Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Mar 20, 2010

हा देश कृषीप्रधान कसा?

हा देश कृषीप्रधान कसा?


- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवी शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातूर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.

                          मी जर असे म्हणायला लागलो तर ते कुणालाही झेपण्याची शक्यता नाही. बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले तरी कोणी पटवून घेईल? नाहीच घेणार. कारण स्पष्ट आहे. वर उल्लेखिलेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ असल्यातरीही त्यांच्या कौतुकासाठी मी वापरलेली शब्दविशेषणे अतिशयोक्तिपूर्ण आहेत. या तर्‍हेच्या भाषाप्रयोगाने संबंधित व्यक्तीचे कौतुक होण्यापेक्षा उपहासच होत असते. आणि असे गुणगौरव करणारा एकतर वेडसर किंवा निष्कारण गोडवे गाणारा “भाट” ठरतो.
                      मग जर हे खरे असेल तर जेव्हा जेव्हा “भारत हा कृषिप्रधान देश आहे” किंवा “शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे” असे म्हटले जाते तेव्हा नेमके काय अपेक्षीत असते? कौतुक की उपहास?
                       भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी देशाचा पोशिंदा आहे वगैरे-वगैरे बरेच काही बोलले जाते पण…..
                 या देशाला कृषिप्रधान मानावे अशा कुठल्याही पाऊलखुणा प्रतिबिंबित होताना दिसत नाहीत, या देशातल्या राजकीय नेत्यांच्या डोक्यात शेतकरी प्रथमस्थानी कधीच नव्हता,आजही नाही. बुद्धिप्रामाण्यवादी,थोर-महान विचारवंताच्या वैचारिक बैठकीचा केंद्रबिंदू “शेती आणि शेतकरी” कधीच नव्हता, आजही नाही. मग हा देश कृषिप्रधान कसा?.

टीव्ही मध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
वृत्तपत्रात शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
लोकसभा/राज्यसभा अधिवेशनात शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
संसदेत पुढार्‍यांच्या भाषणामध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
अंदाजपत्रकीय ऐकून खर्चामध्ये मध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?

                         एवढे जरी लक्षात घेतले तरी भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे,असे म्हणण्याचे कोणी धाडस करेल असे मला वाटत नाही.
                           भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे असे मी सुद्धा म्हणायचो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो…..?  तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणून म्हणतो. पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार, त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार…. ही यादी किती लांब आहे देवच जाणे.

                        ”कोणीतरी म्हणतंय म्हणून मीही म्हणतो” असेच ना? स्वत:च्या अक्कलहुशारीने कोणताही विवेकशील मनुष्य भारत देशाला ’कृषिप्रधान देश’ म्हणण्याचे धाडस करेल याला काहीही तार्कीक आधार दिसत नाही.
                           देशाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून स्वयंप्रेरणेने ‘भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे’ असे ज्याला वाटते त्याच्या वैचारिक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटायला हवे. पण तसे होत असताना दिसत नाही.

                        “कृषीक्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा” मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा ‘अर्थव्यवस्थेचा कणा’ शोधायचा प्रयत्न करतोय परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा “दिवाळीचा सन” म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या ‘कण्या’पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्त्व खाऊन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या ‘अर्थव्यवस्थेच्या कण्याला’ मिळताना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.

आणि जर का हे खरे असेल तर शेतकर्‍याला “देशाचा राजा” म्हणणे म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टाच नाही काय?
ही शेतकर्‍यांची मानसिक छळना आहे असे मला वाटते.
या देशात जसे काही लोक शेतीवर उपजीविका करतात तसेच या शेतीमुळेच अनेकांना आत्महत्याही करावी लागते.
असा विचार करता “भारत हा कृषिमरण देश आहे” हे जास्त संयुक्तिक नाही का?
मग
“सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत” हा जर उपहास/व्यंग असेल तर “भारत हा कृषिप्रधान देश आहे” हे सुद्धा उपहास/व्यंगच.
आणि
“भारत हा कृषिप्रधान देश आहे” हे जर खरेच असेल तर “सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत” हेही खरेच.
उगीच वेगवेगळे मापदंड नकोत.
.                                                                                                   गंगाधर मुटे

//////////////////////////////////////////////////////////////////////////////

5 प्रतिसाद:

हेरंब said...

गंगाधरजी, नेहमीप्रमाणेच विचारांना प्रवृत्त करणारा लेख. खूप आवडला.. !!

Gangadhar Mute said...

धन्यवाद हेरंबजी.

vidya patil said...

Aapal mhanan khar aahe, pan sarvat aadhi shetkari sanghtit hone garjech aahe.

Gangadhar Mute said...

विद्याजी,शेतकरी संघटीत होत नाही,हेच तर खरे दुर्दैव आहे.

Mahadev Kapuskari said...

गंगाधरजी आपले विचार खरोखर शेतकऱ्याच्या अंत:करणातून निघालेले निखारे आहेत आणि जेव्हा मी आपले लिखाण पहिल्यांदा वाचले तेव्हापासून मी आपला fan आहें सर...
आपल्या लिखाणातील काही भाग मी आपली परवानगी न घेता माझ्या ब्लोग वर टाकला आहें त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो.
माझा ब्लोग - mvkapuskari.blogspot.com

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं