Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Nov 15, 2014

आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!


        यंदाचा दुष्काळ "न भूतो न भविष्यति" असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. "रोजचे मढे त्याला कोण रडे" अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.

जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा

दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा

शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्‍यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!

संवेदनाशीलता मेली काय?

        माणूस संवेदनाक्षम वगैरे खरंच असतो काय, याबद्दल मला फार पूर्वीपासून संशय होता;  पण तो केवळ संशय होता. आता मात्र माझ्या मनातला कालचा संशय हळूहळू दृढतेत बदलायला लागला आहे. आता मनुष्याच्या संवेदनक्षमतेविषयी मी एवढेच म्हणू शकतो की माणसाच्या संवेदनशीलते मागे त्याचा निहित स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसेल तर सभोवताली कितीही लाजिरवाण्या, क्रूर अथवा अमानुष घटना घडल्या तरीही मनुष्यप्राणी कळवळत नाही, हळहळत नाही आणि काळजाचे पाणी होण्याइतपत द्रवतही नाही. तो निगरगट्ट, ढिम्मच्या ढिम्म आणि निर्विकारच असतो.

        आतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते. असते ती केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती. जी घटना आज त्या मुली संदर्भात घडली तीच घटना आपल्याही मुलीवर ओढवू शकते, या भितीपोटी उडालेला थरकाप!

        शेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्‍यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.

        हुश्श! एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो? हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय? असा प्रश्न उपस्थित करण्याचे औचित्य दिसतच नाही कारण सामूहिक समाजमन संवेदनक्षम असते, हेच मुळात थोतांड आहे, अशी खात्री व्हायला लागली आहे.

बिनपाण्याने हजामत

        या विषयावर उहापोह करण्याचे कारण असे की, मला समोर भयाण वास्तव दिसत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला लागला की जशी पाऊस पडण्याची शक्यता बळावत जाते तद्वतच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकेल अशी अनुकूल स्थिती शेतकर्‍यांच्या अवतीभवती निर्माण व्हायला लागली आहे. वेळीच शासकीय स्तरावर वेगवान हालचाली होऊन युद्धस्तरावर उपाययोजना झाली नाही तर येणारे सहा-सात महिने अत्यंत वाईट बातम्या घेऊन येतील, हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसायला लागले आहे.

        यंदा विदर्भात नापिकीने कहर केला आहे. कापसाचे एकरी उत्पादन गत दोन वर्षाच्या तुलनेने फक्त ३०-३५ टक्केच होईल, असा अंदाज आहे. सोयाबीनची स्थिती तर सर्वाधिक खराब आहे. जिथे एकरी ९-१० क्विंटल सोयाबीन व्हावे तिथे १ ते २ क्विंटल होत आहे. अनेक शेतात तर एकरी १ क्विंटलापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने व सोयाबीन कापणीसाठी लागणारा खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्‍यांनी उभ्या पिकातच नांगरट सुरू केली आहे किंवा गुरे चरायला सोडली आहेत. यात जिरायती आणि बागायती असासुद्धा भेदाभेद करायला कारण नाही आहे, कारण एकाची पाणी लावून तर दुसर्‍याची बिनपाण्याने हजामत होत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली प्रचंड घट आणि दुसरीकडे शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा दुहेरी जात्यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.

राजा! ही तुझी बदमाषी आहे

        विदर्भातलाच शेतकरी जास्त प्रमाणात आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाही. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. पण महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत 'भारतीय कापूस महामंडळा' च्या धर्तीवर बाजारभावाप्रमाणे किंवा बाजारभावापेक्षा जास्त चढ्या दराने कापूस खरेदीचे धोरण राबविण्यात आले नाही. तुरळक अपवाद वगळले तर अन्य प्रांतातील शेतकर्‍यांना खुल्या बाजारपेठेत जेवढे भाव कापसाला मिळालेत त्यापेक्षा कायमच कमी भाव एकाधिकाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पदरात टाकले गेले. अन्य प्रांतात चांगले भाव असूनही त्याचा फायदा राज्यातील शेतकर्‍यांना घेता आला नाही कारण प्रांतबंदी लादून अन्य राज्यामध्ये कापूस विक्रीस नेण्यास राज्यातील कापूस उत्पादकांना कायदेशीर मज्जाव करण्यात आला आणि "आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना" अशी गत खुद्द शासनानेच राज्यातील कापूस उत्पादकांची करून टाकली. कापूस एकाधिकाराच्या गोंडस नावाखाली कापूस उत्पादकांचे जवळजवळ ३०-३५ वर्षे "कायदेशीर शोषण" झाल्याने राज्यातला कापूस उत्पादक आर्थिक स्थितीने एवढा नेस्तनाबूत झाला की त्याला पुन्हा डोके वर काढताच आले नाही.

        मध्यंतरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारंभालाच चांगली संधी आली होती. कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू शकेल एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली होती. तेव्हा शासनाने फक्त गप्प बसण्याची गरज होती. मामला व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला होता. सरकारवर आर्थिक भारही पडणार नव्हता. याउलट कापसाच्या निर्यातीतून परकीय चलनाची गंगाजळी शासकीय तिजोरीत येऊन साठणार होती पण; कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू देईल तर ते ’मायबाप’ सरकार कसलं? कापूस गिरणी मालकांच्या दबावाखाली येऊन सरकारने तातडीने सूत्रे हालवली. कापसावर निर्यातबंदी लादली आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल ९०००/- सहज मिळू शकणारे भाव प्रति क्विंटल ५०००/- पेक्षाही कमी आले.
जेव्हा चांगलं पिकलं व बाजारभावही चांगले मिळून कापूस उत्पादकांची आर्थिकबाजू सावरायची शक्यता निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍यांची लूट करायला कोणी व्यापारी आला नाही, दलाल आला नाही, चोर आला नाही किंवा दरोडेखोरसुद्धा आला नाही. कापूस उत्पादकांना सरकारने लुटलं, राजरोजसपणे लुटलं, कायदेशीरपणे लुटलं. कापूस उत्पादकांच्या अधोगतीला शासनाची बदमाषीच कारणीभूत आहे.

आत्महत्या नव्हे, शासकीय खून!

        ज्या वर्षी शेतीत उत्पादन कमी येते आणि शेतमालाचे भावही पडतात, त्या-त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातो. शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते ती त्याने आळशीपणा दाखवला म्हणून नव्हे, त्याने कर्तव्यात कसूर केला होता म्हणून नव्हे, त्याच्या व्यसनाधीनतेमुळे तर नव्हेच नव्हे! शेतमालाचे भाव ठरविण्याचे, त्यावर निर्बंध लादण्याचे, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्याचे सर्वाधिकार शासनाकडेच असल्याने शेतीक्षेत्रातील सर्व बर्‍याबाईट परिणामांसाठी व प्रगती-अधोगतीसाठी थेट सरकारच जबाबदार ठरते. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून ह्या आत्महत्यांना "शेतकर्‍यांचा शासकीय खून" असेच संबोधावे लागेल.

- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------

Oct 31, 2014

आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : नियम, अटी व तपशिल

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम

आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४

नमस्कार मित्रहो,
     ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रसारमाध्यम या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही पण;

     आता शेतकर्‍यांच्या मदतीला नवीन संगणकीय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरजालाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच पहिली पायरी म्हणून आज सादर करीत आहोत.....

आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४

विषय : शेती आणि शेतकरी

या स्पर्धेचे दोन प्रकार असतील,

गद्यलेखन स्पर्धा-२०१४ आणि पद्यलेखन स्पर्धा-२०१४

१] गद्यलेखन स्पर्धा-२०१४
विभाग : अ) ललितलेख   ब) कथा   क) वैचारिक लेख   ड) शेतीविषयक माहितीपर लेख

२] पद्यलेखन स्पर्धा-२०१४
विभाग : अ) पद्यकविता   ब) छंदमुक्त कविता   क) गझल   ड) गेय रचना/गीत (पोवाडा, अंगाई, लावणी इत्यादी)

प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल.

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:

१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. साहित्य अनुवादित असेल तर तसा स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे.
२) पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात
३) एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त ३ प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही.

पारितोषिकाचे स्वरूप :

प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.

निकाल :

२६ जानेवारी २०१५ रोजी अंतिम निकाल जाहीर केला जाईल, तो अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.shetkari.in या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.

पारितोषिक वितरण :

सन २०१५ मध्ये होणार्‍या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल.

प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :

१) स्पर्धा ०१ नोव्हेंबर २०१४ ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
२) लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन येथे प्रकाशित करावे लागेल.
३) लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते.
४) स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह spardha@shetkari.in या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
५) स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत माहिती spardha@shetkari.in या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख/कथा/वैचारिक लेख/शेतीविषयक माहितीपर लेख/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे.
६) सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
७) स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
८) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
९) गद्यलेखनासाठी शब्दमर्यादा - १२०० शब्द एवढी असेल.

नियम व शर्ती :

१) स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
२) स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
३) स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
४) एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तर त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
५) परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील.
६) सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.shetkari.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
७) एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
८) अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
९) निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
१०) शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती

आपले स्नेहांकित

डॉ. कैलास गायकवाड, विशाल कुळकर्णी, राज पठाण, कमलाकर देसले
संयोजक मंडळ
आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Oct 27, 2014

www.shetkari.in चा लोकार्पण सोहळा

www.shetkari.in चा लोकार्पण सोहळा

             अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव येथे दिनांक २४ ऑक्टोंबर २०१४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या http://www.shetkari.in/ या संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा गझलनवाज पं भिमराव पांचाळे यांच्या शुभहस्ते, श्री विजय विल्हेकर यांचे अध्यक्षतेखाली आणि श्री संजय कोल्हे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

               याप्रसंगी गझलनवाज भिमराव पांचाळे, श्री विजय विल्हेकर, श्री संजय कोल्हे, श्री गंगाधर मुटे यांची समयोचित भाषणे झालीत.

कार्यक्रमाला गावातील नागरिक उपस्थित होते.



: पहिला शेतकरी गझल मुशायरा :

कार्यक्रमानंतर झालेल्या शेतकरी गझल मुशायर्‍यात गझलकार चांदूर बाजारचे श्री नितीन देशमुख, नेरपिंगळाईचे श्री लक्ष्मण जेवणे, यवतमाळचे अनिल कोसे, सुदाम सोनुले,  विद्यानंद हाडके, गंगाधर मुटे यांनी गझला सादर केल्या.

काही वेचक शेतकरी शेर;

कापूस हिरवा, कापूस भगवा, निळा पांढरा झाला
पण सगळ्या झेंड्यांचा कपडा शेतामधूनी आला
- श्री नितीन देशमुख
--------------
एकवार गर्भिली उधार पेरणी
फ़ास लावणार ती दुबार पेरणी
- अनिल कोसे
--------------
फ़ाटक्या अंबरा पांघरावे कसे
रान भेगाळले नांगरावे कसे
- सुदाम सोनुले
--------------
आत्महत्त्या बळीच्या तू रोख वामना
मी अभयदान इतुके मागून पाहिले
- गंगाधर मुटे
-------------

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं