प्रतिपादन करून शासकीय कर्मचार्‍यांची नाराजी ओढवून घेतली. आपला विचार मांडताना त्यांनी कुठलीच तडजोड केली नाही. परिणामत: त्यांना मिळालेल्या छुप्या शत्रूंची संख्याही अफाट आहे. सत्तेचे लालसी व शेतकरी आंदोलनाचा शिडीसारखा वापर करून राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करू पाहणार्‍या शेतकरी कार्यकर्त्यांनाही त्यांनी आपल्या जवळपास फारसे फिरकू दिले नाही त्यामुळे अनेक कार्यकर्ते शेतकरी आंदोलनापासून दूर जाऊन राजकीय पक्षांशी घरोबा करते झाले.

            शेतीला मध्यवर्ती स्थानी ठेवून विचारांची गुंफणं करणारा हा द्रष्टा नेता आज शरीराने आपल्यात नसला तरी त्यांचे विचार अनादिकाळापर्यंत शेतकरी पाईकांना प्रकाशवाट दाखवून शेतकरी चळवळीचे नेतृत्व करत राहील यात शंका नाही. २० व २१ फेब्रुवारी २०१६ ला संपन्न झालेल्या नागपूर येथील दुसर्‍या अ.भा.मराठी शेतकरी संमेलनाने त्यांना युगात्मा ही मरणोत्तर लोकउपाधी प्रदान केली आणि त्यांच्या चरणी भावना अर्पण केली की,

एक युग कवेत घेतले म्हणून तू युगात्मा.
एक युग घडवले म्हणून तू युगात्मा.
स्वातंत्र्योत्तर भारतातील सगळ्यात मोठी
लोकचळवळ उभी केली म्हणून तू युगात्मा.
शेतीचा प्रश्न या मातीचा कळीचा मुद्दा होता
ती कळ तुला सापडली म्हणून तू युगात्मा.
तुझ्या शत्रूलाही तुझे श्रेय नाकारता आले नाही
नंतर नंतर तर सगळे पक्ष आणि संघटना
तुझीच भाषा बोलायला लागले म्हणून तू युगात्मा
ऊठ म्हणालास... उठले युग, चाल म्हणालास चालायला लागले
तुझी पाहून जादू मग ब्रह्मांडही हलायला लागले
युगायुगानंतर येतो असा युगावर मिळवणारा ताबा.
शरद जोशी तुला युगात्मा नाही म्हणायचं
तर काय म्हणायचं बाबा?

- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६

     कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण,
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक 
युगात्मा शरद जोशी ८१ व्या जयंतीनिमित्त (३ सप्टेंबर २०१६)  

सादर करीत आहोत.....

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६

विषय : शेती आणि शेतकरी 
(लेखन युगात्मा शरद जोशी यांच्या विचारधारेशी साधर्म्य राखणारे असावे)

या स्पर्धेचे चार प्रकार असतील : गद्यलेखन स्पर्धा-२०१६, पद्यलेखन स्पर्धा-२०१६, अनुभवकथन स्पर्धा-२०१६ आणि शेतीसाहित्य समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६
१] गद्यलेखन स्पर्धा-२०१६
विभाग : अ) ललितलेख   ब) कथा   क) वैचारिक लेख ड) मागोवा

२] पद्यलेखन स्पर्धा-२०१६

विभाग : अ) पद्यकविता   ब) छंदमुक्त कविता   क) गझल   ड) गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी)

३] अनुभवकथन स्पर्धा-२०१६ 
विभाग : अ) शेतकरी आंदोलनातील अनुभव   ब) शेतकरी चळवळीच्या वाटचालीतील अनुभव क) शेतीत राबताना आलेले चांगले/वाईट अनुभव   ड) शेतीच्या संदर्भात राजकीय पुढार्‍यांच्या विरोधाभासी भुमिकेचे आलेले अनुभव

४] शेतीसाहित्य समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६
(परिक्षणासाठी शेतीसाहित्याच्या पुस्तकाची व रसग्रहणासाठी कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे. पुस्तक/कविता युगात्मा शरद जोशी यांच्या विचारधारेशी साधर्म्य राखणारी असणे अनिवार्य आहे.)

विभाग : अ) ललित/गद्य/कथासंग्रहाचे समीक्षण   ब) काव्यसंग्रहाचे समीक्षण    क) कवितेचे रसग्रहण
प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:
१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
२) पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
३) एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्‍या रचनेची निवड केली जाईल.

पारितोषिकाचे स्वरूप :

प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.
निकाल :

युगात्मा शरद जोशी यांच्या महापरिनिर्वान दिनी १२ डिसेंबर २०१६ रोजी अंतिम निकाल जाहीर केला जाईल, तो अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.

पारितोषिक वितरण :

सन २०१७ मध्ये होणार्‍या तिसर्‍या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल.

प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :

१) स्पर्धा ०३ सप्टेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
२) लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन प्रकाशित करावे लागेल.
लेखन करण्यासाठी http://www.baliraja.com/node/add/spardha-2016 हा धागा वापरावा.
३) लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते.
४) स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह  abmsss2015@gmail.com या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
५) स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती  abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख   ब) चरित्रलेख   क) वृत्तांतलेख  ड) अनुभवकथन/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
६) सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
७) स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. 
८) संयोजक मंडळ व परिक्षक मंडळ वगळता अन्य सर्वच (शेतकरी साहित्य चळवळीचे पदाधिकारी सुद्धा) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
९) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
१०) गद्यलेखनासाठी कमाल शब्दमर्यादा - २००० शब्द एवढी असेल.
११) गझलेतील एकूण शेरांच्या १/५ शेर विषयाशी निगडीत असेल तरी ती गझल पात्र समजली जाईल. गझल मुसलसल असणे अनिवार्य नाही.

नियम व शर्ती :

१) स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
२) स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
३) स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
४) एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तरी त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
५) परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील. स्पर्धेचा निकाल घोषित होईपर्यंत परिक्षकांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
६) सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
७) एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
८) अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
९) निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
१०) शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती
                                                                                                                          
                आपला स्नेहांकित
                                                                                                                             
                    गंगाधर मुटे                                                                                                          
                संस्थापक अध्यक्ष                                                                             
       अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
--------------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/ 
किंवा 
https://www.facebook.com/groups/abmssc/ 
येथे भेट द्या,

Aug 28, 2016

झाडावर पाखरू बसलं : लावणी

झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||१||

कलम लावली, खतपाणी दिधलं
कुंपण करुनी जिवापाड जपलं
कुणी ना आलं, पाणी घालाया
खतं टाकाया, कुणी न दिसलं
बहर बघुनी, लाळ गाळती
ताव माराया, अभय चळती
कुणी तरी याssss गं
गोफण धराssss गं
कच्च्या आंब्याला लई बाई पिडलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||२||

                  - गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Aug 11, 2016

अभिमानाने बोल : जय विदर्भ!

अभिमानाने बोल : जय विदर्भ!


या मातीचा सवंगडी तू
अभिमानाने बोल
ही धनश्री माझी, वनश्री माझी
अन वैदर्भीय भूगोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
वैदर्भीय भूगोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

तूर, कपाशी, धान, हरबरा
ज्वारी, सोयाबीन
जांभूळ, केळी, पपई, संत्री
रास पिके अनगीन
सुजलाम सुफलाम
शस्य शामलाम
द्रुमफ़लही अनमोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
द्रुमफ़लही अनमोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

बावनकशीचा साग इथे
कानन नृपती वाघ इथे
कोकीळ, पोपट, मोर, काजवे
दिव्यफ़णीचा नाग इथे
सप्तसुरांचे नाद बोलती
ताशा नगारा ढोल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
ताशा नगारा ढोल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

निसर्गराणी, खनिज खाणी
भुईगर्भाला अविरत पाणी
नयन मनोहर अभय अरण्य
वन्य जीवांची मंजूळ वाणी
या मातीला, जनजीवनाला
मानवतेची ओल
तू अभिमानाने बोल
तू अभिमानाने बोल पाईका
मानवतेची ओल
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!
जय विदर्भ! जय जय विदर्भ !!

                       - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Jul 31, 2016

परतून ये तू घरी

परतून ये तू घरी

मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥

सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥

नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥

शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी
राजसा! परतून ये तू घरी॥

                       - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Jul 18, 2016

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

                               - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८/०७/२०१६

Jul 17, 2016

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥
कळेना अभय कैसा । विठूचा झमेला ॥३॥

                                   - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(१७/०७/२०१६)

Jul 16, 2016

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥

लक्ष अब्जावधी । करोडोचा निधी ।
वाढवी उपाधी । शहरांची ॥७॥

ठेऊनिया कमी । शेतीमाल भाव ।
ध्वस्त केला गाव । पिळुनिया ॥८॥

गावही भकास । भकास मारुती ।
घामाची आहुती । व्यर्थ गेली ॥९॥

तिथे ऐश्वर्याचा । सुख, चैनी, भोग ।
सातवा आयोग । सेवेसाठी ॥१०॥

इथे दारिद्र्याचे । सर्वत्र साम्राज्य ।
कर्जाचेच राज्य । आम्हावरी ॥११॥

गाव म्हंजे जणू । दुभत्याची गाय ।
खरडूनी साय । रक्त पिती ॥१२॥

सांगा तुकोराया । अभय एवढे ।
कुणाला साकडे । घालावे गा? ॥१३॥

                    - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१६/०७/२०१६

Jul 15, 2016

॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥

इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥

आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती  ॥३॥

माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥

गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥

लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।
आणि हयगय । श्रमिकांची ॥६॥

                        - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
           १५/०७/२०१६
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Jul 9, 2016

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Jul 6, 2016

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

रागिष्ट रागिणीला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

आसक्त कामिनीची छाया पडू न द्यावी
दीप्तीसमेत ज्योती विझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे
मुक्तीकडे निघावे हरखून माणसाने

                            - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(मराठी मातीला खट्याळरसाचे वावगे नाही. नास्तिकांना आवडेल अशी भाषाशैली वापरून आस्तिकभाव त्यांचेपर्यंत पोचवण्यासाठी संतांनी खट्याळरसाचा उपयोग खुबीने केलेला आहे. त्याचे पुरावे संतसाहित्यात सापडतात. गझल या विदेशीसंस्कृतीचा पदर लाभलेल्या काव्यप्रकाराला मराठी मातीचा सुगंध देण्याचा हा एक प्रयत्न.)

Apr 23, 2016

दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन चित्रफ़ित भाग - 5Shree Sati Jankumata Prassanna

दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन चित्रफ़ित भाग - 4Shree Sati Jankumata Prassanna

दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन चित्रफ़ित भाग - ३Shree Sati Jankumata Prassanna

दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : वृत्तपत्र वृत्तांत

शेतकरी साहित्यही पुढे यावे

सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : मराठी शेतकरी साहित्य संमेलन

नागपूर : दिवंगत शरद जोशी यांनी शेतकरी चळवळ मोठी केली. शेतकर्‍यांबाबत त्यांनी प्रचंड लिखाण केले. त्यांचे साहित्य इतके मोठे होते की ते कुठल्याही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले असते. परंतु त्यांच्या लिखाणाला मान्यता दिली नाही हा आमच्या साहित्यिकांचा करंटेपणा होता. मराठी साहित्य दरिद्री राहण्यामागंच खरं कारण म्हणजे खर्‍या चळवळीशी कधी जुळवूनच घेतलं नाही. महात्मा गांधींशी जुळवून घेतले नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशीही कुठे जुळवून घेतले. दलित चळवळ आणि साहित्य पुढे आले तेव्हा कुठे त्याची दखल घेतल्या गेली. शेतकर्‍यांचे साहित्यही असे दलित साहित्याप्रमाणे पुढे यावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे संपादक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे केले. 

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे दोन दिवसीय दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे हे संमेलनाध्यक्ष होते तर ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर हे प्रमुख अतिथी होते. शेतकरी नेते वामनराव चटप हे स्वागताध्यक्ष होते. शेतकरी साहित्य चळवळीचे अध्यक्ष गंगाधर मुटे, राम नेवले, संध्या राऊत व्यासपीठावर होते. प्रा. सुरेश द्वादशीवार म्हणाले, एकीकडे ४0 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी बातमी आहे तर दुसरीकडे देशात प्रचंड गुंतवणूक झाल्याची बातमी आहे. देशात येणार्‍या या गुंतवणुकीत मरणार्‍या शेतकर्‍यांशी काही संबंध आहे की नाही, याचा विचारच होत नाही. कारण आमच्या संवेदनात बोथट झाल्या आहेत. ७५ टक्के लोकं खेड्यात राहतात. परंतु कोणताही पंतप्रधान स्मार्ट खेडी बनवण्याची भाषा बोलत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. 

शरद जोशी यांनी शेतकरी चळवळीला गती दिली. त्यांच्या संमेलनाला ५-५ लाख लोक एकत्र यायचे. जोपर्यंत शेतीच्या मालाला भाव मिळावा, अशी त्यांची मागणी होती, तेव्हापर्यंत लोकं त्यांच्यासोबत होते. परंतु शेतकर्‍यांच्या सबलीकरणासाठी त्यांची राजकीय शक्ती उभी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हा लोकांना त्यांची जात आठवली. 

गरिबांच्या किंवा शेतकर्‍यांच्या चळवळीत जोपर्यंत लोक आपली जात धर्म विसरून एकत्र येणार नाही, तोपर्यंत या व्यथा अशाच राहतील. अलीकडे शेतकरी साहित्याबद्दल चांगले लिहिले जात आहे. त्यांना बळ द्या, असेही ते म्हणाले. राजीव खांडेकर यांनीसुद्धा दिवंगत शरज जोशी यांच्या विपुल साहित्यावर प्रकाश टाकला. तसेच डॉ. आंबेडकरांचे विचार त्यांच्या अनुयायांनी ज्या प्रमाणे पुढे नेले, त्याच प्रमाणे शेतकरी चळवळ सुद्धा पुढे नेण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. अँड. वामनराव चटप यांनी पत्रकार आणि साहित्यिकांनी शेती व शेतकर्‍यांच्या व्यथा मांडून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधावे. लोकांच्या संवेदना जागृत व्हाव्यात असे लेखन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी 'कणसातील माणसं', नागपुरी तडका या काव्यसंग्रहासह 'शेतकर्‍यांचा सूर्य' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक केले. मनिषा रिठे यांनी संचालन केले. तर राम नेवले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) 

महासत्तेकडे वाटचाल म्हणजे अफूची गोळी देणे - रा.रं. बोराडे

■ ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आपला देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, असं म्हणणे म्हणजे जनतेला अफूची गोळी देणे आहे. हे खर मानलं तरी एक प्रश्न उपस्थित होतो. माझा एक नातू हैदराबाद येथील एका इंग्रजी शाळेत शिकतो. माझ्या शेतकरी भावाचा एक नातू माझ्या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. माझ्या शेतकरी भावाचा हा नातू माझ्या नातवाच्या हातात हात घालून महासत्तेकडे जाणार आहे का? नसल्यास महासत्तेच्या अशा फुशारक्या मारण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतीच्या समस्येच्या मुळाचा आपण विचार करण्याची गरज आहे. आता सर्व अल्पभूधारक झाले आहेत. अशा परिस्थितीत केवळ रस्त्यावर उतरणेच आपल्या हातात आहे. शेतकरी शेतात काम करता करता जगला पाहिजे ही भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकर्‍यांच्या आत्महत्या या फॅशन झाल्याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही यावेळी त्यांनी केला.
--------------------------------------------------
22/02/2016
--------------------------------------------------

शेतकर्यांसाठी शरद जोशींचा मार्शल प्लॅन लागू करा

श्रीनिवास खांदेवाले : दुसर्‍या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा समारोप

नागपूर : भारतात तीन लाखांवर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा देश आणि राज्याच्या राजकारण व अर्थकारणावर परिणाम झाला नाही. दबाव वाढले तेव्हा पॅकेज जाहीर करून वेळ निभावून नेली. शेतकर्यांचे दु:ख, दारिद्रय़ संपविण्यासाठी सरकारला ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था विकसित करणे गरजेचे आहे. परंतु सरकारजवळ नियोजनाचा आराखडाच नाही. ज्या देशात ६0 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्याला प्राधान्यक्रमच नाही. त्यामुळे आत्महत्यांचे सत्र वाढताना दिसत आहे. शेतकर्यांच्या दारिद्रय़मुक्तीसाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी मार्शल प्लॅन तयार केला होता. शेतकर्यांसाठी हा मार्शल प्लॅन लागू करणे गरजेचे आहे, असे मत अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले. 

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ संघटनेतर्फे दोन दिवसीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी संमेलनाचा समारोप झाला. समारोपीय कार्यक्र मात अध्यक्ष म्हणून खांदेवाले यांनी शेतकर्यांच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे नेते गुणवंतराव पाटील, माजी आमदार सरोजताई काशीकर, ज्येष्ठ साहित्यिक व कादंबरीकार रावसाहेब बोराडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे उपस्थित होते. या संमेलनात सर्वानुमते शरद जोशी यांना 'युगात्मा'ही लोकउपाधी देण्यात आली. याप्रसंगी सरोज काशीकर म्हणाल्या की, शेतकरी विकासाच्या नावावर लुटल्या गेला आहे. सरकारने कायद्याचे निर्बंध घालून त्याला बेड्या घातल्या आहे. शेतकर्यांची सर्व बाजूने कोंडी झाली आहे. शरद जोशी यांच्या मार्शल प्लॅननुसार शेतमालाच्या आयातीवर बंधने घालून निर्यातीला प्रोत्साहन द्या, निर्यातीसाठी ३0 टक्के सूट द्या, शेतीला उद्योगाचा दर्जा द्या तरच खर्या अर्थाने भारताचा विकास होईल. 

याप्रसंगी गुणवंतराव पाटील म्हणाले की, शरद जोशी यांनी १९९३ मध्ये लेखाजोखा आंदोलन पुकारले होते. यात सरकारने शेतकर्यांना कशा पद्धतीने लुटले, हे शरद जोशी यांनी सरकारपुढे मांडले होते. शेतकरी सरकारचा कुठलाही देणेदार नाही. त्याच्यावरचे सरसकट कर्ज काढून टाकले पाहिजे. त्याला आधुनिक तंत्रज्ञान पुरविले पाहिजे. सातव्या वेतन आयोगाला शेतकर्यांनी पुढे येऊन विरोध केला पाहिजे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन जगदीश भगत यांनी केले. (प्रतिनिधी) 

