Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Mar 10, 2014

"माझी गझल निराळी" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम

कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले……..!

कोणताही साहित्यप्रकार हा त्या-त्या साहित्यिकाच्या स्वभावानुरूप आकार घेत असतो. मग ती कथा असो, कादंबरी असो, वा कोणताही काव्यप्रकार असो... कथा वाचूनही लेखकाच्या स्वभावाचे पैलू कळतात की हा लेखक कोणत्या धाटणीचा आहे. आणि कवितेत तर त्या कवीचे अंतरंगच उलगडून ठेवलेले असतात. शिवाय कवी हा इतर कोणत्याही साहित्यिकाहून अधिक संवेदनशील असतो. अगदी झाडावरून गळणारं पिकलं पान पाहून सुद्धा त्याचं मन हेलावून जातं. केवळ कविता वाचूनच जातीवंत कविचा जीवनपट नजरेसमोर उभा ठाकतो.

गझल हा तसा तंत्रानुगामी काव्यप्रकार... यात मात्रांचे, वृत्ताचे बंधन असल्यामुळे फार कमी कवी या प्रकाराकडे वळले आहेत. आणि या प्रकाराकडे वळलेल्यांमध्येही फार कमी लोकांनी चांगली गझल मराठी साहित्याला दिली आहे. गझलकारांचा आकडा शेकड्यांनी असला तरी सकस गझल लिहिणा-यांची संख्या उणीपुरीच आहे.

गंगाधर मुटे हे असेच एक उल्लेखनीय नाव आहे. मातीचं गाणं लिहिणार्‍या या कवीची नाळ मातीशी कायम जुळलेली आहे. रानमेवा हा त्यांचा काव्यसंग्रह आधीच प्रकाशित झाला आहे. मुळात शेतकरी असल्यामुळे मातीशी तसेही नाते जडलेले. शिवाय गंगाधर मुटे हे शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे शेतक-यांच्या अडी-अडचणींना, व्यथांना त्यांच्या लेखणीतून वाचा फुटलेली दिसते.

पुसतो सदा आसवांना तो पदर भुमिचा ओला
आसू पुसता हळूच पुसतो आली जाग शिवारा

अशी रचना त्यांच्या लेखणीतून सहज साकारते. अनेकदा त्यांची लेखणी पीक, पेरणी या विषयावर मार्मिक टीप्पणी करते. अशावेळी व्यथा सांगत असतानाच ते पुसटसे बंडखोर देखील होताना दिसतात... त्यांची ही एक गझल पहा...

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?

पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?

तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?

जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?

कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी भिते ना कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?

शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?

’अभय’ काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन् वसावे कसे..!

(खुरटणे = वाढ खुंटणे, तण = पिकांत वाढणारे अनावश्यक गवत, ओलणे = ओलीत करणे,पाणी देणे)

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नव्या पिकांची नवीन भाषा, मरणे कठीण झाले, भुईला दिली ओल नाही ढगाने, भाजून पीक सारे पाऊस तृप्त झाला, आत्महत्या बळीच्या तू रोख वामना, गहाणात हा सातबारा... या त्यांच्या रचना विशेषत्वाने शेतक-यांच्या व्यथा मांडणा-या आहेत. पण गंगाधर मुटे हे कुठेही एकाच विषयात अडकून पडलेले दिसत नाहीत. मातीचं गाणं लिहिणारा हा कवी शृंगार देखील काव्यात तितक्याच खुबीने मांडताना दिसतो... आणि...

ती बोलली तरी का शब्दास नाद येतो
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी

असा एखादा शेर आपल्याला वाचायला मिळतो.

मक्ता या गझलेतील एका परंपरेची कास गंगाधर मुटे यांनी धरलेली दिसते. मक्ता म्हणजे कवीचे नाव अथवा टोपणनाव असलेला शेवटचा शेर... गंगाधर मुटे हे काव्यात आपले अभय हे टोपणनाव वापरतात. मक्ता लिहिताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे मक्त्यामध्ये आपले नाव लिहिताना तेथे एखाद्या मौल्यवान शब्दाची जागा वाया तर जाणार नाही ना ? किंवा हे नाव त्या शेराच्या अर्थाला पूरक आहे ना ? या गोष्टींची काळजी घेणे. आणि अशी काळजी गंगाधर मुटे यांनी घेतलेली दिसते... मक्ता असलेले त्यांचे काही शेर पहा...

संचिताचे खेळ न्यारे... पायवाटा रोखती
चालता मी अभय रस्ता काळही भारावला

अभय एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुईसंग जगणे... भुईसंग मरणे... भुईसंग झरणे... वगैरे वगैरे

आता अभय जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना

नको रत्न मोती, न पाचू हिरे ते
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने

आत्मह्त्या बळीच्या तू रोख वामना
मी अभयदान इतके मागून पाहिले

घे हा अभय पुरावा त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती जी कोहिनूर झाली

गंगाधर मुटे यांना कवितेच्या, गझलच्या रुपाने जगण्याचे संचित गवसले आहे. म्हणूनच तर ते म्हणतात...

वृत्तात चालण्याचे शब्दास भान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

खूप काही चांगले लिहिण्याची क्षमता असणा-या गंगाधर मुटे यांना पुढील गझल लेखनासाठी शुभेच्छा...

जागतिक दृष्टिदान दिन                                           सुधाकर कदम
सोमवार, १० जून २०१३                                    जेष्ठ गझलगायक, संगीतकार
                                                                                      पुणे
=‌^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= ० =‌^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= 

0 प्रतिसाद:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं