नव्या यमांची नवीन भाषा
मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषाकठीण मातीत रूजणार्या, नव्या बियांची नवीन भाषा
पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा
नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके
नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा
नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्या, नव्या मुळांची नवीन भाषा
अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा
कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा
गंगाधर मुटे
.........................................................................
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : पिकांची
रदीफ : नवीन भाषा
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा........................................................................
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.