कवितेतून मांडले शेतकर्यांच्या दु:ख, वेदनेचे प्रतिबिंब


दु:ख, आक्रोश, वेदना आणि मन हेलावून सोडणारे शब्दांचे बाण कविसंमेलनात शेतकर्यांच्या अवस्थेची जाणीव करून देत होते. ही जाणीव करून देताना सरकार आणि राजकीय नेत्यांवरील संताप व्यक्त होतानाही दिसत होता. शेतकर्यांच्या आत्महत्येवरील एका कवितेत राजकारणाचा समाचार घेताना कवी म्हणाला, कोणी म्हणतो हिरवा, कोणी म्हणतो भगवा, अबे शेतकरी मरून रायला, पहिले त्याले जगवा. शहरे स्मार्ट होत असताना, गाव भकास होत आहे. जगाचा पोशिंदा आत्महत्येकडे वळल्यामुळे, ग्रामीण भागात उदासी पसरली आहे. या वातावरणावर लक्ष वेधताना कवी विजय विलेकर यांच्या कवितेतून ही भीती व्यक्त होताना दिसते. ते म्हणतात, 'आत्महत्येची किंचाळी पडते दुरून, अरे व्हारे बाबा जागे हाती मशाल घेऊन..' कवी रवींद्र कामठे हे सुद्धा सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका करताना म्हणतात, 'कोपलेल्या निसर्गावर मात करण्याचे धाडस होते, मातलेल्या सरकारचे डोके कुठे होते..' कवी रविपाल शेतकर्यांची वेदना मांडताना म्हणाले, 'अस्तित्वाने जाहीरनामा कालच प्रसिद्ध केला, जी वस्तू दान केल्या जाते, तिचा निर्माता मेला.' यासारख्या एकाहून एक मनाला झोंबणार्या कविता दुसर्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात सादर करण्यात आल्या. कविसंमेलनाचे अध्यक्षपद ज्ञानेश वाकुडकर यांनी भूषविले. संमेलनात दिलीप भोयर, नवनाथ पवार, प्रा. मनीषा रिठे, धीरज ताकसांडे, डॉ. विशाल इंगोले, श्रीकांत धोटे, शैलजा कारंडे, वृषाली पाटील, दामोदर जराहे, सुमती वानखेडे, रामकृष्ण रोगे, सांडोभाई शेख, सुरेश बेलसरे, मोरेश्वर झाडे, राजेश जवंजाळ या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Deshonnati ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Lokmat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Deshonnati ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Hitvad ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Lokmat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Loksatta ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Maharashtra Times ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sakal ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sakal ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दिनांक : २२ एप्रिल २०१६

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Tarun Bharat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Deshonnati ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  Deshonnati
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  Deshonnati~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Lokmat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Lokmat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Lokasatta ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Maharastra Times ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Maharastra Times ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Maharastra Times ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Punyanagari ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Punyanagari ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sakal ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sakal ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sakal ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~Tarun Bharat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन चित्रफ़ित : भाग - २Shree Sati Jankumata Prassanna

Apr 22, 2016

दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन उद्घाटनसत्र : भाग - १

 दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन

२० व २१ फ़ेब्रुवारी २०१६

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर

उद्घाटनसत्र चित्रफ़ित : भाग - १

ABP MAJHA Mathadiदिनांक ; ०४/०४/२०१६

एबीपी माझा विशेष

विषय : माथाडी कामगार शेतकर्‍यांच्या जिवावर का उठलेत?

- सहभाग -

* गंगाधर मुटे, शेतकरी संघटना नेते, लेखक

* नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते

* संजय पानसरे, माजी संचालक, एपीएमसी

* शंकरराव पाटील, क्रांतीसिंह मंडई, दादर

* दशरथ सावंत, प्रगतीशिल शेतकरी नाशिक

Mar 23, 2016

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

माझ्या मामाला साडेचार पोरी
चार डोमड्या पण एक छोरी गोरी
या छोर्‍यांचं कौतूकं सांगू मी काय
गे माझे शिमगेमाय!

एक नुसताच लंबा बांबू
जणू हाडाचा उभारला तंबू
रक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय
गे माझे शिमगेमाय!

एक भलतीच ऐसपैस
जणू पंजाबी मुऱ्हा म्हैस
डोलतडोलत रस्त्यानं चालत जाय
गे माझे शिमगेमाय!

एका रंभेचं रुपडं भालू
दोन्ही गालाचे फ़ुगले आलू
रोज वेणीला लावते हेअरडाय
गे माझे शिमगेमाय!

एक अप्सरा बेलमांजर
हत्ती डोळ्यात काजळाचे थर
पण स्वभाव गरीब गोगलगाय
गे माझे शिमगेमाय!

एक दणकट मल्ल शिपाई
तिला पिसीआर घेण्याची घाई
तिची मस्करी अभय तू करायची नाय
गे माझे शिमगेमाय!
                  - गंगाधर मुटे ’अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Jan 6, 2016

स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल

पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल

खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल

शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव
बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव
तरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल ?

आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा
म्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा वाजा
स्वदेशीचे ढोंगधतूरे; खातोस विदेशातली दाल

छल कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता
'अभय' जाहली जर भूमिकन्या, मरशील लाथा खाता
तुझी हुशारी, अक्कल तज्ज्ञा बेसुरी बेताल

                                   - गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बुलडाणा : चार/एक/सोळा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं