Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......
Showing posts with label Agriculture. Show all posts
Showing posts with label Agriculture. Show all posts

Dec 6, 2019

उलट्या काळजांची उलटी गंगा

उलट्या काळजांची उलटी गंगा


उलटी गंगा वाहे, पूर आकाशी आला
एकाएकी नावेमध्ये, समुद्र बुडाला

       माझ्या बालपणी गावातील वारकरी भजन मंडळात हे भजन हमखास गायले जायचे. हे भजन भारूड या प्रकारात मोडते. पण तेव्हा काही फारसे समजत नव्हते. मात्र ऐकताना मनाला गुदगुल्या व्हायच्या. अर्थ सरळसोपा असल्याने कळत होता, पण असे कसे काय घडू शकते? असा प्रश्न उपस्थित होऊन कुतूहल वाटायचे आणि ही केवळ गंमत आहे याची खातरी वाटू लागायची.

       पण दुधाच्या दातांची जागा अक्कलदाढांनी घेतली आणि शेतीक्षेत्रात खरोखरच उलटी गंगा वाहत आहे, याची जाणीव व्हायला लागली. भारतात मनुष्यप्राण्याचा विचार केला, तर पुरुषांमध्ये सर्वात जास्त कष्ट शेतकरी पुरुष करतो, महिलांमध्ये सर्वात जास्त कष्ट शेतकरी महिला करत असतात, पण केलेल्या श्रमाचा मोबदला म्हणून भारतीय चलनमुद्रेची गंगाजळी त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही, याउलट चलनमुद्रेचा प्रवाह विपरीत दिशेनेच अखंड वाहत असतो, अशी जाणीव ठळकपणे व्हायला लागली. प्राण्यामध्ये सर्वात जास्त कष्ट वाट्यास येणारा शेतीतला बैल हाच प्राणी आहे. अनेक कारणामुळे इतर सर्व प्राण्यांचे कष्ट कमी झालेले आहेत. अनेक प्राण्यांना शासकीय संरक्षण लाभले आहे. अभयारण्याच्या स्वरूपात वाघांना - म्हणजे माणसाच्या नैसर्गिक शत्रूला जहागिरी बहाल करण्यात आली आहे, पण प्राण्यामध्ये सर्वात जास्त कष्ट करणार्‍या, अन्न पिकवणार्‍या, उन्हातान्हात मरमरमर राबणार्‍या बैलाला इथे शासकीय पातळीवर किंवा जनमानसात कवडीची किंमत दिली जात नाही. बैलाने पिकवलेले अन्नधान्य सारेच खात असले, तरी त्यापैकी कुणीही बैल दिसल्याबरोबर 'धन्यवाद बैलोबा' एवढे उपकाराच्या परतफेडीचे दोन शब्दही बोलायला तयार होत नाही. अन्न पिकवतो बैल, त्याचा अनादर केला जातो आणि कौतुक व पूजा होते देशाच्या पालनपोषणात नगण्य वाटा असलेल्या गायीची. टनभर चारा खाल्ल्यानंतर गाय मणभर दूध देते. दूध देण्यापलीकडे गायीचा काहीही उपयोग नाही. पण गायीला मातेचा दर्जा! बैल म्हणजे पिता तर नाहीच, पण छटाकभर माती उकरणाऱ्या उंदराला मित्र मानणारी मनुष्यजात जमीन नांगरून टाकणाऱ्या बैलाला मित्र मानायला तयार नाही. आहे की नाही उलटी गंगा? यावर शेतीसाठी उपयुक्त बैलाला जन्म देते म्हणून गायीचे महत्त्व आहे, असा युक्तिवाद केला जातो. पण हा युक्तिवाद समर्थनीय नाही, कारण तेच कारण असते तर गायीबरोबर सांडाचीही पूजा करण्याची नक्कीच प्रथा रूढ झाली असती.

    १९८० नंतर शेती क्षेत्रात काही अत्यंत क्रांतिकारक बदल झालेले आहेत. काही बाबतीत उलटापालट झाली आहे. पूर्वी कामाच्या शोधात खेड्याकडून पावले शहराकडे धावायची. पण आता गेल्या काही वर्षांपासून अकस्मातच काळ बदलला आहे. गंगा उलटी वाहायला लागून वळणीचे पाणी आढ्यावर जायला सुरुवात झाली आहे. मोलमजुरी आणि कामधंदा शोधण्यासाठी शहरातील पावले गावाकडे वळायला लागली आहेत. आम्ही शाळा शिकत असताना आम्हाला सांगितले जायचे की, अमेरिकेतील मोलकरीण स्वतःच्या चारचाकी गाडीने भांडी घासायला मालकाच्या घरी जात असते, एवढा तो देश समृद्ध आहे. आम्हाला ते ऐकताना मोठे कुतूहल वाटायचे. एक दिवस भारतातील शेतमजूरही चारचाकी गाडीमध्ये बसून शेतावर काम करायला थेट शेताच्या बांधावर जाईल असे जर भाकीत त्या काळी कुणी वर्तवले असते, तर त्याची रवानगी थेट वेड्यांच्या इस्पितळात केली गेली असती. मात्र अगदी पंधरा-वीस वर्षांच्या काळातच इतिहासाला कलाटणी मिळाली असून शहरातील मजूरवर्ग चारचाकी वाहनात बसून थेट खेड्यात येऊन शेतीच्या बांधावरच उतरायला लागला आहे. फरक एवढाच की अमेरिकेतील मोलकरीण भांडी घासायला मालकाच्या घरी स्वतःच्या चारचाकी गाडीने जात असते, आमचा मजूरवर्ग मात्र भाड्याच्या चारचाकी गाडीने जातो. स्वत:च्या स्वयंचलित वाहनाने शेतावर जाणारा शेतमजूर नजीकच्या काळात लवकर बघायला मिळेल आणि तो दिवससुद्धा फार लांब नाही. परप्रांतीयाचे लोंढेही आता गावामध्ये उतरायला लागले आहेत. मुंबई-पुण्यासारख्या शहरांना परप्रांतीयाचे लोंढे नकोनकोसे होत असताना आणि त्यांना हुसकावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत असताना खेड्यात मात्र याच परप्रांतीयांचे दिलखुलासपणे स्वागत केले जात आहे. खेड्यातील शेतकरी परप्रांतात जाऊन तेथील कामगारांना आपल्या गावात येण्याचे निमंत्रण देऊ लागला आहे. गावामध्ये आल्यानंतर त्यांची निवासाची व्यवस्था राजीखुशीने करायला लागला आहे.

      निसर्गत: गंगा उताराच्या दिशेनेच वाहत असते. मात्र शासन नावाची नियोजक व नियंत्रक संस्था जिथे जिथे नाक खुपसते, तिथे तिथे गंगा उलटी वाहायला सुरुवात होते. नैसर्गिक प्रवाहाला निष्कारण अवरुद्ध करून सत्तेचे दलाल पोसण्यासाठीच शासन नावाची यंत्रणा उतावीळ असते. मागे महाराष्ट्र शासनाने निर्मल ग्राम योजना जाहीर करून गाव स्वच्छ ठेवणार्‍या ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार दिले होते. अनेक ग्रामपंचायतींनी गाव स्वच्छ न करताच केवळ तसे कागदोपत्री दाखवून अनुदानासह पुरस्कार लाटले होते. गावाच्या सामुदायिक प्रयत्नातून व श्रमदानातून गाव निर्मल करावे, अशी शासनाची अपेक्षा असते, या उलट नागरी वस्तीबाबत शासनाचे धोरण उलटे असते. नगरात, महानगरात कुणाला सामुदायिक प्रयत्न अथवा श्रमदान करायला सांगितले जात नाही. शासकीय तिजोरीची दारे मोकळी करून पगारी कर्मचार्‍यांकडून सारी स्वच्छता करवून घेतली जाते. गाव आणि नगर यांच्यासाठी शासनाचे दुजाभावाचे धोरण असतेच, त्याहीपेक्षा हे धोरण गंगेचा प्रवाह उलट्या दिशेने फ़िरवणारे असते. गावातला माणूस दिवसभर शारीरिक श्रम करतो, त्याला आणखी श्रम करायला सांगितले जाते. याउलट बव्हंशी नागरी जनतेचा शारीरिक श्रमाशी संबंध येत नाही. त्यामुळे त्यांना लठ्ठपणाचे व मधुमेहासारखे विकार जडण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी शहरी माणसाने, शासकीय कर्मचार्‍याने, व्यापार्‍याने व उद्योजकाने श्रमदान केले, तर ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक व शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकते/ पण तसे होत नाही. ज्याला श्रम करण्याची सक्त गरज आहे, त्याला श्रम करायला सांगितले जात नाही. ज्याला आणखी श्रम करण्याची गरज नाही किंवा आणखी श्रम केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते, त्यालाच आणखी श्रम करायला सांगितले जाते.

     सध्या घरोघरी संडास बांधण्यासाठी व गाव 'हागणदारीमुक्त' करण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्नाची पराकाष्ठा केली जात आहे. त्यासाठी अनुदानाच्या योजना राबवल्या जात आहे. केंद्र शासन 'स्वच्छ भारत' करण्याच्या मिशनवर अग्रेसर आहे. पण कुठलीही गोष्ट स्वच्छ करायला पाण्याची नितांत गरज असते, याचे भान कुणालाच नाही.

     अगदी पंतप्रधानांनादेखील नाही. व्यवस्थेने सर्वांचीच बंडी उलार करून ठेवली आहे. प्रस्थापित व्यवस्थेने झाडून सारेच उलट्या गंगेचे प्रवासी निर्माण करून ठेवलेले आहेत. जो जितका सुज्ञ, विचारवंत, थोर, महान, ज्येष्ठ, वरिष्ठ तितका तो उलट्या गंगेचा प्रवासी, हेच समीकरण दुर्दैवाने सर्वत्र बघायला मिळत आहे.

       गावात प्यायला पाणी नाही. अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागते. जिथे पाणी उपलब्ध आहे तेथील पाण्याचा टीडीएस मोजण्याची कुणालाच खैस नाही. अनेक गावात पिण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचा टीडीएस चक्क १५०० ते २००० हजार असतो. हा चर्चेचा मुद्दा होत नाही. सर्वांना पिण्याचे शुद्ध आणि ४०० टीडीएसच्या आतील पाणी उपलब्ध झाले पाहिजे, यात कुणालाच स्वारस्य नाही. इथे चर्चा फक्त आरओचे पाणी आरोग्याला कसे हानिकारक आहे, याचीच होते. काळीजच उलटे असेल तर विचाराची गंगा तरी सरळ कशी असणार?

     परंपरागत गावाची रचना अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. कदाचित न शिकलेली माणसे दूरदृष्टी ठेवून विचार करत असावेत. परंपरागत पद्धतीत गावठाणासाठी गावाबाहेर खास जागा सोडलेली असायची. गुरांच्या शेणमूत्रासाठी गावाबाहेर व्यवस्था असायची. घरातला काडीकचरा आणि घाण गावाबाहेर नेऊन टाकण्यासाठी, घरगुती खत साठवण्यासाठी स्वतंत्रपणे प्रत्येकाला पुरून उरेल इतकी मोकळी जागा असायची. 'गावाच्या आतील घाण गावाच्या बाहेर म्हणून गाव स्वच्छ' अशी एकंदरीत मांडणी होती. गावातल्या जमिनीत घाणेरडे पाणी जिरायची व मुरायची काहीच शक्यता नसल्याने गावातील विहिरीतील पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्य असायचे. शौचाला गावाबाहेर जायचे तर अर्ध्या लिटर पाण्यात कार्यभाग उरकणे पुरेसे असल्याने पाण्याच्या दुर्मॉळतेशी सांगड घालणे आपोआपच शक्य व्हायचे. आता सरकार म्हणतेय की घरोघरी शौचालय झाले पाहिजे. झालेच पाहिजे याबद्दल दुमत नाही; नव्हे, ती काळाची गरज आहे. पण शौचायलाचा वापर करायला प्रतिव्यक्ती सरासरी दर दिवशी २५ लीटर पाणी लागते, ते कुठून आणायचे? याचे उत्तर तर आधी शोधायला हवे की नाही? त्यावर गांधी शौचालय हा मार्ग सुचवला गेला. पण त्यामुळे घाण पाणी जमिनीत खोलवर झिरपणे सुरू झाले. ते झिरपत झिरपत विहिरीत पोहोचले. आता विहिरीतील पाणी पिण्यायोग्यच राहिलेले नाही. नाइलाजाने तेच पाणी पिण्याशिवाय गावकर्‍यांना अन्य पर्यायच उपलब्ध नाही. नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करून गावकर्‍यांना चांगले पाणी उपलब्ध करून देण्याची प्राथमिकता शासकीय धोरणात नाही. फक्त अतिदुष्काळी स्थिती निर्माण झाली की सरकारी टँकर इकडे-तिकडे धावायला लागतात. टँकरद्वारे प्रतिव्यक्ती प्रतिदिवशी किती पाणीपुरवठा होतो, याचा आढावा घेतला जात नाही. 'आले देवाजीच्या मना, तेथे कुणाचे चालेना' अशी एक जुनी म्हण आठवते, तिचा येथे पुरेपूर प्रत्यय येत आहे. बदल घडणे ही नैसर्गिक क्रिया आहे व सदैव बदल घडवत राहणे हा मनुष्यस्वभाव आहे. बदल घडायलाच हवे, पण त्यात तारतम्य असायला हवे. घरोघरी शौचालय आले पाहिजे असे वाटत असेल तर घरोघरी पुरेसे पाणी पोहोचवणे ही पहिली पायरी आहे. पुरेसे पाणी उपलब्ध नसेल तर 'हागणदारीमुक्त गाव' ही घोषणा म्हणजे चक्क वेडपटपणा आहे. जेथे ३६० दिवसापैकी १८० दिवस पिण्याला धड पाणी मिळत नाही, त्या गावातील नागरिक गावकुसाबाहेर बाहेर जाऊन लीटरभर पाण्यात कार्यभाग उरकणे पसंत करतील की घरातल्या शौचालयात बसून २५ लीटर पाणी वाया घालवतील? मग बारमाही हागणदारीमुक्त गाव होईल तरी कसे? इतके सोपे समीकरण गणिताच्या पदवीधराला सोडवता येत नाही.

