Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Jul 13, 2011

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा



              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला “डोळस दृष्टी” प्राप्त करून देत असतात आणि सामाजिक जीवनमानाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोनही देत असतात.

             माझ्या बालपणीच्या (१९७०-७५) काळात दळणवळणाची साधने एकतर फारसी विकसित झाली नव्हती किंवा ग्रामीण भागापर्यंत पोचलेली तरी नव्हती. एखादी मोटर सायकल जरी गावात आली तरी गावातील लहानसहान पोरं मोटरसायकल मागे धावायचीत. बुजुर्ग मंडळीही घराबाहेर येऊन कुतूहलाने बघायचीत. त्याकाळी गावातले दळवळणाचे सर्वात मोठे विकसित साधन म्हणजे सायकल. सायकलचा वापरही केवळ पुरुषांसाठीच असायचा. पत्नीला सुद्धा सायकलवर बसवणे लाजिरवाणे वाटायचे आणि कुणी जर तसा प्रयत्न केलाच तर ते चेष्टेचा विषय ठरायचे.  ग्रामीण जनतेचे दळणवळणाचे एकमेव साधन म्हणजे रेंगीबैल, छकडा, दमनी वगैरे. गावाला जोडणारे पक्के रस्ते उपलब्ध नसल्याने ग्रामीण माणसांचा संचारही मर्यादित असायचा. पावसाळाभर गावाचा संपूर्ण जगाशीच संपर्क तुटायचा, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

           इलेक्ट्रिक, टेलिफोन किंवा तत्सम साधने गावात पोचायची होती. टीव्ही, संगणकाचे नामोनिशाण नव्हते. गावात दिसलाच तर एकट-दुकट रेडियो दिसायचा. गावातील एखादा तरुण नोकरी करायला शहरात गेला की शहरातून गावाकडे परतताना हमखास काखेला रेडियो लटकवून आणि रस्त्याने गाणी वाजवतच गावात प्रवेश करायचा. लग्नामध्ये हुंडा म्हणून गोफ, घड्याळ, अंगठी, सायकल आणि रेडियो ही वरपक्षाची सर्वात मोठी मागणी समजली जायची. स्वाभाविकपणे मनोरंजनाची काहीच साधने उपलब्ध नसल्याने पारंपरिक सण साजरे करून त्यातूनच मनोरंजनाची गरज पूर्ण केली जायची.

        जी अवस्था दळणवळण व मनोरंजनाची; तीच वैचारिक देवाणघेवाणीची. सभा, मेळावे, परिसंवाद याचे लोण गावापर्यंत पोचलेच नव्हते. चालायचेत ते केवळ हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने.  हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने याप्रकारातला सर्वात मोठा दोष असा की हे वनवे ट्रॅफिक असते. त्यात चर्चेला वगैरे काहीच स्थान नसते. एकाने सांगायचे आणि इतरांनी ते भक्तिभावाने श्रवण करायचे. आपल्या सुखद:खांना व्यक्त करण्याचे व्यासपीठच उपलब्ध नसल्याने ग्रामीण जनतेची केवढी घुसमट झाली असावी, याचा अंदाज आता सहज बांधता येऊ शकतो.

       निदान पुरुष मंडळींना मारुतीच्या पारावर किंवा चावडीवर बसून गप्पा तरी करता येत होत्या. भावना व्यक्त करायला संधी मिळत होती, पण महिलांचे काय? त्यांना ना पारावर बसून गप्पा मारण्याची अनुमती, ना सुखदु:खाला व्यक्त करण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध. त्यामुळेच महिलाप्रधान सण अतिशय जिव्हाळ्याने साजरे केले जात असावेत आणि त्यानिमित्ताने ग्रामीण महिला मनोरंजन आणि एकीमेकीचे क्षेमकुशल व्यक्त करण्यासाठी अथवा जाणून घेण्यासाठी या सणांचा वापर व्यासपीठासारखा वापर करून घेत असाव्यात.

       अशाच काही महिलाप्रधान सणापैकी भुलाबाईचा उत्सव हा एक सण. आश्विन शु.१० ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंतचा काळ “आश्विनच्या भुलाया” म्हणून साजरा केला जातो. काही भागात याला हादगा म्हटले जाते तर काही भागात भोंडला. या काळात मातीच्या बाहुल्या/भुलाया मांडून दररोज नित्यनेमाने गाणी म्हटली जातात. खिरापत वाटली जाते. जसजसा काळ बदलत गेला तसतसे या सणांचे महत्वही कमी होत गेले.

       पण त्याकाळी छोट्या-छोट्या बालिकांपासून जख्खड म्हातार्‍या महिला सुद्धा यामध्ये गाणी गायनासाठी सहभागी होत असायच्या. त्या पैकी काही गाणी ऐकतांना माझ्या अंगावर काटा उभारायचा. तर काही गाणी ऐकून मन खूप-खूप उदास व्हायचे. काही गाणी मनाला चटका लावून जायची तर काही गाणी ऐकताना कुतूहलमिश्रीत प्रश्नचिह्न निर्माण व्हायचे.


रुणझुण पाखरा जा माझ्या माहेरा
माझ्या का माहेरी सोन्याची पायरी
त्यावरी बसजो शिदोरी सोडजो
माझ्या का मातेला निरोप सांगजो
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
होते तर होऊ दे औंदाच्या मास
पुढंदी धाडीन … गायीचे कळप
पुढंदी धाडीन … म्हशीचे कळप


सोन्याचे मंदिर, सोन्याचा कळस या धर्तीवर घराचे छत सोन्याचे असेल तर ते समजण्यासारखे होते, पण घराला चक्क सोन्याची पायरी? उलगडा व्हायचा नाही म्हणून मग खूप कुतूहल वाटायचे.

      भुलाबाईच्या गाण्याला तत्कालीन सामाजिक साहित्याचा आविष्कारच म्हणावे लागेल. साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात. परंतू थोरा–मोठ्या कवी/लेखकांच्या साहित्यात तत्कालीन वास्तव प्रामाणिकपणे उतरलेलेच नसावे. त्या काळात संतकवी देवास भजण्यात गुंग, त्यांचे बहुतांश काव्यवैभव/प्रतिभा देवाचे गूण गाण्यात खर्ची पडली असावी. कवी हा तर मुळातच कल्पनाविलासात रमणारा प्राणी. वास्तववादी लेखन केले तर आपल्या काव्याला साहित्यिक दर्जा मिळणार नाही, या भयाने पछाडलेला. त्यातल्यात्यात कवी हे बहुतांश पुरूषच. त्यामुळे आपल्या दुखा:ला कोणीच वाली नाही हे बघून महिलांचा कोंडमारा झाला असावा. महिला विश्वाच्या सुखदु:खाचे लेखक, कवी किंवा गीतकारांनी नीट शब्दांकन केले नाही म्हणून आमच्या मायमाउल्या स्वतःच पुढे सरसावल्या असाव्यात आणि कदाचित त्यामुळेच अपरिहार्यपणे महिलांनी प्रस्थापित काव्याला फाटा देऊन स्वतःचे काव्यविश्व स्वतःच तयार केले असावे. कवी, गीतकार आणि संगीतकाराची भूमिका त्यांनीच चोख पार पाडली असावी आणि मग त्यातूनच आकारास आले असावे हादगा, भोंडला, भुलाबाईचे गाणे. या गीतामध्ये साठवलेली आहेत महिलांची अपार दु:खे. प्रकट झाली आहे साताजन्माच्या असहायतेची कारुण्यता. स्पष्टपणे प्रतिबिंबित झाली आहे अबला म्हणून आयुष्य कंठतांना वेळोवेळी झालेली कुचंबणा आणि मिळालेली हीनत्वाची वागणूक. त्यासोबतच अधोरेखित झाली आहे अठराविश्व दारिद्र्य लाभलेल्या संसाराचा गाडा हाकलताना झालेली दमछाक व ससेहोलपट अगदी ठळकपणे.

          वरील गीतात आईच्या घराला सोन्याची पायरी आहे असे म्हटले आहे. मग याला काय म्हणावे? कल्पनाविलास की अतिशयोक्ती? माहेरच्या बढाया की वास्तवता? मला मात्र यामध्ये एक भीषण वास्तविकता दिसते. ती सासुरवासीन जेव्हा सांगावा धाडण्यासाठी त्या पाखराला तिच्या माहेरगावी पाठविण्याचा बेत आखते तेव्हा तिचे माहेरघर पाखराला ओळखता यावे यासाठी तिच्या आईच्या घराची ओळख, खाणाखुणा सांगणे क्रमप्राप्तच ठरते. नेमकी येथेच तिची गोची झाली असावी. तिच्या आईच्या घराचे कवेलू, छप्पर, भिंती आणि दरवाजे हे नक्कीच सांगण्यायोग्य नसावे. खरं आहे ते सांगण्यासारखं नाही आणि खोटंही बोलायचं नाही अशी स्थिती जेव्हा उद्‍भवते तेव्हा अतिशयोक्तिपूर्ण कथन करून वेळ मारून नेणे, हाच तर मनुष्यस्वभाव आहे.  “जेव्हा एखाद्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते तेव्हा तो बढाईचा आधार घेत असतो” हेच तर त्रिकाल अबाधित शाश्वत सत्य. मग तिने सोन्याची पायरी सांगितली त्याचा वेगळा अर्थ कसा घेणार?

         त्यावरी (पायरीवर) बसजो, शिदोरी सोडजो म्हणजे काय? निरोप घेऊन जाणार्‍या पाखराला सोबत नेलेली शिदोरीच खाण्यास सांगायला ती विसरत नाही. का? उत्तर अगदी सोपे आहे, पाखराला तातडीने जेवायची व्यवस्था आईच्या घरी होऊ शकेल अशी परिस्थिती आईचीही नाही, हे तिला पुरेपूर ठाऊक असावे. तसे नसते तर तिने सोबत शिदोरी कशाला दिली असती? आईचे गाव लांब आहे, तेवढी मजल गाठेपर्यंत रस्त्याने भूक लागेल हा उद्देश असता तर मध्येच वाटेवरच्या एखाद्या विहिरीवर किंवा नदीवर बसून शिदोरी खायला सांगितले असते. आईच्या घरी पोचल्यावर पायरीवर बसून सोबतचीच शिदोरी खावी जेणेकरून पाव्हणा उपाशी नाही याचे समाधान आईला लाभेल व आईकडे पाव्हण्याला तातडीने जेवू घालायची व्यवस्था नसेल तरी तिची या फ़टफ़जितीपासून सुटकाही होईल, असा कयास बांधूनच तिने पाखराला नेमकी सूचना दिली, हे उघड आहे.

           आता हे गीत बघा. या गीतामध्ये एका सुनेला लागलेली माहेरची ओढ आणि सुनेला जर माहेरा जाऊ दिले तर शेतीत कष्ट करणारे दोन हात कमी होतील, या भितीने त्रेधातिरपट उडालेल्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांची हतबलताच दिसून येत आहे.

           नुकतेच लग्न होऊन सासरला नांदायला आलेल्या सुनेला तिच्या माहेरची आठवण होते, आईच्या आठवणीने जीव व्याकूळ झालेला असतो. तिकडे आईला सुद्धा लेकीची आठवण होऊन गहिवरलेले असते म्हणून मायलेकीची गाठभेठ करून देण्यासाठी बाप लेकीला घेण्यासाठी आलेला असतो. बाप घ्यायला आलेला बघून आनंदाने उल्हसित झालेली सून सासूला हळूच पण भीत-भीत विचारते.


हात जोडूनी पाया पडूनी
सासूबाई मी विनविते तुम्हाला
बावाजी आले घ्यायाला
जाऊ का मी माहेराला, माहेराला?


माहेराला जायची रीतसर परवानगी सूनबाई मागते आहे हे बघून सासू थोडी भांबावते. तिच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात. एक तर काहीना काही पैसा लागेलच जो घरात नाहीच. दुसरे असे की शेतीत कष्ट करणारे दोन हात पण कमी होणार. म्हणून ती सुनेला म्हणते.


कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा


कारलीच्या बियाणाची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सुनेला मनोमन पटतो. ती बेगीबेगी लागवड उरकते आणि पुन्हा सासूला विचारते.


कारलीचे बी लावलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


एक वेळ मारून नेता आली. कारलीचे बी लावून झाले पण आता पुढे काय? पुन्हा सासूबाई शक्कल लढवते.


कारलीचा वेल निघू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा


सून पुन्हा काही दिवस कळ काढते, बियाणे अंकुरून वेल निघेपर्यंत बियाला पाणी घालते, वेलीचे संवर्धन करते आणि मग वेल निघालेला बघून पुन्हा एकदा आपल्या सासूला विचारती होते.


कारलीचा वेल निघालाजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


सासूसमोर पुन्हा तोच यक्षप्रश्न. इकडे आड तिकडे विहीर. नाही म्हणता येत नाही आणि पाठवायला गेले तर संसाराचं अर्थशास्त्र कोसळते. कौटिल्याची अर्थनिती कळायला अर्थतज्ज्ञ किंवा अर्थमंत्रीच लागतो या सुशिक्षित समाजातील गोंडस समजुतीला उभा छेद देणारी एका अशिक्षित सासूची वर्तणूक.  मग तिथून पुढे नवनवीन युक्त्या लढविणे सासूचा नित्यक्रमच बनून जातो.


कारलीला फूल लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा


कारलीला फूल लागले की माहेराला जायला मिळणार या आशेने सून मात्र आलेला दिवस पुढे ढकलत असते.


कारलीला फूल लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


कारलीचा वेल मांडवावर गेलाय. वेल फुलांनी बहरून गेली. पण नशिबाच्या वेलीला बहर येईल तेव्हा ना.


कारलीला कारले लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा


आता प्रतीक्षेची घडी संपली. कारलीला कारले लागलेत. आता तरी परवानगी मिळायला हवी की नाही?


कारलीला कारले लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


आता कष्ट फळांस आले. कारली पण कारल्याने लदबदून गेली. पण कारली बाजारात नेऊन विकल्याखेरीज पैसा कसा येणार? म्हणून पुन्हा सासू सुनेला अगदी समजावणीच्या स्वरात सांगते


कारलीला बाजारा जाऊ दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा


कारलीला कारले लागलेत, कारली बाजारात गेली. आता मात्र नक्कीच परवानगी मिळणार अशी सुनेला खात्री आहे, म्हणून ती म्हणते


कारली बाजारात गेलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


कारली बाजारात गेली आहे. शेतीत पिकवलेला माल बाजारात जाणे, हा शेतीतील कष्ट फळांस येणारा परमोच्च बिंदू. खरे तर हे गीत यापुढे आनंदाच्या क्षणांकडे वळायला हवे. एवढ्या मेहेनतीने पिकविलेली कारली बाजारात जाणे हा कष्टाचे फळ पदरात पडण्याचा क्षण. शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मी येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शेतीत घाम गाळून पिकविलेला माल विक्रीस जाणे. माल विकायला बाजाराकडे गेलेला घरधनी घराकडे येताना लक्ष्मी घेऊन परतायला हवा. सोबत काहीना काही भातकं, खाऊ वगैरे आणायला हवा. पण इथून पुढे या गीतात तसे काहीच होत नाही. याउलट गीताच्या याच कडव्यापासून गीत विचित्र वळण घेते. निदान आतापर्यंत तरी कुठलाही खाष्टपणा न दाखविणार्‍या सासूचा स्वभाव इथूनच बदलायला लागतो. आजपर्यंत घरात एकमेकाशी गोडीगुलाबीने वागणारी माणसे आता नैराश्याच्या भावनेतून एकमेकांशी फटकून वागताना दिसत आहे. घरात चिडचीडपणा, उदासीनता वाढीस लागलेली दिसत आहे.

         नेमकं झालंय तरी काय? कारली मातीमोल भावाने तर नाही खपली ना? की कारलीच्या खरेदीला कोणी घेवालच मिळाला नाही? मनुष्यजातीचा स्वभाव त्याच्या आर्थिक स्थितीनुसार बदलत असतो हे समीकरण अर्थतज्ज्ञांच्या अर्थशास्त्रात बसत नसले तरीही तेच सत्य असावे. कारण या गीताचा शेवट नेमके तेच अधोरेखीत करून जातो.

आतातरी आपल्याला माहेराला जायला मिळणार की नाही या विचाराने ग्रस्त झालेली सून परत एकदा सासूला विचारती होते. सासूला खूश करण्यासाठी तिला तिच्या आवडीची कारलीची भाजी करून खाऊ घालते.


कारलीची भाजी केलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा


पण आता आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या घरातली सारी कहाणीच बदललेली असते. परिस्थितीसमोर निरुत्तर झालेली सासू चक्क सुनेसोबत त्रोटक स्वरूपात बोलायला लागते. तिची भाषा बदलते, भाषेची ढब बदलते आणि शब्दफ़ेकीची तर्‍हाही बदलते.


मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या सासर्‍याला, सासर्‍याला


अगं सूनबाई, माझी ना नाही पण एक शब्द मामंजीला पण विचारून घे ना. असे म्हटले असते तर ते समजण्यासारखे होते पण सासूची आता तशी सहज आणि सौदार्हपूर्ण बोलीभाषाच बदललेली दिसत आहे कारण "मला काय पुसते, बरीच दिसते" हे वाक्य वाटते तेवढे सहज नाही. या वाक्यात उद्वेग, उबग, क्लेश, चिडचिड, ग्लानी आणि फ़टकळपणा ठासून भरला आहे.
मात्र तरीही "सासर्‍याकडूनच परवानगी घ्यायची होती तर इतके दिवस तुम्ही कशाला उगीच बहाणे सांगत राहिल्या" असा प्रतीसवाल सून करीत नाही. सासूची इच्छा प्रमाण मानून सून आता सासर्‍याला विचारायला जाते.


मामाजी, मामाजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा


पण सासरा तरी वेगळं बोलणार? सुनेला माहेरी पाठवायचे म्हणजे निदान तिला जाण्यापुरता तरी घरात पैसा असावा की नाही? नसणारच. म्हणून तर तोही आपल्यावरची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलून मोकळा होतो.


मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या नवर्‍याला, नवर्‍याला


आता शेवटला पर्याय. तिची माहेराला जाण्याची हक्काची मागणी कोणीच समजून घेतली नाही. पण आता परवानगी देण्याचे अधिकार थेट नवर्‍याच्याच हातात आले आहे. तिच्या व्याकुळतेची तीव्रता नवर्‍याला तरी नक्कीच कळलेली असणार, असे तिला वाटते. तिला खात्री आहे की आता नक्कीच जायला मिळणार. बस्स एवढ्याच तर आशेपायी ती नवर्‍याला विचारायला जाते.


स्वामीजी, स्वामीजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा


पण प्राणप्रियेच्या प्रश्नाला नवरा उत्तरच देत नाही. नवरा काय म्हणतो हे गीतात लिहिलेच नाही. गीताचा दोन ओळीत थेट शेवटच करून टाकला आहे.


”घेतलीय लाठी, हाणलीय पाठी,
तुला मोठं माहेर आठवते, आठवते……!!”


             पीएचडी, डी.लिट मिळवून किंवा वेदपुराण, कुराण, बायबल, कौटिल्य, चाणक्य किंवा हजारो पानांचे अर्थशास्त्राचे पुस्तक वाचूनही जेवढे गाव, गरिबी आणि शेतीचे अर्थशास्त्र समजून घेता येत नाही त्यापेक्षा जास्त वास्तववादी अर्थशास्त्र ह्या एका गीतात सामावले आहे, याची मला खात्री आहे.

                                                                                                                        गंगाधर मुटे

…………………………………………………………………………………………………….
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
…………………………………………………………………………………………………….

0 प्रतिसाद:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं