"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ६
या हृदयीचे त्या हृदयी
सांप्रतकाळात जन्माला येणारा मनुष्यजीव जन्माला येतानाच विज्ञान आणि तंत्रज्ञान सोबत घेऊन जन्माला येतो. पूर्वजन्म व संचिताचे संस्कार त्याचेवर असतात किंवा नाही, हे सांगणे अवघड आहे. परंतु गर्भात जीव पडल्यापासून त्याचेवर विज्ञान व तंत्रज्ञानाचे संस्कार व्हायला सुरू होतात. जन्मसुद्धा तंत्रज्ञानाच्या आधारानेच होतो व पालनपोषणात सुद्धा तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा असतो.
वयाच्या कोणत्याच टप्प्यात तंत्रज्ञानाची गरज नाही, असेही नसते. तंत्रज्ञान हीच मनुष्यजातीची अपरिहार्य गरज झाली असल्याने त्यापासून अलिप्त ठेवले कुणालाही अशक्य असते. पण तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा करावा, हे ठरवणे मात्र अत्यंत आवश्यक असते. बाब कोणतीही असो, त्याविषयीचा अतिरेकीपणा आणि गैरवापर हाच कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे शांतचित्ताने चिकित्सक विचार करून गंभीरतेने तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक ठरते.
आजच्या काळात उपलब्ध असलेले संगणकीय व आंतरजालीय (इंटरनेट) तंत्रज्ञान बाल्यावस्थेत असल्याने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुतूहलमिश्रित असणे स्वाभाविक आहे. त्यातूनच उपयुक्ततेच्या गणितीय हिशेबाने त्याचा वापर करताना भावनात्मक दृष्टीचा विसर पडत असावा. माणूस म्हणजे यंत्रमानव नसून भावनेच्या अविष्कारात रममाण असणारा सजीव आहे, याकडेही दुर्लक्ष होत असावे. हे सर्व लिहिण्याचे कारण की, प्रसंग कोणताही असो, सोशल माध्यमांच्या सहजसुलभ वापरामुळे शुभेच्छा व सदिच्छा देण्याचे उधाणच आलेले आहे. वर्षभर सतत येणारे सण, जागतिक दिवस, महापुरुषांपासून ते किरकोळ पुढाऱ्यांपर्यंतची पुण्यतिथी-जयंती, कुणाचा जन्मदिवस तर कुणाचा वाढदिवस, कुणाचे बारसे तर कुणाचे लग्न वगैरे वगैरे. इतके सर्व कमी पडते म्हणून की काय, त्याही पुढे जाऊन लग्नाचा वाढदिवसदेखील साजरा करण्याची संधी साधण्याची संधी दवडली जात नाही. या सर्व प्रसंगी परस्परांनाच नव्हे तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध नाही अशांनाही शुभेच्छा व सदिच्छा देण्याची सध्या इतकी रेलचेल झाली आहे की ती रेलचेल वैताग येण्याच्या पातळीवर पोचली आहे.
नवतंत्रज्ञानाच्या सहजसुलभतेमुळे एक जीताजागता मनुष्य दुसऱ्या जीत्याजागत्या मनुष्याला शुभेच्छा व सदिच्छा देत असेल तर अशी रेलचेल एकवेळ दुर्लक्षित करता येईल; पण जर जीत्याजागत्या मनुष्याऐवजी एखादे निर्जीव यंत्रच जीत्याजागत्या मनुष्याला शुभेच्छा द्यायला लागले तर काय करायचे? आता वेगवेगळे सॉफ्टवेअर बाजारात मिळतात. आपल्या संग्रही जितके ईमेल आणि मोबाइल नंबर असतील, त्या सर्वांना त्यांच्या जन्मदिवशी अमुक अमुक वेळी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे संदेश रवाना करायचे, अशी सॉफ्टवेअरना एकदा कार्यक्रम प्रणाली दिली की ते सॉफ्टवेअर न चुकता ज्याचा जन्मदिवस असेल त्याला शुभेच्छासंदेश पाठवत राहते. बँका, विमा कंपनीसहित अन्य कंपन्या, प्रतिष्ठाने, संस्था वगैरे हीच प्रणाली वापरत असते. म्हणजे आपल्याला ज्या शुभेच्छा दिल्यात त्या कुण्या व्यक्तीने नव्हे तर निर्जीव यंत्राने दिलेल्या असतात. आपला वाढदिवस आहे हे त्या यंत्राच्या मालकाच्या ध्यानीमनीही नसते. एकदा इतके उघड झाले तर शुभेच्छांनी आनंद होण्याऐवजी मनाची स्थिती उद्वेगाकडे झुकण्याची शक्यता असते.
अनेक पुढारी, पक्ष वगैरे तर नोकरांकडे किंवा एजंटकडे हे काम सोपवतात. म्हणजे एखाद्या नेत्याकडून आलेल्या शुभेच्छा या त्या नेत्याकडून नव्हे तर त्याच्या नोकरांकडून आलेल्या असतात. प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याऐवजी त्याच्या मालकाला चार मते जास्तीची मिळावीत म्हणून जर एखादे यंत्र किंवा नोकर परस्पर आपल्याला शुभेच्छा देत असतील, तर अशा प्रकाराला व्यापार-व्यवहाराचे स्वरूप येऊन मानवतेच्या परिभाषेचीच पायमल्ली होते. त्यांच्याकडे अमाप पैसा असेल, शुभेच्छा पाठवायला नोकर-चाकर असतील, पण सामान्य माणसाला भावना असते आणि तेच त्याचे सर्वस्व असते. जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे निव्वळ व्यवहारी स्वार्थच साधला जात असेल तर हा माणसाने माणसाचा घेतलेला दुरुपयोगच ठरतो.
सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नको
एका हृदयाने दुसऱ्या हृदयाला शुभेच्छा द्यायच्या असतात. या हृदयीचे त्या हृदयी असे प्रत्यक्ष शक्य नसेल तर पत्र, फोन, फेसबुक, व्हॉट्सअॅप, ईमेल वगैरे माध्यमांचा वापर करून दिल्या जाऊ शकतात, पण संदेश पाठवणारा व्यक्ती जिताजागता मनुष्य असला पाहिजे. हृदयाचे काम जर यंत्र करायला लागले, तर उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाचे रूपांतर निर्जीव यंत्रात कधी होईल ते सांगता येत नाही.
- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ६ - दि. २९ फेब्रुवारी, २०२० - "या हृदयीचे त्या हृदयी"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.==========
==========
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.