Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Apr 30, 2011

आईये नेता बने.

चला नेता बनुया….!

                 मला कोणी जर “उद्योग-व्यवसाय” कोणता करावा असा प्रश्न विचारला तर मी बिनदिक्कतपणे आमच्यासारखे राजकारणात या असे ठामपणे उत्तर देत असतो.  आणि का देवू नये? राजकारणात घुसून नेता बनण्याएवढा सहज सोपा बिनभांडवली धंदा दुसरा कोणता असेल तर या भारतवर्षातील कोणत्याही मनुष्यप्राण्याने मला सप्रमाण सिद्ध करून दाखवावे. कोणी सप्रमाण सिद्ध करून दाखवल्यास मी त्यांची जाहीरपणे वांगेतुला किंवा कांदेतुला करून त्यांचा यथोचित सत्कार करायला केव्हाही तयार आहे.
                मी “राजकारणात या” असा सल्ला देतो त्यामागे ठोस कारणे आहेत. अन्य कोणताही व्यवसाय करायचा म्हटले की भांडवल लागते, कला-कौशल्य लागते, मोक्याच्या ठीकाणी जागा लागते, नोकरी करायची तर तत्सम शिक्षण लागते, डोनेशनसाठी पैसा लागतो.शेती करायची तर जमीनजुमला लागते, कष्ट उपसायची तयारी लागते. वगैरे-वगैरे……..
                 आमच्या व्यवसायात उलट आहे. इथे काय लागते यापेक्षा काय नको हीच यादी फ़ार मोठ्ठी लांबलचक असते. अगदी मारूतीच्या शेपटीपेक्षाही लांब. 
पण आपण मात्र येथे किमान काय लागते फ़क्त याचीच यादी करू.

१)  पाच मीटर खादीचे कापड खरेदी करण्याएवढे एवढे भांडवल पुरेसे ठरते. (ती सुद्धा विकत न घेता अवांतर मार्गाने हडपून मिळविली असेल तर फ़ारच उत्तम.) पण तेवढेही भांडवल नसेल तरी नाउमेद होण्याचे कारण नाही. आजकाल बिनाखादीने सुद्धा हा व्यवसाय करता येतो. फ़क्त यशाचा मार्ग जरा लांब पडतो एवढेच.
२) कातडी किमान गेंड्यासारखी तरी जाड असावी.
३) आंधळ्या भिकार्‍याच्या ताटात एक रुपया टाकल्याचा आभास निर्माण करुन चार आणे टाकून बारा आणे उचलून घेता यायला हवे.
४) प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाता यायला हवे.
५) निगरगट्टपणा असावा.
६) सरड्यासारखे रंग बदलता यायला हवेत.
७) जेथे तेथे आपलेच घोडे दामटता यायला हवे. 
वगैरे वगैरे….

          आता मुख्य प्रश्न राहिला शैक्षणिक पात्रतेचा. 
 शैक्षणिक पात्रता काय असावी हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो.
मी आणि माझा जिवलग मित्र श्याम, आम्ही दोघेही मॅट्रीकमध्ये असतानाची गोष्ट. पहिल्याच वार्षीक परिक्षेत श्याम मेरिट मध्ये पास झाला आणि पुढील शिक्षणासाठी शहरात निघून गेला.
मी मात्र मराठी हा एकमेव विषय कसाबसा काढू शकलो.पुढे अनेक वर्ष मी आणि मॅट्रीक दोघेही कट्टर जिवलग मित्र बनलो. आम्हाला एकामेकावाचून करमेचना. मग मी चक्क पंचवार्षिक योजना राबविली मॅट्रीक मध्ये. पाच वर्षानी मात्र कसाबसा पास झालो एकदाचा.
                          वडीलांनी माझ्यातल्या गुणवत्तेविषयी निदान करून पुढारी/नेता बनण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले “तू व्यापारी बनेगा ना किसान बनेगा, पुढारी की संतान है तू इस देशका भविष्य बनेगा.”
मला त्यांचा सल्ला आवडला आणि घुसलो एकदाचा राजकारणात. चढत्या क्रमाने घवघवीत यश मिळत गेले. शिक्षणसंस्था काढल्यात, सहकारी कारखाने काढलेत.
                         आता पाच वर्षाच्या काळात माझा मानमरातब खूपच वाढत गेला. आता मला कोणी रावसाहेब म्हणतात, कोणी बापुसाहेब म्हणतात तर कोणी दादासाहेब.
आणि हो मुख्य गोष्ट राहूनच गेली.
                    श्याम आला होता. हातात एम. एससी,बी.एड,पी.एच.डी अशा पदव्यांची पुंगळी घेऊन माझ्या शाळेत नोकरी मागायला.  म्हटले जागा निघेल तेव्हा रितसर अर्ज कर. सध्या शाळेचे बांधकाम सूरू आहे. खुप खर्चिक काम आहे ते. त्या कामाला निधी लागतो. शाळेतील मुले ही देशाचे भविष्य आहेत.त्यांच्यासाठी सुखसोई उपलब्ध करून देणे माझे परमकर्तव्य आहे त्यासाठी निधी लागतोच. त्याविषयी तू माझ्या पी.ए सोबत बोलून घे. काम कसे रितसर, कायदेशीर व्हायला नको का?
आणि
मुलाखतीच्या दिवशी आला होता श्याम इंटरव्ह्यू द्यायला आणि मी होतो इंटरव्ह्यू घ्यायला …….!
.                                                                                                                                     
                                                                           गंगाधर मुटे.
//////////////////////////////////////////////////////////
(लेख काल्पनिकः लेखातील व्यक्तीरेखेशी कुणाची जीवनरेखा जुळतांना दिसली तर तो निव्वळ योगायोग मानावा)

0 प्रतिसाद:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं