जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)
कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, "कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." एखादा निबंध, कविता किंवा एखादी म्हण वाचत जावे तसेच हे कलमही वाचले तर या कलमात गैर काय आहे? असा साहजिकच कुणालाही प्रश्न पडतो. शिवाय रुग्णाला त्याच्या मनाविरुद्ध बळाचा वापर करून जर एखादा मांत्रिक रोखत असेल तर त्याच्यावर कारवाई होणे उचितच आहे, असे वाटून बस्स एवढाच तर अर्थ आहे या एका ओळीच्या कायद्याचा. मग त्यालाही जर कोणी विरोध करत असेल तर तो विरोध करणारा स्वतः:च मांत्रिक असावा, किंवा धर्मवेडा तरी असावा, तेही नसेल तर अंधश्रद्धा बाळगणारा, अनपढ, गवांर, गावंढळ, बुद्धू, बिनडोक वगैरे तरी नक्कीच असावा, असे बर्याच लोकांना वाटायला लागते, आणि नेमकी येथेच फसगत होते.
पण या कलमात "वैद्यकीय उपचार" हा एकमेवच पर्याय दिल्याने ही "सक्ती"च झाली आहे. "वैद्यकीय उपचार" म्हणजे "ज्या व्यक्तीकडे सरकारी अधिकार्याने सही करून शिक्का मारलेले वैद्यकीय सेवा करण्याचे परवानापत्र आहे त्याने केलेले उपचार." असाच अर्थ घ्यावा लागणार. या व्यतिरिक्त अन्य सर्व उपचार मंत्रतंत्र, गंडेदोरे व जादूटोणा या प्रकारातच गणले जाणार. लेखांक-१ मध्ये दिलेले सर्व "पारंपरिक उपचार" देखील दखलपात्र गुन्हाच ठरणार, कारण या कलमाला "वैद्यकीय उपचार" किंवा "मंत्रतंत्र, गंडेदोरे" हे दोनच प्रकार मान्य आहेत. मग कायद्याशी पंगा घेऊन, वेळ पडल्यास सात वर्ष शिक्षा भोगायची तयारी ठेवून दुसर्याचा जीव वाचवण्यासाठी पारंपरिक उपचार कोण आणि कशाला करेल बरे? म्हणजे आता हे सर्व पारंपरिक उपचार पद्धती थांबणार आणि कालांतराने नष्ट होणार. होत असेल तर होऊ द्या, आपल्या बापाचे काय जाते? असे म्हणून दुर्लक्षही करता आले असते पण; सरकार कायद्यान्वये ज्या वैद्यकीय उपचार पद्धतीची जनतेवर सक्ती करायला निघाले त्या वैद्यकशास्त्रात तरी साप, विंचू आदि चावल्यास "रामबाण उपचार" आहेत काय? दुर्दैवाने याचेही उत्तर नाही असेच आहे. मग सक्ती लादण्याचे कारणच काय? तुम्ही देत असलेला पर्याय जर "पर्फेक्ट" नसेल तर अन्य पर्यायांच्या निवडीचे स्वातंत्र्य का हिरावून घेत आहात?
सध्या प्रचलित उपचार पद्धती मध्ये ग्रामीण जीवनाच्या आवाक्यात असलेल्या अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या प्रमुख तीन उपचार पद्धती आहे. त्यातही लोकप्रियतेत सिंहाचा वाटा एकट्या अॅलोपॅथीचा आहे. वैद्यकशास्त्र अत्यंत प्रगत, अत्याधुनिक आणि बहुतांश रोगांच्या बाबतीत वैद्यकशास्त्राला पर्यायच नाही. पण काही रोग असेही आहेत की, अन्य उपचार पद्धतींच्या तुलनेने वैद्यकशास्त्र पिछाडीवर आहे. खुद्द वैद्यकशास्त्रालाही ते मान्य आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी मान्य केले आहे. उदा.
१) सर्दीपडसा आणि श्वसनाशी संबंधीत रोगांवर वैद्यकशास्त्रापेक्षा प्राणायामाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.
२) स्पॉन्डिलाइटिस सारख्या विकारावर वैद्यकशास्त्रापेक्षा योगाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते. असे म्हणतात.
३) काविळसारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.
या संदर्भात एक उदाहरण देतो, हे माहितीस्तव उदाहरण आहे, समर्थन नाही. माझ्या एका गोपाल नावाच्या मित्राला काही वर्षापूर्वी कावीळ झाला होता. त्याने सुरुवातीचे काही दिवस खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. पण कावीळ आणखी वाढतच होता. खाजगी डॉक्टरच्या सल्ल्यावरून तो थेट नागपूर मेडिकलला दाखल झाला. १५ दिवस लोटले खर्चही खूप झाला पण आराम नव्हता. डोळे, नखे वगैरे पिवळे आले होते. आरामच होईना म्हणून त्यांनी स्वमर्जीने इस्पितळ सोडले आणि एका घरगुती सेवाभावी नि:शुल्क औषध देणार्या ग्रामीण व्यक्तीकडून औषध घेतले. आराम मिळाला.
ग्रामीण भागात अनेक लोकांना अनेक रोगांवर खात्रीने दुरुस्त होऊ शकेल अशी वनस्पती औषधे माहीत आहेत, याचा अनुभव मी बर्याचदा घेतला आहे. दु:खद बाब एवढीच की, आपले महत्त्व कायम राहावे म्हणून ही मंडळी अशी माहिती स्वतः:जवळच जपून ठेवतात. इतरांना अजिबात सांगत नाही. त्यामुळे या औषधोपचाराची चिकित्सा आणि संशोधन होत नाही. माझ्या गावावरून ८५ किलोमीटर अंतरावरील एका गावात एक सेवाभावी महिला आहे. ती कावीळ रोगावर औषध देते. ३० वर्ष झाले, कावीळ रोगाची साथ वगैरे आली की तिच्या घरासमोर रांगा लागतात. तिच्याकडील औषध घेणारे आजपर्यंत सर्वच दुरुस्त झालेत अशी चर्चा आहे. ते खरे की खोटे हे मला माहीत नाही पण हा औषधोपचार करताना कुठल्या वनस्पती वापरल्या जातात हा माझा नेहमीचाच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. हा लेखांक लिहिण्याच्या निमित्ताने या वेळेस मात्र मनावर घेतले आणि तिच्या गावात जाऊन तिची भेट घेतली. कावीळचे औषध ती कसे तयार करते, हे तिने मला सांगावे, मी त्यावर अधिक प्रयोग आणि संशोधन करून लोकांना फुकट वितरित करीन त्यामुळे लोकांचे भले होईल. तुला लोक आशीर्वाद देईल. तुला पुण्य लाभेल अशा तर्हेने खूप समजावले, पण ती राजी होत नव्हती. दोन दिवस सतत पाठपुरावा केल्याने कदाचित तिचे मन द्रवले असेल. शेवटी एकदाची ती राजी झाली.
तिने सांगितलेली औषधी तयार करण्याची पद्धत अशी.
शनिवार दिवशी सकाळी तळहाताच्या आकाराचे एरंडी या वनस्पतीची अडीच पाने घ्यावीत. त्यात १५ ग्रॅम मिरे घालावे. त्यात १/३ ग्लास पाणी टाकून ठेचावे. तयार झालेला रस उपाशी पोटी रोग्यास पिण्यास द्यावा. छोटासा गुळाचा तुकडा खायला द्यावा. नंतर दूध, भात आणि गूळ खायला द्यावा. गरज भासल्यास दुसर्या शनिवारी पुन्हा एक मात्रा द्यावी.
पथ्य - आंबट आणि कच्चे तेल अजिबात खायचे नाही.
हे औषध गुणकारी आहे किंवा नाही, याविषयी मी काही सांगू शकत नाही. केवळ मी मिळविलेली माहिती शेअर करणे, हा उद्देश आहे. भविष्यात कुणालाच कावीळ होऊ नये, ही सदिच्छा, पण झालाच तर थेट डॉक्टरकडेच जावे.
३) वात, लकवा, अर्धांगवायू सारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, हा माझा अनुभव आहे.
दहा वर्षापूर्वी माझ्या आईला वात, लकवा झाला होता, अॅलोपॅथीचे खूप इलाज केले पण आजार दिवसेंदिवस वाढतच गेला. तालुक्याच्या इस्पितळात भरती केले. त्यांनी १०-१२ दिवसाच्या उपचारानंतर सेवाग्राम मेडिकलला रेफ़र केले. तिथे भरती केले पण प्रकृती सुधारणे ऐवजी बिकटच होत गेली. अर्धांगवायूचा झटका आला. काही दिवसानंतर तिला २० पैकी एकही बोट हालवता येत नव्हते. हात-पाय तर हालण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व शर्थीचे प्रयत्न झाल्यानंतर तिथून नागपूरला रेफ़र करण्यात आले. तिथे भरती केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, बघा, तुमचा आग्रह असेल तर भरती करून घेतो, आपण प्रयत्न करू पण काही उपयोग होईल असे वाटत नाही. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून १६ किलोमीटरवर एक तिगाव आहे. तेथे एक हकीम आहे, मग त्याच्याकडे नेले. त्याने फक्त २०० रुपयात काही जडीबुटीची भुकटी आणि तेल दिले. २४ तासातच आराम दिसायला लागला. तीन महिन्यात आई तंदुरुस्त झाली, एवढी की तिला घेऊन वैष्णोदेवीला गेलो. १६ किलोमीटर डोंगर चढणे व १६ किलोमीटर डोंगर उतरणे आणि तेही वयाच्या ७० व्या वर्षी! लीलया आव्हान पेलले माझ्या आईने मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर. आजही ती स्वस्थ आहे.
वैष्णोदेवीला जाण्यामागे भक्तिभावाने देवीदर्शन घेणे असा आईचा उद्देश तर आईला यानिमित्ताने शारिरीक व्यायाम देणे असा माझा उद्देश होता.
वैष्णोदेवीला जाण्यामागे भक्तिभावाने देवीदर्शन घेणे असा आईचा उद्देश तर आईला यानिमित्ताने शारिरीक व्यायाम देणे असा माझा उद्देश होता.
हे लिहिण्यामागे वैद्यकशास्त्राला कमी लेखण्याचा किंवा आव्हान देण्याचा प्रयत्न नाही पण वैद्यकीय उपचाराव्यतिरिक्त अन्य तर्हेने उपचार घेणे म्हणजे अंधश्रद्धा असते, औषध देणारा म्हणजे भोंदूच असतो, असे वगैरे काही नसते. १७ वर्ग शिकणे, १८ पुस्तके वाचणे म्हणजेच ज्ञान असते, उरलेले सगळे अज्ञान असते, असेही नसते, याचेही भान असणे गरजेचे असते.
- गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------
(.....अपूर्ण....)
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.