मराठी भाषा दिन : दोन संकल्प
आज २७ फेब्रुवारी आणि महाशिवरात्री सुद्धा आजच. ५२ वर्षापूर्वी महाशिवरात्री अशीच नेमकी २७ फेब्रुवारी या दिवशी आली होती आणि नेमका हाच शुभमुहूर्त निवडून अस्मादिकांनी या पृथ्वीतलावर आपले ’पुनरागमन’ केले. या दिवसाला वाढदिवस का म्हटले जाते हे एक गूढ कोडेच आहे आणि हा दिवस साजरा करावा हे आणखी एक जटिल कोडे. या दिवशी ’वाढ’ कशात होते हेच कळेनासं झालंय. वयमानात वाढ होते मात्र जगण्याचा काळ कमी होत जातो. यात हर्षोल्लास करण्यासारखे काय आहे?
वय वाढत जाताना आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर ’वाढ’ या शब्दाचे संदर्भ देखील बदलत जातात. बालपणी वाढत्या वयासोबत शारीरिक बल आणि बुद्धी वाढत जाते. तरुणपणी वाढत्या वयासोबत चैतन्य आणि विवेकशीलता वाढत जाते मात्र एकदा का तारुण्य ओहोटीला लागलं की मग वाढत्या वयासोबत ’वाढ’ शब्दाचे संदर्भही उलटे पडायला लागतात. मानसन्मान वाढण्याची शक्यता असते; केवळ शक्यता असते खात्री नाहीच. मात्र वाढत्या वयासोबत डोळ्याच्या नंबरमध्ये सततची वाढ, प्राकृतिक विकारामध्ये निरंतर वाढ हे मात्र हमखास असते आणि तरीही आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत ’वाढदिवस’ साजरा करण्याचा आपला उत्साह मात्र यत्किंचितही कमी होत नाही. हे मानवी स्वभावातील एक रहस्यच समजावे लागेल.
आजचा दिवस "मराठी भाषा दिवस" "जागतिक मराठी भाषा दिवस" "मराठी भाषा दिन" म्हणूनही जगभरातील मराठी भाषिकांकडून साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेऊन मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू केली. या दिवसाचे औचित्य साधून आपणही काहीतरी संकल्प करायला हवा. मी सुद्धा मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी माझ्यापरीने दोन प्रकल्प हाती घेत आहे.
१) सुमारे दीड वर्षापूर्वी म्हणजे २२/०७/२०१२ रोजी मी www.sharadjoshi.in अर्थात "योद्धा शेतकरी" या एका महत्त्वाकांक्षी संकेतस्थळाच्या निर्माणाचा एक महाप्रकल्प हाती घेतला. हे संकेतस्थळ म्हणजे शरद जोशी आणि शेतकरी संघटनेविषयी परिपूर्ण माहितीने ओतप्रोत भरलेला अनमोल खजिना व्हायला हवा. शरद जोशींच्या समग्र लेखनासहित अधिवेशने, मेळावे, रस्ता रोको अथवा रेल्वेरोको दरम्यान वेगवेगळ्या आंदोलनस्थळी घडलेल्या घडामोडीविषयीचे शक्यतो फोटोसहित सर्व वृत्तांत येथे उपलब्ध व्हायला हवेत. त्यादृष्टीने कार्य सुरू केले पण हे संकेतस्थळ परिपूर्ण करण्याचे कार्य वाटते इतके नक्कीच सहजसाध्य नसल्याने अजूनही पूर्णत्वास पोचलेले नाही. अजून खूप काम बाकी आहे. दीड वर्षात झालेल्या कामाबद्दल मी स्वतःही समाधानी नाही. पुढील एक वर्षात हे कार्य पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे. त्यासाठी येत्या काही काळात एक "राज्यव्यापी दौरा" करण्याचे निश्चित केले आहे.
२) आजवर मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलन झालेत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. या दिशेने पाऊल टाकण्याचा मानस आहे. हे कार्य किती कठीण आहे याची जाणीव असली तरी हे कार्य अशक्यप्राय नाही याचीही खात्री आहे. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची पायाभरणी करून एका वर्षाच्या आत अ.भा. स्तरावर मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करायचे ठरवले आहे आणि त्यानंतर दरवर्षी मराठी शेतकरी साहित्य संमेलन भरवणे शक्य व्हावे म्हणून संघटनात्मक बांधणी करायचे ठरवले आहे.
शामियान्याच्या भव्यदिव्यतेपेक्षा चर्चात्मक दर्जाची "भव्यदिव्यता" जर प्रकटीत करता आली तर ते कदाचित अधिक प्रभावकारी शेतकरी साहित्य संमेलन ठरू शकेल. या कामात मला मार्गदर्शक आणि सहकार्यांची प्रचंड गरज भासेल. या निमित्ताने मी आपल्यासमोर मार्गदर्शन आणि सहकाराची याचना करतो आहे. जाणकारांनी आणि स्वेच्छूक मंडळींनी स्वतःहून समोर यावे. आपण लवकरच यासंदर्भात चर्चा सुरू करू. संघटनात्मक प्रारूप ठरवू, नियमावली बनवू, संस्था नोंदणीसाठी दस्तावेज तयार करू आणि आकारास आणू अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ.
सहकार्याच्या अपेक्षेत...!
आपला नम्र
- गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------------------------------------
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.