     सुशिक्षित बेरोजगारांना 'बेरोजगारी भत्ता' हा 'उलट्या गंगेला' अधोरेखित करणारा आणखी एक नमुना. बेरोजगारी भत्ता देणे गैर नाही पण केवळ सुशिक्षित बेरोजगारांनाच का म्हणून? अशिक्षित बेरोजगारांना का नाही? याचे समाधानकारक उत्तर कोणालाच देता येत नाही. मात्र तरीही घोडे दामटलेच जाते. अशिक्षित युवकाने महाविद्यालयात न जाता त्याऐवजी कुठले तरी काम केलेलेच असते. कुणी शेती करून अन्नधान्याच्या वखारी भरलेल्या असतात. कुणी सूतगिरणीत काम करून देशवासीयांना नेसायला कपडे पुरवलेले असतात. कुणी कामगार बनून घरे बांधण्यास मदत केलेली असते. पण ज्याने देशाला अन्न, वस्त्र, निवारा पुरवला त्याला आपला देश काहीही द्यायला तयार नसतो. त्याच्या कार्याला प्रोत्साहनही दिले जात नाही आणि त्याला बेरोजगारी भत्ताही दिला जात नाही. या उलट ज्याने केवळ महाविद्यालयीन शिक्षण घेतले, सुटीचा दिवस बसस्टॉपवर उभे राहून मजनूगिरी करण्यात घालवला, सार्‍या शासकीय सुविधांचा व फी माफीचा लाभ उचलला, त्या बदल्यात देशाला काहीच परतफेड केली नाही, तरीही फक्त त्याच सुशिक्षित युवकाला बेरोजगारी भत्ता देण्याची भाषा केली जाते. जो देशासाठी श्रम करून देश घडवतो, त्याला खिजगिणतीतही पकडले जात नाही.

    देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणारा जवान, देशवासीयांना तनफुगी होईपर्यंत भरपेट खाऊ घालणारा किसान, कापसापासून धागा व धाग्यापासून कापड बनवून देशवासीयांची लाज झाकणारा कामगार, श्वसनाचे रोग विकत घेऊन कोळसाखाणीत काम करून घरोघरी वीज पुरवून अंधार्‍या देशाला प्रकाशमय करणारा यांना देशभक्त म्हणण्याची आमची संस्कृती नाही. देशाच्या जडणघडणीत ज्याचा वाटा व कार्य शून्य, तो मात्र देशभक्त म्हणून गौरवला जातो.

इथे पावलोपावली गंगा उलटीच वाहत आहे आणि उलटी गंगाच आपल्या अंगवळणी पडलेली आहे!

- गंगाधर मुटे
(मनोगत-दिवाळी अंक २०१९ प्रकाशित लेख)

Nov 15, 2019

शेती आणि सरकार

जर पंधरवड्यापूर्वी सरकार स्थापन झालं असतं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या घरावर सोन्याची कवले चढली असती का?
किंवा उद्या सरकार स्थापन झालं की लगोलग शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जाणार आहे का?

आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात शेती करताना एखाद्याला सरकारची किती कोटी रुपयांची मदत झाली हे कुणीतरी मला जरा सांगाल का?

जर शेतकऱ्यांना सरकारकडून काहीच मिळत नसेल तर निष्कारण अशा परिस्थितीचा संबंध शेतीशी जोडून जणू काही सरकार असलं की शेतकऱ्याला भरमसाठ मदत केली जाते असा चुकीचा संदेश बिगरशेतकरी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम होत असते…

आणि
नको त्या बाबीचा शेतीशी संबंध जोडणे म्हणजे अनावश्यक रित्या शेती बद्दलचे प्रेम उचंबळून आणण्यासारखे आहे.

नको तिथे शेती विषय घालून सोंगाड्या सारखी नाटके करण्याची गरज आहे मला वाटतं नाही.
****
शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते फार तर असे म्हणू शकतात की सरकार नसल्यामुळे आमची सरकार विरोधी लढाई थांबली आहे.
शेतकऱ्याला काहीच मिळणार नसेल तरी सुद्धा आमची लढाई सरकारच्या विरोधात रात्रंदिवस सुरू असते.
सरकार नसल्यामुळे आमच्या लढाईमध्ये खंड पडला आहे. त्यामुळे आमचे लढाईसाठी हात शिवशिवत आहे.
अशा स्थितीत तातडीने सरकारची स्थापना करावी आणि आमच्या लढाईच्या रस्ता मोकळा करून द्यावा.
त्यामुळे शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते किती लढवैय्ये, किती लढाई बहाद्दर आहेत आणि शेतकरी व शेतकऱ्यांची बाजू रात्रंदिवस कशी लावून धरत असतात, इतके तरी बिगर शेतकरी समाजाच्या लक्षात येईल.

- गंगाधर मुटे आर्वीकर

Oct 12, 2019

पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा

 पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा


सरकारी वकील : पुढे काय झालं?
वसुली अधिकारी : आम्ही आर्वी छोटी या गावांमध्ये वसुलीसाठी गेलो होतो.
ऍड देशमुख : तुम्ही गावांमध्ये गेले होते कशावरून? काही पुरावा आहे का?
वसुली अधिकारी : आम्ही आमच्या ऑफिसमध्ये कारवाई बुक मध्ये तशी नोंद केली होती. 
ऍड देशमुख : दाखवा बुक
वसुली अधिकारी :  ऑफिसमध्ये आहे, सोबत आणले नाही.
ऍड देशमुख : का आणले नाही? तुम्ही आणले नाही त्याचे कारणच तुम्ही रजिस्टर काही लिहिले नाही. कारण तुम्ही त्या गावात गेलेच नव्हते
वसुली अधिकारी : गेलो होतो. रजिस्टर मध्ये नोंद आहे. रजिस्टर ऑफिस मध्ये आहे.
ऍड देशमुख : तलवार घरी ठेवून लढाईला जायचं किंवा वस्तरा घरी ठेवून हजामतीला जायचं, असं चालत असते का? तुम्ही रजिस्टर मेंटेन केलेलेच नाही कारण तुम्ही त्या गावात गेलेलेच नव्हते. तुम्ही त्या गावाला गेले असते तर तुम्ही नक्कीच रजिस्टर सोबत आणले असते.
वसुली अधिकारी काही बोलत नाही. चूप राहतो. 

ऍड देशमुख : तुम्ही गावात गेल्यानंतर ज्यांच्याकडे कर्ज आहे त्यांना तुम्ही शिवीगाळ केली.
वसुली अधिकारी : नाही. आम्ही शिवीगाळ केली नाही. आम्ही नियमाप्रमाणे वसुली करत होतो तेव्हा छातीवर शेतकरी संघटनेचे बिल्ले लावून सुमारे 100 तरुण पोरांचा जमाव गंगाधर मुटे यांच्या नेतृत्वाखाली आमचेकडे आला आणि आमची वसुली थांबवली
ऍड देशमुख : वसुली थांबवली म्हणजे नेमके काय केले?
वसुली अधिकारी : आम्हाला मारहाण केली, आणि शिवीगाळ केली
ऍड देशमुख : तुमची कॉलर वगैरे पकडली होती का?
वसुली अधिकारी : होय, आमची कॉलर पकडली होती.
ऍड देशमुख : आमची म्हणजे कोणाकोणाची?
वसुली अधिकारी : मी आणि माझ्या चार-चार सहकाऱ्यांची
ऍड देशमुख : तुमची कॉलर कुणी पकडली?
वसुली अधिकारी : गंगाधर मुटे यांनी
ऍड देशमुख : आणखी कुणी तुमची कॉलर झाली धरली?
वसुली अधिकारी :  गंगाधर मुटे यांनी धरली 
ऍड देशमुख : एकाच व्यक्तीने एकाच वेळी पाच लोकांची कॉलर कशी काय धरली? गंगाधर मुटे यांना किती हात आहेत?
वसुली अधिकारी :  दोन आहेत
ऍड देशमुख : मग कॉलर धरायला किती हात लागतात?
वसुली अधिकारी : एका हाताने कॉलर धरता येते 
ऍड देशमुख : गंगाधर मुटे यांना दोनच हात आहेत. दोन हाताने दोघांची कॉलर धरली असेल. एक माणूस एकाच वेळी पाच लोकांची कॉलर धरू शकत नाही. बरोबर?
वसुली अधिकारी : बरोबर आहे
ऍड देशमुख : म्हणजे गंगाधर मुटे यांनी पाच लोकांची कॉलर धरलीच नाही?
वसुली अधिकारी :  चुकलो होतो, पाच लोकांची नाही दोघांची धरली होती.
ऍड देशमुख : मग पोलीस तक्रार करताना कॉलर धरली असे तक्रारीत लिहिले होते का?
वसुली अधिकारी :  हो लिहिले होते
ऍड देशमुख : नक्की आठवते का?
वसुली अधिकारी : हो नक्की आठवते. तक्रारीत लिहिले होते.
ऍड देशमुख : तक्रार कोणी केली होती?
वसुली अधिकारी : मीच दिली होती?
ऍड देशमुख : तुमच्या तक्रारीचा मूळ कागद माझ्याकडे आहे. तक्रारीत कॉलर धरल्याचा कुठेही उल्लेख नाही
वसुली अधिकारी : मग विसरलो असेल
ऍड देशमुख : जेव्हा घटना घडली तेव्हा रिपोर्ट देताना आठवले नाही, आज कसे काय आठवले?
वसुली अधिकारी : तुम्ही विचारलं म्हणून आठवले
ऍड देशमुख : मी विचारले नसते तर आठवले नसते का? 
वसुली अधिकारी :  नसते आठवले.
ऍड देशमुख : बरं पुढे काय झालं? 
वसुली अधिकारी : आम्हाला मारलं
ऍड देशमुख : कोणी मारलं आणि कशाने मारले?
वसुली अधिकारी : लाथाबुक्क्यांनी मारले
ऍड देशमुख : तक्रारीत तुम्ही लाठ्याकाठ्यांनी मारले असे लिहिले आहे
वसुली अधिकारी :  होय, आम्हाला लाठ्याकाठ्यांनी मारले
ऍड देशमुख : पुढे आणखी काय झालं?
वसुली अधिकारी : आम्हाला दगड फेकून मारले
ऍड देशमुख : तुम्हाला दगड लागलेत का? काही जखमा झाल्यात का?
वसुली अधिकारी : होय, आम्हाला दगड लागले आणि जखमा सुद्धा झाल्या होत्या
ऍड देशमुख : मेडिकल रिपोर्ट दाखवा
वसुली अधिकारी : केस पेपरमध्ये जोडला असेल
ऍड देशमुख : तुम्ही जोडला असेल? की अन्य कुणी जोडला असेल?
वसुली अधिकारी :  पोलिसांनी जोडला असेल
ऍड देशमुख : तुम्हाला मेडिकलमध्ये पोलिसांनी नेले होते का?
वसुली अधिकारी : नाही, आम्ही स्वतःहूनच गेलो होतो
ऍड देशमुख : पोलिसांनी मेडिकल रिपोर्ट घेतला होता का?
वसुली अधिकारी : आता नक्की आठवत नाही
ऍड देशमुख : शरीरावर जखमा झाल्याचे काही व्रण तरी आहेत का?
वसुली अधिकारी : होय. आहेत.
ऍड देशमुख : दाखवा, कुठे आहे?
वसुली अधिकारी : तेव्हा कुठे कुठे जखमा झाल्या होत्या ते आता आठवत नाही. 
ऍड देशमुख : तुम्ही यांना ओळखता का?
वसुली अधिकारी : ओळखतो. हेच गंगाधर मुटे आहेत
ऍड देशमुख : यांनी तुमची गावातून मारबत काढली होती का?
वसुली अधिकारी : हो. "कर्जवसुली अधिकाऱ्यांना घेऊन जा गे मारबत" असे म्हणत आमच्या गाडीमागे धावत येऊन आमची मारबत काढली होती.
ऍड देशमुख : यांनी तुमच्या अंगावर चिखल फेकला होता का?
वसुली अधिकारी : यांनी आमच्या अंगावर चिखल फेकला होता.
ऍड देशमुख : तुमच्या अंगावर फेकायला यांनी चिखल कुठून आणला आणला होता?
वसुली अधिकारी : यांनी विहिरी जवळच्या नालीतील घेतला होता.
ऍड देशमुख : ही शाळेजवळची घटना आहे ना?
वसुली अधिकारी : होय. शाळेजवळचीच घटना आहे.
ऍड देशमुख : पण शाळेजवळ तर विहीरच नाही. मग तिथे नाली आणि चिखल कुठून आला? तुमच्या अंगावर चिखल फेकला, असे तुम्ही तर तक्रारीत लिहिलेलेच नाही!

वसुली अधिकारी काही बोलत नाही. चूप राहतो. 

ऍड देशमुख : गंगाधर मुटे यांनी तुमच्या अंगावर शेणसुद्धा फेकलेच असेल ?
वसुली अधिकारी : होय, त्यांनी आमच्या अंगावर शेण फेकले.

            हे ऐकून सरकारी वकील वैतागून उभा होतो आणि वसुली अधिकाऱ्याकडे बघून म्हणतो "आणखी किती खोटे बोलणार आहात रे तुम्ही? आता इथे बोलतो आहेस त्यातील अर्धे तर तू तुझ्या मूळ रिपोर्ट मध्ये लिहिलेच नाही!"

            ऍड देशमुख  न्यायालयाला सांगतात की, ही सगळी बनावट कहाणी आहे. ही मंडळी आर्वीला गेलेलीच नव्हती आणि तिथे काहीही झालं नाही. गंगाधर मुटे पत्रकार आहेत आणि त्यांनी बँकेविरोधात अनेक बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापल्या होत्या आणि बँकेतील गैरकृत्याचे  बिंग फोडले होते म्हणून ही मंडळी चिडली आणि खोटी बनावट केस उभी करून माझ्या अशिलाला त्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला.

         ही कहाणी आहे १९८२ या सालातील. या काळात इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संघटना स्थापन होऊन शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर येण्याला सुरुवात झालेली होती. कॉलेज करत असतानाच मी जशी संधी मिळेल तसा संघटनेच्या उपक्रमात सहभागी होत असायचो. शरद जोशी वर्धेला आले आणि त्यांची सभा किंवा बैठक असली की मी कॉलेजला  बुट्टी मारून शरद जोशींना ऐकायला जात असायचो. तो काळच वेगळा होता. त्या काळातल्या कहाण्या ऐकताना आजच्या नव्या पिढीला काल्पनिक कहाण्या वाटून एखादा कपोलकल्पित चित्रपट बघत असल्याचा फील येईल, इतका तो काळ वेगळा होता. शेती आणि शेतकऱ्याला अजिबात प्रतिष्ठा नव्हती. ७० वर्षाच्या वयोवृद्ध शेतकऱ्याला दलालांचा किंवा व्यापाऱ्यांचा १० वर्षाचा पोरगा अथवा मार्केट यार्डातला हमाल देखील अरे-कारे, आबे-काबे अशा एकेरी भाषेत बोलायचा. गावातल्या पटवाऱ्याकडे किंवा सोसायटीच्या बाबूकडे शेतकरी देव किंवा मसीहाच्या नजरेने बघायचे. माझं बालपण गावात आणि शिक्षणासाठी शहरात गेल्याने शहर आणि खेडी यांच्यातील जीवनमानाची दरी स्पष्टपणे नजरेत भरत होती.  शेतीची दुर्दशा संपवायची असेल तर शेतकरी संघटित झाला पाहिजे, अशी अस्पष्ट जाणीवही अंतर्मनाला होत होती. तशातच शरद जोशींचे परदेशातून गलेलठ्ठ पगाराची नोकरी (१९७८ मध्ये दीड लाख रु. महिना) सोडून भारतात येऊन शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटना बांधण्याचे त्यांचे प्रयत्न मनाला भुरळ घालत होते. 

            त्या काळात सक्तीची कर्जवसुली हा एक भयानक प्रकार सुरू होता. सक्तीची वसुली म्हणजे एखाद्या शेतकर्‍यावर एखाद्या बँकेचे जर ५० हजार रुपये कर्ज असेल तर वसुली अधिकारी त्या शेतकर्‍याच्या घरात घुसून त्याच्या घरातली स्वयंपाकाची भांडी जप्त करायचे, झोपायचा पलंग जप्त करायचे, घरात असलेले पाचपन्नास किलो अन्नधान्य जप्त करायचे. या वस्तूंची एकूण किंमत दोन-चारशे रुपयेच असायची. पण या वस्तू जप्त करून, त्याचे चावडीवर प्रदर्शन मांडून त्या शेतकर्‍याची पुरेपूर नाचक्की करणे, हा त्यामागचा हेतू असायचा. हे वाचताना एखाद्याला अतिशयोक्ती वाटेलही; पण सक्तीची वसुली करताना वसुली अधिकारी शेतकर्‍यांना ”तुझी बायको गहाण ठेव”, “तुझी मुलगी रातच्याला पाठव पण आमची वसुली दे'', या भाषेत बोलायचे. शेतीची, घराची, खुंट्याच्या जनावराची जप्ती करून जाहीर लिलाव करायचे आणि येईल त्या किमतीला हर्रास करून विकूनही टाकायचे. कर्ज मागायचे असेल तर अधिकाऱ्यांना पार्टी दिल्याशिवाय कर्जमंजुर होत नव्हते आणि कर्जफेडीसाठी महिनाभराची मुदत वाढवून मागायची असेल तर कोंबडीच्या तंगडीचा नैवद्य दाखवल्याशिवाय मुदतवाढ मिळत नव्हती. एकंदरीत "पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा" असा सर्रास प्रकार चालायचा. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय घाट्याचा झाला की भांडवली तूट भरून निघत नाही आणि शेतीवर कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे प्रयत्न करूनही, प्रामाणिकपणे शेती करूनही, कर्जफेड करणे शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते. शेतमालाला भाव द्यायला सरकार तयार नव्हते, मात्र शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली पाहिजे म्हणून सक्तीची कर्ज वसुली करणे हा त्या काळातील नेहमीच फंडा असायचा. मी नागपूर येथील एका प्रतिष्ठित दैनिकाचा पत्रकार असल्याने मी त्या काळात सविस्तर बातम्या लिहून प्रकाशित केल्या होत्या आणि शक्य त्या पद्धतीने हा प्रश्न चव्हाट्यावर आणायचा प्रयत्न केला होता.

            सक्तीची कर्जवसुली हा ज्वलंत प्रश्न असण्याच्या काळातच शेतकरी संघटनेचा एक शेतकरी मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात शरद जोशींनी "राजकीय पुढाऱ्यांना आणि कर्ज वसुली अधिकाऱ्यांना गाव बंदी" असा एक कार्यक्रम दिला होता. हा कार्यक्रम आपल्या गावात आपण राबवायचाच असा मी निर्धार केला. अंकुश भोयर, स्व. बाबा कातोरे, अशोक कातोरे, प्रभाकर उगेमुगे, अशोक धात्रक, राजू उगेमुगे या सहकाऱ्यांच्या मदतीने गावात संघटना स्थापन केली. शेतकऱ्यांसोबत बैठका केल्या. शरद जोशी काय म्हणतात ते शेतकर्‍यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता गावामध्ये शेतकरी संघटनेच्या रूपाने एक तरुणांची फौज तयार झाली. फौज तयार झाली पण काम काहीच नव्हते म्हणून मग आम्ही गावात भिंती रंगवणे, आजूबाजूच्या गावात जाऊन शेतकरी संघटनेचा विचाराच्या प्रचारार्थ छोट्या छोट्या बैठका घेणे असे कार्यक्रम सुरू केले. त्या काळात आम्ही तसे नवखे आणि अनुभव शून्य पण सळसळत्या रक्ताचे नवतरुण होतो. गावबंदी कशी करायची, त्याचा शेवट काय होईल, याचा विचार करायची जराशी सुद्धा गरज न वाटणारे आणि परिणामाची चिंता न बाळगणारे. 

            एक दिवस आम्ही सहज गप्पा मारत चौकात बसलो असताना काही शेतकरी पोरं धावत आमच्याकडे आली आणि म्हणाली की, बँकेचे कर्जवसुली अधिकारी गावात येऊन उत्तम देशकर यांच्या पत्नीला अर्वाच्य शिवीगाळ करत आहेत. हे ऐकताच आम्ही खाडकन उभे झालो आणि घटना स्थळाच्या दिशेने पळत सुटलो. तिथले दृश्य बघून मी अवाकच झालो. तो बँकेचा वसुली अधिकारी त्या शेतकऱ्याच्या पत्नीला "आत्ताच्या आत्ता आता कर्ज भर" असा हुकूम सोडत होता. 
"साहेब, अजून आमचे कापूस बोंड मार्केटला गेले नाही, घरात अजून पैसा आला नाही, आम्ही कर्ज भरावे कसे? कापूस विकला की कर्ज भरतो" अशी ती शेतकऱ्याची पत्नी गयावया व विनंती करत होती.  
"तुम्हाला मुलीचे लग्न करायला पैसे सापडतात, नातेवाइकांच्या तेरवीला जायला पैसे सापडतात, दारू प्यायला पैसे सापडतात, लुगडे घ्यायला पैसे सापडतात, मात्र बँकेचे कर्ज भरायला पैसे सापडत नाहीत, तुम्ही आत्ताच्या आत्ता कर्जाची रक्कम भरली पाहिजे" असा तो  उर्मट अधिकारी हुकूम सोडत होता.
            कर्जाचा हप्ता म्हणून भरायला काहीही रक्कम घरात नसल्याने तो शेतकरी हतबल होता पण अधिकारी मात्र काहीच ऐकून घेत नव्हता. शेवटी म्हणाला की, मी तुमच्या घरातली भांडीकुंडी जप्त करणार आहे आणि त्याने लगोलग आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला की भांडीकुंडी घराबाहेर काढा. त्याचे सहकारी लगेच घरात घुसले आणि त्यांनी घरातील  गुंड, ताट, वाट्या ,कोपरा, अशी स्वयंपाकाची भांडी गोळा करून रस्त्यावर आणून टाकली. अधिकाऱ्याने लगेच कागद लिहिला. त्यावर या सगळ्या भांड्यांचे वर्णन आणि जप्तीचा आदेश लिहून त्यावर स्वाक्षरी करून शेतकऱ्याच्या हातात ठेवला. आम्ही अगदी सौम्य भाषेत त्या वसुली अधिकाऱ्यांना विचारले की, साहेब! आता या भांड्यांचे काय करणार आहात? तर तो अधिकारी म्हणाला "ही भांडी आम्ही जप्त करून घेऊन जाणार आणि हिंगणघाट  बँकेचे ऑफिस समोर लिलाव करणार." स्वयंपाकाच्या भांड्यांचा जाहीर लिलाव हे ऐकताच आम्ही संतापलो, आमची वानरसेना संतापली आणि रस्त्यावर आणलेली सर्व भांडी आम्ही परत शेतकऱ्याच्या घरात नेऊन ठेवली. हे बघून तो अधिकारी आणखी चिडला आणि म्हणाला "मी तुम्हाला पाहून घेतो, जेलची हवा दाखवतो, तुम्हाला सहा महिन्यासाठी जेलमध्ये घातलं नाही तर मी नावाचा घोरपडे नाही." स्वाभाविकपणे मग आमची त्या अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. मग ते घर सोडून अधिकारी पुढच्या कर्जदार शेतकऱ्याकडे जायला निघाले. आम्ही त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे जात होतो. ते  शेतकर्‍याच्या घरी घुसून त्याच्या घरातली भांडी काढून रस्त्यावर आणत होते आणि जप्तीची प्रक्रिया पूर्ण झाली की ती भांडीकुंडी आम्ही उचलून परत शेतकऱ्याच्या घरात व्यवस्थित नेऊन ठेवत होतो. असे दहा-बारा घरी झाल्यानंतर सरतेशेवटी ते निघून गेले.

          आम्हाला वाटले की ते निघून गेलेले आहेत, म्हणून आम्ही सर्व एका शेतकऱ्याच्या घरासमोर शांतपणे ''आता पुढे काय होईल" याविषयी चर्चा करत बसलो होतो. तितक्यात पुन्हा बातमी मिळाली की तो अधिकारी आणि त्यांचे सहकारी गावाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन जप्तीची कारवाई करत आहेत. आम्ही लगबगीने त्या दिशेने निघालो. आम्ही पोहचेपर्यंत त्यांनी रामकृष्ण खाडे यांच्या घरात घुसून त्यांच्या घरात असलेला एकमेव लोखंडी पलंग सर्वांनी मिळून बाहेर आणला होता पण या वेळेस मात्र त्यांनी पलंग रस्त्यावर ठेवला नाही. सहा जणांनी तो पलंग खांद्यावर घेऊन ते त्यांच्या जीपगाडी कडे जायला निघाले होते. आता मात्र थेट संघर्ष अटळ होता. त्यांच्या हातचा पलंग हिसकावून घेणे यापलीकडे दुसरा कुठलाही मार्ग उरला नव्हता. मग आम्ही सगळ्यांनी मिळून वसुली अधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्यांची बर्‍यापैकी धुलाई केली. इतकी धुलाई केली की ते मिळेल त्या दिशेने पळायला लागले. आम्ही त्यांचा पाठलाग करून "वसुली अधिकाऱ्यांना घेऊन जा गे मारबत"  "शेतकरी संघटनेचा विजय असो" "शरद जोशी झिंदाबाद" "शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे" "सक्तीची कर्जवसुली थांबलीच पाहिजे" अशा घोषणा दिल्या आणि तो पलंग परत ज्याचा होता, त्याच्या घरी नेऊन ठेवून दिला. आम्ही सर्व त्या काळात नवथर म्हणजे वय वर्षे १५ ते २२ वयोगटाचे होतो, आम्हाला तशी कसलीच व्यावहारिक जाण नव्हती. आम्ही वसुली अधिकाऱ्यांशी जसे वागलो ते योग्य की अयोग्य, त्याचे दुष्परिणाम काय होतील, याचा विचार करण्याची सुद्धा आम्हाला त्या वेळेस गरज वाटली नाही. अधिकारी पळून गेले, आपला विजय झाला, आता हे सगळं प्रकरण संपलं आहे, असा काहीसा स्वतःचा ग्रह करून आम्ही सर्वच्या सर्व वानरसेनेसह घरी परतलो आणि गप्पा हाकत बसलो. 

        तितक्यात आजनगाव पोलीस स्टेशनची पोलीस व्हॅन आली. पोलीस निरीक्षक विकास देशकर आणि त्यांच्यासोबत पंचवीसेक पोलिसांचा ताफा. विकास देशकर झपाझप पावले टाकत आमच्या दिशेने आला आणि म्हणाला, 

"गंगाधर मुटे कोण आहे?" 
"मी आहे साहेब!"  मी उभा झालो आणि अदबीने म्हणालो.
विकास देशकरने माझा हात धरला आणि अक्षरशः ओढत न्यावे तसे ओढत नेऊ लागला. 
"साहेब! मी स्वतःहून तुम्ही म्हणाल तिथे यायला तयार आहे, माझा हात सोडा, मला सन्मानाने चालू द्या.”  पण एका सामान्य शेतकरी पुत्राचे ऐकेल तो पोलिस अधिकारी कसला? या पोलीस निरीक्षकाने मला बाजारओळी पर्यंत ओढत न्यावे त्या स्टाइलनेच नेले. गावातील लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक खच्चीकरण करणे हा त्याचा प्रयत्न असल्याचे माझ्या लक्षात आल्याने आता माझे डोके तापायला लागले होते. जी काही कायदेशीर सजा होईल ती आनंदाने भोगायची माझी आनंदाने तयारी होती. पण अशी वर्तणूक सहन करण्यापलीकडे होती पण नाईलाज होता.
बाजारओळीतील चौकात गेल्यानंतर देशकर मला म्हणाला,

"या वसुली अधिकाऱ्यांची माफी माग" 
"साहेब, मी माफी मागावी असा कोणताही गुन्हा मी केलेला नाही" मी म्हणालो आणि तो कर्ज वसुली अधिकारी शेतकरी महिलेशी कसा वागला, हे सांगण्याचा प्रयत्न करू लागलो. पण तो मला बोलूच देत नव्हता. माझे काहीही न ऐकताच तो म्हणाला..
"आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस. चल माफी माग" या वेळेस त्याचा स्वर मग्रुरीपूर्ण आदेशात्मक होता.
"मी गुन्हा केलेला नाही आणि मी माफी मागणार नाही" मग मी सुद्धा तितक्याच धीटपणे उत्तर दिले.

हे ऐकताच त्या पोलीस निरीक्षकाचा पारा चढला आणि त्याने खाडकन माझ्या कानशिलात ठेवून दिली. हा क्षण माझ्यासाठी नक्कीच अनपेक्षित होता. आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल, याचा अंदाज आला होता पण आपल्या अंगावर हात टाकला जाईल, याची मी यत्किंचितही कल्पना केली नव्हती. मी आजवर कधी कुणाकडून मार खाल्लेलाच नव्हता. शाळेत त्या काळी शिक्षक विद्यार्थ्यांना झोडून-फोडून काढायचे, पण किरकोळ शिक्षा वगळता मोठ्या शिक्षा मला माझ्या शालेय गुरुजनांनी कधी केल्या नव्हत्या. त्यामुळे हा प्रसंग माझ्यासाठी अत्यंत अनपेक्षित असाच होता. त्यामुळे पुढे जे घडले तेही अनपेक्षित असेच घडले.

ज्याक्षणी पोलीस इन्स्पेक्टरने पूर्ण ताकदीनिशी माझ्या कानशिलात ठेवली त्याच क्षणी.... 
अगदी क्षणाचा विचार न करता... 
मी सुद्धा माझ्या पूर्ण ताकदीनिशी पोलीस इन्स्पेक्टरच्या थोबाडीत ठेवून दिली. 

       आरोपीच्या अंगावर हात घातल्यावर आरोपीसुद्धा उलटटपाली परतफेड करू शकतो.... अशी त्याने आयुष्यात कधीच कल्पना केलेली नसणार. तो पूर्णतः बेसावध असल्याने त्याला मला अडवायची संधीच मिळाली नाही. डोक्यावर हॅट असल्याने कानशिलाचा भाग झाकलेला असला तरी गुबगुबीत गालाचा मलईयुक्त प्रदेश हिरव्यागार मैदानासारखा सताड मोकळा होता. त्याचा फायदा मी उचलला आणि पाचही बोटे उमटतील अशी झापड त्याच्या गालधरून ठेवून दिली.

            त्यांनंतर पुढे जे झाले ते पाहण्याच्या अवस्थेत मी नव्हतो. कारण आता पोलिसांचा पूर्ण ताफाच सक्रिय झाला होता. पावसात गेल्यानंतर जसे एकाच वेळी पाचपन्नास टपोरे थेंब अंगावर पडताना जाणवतात तसेच माझ्या सर्वांगावर पाच-पन्नास लाठ्यांचा भडिमार एकाचवेळी होत आहे असे जाणवत होते. प्रतिपक्षाला पुन्हा संधी मिळू नये म्हणून जशी व्यूहरचना केली जाते तशीच व्यूहरचना बहुधा त्यांनी केली असावी. दहावीस मांजरींनी मिळून उंदीर पकडावा तसे त्यांचे मला पकडणे, उचलणे, गाडीत कोंबणे ...... वगैरे वगैरे.

         घटना घडत असताना सारा गाव तिथे गोळा झाला होता. शेतकरी संघटनेच्या घोषणांनी आसमंत दुमदुमत होता. शेतकरी संघटनेच्या घोषणांमध्ये आता आणखी ''पोलीस खाते मुर्दाबाद" "पोलिसांची दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही" यासारख्या घोषणांची आणखी त्यात भर पडली होती. ज्या सफाईने गाडीत बसून शिताफीने व लगबगीने पोलिसांनी गाडी तिथून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, गाडीत ज्या तऱ्हेने सर्व "पोझिशन" घेऊन बसले होते, त्यावरून गावकरी विरुद्ध पोलीस असा संघर्ष उभा राहतो की काय, अशी भीती बहुधा पोलीस खात्याला वाटली असावी, असे जाणवले. मला घेऊन पोलीस व्हॅन पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झाली. गाडी चालत असताना माझ्या अंगावर किती वळ उमटले असतील, लाठ्या किती आणि कुठे कुठे बसल्या असतील याचा अजिबात विचार माझ्या डोक्यात आल्याचे मला आठवत नाही. माझ्या डोक्यात तेव्हा फक्त एकच विषय घोळत होता.... तो म्हणजे आपण थोबाडात कशी हाणली. तेच दृश्य शौर्य रूपाने माझ्यासमोर वारंवार दृष्टिपटलावर येत होते आणि मी माझ्या स्वतःच्या शौर्यात इतका मशगुल झालो होतो की अजूनपर्यंत माझ्या वेदनांनी डोके वर काढायला सुरुवातच केलेली नव्हती. ठाण्यात पोचताक्षणी मला पोलीस कस्टडीत कोंबले गेले... आणि कस्टडीला बाहेरून कुलूप लागले. एखादा कुख्यात दहशतवादी कस्टडीत कोंबताना व्हावे तसे त्यांचे वर्तन होते पण मी पाणी मागताच मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्याने पाणी मागितल्यावर करावी तशी धावपळ करून त्यांनी माझ्यासाठी पाणी आणले. मला पाणी दिले आणि पुढील कारवाईला लागले. मला जिथे ठेवले ती कस्टडी अगदीच मोक्यावर असल्याने त्यांचे सर्व कामकाज मला दिसत होते.

         वसुली अधिकाऱ्याच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंतची कारवाई केली होती. त्यामुळे "लेखी तक्रार तातडीने द्या" असे वसुली अधिकाऱ्याला सांगण्यात आले. वसुली अधिकाऱ्याने माझ्याकडे पहिले आणि नजरानजर होताच त्याला दरदरून घाम फुटला. रिपोर्ट लिहिताना त्याचे हात थरथरत होते. कोणत्याही स्थितीत सहा महिने जमानत मिळता कामा नये, यासाठी कोणकोणती कलमे लावावी, याचा सर्वांनी सामूहिक विचार करून माझ्यावर गुन्हा नोंद करून ३५३ हे अजामीनपात्र आणि आणखी ४ अन्य कलम लावण्यात आले. वसुली अधिकाऱ्याला तिथून निसटण्याची घाई असल्याने घाईगडबडीत रिपोर्ट लिहिल्या गेल्याने त्यात बऱ्याच चुका झाल्या आणि त्याच धबडग्यात वसुली अधिकारी व सहकाऱ्यांचे मेडिकल करणे पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असूनही राहून गेले. 

         या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरावी अशी त्या काळात कोणतीच साधने आमच्या गावात उपलब्ध नव्हती. न मोबाईल, न फोन, ना बाइक, ना फोरविलर. होती ती फक्त सायकल. आमची पोलीस व्हॅन गावावरून निघाली तेव्हा त्याच वेळी माझे सवंगडी सहकारी सायकली घेऊन हिंगणघाटच्या दिशेने रवाना झाले होते. एक टीम आमदार डॉ. बोंडे यांचेकडे तर दुसरी टीम शेतकरी संघटनेचे कणखर नेते गिरधर राठी यांच्या घरी पोचली. हिंगणघाटला आमदार डॉ. बोंडे, गिरधर राठी, प्रा. मधुकर झोटिंग, प्रा. शेषराव येरलेकर, डॉ. जवादे आणि अन्य सहकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. पुढे काय करावे याविषयी विचार विमर्श करण्यात आला. ही मंडळी तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात पोहोचले पण कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी हजर नव्हते. कळले की ते कुठे तरी लग्नात गेले आहे. मग ही मंडळी लग्नाच्या दिशेने रवाना झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी यांना सर्व प्रकार सांगितला आणि या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आजनगाव पोलीस स्टेशनला चालावे असा आग्रह धरला. पण अधिकारी काही केल्या ऐकेचना. मग गिरधर राठी यांनी तंबीच दिली की तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ पण जर का प्रकरण हाताबाहेर गेले आणि तिथे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्व जबाबदारी तुमची राहील. मग मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ही सर्व मंडळी त्यांना घेऊन आजनगावला आली. माझ्या सुटकेची मागणी केली तर ठाणेदार म्हणाले आरोपीवर ३५३ व अन्य ४ कलमे रजिस्टर झालेले आहेत. येथे जमानत देता येणार नाही. तुम्ही उद्या न्यायालयात आपली बाजू मांडा आणि जमानतीसाठी प्रयत्न करा. गुन्हा संगिन असल्याने सहा महिन्यापर्यंत जामीन मिळणे अशक्य आहे, असेही ते म्हणाले. ठाणेदाराची उर्मट भाषा ऐकून शेतकरी संघटनेचे नेते संतापले.

डॉ. बोंडे म्हणाले "आत्ताच्या आत्ता आमचा कार्यकर्ता सोड नाहीतर मी तुझी पॅंट सोडतो आणि तुला कस्टडीत कोंबून आमचा कार्यकर्ता बाहेर काढतो" 
गिरधर राठी म्हणाले "जास्त शहाणपणा करशील तर कुलूप फोडून आम्ही आमचा कार्यकर्ता बाहेर घेऊन जाऊ आणि पोलीस स्टेशन पेटवून देऊ"
तोपर्यंत पोलिस स्टेशन बाहेर सुमारे तीन हजार लोकांचा जमाव गोळा झाला होता. तणाव वाढत होता. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे लक्षात येताच एसडीपीओ श्री सारंगी साहेबांनी एसपी साहेबांसोबत फोनवरून संभाषण केले. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तणाव वाढू नये, अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आरोपीला विनाशर्त सोडून देणे आवश्यक असल्याचे एसपींना त्यांनी पटवून दिले. सरतेशेवटी ठाणेदाराला नमते घ्यावे लागले आणि माझी विनाशर्त सुटका करण्यात आली. 

            कर्जवसुली अधिकाऱ्याला कर्जवसुली करण्यापासून मज्जाव करणे, त्याला अडवणे आणि कर्ज वसुलीचा डाव उधळून लावणे हा शेतकरी संघटनेच्याच नव्हे तर शेतीच्या इतिहासातील हा पहिला अध्याय आणि मैलाचा दगड असण्याची शक्यता आहे. कदाचित सृष्टीच्या उगमानंतर समग्र शेतीच्या इतिहासातील हे पहिलेच आंदोलन असण्याची शक्यता आहे. त्याच आंदोलनाने राज्यभर वसुली अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले. तेव्हापासून पुढे कालांतराने सक्तीची कर्ज वसुली हा प्रकार कमी होत गेला आणि आता तर औषधालाही उरला नाही. नवीन पिढीला आज हे सुद्धा ज्ञात नसेल की ३० वर्षांपूर्वी इतक्या कठोर पद्धतीने शेतीची कर्जवसुली केली जात होती.

         दुसऱ्या दिवशी हिंगणघाट येथे पोलीस कारवाईच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला आणि सक्तीची कर्ज वसुली थांबवा ही मागणी करण्यात आली. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा व्यक्तिगत स्वरूपाचा होता आणि तो सरकार परत घेणार नाही याची आम्हाला जाणीव होती. त्यामुळे न्यायालयीन लढा लढण्याशिवाय अन्य काही पर्याय नव्हता. माझ्या विरोधात न्यायालयात सहा वर्षे खटला चालला. बँकेच्या बाजूने पूर्ण ताकदीनिशी केस लढवण्यात आली. माझ्या विरोधात पुरावे सुद्धा भक्कम होते परंतु बँक अधिकाऱ्यांनी तक्रार लिहिताना अक्षम्य चुका केल्याने तसेच माझ्या वकिलांनी बाजू पद्धतशीर व भक्कमपणे हाताळल्याने  या प्रकरणातून माझी निर्दोष मुक्तता झाली. 
       शेतकरी संघटनेचे कार्य करताना एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की पोलीस कारवाई झाली किंवा न्यायालयीन केसेस झाल्या तरी या केसेस प्रत्येक कार्यकर्त्याला आपआपल्या बळावरच स्वतःच्या ताकतीने आणि स्वतःच्या खर्चाने लढाव्या लागत असतात. शेतकरी संघटनेकडे कुठलाही निधी नसल्याने त्यावर अन्य काही पर्याय नाही. शेतकरी संघटनेत आजपर्यंत जेवढ्या पोलीस कारवाया अथवा न्यायालयीन कारवाया झाल्या आहेत त्या सर्व केसेस शेतकऱ्यांनी आपापल्या खर्चाने व स्वतःच्या ताकतीने न्यायालयात लढवलेल्या आहेत. शेतकरी संघटनेला राज्यभर असे कार्यकर्ते मिळालेत हेच शेतकरी संघटनेचं खास वैशिष्ट्य आणि वैभव आहे

- गंगाधर मुटे 
(टीप : संबंधितांच्या खाजगी आयुष्यातील हितसंबंधांना बाधा येऊ नयेत म्हणून काळ, वेळ, स्थळ आणि नावे बदलण्यात आलेली आहेत.)

Mar 7, 2019

इजरायल कृषी अभ्यास दौरा : अंतरिम निष्कर्ष

इजरायल कृषी अभ्यास दौरा : अंतरिम निष्कर्ष

          इजरायलचा विषय निघाला की बहुतांशी इजरायलच्या प्रगत शेतीतंत्राचा विषयही आपसूकच निघतो. इजरायलची शेती अत्यंत प्रगत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीक्षेत्रात तेथील शेतकऱ्यांनी उंच भरारी घेतली आहे आणि  तिथला शेतकरी स्वबळावर स्वयंपूर्ण झाला आहे, असा गोड समज/गैरसमज भारतीयांनी करून घेतला आहे. इज्राएलची शेती आणि इजरायलाचा शेतकरी भारतीय शेती आणि भारतीय शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय आहे, असाही आणखी एक गोड समज/गैरसमज भारतीयांनी करून घेतला आहे. शेती क्षेत्र वगळता अन्य सर्व क्षेत्रात भारत मात्र इजरायलच्या फारच पुढे असून इजरायल पासून काय बोध घ्यायचा, काय धडे गिरवयाचे ते भारतीय शेतकऱ्यांनीच गिरवावे, असे एकंदरीतच भारतीय जनमत असल्याचे अनेक वर्षांपासून मला जाणवत आले होते. पण पूर्वग्रह गोंजारत बसलो तर नवे शिकता येत नसते. नवीन काही शिकायचे असेल तर आधी काहीतरी लिहिलेली पाटी पुसून कोरी करावी लागते व नवे ज्ञान ग्रहण करण्यासाठी रिकाम्या हाताची ओंजळ करून पुढे जावे लागत असते. म्हणूनच दौऱ्यावर जाण्यापूर्वी मी "इस्त्राईल अभ्यास दौरा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. डोके रिकामे आणि मेंदू रिफ्रेश करून जातोय. बघुयात काय शिकायला मिळते ते!" असे मनाशी पक्के ठरवले होते आणि तसा सूचक उल्लेख देखील १४ फेब्रुवारीच्या पोस्टमध्ये केला होता.
 Israel
          ठरल्याप्रमाणे २२ ते २८ फेब्रुवारी २०१९ इस्त्राईल अभ्यास दौरा संपन्न झाला. इजरायल मधील छोट्याशा वास्तव्यात जे काही ऐकायला, वाचायला आणि बघायला मिळाले त्याची आपल्या पूर्वानुभवांशी व सद्यस्थितीशी सांगड घालून भारत आणि इजरायल यांची तुलना केली कि अनेक पैलूवर प्रकाश पडून काही निष्कर्षांप्रत पोचता येऊ शकेल. उण्यापुऱ्या आठ दिवसात समग्र इजरायलचा अभ्यास होणे शक्य नाही याची मला जाणीव आहे. हत्तीचा एक अवयव बघून त्यालाच हत्ती समजण्याचा आततायीपणा सुद्धा उपयोगाचा नाही. शितावरून भाताची परीक्षा या समीकरणाला अनुसरून मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थातच प्रारंभीच्या काळात मी जे माझे निष्कर्ष देत आहे ते अंतरिम स्वरूपाचे असून अंतिम टप्प्यात कदाचित निष्कर्षात बदल होऊ शकतो.

अवलोकन/निष्कर्ष : १

  1. इजरायल हा आकाराने आणि लोकसंख्येने एक अत्यंत छोटासा पण सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत सजग आणि बलशाली देश. स्वबळावर शत्रूचा सामना करण्याची व त्याला चारीमुंड्या चीत करण्याची ऐपत बाळगून आहे. संकट आल्यावर आंतरराष्ट्रीय जनसमुदायाकडे  तोंड वासून बघत राहण्याची त्याला गरज नाही. स्वतःची ध्येय्य-धोरणे राबवताना किंवा प्रत्युत्तरादाखल आक्रमण करताना हा चिमुकला देश जगातल्या कोणत्याही देशाची तमा बाळगत नाही. स्वसंक्षणाच्या बाबतीत कसलीच तडजोड स्वीकारत नाही. 

  2. इजरायल सारखा छोटासा देश स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून स्वबळावर जेरुसलेम शहरात एक खांबाचा देखना अर्धचंद्राकार फ्लाय ओव्हर निर्माण करू शकतो. आम्ही मात्र चीन अथवा अन्य देशातून आयते तंत्रज्ञान आणतो, पैसे मोजून ते काम त्यांच्याकडूनच करून घेतो आणि आमचा देश विकास करत असल्याचा डांगोरा पिटतो. इजरायल हा देश केवळ कृषि क्षेत्रच नव्हे तर सर्वच क्षेत्रात स्वदेशी स्वयंपूर्ण  आहे असे जाणवले. 

  3. मार्केटमध्ये विक्रीला फारशा इंपोर्टेड वस्तू आढळल्या नाहीत. स्थानिक उत्पादित वस्तूच नजरेत पडल्यात. 

  4. सुरक्षेच्या नावाखाली पुलिस चौक्या, बॅरिकेट, स्पीडब्रेकर, चौकाचौकात वाहतूक नियंत्रण कक्ष अथवा पुलिस वगैरे कुठेही आढळले नाही.

  5. इजरायलमध्ये रात्री-बेरात्री महिला निसंकोचपणे कुठेही फिरू शकतात.

  6. रस्ते आणि चौक रुंदीने कमी म्हणजे अगदी तंतोतंत आहेत. जमिनीचा देखील ते वापर काटकसरीने करतात.

  7. वेळेच्या बाबतीत फार काटेकोर आणि शिस्तप्रिय आहेत.

  8. स्वदेशाबद्दल बोलताना अभिमानानाने पण किंचितसे अतिरंजित व बढाईपूर्ण बोलतात. उदा. मी एकाला विचारले कि पोचायला किती वेळ लागेल तर तो म्हणाला कि रस्ता एकदम सुपरफास्ट आणि ३ लेनचा आहे, ५० किमी अंतर आपण ३० मिनिटात पार करू. प्रत्यक्षात मात्र ४५ मिनिटे लागलीत.

  9. इजरायलच्या प्रत्येक नागरिकाला लष्करात सेवा देणे अनिवार्य आहे. पुरुषांना ३ तर महिलांना २ वर्षे सैनिकीशिक्षण घेणे व सेवा देणे सक्तीचे आहे.
तात्पर्य : स्वातंत्र्य मिळण्याच्या बाबतीत एका वर्षाने भारतापेक्षा लहान असूनही इज्राएलने अनेक बाबतीत घेतलेली भरारी अवाक करणारी आहे. शेतीपेक्षाही अन्य विषयात भारताने इजरायलचे अनुकरण करावे, आदर्श घ्यावा, अशी स्थिती नक्कीच आहे.

अधिक सखोल व विस्तारपूर्वक आढावा घेण्यासाठी पुस्तकरुपातच मांडणी करावी लागेल, त्याशिवाय विषयाला न्याय देणे अवघड आहे.

- गंगाधर मुटे 

Nov 21, 2017

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत
संमेलनाध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड

कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजित फाळके यांनी तर अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरुप धारण केले आहे पंरतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाहीत. अगदी साहित्यक्षेत्रसुद्धा या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे असे आढळून येत नाही. मागील तीन वर्षातील सततच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीने शेतकरी हतबल झालेला असतानाच विद्यमान सरकारच्या फसव्या कर्जमाफीने शेतकरी आणखीनच हवालदिल झालेला आहे. जवळजवळ सर्वच शेतमालाचे भाव केंद्रशासनाने निर्धारित केलेल्या हमीभावापेक्षाही (MSP) कमी दराने बाजारात विकले जात आहे. शेतकरी देशोधडीस लागत असतानाही समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात मात्र वास्तवाचे प्रभावीपणे चित्र प्रतिबिंबित होताना दिसत नाही, ही बाब साहित्यक्षेत्रातील उदासीनता अधोरेखित करणारी आहे.

साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे तर २०१७ मध्ये तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.

या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणाऱ्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्तारासाठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पीढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.

या संमेलनात "आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण", "स्वामिनाथन आयोग: शेतीला तारक की मारक?", "शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल, "सावध! ऐका पुढल्या हाका", अशा विविध विषयावरील एकूण ४ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन अशी दोन स्वतंत्र सत्रं ठेवण्यात आली आहेत.
संमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, आणि स्वागत समिती अशा चार समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, व जनार्दन म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-to-host-4th-shetkari-sahitya-sammelan/articleshow/61691919.cms

Dec 4, 2016

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

                 शरद जोशींच्या पश्चात शेतकरी चळवळीचे भवितव्य काय, असा प्रश्न माझ्यासहित अनेकांना सतावत आहे. शेतकरी चळवळ शरद जोशींनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली की ती उंची पार करण्याचा विचार राहू द्या; त्या उंचीच्या आसपास पोचण्याचीही नेतृत्वक्षमता कुणात नाही, ही वास्तविकता नजरेआड करता येत नाही. खरं तर मी चळवळ शब्द वापरत असलो तरी जोशींनी शेतकरी आंदोलनाला चळवळ असा शब्द कधीच वापरला नाही. ते लढवैय्ये असल्याने त्यांनी मिळमिळीत भाषाशैलीही कधीच वापरली नाही त्याऐवजी थेट आणि आक्रमक पण अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध आणि परिशास्त्रीय भाषेचाच वापर केला. 

                 १९८० चे दशक उजाडेपर्यंत लढाऊ किसान किंवा लढवैय्या शेतकरी हे शब्दच निरर्थक होते. इतिहासात आपण कितीही मागे जाऊन बघितले तरी कोणत्याही कालखंडात भारतीय शेतकरी त्याच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध कंबर कसून लढत होता, अशा पाऊलखुणा कुठेही आढळत नाहीत. अगदी शेताच्या बांधावर राजसैन्याच्या घनघोर लढाया व्हायच्या तेव्हाही शेतकरी त्या लढायांकडे मूक बधिरतेने निर्विकार चेहरा करूनच बघत राहायचा. शेतकर्‍याला पक्के ठाऊक होते की, राजे असो, पेशवे असो, मोगल असो किंवा डाकू-लुटेरे असो, हे सारे विजयानंतर आपल्याकडे शेतसारा वसूल करायला किंवा धान्याची लूट करायलाच येणार आहेत. ह्या लढाया म्हणजे शेतसारा वसूल कोणी करायचा याचा रीतसर परवाना मिळवण्यासाठीच असतात. ज्याला आपले म्हणावे असे यांच्यापैकी आपले कोणीच नाहीत, अशीच शेतकरी समाजाची सामूहिक विचारपद्धतीची ठेवण असल्याने कितीही अन्याय, अत्याचार झालेत तरी त्याविरुद्ध एक शेतकरी म्हणून निखळ शेतीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेतकरी पेटून उठला, त्याने राजसत्तेविरुद्ध बंड पुकारले असे उदाहरणच शेतीच्या इतिहासात सापडत नाही. त्याऐवजी दोन्ही हात जोडून अदबीने उभा राहणारा शेतकरी मात्र इतिहासाच्या पानापानावर पाहायला मिळतो. 

                 अशा स्थितीत शरद जोशींनी शेतकरी चळवळ उभी केली. कुत्र्याचे शेपूट सरळ होईल पण शेतकरी संघटित होणार नाही, या पारंपरिक समजुतीला उभा-आडवा-तिरका छेद देत शेतकरी संघटित केला, नुसताच संघटित केला नाही तर शेतकर्‍यांच्या मनात स्वाभिमानाने जगण्याचे बीजारोपण केले. ताठ मानेने व मूठ आवळून जगायचा मूलमंत्र दिला. देशातील इतर नागरिकांसारखे सन्मानाने जगता यावे म्हणून रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली. शेतकर्‍यांच्या मनातील राजसत्तेची व तुरुंगाची भीती घालवली. त्याचबरोबर प्रचलित अर्थवादाला कलाटणी देऊन शेतीच्या अर्थवादाच्या उत्क्रांतीची दिशा बदलण्यात शरद जोशी शतप्रतिशत यशस्वी झालेले आहेत. शरद जोशी यांनी “शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य” बनून पिढ्यानपिढ्या दारिद्र्याच्या अंधार्‍या खाईत चाचपडणार्‍या शेतकर्‍यांचा मुक्तीचा मार्ग प्रकाशमय करून ठेवला आहे.

                 शेतीला मध्यवर्ती स्थानी ठेवून विचारांची गुंफणं करणार्‍या द्रष्टा नेत्याच्या पश्चात आता तोच वसा घेऊन पुढील वाटचाल करायचे काम शेतकरी चळवळीसमोर असायला हवे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. शेतकरी चळवळीसाठी हा संक्रमणकाळ असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शेतकरी चळवळीचा पाया भक्कम असल्याने चळवळ संपणार नाही मात्र चळवळीचा प्रभाव आणि परिणामकारकता संकुचित होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. सत्तेचे लालसी व शेतकरी आंदोलनाचा शिडीसारखा वापर करून राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करू पाहणार्‍या शेतकरी कार्यकर्त्यांना शरद जोशींनी पद्धतशीरपणे संघटनेच्या जवळपास फारसे फिरकू दिले नव्हते, त्यांना शरद जोशींचे जाणे म्हणजे संधीची पर्वणी वाटायला लागली आहे. जोपर्यंत जंगलचा राजा सिंह जिवंत असतो तोपर्यंत लांडगे-माकड-कोल्ह्यांना जंगलाचा राजा होताच येत नाही. पण सिंह मरण पावला की लांडगे-माकड-कोल्ह्यांची सुप्त ऊर्मी उफाळून येते आणि आपली योग्यता न जोखताच राजा होण्याची स्वप्ने त्यांना पडायला लागतात. सिंहाचे जाणे त्यांना लाभप्रद वाटायला लागते, नेमका असाच काहीसा प्रकार शेतकरी चळवळीच्या बाबतीत घडत आहे. सत्तेत सहभागी होऊन शेतीचे प्रश्न सोडवता येतात असा येरागबाळा विचार मांडून तशीच कृती करणे, एखाद्याने स्वत:ला शरद जोशींचे वारसदार घोषित करणे, ज्याला आयुष्यभरात तीन कार्यकर्तेही मिळवता आले नाही त्याने स्वत:ला शेतकरी चळवळीचा अर्ध्वयू समजून घेणे, पावसाच्या सरी आल्या की जागोजागी भुछत्र्या उगवाव्यात तशा भाराभार शेतकरी संघटनांची स्थापना व्हायला लागणे, हे त्याचेच निदर्शक आहे.

                 काही सत्तालोलुप कार्यकर्त्यांना सत्तापदांची लालसा दाखवून कोणतीही चळवळ फोडून प्रभावहीन करण्याची कला राजकारण्यांना उपजतच असते. शरद जोशी असतानाही हा प्रयोग वेळोवेळी झालेला आहे. त्यामुळे चळवळीची शक्ती कमजोर करण्यात राजकारण्यांना तत्कालीन परिस्थितीत काहीसे यश आले असले तरी शेतकर्‍यांचा आवाज म्हणून शरद जोशींचा दरारा दिल्लीपर्यंत तरीही कायमच होता. इथे विशेष बाब म्हणून हेही लक्षात घ्यायला हवे की प्रकृती अस्वास्थ्यामुळे १९९५ च्या सुमारासच शरद जोशींना अनेक बाबतीत शारीरिक मर्यादा आल्या होत्या. अनेक जटिल शस्त्रक्रियांमुळे तर त्यांना दौरे करणे, आंदोलनासाठी लागणारे जनमानस तयार करणे, उपोषण करणे आणि रणात प्रत्यक्ष उतरून पाईकांचे नेतृत्व करणे त्यांना अशक्यप्राय झाले होते. तरीही १९९५ ते २०१५ एवढा वीस वर्षाचा प्रदीर्घ काळ त्यांनी शेतकरी आंदोलनाचा दरारा कायम ठेवला होता. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी आंदोलनात एकवाक्यता होती. त्या एकजिनसीपणामुळेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याच्या मागणी सारख्या अव्यवहार्य संकल्पनांना डोके वर काढता आले नाही.

                 पण आज चित्र निश्चितच पालटले आहे. शेतकरी चळवळीच्या स्वनामधन्य नेत्यांत कुठेही एकवाक्यता नाही. आपापल्या मर्जीप्रमाणे ज्याच्या मनात जसे येईल तसे तो बोलत सुटतो. कुणी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी करतो, कुणी शेतकर्‍यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्या, असा एजेंडा पुढे रेटू पाहतो तर कुणी शेतकर्‍यांनी सत्ता हाती घेतल्याखेरीज शेतीचे प्रश्न सुटणार नसल्याची हाकाटी पिटतो. शेतीचे अर्थशास्त्र समजून न घेताच बेताल वक्तव्ये करण्याचेही सध्या पेवच फुटलेले आहे. डॉ आंबेडकरांच्या निधनानंतर रिपब्लिकन चळवळीच्या वाट्याला आला तसाच भोग शेतकरी चळवळीच्या वाट्याला येतो की काय, असा संभ्रम होण्यासारखी स्थिती उद्भवणे, ही  नक्कीच दुर्दैवी बाब आहे.

                 शेतीमालाला उत्पादन  खर्चावर आधारित रास्त भाव मिळाल्याखेरीज शेतीव्यवसायात बरकत येऊ शकत नाही, रास्त भाव मिळेल अशी व्यवस्था होण्याऐवजी केल्या जाणार्‍या अन्य सर्व उपाययोजना म्हणजे नुसत्याच मलमपट्ट्या आहेत या एका अर्थशास्त्रीय विचारधारेला मध्यवर्ती स्थानी ठेवून गेले तीन दशक शेतकरी चळवळ उभी होती.  शरद जोशींनी मांडलेली विचारधारा अनेक चिंध्या एकत्र करून बांधलेले गाठोडे नसून एकाच तलम धाग्यात विणलेले महावस्त्र असल्याने शास्त्रशुद्ध अर्थशास्त्रीय आधारावर आजवर कुणालाच त्या मांडणीला छेद देता आलेला नाही. त्यामुळे नाव शरद जोशींचे घ्यायचे आणि कृती मात्र चक्क विपरित करायची हा नवा अजबच प्रकार अलीकडे सर्रास पाहायला मिळत आहे. नाना पाटेकर-मकरंद अनासपूरे या जोडगोळीचे शेतकरी विधवांना आर्थिक मदत करण्याचे कार्यक्रम असोत किंवा राजू शेट्टी-सदा खोत यांचे सरकार प्रायोजित कार्यक्रम असोत, शेतकरी चळवळीच्या निकोप वाढीसाठी मारकच आहेत.

                 एकीकडे शेतकरी चळवळीची अशी वाताहात होत असतानाच शेतीसमोरचे प्रश्न आणखी बिकट होत चाललेले आहे. शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी नवनव्या कॢप्त्या शोधून काढून त्यावर अंमलबजावणी करण्याचे नव्या सरकारचे अनुनभवी शिलेदार शेतीव्यवसायाला व्दापारयुगात नेऊन ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आजपर्यंत शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी झोनबंदी, प्रांतबंदी, निर्यातबंदी व मुक्त आयात हेच मुख्यत्वे हत्यार म्हणून वापरले गेले होते; पण नव्या सरकारने त्या जोडीला साठेबंदी नावाचे नवे हत्यार वापरून शेतमालाचे भाव पाडून दाखवले आहे. तुरीचे घसरलेले भाव हा या संदर्भातील उत्कृष्ट नमुना मानावा लागेल. शेती विषयक नवतंत्रज्ञान-विरोधी डावपेच, सेंद्रीयशेती अथवा झिरो बजेट शेतीचा सरकार प्रायोजित गाजावाजा, गोवंश हत्याबंदी कायदा, भूमी अधिग्रहणाचा फसलेला मनसुबा इत्यादी अरिष्टे शेतीव्यवसायाला आणखी बेजार करीत आहेत. त्या जोडीला आजवर सर्वच सरकारांनी राबविलेले सीलिंग व जीवनावश्यक वस्तू सेवा सारखे शेतकरीविरोधी कायदे, घटनेचे शेड्यूल ९, अन्नसुरक्षा आणि मनरेगा वगैरे सारख्या शेतीव्यवसायाची गळचेपी करणार्‍या योजना व तत्सम धोरणे प्रभावीपणे राबवायला सरकारं मोकळे आहेतच.

                 कधी अतिवृष्टी तर कधी खंडवृष्टी, नेहमीचीच वीज टंचाई, वीज, बीज, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरीचे दर, मुलांच्या शिक्षणाचा वाढलेला खर्च, प्रवासखर्च इत्यादी सर्वच बाजूंनी कायमच भाववाढ होत असताना केवळ शेतमालाच्या भावाची नाकेबंदी करून दर स्थिर ठेवले किंवा कमी केले तर शेतीव्यवसाय आणखी तोट्यात येणार हे स्पष्ट आहे. अशातच शेतकरी चळवळीची दबावगट म्हणून प्रभाव पाडण्याची शक्ती हीन होत असेल तर येणारा काळ शेतीसाठी फारसा उत्साहवर्धक नसेल हे सांगायला भविष्य़वेत्त्याची गरज भासत नाही. शेतीमध्ये येऊ घातलेली संभाव्य निरुत्साहिता थांबवण्यासाठी आताच प्रभावी उपाययोजना केली गेली नाही तर निरुत्साहितेचे रूपांतर अराजकतेत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याची काही अंशी जबाबदेही शेतकरी चळवळीचीही असेल, यात संशय नाही.

 - गंगाधर मुटे                      
~~~~~(महाराष्ट्र टाईम्स, दि. २/१२/२०१६ राज्यातील सर्व मराठी आवृत्त्यांत प्रकाशित)~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Nov 19, 2016

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

   "विविधता आणि लहरीपणा हेच निसर्गाचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याने शेतीच्या दुर्दशेसाठी निसर्गाला दोषी धरण्याचे काहीही कारण उरत नाही. शेतीच्या दुर्दशेची कारणे निसर्गाच्या लहरीपणात नसून अन्यत्र आहेत, हे न समजण्याइतपत कुणी दुधखुळा असू शकतो, अशी कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. तरीही तशी भाषा वापरली जात असेल तर त्यात  नक्कीच काहीतरी काळेबेरे आणि कुटनितीचे खेळ आहेत, असा ग्रह नाईलाजाने करून घेणे भाग आहे.  डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून बुद्धीचातुर्याच्या बळावर कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले."


निसर्ग म्हणजे निसर्ग आहे आणि त्याची वर्तणूक सुद्धा निसर्गाला शोभेल अशी नैसर्गिकच असणार हे उघड आहे.  निसर्ग विविधतेने नटलेला आहे. विविधता हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. निसर्गातला विविधता हा गूण काही कालचा किंवा परवाचा नाही. आपल्यासारख्या बुद्धीवंतांचा जन्म झाल्यानंतर निसर्गाने विविधतेचा गूण धारण केला असेल, असेही नाही. निसर्गाचा जेव्हा केव्हा जन्म झाला असेल तेव्हाच तो विविधतेचा जन्मजात गूण धारण करुनच जन्माला आला असणार, हेही उघड आहे.  ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असूनही यावर मते-मतांतरे व्यक्त होत असतील तर तीही नैसर्गिक वैविध्यतेच्या रचनात्मक मानसिकतेमुळेच होत असते, ही नैसर्गिक शाश्वत सत्यता सुद्धा आपण स्विकारलीच पाहिजे. पण तिथेही विविधताच आडवी येते आणि शाश्वत सत्यता स्विकारायला शतप्रतिशत मानसिकता कधीच तयार होत नसते.

भारतीय शेती निसर्गावर अवलंबून असल्याने व निसर्ग बेभरवशाचा असल्याने शेतकरी गरीब आहे, हे विधान मी शाळा-कॉलेजात असताना ऐकताना आणि वाचताना इतके वेळा कानावर आणि डोळ्यावर येऊन आदळायचे की कानाचे पडदे फ़ाटायला बघायचे व डोळ्यातली बाहुली ठार गारद व्हायला बघायची. शाळा-कॉलेजात जाऊन शिकले-सवरलेले आणि ग्रंथ-कुराण-बायबल-वेद वाचून साक्षात ज्ञानाचे महामेरू झालेले इतके येरेगबाळे कसे बोलू आणि लिहू शकतात, याचे कायम कुतुहलमिश्रीत नवल वाटत राहायचे. मग या विधानाची शहानिशा करून आकलन करण्यासाठी मेंदूच्या भवती विचाराचे लोंदे गोळा व्हायचे. ते मेंदूभवती इतका पिंगा घालायचे की मेंदू पार गुळगुळीत होऊन पलिकडे काम करेनासा व्हायचा. कधीकधी मेंदू हँग झाला की मुद्दा निकाली न काढताच त्याला आहे तसाच अर्धवट आणि येरागबाळा सोडून मेंदूला फ़ॉर्म्याट मारून, नव्याने रिफ़्रेश मारून ताजेतवाने व्हावे लागायचे.

शाळा-महाविद्यालयात मिळवलेल्या ज्ञानाची शिदोरी गाठीशी घेऊन जेव्हा मी प्रत्यक्ष शेती करायला सुरवात केली तेव्हा पहिल्या सहा महिन्यातच पुस्तकीय ज्ञानातील विरोधाभास उघड व्हायला लागला. प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रत्यक्ष ग्रामीण जीवन, पुस्तकीय ज्ञानातील पांडित्य व बोलघेवड्या पगारी तज्ज्ञांचे सल्ले हे दुरान्वयानेही आपसात एकमेकांच्या नातेसंबंधात लागत नाही, याची प्रचिती यायला लागली. शेती, शेतीतील गरीबी, गावाची दुर्दशा याची कारणे शोधतांना जी कारणे आढळली ती पुस्तकांशी, पुस्तकी पंडीतांच्या निष्कर्षाच्या आणि शिकवणीच्या थेट उलटी दिसत होती. डोहाकडे जाणार्‍याला वाचवण्यासाठी उदात्त हेतूचा देखावा करून सुचवले जाणारे मार्ग त्याला आणखी त्वरेने डोहाकडे नेणारे आणि कुठल्याही स्थितीत तो बुडलाच पाहिजे, अशी बेमालूमपणे पण प्रभावी व्यवस्था करणारेच आहेत, हे ज्या क्षणी लक्षात आले आणि खात्री पटली त्या क्षणीच प्रचलित पुस्तकी पंडीत, पारंपारिक ज्ञानाचे महामेरू आणि पगारी तज्ज्ञ यांच्यावरचा माझा विश्वास भुर्रकन उडून अवकाशात निघून गेला तो आजतागायतही परत आलेला नाही.

मात नव्हे मैत्री

निसर्गावर मात करण्याच्या वल्गना हा आणखी एक असाच आगाऊपणा. एकंदरीत निसर्गाची प्रकृती एकजिनशी आणि वैश्विक आहे. विश्वाच्या एका भौगोलिक प्रदेशात घडलेल्या बदलाचा प्रभाव विश्वाच्या दुसर्‍या भौगोलिक प्रदेशात जाणवत असतो. वैश्विक रचना समग्र ब्रह्मांड रचनेशी संलग्नीत आहे, इतके जाणायला मनुष्य खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषशात्रीच असला पाहिजे, हेही आवश्यक नाही. ब्रह्मांडाची परिमिती कुणालाच मोजता आली नाही आणि मोजता येणे शक्यही दिसत नाही. आकाशगंगेतील अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिणाम सुद्धा अत्यंत थिटे आहे. आकाशगंगेचे नुसते अंतर मोजण्याचीही कुवत नसलेल्या मनुष्यप्राण्याने थेट मात करण्याच्या गोष्टी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरित निसर्गाची आणि निसर्गावर प्रभाव टाकणार्‍या घटकांची व्याप्ती लक्षात घेतली तर विभागवार किंवा प्रदेशवार निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणता येणे आपल्या आवाक्यात नाही. तंत्रज्ञानाने कितीही झेप घेतली तरी निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणणे कधीही शक्य होणार नाही, याचे भान विसरून चालणार नाही. सतरा वर्षे शाळा-महाविद्यालयात घालवली आणि जोडीला शे-पाचशे पुस्तके वाचल्याने ज्ञानग्रहनक्षमतेच्या कक्षा तेवढ्या रुंदावत जातात, निसर्गावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होत नाही याचे भान राखायलाच हवे.

हजारो वर्षापासून शेतकरी शेती करत आला पण त्याने निसर्गावर मात करण्याची भाषा कधीच केली नाही. त्याने निसर्गाशी जुळवून घेतले, निसर्गाशी मैत्री केली. निसर्गाला बदलायला भाग पाडणे मनुष्य प्राण्याच्या आवाक्यात नाही, याची जाणीव असण्याइतपत व्यावहारिक ज्ञान त्याचाकडे असल्याने तसा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. याउलट तो स्वत: बदलला. निसर्ग कसा असतो, हे त्याने समजून घेतले एवढेच नव्हे तर त्याने स्वत:ला निसर्गानुरूप बदलवून घेतले. त्याने नैसर्गिक प्रकृतीला स्वत:च्या प्रकृतीत विलिन करून घेतले. रान केव्हा नांगरायचे, उदिमाला सुरुवात केव्हा करायची, पेरणी केव्हा करायची याचे वेळापत्रक त्याने निसर्गाला अनुसरून तयार केले. पेरणी केली अन पाऊस आला नाही किंवा अति पाऊस होऊन दुबारपेरणीची वेळ आली तर कधी कुरबूर केली नाही, आदळआपट केली नाही आणि निसर्गाला कधी दोष तर दिलाच नाही. पुन्हा नव्याने तयारी केली आणि दुबार पेरणी केली. कधी ओला दुष्काळ पडला, कधी कोरडा दुष्काळ पडला, कधी एका पावसाच्या कमतरतेने पीक करपून गेले, कधी अति पावसाने अथवा महापूराने शेत पिकासहित खरडून गेले, कधी वादळाने तर कधी गारपिटीने पीक धाराशायी केले पण शेतकरी अश्रू ढाळत बसला नाही आणि निसर्गाच्या नावाने शिमगा करत डांगोराही त्याने कधीच पिटला नाही. त्याने निसर्गाला मित्रासारखीच वागणूक दिली आणि निसर्गाला त्याच्या विविधतेसह आनंदाने स्विकारले. पावसाने उघडीप दिली किंवा खंडवृष्टीची स्थिती निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍याने निसर्गाला बोल लावला नाही तर त्याची आराधना केली. कधी कमरेला बेडूक बांधून वरुणदेवतेला प्रसन्न करायचा प्रयत्न केला, कधी सर्व गावकर्‍यांनी एकत्र येऊन मारोतीच्या पाळावर अभिषेक केला तर कधीकधी सामुहिक सदावर्त करून देवासमोर नैवद्य ठेवला आणि गावातील सर्व गोरगरीब गावकर्‍यांना यथेच्छ भोजनाचा पाहूणचार दिला. शेतकर्‍याने पेरणीसाठी मातीचा, पीक जगवण्यासाठी पाण्याचा, कचराकाडी जाळण्यासाठी अग्नीचा, धान्य उफ़णण्यासाठी वायुचा, उदीमासाठी वृक्षाचा खुबीने वापर केला. पंचमहाभूतांचा आणि निसर्गदत्त संसाधनाचा पुरेपूर कौशल्यानिशी वापर करत व निसर्गाशी सलोखा राखत आपली शेती फ़ुलवत ठेवली. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात शेतकर्‍याने निसर्गाला शत्रू मानून त्याच्यावर मात करण्याची भाषा वापरल्याच्या यत्किंचितही पाऊलखुणा आढळत नाही.

कुटनितीचा खेळ

मग निसर्गावर मात करण्याची आणि शेतीतील अठराविश्व दारिद्र्याशी निसर्गाच्या लहरीपणाशी सांगड घालून निसर्गालाच जबाबदार धरण्याची भाषा आली कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. उत्तर जटील नसले तरी कुटील नक्कीच आहे. शेतकर्‍यांच्या मर्जीनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार पाऊस कोणत्याच युगात पडल्याची शक्यता नाही आणि यानंतर पुढे येणार्‍या युगातही पडणार नाही, हे शेतकर्‍याला निसर्गत: मान्य असल्याने तो त्याच्या गरिबीला निसर्गाला जबाबदार धरत नसला तरी अन्य कोण जबाबदार असेल याचीही कल्पना त्याला नाही आणि नेमकी इथेच शेतकरी समाजाची गोची झाली. शेतीत दारिद्र्य आहे हे खरे आहे पण ते कशामुळे आहे, याचे नेमकेपणाने उत्तर शेतकरी समाजाला माहित नसल्याने त्यांचा “नरोवा कुंजरोवा” झाला. शेतकरी समाजातील याच संभ्रमाचा फ़ायदा अनुत्पादक वर्गाने नेमकेपणाने उचलला.

 "विविधता आणि लहरीपणा हेच निसर्गाचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याने शेतीच्या दुर्दशेसाठी निसर्गाला दोषी धरण्याचे काहीही कारण उरत नाही. शेतीच्या दुर्दशेची कारणे निसर्गाच्या लहरीपणात नसून अन्यत्र आहेत, हे न समजण्याइतपत कुणी दुधखुळा असू शकतो, अशी कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. तरीही तशी भाषा वापरली जात असेल तर त्यात  नक्कीच काहीतरी काळेबेरे आणि कुटनितीचे खेळ आहेत, असा ग्रह नाईलाजाने करून घेणे भाग आहे.  डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून बुद्धीचातुर्याच्या बळावर कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले." जेव्हा जेव्हा थेट दोन हात करणे अशक्य असते तेव्हा तेव्हा समोरच्या बाजुला परास्त करण्यासाठी कुटनितीचा अवलंब करण्याला बहुतांश शास्त्रांची मान्यता असल्याने शेतमालाच्या लुटीसाठी या मार्गाचा अवलंब करणे सर्वांनाच सोईचे वाटले असावे. शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध होत राहण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या गरिबीचे खरे कारण कळू न देता त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत राहणे सर्वांना फ़ायदेशीर ठरले असावे. शेतकरी आळशी, कामचोर, उधळ्या, अज्ञानी आहे, परंपरागत पद्धतीने शेती करणारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर न करणारा आहे त्यामुळे तो गरीब आहे किंवा शेतीच्या दुर्दशेला निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत आहे, अशा सामुहिक जनमानस तयार करणार्‍या संकल्पनांचा वापर शेतीमालाला मिळणार्‍या अत्यल्प भावाच्या मुद्याला बगल देण्यासाठी कुटनितीक शैलीने पद्धतशीरपणे करण्यात आला असावा, हे उघड आहे.

ग्राहकांची मानसिकता

कोणत्याही व्यक्ती अथवा सामुहिक कुटुंबाचा जमा आणि खर्चाचा ताळेबंद जुळत नाही तेव्हा त्या व्यक्तीचा अथवा कुटुंबाचा अर्थसंकल्प तोट्याचा तयार होतो. अर्थाच्या अनुलब्धतेमुळे साधनांच्या खरेदीवर एकतर मर्यादा येतात किंवा खरेदी अशक्य होते. घरात साधनांची त्यातल्या जिवनावश्यक गरजेच्या वस्तुंच्या खरेदीसाठी अथवा जिवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी क्रयशक्ती संपली की घरात जे चित्र तयार होते त्यालाच आपण दारिद्र्य म्हणत असतो. देशाचा, राज्याचा, कार्पोरेट क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा अर्थसंकल्प मांडण्याची व तर्‍हेतर्‍हेचे उपाय सुचवण्याची पात्रता असलेले लक्षावधी पगारी अर्थतज्ज्ञ या देशात मुबलक मिळून जातात. अर्थसंकल्पात तृटी दर्शविणारे व त्याचे लेखापरिक्षण करणे ऑडिटर सुद्धा लक्षावधी संख्येने मिळून जातात पण शेतीत गरिबी आहे कारण शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढेही भाव मिळत नसल्याने शेतीचा अर्थसंकल्प तोट्यात जातो, असे ठासून सांगणारे अर्थतज्ज्ञ किंवा सी. ए मात्र दुर्मीळ असणे वरील कुटनितीचा परिणाम आणि पुरावा आहे.

गणीताच्या भाषेत ०.५ च्या वरील सर्व किंमती १ च्या बरोबर तर ०.५ च्या आतील सर्व किंमती शुन्याच्या बरोबरीच्याच असतात. आज आपल्या देशात बहुतांश शेतमालाला एकूण उत्पादनखर्चाच्या निम्म्यापेक्षाही कमीच भाव दिले जातात. म्हणजे शून्य किंमतीत म्हणजेच फ़ुकटाच्या बरोबरीनेच शेतमाल हडपला जातो, हे गणीतीय सत्य सर्वांनीच स्विकारायला हवे. शेतीतील गरिबी संपवण्यासाठी शेतमालाचे उत्पादन खर्च भरून निघतील एवढे भाव मिळण्याखेरीज अन्य कुठलाही मार्गच अस्तित्वात नसल्याने शेतमाल स्वस्तात मिळाला पाहिजे, अशी मानसिकता आता ग्राहकांनीही बदलणे, काळाची गरज झाली आहे.

                                                                                                                   - गंगाधर मुटे
(’जनशांती’नाशीक, दिवाळी अंकात प्रकाशित लेख)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Jul 17, 2016

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥
कळेना अभय कैसा । विठूचा झमेला ॥३॥

                                   - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(१७/०७/२०१६)

Jul 16, 2016

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥

लक्ष अब्जावधी । करोडोचा निधी ।
वाढवी उपाधी । शहरांची ॥७॥

ठेऊनिया कमी । शेतीमाल भाव ।
ध्वस्त केला गाव । पिळुनिया ॥८॥

गावही भकास । भकास मारुती ।
घामाची आहुती । व्यर्थ गेली ॥९॥

तिथे ऐश्वर्याचा । सुख, चैनी, भोग ।
सातवा आयोग । सेवेसाठी ॥१०॥

इथे दारिद्र्याचे । सर्वत्र साम्राज्य ।
कर्जाचेच राज्य । आम्हावरी ॥११॥

गाव म्हंजे जणू । दुभत्याची गाय ।
खरडूनी साय । रक्त पिती ॥१२॥

सांगा तुकोराया । अभय एवढे ।
कुणाला साकडे । घालावे गा? ॥१३॥

                    - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१६/०७/२०१६

Jul 9, 2016

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Apr 23, 2016

दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : वृत्तपत्र वृत्तांत

शेतकरी साहित्यही पुढे यावे

सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : मराठी शेतकरी साहित्य संमेलन

नागपूर : दिवंगत शरद जोशी यांनी शेतकरी चळवळ मोठी केली. शेतकर्‍यांबाबत त्यांनी प्रचंड लिखाण केले. त्यांचे साहित्य इतके मोठे होते की ते कुठल्याही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले असते. परंतु त्यांच्या लिखाणाला मान्यता दिली नाही हा आमच्या साहित्यिकांचा करंटेपणा होता. मराठी साहित्य दरिद्री राहण्यामागंच खरं कारण म्हणजे खर्‍या चळवळीशी कधी जुळवूनच घेतलं नाही. महात्मा गांधींशी जुळवून घेतले नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशीही कुठे जुळवून घेतले. दलित चळवळ आणि साहित्य पुढे आले तेव्हा कुठे त्याची दखल घेतल्या गेली. शेतकर्‍यांचे साहित्यही असे दलित साहित्याप्रमाणे पुढे यावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे संपादक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे केले. 

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे दोन दिवसीय दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे हे संमेलनाध्यक्ष होते तर ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर हे प्रमुख अतिथी होते. शेतकरी नेते वामनराव चटप हे स्वागताध्यक्ष होते. शेतकरी साहित्य चळवळीचे अध्यक्ष गंगाधर मुटे, राम नेवले, संध्या राऊत व्यासपीठावर होते. प्रा. सुरेश द्वादशीवार म्हणाले, एकीकडे ४0 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी बातमी आहे तर दुसरीकडे देशात प्रचंड गुंतवणूक झाल्याची बातमी आहे. देशात येणार्‍या या गुंतवणुकीत मरणार्‍या शेतकर्‍यांशी काही संबंध आहे की नाही, याचा विचारच होत नाही. कारण आमच्या संवेदनात बोथट झाल्या आहेत. ७५ टक्के लोकं खेड्यात राहतात. परंतु कोणताही पंतप्रधान स्मार्ट खेडी बनवण्याची भाषा बोलत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. 

शरद जोशी यांनी शेतकरी चळवळीला गती दिली. त्यांच्या संमेलनाला ५-५ लाख लोक एकत्र यायचे. जोपर्यंत शेतीच्या मालाला भाव मिळावा, अशी त्यांची मागणी होती, तेव्हापर्यंत लोकं त्यांच्यासोबत होते. परंतु शेतकर्‍यांच्या सबलीकरणासाठी त्यांची राजकीय शक्ती उभी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हा लोकांना त्यांची जात आठवली. 

गरिबांच्या किंवा शेतकर्‍यांच्या चळवळीत जोपर्यंत लोक आपली जात धर्म विसरून एकत्र येणार नाही, तोपर्यंत या व्यथा अशाच राहतील. अलीकडे शेतकरी साहित्याबद्दल चांगले लिहिले जात आहे. त्यांना बळ द्या, असेही ते म्हणाले. राजीव खांडेकर यांनीसुद्धा दिवंगत शरज जोशी यांच्या विपुल साहित्यावर प्रकाश टाकला. तसेच डॉ. आंबेडकरांचे विचार त्यांच्या अनुयायांनी ज्या प्रमाणे पुढे नेले, त्याच प्रमाणे शेतकरी चळवळ सुद्धा पुढे नेण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. अँड. वामनराव चटप यांनी पत्रकार आणि साहित्यिकांनी शेती व शेतकर्‍यांच्या व्यथा मांडून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधावे. लोकांच्या संवेदना जागृत व्हाव्यात असे लेखन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी 'कणसातील माणसं', नागपुरी तडका या काव्यसंग्रहासह 'शेतकर्‍यांचा सूर्य' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक केले. मनिषा रिठे यांनी संचालन केले. तर राम नेवले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) 

महासत्तेकडे वाटचाल म्हणजे अफूची गोळी देणे - रा.रं. बोराडे

■ ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आपला देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, असं म्हणणे म्हणजे जनतेला अफूची गोळी देणे आहे. हे खर मानलं तरी एक प्रश्न उपस्थित होतो. माझा एक नातू हैदराबाद येथील एका इंग्रजी शाळेत शिकतो. माझ्या शेतकरी भावाचा एक नातू माझ्या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. माझ्या शेतकरी भावाचा हा नातू माझ्या नातवाच्या हातात हात घालून महासत्तेकडे जाणार आहे का? नसल्यास महासत्तेच्या अशा फुशारक्या मारण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतीच्या समस्येच्या मुळाचा आपण विचार करण्याची गरज आहे. आता सर्व अल्पभूधारक झाले आहेत. अशा परिस्थितीत केवळ रस्त्यावर उतरणेच आपल्या हातात आहे. शेतकरी शेतात काम करता करता जगला पाहिजे ही भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकर्‍यांच्या आत्महत्या या फॅशन झाल्याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही यावेळी त्यांनी केला.
--------------------------------------------------
22/02/2016
--------------------------------------------------

शेतकर्यांसाठी शरद जोशींचा मार्शल प्लॅन लागू करा

श्रीनिवास खांदेवाले : दुसर्‍या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा समारोप

नागपूर : भारतात तीन लाखांवर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा देश आणि राज्याच्या राजकारण व अर्थकारणावर परिणाम झाला नाही. दबाव वाढले तेव्हा पॅकेज जाहीर करून वेळ निभावून नेली. शेतकर्यांचे दु:ख, दारिद्रय़ संपविण्यासाठी सरकारला ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था विकसित करणे गरजेचे आहे. परंतु सरकारजवळ नियोजनाचा आराखडाच नाही. ज्या देशात ६0 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्याला प्राधान्यक्रमच नाही. त्यामुळे आत्महत्यांचे सत्र वाढताना दिसत आहे. शेतकर्यांच्या दारिद्रय़मुक्तीसाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी मार्शल प्लॅन तयार केला होता. शेतकर्यांसाठी हा मार्शल प्लॅन लागू करणे गरजेचे आहे, असे मत अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले. 

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ संघटनेतर्फे दोन दिवसीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी संमेलनाचा समारोप झाला. समारोपीय कार्यक्र मात अध्यक्ष म्हणून खांदेवाले यांनी शेतकर्यांच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे नेते गुणवंतराव पाटील, माजी आमदार सरोजताई काशीकर, ज्येष्ठ साहित्यिक व कादंबरीकार रावसाहेब बोराडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे उपस्थित होते. या संमेलनात सर्वानुमते शरद जोशी यांना 'युगात्मा'ही लोकउपाधी देण्यात आली. याप्रसंगी सरोज काशीकर म्हणाल्या की, शेतकरी विकासाच्या नावावर लुटल्या गेला आहे. सरकारने कायद्याचे निर्बंध घालून त्याला बेड्या घातल्या आहे. शेतकर्यांची सर्व बाजूने कोंडी झाली आहे. शरद जोशी यांच्या मार्शल प्लॅननुसार शेतमालाच्या आयातीवर बंधने घालून निर्यातीला प्रोत्साहन द्या, निर्यातीसाठी ३0 टक्के सूट द्या, शेतीला उद्योगाचा दर्जा द्या तरच खर्या अर्थाने भारताचा विकास होईल. 

याप्रसंगी गुणवंतराव पाटील म्हणाले की, शरद जोशी यांनी १९९३ मध्ये लेखाजोखा आंदोलन पुकारले होते. यात सरकारने शेतकर्यांना कशा पद्धतीने लुटले, हे शरद जोशी यांनी सरकारपुढे मांडले होते. शेतकरी सरकारचा कुठलाही देणेदार नाही. त्याच्यावरचे सरसकट कर्ज काढून टाकले पाहिजे. त्याला आधुनिक तंत्रज्ञान पुरविले पाहिजे. सातव्या वेतन आयोगाला शेतकर्यांनी पुढे येऊन विरोध केला पाहिजे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन जगदीश भगत यांनी केले. (प्रतिनिधी) 

कवितेतून मांडले शेतकर्यांच्या दु:ख, वेदनेचे प्रतिबिंब


दु:ख, आक्रोश, वेदना आणि मन हेलावून सोडणारे शब्दांचे बाण कविसंमेलनात शेतकर्यांच्या अवस्थेची जाणीव करून देत होते. ही जाणीव करून देताना सरकार आणि राजकीय नेत्यांवरील संताप व्यक्त होतानाही दिसत होता. शेतकर्यांच्या आत्महत्येवरील एका कवितेत राजकारणाचा समाचार घेताना कवी म्हणाला, कोणी म्हणतो हिरवा, कोणी म्हणतो भगवा, अबे शेतकरी मरून रायला, पहिले त्याले जगवा. शहरे स्मार्ट होत असताना, गाव भकास होत आहे. जगाचा पोशिंदा आत्महत्येकडे वळल्यामुळे, ग्रामीण भागात उदासी पसरली आहे. या वातावरणावर लक्ष वेधताना कवी विजय विलेकर यांच्या कवितेतून ही भीती व्यक्त होताना दिसते. ते म्हणतात, 'आत्महत्येची किंचाळी पडते दुरून, अरे व्हारे बाबा जागे हाती मशाल घेऊन..' कवी रवींद्र कामठे हे सुद्धा सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका करताना म्हणतात, 'कोपलेल्या निसर्गावर मात करण्याचे धाडस होते, मातलेल्या सरकारचे डोके कुठे होते..' कवी रविपाल शेतकर्यांची वेदना मांडताना म्हणाले, 'अस्तित्वाने जाहीरनामा कालच प्रसिद्ध केला, जी वस्तू दान केल्या जाते, तिचा निर्माता मेला.' यासारख्या एकाहून एक मनाला झोंबणार्या कविता दुसर्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात सादर करण्यात आल्या. कविसंमेलनाचे अध्यक्षपद ज्ञानेश वाकुडकर यांनी भूषविले. संमेलनात दिलीप भोयर, नवनाथ पवार, प्रा. मनीषा रिठे, धीरज ताकसांडे, डॉ. विशाल इंगोले, श्रीकांत धोटे, शैलजा कारंडे, वृषाली पाटील, दामोदर जराहे, सुमती वानखेडे, रामकृष्ण रोगे, सांडोभाई शेख, सुरेश बेलसरे, मोरेश्वर झाडे, राजेश जवंजाळ या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Deshonnati ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Lokmat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Deshonnati ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Hitvad ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Lokmat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Loksatta ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Maharashtra Times ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sakal ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sakal ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दिनांक : २२ एप्रिल २०१६

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Tarun Bharat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Deshonnati ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  Deshonnati
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  Deshonnati~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Lokmat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Lokmat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Lokasatta ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Maharastra Times ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Maharastra Times ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Maharastra Times ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Punyanagari ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Punyanagari ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sakal ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sakal ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sakal ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~Tarun Bharat ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं