Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Feb 27, 2013

माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस

माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस

नमस्कार मित्रहो,

                 आज २७ फेब्रुवारी, कवीवर्य कुसूमाग्रजांचा जन्मदिवस. हाच दिवस "जागतीक मराठी भाषा दिवस" म्हणून पाळला जातो. योगायोगाने आज माझ्याही आंतरजालावर वावरण्याला १२०० दिवस पूर्ण होत आहे.

                नोव्हेंबर २००९ मध्ये मी अकस्मात आंतरजालावर आलो. आंतरजालावर १-२ लेख लिहिल्या नंतर इंटरनेटसुद्धा शेतकर्‍यांसाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते, याची जाणिव झाली. एका क्लिकमध्ये आपले विचार सातासमुद्रापल्याड जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकते, जगभरातील मराठी माणसांशी आपण संवाद साधू शकतो; या बाबींनी माझ्यावर एवढी भूरळ घातली की मी मग मागे वळून पाहिलेच नाही.

                मायबाप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझी वांगेमय/वांगंमय शेती तोट्यात गेली असली तरी मायबाप इंटरनेट आणि रसिकांच्या कृपेने माझ्या वाङ्मयशेतीला मात्र चांगले भाव मिळत आहेत, हे संकेतस्थळावरील वाचक/वाचनांच्या संख्येवरून निर्विवाद सिद्ध व्हायला लागलेलं आहे.

मागील १२०० दिवसांचा लेखाजोखा :-

माझे संकेतस्थळ/ब्लॉग आणि कंसात वाचने/वाचकांची संख्या.

०१) gangadharmute.wordpress.com - माझी वाङ्मयशेती - (६३,९६५) -
                                                                             सलग दोनदा स्टार/एबीपी ब्लॉग माझा पुरस्कार प्राप्त.

०२) www.baliraja.com - बळीराजा डॉट कॉम - ( ५७,३९० ) 

०३) www.sharadjoshi.in - योद्धा शेतकरी - ( ३१,०७०)

०४) baliraja.wordpress.com - बळीराजा - ( २५,८०६  ) 

०५) gangadharmute.blogspot.com - शेतकरी विहार - ( १२,५०३ ) 

०६) gangadharmutespoem.blogspot.in - माझी कविता - (१४,५७२)

०७) marathigazal.wordpress.com - माझी मराठी गझल - ( ५,९०४ ) 

०८) shetkari-sanghatana.blogspot.com - शेतकरी संघटना - (३,२२५)

०९) ranmewa.blogspot.in - रानमेवा - ( २८०४ )

खालील संकेतस्थळावरील लेखन वाचकांची एकूण संख्या उपलब्ध नाही.
मात्र ती सुद्धा काही लाखाच्या घरातच असणार हे स्पष्ट आहे.

                एकूणच शेतीसाहित्य वाचनाबाबत असलेली वाचकांची उदासिनता आणि मुद्रित शेतीसाहित्याला दुर्मिळ असलेला नागरी वाचकवर्ग हा आजवरचा इतिहास लक्षात घेतला तर आंतरजाल हे शेतीविषयासाठी फार मोठे व्यासपीठ ठरू शकेल, याबद्दल आता माझ्यामनात तिळमात्रही शंका उरलेली नाही.

                                  Thank you Mr Internet!


                                                                                          - गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------


Facebook
-----------------------------------------------------------------------------------------

Feb 23, 2013

नागपुरी तडका - ई पुस्तक

                 ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे या प्रकाशनसंस्थेने "नागपुरी तडका" हा माझा Online कवितासंग्रह आज प्रकाशीत केलाय, त्याबद्दल मी "ई साहित्य प्रतिष्ठान" चमूचा आभारी आहे.
                                                                                                                   
*  *  *  *
PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता चित्रावर क्लिक करा.
प्रकाशकाचे दोन शब्द

                          मराठी अमृताहून गोड भाषा. पण तिच्या ग्रामीण बोलींना जो गोडवा, तजेला आणि मसालेदार झणझणीत तडका आहे तो पुस्तकी शहरी मराठीत नाही. कोकणची खुमासदार मालवणी घ्या किंवा कोपरखळ्या मारणारी अहमदनगरची नगरी , सणसणीत गोळीबंद आगरी किंवा मिठ्ठास खानदेशातली अहिराणी. गांवोगांवच्या या भाषांची मज्जाच न्यारी. अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर तांबड्या रश्शासारखी. ज्यांनी अशा भाषांतून व्यवहार केला नाही ते कमनशीबीच. या भाषा म्हणजे अस्सल संस्कृतीची खाण आहे. त्यामुळे आज वऱ्हाडी भाषेतल्या या कवितांची मेजवानी तुमच्यासमोर आणताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. 

                          पण गंगाधर मुटे यांच्या नागपुरी तडक्यात केवळ भाषेचा फ़ुलबाग नाही. काळजाची आग आहे. उपाशी शेतकऱ्याच्या पोटात खवळणाऱ्या अॅसिडमधल्या या कविता आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्यांवर अश्रू गाळणारं भरपूर लिखाण आजवर झालंय. “बिचारा शेतकरी” असंच विदर्भातल्या शेतकऱ्याचं वर्णन इतर लेखक कवी करतात. मनापासून त्यांना त्याच्या दुःखाची संवेदना जाणवते यात वाद नाही. पण गंगाधर मुटेंच्या कवितेत हाच शेतकरी हात पसरून नाही तर मुठी वळून येतो. वाकून नाही तर ताठ मानेने येतो. गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागतो. त्यांची जनता बिचारी नाही तर विचारी आहे. आणि ती अविचारी होण्यापुर्वी पिळणाऱ्यानी आणि गिळणाऱ्यानी सावध व्हावे असा इशारा ती घेऊन येते. त्यांचा शेतकरी “खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालणाऱ्या” पुढाऱ्यांना खणखणीत दणके घालणारा आहे. 

                          गंगाधरजींच्या कविता मरगळलेल्या शेतकऱ्याला स्फ़ूर्ती देणाऱ्या आहेत. या कविता केवळ आरामखुर्चीतलं वाचन नाहीत. भविष्यकाळाला घडवण्याची ताकद असलेल्या जनसंमर्दाला झोपेतून जागं करणाऱ्या आहेत. आपल्याला त्या नक्की आवडतील.

PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता येथे क्लिक करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------
अंक वाचण्यासाठी अंकावर क्लिक करा. 
पाने पलटण्यासाठी पानाच्या काठावर क्लिक करा.


-----------------------------------------------------------------------------------------------------

Feb 21, 2013

कान पकडू नये


कान पकडू नये


आता कुणी कुणाचे कान पकडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये

ते दान का मिळाले? जे टाळले सदा
असले पुन्हा नव्याने सहसा घडू नये

शोधेन मीच माझा, रस्ता पुन्हा नवा
त्या मूक दर्शकांनी सहसा रडू नये

निद्रिस्त मीच केल्या माझ्याच जाणिवा
संवेदनेवरी या मीठ रगडू नये

कोणास कोण प्याले, कळतेच ना कधी
नातेच बाटलीशी सहसा जडू नये

म्हणतात वाहवा, व्वा! स्त्रीरम्य वेड ते
सच्चा विचार सहसा का आवडू नये?

सजतात रोज येथे कित्येक मैफ़िली
कोणास न्याय्य मुद्दा का सापडू नये?

झाले अता पुरेसे, ते बोलले बहू
बाळंत होत ना ती, चर्चा झडू नये

सोसून ऊन वारा, अंकूरतो अता
कोंबेजण्याच आधी सहसा सडू नये

आता कुठे जरासा झालोय मुक्त मी
पायास साखळ्यांनी परत जखडू नये

माझ्याकडे मुळीही किल्ल्या न शिल्लकी
माझ्याविना कुणाचे सहसा अडू नये

हे अन्न सात्त्विकाचे ये ’अभय’ भोजना
मंगल अशा प्रसंगी सहसा दडू नये

                                   - गंगाधर मुटे
………………………………………………
वृत्त : विद्युल्लता
काफिया : पडू
रदीफ : नये
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगा
………………………………………………

Feb 19, 2013

पांढरा किडा

पांढरा किडा

तुझी सांग येथे दखल कोण घेतो
कशाला घशाला उगा त्रास देतो

असामान्य विश्लेषकांच्या भितीने
गझल घप्प कपड्यात झाकून नेतो

नवे रोप लावत पुढे चालताना
कुणी सांड मागून तुडवीत येतो

पिके फस्त केली फळे पोखरूनी
कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो

अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो

                                   - गंगाधर मुटे
……………………………………
वृत्त : भुजंगप्रयात

Feb 16, 2013

तुला कधी मिशा फुटणार?

तुला कधी मिशा फुटणार?

पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर

पंचम स्वरात बोलणे तुझे, गैरवाजवी नसेलही
पण; मुजोरीची किंमत काय? पुरेसे नाक कटल्यावर

काही औषध उरले नाही, मित्रा तुझ्या स्वभावाला
मिळणार केव्हा शांती तुला! माझे डोळे मिटल्यावर?

राखेशिवाय दुसरे आता अन्य काय उरले येथे?
अवश्य धावून तू आलास खरा; पण आग विझल्यावर

तुझ्याशी वाद घालणे असा माझा उद्देश नसतोच
तरी वेळ येते कधीकधी, डोक्यात भूत शिरल्यावर

तुमची चर्चा चालू ठेवा, अशी, जशी वाटेल तशी
मी मात्र शब्दांना माळेत गुंफतो मला स्फुरल्यावर

निष्कारण वार केलास तू म्हणून फणा उचलला, पण;
जा तुला मी ’अभय’ देतो तू आता मागे हटल्यावर

                                                   - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------

Feb 15, 2013

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता...।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं
मंग म्हणान माही तलवार अशी काही चालली
एका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली
चूलीमागं औरंगजेब जीव लपवत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

रावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली
तळपायीची आग माह्या मस्तकात गेली
तोडून त्याचे नऊ मुंडके, मी संग घेऊन आलो
पण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो
काय करू, काय नाही; मले समजत नाही आता
अन्
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता... ॥

                                                  - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------

Feb 14, 2013

लगान एकदा तरी..... (हझल)

लगान एकदा तरी..... (हझल)

चरेन शासकीय कुरण-रान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री
बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी

क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का?
तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी

शिकून घे धडे लढायचे हिरोकडे अता
बघून थेटरात घे लगान एकदा तरी

कधी विचारतेय का अभय इथे कुणी तुला?
जरा गप बसणार का? गुमान एकदा तरी

                                             - गंगाधर मुटे
....................................................................................................
वृत्त : कलिंदनंदिनी     काफिया : महान    रदीफ : एकदा तरी 

लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
....................................................................................................

Feb 13, 2013

गहाणात ७/१२.....

गहाणात ७/१२.....

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

जिथे ढेप-सरकी तिथे थांबते ही
घरी खात नाहीच चारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

अता अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे

बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

कधी झोप मोडेल सुस्तावल्यांची?
किती वाजवावा नगारा वगैरे

इथे पावलोपावली लाचखोरी
कुणाचाच नाही दरारा वगैरे

’अभय’ भोवती घे लपेटून धारा
प्रवाहास नसतो किनारा वगैरे

                                  - गंगाधर मुटे
------------------------------------------
(धन्यवाद वैभव जोशी)

Feb 12, 2013

सातवे अ.भा.मराठी गझल संमेलन, आष्टगाव

सातवे अ.भा.मराठी गझल संमेलन, आष्टगाव 


                  गजल सागर प्रतिष्ठान तर्फे मोर्शी तालुक्यातील आष्टगाव (जि. अमरावती) येथे उभारलेल्या सुरेश भट गजलनगरीत दि. ९ आणि १० फेब्रुवारी २०१३ रोजी सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आष्टगाव हे गझलनवाज श्री भिमराव पांचाळे जन्मगाव आहे. अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद सोनेवाने तर उद्‌घाटक म्हणून गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे अध्यक्ष आणि दुबईच्या मिटकॉन इंटरनॅशनल चे संचालक डॉ.संदीप कडवे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी साहित्य संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके, उर्दूचे प्रख्यात शायर जनाब नसिम रिफअत ग्वालियरी, मुंबई येथील विक्रीकर सहआयुक्त सुभाष येंगडे तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन जोशी, आष्टगावच्या सरपंच कांताबाई इंगळे, आमदार ऍड. यशोमती ठाकूर, आमदार डॉ. अनिल बोंडे, गजलकार ए. के. शेख, सिद्धार्थ भगत, अमर हबीब, संमेलनाचे निमंत्रक गजलनवाज भीमराव पांचाळे व्यासपीठावर विराजमान होते.

Bhimrao Panchale
सुरेश भट गजलनगरी

                  यावेळी गजलनवाज भीमराव पांचाळे म्हणाले, आपण ज्या गावात वाढलो, ज्या डोंगरदर्‍यांमधून फिरलो, ज्या गावात आपल्याला आद्यस्वर गवसला, त्या गावात संमेलन व्हावे, अशी माझी इच्छा होती. जात्यावरचे आईचे गाणे हाच माझा आद्य स्वर होता. आईच्या मांडीवर डोके ठेवून गाणे ऐकताना मी झोपी जायचो. शिवरात्रीला सालबर्डीला जाणार्‍या भाविकांच्या ‘महादेवा जातो गा...’ या पहाडी स्वरांनी मनात घर केले. आपली पत्नी गोव्याची. मात्र तिला आपल्यापेक्षाही या गावाची ओढ अधिक. गावकरी, मित्र यांच्या सगळ्यांच्या आग्रहातून हा विचार समोर आला आणि हे संमेलन आज आष्टगावात होत असल्याचे भीमरावांनी सांगितले. ४२ वर्ष आपण गजल गात आहोत. हा प्रवास आज निर्णायक वळणावर आला असल्याचेही भीमराव पांचाळे यांनी स्पष्ट केले.

गझलनवाज
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सुरेश भटांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

                  न्यायाधीश मदन जोशी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रख्यात शायर नसीम रिफअत यांनी शेरोशायरी सादर केली. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सुरेश भटांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रास्ताविकातून गज़लनवाज भीमराव पांचाळे यांनी आपल्या गावच्या मातीची ओढ म्हणून आष्टगावात संमेलन घेण्याचा माझा मनोरथ या संमेलनानिमित्ताने पूर्ण होत असल्याची भावना व्यक्त केली. पहाडी रागातील "महादेवा जातो गाऽ' या ओळी गुणगुणून त्यांनी सभागृह आपल्या सुरेल स्वरांनी भारावून टाकले.
                  याप्रसंगी "गज़लसागर'च्या गज़लसंमेलन विशेषांकाचे तसेच "मराठी गज़ल : सुरेश भटांनंतर' या प्रातिनिधिक गजलसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. दुबईकरांच्या वतीने भीमराव पांचाळे यांचा संदीप कडवे यांच्या हस्ते; तर लाखनीवासींतर्फे संमेलनाध्यक्ष प्रल्हाद सोनेवाने यांचा प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


भिमराव पांचाळे
 याप्रसंगी "गज़लसागर'च्या गज़लसंमेलन विशेषांकाचे तसेच "मराठी गज़ल : सुरेश भटांनंतर' या प्रातिनिधिक गजलसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

                      सातव्या अ. भा. मराठी गज़लसंमेलनाच्या उद्‌घाटकीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानाहून बोलताना वसंत आबाजी डाहाके यांनी आष्टगावसारख्या छोट्याशा खेड्यात अखिल भारतीय स्तरावरचे मराठी गज़लसंमेलन होणे हा अपूर्व योग असल्याचे म्हटले. गज़ल मराठीत आणण्याचे खरे श्रेय सुरेश भटांचेच, असे सांगून गज़ल हा रूपबंध जे मागतो, त्या दिशेकडे वळणे खरोखर कठीण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
                        खास दुबईहून गज़लसंमेलनाकरिता आलेले संदीप कडवे यांनी आपल्या उद्‌घाटकीय भाषणात बोलताना गज़लचे माहेर आखातात असल्याने पुढचे अखिल भारतीय मराठी गज़लसंमेलन आखातात झाल्यास गज़ल आपल्या माहेरी आल्यासारखे होईल, असे प्रतिपादन केले. आखातात मराठी गज़लसंमेलनाच्या आयोजनाच्या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत, असे त्यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
                       गज़लचे शब्द विश्‍वशांती व राष्ट्रशांतीचे दूत व्हावेत; तसे ते क्रांतीची मशालही व्हावेत. आमची गज़ल ही वर्तमानातील प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी त्यांचा सूक्ष्मदृष्टीने विचार करण्यासाठी तत्पर असली पाहिजे. समाजातील दुःख, दैन्य व दारिद्य्र पाहून ती कळवळली पाहिजे, अन्याय पाहून ती चिडली पाहिजे, त्याविरोधात झुंजली पाहिजे व पेटून उठली पाहिजे, असे प्रतिपादन सातव्या अखिल भारतीय मराठी गज़लसंमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनेवाने यांनी व्यक्त केला.

Marathi Gajhal
एक चिमुकली गझल सादर करताना


गझलनवाज
गझलनवाज भिमराव दादा आणि जेष्ठ गझलकार ए.के.शेख यांच्यासोबत गझलकार सुप्रिया जाधव, प्राजक्ता पटवर्धन आणि गंगाधर मुटे

------------------------------------------------------------------------------------------------------------
सातव्या अखिल भारतीय मराठी गज़ल संमेलनाच्या निमित्ताने मराठी गझल समेलन विशेषांक काढण्यात आला.
अंक वाचण्यासाठी अंकावर क्लिक करा.
पाने पलटण्यासाठी पानाच्या काठावर क्लिक करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------

Feb 9, 2013

नव्या यमांची नवीन भाषा


नव्या यमांची नवीन भाषा
मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा

पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा

नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके
नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा

अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा

कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा

श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा

गंगाधर मुटे
.........................................................................
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : पिकांची
रदीफ : नवीन भाषा
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा
........................................................................

Feb 8, 2013

एकदा तरी

          एकदा तरी


सकाम कर्म त्यागुनी निदान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

नसेल आपले तरी कशास हक्क सांगणे?
समानतेस न्याय दे किमान एकदा तरी

महान, थोर, श्रेष्ठ हे बिरूद फ़ार मिरवले
जगून दाव माणसासमान एकदा तरी

स्वराशिवाय रेकलो असाच मी बरेचदा
निघेल सूर कोकिळे समान एकदा तरी?

उदास चेहरा असा कसा मलूल जाहला?
हसा बघू जरा हळूच छान एकदा तरी

खरीदण्यास पाहतोस स्वाभिमान आमचा
करेन बंद मी तुझे दुकान एकदा तरी

सजा सुनावणे अभय कठीण काय त्यात; पण
बघा धरून आपलेच कान एकदा तरी

                                                - गंगाधर मुटे
……………………………………………………
वृत्त : कलिंदनंदिनी
काफिया : महान
रदीफ : एकदा तरी
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

……………………………………………………

Feb 7, 2013

नेते नरमले

नेते नरमले

मोठे गरजले
छोटे बरसले

रेती वाहतच
गोटे अडकले

मते पाहताच
नेते नरमले

ललना पाहून
कपडे शरमले

चकवेही आज
रस्ता भटकले

शिपाई मजेत
कैदी सटकले

बिल्डर म्हणताच
मंत्री दचकले

काजवे रात्री
अभय चकाकले

                 - गंगाधर मुटे
====================

Feb 6, 2013

भारी पडली जात


         भारी पडली जात


पोळून गेले तरी कधीच मी, आखडले ना हात
तुझे जिंकणे असे भावले, की खात राहिलो मात

बोलत होती ती अशी की, मी गुंतून गेलो पार
जरा न कळले केव्हा कशी ती, उलटून गेली रात

वाटेवरती काटे बोचरे, पसरून होते दाट
आता पोचलो कसाबसा मी, कित्येक खस्ता खात

एकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात
आतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत

सूर बोबडे ऐकून माझे, मुरडून घेती नाक
नसेल जर का आवड माझी, मी बसू कशाला गात?

नारळ फुटला, प्रसाद वाटू, बोलून गेलेत काल
वाट पाहतोय इथे अजूनी, घासून बसलो दात

गुणवत्तेचा गळा दाबुनी, हा निकाल आला आज
कर्तृत्वाचा बोर्‍या वाजला, नि भारी पडली जात

भिती मनातील आता तरी तू, पुरुनी दे वा जाळ
अभय जगावे,कसे जगावे, तू घ्यावे करुनी ज्ञात

                                           - गंगाधर मुटे
.........................................................................

Feb 1, 2013

"रानमोगरा - माझी वाङ्मयशेती" दूरदर्शनवर

ABP Majha

"रानमोगरा - माझी वाङ्मयशेती" दूरदर्शनवर


एबीपी माझा TV - ब्लॉग माझा पुरस्कार सोहळा 


                       एबीपी माझा TV व्दारा नोव्हेंबर २०१२ मध्ये ब्लॉग माझा-४ या जागतीक ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेत माझ्या "रानमोगरा" या ब्लॉगला पुरस्कार मिळाला. 


               माझ्या "रानमोगरा" (http://gangadharmute.wordpress.com/) या ब्लॉगला सलगपणे दुसर्‍यांदा हे पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेचे निकाल जाहीर झाल्यानंतर २७ जानेवारी २०१३ रोजी एबीपी माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. ब्लॉग माझा-४ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याच्या समारंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे एबीपी माझा TV वर दिनांक ०३ फ़ेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी १२:३० वाजता प्रक्षेपण करण्यात आले. 

दिनांक रविवार, ३ फेब्रुवारी २०१३

वेळ - दुपारी १२.३० वा.

चॅनेल - एबीपी माझा


 "रानमोगरा" विषयी प्रसारीत झालेली ३.१९ मिनिटांची VDO क्लिप 
------------------------------------------------------------------------------------------------------------------

ABP Majha
परिक्षकासोबत विजेत्यांचा ग्रूप फ़ोटो
*
------------------------------------------------------------------------------------------------------------

एबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती



Blog Majha
एबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती

                एबीपी माझा या मराठी सॅटेलाइट दूरदर्शन वाहिनीने आयोजित केलेल्या ‘ब्लॉग माझा २०१२’ ह्या स्पर्धेतील विजेत्यांना परिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण आणि सोबतच एबीपी माझाच्या टेलीकास्टींगसाठीच्या एपीसोड शूटींगचा कार्यक्रम मुंबई येथील बोस्टन हाऊस, सुरेन रोड, लँडमार्क बिल्डींगजवळ, दर्पण टॉकीज चौक, अंधेरी पूर्व येथे तारीख २७ जानेवारी २०१३, रविवारला सकाळी ११ ते दुपारी ४.३० च्या दरम्यान पार पडला. सदर कार्यक्रमाचे लवकरच  एबीपी माझा या मराठी सॅटेलाइट दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारण केले जाईल.

                मराठी ब्लॉगर्सना व्यासपीठ मिळवून देणारी 'ब्लॉग माझा' ही मराठीतली एकमेव अभिनव स्पर्धा आहे. न्यू मीडियामुळे आपल्या मराठी भाषेसमोर संधी आणि आव्हानं उभी होत आहेत. या आव्हानांचं रूपांतर संधीत करण्याचा आणि या ब्लॉगसारख्या माध्यमातील मराठीला, मराठी लेखनाला व मराठी सृजनशीलतेला दाद देण्याचा उपक्रम म्हणजे 'ब्लॉग माझा'! यंदाही या उपक्रमाला मराठी ब्लॉगर्सनी मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे परिक्षक असणारे दै.'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक श्री. अशोक पानवलकर, मराठी अभ्यास केंद्राचे संचालक श्री. दीपक पवार आणि युवा नाटककार व लेखिका इरावती कर्णिक यांच्या समोर विजेते ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान होतं. ते आव्हान निभवतांना परिक्षकांनी काय निकष  ठेवलेत, निवड प्रक्रिया कशी किचकट होती याविषयी
Blog Majha






परिक्षक पॅनेल मधले एक परिक्षक श्री दिपक पवार ह्यांच्याशी दिलखुलास चर्चा झाली. एकंदरीत मजा आली.

              १५ विजेत्यांपैकी १२ विजेते स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधता आला. "ब्लॉग माझा-३" या २०१० मधील स्पर्धेत विजेते ठरल्यापैकी श्री नरेंद्र गोळे, श्री एकनाथ मराठे आणि मी स्वत: या वेळी सलग दुसर्‍यांदा विजेते ठरलो असल्यामुळे त्यांच्याशी माझा जुना परीचय आणि मैत्री असल्यामुळे त्यांच्याशी संवाद तर झालाच पण यावेळेस नव्यानेच आलेल्यांशीही संवाद साधता आला. आंतरजालावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सोकाजीराव त्रिलोकेकर म्हणजे ब्रिजेश मराठे होय, हे सुद्धा कळून आले. सुलक्षणा लक्ष्मण प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. श्रेया महाजन यांचेकडून आणखी बरेचकाही शिकण्यासारखे आहे, याची जाणिव झाली. रोहन जगताप, तन्मय कानिटकर, प्रशांत रोटवदकर आणि इतर विजेत्यांशी संवाद साधण्याची इच्छा वेळेअभावी अपूर्णच राहिली.

                          एबीपी माझाचे असो-सिनिअर प्रोड्युसर-  अँकर, नावाप्रमाणेच सदोदित प्रसन्न भासणारे प्रसन्न 
जोशी, यांनी सर्वांचा परिचय करून घेतल्यानंतर ‘ब्लॉग माझा २०१२’ ह्या स्पर्धेतील विजेत्यांना परिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि आपापल्या ब्लॉगची माहिती सांगण्याची प्रत्येकी २ मिनीटांची ‘बाइट’, अश्या तर्‍हेने कार्यक्रमाचे शूटींग व रेकोर्डिंग करायचे असल्याची माहिती दिली. कुणी कुठे-कसे उभे राहायचे, कुठून चालायला सुरूवात करायची, प्रमाणपत्र स्विकारल्यानंतर कशी "पोझ" घ्यायची, अशा तर्‍हेच्या जुजबी सुचना देऊन शूटींग व रेकोर्डिंगला सुरूवात झाली.   
Vinod Kambli
विनोद कांबळी










            दरम्यानचे काळात प्रसिद्ध माजीक्रिकेटपटू विनोद कांबळी स्टुडियोत पोचले. त्यांचेशी प्रत्यक्ष भेट  होणे याचा आनंद  काही वेगळाच होता. विनोद कांबळी म्हणजे माझा सर्वाधिक आवडता खेळाडू. अगदी सचीन तेंडूलकर पेक्षाही माझा जीव कांबळीमध्येच जास्त गुंतायचा. सचीनची महानता मला निर्विवाद मान्य असूनही मी कांबळीवरच जास्त प्रेम का केले, याचे उत्तर मला तेव्हाही माहीत नव्हते आणि आजही मला बिनतोड स्पष्टीकरण देता येत नाही. मात्र एकेकाळी कांबळी माझा "जीव की प्राण" होता, हे नाकारण्यातही अर्थ नाही. त्याला टीममधून वगळल्यावर मला किती वेदना व्हायच्या, हे शब्दात सांगणे कठीण आहे. सचीन नावाच्या विक्रमांच्या बादशाहने एक-एक शिखर पादाक्रांत करत एकदिवसीय क्रिकेटमधील स्वप्नवत दोनशे धावांचा पल्ला गाठला तेव्हा सलाम नाबाद २००! तुंबडीगीत हे तुंबडीगीत मी उत्स्फ़ूर्तपणे लिहिले; तसे एखादे गीत कांबळीवर अजूनपर्यंत तरी माझ्या हातून लिहिले गेले नाही. मात्र यानिमित्ताने कांबळीसोबत जवळून भेटण्याचा जो योग आला तो क्षण माझ्या कायमच स्मरणात राहील.

                  कर्मधर्मसंयोगाने नेमके त्याच दिवशी प्रमोद देव साहेंबाच्या मुलीचे लग्न होते. शूटींगचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नातही जाता आले. अक्षता टाकण्याचा मुहूर्त उलटून गेला असला तरी भोजनाचा कार्यक्रम ऐन बहारात होता. मलाही त्यानिमित्ताने अक्षता न टाकताच भोजनाचा अर्थात "पंचावन्नपक्वानाचा" यथेच्छ समाचार घेता आला. योगायोग बघा, १४ जानेवारी २०१३ला मी "शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)" ही हजल लिहिली त्यातील एक शेर असा आहे.

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा



आणि ................ १३ दिवसातच आयुष्यात पहिल्यांदाच अगदी तशीच वेळ माझ्यावर आली. :)



Goa
प्रसन्न जोशी सोबत लेखक
                     मुंबईपासून माझ्या गावाचे अंतर जवळपास ८०० किलोमीटर. एवढे अंतर चालून कार्यक्रमाला जायचे किंवा नाही असा प्रश्न माझ्यासमोर उद्भवलाच नाही. कार्यक्रमाला जायचेच हा विचार आधीच पक्का झाला होता. त्यामुळे प्रसन्न जोशींची १२ जानेवारी २०१३ रोजी मेल येताच आणि प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रम १० फेब्रुवारी २०१३, रविवारला आयोजित केला आहे हे कळताच रेल्वे आरक्षण वगैरे उरकून घेतले. पण एक घोळ झाला. पुन्हा प्रसन्न जोशींची मेल आली आणि कार्यक्रमाच्या तारखेत बदल होऊन १० फेब्रुवारी २०१३ ऐवजी २७ जानेवारी २०१३ ला होणार असल्याचे कळल्याने थोडी तारांबळ उडाली. आता ऐनवेळेवर रेल्वे आरक्षण मिळेल काय, वेटींग मिळाले तर कन्फ़र्म होईल काय, सारे प्रश्नच प्रश्न. शेवटी निर्णय झाला की थेट चारचाकी वाहनानेच जायचे. भटकंती करत जायचे. कोकणात खूप खोलवर घुसायचे, तेथील जीवनशैली न्याहाळत गोवा-रत्नागिरी मार्गे मुंबईला पोचायचे. पण पुरेसा वेळ नसल्याने इष्टमित्र-मंडळींशी आणि आंतरजालीय मित्रांशी फ़ारसा संपर्कच करता आला नाही. त्यामुळे भटकंतीचा उद्देश फ़सला नसला तरी फ़ारसा सफ़लही झाला नाही.
*   *   *   *
Pandharpur
चंद्रभागेच्या तिरी - पांडुरंग हरी
 *   *   *   *
Goa
देशी-विदेशी पर्यटकांचा आवडता कोलंगुट बीच, गोवा
*   *   *   *

Goa
मंगेश मंदीर, गोवा
*   *   *   *
Goa
कोलंगुट समुद्रकिनारा, गोवा
*   *   *   *
Goa
जुने गिरिजाघर, गोवा
*   *   *   *
Goa
दोना पौला, गोवा
*   *   *   *
Goa
किनारपट्टीवरील सुर्यास्त, गोवा
*   *   *   *

काजू
कोकणचा काजू (रत्नागिरी)
*   *   *   *

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं