Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

May 28, 2012

माणसांचे यशू-बुद्ध होते

.
माणसांचे यशू-बुद्ध होते
.
.
घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

प्रणयवासनेला सिमा ना वयाची
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते

किती साचुदे गाळ-कचरा तळाशी
तरी धार नाहीच अवरुद्ध होते

जसा बाज गझलेस येतो मराठी
तशी मायबोलीच समृद्ध होते

कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते

                          - गंगाधर मुटे
---------------------------------

May 25, 2012

भिक्षा..!!

भिक्षा..!!

ऐकविण्याची रीत तुमची
काळीज माझं चिरते आहे
आमंत्रकालाच म्हणताय तुम्ही
भिक्षा मागत फिरते आहे?

मीच चालवितो सदावर्ते
कैक ढेकरे तृप्त होती
यज्ञ माझा सफ़ल करूनी
प्रेमे "पुलेशू" मजला देती ...!!

तुमचे माझे कसले नाते
मी भक्त; तुम्ही दैवत माझे
घ्यावे मजला सांभाळुनी
पदरी घ्यावे गुन्हे माझे ..!!

आमंत्रण जर का असेल गुन्हा
देत फ़िरेन मी पुन्हा-पुन्हा
मरेस्तोवर मागुनी भिक्षा
गुन्हा करेन मी पुन्हा-पुन्हा..!!

                     - गंगाधर मुटे
------------------------------

May 24, 2012

उद्दामपणाचा कळस - हझल

.
उद्दामपणाचा कळस - हझल
.
.

भिणार नाही तुला कुणीही, फुसकी खळबळ म्हणजे तू
पेल्यामध्येच खळवळणारे पुचाट वादळ म्हणजे तू

पराकोटीचा बेशरम तू, लाचार तू, येडपट तू
शेणामधल्या किड्यासारखी, अविरत वळवळ म्हणजे तू

नको तिथे नाक खुपसण्याचे, प्यायलास तू बाळकडू
उथळ पाण्यासारखी खळखळणारी खळखळ म्हणजे तू

ओंगळ तू, वंगाळ तू, जसा मल सांडव्याचा गाळ तू
साचलेल्या डबक्यामधील कुंठलेले जळ म्हणजे तू

राहू-केतू तू, असुरांचे दृष्ट हेवे-दावे तूच
स्मशानभूमीत पिशाच्चांची अशांत वर्दळ म्हणजे तू

छल-कट शिरोमणी शकुनी तू, कळीचा नारद मुनी तू
दुनियेस हैराण करणारी चुगलखोर कळ म्हणजे तू

वात्रट तू, वाह्यात तू, असतो इंद्रियांच्या कह्यात तू
उद्दामपणाच्या वृक्षाला आलेले फळ म्हणजे तू

ना नर तू, ना नारायण तू, दहा मुखाचा रावण तू
सर्व विकारास 'अभय'दाते, सोयीचे तळ म्हणजे तू

                                                        - गंगाधर मुटे
-----------------------------------------------------

May 19, 2012

कापला रेशमाच्या सुताने गळा

.
.
--------------------------------------------------------
कशी देऊ दाद मित्रा, तुझा विकासाचा आलेख वेगळा
ऐश्वर्य तुझे सात मजली, अन तुला गालिच्यांचा लळा
आरसी - ओसी मध्ये तुझी करंगळी खेळते....... पण;
त्या तिथे गावी बापास तुझ्या मिळ कोरडा जोंधळा
---------------------------------------------------------
.
.
कापला रेशमाच्या सुताने गळा
.

जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
कापला रेशमाच्या सुताने गळा

घेतला आळ नाही निसर्गावरी
भोगुनी सोसले मी तडाखे-झळा

साथ नाही सुखाचा खरे हे जरी
का तुझ्या वाचुनी मी लुळापांगळा?

राहतो मी कुठे, नेमका कोण मी?
सापडेना खुणा, मी कसा बावळा?

भाग ओसाड का घाम गळतो जिथे?
वाट चुकलाय पैसा-टका आंधळा

झेप घेण्यास तू वेळ लावू नये
मांडला आज आहे इथे सापळा

रंग खात्रीस पक्का, फिका ना पडे
वर्ण भाग्यात माझ्या निळासावळा

मार्ग सारेच धुंडाळतो कैकदा
चालण्याला तरी शोधतो वेगळा

चित्त शाबूत असणे ”अभय" चांगले
पोळलेला जरी भावनांचा मळा

                               - गंगाधर मुटे
---------------------------------------
अवांतर - एक विडंबन

मै खंजर तो नही
मगर ये घोरफडी
जबसे मैने तुझको काटा
खंजरी हो गयी....॥
---------------------------------------

May 14, 2012

सुप्तनाते

.
सुप्तनाते
.
तुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना
कुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना

तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा
तुझे वागणे तूज लखलाभ मित्रा, तुला मोक्ष देवो अहंभावना

तुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे?
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना

चला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ, हृदय भासते 'मेड इन चायना'

किती ग्रंथ वाचून मुखपाठ केले, किती ऐकतो रोज पारायणे
जुमानेच नाही कशालाच थोडी, नियंत्रीत होईचना वासना

कसा आज रस्ता दिशाभूल झालो, निघालो कुठे अन् कुठे पोचलो
कसोटीत उद्दिष्ट हरवून गेले, "अभय" व्यर्थ गेली तुझी साधना

                                                               - गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------

मीमराठी स्नेहसंमेलन : मल्टीस्पाईस, पुणे

मीमराठी स्नेहसंमेलन : मल्टीस्पाईस, पुणे

 (श्री विशाल  कुलकर्णी यांनी मीमराठीवर लिहिलेला  वृत्तांत)

ए ’सिंहगड’ पक्का ना मग? १३ मे करेक्ट?
काय राव, सिंहगडावर कसली गर्दी असेल शनिवार-रवीवार आणि आमच्यासारख्यांनी गडावर चढायचे म्हणजे? पुन्हा स्नेहसंमेलनाला जर कुणी ’वयोवृद्ध’ सदस्य येणार असतील तर (उदा. "?") त्यांना चढणे होणार का गडावर?
पण मी काय म्हणतो, पुण्यातच कुठेतरी सगळ्यांना येता येइल असे एखादे मध्यवर्ती ठिकाण नाही का ठरवता येणार?
"ब्रह्मा किंवा मल्टीस्पाईस' ठरवता येइल, पण मग खर्च आपल्याला वाटून घ्यायला लागेल...
'ठिक आहे ना, जर सगळ्यांची सोय होणार असेल तर खर्चाचा मुद्दा दुय्यमच नाही का?"

         गेले कित्येक दिवस मीमराठीवर गाजत असलेला २०११-२०१२ मधील काव्यलेखन आणि कथालेखन स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाबद्दल चाललेली चर्चा शेवटी 'म्हात्रे पुलाजवळील 'मल्टीस्पाईस' व्हेज रेस्टॉरंट या ठिकाणी सगळ्यांनी भेटायचे या मुद्द्यावर एकमत येवून संपुष्टात आली. मुळातच नेहमीप्रमाणे एखादा हॉल वगैरे घेवुन, पाहुणे बोलावून टिपीकल बक्षीस समारंभ करण्यापेक्षा एक अनौपचारिक स्नेह संमेलन करायचे ही कल्पना सगळ्यांनीच उचलून धरलेली असल्याने बर्‍याच कटकटी आपोआप दूर झाल्या होत्या.

              शनिवारी संध्याकाळी ठरल्याप्रमाणे अशोककाकांचा फोन आला. "विशाल, मी पोचलोय रे पुण्यात. उद्या सकाळी ९-९.३० च्या दरम्यान स्वारगेटला भेटू." काका, सांगवीला त्यांच्या चिरंजिवांकडे उतरले होते. सकाळी आम्ही स्वारगेटपाशी भेटायचे आणि मग तिथुन 'मल्टीस्पाईस' वर हल्ला करायचा असे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी बरोब्बर ८.५५ मिनीटांनी काकांचा फोन आला. ते स्वारगेटला पोचले होते. सव्वा नऊ पर्यंत मीही पोचलो आणि काकांना शोधायला सुरुवात करणार. तोवर तिथे उभे असलेले एक 'गॉगल' घातलेले 'डॉन' टाईप व्यक्तीमत्व पुढे आले. मी बाईक बाजुला लावत होतो तोवर काकांचा हुकुम झाला. 'गाडीवरुन खाली उतर." (मला क्षणभर सदाशिवपेठेत उभा असल्याचा भास झाला.) पण मी पुढे होवून हात जोडेपर्यंत अशोककाकांनी छान मिठी मारली. क्षणभर मला माझ्या आण्णांच्याच मिठीत असल्याचा भास झाला. ८.५० ते सवा नऊ एवढ्या वेळेत काकांनी तिथल्या एका उसाच्या रसविक्रेत्याशी मैत्री करुन टाकली होती. (हे अशोककाकांनाच जमू जाणे). काकांना घेवुण नियोजीत स्थलाकडे प्रस्थान केले. तेवढ्यात काकांनी मीरजहून श्री. जावेद मुल्ला हे (मीमचे नवसदस्य, एक उत्कृष्ट चित्रकार आणि 'कै. मोहम्मद रफीसाहेबांचे' अनन्य भक्त)आधीच मल्टीस्पाईसकडे रवाना झाल्याची बातमी दिली. आम्ही ही तिकडेच निघालो. काकांशी बोलण्याच्या नादात आम्ही थोडे पुढे गेलो आणि रस्ता चुकलो. तिथुन मालकांना फोन, मग ररादांना फोन. ररांनी व्यवस्थीत रस्ता समजावून सांगितला आणि शेवटी एकदाचे आम्ही गडावर येवुन पोहोचलो. दरम्यान आशिषशी (निंबाळकरांचा)समस - समस खेळणे सुरुच होते. मीमचे नव सदस्य श्री. गिरिश खळदकर हे आशिषला स्वारगेटवरुन घेवून मल्टीस्पाईसकडे रवाना झाले होते.


             इथे जावेदभाई आमची वाटच बघत होते. इतक्यात मालकही दोन मिनीटाच्या अंतरावर असल्याची बातमी मिळाली. मालकांची दोन मिनीटे म्हणजे २० मिनीटांपासुन एक तासापर्यंत कितीही होवु शकत असल्याने आम्ही थोडे काळजीत पडलो होतो, पण मालकिणबाईंनी २ म्हणजे दोनच मिनीटे अशी ग्वाही दिली आणि आम्ही निश्चिंत झालो. 'मल्टीस्पाईस' सकाळी ११ वाजता उघडते त्यामुळे आम्ही पोचलो तेव्हा तिथे अजुन साफ सफाईच चालु होती. कदाचीत एखाद्या झाडु आमच्याही हाती सोपवला जायचा या भितीने आम्ही (अस्मादिक, अशोककाका आणि जावेदभाई) बाहेरच थांबलो. तोपर्यंत मालक पोचलेच आणि आम्ही आत शिरलो. आल्या आल्या मालक आम्हाला 'चल तुला एक गंमत दाखवतो' म्हणून बाहेर घेवुन गेले. (नंतर येणार्‍या प्रत्येक जवळच्या व्यक्तीला गंमत दाखवण्याचे काम मालक इमाने इतबारे करत होते )

              भेटल्या भेटल्या अशोककाकांनी निपोंच्या मातोश्री आजारी असल्याकारणे ते येवु शकत नसल्याची बातमी दिली होती, त्यामुळे अशोककांच्या चेहर्‍यावर थोडी नाराजी होती. पण तेवढ्यात निपोंचा फोन आला आणि त्यांच्या भगिनी मातोश्रींची काळजी वाहण्यास समर्थ असल्याची आनंददायी बातमी देत त्याचबरोबर निपोंनी ते पुण्यात पोचले असुन, ररांबरोबर कार्यक्रमस्थळी येत असल्याची शुभवार्ता ऐकवली आणि काकांची कळी खुललली. एकेक मंडळी हळु हळू यायला लागली. सर्वात आधी गिरीश आणि श्रीमंत निंबाळकर महोदय हजर झाले. आम्ही सर्वात आधी निंबाळकरांची पावले सरळ असल्याची खात्री करुन घेतली. त्यावर निंबाळकरांनी 'आमची पावले उलटीच आहेत, पण तुम्हाला भय वाटू नये म्हणून आम्ही त्यानुसार आपले समस्त शरीर वळवून घेतलेले आहे' अशी बातमी दिली. बाकीची मंडळी येइअपर्यंत अस्मादिकांनी आपली फोटोग्राफीची हौस भागवून घेतली.इतक्यात एक हेल्मेट हॉटेलच्या कंपाऊंडमध्ये आत शिरलं. हे कोण असावेत असा विचार मनात येतोच आहे, तोवर "हेच ते ड्रेस-कोड वाले!" अशी अभिनव ओळख करुन देत मालकांनी 'विमो उर्फ विवेक मोडक' यांचं स्वागत केलं.

तेवढ्यात मीमवरील 'आदित्य चंद्रशेखर' हे आपल्या सौभाग्यवती आणि चिरंजिवांसहीत हजर झाले. मालकांनी लगेचच आदित्यच्या चिरंजिवांना 'मीमवरील सर्वात तरुण सदस्य' असा प्रिमीयम बिल्ला जाहीर करत असल्याची घोषणा केली. यावर विमोंनी स्वतः मालक आणि मालकिणबाई हे मात्र अजुनही 'प्रिमीयम सदस्य' नसल्याची आठवण करुन दिली. (रुपये ७०० + ७०० = १४०० या रकमेचा चांदनी दरबारात स्वीकार करुन तिथेच पोच पावती देण्यात येइल याची मालकांनी पोच घ्यावी. तसेच जितका उशीर होइल तितके १४०० वरील व्याज वाढत जाईल याचीही नोंद घ्यावी)

सौ. राज जैन, सौ. आदित्य आणि नव निर्वाचीत मीम सदस्य 

नव सदस्याने मीमचा स्वीकार करावा म्हणून त्यांना मस्का मारणारे मीमचे मालक आणि ही काय ब्याद गळ्यात पडली म्हणून वैतागलेले नव सदस्य

हळु हळु सगळी मंडळी जमा व्हायला सुरुवात झालेली होती. मुटेसाहेब पुण्यात पोचले असुन कार्यक्रमस्थलाकडे रवाना झाले आहेत ही बातमी येवुन पोचली होती. नेहमीप्रमाणे उशीरा येणारे मनसे लोहगाव शाखा उपाध्यक्ष इथेही आपल्या किर्तीला जागले.येणार्‍या प्रत्येकाची ओळख करुन देण्याचे काम मालक मनोभावे पार पाडत होते. टेबलावर बसुन एकमेकांची फिरकी खेचायचे प्रकार सुरु झाले होते.

मीमवरील एक महा-सज्जन(?)(कृपया डॅशच्या (-)जागी 'बाराचे' असे वाचावे)सदस्य विमोशेठ आणि शाखा उपाध्यक्ष

आशिष निंबाळकर (उत्सवमुर्ती - सफेद टी शर्ट) आणि गिरिश खळदकर

अशोककाका आणि शाखा उपाध्यक्ष

इतक्या वेळात मीमचे वयोवृद्ध सदस्य श्री.ररा निपोंना घेवून पोचले होते. जावेदभाईंनी आपला रफीसाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह मीमच्या सदस्यांसाठी खुला केला होता. जावेदभाई, पेशाने कलाशिक्षक आहेत. पण त्याबरोबरच एक उत्कृष्ट चित्रकारही आहेत.

निपो आणि जावेदभाई
(यातील निपो कोण हे ओळखणार्‍याला मालकांतर्फे ब्रह्मावर नेवुन एक कटींग चहा पाजण्यात येइल.)


इतक्यात मालकांना जोशीबाईंचा (प्रियंका) फोन आला व जोशीबाई पटवर्धनबागेपाशी असल्याचे कळले. मालक त्यांना 'मेहंदळे गॅरेजपाशी' बोलवण्याच्या विचारातच होते, तोवर जोशीबाईंनी रिक्षावाला सरळ मल्टीस्पाईसलाच घेवुन येत असल्याची बातमी मालकांना दिली. (रिक्षावाल्याचे ते सौजन्य पाहून आपल्याला अंमळ गहिवरुन आल्याचे मालकांनी नंतर मालकिणबाईंजवळ एका़ंतात कबुल केले अशी विश्वासु सुत्रांची माहिती आहे.)

जोशीबाई (प्रियंका पण चोप्रांची नव्हे) [मागे उभी असलेली व्यक्ती जोशीबाईंचा अंगरक्षक नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी]

ज्यांच्यामुळे सिंहगड कॅन्सल झाला ते 'गवि'च येवु शकत नसल्याने 'गवि'चा आतापर्यंत किमान १०० वेळातरी उद्धार झालेला होता. शेवटी गविंना एक दिवस गोव्याला 'मार्टिन्स कॉर्नरला' घेवून जायचे आणि सगळे बिल त्यांना भरायला लावायचे अशी सौम्य शिक्षा ठोठावण्यावर सदस्यांचे ९९.५% vs ०.५% असे एकमत झालेले होते.

काव्य स्पर्धा २०११ आणि लेखन स्पर्धा २०१२ अशा दोन्ही बक्षीस समारंभाची वाट पाहात एकमेकांशी गप्पा मारत, एकमेकाच्या फिरक्या खेचण्यात मशगुल असलेले मीमकर.. (डावीकडुन मालक, आदित्य चंद्रशेखर, श्री श्री श्री स्वामी संकेतानंद महाराज धायरी-बंगरुळकर आणि पिंगुशेठ) पाठमोर्‍या व्यक्तीच्या केसांवरुन त्या व्यक्तीबद्दल अंदाज आला असेलच. तरीही सद्ध्यातरी आम्ही ते नाव गुलदस्त्यातच ठेवत आहोत. तोवर keep on guessing !या वेळेपर्यंत बाकीची मंडळीही येवुन दाखल झाली होती.
उदा. झकासराव,

नीळा प़क्षी (हा पक्षी चक्क गौरवर्णीय निघाला, मीमकरांची दिशाभूल केल्याबद्दल नीलपक्षींचा झायीर णिशेद !त्याचबरोबर मीमच्या या कौटुंबिक सोहळ्यात आपल्या कुटुंबियांबरोबर सहभागी झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि अभिवादनही !

मीमचे अनुभवी सदस्य श्री. कोर्डे बंधुही कुटुंबासहीत येवुन दाखल झाले होते.
श्री.अरुण कोर्डे व श्री. शरद कोर्डे

इतका वेळ ज्याची आतुरतेने वाट पाहात होतो तो आपला सर्वांचा लाडका मीमकरही येवुन दाखल झाला. एवढ्या मोठ्या प्राणघातक आपत्तीतून नुकताच बाहेर आलेल्या या लाडक्या मित्राला बघून खरोखर मनस्वी आनंद झाला.

बावनखणीचा जादुगार : धुंद रवी

आता सगळेच कडाडलेले होते. त्यामुळे मालकांनी इनिशिएटिव्ह (मराठीचा आग्रह असणार्‍यांनी योग्य तो शब्द सुचवावा) घेवुन सुपची ऑर्डर दिली आणि सुप टेबलवर येताच बक्षीस समारंभाची घोषणा करुन गरम गरम सुप पिण्याच्या आनंदावर 'सुप'आपलं 'पाणी' फिरवले. आधी 'काव्य लेखन २०११' च्या विजेत्यांचा श्री. अशोककाका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्री. गंगाधरदादा मुटे आणि श्री. आदित्य चंद्रशेखर काकांच्या हातून पुरस्कार आणि प्रमाणपत्र स्वीकारताना...


त्यानंतर ’लेखन स्पर्धा २०१२’ च्या विजेत्यांचा अनुभवी मीमराठी करांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तृतीय पुरस्कार विजेत्या ’नीलपक्षी’ यांना मुटेसाहेबांच्या हस्ते गौरवण्यात आले.

द्वितीय पुरस्कार ढापणारे श्री श्री श्री ईरसाल म्हमईकर यांचा श्री. कोर्डे बंधु यांच्या हस्ते ’सत्कार’ करण्यात आला.

तर प्रथम पुरस्कार विजेते श्री. आशिष निंबाळकर यांना साक्षात मीमच्या आदीपुरुषाच्या हस्ते गौरवण्यात आले.
आशिष निंबाळकर रमतारामश्रींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना...

दरम्यान प्रत्येक विजेत्याने आपले मनोगतही व्यक्त केले. समस्त मीमकरांनी एकमताने फ़क्त चारच शब्दात आपले मनोगत व्यक्त करण्याची मागणी केलेली असतानाही ती बंडखोरपणे धुडकावून लावत ईरसाल म्हमईकरांनी उपस्थित सर्व मीमकरांना खालील आवाहन केले.

"आपण सर्वजण मीमराठीचे निश्चितपणे काही ना काही देणे लागतो. याची आठवण करुन देत आम्ही तुम्हा सर्वांना जबरदस्तीची विनंती कर्तो आहोत की इथे लेख, ललित, प्रवास वर्णन, कथा, कविता काहीही लिहीले नाही तरी एकवेळ चालेल पण फ़क्त वाचनमात्र राहू नका. उपलब्ध सर्व लेखनावर आपल्या शक्य तेव्हा व शक्य तेवढ्या शब्दात प्रतिसाद जरुर द्या. मीमराठीने आपल्याला दिलेल्या खजिन्याच्या बदल्यात आपण मीमराठीसाठी एवढे नक्कीच करु शकतो आणि करुच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाकडेवाडी!"

यानंतर श्री. अर्धवट तसेच शाखा उपाध्यक्ष श्री. सुहासराव यांनी अतिशय भावुक होत मालकांचे कौतुक केले. (मालक, ७०० रुपये आधीच वसुल केलेले आहेत ना दोघांकडुनही)

पुरस्कार वितरण सोहळ्याचे फोटो काढण्यात रमलेली उत्साही फोटोग्राफर मंडळी

बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपला आणि सर्व जण मुख्य मुद्द्याकडे वळले. म्हणजे आवडीच्या कामाला लागले...
जेवण टेबलावर येइपर्यंत गप्पा मारण्यात दंग झालेले मीमकर...


मनस्वी राजन, मीमवरच्या निवांत पोपटाबरोबर

डाव्या कोपर्‍यात स्वामीजींबरोबर बसलेले 'सातारकर'स्वामी !

खास अशोककाकांना भेटण्यासाठी म्हणून आलेली त्यांची भाची आणि अस्मादिकांची धाकटी बहिण दक्षीणा

बहुदा कुठल्यातरी अनन्य भक्ताला आपल्या कृपावचनांचा लाभ करुन देत असलेले स्वामी संकेतानंद, मनस्वी राजन आणि धुंद रवी यांच्यासोबत...

एकदाचे जेवण टेबलवर लागले आणि इतका वेळ हाडाडलेले मीमकर 'अन्नं पुर्णब्रम्ह'वर कचकचुन तुटून पडले.भुकेजलेल्या मीमकरांना बघून आश्चर्यचकीत झालेले 'नव निर्वाचीत मीम सदस्य' जेवणावर तुटून पडलेल्या मीमकरांकडे पाहताना..

च्यायला, काय माणसे आहेत एकेक? कधी खायला मिळालं होतं का नव्हतं यांना?

जेवण आटोपल्यावर नेहमीप्रमाणे गृपचे फोटो सेशन पार पडले.


इथे बहुदा मालकांना धरुन बसलेल्या मालकिणबाईंना 'बाई गं, तुझाच आहे, आम्ही नाय नेत त्याला' असे सुहासरावांनी सांगितल्यामुळे त्या अंमळ लाजल्या असाव्यात. (हे ही एक आश्चर्यच)


सर्व काही व्यवस्थीत पार पाडल्यावर एखाद्या सावकाराप्रमाणे मालकांनी उपस्थित सदस्यांकडून ठरलेला हप्ता गोळा केला आणि हॉटेल मालकांचे बील भरुन टाकले. (यानंतर मात्र मालकांनी खरोखर सुटकेचा श्वास सोडला असेल)

सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर हळु हळु सर्वांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली. बाकी प्रतिसादातुन बाकीचे सदस्य आपला अनुभव आणि छायाचित्रे शेअर करतीलच. तोपर्यंत एवढेच.....


आपला..
ईरसाल म्हमईकर

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं