Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Jul 27, 2011

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन


                भुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात. या गीतांचे गेयता आणि आशय हेच बलस्थान असल्याने त्यात रचनाशैली, खोटा समाजाभिमुख बेगडीपणा, आलंकारिक शब्दरचना वगैरे कृत्रिमरित्या अनावश्यकपणे घुसडण्याची त्या महिला गीतरचनाकारांना गरजच भासलेली दिसत नाही. मिरची-मसाला न वापरता आहे तेच वास्तव शब्दात उतरविण्याचा प्रयत्न केल्यानेच या गीतांना अस्सल अभिजातपणा आलेला आहे आणि म्हणूनच त्यात ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृतीचे अनेक पदर सहजपणे प्रतिबिंबित झालेले आहेत. हे गीत बघा.


वैदूदादा, वैदूदादा घरावरी चाल गा, चाल गा
बुढ्याचे मचले हाल गा, हाल गा
माही(माझी) सासू म्हणते गा, म्हणते गा
तुले खुट्याची म्हैस देते गा, देते गा.


                 घरात म्हातारा सासरा बिमार झालाय म्हणून वैद्याला बोलवताना त्याला उपचाराची फी म्हणून चक्क खुट्याची म्हैस देण्याचा वायदा करणे म्हणजे काय? नगदी फी का देऊ नये? शिवाय वैद्याची फी आणि म्हशीच किंमत यात खूपच तफावत आहे. या गीताचे दोन अर्थ निघू शकतात. 


                 खिशात रोकड नसली आणि एखादी वस्तू उधार मागायची म्हटले तर थेट तसे उधार न मागता आडवळणाने मागणी प्रस्तुत करायची एक पद्धत आहे. ती आजतागायत वापरात सुद्धा आहे. शेतकर्‍याच्या घरात वर्षातून एकदाच पैसा येत असल्याने व खर्च मात्र वर्षभर करावे लागत असल्याने त्याच्या उधारीचा प्रकारही दिर्घमुदतीचा असतो. स्वाभाविकपणे वैद्य वगैरे एकवर्षाच्या उधारीवर औषधोपचार करायला सहजासहजी तयार होत नसावेत म्हणून गरजेपोटी म्हैस देऊन किंवा म्हैस देण्याची भाषा करून उधारीवर औषधोपचार करून घेणे ही अपरिहार्यता असावी, हे स्पष्ट आहे.


                किंवा दुसरा अर्थ असाही निघतो की, सासर्‍याचा जीव वाचविण्याच्या बदल्यात वैद्याला म्हैस देण्याची भाषा सासू-सुनेने स्वेच्छेनेच केली असावी. शेतकर्‍याला बळीराजा म्हणतात कारण बळीराजाच्या दानशूरपणाचा गूण शेतकर्‍याच्या रक्तामासांत पुरेपूर भिनलेला आहे. आजही शेतकरी समाजाएवढे दानशूर दुसरे कोणीच नाही. अन्नदानाच्या बाबतीत आजही शेतकरी समाज सर्वात पुढे आहे. गणेश स्थापना, महालक्ष्मी स्थापना, माऊंदे, बारसे, लग्नकार्य, व्रतांचे उत्थापन या निमित्ताने शेतकर्‍याच्या अंगणात जेवढ्या पंगती बसतात, तेवढे अन्नदान अन्य कोणत्याच समाजात होत नाही, ही वास्तविकता आहे. वर्षभर घरात चटणी-भाकर खायची पण अन्नदान करताना इतरांना वरण-भात-भाजी-पोळी खाऊ घालायची हा शेतकरी समाजाचा धर्मच बनला आहे. ही वृत्ती चांगली की वाईट, हा स्वतंत्र वादाचा विषय असू शकेल पण शेतकरी माणसापेक्षा पन्नास पटीने अधिक मिळकत मिळविणारी बिगर शेतकरी मंडळी आपली संपूर्ण मिळकत स्वतःच्या स्वतःपुरत्या मर्यादित प्रपंचातच खर्च करीत असतात. स्वतः फारसे दान वगैरे करीत नाहीत आणि शेतकरी करतो त्याचे कौतुकही करीत नाहीत, याउलट "शेतकरी उधळखोर असल्याने कर्जबाजारी होतो’’ असा शिक्का मारून मोकळे होतात.


               शेतकर्‍यांमधील दानशूरपणाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. शेतकर्‍याच्या घरी येणारा पाहुणा कधीच उपाशी जात नाही. चहा-सुपारीवर पाहुण्याची बोळवण करणे अजूनही शेतकर्‍याला जमलेच नाही. अर्धा लाख मासिक मिळकत मिळवूनही भिकार्‍याच्या ताटात चार आणे टाकण्यासाठी का-कू करणे किंवा त्याऐवजी भिकार्‍याला दुनियाभराची अक्कल सांगत सुटणार्‍यांच्या या देशात आजही शेतकर्‍याच्या दारात भिक्षेकरी गेला तर त्याच्या झोळीत अगदीच सहजपणे शेर-दोन शेर धान्य पडतच असते. स्वेच्छेने लोकवर्गणी देऊन गावात एखादा सार्वजनिक उत्सव साजरा करणे त्याच्या अंगवळणीच पडले आहे.


             विनोबांच्या भूदान यज्ञात शेतजमीन दान करण्याची हिंमत शेतकर्‍यांनी दाखविली आहे. जनावरे (मुख्यत: गाय) दान करण्याची फार जुनी परंपरा आहे. काही काळापूर्वी झाडे सुद्धा दान दिली जात. आजही महसूल खात्याच्या नोंदी तपासल्या तर शेतीची मालकी एकाची आणि त्याच शेतातील झाडाची कायदेशीर मालकी दुसर्‍याची, असे प्रकार आढळतात.


शहरातील मनुष्य जर खेड्यात शेतकर्‍याकडे आला तर येताना सोबत रिकामी पिशवी घेऊन येतो. शेतकरीही अगदी आनंदाने चिंच, बोर, आंबे, संत्री, केळी, वांगी, मिरची, टमाटर, कोबी यापैकी त्याच्याकडे जे उपलब्ध असेल त्या वस्तूंनी ती रिकामी पिशवी भरून देतो. त्याचा तो कधीच मोबदला घेत नाही कारण रिकामी पिशवी घेऊन येणारा कधी मोबदला देतच नाही. मला अगदी बालपणापासून पडलेला प्रश्न असा की हे वनवे ट्रॅफिक का? शहरी माणसाला शेतकर्‍याकडून ताजा भाजीपाला, फुले फळे प्रेमाच्या नात्याखातर विनामूल्य घेऊन जावे असे वाटत असेल तर त्यात गैर काहीच नाही; पण येताना तो पिशवी रिकामीच का घेऊन येतो? शहरामध्ये असे अनेक पदार्थ असतात की जे शेतकर्‍यांनी कधीच पाहिलेले किंवा खाल्लेले नसतात. बालूशाही, बर्फी, चमचम, रसगुल्ला, फरसाण वगैरे तर लहानसहान शहरातही उपलब्ध असतात. मग शहराकडून खेड्याकडे येणारी पिशवी हमखास रिकामीच का असते? ज्याला इकडून काहीतरी घेऊन जायची सुबुद्धी असते त्याला तिकडूनही काहीतरी घेऊन येण्याची देव सद्‍बुद्धी का देत नाही? शेतकर्‍यांनी हे पदार्थ खाणे त्यांच्या प्रकृतीला हानिकारक असते काय? की शेतकर्‍याला हे पदार्थ पचतच नाही, खाल्ले तर शेतकर्‍याला अंदाधुंद ओकार्‍या होतील असे शहरी माणसाला वाटते?  बरे या एकतर्फी प्रेमाचे समीकरण शेतकर्‍याच्या लक्षात येत नसेल काय? बहुतेक नाहीच कारण पाहुण्याची पिशवी भरून देताना त्याच्या चेहर्‍यावर जे समाधान उमटते ते काही औरच असते. त्याची नैसर्गिक दातृत्ववृती अधोरेखित करणारे असते.



             वरील गीताचा समीक्षणात्मक अंगाने विचार केल्यास या गीतात गेयता, यमक आणि आशय वगळता अलंकार, उपमा, लेखनकौशल्य वगैरे फारसे आढळणार नाही पण आशयगर्भिता हेच या गीताचे बलस्थान आहे. चार ओळीच्या या गीतातील शब्दयोजना अत्यंत समर्पक व नेमकी असून दोनशे पानाचे पुस्तक लिहूनही जो आशय नेमकेपणाने व्यक्त करणे कठीण जाईल, एवढा प्रचंड आशय या गीतात ठासून भरला आहे. 


               मचने हा शब्द सध्या प्रमाणभाषेत वापरला जात नाही आणि मचणे या शब्दाचा नेमका अर्थ व छटा प्रकट करणारा दुसरा पर्यायी शब्द प्रमाणभाषेत उपलब्ध नाही. मर्यादित शब्दात गेयता राखून अमर्याद आशय व्यक्त करायचा असेल तर "मचणे" या शब्दासारखे शब्द भाषेत असणे अत्यंत आवश्यक आहे आणि मोजक्या शब्दात बरेच काही व्यक्त करणारे शब्द असल्याखेरीज कोणत्याही भाषेला भाषासमृद्धी येऊ शकत नाही, हेही लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे. 


                   बुढ्याचे मचले हाल याचा अर्थ वयाने म्हातारपणाकडे झुकलेल्या सासर्‍याला काहीतरी भयानक बिमारी झाली आहे. त्याच्या शरीरात उठणार्‍या कळा आणि आत्यंतिक वेदनांमुळे तो विव्हळत, तळमळत किंवा तडफडत आहे, असा होतो.

                     जेथे मला अर्थ लिहायला दोन वाक्य व बावीस शब्द वापरावे लागले व पद्याचे गद्य झाले तेथे तेवढाच आशय या गीतामध्ये "बुढ्याचे मचले हाल" या तीनच शब्दात व्यक्त झालाय आणि गेयताही निर्माण झाली. हे शक्य झाले ते केवळ मचले या शब्दाच्या वापरामुळेच.


                       गीतामध्ये वैद्यबुवाला घरावरी म्हणजे घरापर्यंत चाल असे म्हटलेले आहे, घरी ये असे म्हटलेले नाही. घरी ये असे म्हणण्यामध्ये औषधोपचार करण्यासाठी घरी ये असा अभिनिवेश असतो. 


                   मात्र घरापर्यंत चाल याचा वेगळा अर्थ लागतो. खरे तर पेशंटला जेवढी वैद्याची गरज असते तितकीच किंवा त्यापेक्षाही जास्त गरज "पापी पेट का सवाल है" या न्यायाने वैद्याला पेशंटची असायला हवी. ज्या घरात आजारी व्यक्ती आहे ते घर जर ऐश्वर्यसंपन्न आणि आर्थिक सुदृढ असेल तर उपचारासाठी बोलावताना वैद्याची मिनतवारी करायची गरज भासूच नये. कर्तव्यदक्षता किंवा पैशाचा मोह या दोन कारणापैकी निदान एका कारणाने तरी वैद्याने आजारी माणसाच्या घराकडे पळतच सुटायला हवे. पण या गीतातील आशयाचा मामला जरा वेगळा आहे. या म्हातार्‍याच्या घरची आर्थिक स्थिती वैद्याला माहीत असणार म्हणून तो चालढकल करीत असावा. म्हणून सून जे म्हणते त्याचा अर्थ असा की,


                "हे वैद्यराजा, तू मला माझ्या थोरल्या दादासारखा आहेस. तू केवळ माझ्या घरापर्यंत चल. उधारीवर उपचार करायचे किंवा नाही याचा निर्णय तू नंतर घे, मला खात्री आहे की, तू घरापर्यंत आलास तर माझ्या सासर्‍याच्या वेदना पाहून तुझे अंतःकरण नक्कीच द्रवेल. समोरचे दृश्य बघून व्यावसायिक विचार बाजूला पडेल, उधार की नगदी यापेक्षा पेशंट व वैद्य यांच्यातील नात्याची आठवण तुला होऊन तुझ्यातला वैद्य जागा होईल. म्हणून तू इथून ऊठ, फक्त माझ्या घरापर्यंत चल आणि एक नजर माझ्या सासर्‍यावर तर टाक." 


               या चार ओळीच्या गीताची नायिका सून आहे. सामाजिक भान हरवलेल्या एखाद्या साहित्यश्रेष्ठ कवीने ही कविता लिहायला घेतली असती तर आजारी सासरा आहे मग वैद्याला बोलवायला सासूच जाऊ शकते, सुनेसाठी कवितेत स्थानच निर्माण होत नाही असे गृहीत धरून सासूलाच नायिका बनविले असते. पण या गीतात तसे झाले नाही. सून-सासू-सासरा या नात्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न येथे झालेला दिसतो. या घरातली सून "सासरा माझा कुरकूर करे, तिकडेच मरू दे त्याले, भवानी आई रोडगा वाहीन तुले" असे म्हणणार्‍यापैकी नक्कीच नाही. सासर्‍याचे दु:ख पाहून व्याकूळ होणारी आहे. म्हातार्‍याच्या उपचारासाठी खुट्याची म्हैस देऊन टाकू म्हणणार्‍या सासूचे ती समर्थन करते. सासू सासर्‍यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणार्‍या उच्चभ्रू सभ्य संस्कृतीचा तिला अजूनतरी वारा लागलेला दिसत नाही.


                      खुट्याची म्हैस देणे हे सुद्धा आशयगर्भ वाक्य आहे. तुकारामांनी "भले आम्ही देऊ कासेची लंगोटी" असे म्हटले. कासेची न म्हणता नुसतीच लंगोटी देऊ म्हटले असते तर त्याचा अर्थ परिणामकारकतेने प्रकट झालाच नसता. तसे म्हैस देणे आणि खुट्याची म्हैस देणे यातही फरक आहे. म्हैस देतो म्हणणे याचा अर्थ अनेक म्हशीपैकी एक देतो, असा निघू शकला असता. पण खुट्याची म्हैस देतो याचा अर्थ खुट्याला असलेली एकमेव म्हैस असाच घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत खुट्याची म्हैस देण्याची भाषा दानशूर वृत्ती किंवा आत्यंतिक विवशता या दोनपैकी निदान एक तरी कारण स्पष्टपणे अधोरेखित करून जाते.


            या चार ओळीच्या गीतातील एकेक शब्द तोलून-मापून वापरलेला दिसत आहे. नेमक्या शब्दप्रयोगामुळे मर्यादित शब्दामध्ये अमर्याद आशय गुंफणारे कवित्व अशिक्षित ग्रामीण महिलांनी गेयस्वरूपात कवन केले आहे. पण या भुलाबाईच्या गीतांकडे साहित्यक्षेत्राने कधीच गंभीरतेने पाहिलेले दिसत नाही. ग्रामीण अशिक्षित जनजीवनामध्येही तोलमोलाचे काव्य रचण्याचे अंगीभूत कौशल्य असू शकते, भुलाबाईंची गाणी सुद्धा साहित्यक्षेत्राला मार्गदर्शक ठरू शकतात असे गृहीत धरून जर काव्यजगताची पुढील वाटचाल झाली असती तर मूठभर आशय व्यक्त करण्यासाठी ढीगभर शब्दांचे मनोरे रचून गेयता गमाविलेल्या गद्यस्वरूपातील निबंधांना कविता म्हणण्याचा प्रघातच पडला नसता. कवितेने सामाजिक बांधीलकी जपली असती तर कवीही स्वतःच्या एकलकोंड्या मानसिकतेतून बाहेर येऊन समाजाशी एकरूप झाला असता. कवितेला जनसामान्यांच्या सुखदु:खाची किनार लाभली असती तर कविता आमजनतेच्या भावविश्वाशी समरस झाली असती. आहे ते वास्तव साकारण्याचा प्रयत्न झाला असता तर कवितेच्या विषयामध्ये विविधता आली असती व काव्य लोकाभिमूख झाले असते आणि जर असे झाले असते तर कवी आणि कविता हा चेष्टेचा व उपहासाचा विषय नक्कीच झाला नसता अशी आता माझी खात्री पटायला लागली आहे.


                                                                                                                                गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------------

0 प्रतिसाद:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं