Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Apr 25, 2020

आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग १४
आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती

           माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी अकस्मात गंभीर स्थिती उद्भवली होती. तातडीने गावापासून दूर ५० किमी अंतरावरील सेवाग्राम रुग्णालयात पेशंट दाखल करावा लागला. प्रसूती झाली, बाळ जन्माला आले पण सारे प्रकरणच एकदम गंभीर असल्याने मलाही तिथेच तब्बल १४ दिवस ठाण मांडून बसावे लागले. रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर घरी आलो आणि कपडे बदलले. गेली १५ दिवस खुंटीला लटकून असलेल्या शर्टच्या खिशात सहज हात घातल्यावर हाताला एक कागद लागला. कागद बाहेर काढला आणि मजकुरावर नजर पडताच मी निदान पंचवीसेक फूट तरी उंच उडालेलो असेल किंवा ११०० किलोवॅटचा जबरी झटका तरी मला नक्कीच बसला असेल कारण त्याक्षणी माझी अवस्थाच तशी झाली होती. अचानक तोंडातून मोठा आवाज निघाल्याने काय झाले म्हणून बघायला घरातील सर्व मंडळी माझ्या भोवताल गोळा झाली होती. असे काय असेल त्या कागदात?

           अचानक आठवण झाली की मी १५ दिवसापूर्वी स्वतःच आजारी होतो. आठवडा संपूनही आजारातून आराम मिळण्याऐवजी सतत वाढतच चालल्याने मला तालुक्यातील रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. मला कावीळ झाल्याचे निदान होऊन औषधोपचार करण्यात आले होते. त्याचाच तो कागद होता म्हणजे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन होते. औषधोपचार आटोपून मी घरी येऊन रुग्णशय्येवर पहुडलो होतो आणि तास-दोन तासातच वरील गंभीर प्रसंग उद्भवला होता. त्यात माझा कावीळ कुठे चोरीस गेला, तो कुणी पळवला हे मला अजूनही कळलेले नाही. मीच नव्हे माझे पूर्ण कुटुंबीय सुद्धा मी आजारी असल्याचे विसरून गेले. मी पुढील चौदा दिवस इतका निरोगी होतो की त्या कावीळची आठवण सुद्धा कधीच झाली नाही. कावीळसारखा जीवघेणा आणि क्लिष्ट स्वरूपाचा रोग अचानक असा कसा गायब झाला असेल? कुणी गायब केला असेल? दैवी शक्तीने की आत्मशक्तीच्या स्वसामर्थ्याने?

           मी सामाजिक कार्यात असल्याने अनेकदा गावातील व्यक्ती आजारी पडून अतिगंभीर अवस्थेत पोचला की त्याला १६ किमी अंतरावरील रुग्णालयात घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर येते. आम्ही जेव्हा रुग्ण घरातून वाहनापर्यंत नेतो तेव्हा त्याला चार-पाच लोकांनी मिळून उचलून न्यावे लागते. दवाखान्याजवळ पोचलो की दोन माणसांनी आधार दिला की रुग्ण हळूहळू चालत डॉक्टरपर्यंत जाऊ शकतो. डॉक्टरने नाडी बघितली, स्टेथोस्कोप लावला आणि सांगितले की जा, अमुक अमुक बेडवर झोपा. तर तोच रुग्ण स्वतःच चालत चालत बेडपर्यंत जातो आणि झोपतो. बहुतांश वेळा थोड्याफार फरकाने असेच घडत असते, हा माझा स्वानुभव आहे. जो रुग्ण अनेक दिवस खाटेवर स्वतःहून उठून बसू शकत नव्हता, उभा होऊ शकत नव्हता तोच रुग्ण डॉक्टरच्या दिशेने निघाल्यावर कसाबसा उठून उभा व्हायला लागतो. डॉक्टरांनी तपासल्याबरोबर स्वतःच्या पायाने चालायला लागतो. काय असतो हा चमत्कार? 

           मी आता डॉक्टरकडे चाललोय म्हणजे आता माझी प्रकृती ठीक होणार, असा आत्मविश्वास निर्माण झाला की आत्मबलही आपोआपच वाढायला लागते. आत्मबल वाढायला लागले की शरीर साथ द्यायला लागते. रोगासोबत शरीरच लढत असते. शरीराची शक्ती क्षीण झाली तर औषधोपचाराने आपण शरीराची लढण्याची शक्ती वाढवत असतो. जर शरीर साथ देत नसेल तर जगातली सर्व औषधे निरुपयोगी आहेत. जर रुग्ण अतिगंभीर अवस्थेत पोचला  आणि शरीराने साथ द्यायला नकार दिला तर अशा प्रसंगी डॉक्टर अजिबात उपचार सुरू करत नाहीत. ते तोपर्यंत थांबतात जोपर्यंत शरीर उपचाराला प्रतिसाद देण्यायोग्य समर्थ होत नाही.

           आजारासोबतच लढण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आत्मबलाचा उपयोग होतो असे नव्हे तर बोलण्या-चालण्या-वागण्यात देखील जिथे जिथे प्रतिकार करण्याची गरज भासते तिथे तिथे आत्मबलाचा उपयोग होतो. प्रवाहासोबत पोहायलाही आत्मबलाची आवश्यकता असते आणि प्रवाहाच्या विरोधात पोहतानाही आत्मबलाची गरज भासते. शरीराची कितीही दमछाक झाली आणि पंख गळायला आले तरी आत्मबल जर कणखर असेल तर उत्तुंग भरारी घेणे आपल्या आवाक्याबाहेर नसतेच. 

आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो

           ज्ञान, विज्ञान, श्रद्धा, विश्वास, भक्ती, शक्ती, युक्ती, अभ्यास, चिंतन, मनन या सर्व स्रोतांचा उपयोग आत्मभान जागवण्यासाठी होतो. त्यातूनच आयुष्याच्या चतुरस्र रेशीमवाटा समृद्ध होत जातात.  

- गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १३ - दि. १८ एप्रिल, २०२० - "आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  रेशीमवाटा

Apr 18, 2020

केवळ जंतूमुळे रोग होतो? : भाग १३

केवळ जंतूमुळे रोग होतो?
"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग १३

        अनावश्यकरीत्या कुठलेही डावपेच, कूटनीती, दुजाभाव, हेवा, मत्सर व अहंकार न बाळगता सहज चालत राहणे ही माणसाच्या आयुष्याची सहजसुलभ सुखदायी रेशीमवाट आहे. पण प्रत्येक मनुष्य अनन्यसाधारण असल्याने आपली अनन्यसाधारणता प्रदर्शित करत राहण्याची प्रेरणा त्याला काहीतरी तुफानी आणि आगळेवेगळे करून दाखवण्याच्या मार्गावर नेऊन सोडते. त्यातूनच जितकी मते तितके मतप्रवाह निर्माण तयार होतात. परस्परभिन्न मतप्रवाहामध्ये मग संघर्षाची सुरुवात होते. जिंकण्याच्या इर्षेने त्यात डावपेच, कूटनीती, दुजाभाव, हेवा, मत्सर व अहंकार आदींचा शिरकाव होऊन सहजसुलभ असलेली रेशीमवाट मग क्लिष्ट होऊन जाते आणि यातच पहिला बळी विवेक व तारतम्याचा जातो.

        रोग का होतो? असा जर प्रश्न टाकला तर निसर्गाच्या प्रकोपाने होतो असे उत्तर काही दशकापूर्वी दिले जात होते. कालांतराने विज्ञान प्रगत होत गेले, आधुनिक वैद्यकशास्त्राने क्रांतिकारी संशोधन केल्यामुळे अनेक गुपितं उघड व्हायला लागली. त्यामुळे कालचे उत्तर आज शिळे होऊन रोग जंतूमुळे होतो, या उत्तरावर आपण येऊन स्थिरावलो. स्थिरावत असताना विवेक व तारतम्याचा बळी गेल्याने यापेक्षा दुसरे उत्तर सुद्धा असू शकते, हे मान्य करणे म्हणजे जणू काही विज्ञानाचीच प्रतारणा करून विज्ञानद्रोह करणे, अशा टोकाच्या भूमिकेपर्यंत माणसाची मजल गेली. पण खरेच याला अन्य प्रकारची उत्तरे नसूच शकतात का? याचे उत्तर जर नाही असे एखादा विज्ञाननिष्ठ मनुष्य देत असेल तर ते सुद्धा चुकीचेच आणि विज्ञानाची प्रतारणा करणारे असते कारण विज्ञान केव्हाही, कोणतीही शक्यता कधीही नाकारत नाही.

        एखाद्या रोगाची जबरदस्त साथ येते तेव्हा सर्वच लोक आजाराला बळी पडत नाहीत. अगदी कुटुंबात सुद्धा क्वचितच सर्वांना आजार जडतो. एरवी एक आजारी पडतो आणि उरलेले निरोगी असतात. अगदी जेव्हा आधुनिक वैद्यकीयशास्त्र अजिबात प्रगत नव्हते किंवा आज सर्वोत्तम असलेल्या ऍलोपॅथीचा शोध सुद्धा लागलेला नव्हता तेव्हाही प्लेग, कॉलरा सारख्या महामारीमध्येही शतप्रतिशत जनता मृत्युमुखी पडलेली नाही. एखाद्या रोगाची साथ कितीही भयंकर असू द्या पण ज्याचे लग्न होऊ घातले आहे असे नवरा-नवरी लग्नाच्या दिवशी, लग्न घटिकेच्या वेळी आजारी पडले आणि मग नजीकच्या इस्पितळातील आयसीयू वॉर्ड मध्ये जाऊन लग्न लावावे लागले, असे एकही उदाहरण माझ्या ऐकण्यात नाही. मग नवरा-नवरीला आजारातून सूट का देत असेल हे जंतू? मात्र समारंभ आटोपल्यानंतर साथीचा रोग नसेल तरीही वराकडील-वधूकडील मंडळी थकव्याने आजारी पडतात, हे अनुभवले आहे. ज्याचा अभ्यास चांगला झाला आहे आणि पेपर जर मनासारखे गेले तर असे विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी आजारी पडत नाहीत. अभ्यास जर समाधानकारक झाला नाही किंवा अभ्यास होऊनही जर पेपर मनासारखा सोडवला गेला नाही तर असा विद्यार्थी आजारी पडण्याची शक्यता मात्र खूपच जास्त असते. मग हे जंतू असा भेदभाव का बरे करत असतील?

        करोनाने एक बरे केले की, विषाणूच्या मारक क्षमतेपेक्षा आणि औषधोपचाराच्या तारक क्षमतेपेक्षा माणसाची प्रतिकार शक्ती जास्त महत्वाची असल्याचे अधोरेखित केले. ज्यांची प्रतिकारशक्ती मजबूत आहे त्यांना एकतर करोना संसर्ग होणार नाही. संक्रमण झालेच तर जाणवणार नाही आणि जाणवलेच तरी मनुष्य मरणार नाही, ही शक्यता खूपच जास्त आहे. पण अशी प्रतिकारशक्ती कृत्रिमरीत्या निर्माण करण्याइतपत आधुनिक विज्ञान या क्षणापर्यंत तरी हतबल आहे. याचाच अर्थ असा की आधुनिक विज्ञान सर्वोत्तम असले तरी सर्वस्व नाही. इतके भान येऊन वास्तवाची जाणीव झाली तर माणसाला विज्ञानाविषयीचा फाजील अहंकार सहज गाळून टाकता येतो. असा अनावश्यक अहंकार गळून पडला की नवनवीन रेशीमवाटा धुंडाळण्याच्या क्षमतेला चालना मिळून पर्यायी वाटा गवसण्याचे दरवाजे खुले होऊन जातात. त्यापैकीच एक सहज गावसण्याजोगा मार्ग म्हणजे आत्मबल. त्याविषयी उहापोह पुढील लेखात करू.

बक्कळ करून झाले, इतुके अता करूया
अपुलीच आत्मशक्ती, खंगाळुनी बघूया

        प्रतिकारशक्तीचा संबंध जसा आहाराशी व व्यायामाशी असतो त्यापेक्षा जास्त संबंध आत्मबलाशी असतो. आत्मबलाचा पाया विश्वास व श्रद्धेवर आधारलेला असतो. आत्मबलाशिवाय शारीरिक बल चैतन्यहीन असते. आत्मशक्तीचा स्तर अत्युच्च्य पातळी गाठून असेल तर जंतूच काय जंतूचा बाप देखील अशा व्यक्तीला सहजासहजी खाटेवर लोळवू शकत नाही.
- गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १३ - दि. १८ एप्रिल, २०२० - "केवळ जंतूमुळे रोग होतो?"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

  रेशीमवाटा

Apr 11, 2020

पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही - भाग १२

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग १२
पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही

       आज रोजी आपण एका विचित्र वळणावर उभे आहोत. तुलनाच करायची झाली तर आपण आदिमानवापेक्षाही आदिमानव झालेलो आहोत, असे म्हणण्याइतपत वेळ आली आहे. साधन निर्मितेची कला अवगत होण्यापूर्वीचा आदिमानव जसा गुहेत दडून बसायचा तसेच आज आपण आपापल्या गुहेत बसलेलो आहोत. आपल्याकडे एसी, फ्रीज, कूलर वगैरे असूनही त्याचा यथेच्छ उपभोग घेण्यास असमर्थ आहोत. अनेक वर्षातील अथक संशोधनानंतर निर्माण केलेली यांत्रिक साधने आपल्यापासून काही अंतरावर एकाजागी स्थितप्रज्ञासारखी स्थिर झालेली आहेत. एका करोना नावाच्या सूक्ष्म विषाणूमुळे आपली जीवनशैली एकाच दिवसात पार बदलून गेली आहे. ऐहिक आणि आत्मिक सुखविलासासाठी मनुष्याने तंत्र आणि यंत्राच्या बळावर ज्या रेशीमवाटा तयार केल्या होत्या त्याच वाटा आज  निष्प्रभ झाल्या सारख्या दिसत आहेत. 

एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले

        करोना संकट अभूतपूर्व असले तरी मनुष्य प्राण्यासाठी अगदीच नवखे नाही. उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यावर अनेक संकटे आलेली आहेत. अनेकदा होत्याचे नव्हते झालेले आहे. पण तरीही मनुष्यप्राणी टिकून आहे, टिकूनच राहणार आहे कारण गरजेनुसार स्वतःला बदलण्याची लवचिकता व त्यानुसार आयुष्याच्या नव्या रेशीमवाटा नव्याने निर्माण करण्याची अद्भुतशक्ती मनुष्यजातीकडे आहे. सध्या लॉकडाऊन मुळे जिथला मनुष्य तिथेच थांबला आहे. ज्यांचे स्वगृही परतण्याचे सर्व यांत्रिक मार्ग बंद झाले होते त्यांनी ३००-४०० किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन आपले उद्दिष्ट गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीही या काळात दाखवली आहे. हेच मनुष्याचे असली स्वरूप आहे ज्या आधाराने अगम्य परिस्थितीवर मात करत उत्क्रांती सदैव दोन पावले पुढेच गेलेली आहे.

      जेव्हा जेव्हा देशावर राष्ट्रीय संकट कोसळते तेव्हा तेव्हा त्याचे चटके सरसकट सर्वांनाच बसत असतात. कदाचित कुणाला जास्त तर कदाचित कुणाला तुलनेने कमी. पण या चटक्यातून कुणीच सुटत नाही. अनेक लोकांची जीवनशैली अशी असते की त्याला जेवण आणि चहा सुद्धा बाहेर जाऊन घ्यावा लागतो. त्याच्या स्वतःच्या खोलीमध्ये स्वयंपाकाची भांडी तर सोडा पण साधी पिण्याचे पाणी साठवण्यासाठी बादली सुद्धा नसते. आज या दीर्घ लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात त्यांची काय स्थिती असेल, याची कल्पना करणे सुद्धा अंगाचा थरकाप उडवणारे ठरत आहे. अनेकांना दिवसभरातून एकदा तरी जेवण कसे मिळवावे असा प्रश्न पडला असेल. दारात यंत्र सामुग्री व खिशात पैसा असूनही अनेक लोक पुरते हतबल झालेले असतील पण अशा बिकट स्थितीशी सुद्धा  मनुष्य लीलया जुळवून घेतो, हेच तर मनुष्याचे खरेखुरे बलस्थान आहे.

        लॉकडाऊन नसलेल्या काळातील एक मजेदार अनुभव सांगतो. गोष्ट आहे याच वर्षीच्या होळीच्या दिवशीची. मला मीटिंगसाठी औरंगाबादला जायचे होते. रात्रीच्या बसने जायचे, सकाळी पोचायचे आणि रात्रीच्या बसने परतायचे असा साधासुधा बेत असल्याने सोबत छोटीशी बॅग घेतली ज्यात शाल, ब्लॅंकेट, चादर वगैरे काहीही नव्हते. मीटिंग आटोपून रात्री ज्या बसने परतायचे होते, ती बस धूळवड असल्याने ऐनवेळी रद्द झाली होती. शेवटी रात्री १० वाजताची एक नॉन एसी बस मिळाली. बसमध्ये बसलो आणि अचानक थंडी वाजायला सुरुवात झाली. मलेरियाचा ताप येतो तशी कडाक्याची थंडी व हुडहुडी भरायला लागली. तातडीने डॉक्टर किंवा निदान पॅरासिटोमॉलच्या गोळ्या आणि एका ब्लॅंकेटची आवश्यकता होती. पण रंगपंचमीचा दिवस असल्याने पूर्ण मार्केटच बंद असल्याने काहीही उपलब्ध झाले नाही.

        खिशात पैसे आहेत. देशात डॉक्टर भरपूर आहेत. औषधांनी व ब्लॅंकेटनी दुकाने खचाखच भरलेली आहे, असे अर्थशास्त्र व व्यापारशास्त्र कितीही सांगत असले व ते शंभरटक्के खरेही असले तरी त्याही पेक्षा प्रसंगानुरूप व गरजेनुसार काय उपलब्ध होऊ शकते, हेच सर्वात जास्त महत्त्वाचे असते. तंत्रविज्ञान कितीही प्रगत असले आणि गाठीशी भरपूर संपत्ती असली की सर्वच प्रश्न चुटकीसरशी सुटतात, असेही नसते.

शेवटी काय तर ना मिळाली गोळी, ना मिळाली शाल, ना मिळाले ब्लॅंकेट, ना मिळाली चादर. थंडी आणि हुडहुडी पासून बचावासाठी रात्रभर २००० व ५०० च्या नोटाच पांघरून प्रवास करावा लागला.

- गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १२ - दि. ११ एप्रिल, २०२० - "पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

  रेशीमवाटा

Apr 4, 2020

अस्तित्व दान करायचे नसते! - भाग ११

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ११
अस्तित्व दान करायचे नसते!

विज्ञानाच्या साहाय्याने गरूडझेप घेत आसमंतात तरंगणाऱ्याचे अचानक क्षणात पंख गळून पडावेत आणि तो धाडकन जमिनीवर आदळावा, अशी काहीशी स्थिती करोना नामक एका सूक्ष्म निर्जीवाने मनुष्यजातीची करून ठेवलेली आहे. आपल्या शत्रूचा निःपात करण्यासाठी रिव्हॉल्वर पासून रणगाड्यापर्यंत आणि मिसाइल पासून अण्वस्त्रापर्यंत माणसाने शस्त्रसज्जता केली पण आता स्वसंरक्षणासाठी जेव्हा प्रत्यक्ष लढायची वेळ आली, तेव्हा सैन्याचा उपयोग शत्रूशी लढण्यासाठी न होता स्वकीयांना घरात डांबण्यासाठी करावा लागत आहे, एका अर्थाने ही अवस्था मनुष्यजातीला भानावर येण्यास भाग पाडणारी आहे.

शत्रू बदलल्याने युद्धाचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे माणसाने आपल्या संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांची नव्याने फेररचना करणे आवश्यक झाले आहे. ज्या करोनाविरुद्ध लढायचे आहे, त्या करोनाला देश, राज्य, धर्म, जात, पंथ, गरीब, श्रीमंत, शोषक, शोषित, दलित, सवर्ण अशा स्वरूपाचे कोणतेही मनुष्यनिर्मित भेदाभेद कळत नाहीत. ज्याच्याशी गाठ पडेल, त्याला गिळंकृत करणे इतकेच करोनाला कळते. करोना हे मनुष्यजातीवरील संकट असल्याने सर्व जगाने एकत्र येऊन करोनाविरुद्धची लढाई लढणे, हीच काळाची गरज आहे. करोनाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत माणसामाणसात कुठलाही भेदाभेद केल्यास आपण करोनाला हरवू शकणार नाहीत, इतके भान जर याक्षणी मनुष्यप्राण्याला आले नाही तर माणसाची अनुवंशीय अहंकाराची नशा उतरवण्याची संधी करोनाला आयतीच चालून येईल, याबद्दल मला तरी तीळमात्र शंका नाही.

प्रत्येकाने एक बाब ठळकपणे लक्षात घेतली पाहिजे की, कोणतीही एक व्यक्ती, एक समूह, एक पक्ष, एक संघटना वगैरे करोनावर नियंत्रण मिळवू शकत नसल्याने सरकारच्या नेतृत्वात एकजूटीची सक्त आवश्यकता आहे. लॉकडाऊनमुळे तमाम भारतीय जनता आपापल्या घरात बंदिस्त झाल्याने आता केवळ शासन, प्रशासन आणि मानसेवी डॉक्टरच मैदानात उतरून करोनाशी दोन हात करणार आहेत. आपण घरात बसून काहीच करू शकत नसलो तरी शासन, प्रशासन आणि मानसेवी डॉक्टरांचे मनोबल उंचावण्यासाठी सकारात्मक प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह व पाठबळ नक्कीच वाढवू शकतो. करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा निर्णय कसाही असो आणि कोणताही असो, आपल्याला व्यक्तिशः पटो अथवा ना पटो, आपण सर्व निर्णयांना पुरेपूर पाठिंबा दिला पाहिजे. शासनाचा निर्णय योग्य की अयोग्य हे स्वतःच्या मतानुसार किंवा स्वतःचे निकष लावून न ठरवता, शासन या संबंधात जे जे निर्णय घेईल ते सर्व निर्णय योग्यच आहेत, असे समजून आपण आपले वर्तन सहकार्याचे व अनुमोदनाचे ठेवले पाहिजे. ही काळाची गरज आहे. या प्रयत्नात जात, धर्म, पंथ, पक्ष असे कुठलेही भेदाभेद करणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. याच पायरीवर करोनाला थोपवणे जितके सोपे आहे, तितके सोपे पुढील पायऱ्यांवर नसणार आहे, इतके ध्यानी घेतलेच पाहिजे.

करोना म्हणजे अस्मानी किंवा सुलतानी संकट नसून संबंध मानवजातीवरील अरिष्ट असल्याने सर्वांनी संकुचित वृत्तीतून बाहेर येऊन व्यापकपणे विचार केला पाहिजे, इतके खरे तर कोणत्याही माणसाला कळते पण धर्म आणि पक्ष यांचा मानवी मनावर इतका भारी पगडा असतो की मती कुंठित होऊन आयुष्याच्या रेशीमवाटा कधी काटेरीवाटांमध्ये रूपांतरित झाल्या हे ज्याचे त्यालाही कळत नाही. धार्मिक मतभेदांना काही वैचारिक अधिष्ठान तरी असते पण पक्षीय राजकारण म्हणजे निव्वळ उलट्या काळजाचा खेळ झाला आहे. राजकारणाच्या पोरखेळात सत्त्व आणि तत्त्व यांचे महत्त्व कधीचेच हद्दपार झाले आहे. राम्याने गोम्याला चिम्या म्हटले की लगेच निम्या गोम्याला तिम्या म्हणणार. मतेमतांतराच्या गोंडस नावाखाली परस्परांच्या उलट व विरोधाभासी बोलणे यालाच राजकीय विचारधारा म्हणतात, इतक्या खालच्या पातळीवर राजकारण घसरले आहे.

असणेच आज माझे,
नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने
अस्तित्व दान केले

करोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भातही माणसांमध्ये एकवाक्यता येत नसेल, संधी मिळेल तेथे गलिच्छ राजकारण घुसवून नुसताच कांगावा केला जात असेल तर आपण करोनाला आक्रमणाचे निमंत्रण देऊन त्याच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरूण मानवजातीशी फितुरी करून करोनाला आपलेच अस्तित्व आपल्याच हाताने दान करत आहोत, असे भाकीत वर्तवायला ज्ञान, विज्ञान, अध्यात्म अथवा ज्योतिषीशास्त्राची गरजच पडणार नाही.

- गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ११ - दि. ०४ एप्रिल, २०२० - "अस्तित्व दान करायचे नसते!"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं