Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Dec 15, 2010

गंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय

       गंगाधर मुटेंचा काव्यमेवा - कवितेचा परिचय 
                                                           - बेफिकीर

गंगाधर मुटे या माणसाबाबत माझी आधीची गृहीते मला बदलावी लागत आहेत.

               गझल या विषयावर त्यांचे मला अनेकदा फोन यायचे. तंत्राबाबत चर्चा व्हायची. चर्चा होऊनही त्यांना गझलतंत्रात सफाई साधता येत नाही यावरून मी किंवा ते कमी पडत आहेत असे वाटून मला राग यायचा. त्यातच ते त्यांची ती गझल प्रकाशित करायचे व त्यांचे समकालीन गझलेच्छू तिला दाद द्यायचे.
              
             आजवर या कवीची 'एक' कविता समोर यायची आणि ती चाखेपर्यंत किंवा सोसेपर्यंत दुसरी यायची नाही. दोन कवितांमध्ये पंधरा दिवसांची तरी गॅप असायची. तसेच, कधी 'बिपाशाले लुगडे' तर कधी 'नाकाने कांदे सोलतोस किती' अशा टीकात्म किंवा रंजक कविता हाच या कवीचा विशिष्टगुण आहे असे जाणवत राहायचे.

              पण आज पहाटे मी गावाहून घरी आलो आणि रानमेवाची प्रत मला मिळाली. आणि गंगाधर मुटेंनी आजवर आपल्या सर्वांसमोर प्रकाशित केलेल्या कविताच या देखण्या पुस्तकात एकत्र केलेल्या आहेत हे पाहून मी ते पुस्तक वाचायचेच टाळले. कारण नवीन काहीच मिळणार नव्हते.

               पेपर, चहा वगैरे झाल्यावर 'चला, सहज आपले बघू तरी' म्हणून हातात घेतलेले हे पुस्तक! त्यातील एकही कविता मी नीट वाचली नसली तर जणू सर्व पुस्तक मनात घोळवले आहे असे वाटू लागले.

आणि मग स्पष्टपणे, प्रभावीपणे आणि सच्चेपणाने त्या कवितांमागील मन प्रकर्षाने जाणवू लागले.

             हे पुढील विधान करताना त्यात माझा काहीतरी साहित्यातील निकषांनुसार भ्रष्ट हेतू आहे असे कुणालाही वाटू शकेल किंवा माझ्या बुद्धीचा संशय येऊन त्यावर उपचारही सुचवले जातील, पण...

... रानमेवा हे मी वाचलेल्या मराठी कवितासंग्रहांपैकी एक देखणे पुस्तक आहे.. दिसायलाही आणि... वागायलाही...

             तमाम पुरस्कार प्राप्त, गौरवल्या गेलेल्या आणि साहित्यातील वेगवेगळी बिरुदे मिरवणार्‍या व जे 'पोझ' घेतात हे सहज समजू शकते अशा कवींनी व बारश्यापासून ते मयतीपर्यंत प्रत्येक समारंभाचे अध्यक्षस्थान आपल्यालाच मिळावे याकडे डोळे लावून बसलेल्या व घरी बायकोच्या शिव्या खाणार्‍या समीक्षकांनी हा विदर्भातील एक शेतीवर निस्सीम प्रेम करणारा सच्चा माणूस काय म्हणतो हे वाचायलाच पाहिजे.

या कवितेची, कवितासंग्रहाची व गंगाधर मुटेंच्या काव्याची काही ठळक वैशिष्ट्ये!

भाषा - हा खराखुरा सावजी तडका आहे. भाषा जणू काळ्या मसाल्याप्रमाणे जिभेला 'टक्क' करायला लावते. इकडे पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडच्या गृहिणी बॅकेतून व्ही आर एस घेऊन नटून थटून काव्यसंमेलनाला लगबगीत इकडे तिकडे वावरून मराठी कवितेची जबाबदारी आपल्या शिरावर असल्याचे भासवतात त्यांना 'औषध' म्हणून रानमेवा वाचायला द्यायला हवा.

काय रं शाम्या इथंतिथं झ्यामल - झ्यामल करतोस
बैन तोंडाले खरुज अन मोंढ्याले खाजवतोस

                     आता 'मोंढा' म्हणजे काय हे त्यांनी खाली लिहीलेलं असतं! पण बैन, झ्यामल झ्यामल हे काही समजत नाही. पण गंमत अशी की 'समजत नाही' म्हणतानाच समजते की तो जो कोण शाम्या आहे तो नुसताच टिमकी वाजवतोय आणि जिथे उपाय करायला हवेत त्याऐवजी तिसरीचकडे करतोय! हे शासनाच्या अनेक योजनांना लागूही होते. मग आपल्याला 'झ्यामल - झ्यामल' बाबत काही प्रॉब्लेम उरत नाही. उलट 'झ्यामल - झ्यामल' हा शब्दप्रयोग आपल्याला आवडतोच!

                    जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे - ही अशीच एक ओळ! हा 'टगरबगर' शब्द त्याच्या ध्वनीवरून आपल्याला 'टुकुर टुकुर' असा अर्थ सांगून जातोच! पण टुकुटुकु किंवा टुकुर टुकुर या शब्दांऐवजी टगरबगर हा फारच पुरुषी, राकट आणि देहाती स्वरुपाचा वाटतो. आणि त्यामुळेच कविता रांगडी आणि सच्ची होत जाते.

गंगाधर मुटेंची भाषा एकदम आवडते वाचकाला!


आशय - मुटेंच्या कवितेची मूळ ढब मात्र सामाजिकच आहे. तरल प्रेमभावना, अध्यात्म, जीवनातील माधुर्यापासून यांची कविता लांब उभी राहते. तिला काळजी असते शेतकर्‍याचे काय होणार, समाजाचे काय होणार!

           आजकालच्या मुली कुणी नाही हे पाहून झाडामागे मित्राबरोबर दात 'किसत' बसतात यातील 'किसत' या शब्दाची आपल्याला गंमत वाटत असतानाच नकळत हेही कळून जाते की गंगाधर मुटेंना ही संस्कृतीची अवनती वाटते.

             त्यांचा आशय हाणामारी करत अंगावर येत नाही, तो आक्रोशही करत नाही, कुणाच्या मयतीला आल्याप्रमाणे टाहो किंवा हंबरडे फोडत नाही, सच्चेपणाचे 'पोझिंग' म्हणून रंजीत शब्दांचा आसराही घेत नाही. त्यांच्या कवितेचा आशय मिश्कीलपणे समाजावर आणि काही प्रमाणात शोषणावर भाष्य करून जातो.
  
भरजरी शालू जुनाट झाले
फेकुनी द्या त्या नववारी
कम्फर्टिबल त्या मस्त बिकिन्या
हव्या कशाला मग सलवारी?
* * *
जर का असती देवाची इच्छा
जन्मलो नसतो नेसून कपडे?
स्वस्त बिकिनी मस्त बिकिनी
अभय वापरा घरोघरी
* * *
पुजारी पुसे एकमेकास आता
नटी कोणती आज नावाजलेली

             अशा ओळी वाचकाच्या मनात आधी उतरतात, स्थान निर्माण करतात आणि मग हळूच सांगतात.. 'विनोदात गुंडाळलेली सच्चाई आहे मी'!

            मात्र काहीवेळा मुटेंची कविता हेलावणारी असू शकते. अशा अनेक कविता आहेत. पण उदाहरण म्हणून धकव रं श्यामराव या कवितेतील काही ओळी आणि गंधवार्ता या कविता! गंधवार्तेतील या ओळी पहा..

दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचीत पडलीय
हृदय फाटता धरणीवर

बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता धरता
नाही जराशी त्याला
कसलीच गंधवार्ता

मुटेंची कविता अनेकदा गझलेसारखा आशयही आणते.
हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना
* * *


शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना

                     मात्र त्यांना 'गझल' अजून तरी जमलेली नाही असे मला स्पष्टपणे वाटते. पण अर्थातच, गझलेचे तंत्र किंवा त्याचे अवडंबर म्हणजे गझल नव्हे तर आशय हेच गझलियतचे सर्वमान्य लक्षण आहे. त्या दृष्टीने मुटेंच्या काव्यात मनाला स्पर्शणारा आशय अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे गझलेवर पकड आली काय, नाही काय त्याने कुणालाच फरक पडू नये.

                      मुटेंनी पाऊस, देव यांच्या प्रार्थना स्वरुपी कविता मात्र यात समाविष्ट करायला नको होत्या असे मला वाटते. कारण अशा कवितांमुळे अडखळल्यासारखे होते मधेच व त्या कविताही तितक्याश्या 'मला' भावल्या नाहीत.

                मुटेंच्या कवितेचा आशय साध्यासुध्या जीवनशैलीचीच लक्षणे दाखवतो. त्यात 'पोझिंग' नाही, काव्य 'इम्प्रेसिव्ह' करण्याचा आटापिटा नाही. 'जे आहे ते असे आहे' असा रोखठोक, रांगडा व काहीसा ग्रामीण बाज असलेला आशय आहे.

तंत्र - हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य नाही. मुटेंनी तंत्रासाठी आटापिटाही केलेला दिसत नाही किंवा अगदीच गद्य काव्य आहे असेही नाही. मुख्य म्हणजे त्यात 'तंत्र' हा हेतू कुठेही नाही. कविताच बोलक्या असल्यामुळे बांधणीकडे लक्ष जातही नाही. बहुधा पहिलाच काव्यसंग्रह असावा कारण त्यांनी नागपुरी तडका, गझल असे विभाग केलेले आहेत. यामुळे काही प्रमाणात रसभंग झाला, निदान माझा! पण त्या त्या विभागात गेल्यावर ती ती शैली भावली हेही खरे! अर्थात, इतर वाचकांचा रसभंग होईल असे नाही. तसेच, हे विभाग नाही करायचे तर काय करायचे असा उपायही माझ्याकडे नाही.

              रानमेवा हे पुस्तक देखणेही आहे. मुखपृष्ठ नयनमनोहर आहे. मी इतरांनी दिलेले अभिप्राय किंवा मुटेंचे स्वतःचे मनोगत वाचलेले नाही. कॅम्पस प्रकाशनचे हे पुस्तक ६० रुपयांना आहे.

             पुस्तक हातात घेतल्यावर रसिकाचे मन गुंतेल इतपत रंजकता प्रत्येक साहित्यात असायलाच हवी असे माझे आवडते मत आहे. रानमेवामध्ये मन गुंतते. माझ्याकडे या घडीला नव्या, होऊ घातलेल्या, होऊ पाहणार्‍या, गाजलेल्या, पडलेल्या, सुमार, बेसुमार वगैरे अशा किमान शंभर कवींचे काव्यसंग्रह आहेत. त्यातच हे पुस्तक आपोआप गेलेही असते कारण हल्ली कवितासंग्रहाची भीती वाटते हे सत्य सर्वांना माहीत आहेच.

पण रानमेवा मात्र त्या धुळीत पडणार नाही.

गंगाधर मुटेंमधील सच्चेपणाला शुभेच्छा!

धन्यवाद!

                                                         भुषण कटककर 'बेफिकीर'
                                                           जी ४०१,वृंदावन हाईटस, 
                                                       वृंदावन हाऊसिंग कॉम्प्लेक्स, 
                                                गुरू गणेशनगर समोर, कोथरुड, पुणे-२९
.................................................................................
................................................................................

0 प्रतिसाद:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं