गेल्या ४-५ दिवसापासून पावसाची कधी रिपरिप तर कधी सततधार सुरू आहे. हवा’मान’ खात्याचे सारे अंदाज खोटे ठरवीत पावसाने हवा'मान' खात्याला 'मान' खाली घालावयास भाग पाडलेले आहे. तशीही हवा’मान’ खात्याची ’मान’ फ़क्त ताप’मान’ वर्तवण्यापुरतीच ताठ असते. पर्जन्य’मान’ वर्तवताना त्यांचे अनु’मान’ नेहमीच ’मान’ पायाखाली दुमडून उताणे झोपत असते. त्यामुळे शेतकर्यांनी स्वत:च्या द’मानं’च घेतलेलं बरं! हवा’मान’ खात्यावर विसंबून आणि आपली ’मान’ हवा’मान’ खात्याच्या मांडीवर ठेवून शेतकर्यांनी आपला वर्त’मान’ बिघडवून घेण्यात काहीही अर्थ दिसत नाही.
बाहेर पाऊस पडत आहे आणि मी आतमध्ये बसून पेपर चाळत आहे. ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ या संबंधित एकही बातमी दिसत नाही. कुत्री केकाटण्याचे जसे उत्तरा नक्षत्र असते तसेच ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ सारखे शब्द उच्चारून केकाटणार्यांचे रोहिणी नक्षत्र असते. कधी-कधी पावसाचे आगमन लांबलेच तर ’एल-निनो’ ’वृक्षतोड’ च्या नावाने केकाटणेही थोडेफ़ार लांबत असते. मात्र एकदाचा पाऊस कोसळला की गाढवाच्या सिंगाप्रमाणे हे केकाटणारेही प्रसिद्धीमाध्यमातून गायब होऊन जातात.
पावसाचे आगमन लांबले तर त्याला पर्यायी काही उपाय सांगता आलेत तर ते सांगणे उपयोगाचे ठरू शकते पण हे तज्ज्ञ पर्याय सांगण्याऐवजी पाऊस लांबण्याची कारणमिमांसा व्यक्त करण्यात धन्यता मानतात. ज्याचा शेतीला आणि शेतकर्याला कवडीचाही उपयोग नसतो.
पाऊस किती पडला यापेक्षा तो कसा पडला, यावर शेतीचे पीकपाणी अवलंबून असते, हे साधेसुधे कोडे देखील आमच्या तज्ज्ञांना अजूनपर्यंत उमगलेले नाहीये. यांची भाषा अजूनही पावसाची वार्षिक सरासरी याभवतीच पिंगा घालत आहे. एखाद्या वर्षी पावसाची सरासरी काय होती, ती १००% होती, १५०% होती कि ५०% टक्केच होती यावर पीकपाण्याची-उत्पादनाची शक्यता ठरत नाही. एखादेवर्षी जर २०% किंवा ३०% च पाऊस पडला; पण तो जर थोडा-थोडा आणि नियमित कालावधीत पडत राहिला तरी कोरडवाहू शेतीमध्ये भरघोस उत्पादन येऊ शकते. याऊलट एखादेवर्षी १००% सरासरी पाऊस पडला पण कमी दिवसात/कमी कालावधीत मुसळधार पडला तर कोरडा किंवा ओला दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण होऊन शेतीच्या उत्पादनात प्रचंड घट येऊ शकते आणि नेमके एवढे साधे गमक सुद्धा अजूनपर्यंत हवामान तज्ज्ञांना गवसायचे बाकीच आहे. मुलभूत ज्ञानाचा पायाच जर अव्यवहार्यतेवर आधारला असेल तर कसले बोडक्याचे संशोधन करणार? अशा संशोधनाची आणि सल्याची उपयोगीता तरी काय असणार आहे?
आणि म्हणूनचहवामान तज्ज्ञ शेतीच्या दृष्टीने शोकेसचे जिन्नस झाले आहे, असे वाक्य उच्चारले तर ते चुकीचे ठरणार नाही.
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.