"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग २
सुखासीन आयुष्याचा राजमार्ग
एकंदरीतच सजीव प्राण्यांचा विचार केला तर केवळ मनुष्यजात हीच एकमेव अशी प्राणीजात आहे की ती चराचर सृष्टीतील अन्य प्राणिमात्रापेक्षा अत्यंत शारीरिक दुर्बल अशी प्राणिजात आहे. स्वसंरक्षणासाठी मनुष्याकडे कोणतेही शारीरिक सामर्थ्य नाही. त्याला वाघासारखा तीक्ष्ण नखे असणारा पंजा नाही, रेड्यासारखे शिंगे नाहीत, हत्तीसारखे दात नाहीत, हरणासारखी पळण्याची गती नाही, पक्षासारखे हवेत उडता येत नाही, माकडासारखे झाडावर चढता येत नाही आणि उंदरासारखे बिळात लपताही येत नाही. त्याला स्वसामर्थ्याने स्वतःच्या अवयवांच्या बळावर इतरांवर आक्रमण करता येत नाही, इतकेच नव्हे तर स्वतःचे रक्षण देखील करता येत नाही. जंगली श्वापदे जाऊ द्या; साध्या मुंगीपासून, मधमाशीपासून किंवा उंदरा-मांजरापासून देखील त्याला स्वतःचा बचाव करणे अवघड आहे. तरीही अत्यंत दुर्बल अशा मनुष्यप्राण्याने संबंध प्राणिमात्रावर साम्राज्य प्रस्थापित केले कारण इतर शक्तिशाली प्राण्यांकडे नसलेली विचार करण्याची एकमेव अद्भुतशक्ती मनुष्याकडे आहे आणि तिचाच वापर मनुष्यजातीने आपल्या उत्क्रांतीसाठी करून घेतला. विचारशक्तीच्या बळावर मनुष्याने साधनांची, आयुधांची निर्मिती केली आणि त्याचा उपयोग स्वसंरक्षणासोबतच इतरांवर आक्रमण करण्यासाठी करून समग्र प्राणी जगतावर स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित केले. मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा इतिहास हा त्याच्या साधनांच्या निर्मिती व विकासाच्या उत्क्रांतीचा इतिहास आहे
शारीरिक दुर्बल असल्यानेच स्वसंरक्षणासाठी मनुष्याला मेंदूचा उपयोग करणे भाग पडले. त्यातूनच त्याला साधने निर्माण करण्याची कला अवगत झाली. जो सर्वात जास्त शारीरिक दुर्बल, कमजोर अथवा हीन असतो त्यालाच वेगवान क्रांतिकारी उत्क्रांतीची गरज भासते आणि ज्याची सतत उत्क्रांती सुरू असते तोच बदलत्या स्थितीत बदलत्या काळात खंबीरपणे टिकून राहतो. भूतलावरील डायनासोरसारखे अनेक शक्तिशाली प्राणीजात लोप पावत असताना माणसाने मात्र स्वतःची मानवजात केवळ टिकवूनच ठेवली नाही तर अधिकाधिक उत्क्रांत करत नेली. हत्यार सादृश्य साधनांची निर्मिती करून स्वसंरक्षणाचा परिघ प्रशस्त करणे हा त्याचा साधन निर्मितीचा पहिला टप्पा होता. प्राथमिक अवस्थेत अन्न, वस्त्र आणि निवारा यापैकी वस्त्र आणि निवारा ह्या दोन्ही बाबीचे महत्त्व केवळ स्वसंरक्षणापुरतेच मर्यादित होते. पण कालांतराने त्याच्या स्वसंरक्षणाचे प्रश्न सुटत जाऊन निर्धोक पातळीवर पोहोचला लागल्याने त्याची विचार करण्याची पद्धत स्वसंरक्षणावरून अन्य बाबीवर केंद्रित व्हायला लागली. संरक्षणासाठी निर्माण केलेली साधने त्याला आपोआपच शिकारीसाठी उपयोगी पडून त्याचा उपयोग अन्न मिळवण्यासाठी सुद्धा व्हायला लागला.
अन्न, वस्त्र व निवाऱ्याचे प्रश्न सहज सुटून आयुष्यात किंचितशी स्थिरता आल्यानंतर त्याच्या डोक्यात सुखासीन आयुष्याची कल्पना घर करत गेलेली असावी. पण याच सुखासीन आयुष्याच्या संकल्पनेने मनुष्यजातीची जितकी हानी केली तितकी हानी अन्य कोणत्याही संकल्पनेने खचितच केली नसेल. रानटी अवस्थेपासून तर एकविसाव्या शतकापर्यंतचा मनुष्यप्राण्याचा स्वभाव बघितला तर मनुष्यप्राणी कधी एकलपणे तर कधी समूहाने सुखासीन आयुष्याच्या संकल्पनेच्या सभोवतीच पिंगा घालण्यात आपली सर्व शक्ती खर्ची घालत असल्याचे अधोरेखित होते. स्वतःचे व स्वतःच्या समूहाचे सुखासीन आयुष्य अधिकाधिक निर्धोक करण्यासाठीच एखादी अमेरिका एखाद्या इराकला बेचिराख करून टाकते. सुखासीन आयुष्याची प्रेरणाच दोन टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध, दोन समूहांमध्ये दंगल, दोन पक्षांमध्ये सत्तेची लढाई किंवा दोन देशांमध्ये विनाशकारी विध्वंसक रक्तपात घडवून आणत असते. अण्वस्त्रांच्या वापराने मनुष्यजातीचे अस्तित्वच संपुष्टात येऊ शकते इतके माहीत असून सुद्धा शंभर वेळा पृथ्वी निर्मनुष्य करू शकेल इतक्या अण्वस्त्रांची निर्मिती स्वतः मनुष्यप्राणी करून ठेवत असतो.
माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली किंवा नाही हा मुद्दा बाजूला ठेवला तरी मनुष्यजातीच्या विचारशैलीमध्ये मर्कटचेष्टा हा स्थायीभाव असतो. ह्या मर्कटचेष्टापायीच मनुष्यप्राणी सुखासीन आयुष्याच्या शोधात सदैव भटकत असतो आणि नव्याने नवनवी संकटे स्वतःवर ओढवून घेत असतो. मनुष्य कधी नराचा नारायण, कधी नारायणाचा नर, तर कधी नराचा वानर होत राहतो. आधी युद्ध मग बुद्ध, पुन्हा युद्ध पुन्हा बुद्ध. हीच वारंवारिता त्याच त्याच क्रमाने वारंवार दृग्गोचर होत राहते. हे असे दृष्टचक्र सुद्धा सृष्टिचक्रासारखे अव्याहतपणे सुरू राहते.
धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
राग, लोभ, मोह, माया, मत्सर, क्रोध यावर नियंत्रण मिळवून प्रेम, शांती, अहिंसा आणि परस्पर सद्भाव हीच खरीखुरी आयुष्याची रेशमी पाऊलवाट आहे आणि एकमेव रेशमी राजमार्ग सुद्धा हाच आहे. अगदी निःसंशयपणे!
- गंगाधर मुटे आर्वीकर
==========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग २ - दि. १ फेब्रुवारी, २०२० - सुखासीन आयुष्याचा राजमार्ग
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.