गझलविश्वाची परिभाषा बदलणारा
गझलसंग्रह : ’माझी गझल निराळी’
मागच्या विजयादशमीलाच 'माझी गझल निराळी' हा गंगाधर मुटेंचा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि लागलीच दुसरी आवृत्ती. “वाह! हार्दिक शुभेच्छा गंगाधर मुटेजी !!” असेच उद्गार निघाले, जेव्हा ही बातमी ऐकली. या गझलसंग्रहाची प्रकाशनापूर्वीच अनेकांना प्रतीक्षा होती त्यापैकी मी सुद्धा एक होतो. शेतकर्यांच्या वेदनांची कैफियत मांडण्यासाठी त्यांनी गझल हा काव्यप्रकार निवडावा हेच मुळी धाडसाचे काम आहे. हा गझलसंग्रह विषयाच्या अनुषंगाने अद्वितीय असाच आहे. “शेतकर्यांचा आसूड” या महात्मा फुलेंच्या पुस्तकानंतर शेतकर्यांच्या जीवनाला समग्र स्पर्श करणारे लिखाण माझ्या वाचनात आले नव्हते. ही पोकळी गंगाधर मुटेंच्या समर्थ लेखणीने भरून काढली आहे.
मी तसा या प्रांतात नवखाच. दोनशेच्या आसपास गझला लिहिल्यानंतर मला अद्यापही हे उमगले नाही की नेमके मी कोणासाठी लिहीत आहे. परंतू गंगाधर मुटेंकडे मात्र याचे स्पष्ट उत्तर आहे. त्यांचे लेखन त्या तमाम कष्टकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे या उद्दाम राज्यकर्त्यांनी युगानुयुगे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे.
असेच एकदा फेसबुकवर पडणार्या शेकडो गझलांच्या पावसाचा आनंद लुटत आणि अधून मधून एखादा शेर लिहीत बसलो होतो. अनेक विषय होते - हृदय आणि त्याच्या विविध विकारांचा आशय असलेले, 'उमदा खयाल' वाले. तेवढ्यात मेसेज बॉक्स मध्ये प्रसिद्ध विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेले माझे स्नेही, अमर हबीब यांचा मेसेज डोकावला. तो असा होता- “काय हो, आपल्याला परिचित एखादा शायर आहे का, जो शेतकर्यांच्या दयनीय स्थितीवर लिहितो?” मला सुरुवातीला वाटले अमर हबीबजींना असे म्हणावयाचे आहे की “काय हो, तुम्हाला काही उद्यागबिद्योग नाही का? कसल्या गझला लिहिता? जरा ज्वलंत सामाजिक विषयाचे भान ठेवून लिहीत चला.” परंतू त्यांना खरेच कुठेतरी याच विषयावर व्याख्यान द्यायचे होते. मी विचारात पडलो 'गझल आणि शेतकरी'! बापरे!! याप्रसंगी वीज चमकल्यागत गंगाधर मुटे हे नांव माझ्या डोळ्यासमोर आले आणि लागलीच मी त्यांना गंगाधर मुटें हेच एकमेव व्यक्तिमत्त्व शेतकर्यांची गार्हाणी गझलेतून मांडते हे बिनदिक्कतपणे सांगितले होते..
एकंदर काय तर हजारोंच्या घरात आज महाराष्ट्रात मराठी गझलकारांची संख्या गेली असूनही, कास्तकारांच्या मूक वेदनांना समाजासमोर मांडणारे गंगाधर मुटे हेच एकमेव नांव! हा स्तंभ मला टाळताही आला असता परंतू मुद्दाम लिहितोय. गझलेचे अध्वर्यू सुरेश भट यांनी मराठी गझलेचे दालन येणार्या पिढ्यांसाठी खुले केले हे अंतिम सत्य. सुरेश भटांनंतर सर्वार्थाने मराठी गझलेचा झेंडा अटकेपार रोवणारे दोन व्यक्तिमत्त्व मला ज्ञात आहेत, एक इलाही जमादार व दुसरे भीमराव पांचाळे! याचा अर्थ असा मुळीच नाही की आम्ही निव्वळ सुमार लिहितो...!
काय आहे ही गझल? फक्त दोन ओळींची पूर्ण कविता? तरीही अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम. आज माझ्यासारख्या पामराकडेही १९४ अक्षरगणवृत्तं आणि ४६ मात्रावृत्तांची यादी का यावी? अर्थातच मराठी मातीत गझलेची पाळेमुळे आता अगदी खोलवर रुजू लागली आहेत. गंगाधर मुटेंच्या 'माझी गझल निराळी' या गझलसंग्रहाची पहिली आवृत्ती हातोहात संपणे हे त्याचेच द्योतक आहे!
काव्यलेखनाचा हा प्रपंच समाज घडवण्यासाठी केलेला पाहून आनंद होतो. शेतकर्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या संघर्षाची मशाल सदैव तेवती ठेवण्याचे कठीण काम गंगाधर मुटेंजीनी लीलया पेलले आहे. ८८ गझलांचा हा संग्रह गझलविश्वाची परिभाषा बदलणारा असा आहे.
घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी
या मतल्याने त्यांनी आपली गझल सुरू करून पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उठसूट गझलेचे वाटोळे करत सुटलेल्या बाजारबुणग्यांना खालील शेर बरेच काही सांगून जातो.
शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी
अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने
वातानुकूलित काव्य आणि रणरणत्या उन्हात कष्टकर्यांच्या घामातून झरणारे काव्य, इंडिया आणि ग्रामीण भारतातील फरक स्पष्ट करून जाते. हा गझलसंग्रह त्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण वाटतो.
तुझे तडाखे सोसून काया झिजून गेली सुकून गेली
तरी निसर्गा ! कुठे मनाने यत्किंचित मी खचून गेलो ?
वृत्तात चालण्याचे शब्दांस ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले!!
खरे तर गंगाधरजींची गझल सर्वच मानवी भावनांना स्पर्श करताना दिसते. त्यांची गझल बेमालूमपणे एखादवेळी गझलप्रांताच्या मूळगावी सुद्धा लाजतमुरडत जाऊन येते आणि हळुवार यौवनसुलभ वंचनांचा ठाव घेते. मग हे वेगळेपणही रसिकमनाचा ठाव घेणारे ठरते. त्यांची प्रेमरसाने ओतप्रोत भरलेली एक गझल मला बरीच भावली...
किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणे वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळुवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
ही गझल वाचली की मला हसरत मोहनीच्या गझलेची आठवण होते... उर्दू मराठीची गज़लियत समपातळीवर येत असल्याचे पाहून आनंदही वाटतो. तीच ती गझल जी गुलाम अली ने गायीली. चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है। मधील हा शेर पहा-
खेंच लेना वो तेरा परदे का कोना दफ़तन
और दुपट्टेसे तेरा वो मुँह छुपाना याद है!
देशाचा पोशिंदा हा राजकारणात चेष्टेचा विषय होवून बसला आहे. शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी उभ्या महाराष्ट्रात कुचकामी व्यवस्थेविरुद्ध संघटनेच्या माध्यमातून एल्गार पुकारला तेव्हा मी अंबाजोगाईत महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. भाईंच्या त्या बोलबाल्याच्या लढ्यात माझ्या सख्या भावाला तेव्हा शिक्षण सोडून स्वतःला झोकून द्यावे लागले होते. त्यांना प्रेरित करणारे आजही त्या सुखद क्षणांना जपतात, हा सत्याच्या जपणुकींसाठीचा आदर्श असावा. माझ्या तरुण मनाला तेव्हा वाटले होते माझा शेतकरी बाप आता युगानुयुगांच्या जोखडातून मुक्त होईल. परंतू दुर्दैवाने तो लढा पुढे कमजोर होत गेला. त्याला बळ देण्याचे काम गंगाधर मुटेंनी गझलेच्या माध्यमातून नक्कीच केले आहे. ही आशा पल्लवित करणारी 'अन्नधान्य स्वस्त आहे' ही गझल मनाचा ठाव घेणारी आहे...
कोरडा दुष्काळ तेव्हा पांढरे पक्षी दिसेना
कंच पिकलेल्या सुगीला मात्र त्यांची गस्त आहे!
वाह! किती सुंदर अभिव्यक्ती आणि किती सखोल आशयगर्भता!!
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे ?
धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला ?
भ्रष्ट नेते मोकळे अन् , कोठडीच्या आंत अण्णा !
* * *
भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे,
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा!
* * *
आस अण्णा श्वास अण्णा, 'अभय' तेचा ध्यास अण्णा.
अग्निलाही पोळणार्या, वादळाची जात अण्णा !!!!!
मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरणीच्याच जबड्यात गेला ससा
* * *
भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा
* * *
करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी
* * *
उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे, टुकार घोडे हजार आहे
* * *
बघा जरा हो बघा जरासे, कसा भामटा फुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे..
गझलकाराचे व गझलेचे वय जसजसे वाढत जाते तसतसे ते दोघेही तरुण होत जातात असे माझे गुरु तथा सुरेश भटांचे शिष्य आदरणीय प्रा. सतीश देवपूरकर म्हणतात. याचा प्रत्यय हा गझलसंग्रह वाचून येतो. गंगाधर मुटेंची गझल विविध खयालांना एकत्र घेऊन पुढे पुढे अधिकच संपन्न होत गेलेली आहे. गझल निर्मितीत चिंतनाला अतिशय महत्त्व आहे. शिवाय एखाद्या शेराच्या परिपूर्णतेसाठी तास न् तास चालणारा रियाज ही तेवढाच महत्त्वाचा असतो. वृत्तबद्ध रचनांची बांधणी म्हणावी तेवढी सोपी नाही परंतू रियाजाअंती ती सहज साध्य आहे मात्र कमीतकमी शब्दांत दांडगा विचार मांडणे तसे जिकिरीचेच काम आहे. वैचारिक प्रगल्भतेचे प्रतिबिंब तेव्हाच गझलांतून अगदी सहज उतरत जाते, जेव्हा एखादा गझलकार एखाद्या रचनेत रात्रंदिवस अडकून पडतो. दोन मिसरे एका सेकंदातही सुचू शकतात किंवा त्याला दोन दिवसही लागू शकतात. अशावेळी चिंतनाच्या विविधपैलुंची झलक एखाद्या शेरामध्ये एकाचवेळी दिसून येते. गंगाधरजींचा काही गझलांचा या अंगाने विचार केला तर त्यांची वैचारिक ठेवण गझलकार म्हणून प्रथम श्रेणीची वाटते. गझलकार हा प्रथम दर्जाचा विचारवंतही असायलाच हवा. त्यांचा हा मतला आणि काही शेर या बाबीची प्रचिती नक्कीच करून देतात. पाहा
घमासान आधी महायुद्ध होते !!
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते !!
लेऊन फार झाले, हे लेप चंदनाचे !!
भाळास लाव माती, संकेत बंधनाचे !!
'माझी गझल निराळी' च्या दुसर्या आवृत्तीत नवीन दोन गझलांची भर पडत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. 'टिकले तुफान काही' आणि 'अमेठीची शेती' या दोन्ही गझला परत शेतकर्याच्या डोक्यावरील फाटक्या आभाळाची जाणीव करून देतात. खरे आहे आपले, गंगाधरजी, अपूर्णतेची खंत घेऊन पोशिंदा आजही हळहळतो आहे.
ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही !!
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही !!
* * *
निद्रिस्त चेतनेचे, सामर्थ्य जागवाया,
पोटात सागराच्या घुसले तुफान काही !!
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक़सद नही,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ।
* * *
मेरे सीने में नही तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकीन आग जलनी चाहिए।
गंगाधर मुटे यांना 'माझी गझल निराळी' च्या दुसर्या आवृत्ती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !!
- राज पठाण
अंबाजोगाई, जि. बीड.
दि. ०६ मार्च, २०१४
== ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.