Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Mar 31, 2010

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

                   आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार शिबिरे आयोजित करावी, असा वारंवार सल्ला दिला जातो त्या अनुषंगाने खालील बाबींचा विचारवंताकडून खुलासा होणे आवश्यक आहे.

१) जेंव्हा जेंव्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघतो तेंव्हा तेंव्हा शेतकरी मनोदुर्बलता किंवा मनोरुग्णतेमुळे आत्महत्या करतो असेच निदान केले जाते. आणि त्याच अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या जातात. सहाजीकच, निदान जर चुकीचे असेल तर सुचविलेले उपाय योग्य कसे असणार? (वाचा - शेतकरी आत्महत्यावर तज्ज्ञांची मुक्ताफळे - )

२) आर्ट ऑफ लिविंग किंवा मानसोपचार शिबिरे आयोजित करायला हरकत नाही पण शेतकर्‍यांचे मनोबळ वाढावे यासाठी काय सांगणार? प्रबोधनाचे स्वरूप काय असणार?
उदा. शेतकरी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करत असेल तर त्याचे मनोबळ वाढविण्यासाठी

अ) कर्ज परत करण्यासाठी चोरी करा, दरोडे घाला आणि पैसे मिळवून कर्ज परत करा असे सांगणार? (शेतीच्या उत्पन्नातून/बचतीतून त्याला कर्ज फ़ेड करता आली नाही हे गृहीत धरावेच लागेल.)

आ) मरण पत्करण्यापेक्षा कर्ज बुडवायला शिकण्याचा सल्ला देणार?

इ) आर्थीक हलाखीमुळे मुलीचे लग्न करता येत नसेल तर टेंशन घेऊ नकोस, ती बिनालग्नाची राहीली तरी चालेल पण तू जगलाच पाहीजे असे सांगणार?

ई) सावकाराने कर्जापायी भरचौकात अपमान केला तरी तू मनाला लावून घेऊ नकोस, संवेदनाक्षम, हळवेपणाने जगण्यापेक्षा कोडगेपणाने वाग असा सल्ला देणार?

            मानसोपचार शिबिरे घेणार म्हणजे त्याला काय समजावणार याचा उलगडा व्हायला हवा.
रोगाचे निदानच चुकीचे घेवून एखादा मानसोपचारतज्ज्ञ उपचार करणार असेल तर अपेक्षित परीणाम कसा साधला जाईल?
हे प्रश्न अनुत्तरीत राहातात.
...............................................................
या अनुषंगाने झालेली एक प्रश्न-उत्तरांची देवानघेवान.

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर पुष्कळ चर्वितचर्वण  झाले आहे.
(आणि त्या सर्वांच्या मते शेतकरी मुर्ख, मनोरुग्न व अज्ञानी आहे.)

 कित्येकदा तर मूळ विषयाचे गांभीर्य दडपून टाकून, केवळ सरकारवर तोफा डागण्यासाठी हा विषय 'हायजॅक' केला गेला आहे.
(हे 'हायजॅक' करणारे मात्र नक्कीच मनोरुग्न असणार. पाठवा त्यांना मेंटल हॉस्पीटल मध्ये. माझे सक्रिय समर्थन.)

मुंबईतल्या किंवा कुठल्याही झोपडपट्टीमधले, उकिरड्यातले अन्न वेचून खाणारे, रेल्वे रुळांवर शौचास जावे लागत असलेले, दिवसोंदिवस आंघोळ करू न शकणारे लोक आत्महत्या का करीत नाहीत?
(ते सात पिढ्यांत फेडता येणार नाही एवढे कर्जबाजारी नाहीत म्हणून.)

त्यांच्यामध्ये जगण्याची कोणती प्रेरणा असते?
(सर्व सजीवांमध्ये जगण्याची  प्रेरणा सारखीच असते.)

 किंवा, उलटपक्षी, कॅट सारख्या परीक्षांतील अथवा कुठल्याही परीक्षेतील अपयशाला घाबरणारे, आय. आय. टी सारख्या नामवंत शिक्षणसंस्थांतून शिकणारे लोक आत्महत्या का करतात? त्यांच्यामध्ये कोणती प्रेरणा कमी पडते? महत्त्वाच्या परीक्षांच्या निकालांच्या आगेमागे आत्महत्यांची लाट का येते?  रोज रात्री नवर्‍याच्या लाथाबुक्क्यांचा मार खाऊन, प्रसंगी डाग, चटके सोसून पुन्हा सकाळी निमूटपणे सर्व अपमान व सर्वांसमोर झालेली शोभा विसरून(सूडाची भावना न ठेवता) त्याच्यासाठी स्वयंपाक बनवणारी स्त्री कोणत्या अंतःप्रेरणेने जगत असते? त्यातल्या काही आत्महत्या करतातही, पण एकंदर अत्याचाराच्या प्रमाणात त्या नगण्य असतात.
(आत्महत्येस एवढेच कारण पुरेसे नाही.)

शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा देशातल्या एकूण आत्महत्यांमधला एक छोटा भाग आहे.
(किती शेतकर्‍यांनी पुन्हा आत्महत्या कराव्यात म्हणजे आंकडा शोभून दिसेल ????????.
सबंध देशात फक्त एका शेतकर्‍याने जरी आत्महत्या केली तरी एखाद्याला ते लाजीरवाने वाटेल. याउलट आत्महत्या करता करता एखादी पिढी जरी उध्वस्त झाली तरी एखाद्याला त्याचे काहीच वाटणार नाही. हे समिकरण शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या संख्येवर नव्हे तर त्या "एखाद्याची" मानसिक रचना/ठेवन कशी आहे यावर अवलंबून आहे. )

 त्यातूनही, सर्वच कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात का?  
("सर्वच कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आता सामुहीक आत्महत्या करून  तसे सिद्ध करून दाखवावे, तसे न केल्यास आत्महत्या करणार्‍याला आम्ही मनोरूग्न म्हणत राहू, इतर कुठल्याही कसोट्यांवर पडताळा करण्याची गरज नाही" असा याचा अर्थ घ्यायचा काय? )

जर ह्याचे उत्तर 'नाही' असे असेल, तर आत्महत्यांमागे मनोदुर्बलता हे कारण असण्याची शक्यता वाढते.

(मग सरकार झोपी गेले काय? अशा मनोरूग्न शेतकर्‍यांची तातडीने राज्यवार यादी बनवा आणि प्रसिद्दीला द्या. म्हणजे अशा मनोरूग्न शेतकर्‍यापासून इतर शेतकरी बांधव सुरक्षीत अंतर ठेवून चालतील.)

                                                        गंगाधर मुटे
..........................................................................

Mar 29, 2010

गाय,वाघ आणि स्त्री

गाय,वाघ आणि स्त्री

बाईत आणि गायीत मला नेहमीच एक साम्य आढळत आले आहे.
दोघीही शारिरीक अंगाने अबलाच.स्वबळावर स्वसंरक्षणास असमर्थ.
निसर्गाने सर्व सजीवांना नैसर्गीक मृत्यू येईपर्यंत स्वबळावर स्वसंरक्षण करून प्राण वाचविण्यासाठी काही जन्मजात काही 'हत्यारे आणि ढाली' दिल्या आहेत.
उदा :- उंदराला बिळात घुसता येते,मांजरीला बिळात घुसता येत नाही त्यामुळे उंदराचे रक्षण होते.
याच अर्थाने मांजरीला भिंतीवर चढता येते,कुत्र्याला भिंतीवर नाही चढता येत.
या झाल्या उंदिर आणि मांजरीच्या स्वसंरक्षणाच्या ढाली.
याच प्रमाणे आपल्या दात आणि नखांचा वापर करुन कौशल्याने अन्नमिळविण्यासाठी उपयोग करणे हे झाले उंदराचे हत्यार.
त्याच प्रमाणे मांजर शिकार मिळविण्यासाठी ज्या ज्या अवयवांचा वापर करते ते झाले मांजरीचे हत्यार.
मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी २-३ उदाहरणे बघु.
हरणाला वाघ-सिंहापेक्षा आणि सशाला त्याच्या शत्रुपेक्षा अधिक वेगवान पळता येते.
माकडाला झाडावर चढता येते. मोराला बचावापुरते उडता येते.
मुद्दा एवढाच की बचावासाठी सजीवाकडे नैसर्गिकरित्या हत्यार/ढाल/कौशल्य यापैकी काहीतरी नक्कीच आहे.
मात्र मानव जात आणि त्याचे बहुतेक पाळीव प्राणी यांचेकडे यापैकी काहीही नाही.
निदान मानवाकडे बुद्धी आणि साधने बनविण्याची कला तरी आहे.
मानवाने बुद्धीचा वापर करुन साधने बनविली आणि त्या साधनांचा हत्यारासारखा उपयोग करुन संपुर्ण सजिव सृष्टीवर हुकुमत मिळविली. हातात साधन नसेल तर मानवाएवढा दुर्बल कोणीच नाही.विनाहत्याराने मनुष्य साध्या मधमाशीसोबत सुद्धा लढु शकत नाही.साधनविरहीत माणसाला, कावळासुद्धा पराजित करु शकेल.
पण गायीचे काय? गाय पुर्णतः संरक्षणासाठी मानवावर अवलंबून.
कल्पना करा.(कल्पना काय फक्त कवींनीच करायच्या ? आणि रसिकांनी फक्त टाळ्या वाजवायच्या ? )
कल्पना करा की जर उद्या मानवाला गाय निरूपयोगाची आणि परवडेनाशी वाटली तर माणूस गायीचा त्याग करणारच. कारण नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मुलभुत मानवी स्वभावच.
गाईचे प्रेम,भुतदया वगैरे दिखावाच. जर तसे नसते तर गाय फक्त शेतकर्‍यांच्याच दारात नसती दिसली.
गाय दिसली असती कलेक्टर, मंत्रालय,राजकिय पक्षांची कार्यालये वगैरे ठीकाणी गाय बांधलेली आढळली असती आणि सकाळी उठून कलेक्टर शेण सावडतांना आणि मुख्यमंत्री दुध काढतांना आढळले असते.
मग नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मुलभुत मानवी स्वभाव असलेल्या माणसाने गायी पाळणे बंद केले तर काय होईल?.. गाईचे काय होईल ?.
वाढत्या यांत्रिकीकरणाने बैलांची गरज संपत चाललेली.
दुधाच्या किंमती आवाक्यात आहे तोपर्यंत ग्राहक दुध पिणार.
यदाकदाचित दुधाचे भाव ५०० रु.प्रतीलीटर झालेत तर निव्वळ गायीच्या प्रेमापोटी दुध खरेदी करणार्‍या ग्राहकांचीसंख्या किती?.
जर अशी स्थिती उद्भवली तर माणुस गाईचा त्याग करणारच.
मग गाईचे काय होईल ? कशी जगेल बिचारी?
जंगलात ती शत्रूपासून स्वसंरक्षण करु शकत नाही कारण गायीला ना बिळात घुसता येत,ना झाडावर चढता येत, ना हवेत उडता येत ना अती वेगाने पळता येत. शत्रुशी दोन हात करायला ना दात ना नखे.ना हत्तीसारखे शक्तीयुक्त सोंड.
शेपटी आणि शिंगांची ताकत व धार उत्क्रांतीच्या प्रवाहात क्षिण झालेली.
मग ती स्वबचाव कशी करेल ?
तिला गरज पडेल एका बलशाली सहकार्‍याची. मग तो सहकारी कोण ?
गायीचे जेवढे शत्रु आहेत त्या सर्वांना पराभुत करुन गायीला जिवदान,अभय देण्याची शक्ती केवळ सिंह, वाघापाशीच. सिंह,वाघाशिवाय गायीचे रक्षण कोणीच करु शकत नाही...................
आणि नेमकी येथेच बंडी उलार होते.
जो गायीचे रक्षण करू शकतो तोही तिचा शत्रूच...
गाय वाघाकडे अभय मागण्यास गेली तर वाघोबा तिला अभय देण्याऐवजी तिच्यामध्ये आपले खाद्य शोधणार.
भुक शमविण्याची वस्तु या नजरेने पाहाणार.
ज्याच्याकडे आश्रयाला जावे तोच काळशत्रू ठरणार.
कारण..
वाघाकडे जे दात आहेत ते गायीला खाण्यासाठीच...
तिचे प्राण वाचवू शकेल,अभय देवु शकेल, असे दात वाघाजवळ आहेतच कूठे ?

”गायीस अभय देण्या,वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या,सूर्यास हात नाही.”
.
..गंगाधर मुटे
....................................................................
तात्पर्यः ज्याच्याकडून रक्षणाची अपेक्षा केली जावु
शकते तोच जर भक्षक ठरणार असेल तर.............
म्हणुन गाय आणि स्त्री या दोघीत या अनुषंगाने
विचार केला तर त्यांच्या व्यथा सारख्याच वाटतात मला.
...................................................................

Mar 28, 2010

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन


आधी काय निर्माण झाले असावे?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्‍हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटून जात असतो.
उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात उत्तर मिळण्याऐवजी नव्याने नवनवे प्रश्नच निर्माण होत जातात.
गुंता सुटण्याऐवजी गुंतागुंत आणखी वाढतच जाते, वैताग येतो. आणि जाऊ दे, काय करायचे आपल्याला असे म्हणून आपण विषय सोडून देत असतो.
.............
प्रश्नांची उकल करणे खरेच कठीण असते?
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असू शकतो?
'आधी कोंबडी की आधी अंडी' या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रीय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळून जाते. कळून चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासून कोंबडी जन्माला आली. गुंतागुंत दूर होते आणि मग लक्षात येते की महाकठीण वाटणारे उत्तर एवढे सोपे होते?
.........................
आज हा विषय चघळण्याचे कारण?
२६ जानेवारी - गणराज्य-प्रजासत्ताकदिन येतोय.
या निमित्ताने देशभर चर्चेला पाय फुटणार. स्वातंत्र्योत्तर काळात
'काय मिळवले काय गमाविले'
'देश जगात महाशक्ती म्हणून उदयास येणार की नाही'.
'देशाला प्रगतिपथावर नेण्यास कोणी किती योगदान दिले'.
त्यासोबतच दबक्या आवाजात का होईना पण हाही एक विषय चर्चिला जाणार.
देशाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
राजा की प्रजा? नेते मंडळी की जनता जनार्दन?
अर्थातच कोंबडी की अंडी ?
नुसतीच चर्चा...... उत्तर नसलेली.
उत्तर शोधायचा प्रामाणिक प्रयत्न न झालेली.
२७ तारीख उजाडली की आमची नित्याची दिनचर्या सुरू.
हे असे रहाटगाडगे...........पुन्हा त्या चर्चेला एक वर्षाची विश्रांती.....!!
याला म्हणायचे प्रजासत्ताकदिन धूमधडाक्यात साजरा करणे.....!!
जोरसे बोलो....
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो....!!!!!!!!!!!!!!!

                                                      गंगाधर मुटे
------------------------------------------------------------
(१२.०१.२०१०)
------------------------------------------------------------

Mar 27, 2010

शेतकरी पात्रता निकष.

  शेतकरी पात्रता निकष.
                  मायबोली या संकेतस्थळावर मला एक प्रश्न विचारण्यात आला की "एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल - आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत? म्हणजे, आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि कायदेशीर सर्व बाबींबद्दल तुमचा अनुभव/मते सांगा - प्लीज! "असा प्रश्न विचारला आहे. अशा तर्‍हेच्या प्रश्नाला उत्तर तरी काय द्यावे?.
             कारण या प्रश्नाचे उत्तर माझ्यासाठी फारच अवघड आहे. असा प्रश्न मला आजवर कोणी विचारलाच नव्हता. "इधरसे बाहर निकलनेका रस्ता है, अंदर आनेके लिये रस्ता तो हैही नही".
शेती सोडून जे अन्यत्र गेले त्यांच्या आयुष्याचे सोने झाले याउलट जे बाहेरुन शेतीत आले ते गेले, कामातूनच गेले, मातीमोल झाले.
               हे जर मला माहीत असेल तर मी काय माहिती द्यावी? आम्ही कवी माणसं. कविता करताना पतंगाला सहज अग्निज्योतीवर उड्डाण घ्यायला सांगतो आणि प्रेमाच्या आहुतीची महती गातगात कविता पूर्णं करतो. पण जित्याजागत्या जीवाला शेती करायला लावणे म्हणजे खोल डोहात बुडण्यासाठी आमंत्रीत करण्यासारखे आहे, हे मला पक्के ठाऊक आहे, तरीपण मी उत्तर द्यायचा माझ्यापरी प्रयत्न करणार आहे.
.
या प्रश्नाचे दोन विभाग पडतात.शेती कशासाठी करायची ?

अ) हौसेखातर शेती. (उपजीविकेसाठी अन्य सोर्स आहेत अशांसाठी.)
                      हौसेखातर शेती करायची असेल तर कशाचीच अडचण नाही. घरात दोन पिढ्या जगतील एवढी संपत्ती असेल, पुढारीगिरी करून माया जमविता येत असेल किंवा घरातले कोणी सरकारी नोकरीत असून पगाराव्यतिरिक्त माया जमविण्याचे अंगी कौशल्यगूण असेल तर त्यांच्यासाठी काळ्या पैशाला पांढर्‍यात रूपांतरित करण्यासाठी शेती एक वरदानच ठरत आली आहे.
ब) उपजीविकेसाठी शेती.
                      उदरभरणासाठी शेती ( उदरभरण हाच शब्द योग्य. लाईफ बनविणे, करिअर करणे, जॉब करणे सारखे शब्द सुद्धा येथे फालतू आहेत.) करायची असेल तर मग गंभीरपणे विचार करावा लागेल.त्यासाठी कायकाय हवे आणि कायकाय नको अशा दोन याद्या कराव्या लागतील.
१] प्रथम आर्थिक खर्चाची यादी करू.अंदाजे किमतीसह.

१) १० एकर शेतजमीन.........२०,००,०००=००
२) बांधबंदिस्ती : ....................२०,०००=००
२) विहीर पंप :.....................१,५०,०००=००
३) शेती औजारे :................... ३०,०००=००
४) बैल जोडी :....................... ६०,०००=००
५) बैलांचा गोठा :............... १,००,०००=००
६) साठवणूक शेड :..............१,००,०००=००
-----------------------------------------------
एकूण अंदाजे भांडवली खर्च : २४,६०,०००=००
-----------------------------------------------

सर्वसाधारणपणे अंदाजे २५,००,०००=०० एवढी भांडवली गुंतवणूक करावी लागेल.

शारीरिक गरजा :

१) त्वचा जाडी भरडी असावी.सहजासहजी काटा रुतायला नको.
२) रंग घप्प असावा.शक्यतो डार्क ब्लॅक.
३) गोरा,निमगोरा,गव्हाळी वगैरे रंग इकडे घेऊन येऊ नये.चार-सहा महिन्यातच रंग बदलण्याची हमखास शक्यता.त्यासाठी एक उन्हाळा पुरेसा आहे.
४) पायांना चपलेची आदत नसावी.चिखलात चप्पल चालत नाही.
५) शरीरात रक्त जास्त नको,जेमतेम असावे कारण काटा रुतला तर भळभळा वाहायला नको.
६) हाडे कणखर आणि दणकट असावी.
७) शरीरात चपळता असावी.बैल पळाल्यास धावून पकडता येणे शक्य व्हावे.
८) ५०-६० किलो वजन २-४ किलोमीटर वाहून नेण्याची क्षमता असावी.

मानसिक गरजा :-

१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच " रघुपती राघव राजाराम" हे गीत घरासमोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता......राम नाम सत्य है...
२) हांजीहांजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्‍यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हांजीहांजी केल्यावाचून गत्यंतर नसते.
३) मिनतवारी करणे हा अंगीभूत गुण असावा कारण प्रत्येक ठिकाणी उधारीपाधारी शिवाय इलाज नसतो.
४) आत्मसन्मान वगैरे वगैरे अजिबात नको.हमालानेही अरे-कारे,अबे-काबे म्हणून दोन शिवा हासडल्या तर वैषम्य वाटायला नको.शेतकर्‍यासोबतची सर्वांची बोलीशैली ठरली आहे.७० वर्षाच्या शेतकर्‍याला १२ वर्षाचा व्यापारी पोरगा सुद्धा याच भाषेत बोलत असतो.
५) मुलाबाळांना उच्चशिक्षण द्यायच्या महत्त्वाकांक्षा नकोत.नाहीतर अपेक्षाभंग व्हायचा.
६) चांगले जीवनमान जगण्याची हौस नसावी.अनेक पिढ्या उलटूनही तसे शक्य होत नाही.
७) थोडाफार मुजोरपणा हवा.
सावकार - बँका कर्जवसुली मागण्यास आल्या तर - पुढच्या वर्षी देतो, होय देतोना, पळून गेलो काय, होईन तवा देईन, नाही देत जा होईन ते करून घे. अशी किंवा तत्सम उत्तरे देता आली पाहिजेत.तरच चार वर्षे पुढे जगता येईल.
८) मनाचा हळवेपणा अजिबात नको. जर का तुम्ही संवेदनाक्षम-हळव्या मनाचे असलात तर चार लोकात झालेली फटफजिती सहन न झाल्याने गळफास लावून घ्यायचे.म्हणून मुजोरपणा हवा हळवेपण अजिबात नकोच.
९) पंखा,कूलर,फ्रीज,टीव्ही वगैरेची आवड नको. दिवसभर शेतात काम झाले की आलेला शीण-थकवा एवढा भारी की खाटेवर पडल्याबरोबर ढाराढूर झोप लागत असते.
१०) विचार करण्याची प्रवृत्ती नको नाहीतर चिंतारोग व्हायची भिती.

कायदेशीर गरजा:-

कायदेशीर ज्ञान नसले तरी चालते. खिशात पैसे असेल तर हवा तेवढा सल्ला वकील मंडळीकडून घेता येतो.

माझ्या मते जर कोणाला नव्याने शेती करायची (गावरानी भाषेत जिरवून घ्यायची) हौस असेल तर त्यांनी एवढा विचार नक्कीच करायला हवा.
देशाच्या पोशिंद्याची ही चार प्रश्नांची कहाणी अठरा उत्तरी सुफळ संपुर्णम.....!
पोशिंद्याचा विजय असो....!!

२५-०१-२०१०                                                 गंगाधर मुटे
===========================================

Mar 25, 2010

शेतीवर आयकर का नको?

शेतीवर आयकर का नको?

शेतीवर आयकर का नको?
शेतकर्‍यास आयकर आकारायलाच हवा.
त्यामुळे काळ्या सत्ताधार्‍यांचे पितळच उघडे पडेल. आयकराच्या निमित्ताने शासन दरबारी शेतकर्‍याचा आर्थिक ताळेबंद अधिकृतपणे सादर होईल.
         त्या ताळेबंदावरून या व्यवस्थेने दडवून ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासमोर येईल.  देशातील १०० टक्के शेतकर्‍याची शेती पूर्णतः तोट्याची आहे, याला अधिकृत दुजोरा मिळेल. शेतकर्‍याला भरमसाठ सबसिडी देत असल्याच्या शासकीय दाव्याचा फुगा फुटून जाईल.(तसाही गॅट समक्ष सादर केलेल्या कागदपत्रात अधिकृतपणे तो फुगा फुटलाच आहे.)
या देशात पुढारी आणि शासकीय कर्मचारी यांच्याच तेवढ्या शेत्या फायद्यात बाकी सर्व तोट्यात हेही देशाला अधिकृतपणे कळेल.
         घरात पोटभर खायला नसूनही, मिशीवर ताव देऊन पाटिलकीचा खोटा आव आणणार्‍यांचे सत्य स्वरूप समाजासमोर येईल.
         आणि काळ्या चलनाचे पांढर्‍या चलनात रुपांतर करण्यासाठी, दोन नंबरची कमाई एक नंबर मध्ये रुपांतरीत करण्यासाठी जो शेतीच्या नावाखाली धुडगूस चाललाय, त्यालाही पायबंद बसेल.
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर त्याच्या घरात आलेली मालमत्ता कशी, कुठून आली याचे तो स्पष्टीकरण काय देईल ?
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर तो उत्पन्नाचे साधन काय दाखवील?
शेतीला आयकर लावल्यास शेतकरी सोडून ते इतरांनाच जास्त अडचणीचे आहे.
आयकर लावल्यास गरीब शेतकर्‍यांचे काय होईल असे जर कुणी बेंबीच्या देठापासून ओरडत असेल तर त्यांना “माझं काय होईल’, असे म्हणायचे आहे असा अर्थ काढायला आपण शिकले पाहिजे.
शेतकर्‍यावर उत्पन्नावर आधारीत आयकर लावायला हरकत नाही मात्र त्याऐवजी प्रोफेशनल टॅक्स सारखे मोघम टॅक्स लावू नयेत, नाहीतर ते शेतकर्‍यांना लुटायचं नवे हत्यार ठरेल.
आयकराला शेतकर्‍यांनी भिण्याचे काहीच कारण नाही, कारण…
ज्याला आय नाही त्याला कर नाही आणि ज्याला कर नाही त्याला डर नाही.
भाजल्या कोंबड्याला विस्तवाची कुठली आली भीती ?
शेतकर्‍यांना पिढ्यानपिढ्या लाचारासारखे जीवन जगण्यापेक्षा आर्थिक सुदृढ होऊन आयकरदाता शेतकरी म्हणून सन्मानाने जगायला नक्कीच आवडेल.

………………………………………………………………….

बागायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१)  बांधबंदिस्ती :          २००००=००
२)  विहीर पंप :           १५००००=००
३)  शेती औजारे :         ३००००=००
४)  बैल जोडी :             ६००००=००
५)  बैलांचा गोठा :       १०००००=००
६)  साठवणूक शेड :    १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च :  ४६००००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत :                २५००० रु
नांगरट करणे :           ८००० रु
बियाणे :                  १६००० रु.
रासायनिक खते :      १२००० रु
निंदण खर्च :            १५००० रु.
कीटकनाशके :         १६००० रु.
संप्रेरके :                  ३००० रु.
सुक्ष्मखते :             १२००० रु.
फवारणी मजुरी :      ३००० रु.
कापूस वेचणी :        २४००० रु.
वाहतूक खर्च :          ६००० रु.
ओलीत मजुरी :      १२००० रु.
वीज बिल :              ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड :       २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज :             ४६०००=००
…. चालू गुंतवणुकीवरील व्याज :          १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा :      ४६०००=००
—————————————————
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क            २५०००० = ००
—————————————————
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत                    १८०००० = ००
————————————————–
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क             २,५०,००० = ००
ग) एकूण उत्पन्नाची बाजार किंमत          १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा                                        ०,७०,००० = ००
————————————————–
.
.
                     वरीलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, त्रुटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.
उत्पादनखर्च काढताना मी गृहीत धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करू शकतो,आणि १ विहीर १० एकराचे ओलित होऊ शकते असे गृहीत धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहीत धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरून त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला आहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनिक खते,कीटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषी विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.

================================
दिनांकः- ३०.१२.०९
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती :             २००००=००
२) विहीर पंप :                  ००००=००
३) शेती औजारे :             २००००=००
४) बैल जोडी :                 ४००००=००
५) बैलांचा गोठा :           १०००००=००
६) साठवणूक शेड :         १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च :    २,८०,०००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत :                       ००००० रु
नांगरट करणे :                  ८००० रु
बियाणे :                         १६००० रु.
रासायनिक खते :             १२००० रु
निन्दन खर्च :                  १०००० रु.
कीटकनाशके :                १०००० रु.
संप्रेरके :                         ०००० रु.
सुक्ष्मखते :                      ०००० रु.
फवारणी मजुरी :             ३००० रु.
कापूस वेचणी :              १२००० रु.
वाहतूक खर्च :                 ३००० रु.
ओलीत मजुरी :               ०००० रु.
वीज बिल :                     ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड  :             २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) :            ७६,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
…. चालू गुंतवणुकीवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
————————————————–
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क          १,३७,००० = ००
————————————————–
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत                  ९०,००० = ००
————————————————–
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क ……     .१,३७,००० = ००
ग) एकूण उत्पन्नाची बाजार किंमत…..      ०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा……………………………. ०,४७,००० = ००
————————————————-
.
.
             वरीलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, त्रुटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.
उत्पादनखर्च काढताना मी गृहीत धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करू शकतो,असे गृहीत धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहीत धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरून त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला आहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनिक खते,कीटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषी विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
——————————————-
दिनांक :- ०३-०१-२००९
अत्यल्प भुधारक शेतकरी.
बागायती कापसाचा उत्पादन खर्च

प्रमाण : १ शेतकरी २.५ एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च २.५ एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती :                   ५०००=००
२) विहीर पंप :                    १५००००=००
३) शेती औजारे :                  ३००००=००
४) बैल जोडी :                      ३००००=००
५) बैलांचा गोठा :                १०००००=००
६) साठवणूक शेड :              १०००००=००
————————————————
एकूण भांडवली खर्च :        ४,१५,०००=००
————————————————
अ) चालू खर्च..
शेण खत :                ६००० रु
नांगरट करणे :         २००० रु
बियाणे :                  ४००० रु.
रासायनिक खते :       ३००० रु
निंदण खर्च :             ४००० रु.
कीटकनाशके :          ४००० रु.
संप्रेरके :                  १००० रु.
सुक्ष्मखते :               १००० रु.
फवारणी मजुरी :       १००० रु.
कापूस वेचणी :         ६००० रु.
वाहतूक खर्च :          २००० रु.
ओलीत मजुरी :        ३००० रु.
वीज बिल :              २००० रु.
बैलाची ढेप/पेंड :       २००० रु.
————————————————-
एकूण खर्च (अ) :  ०,४१ ,००० = ००
————————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज :          ४००००=००
…. चालू गुंतवणुकीवरील व्याज :         ५०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा :    ४००००=००
————————————————
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क        १,२६,००० = ००
————————————————
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे २.५ एकरात १५ क्विंटल.
इ) १५ क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत                ४५००० = ००
—————————————————
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क        १,२६,००० = ००
ग) एकूण उत्पन्नाची बाजार किंमत        ४५,००० = ००
ह) शुद्ध तोटा                                   ०,८१,००० = ००
————————————————–
.
               वरीलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, त्रुटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.
उत्पादनखर्च काढताना मी गृहीत धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी २.५ एकर शेती म्हणजे अत्यल्प भुधारक शेतकरी.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहीत धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरून त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला आहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनिक खते,कीटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषी विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.

२६-१२-२००९                                            गंगाधर मुटे
=========================================

Mar 24, 2010

शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?.


शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?.
                                  'वांगे अमर रहे !' हा लेख वाचून शर्मिला यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न नसून उत्तरच आहे असे मला वाटते.
                                 कारण जोपर्यंत मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री यात वाढ, सुधारणा होत नाही तो पर्यंत हा प्रॉब्लेम कमी होणारच नाही. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी 'ताज्या' हून ताजे असतात. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषीप्रधान्,अर्थव्यवस्थेचा कणा वगैरे असूनही विकसित का करू शकला नाही?.
                            विदेशी तंत्रज्ञान जसेच्या तसे स्वीकारण्यापेक्षा देशातील लोकांना रुचेल आणि देशात ज्या शेतमालाची अधिक पैदावार होते त्यावर आधारित तंत्रज्ञान विकसित व्हायला पाहिजे. उदा.
१) बोरावर आधारित बोरकुट
२) लिंबावर आधारित सरबते
३) टोमॅटो सास
                                या व्यतिरिक्त अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे पण या सर्व पदार्थांना देशी सुगंध हवा, तरच ते लोकांच्या पसंतीस उतरेल.सामान्य लोकांनी प्रक्रिया उद्योग उभारले तरच त्याची किंमतही आटोक्यात राहू शकते,वेगवेगळ्या भागात स्थानिक शेतमालाची उपलब्धता आणि त्या भागातील लोकांची रुची लक्षात घेऊन पाऊल टाकावे लागेल.
हे सर्व उद्योग मोठ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी करून उपयोगाचे नाही कारण त्यामुळे शेतकर्‍यांना अथवा बेरोजगारांना फायदा होणार नाही.
मागे बायोडिझेल निर्मिती बद्दल बरीच चर्चा झाली.जेट्रोपा लागवड उपयोगी ठरली असती.
                                  शेती विषयक तंत्रज्ञानामध्ये लहान-लहान देश पुढे-पुढे जात असताना आमचा भल्ला मोठा देश मागे-मागे का पडतो?. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री अन्य देशांत स्थापित अवस्थेमध्ये वावरत असताना आम्ही या विषयात अजून पहिले पाऊल सुद्धा नीट टाकायला सुरुवात केलेली नाही. आणि आम्हाला तशी गरजही वाटत नाही. कदाचित असे तर नाही की उगीच माथापच्ची करून नवनिर्माण करत बसण्यापेक्षा इतरांनी विकसित केलेले तंत्रज्ञान चोरून-लपून मिळवायचे,त्यात जुजबी फेरबदल करायचे आणि मेड इन इंडिया असा शिक्का मारला की आम्हीही जगाच्या समांतरच आहो हे भासविण्याचा सरळसोट 'शॉर्टकट' आम्ही निवडलाय?. हा माझा दावा नाही उगीच शंका आहे,परमेश्वर करो आणि माझी शंका खोटी ठरो.
                              तरी एक प्रश्न कायमचा कायमच राहतो,आम्ही त्यादिशेने पावले का टाकीत नाही?. जसे शर्मिला यांना वाटते तसे आमच्या राज्यकर्त्यांना का वाटत नाही?.
                              भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे असे मी म्हणतो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो,तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणून म्हणतो.पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार,त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार... ही यादी किती लांब आहे देवच जाणे.
देशाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून स्वयंप्रेरणेने 'भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे' असे ज्याला वाटते त्याच्या वैचारिक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटत असते..
                        "कृषीक्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा" मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा 'अर्थव्यवस्थेचा कणा' शोधायचा प्रयत्न करतो परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा दिवाळीचा सन म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या 'कण्या'पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्त्व खाऊन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या 'अर्थव्यवस्थेच्या कण्याला' मिळताना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
                            मग ज्या देशात शेतीक्षेत्र एवढे दुर्लक्षित असेल त्या देशात स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री सारख्या इंडस्ट्रीज कशा उभ्या राहतील?. या ठिकाणी एखाददुसरे किंवा तुरळक उदाहरण नव्हे तर व्यापकतेने देशातील ८० % जनतेचा विचार करावा लागेल. कारण पाचपन्नास युनिट उभारल्याने देशाचा प्रश्न सुटणार नाही.
                           त्याशिवाय अशी प्रक्रिया युनिट्स उभारायला स्किल्,कौशल्य,व्यावसायज्ञान,अनुभव,आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ लागेल. आमच्याकडे मनुष्यबळ सोडलं तर बाकी गोष्टींचा प्रचंड दुष्काळ आहे. मनुष्यबळ आहे पण त्यात बुद्धिबळ कमी आणि बाहूबळ जास्त आहे. जे काही बुद्धिबळ आहे त्यात व्यवहारज्ञान/व्यावसायिक ज्ञान कमी आणि पुस्तकी किंवा कारकुनी ज्ञान जास्त आहे. म्हणून कारखाने काढायला कोणी समोर येत नाही पण कारखाना निघणार म्हटल्यावर रांगा लागतात. याला आजचे युवक अजिबात जबाबदार नाहीत,असलोच तर आम्ही प्रौढ मंडळी जबाबदार आहोत. आमची शिक्षणपद्धती जबाबदार आहे.आजची शिक्षण प्रणाली म्हणजे कारकून घडवणारे आणि बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने ठरले आहेत.शाळा कॉलेज किंवा उच्च शिक्षणाचे मुख्य सूत्र 'लाथ मारीन तिथे पाणी काढीन' असा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देईल एवढे ताकदवार असायला हवे.याबाबतीत वैद्यकीय शिक्षणाचा 'मॉडेल' म्हणून उपयोग होऊ शकतो.मला वाटते की कदाचित 'डॉक्टर' हा एकमेव विद्यार्थी असावा ज्याच्यामध्ये डिग्री हाती पडताक्षणीच आपले आयुष्य स्वबळावर जगण्याचा आत्मविश्वास आलेला असतो. बाकी क्षेत्रासाठी आपण एवढी आत्मविश्वास देणारी शिक्षणप्रणाली जर अमलात आणली तर आज गंभीर वाटणारे प्रश्न अत्यंत सुलभ होऊ शकतात.दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
                           या देशावर वसाहतवादी राज्यसत्ता चालविण्यासाठी इंग्रजांना कारकुनांची गरज होती त्यानुरुप कारकून तयार करणारी शिक्षणप्रणाली त्यांनी स्थापित केली.आम्ही इंग्रजांना घालवले पण त्यांची शिक्षणपद्धती आजतागायत कवटाळून बसलोच आहोत.
                                शाळा कॉलेज शिकताना विद्यार्थी,त्याचे पालक,शिक्षण व्यवस्था या सर्वांचे मिळून अंतिम ध्येय काय असते,त्याने शिकून सवरून या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा एक हिस्सा होणे.अगदी कलेक्टर पासून चपराश्यापर्यंत कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल पण सरकारी कारकून व्हायचं.३ % नोकरीच्या जागा असताना १०० % विद्यार्थ्यांना आम्ही एकाच मार्गाने ढकलतो.किमान ५० % विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायला काय हरकत आहे?.
                            यासंदर्भात 'राजा हरिश्चंद्राचे' उदाहरण फारच बोलके आहे. राज्य गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी कामधंदा करावा म्हणून राजा हरिश्चंद्र मजुरांच्या बाजारात जाऊन उभा राहिला.तुला काम काय करता येते ? या प्रश्नावर हरिश्चंद्राचे उत्तर होते. "मला राज्य चालविता येते". पण ज्यांना मजूर हवे होते त्यांच्याकडे 'राज्य' कुठे होते,याला चालवायला द्यायला?. राजा हरिश्चंद्रास कामच मिळेना. शेवटी स्मशानात राहून प्रेताची रखवाली करावी लागली.
राज्य चालविण्याखेरीज इतर कसलेच कौशल्य नसलेला राजा हरिश्चंद्र आणि प्रशासन चालविण्या खेरीज कसलेच कौशल्य अवगत नसलेला पदवीधर यांच्यात फरक काय उरतो?
                        डिग्री घेऊन १०० विद्यार्थी बाहेर आले की त्यात ३ लोकांना नोकरी मिळते,ते मार्गी लागतात.उरलेले ९७ नोकरीच्या शोधात भटकत फिरतात. कारण १५-२० वर्षे शाळा कॉलेजात घालवूनही व्यवसाय,स्वयंरोजगार वा अन्य उद्योग करण्यासाठी लागणारे कौशल्य,व्यावसायिक ज्ञान आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास यापैकी त्याच्याकडे काहीही आलेले नसते. उद्योग व्यवसाय करायचे म्हटले तर बँका कर्ज देत नाही कारण बँकेला माहीत असते हा शंभराचे साठ करणार. म्हणून बँका टाळाटाळ करतात.पदवी मिळवल्याने व्यवसायज्ञान मिळाले हे बँकेलाही मान्य नसते.
                       शेवटी एक दिवस घरात खायचे वांदे पडायला लागलेत किंवा लग्नाचे वय घसरायला लागले की मग मिळाला तो रोजगार करण्याशिवाय गत्यंतर नसते आणि आमच्या तरुणाईचे खच्चीकरण होते.त्यासोबतच असे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर काढण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरते.
                     हे सगळे बदलायचे असेल तर आहे त्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील आणि या बदलासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागेल.. 
वरना कुछ नही होनेवाला...... असंभव....!
.
                                                                                   गंगाधर मुटे
.........................................................................................................................

Mar 23, 2010

शेतीला सबसिडी कशाला हवी?

शेतीला सबसिडी कशाला हवी?

                              शेतकर्‍यांना शेती परवडावी आणि गोरगरीबांना अन्नधान्य स्वस्तात मिळावे या उद्देशाने शेतीला सबसिडी दिली जाते,हे कारण सांगितले जात असले तरी ते खरे नाही,चक्क बनवाबनवी आहे. एकंदरीतच या कृषिप्रधान देशाची अर्थविषयक ध्येय-धोरणे आखताना शेतकरी किंवा गोरगरीब सामान्य माणूस केंद्रस्थानी कधीच नव्हता,आणि आजही दिसत नाही. "सर्वसामान्य जनतेचा विकास म्हणजे देशाचा विकास" असल्या घोषणा फक्त निवडणुकांपुरत्याच असतात,धोरणात्मक निर्णयांमध्ये त्याचा मागमूसही दिसत नाही.

                                 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या विकासाच्या ज्या संकल्पना मांडल्या गेल्या त्यामध्ये "औद्योगिक भरभराट म्हणजे देशाचा विकास" अशीच सूत्रे ठरविण्यात आली.त्याला पूरक अशीच धोरणे आखण्यात आली.औद्योगिक भरभराटी व्हावी म्हणून भांडवलीबचत निर्माण करण्यासाठी जे मार्ग शोधण्यात आले त्यामध्ये शेतकरी आणि कामगार या दोघांचाही बळी गेला. शेतकरी आणि कामगार या दोघांचाही बळी देऊन भांडवलीबचत निर्माण करण्याचे धोरणच आखण्यात आले.
भांडवलीबचत निर्मितीची प्रमुख तीन अलिखित पण अधिकृत सूत्रे.
१) कच्चा माल स्वस्तात स्वस्त घ्यायचा. अर्थात शेतीचे शोषण.
२) श्रमाला कमीतकमी मोल द्यायचे. अर्थात कामगार शोषण.
३) पक्का माल तयार झाला की तो ग्राहकाला जास्तीत जास्त भावाने विकायचा.अर्थात ग्राहकाचे शोषण.

                         ही त्रिसूत्री राबवताना एक मोठी समस्या उभी ठाकली ती ही की जर हे जनतेला माहीत झाले तर असंतोषाचा उद्रेक होईल,मग काय करायचे ?

                                या जटिल प्रश्नाचे उत्तर मात्र लगेचच मिळाले कारण तत्कालीन पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी सर्वच विलायती तालिमीतच तयार झालेले. त्यामुळे स्वाभाविक वृत्तीही विलायतीच.विचारशैलीही विलायतीच. मतभेद होते फक्त सत्ता कुणाची असावी याविषयी. सत्ता कशी असावी हा प्रश्नच नव्हता. (१५ ऑगस्टला झेंडा फडकल्यानंतर म.गांधी आणि इतर तत्सम स्वदेशी नेते तर अदृश्यच झालेले. स्वातंत्र्योत्तर काळातील आर्थिक धोरणावर म.गांधींची छाप आहे असे एखादे अस्तित्वात असलेले प्रभावी शासकीय धोरण आहे दृष्टिपथात? ) "तोडा,फोडा आणि राज्य करा" ही कूटनीती काळ्या सत्ताधार्‍यांनाही उपयोगी पडली.आणि तिथूनच उगम झाला "तोडा,फोडा आणि राज्य करा" ह्या एका नव्या बहुअंकी कलगीतुर्‍याचा.
                       अन्नधान्य महाग झाले तर गोरगरीब जनता जगेल कशी ? असे ग्राहकाला / कामगाराला सांगायचे. शेतीमालास शहरी ग्राहक / व्यापारी पिळतात म्हणून भाव मिळत नाही,असे शेतकर्‍याला सांगायचे. तिघांनाही एकमेकांच्या विरोधात भडकविणारी फुटीर मानसिकता भारतीयामध्ये आपोआप आलेली नाही, त्यामागे काळ्या सत्ताधार्‍यांचे पूर्वनियोजित,अधिकृत पण अलिखित धोरणच राहिले आहे.
-----------------------------------------------
आता काही उदाहरणे तपासू.

१) एक किलो कापसाला जर शेतकर्‍याच्या हाती ३०/- रु पडत असतील तर ,१ किलो कापसापासून तयार झालेला कापड ग्राहकाच्या हाती पडेपर्यंत त्याची किंमत २५०/- ते ५००/- रु. झालेली असते.
२) एक किलो तुरडाळीला जर शेतकर्‍याच्या हाती ४०/- रु पडत असतील तर ,१ किलो तुरडाळ ग्राहकाच्या हाती पडेपर्यंत त्याची किंमत ८०/- ते १२०/- रु. झालेली असते.
३) एक किलो सोयाबीनला जर शेतकर्‍याच्या हाती १५/- रु पडत असतील तर ,१ किलो सोयाबीन पासून तयार होणारे तेल आणि डिओसी पासून तयार होणारे खाद्य पदार्थ किंवा तत्सम पदार्थ यांची एकंदरीत किंमत ४०/- ते ११० /- रु. झालेली असते.
४) १ लीटर दुधाला जर शेतकर्‍याच्या हाती १५/- रु पडत असतील तर ,१ लीटर दूध ग्राहकाच्या हाती पडेपर्यंत त्याची किंमत २५/- ते ४०/- रु. झालेली असते.
हे झाले मुख्य पिकाबाबत.इतर पिकांची तर त्यांहूनही वेगळी परिस्थिती आहे.
द्राक्ष,मोसंबी,संत्रा,आंबा,ऊस,पपई,केळी ही पिके विकून जर शेतकर्‍याला १ किलो पोटी १ /- रु. मिळत असेल तर ग्राहकापर्यंत पोहचे पर्यंत त्याची किंमत ४/- ते चक्क ४० /- रु. झालेली असते.
यावरून " ग्राहकाला मोजाव्या लागणार्‍या किमतीचा आणि शेतकर्‍याच्या पदरात पडणार्‍या किमतीचा अर्थाअर्थी संबंध नाही" असा निष्कर्ष काढायला काय हरकत आहे?.
यावर एक युक्तिवाद केला जातो. तो असा.
'' शेतकरी आणि ग्राहकांच्या मध्ये काम करणार्‍या यंत्रणेला वाहतूक,प्रक्रिया आणि व्यवस्थापनाचे खर्च येतात."
हा युक्तिवाद मलाही मान्य आहे, पण त्यामुळे काही उपप्रश्न तयार होतात ते असे.

१) मग एकट्या शेतकर्‍यालाच जबाबदार का धरले जाते,अवांतर यंत्रणांना जबाबदार का धरले जात नाही.?
२) गोरगरीबांना अन्नधान्य स्वस्तात मिळावे यासाठी एकट्या शेतकरी समाजाचीच गळचेपी का केली जाते.?
३) या अवांतर यंत्रणांवर शासन काही बंधने का लादत नाही.
४) गरीबांना स्वस्त दरात धान्य मिळण्यासाठी राशन दुकाने असताना या विषयी युक्तिवाद करताना वारंवार "गरीब" हा शब्द का वापरला जातो ?
५) दरवाढीला जर फक्त आणि फक्त शेतकरीच जबाबदार नसेल तर "शेतकर्‍याला जर योग्य दर दिलेत तर गोरगरीब जनता जगेल कशी ?" ही "सार्वजनिक आणि सामूहिक मानसिकता" रुजली कुठून ? रुजवली कोणी ? त्याचे खंडन का केले जात नाही.?
--------------------------------------------------

                                  शेतकर्‍यांना शेती परवडावी आणि गोरगरीबांना अन्नधान्य स्वस्तात मिळावे म्हणून शेतकर्‍याला सबसिडी दिली जाते असे वारंवार म्हटले जाते. पण हे अर्धसत्य आहे. कारण शेतकर्‍याला किंवा शेतमालास प्रत्यक्ष सबसिडी दिली जात नाही.शेतीसाठी लागणार्‍या काही निविष्ठा,औजारे उत्पादक कंपन्यांना सबसिडी दिली जाते, जसे की घरगुती सिलेंडर कमी किमतीत मिळावे म्हणून गॅस / पेट्रोलियम कंपन्यांना सबसिडी दिली जाते,त्याच धर्तीवर रासायनिक खते शेतकर्‍यांना कमी दरात उपलब्ध व्हावे म्हणून रासायनिक खते उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकार सबसिडी देते त्यामुळे रासायनिक खते कमी दरात उपलब्ध होतात हे खरे आहे,पण त्यामुळे शेतमालाच्या किंमती कमी होतात किंवा शेतकर्‍याचा उत्पादन खर्च कमी होतो असा दावा केला जातो ती चक्क बनवाबनवी आहे, ती कशी ते बघू.

१) समजा एका शेतकर्‍याचा त्याच्या एक वर्षाच्या शेतीत एकूण उत्पादन खर्च १०० रु.असेल तर सबसिडीच्या दरात त्याला रासायनिक खते उपलब्ध झाल्यामुळे त्याचे फक्त १ ते २ रु. वाचतात. म्हणजे उत्पादन खर्च १ ते २ टक्क्यांनी कमी होतो.
२) सबसिडी असल्यामुळे जर एक किलो कापसाला शेतकर्‍याच्या हाती ३०/- रु पडत असतील तर सबसिडी नसल्यास एक किलो कापसाला शेतकर्‍याच्या हाती ३० रु.६० पैसे पडतील.
आता वाचकांनी एक गणीत सोडवून बघावे.

जेव्हा कापसाची किंमत ३०/- रु तेव्हा कापडाची किंमत ५०० /-रु. तर
जेव्हा कापसाची किंमत ३० रु.६० पैसे तेव्हा कापडाची किंमत किती ?
यावर एका अशिक्षित आजीचे उत्तर असे.
कापड घ्यायला दुकानात गेले तर ५०० रुपयाच्या खरेदीत मोलभाव करताना,घासाघीस करतानाच २०० रु.चा फरक असतो.
या शेतीविषयक सबसिडीने खरेच काही फायदा होतो? शेतकर्‍याचा ? ग्राहकाचा ? की आणखी कुणाचा ?
..............................................................

                                       शेतीला अप्रत्यक्षपणे मिळणार्‍या आणखी काही सबसिडी आहेत,पण त्याचा लाभ शेतकर्‍यांपेक्षा इतर घटकांनाच जास्त होतो.जिल्हा परिषदेला काही शेतकी औजारे सबसिडीवर असतात त्याचा फायदा पुढारी आणी त्यांचे हस्तक यांनाच होतो. साधा स्प्रे पंप पाहिजे असेल तर त्यासाठी जि.प.सदस्याचे अलिखित शिफारसपत्र लागते.
शिवाय या अनुदानित औजारांची संख्या गरजू शेतकर्‍यांच्या तुलनेत एक हजारांश देखिल नसते त्यामुळे अशा सबसिडींचा शेतकर्‍यांना फायदा होतो असे म्हणणे शुद्ध धूळफेक ठरते.
............................................................

                               शेतकर्‍यांना फुकट किंवा अनुदानित खायची सवय पडली म्हणून कष्ट करण्याची प्रवृत्तीच कमी झाली असा एक सामूहिक मतप्रवाह आढळतो.
प्रत्यक्षात 'शेतकरी घटक' म्हणून या देशात सार्वत्रिक स्वरूपात शेतकर्‍याला फुकट काहीच मिळत नाही.
कृषी विभागाच्या काही योजना असतात उदा.मच्छीतलाव्,सिंचन विहिरी,मोटारपंप,वगैरे. पण यामध्ये आदिवाशी शेतकरी,भटके,विमुक्त जाती-जमातीचे शेतकरी,दारिद्र्य रेषेखालील शेतकरी असे वर्गीकरण असते.म्हणजे या योजनेचे स्वरूप शेतकरीनिहाय नसून जातीनिहाय असते. त्यामुळे अशा योजनांमध्ये शेतकरी सोडून इतरांचीच गरिबी हटते. स्थानिक पुढारी अधिकार्‍यांशी संगनमत करून हात ओले करून घेतात. त्यामुळे ज्याच्या शेतात विहीर नाही त्याला मोटारपंप मिळतो,आणि ज्याच्या शेतीत फवारणीची गरज नाही त्याला स्र्पेपम्प मिळतो. अशा अनावश्यक वस्तू फुकटात मिळाल्याने एक तर त्या जागच्या जागी गंजून जातात किंवा तो येईल त्या किमतीत विकून टाकतो. अशा योजनांमध्ये सुद्धा लाभार्थी निवडायची संख्या गरजू शेतकर्‍यांच्या तुलनेत एक हजारांश देखिल नसते.
अशा परिस्थितीत सरसकट शेतकर्‍यांना फुकट किंवा अनुदानित खायची सवय पडली म्हणून कष्ट करण्याची प्रवृत्तीच कमी झाली असा समज करून घेण्यामागे किंवा असा समज करून देण्यामागे काय लॉजिक आहे.
                           एकंदरीत शेतकी सबसिडीचा विचार करता शेतकर्‍याला काही फायदा होतो,असे दिसत नसताना ,त्या तुलनेत शेतकी सबसिडीचा ज्या तर्‍हेने डंका पिटला जातो, त्याला ढोंगीपणा म्हणू नये तर काय म्हणावे?
------------------------------------------------
ताजा कलम :- माफ करा,मी विसरलो होतो,एक गोष्ट आम्हाला अगदी फुकटात मिळते.

आमच्या घरी कुणी गर्भवती स्त्री असेल तर राज्यकर्ते तिच्यासाठी फुकटात मूठभर लाल गोळ्या पाठवतात,अगदी दर महिन्याला, न चुकता .........

आणि आमची लुळी,लंगडी,पांगळी मानसिकता पुढार्‍यांच्या साक्षीने टाळ्यांचा कडकडाट करते ....
...... तुम्ही पण टाळ्या वाजवा....
..... बजाओ तालियां....
...... Once more,Take a big hand.....

.                                                     गंगाधर मुटे
......................................................................................
(दि. २३-०३-२०१०)

Mar 22, 2010

वांगे अमर रहे !

वांगे अमर रहे !


                       कॉलेज संपवून शेती करायला गेलो तेव्हा गावातील इतरांकडे नाही ते ज्ञान आपल्याकडे आहे असा माझा दृढ समज होता आणि त्याच आविर्भावात मी शेतीची सुरुवात केली. या सर्व जगाच्या लेखी मूर्ख असलेल्या शेतकर्‍यांना स्वानुभवाने शहाणे करण्यासाठी भरघोस उत्पन्न घ्यायचे ठरविले. दोन महिन्यांत नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून वांगीची निवड केली आणि ५ एकरात वांगीची लागवड केली. मेहनत,जिद्द सर्वस्व पणाला लावलं. मेहनत फळा आली. भरघोस पीक आलं.                        


                      अन्य शेतकरी घेतात त्याच्या १-२ नव्हे चक्क ५-६ पट उत्पादन मिळालं. आणि इथेच माझे ग्रह फिरले.
माझी वांगी बाजारात गेली आणि स्थानिक बाजारात वांगीचे भाव गडगडले. ५ रुपयाला पोतं कुणी घेईना. वाहतूक,हमाली,दलाली वजा जाता जो चुकारा मिळाला ते पैसे बसच्या तिकिटालाही पुरले नाहीत. शेतात घेतलेली मेहनत आणि वांगी फुकटात गेली. असे काय झाले? काहीच कळत नव्हते. प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे माझ्या नजरेत इतर शेतकरी अडाणी,मूर्ख असल्याने त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी निष्कर्ष निघाला की मार्केटमध्ये गरजेपेक्षा जास्त माल गेल्यामुळे भाव पडले. कारण ग्राहकाला जेवढी गरज असेल तेव्हढीच तो खरेदी करेल. माझी वांगी खपावी म्हणून ग्राहक पोळी, भात, भाकरीऐवजी नुसतीच वांग्याची भाजी खाऊन पोट थोडीच भरणार आहे? स्थानिक बाजारात गरज, मागणीपेक्षा जास्त माल गेल्याने ही स्थिती झाली त्याला जबाबदार मीच होतो. इतर शेतकर्‍यांनी सायकलवर आणलेली अर्धा पोतं वांगी सुद्धा माझ्या मुळे बेभाव गेली होती. सायकलवर अर्धा पोतं वांगी आणून उदरनिर्वाह करणारे माझ्यामुळे अडचणीत आले.


                     झाली चूक पुन्हा करायची नाही म्हणून दुसर्‍या खेपेस वांगी आदिलाबादला न्यायचे ठरवले. माझ्या गावाहून १५० किमी अंतरावर मोट्ठी बाजारपेठ असलेले आंध्रप्रदेश मधील आदिलाबाद शहर. ६० पोती वांगी न्यायची कशी? स्पेशल वाहनाचा खर्च परवडणार नव्हता म्हणून माल बैलबंडीने हायवे क्रं. ७ पर्यंत नेला. रायपुर - हैदराबाद जाणार्‍या ट्रकला थांबवून माल भरला. तिथे हमाल किंवा कुली नव्हताच त्यामुळे मीच ट्रकड्रायव्हरच्या मदतीने माल चढविला. ६० पोती प्रत्येकी वजन ५०-५५ किलो. अनुभव नवा होता. मजा वाटली (?) शेतकरीcumहमाल.Two in One.


आदिलाबाद गाठले.
तिथल्या मार्केटची गोष्टच न्यारी. मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती.
वांगेच वांगे.
अत्र तत्र सर्वत्र वांगेच वांगे.
जिकडे तिकडे चोहीकडे, वांगेच वांगे गडे, आनंदी आनंद गडे.
मार्केट वांग्यांनी भरलं होतं. त्या संदर्भात एका शेतकर्‍याला विचारले.
"यंदा हवामान वांगी साठी फारच अनुकूल असल्याने वांगीचं भरघोस उत्पादन आलंय." तो शेतकरी.
"भाव काय चाललाय?" माझा प्रश्ऩ.
"सकाळच्या लिलावात ५-६ रुपये भाव मिळाला." तो शेतकरी.
"किलोला की मणाला?" माझा प्रश्ऩ.
"किलोला? अरे यंदा किलोला विचारतो कोण? पोत्याचा हिशेब चालतो." तो शेतकरी.
"म्हंजे? पोतभर वांगीला ५-६ रुपये?" माझा प्रश्ऩ.
"पोतभर वांगीला नाही, पोत्यासहित पोतभर वांगीला." तो शेतकरी.
"रिकाम्या पोत्याची किंमत बाजारात १५ रुपये असताना पोत्यासहित पोतभर वांगीला ५-६ रुपये? "मी मलाच प्रश्न विचारीत होतो. हे कसं शक्य आहे? विश्वास बसत नव्हता पण समोर वास्तव होतं.
"आता लिलाव केव्हा होईल?" माझा प्रश्ऩ.
"इथे नंबरवार काम चालतं, मी काल आलो, माझा नंबर उद्या येईल कदाचित." तो शेतकरी.
"तोपर्यंत वांगी नाही का सडणार?" माझा प्रश्ऩ.
यावर तो काहीच बोलला नाही. मूक होता. डोळे पाणावले होते, एवढ्या मेहनतीने पिकविलेलं वांगं सडणार म्हटल्यावर त्याचा जीव कासावीस झाला होता.
आता माझ्याही मनात कालवाकालव व्हायला लागली.
आपला नंबर तीन दिवस लागला नाही तर अर्धी वांगी नक्कीच सडणार. डोळ्यादेखत वांगी सडताना पाहणं मानसिकदृष्ट्या पीडादायक ठरणार होतं. मी मनातल्या मनात गणित मांडायला सुरुवात केली. तीन दिवसात किमान अर्धी वांगी नक्कीच सडणार. उरलेली ३० पोती गुणिला ५ वजा तीन दिवस जेवणाचा, निवासाचा खर्च बरोबर उणे पंधरा ( -१५) म्हणजे वांगी विकण्यासाठी मला जवळून १५ रुपये खर्च करावे लागणार होते.
काय करावे मला सुचत नव्हतं, डोकं काम करीत नव्हतं, माझं सर्व पुस्तकी ज्ञान उताणं झोपलं होतं.
आता पुढे काय?
निर्णय घेतला. एकदा डोळेभरुन त्या वांगीकडे पाहिलं. गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावी अशी. ते दृश्य डोळ्यात साठवलं, एका झटक्यात वांगीकडे पाठ फिरविली आणि गावाचा रस्ता धरला. गावाजवळ आलो तेव्हा दिवस उतरणीला आला होता. आणि आता मला एका नव्या समस्येने ग्रासले होते. गावांतील शेतकरी मला यासंदर्भात विचारतील त्याला उत्तर काय द्यायचे? मूर्ख शेतकर्‍यांच्या नजरेला नजर भिडविण्याचे धाडस विद्याविभूषित शहाण्याकडे उरले नव्हते. मग एका चिंचेच्या झाडाखाली विसावलो. तेथेच टाईमपास केला. गावातील सर्व लोक झोपी गेले असतील याची खात्री झाल्यानंतरच गुपचिप चोरपावलाने गावात प्रवेश केला.
आजही मला दिसतात.
..ते ..वांगे..
गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावे असे, अजूनही न सडलेले.
आणी माझ्या दृष्टिपटलावर अमर झालेले.

                                                             गंगाधर मुटे
............ **..............**..............**..............**.............

Mar 21, 2010

‘शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे’


शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे

                  शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरू आहे. या समस्येची उकल करताना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर “शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा” अशा स्वरूपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.
                शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी आयुष्यात एकदातरी सलगपणे काही दिवस शेतकरी समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात किंवा राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात, तो कसे जीवन जगतो आणि किती कष्ट करतो याचा अनुभव येणे अशक्य आहे. ४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे, पण हा देश आपण कोण्या कामचुकार, आळशी, अलायक तज्ज्ञांचा हातात सोपवला असा प्रश्न जर कोण्या ग्यानबाला पडला, तर त्याच्याशी वाद घालता येईल, मुजोरीही करता येईल पण त्या ग्यानबाच्या प्रश्नाचे समर्पक निराकरण करता येईल?
                       झोप, जेवण आणि अन्य शारीरिक विधींसाठी लागणारा काळ सोडला तर उर्वरित वेळात शेतकरी काय करतो? स्विमिंग करायला जातो? क्रिकेट / सिनेमा बघायला जातो? बायकोला घेऊन बागेत फिरायला जातो? बिअरबारवर जातो? बारबालांचे नृत्य बघायला जातो की इतवारी / बुधवारपेठेत फेरफटका मारायला जातो? मान्यवर तज्ज्ञांनी पहिल्यांदा या प्रश्नांचे उत्तर शोधायला हवे. ( आणि जरी का या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल तरीही बिघडते कुठे? सर्व उपभोगाचा भोग भोगणारी आमच्या सारखी भोगवादी मंडळी कुठे आत्महत्या करताहेत? आम्ही जिवंतच आहोत की अजून. )
औताच्या बैलाला वर्षातून फक्त १२० ते १४० दिवस तर शेतक-याला मात्र ३६५ दिवस काम करावे लागते, बाप मेला सुट्टी नाही, बापाला तिरडीवर तसाच ठेवून बैलाचे शेणगोटा, चारापाणी करायला जावेच लागते. पोरगा तापाने फणफणत असेल किंवा अगदी Gastro जरी झाला तरीही पेरणी थांबवता येत नाही हे वाजवी सत्य तज्ज्ञ मंडळींना कधी कळेल?
                 तरीही या तज्ज्ञ मंडळींना शेतकरी आळशी आणि कामचुकार दिसत असेल तर त्यांनी खालील प्रमाणे शास्त्रशुद्ध मार्गाचा अवलंब करून स्वतः:ची खातरजमा करून घ्यावी.
आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन;

१) प्रेताचे वजन करावे व शारीरिक उंची मोजावी. वजन व उंची यांचा रेशो काढावा. तो डॉक्टरला दाखवावा. मयत व्यक्ती सुदृढ की कुपोषित, कष्टकरी की कामचुकार या विषयी सल्ला घ्यावा.
२) मुखवट्याचा एक क्लोजअप फोटो घ्यावा. त्यावरून मरण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर काय भाव होते, मरण्यापूर्वी त्याची मानसिक स्थिती काय होती याचा याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून रिपोर्ट मागवावा.
३) त्याच्या घरातील नेसनीची वस्त्रे, अंथरून-पांघरून, भांडी-कुंडी यांची यादी बनवावी. त्यावरून मयत व्यक्ती काटकसरी की उधळखोर याचा अंदाज काढावा.
४) व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. तसे असेल तर तो कोणती दारू पीत होता? गावठी, देशी की इंग्लिश याचा शोध घ्यावा. गावठी, देशी आणि इंग्लिश मद्याचे अनुक्रमे बाजारभाव माहीत करून घ्यावे. (मान्यवरांना गावठी, देशीचे भाव माहीत नसणार) दरडोई येणारा खर्च याचा तुलनात्मक तक्ता/गोषवारा बनवावा. बिगरशेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण आणि शेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण याची आकडेवारी गोळा करून तुलना करावी.
५) अज्ञानतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. तसे असेल तर बिगरशेतकरी पण अज्ञानी अशा अन्य समुदायातील लोक आत्महत्या का करीत नाहीत? किंवा बारामतीचे लोक फारच सज्ञानी आहेत काय?
६) वेडसरपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. वेडसर लोक आत्महत्या करतात? कुठले? अमेरिकेतील? ब्रिटनमधील? फ्रांसमधील की पाकिस्तानातील?
७) मनोरुग्णपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. त्यासाठी गावागावात मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे त्यांना वाटते. पण ग्यानबाला हे पटत नाही. एका दाण्यातून शंभर दाण्याच्या निर्मितीचा चमत्कार घडवणारा व स्वतः: अर्धपोटी राहून जगाला पोटभर खाऊ घालणारा शेतकरी मनोरुग्ण कसा काय असू शकतो? कदाचित वैफल्यग्रस्त असू शकतो. मग तो वैफल्यग्रस्त, नाउमेद का झाला याची कारणे शोधावी. ती कारणे सामाजिक की आर्थिक याचाही शोध घ्यावा? शेतात गाळलेला घाम, दामात का परावर्तित झाला नाही याचाही शोध घ्यावा. याउलट पॅकेजची रक्कम गिळंकृत करणारे राजकीय पुढारी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणाऱ्या शासकीय मदतीचा चेक काढण्यासाठी लाच खाणारी नोकरशाही मानसिक विकृतीने ग्रासली असून त्यांच्या भावनिक संवेदना बधिर झाल्या आहेत. तेच खऱ्या अर्थाने मनोरुग्ण असून त्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये, मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे ग्यानबाला वाटते. शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेचे शुद्धीकरण आणि मतपरिवर्तन होणे गरजेचे आहे, ज्या अर्थी शेतीविषयक ध्येय-धोरणामध्ये मूलभूत बदल होताना दिसत नाही त्या अर्थी शेतीविषयक ध्येय-धोरणे आखणाऱ्याकडून शेतकरी आत्महत्या बद्दल व्यक्त होणारी चिंता हा वरपांगी देखावा आहे, ज्या अर्थी शेतीला न्याय देणारी कृषी विषयक धोरणे आखण्यासाठी लागणारी कणखरता त्यांच्यामध्ये नाही त्याअर्थी तेही मानसिक दुर्बल असावे असा ग्यानबाचा कयास आहे, त्यासाठी मंत्रालयामध्ये मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असेही ग्यानबाला वाटते. जे ग्यानबाला उमजते ते या तज्ज्ञांना का उमजू नये? उमजत असेलही कदाचित परंतु शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेवर उदरनिर्वाह करणारी मंडळी सिंहासनाच्या इच्छे विरुद्ध काही निष्कर्ष काढतील ही अशक्य कोटीतील बाब आहे, असेही ग्यानबाचे स्पष्ट मत आहे.
८) पॅकेजमुळे आत्महत्या थांबत नाही, असा काहींचा निष्कर्ष आहे. परंतु ते पॅकेजच्या स्वरूपावर अवलंबून आहे. कँसरच्या रोग्याला पॅरासीटामॉलचे पॅकेज द्यायचे, रोगी बरा झाला नाही अथवा दगावला की रोगी अज्ञानी होता, त्याने औषधे घेण्यात कुचराई केली, असा काहीसा बावळट निष्कर्ष काढण्याचा हा प्रकार आहे. त्या ऐवजी पॅकेजच्या मूळ स्वरूपातच गफलत झाली, रोगाचे निदान करण्यात, औषधांची निवड करण्यात चूक झाली हे कबूल करण्यासाठी लागणारी मानसिक औदार्यता आमच्यामध्ये केव्हा येणार हाच खरा लाख मोलाचा प्रश्न आहे.
                          मान्यवर तज्ज्ञांनी या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवी. विषयाच्या खोलवर जायला हवे. अभ्यासांती निष्कर्ष काढून सप्रमाण सिद्ध करायला हवे, पण हे होताना दिसत नाही. पूर्वग्रह बाजूला सारून त्रयस्थपणे मुद्द्याची उकल केल्याखेरीज निर्दोष निष्कर्ष निघू शकत नाही. परंतु बाटली आणि पंचतारांकित संस्कृती वृद्धिंगत झालेल्या स्वनामधन्य तज्ज्ञांना याची गरज भासत नाही. एरवी शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशील मुद्द्यावर तज्ज्ञांनी येरेगबाळे मतप्रदर्शन करण्यापेक्षा चूप बसने शेतकऱ्यासाठी समाधानाचे ठरेल. आणि कदाचित शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील मुद्द्याची उकल होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांच्या प्रारंभाचे तेच पहिले पाऊल ठरेल.


                                                             गंगाधर मुटे
....................................................................................
पुर्वप्रकाशित : १० मार्च २०१०
....................................................................................

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं